इब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करताना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट अपारंपारिक जीवन जगणार्या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते; अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो. अशा टोळ्यांना प्रस्थापित नागरी समाजजीवनात स्थान नसते आणि त्या टोळ्यांवर अशा राजसत्तेची हुकूमतही चालत नसते. त्यांना प्रस्थापित समाजात स्थानही नसते. त्याचवेळी अशा टोळ्या प्रस्थापित नागर समाजाच्या जीवनमूल्यांचा कमालीचा द्वेष करीत असतात. म्हणूनच त्या टोळ्य़ा नेहमी प्रस्थापित नागरी समाज व त्याची जीवनमुल्ये व सत्ता उध्वस्त करण्यासाठी टपलेल्या असतात. प्रस्थापित समाजाला व त्यांच्या सत्तेला त्या टोळ्यांपासून कायम संरक्षणाची गरज भासत असते. कारण ह्या विस्थापित टोळ्या व त्यातले वंचित लोक, प्रस्थापिताला उध्वस्त करायला कायम धडपडत असतात. जेव्हा त्यापैकी एखादी टोळी प्रस्थापित सत्तेला उध्वस्त करून राजसत्ता काबीज करते, तेव्हा कर्तव्य म्हणून तिला सत्ता पुढे राबवावीच लागते. मग जसजशी नवी टोळी वा तिचे म्होरके राजकीय सत्ता राबवू लागतात; तसतसे त्यांचेही नागरीकरण होत जाते. त्यांच्यातल्या असंस्कृत अपारंपारिक प्रवृत्ती मावळू लागतात. त्यांच्यातली लढायची इर्षा वा वृत्ती निष्क्रिय होत जाते आणि जी सत्ता मनगटाच्या ताकदीवर संपादन केली; तिच्याच रक्षणासाठी त्या सत्ताधार्यांना टोळीबाहेरचे लढवय्ये भाड्याने वेतनावर मिळवावे लागतात. असे वेतनदार भाडोत्री ‘लढवय्ये’ टोळीसारखे निष्ठावान नसतात. म्हणूनच टोळ्यांच्या लढण्याच्या क्षमतेसमोर हे भाडोत्री लढवय्ये कमी पडू लागतात. थोडक्यात जीवावरचा जुगार खेळायची तयारी असलेले टोळीवाले (परके, बाहेरचे, आक्रमक) आणि हाती असलेली सत्ता वाचवायच्या बचावात्मक पवित्र्यात असलेले प्रस्थापित सत्ताधारी व त्यांचे भाडोत्री लढवय्ये; यांच्यातला हा सत्तासंघर्ष होतच असतो. त्यात आपल्या रानटी क्रौर्यामुळे बहुधा टोळीवाल्यांचा विजय होतो. असाबियामुळे म्हणजे टोळीतील परस्परांसाठी जीव देण्याच्या प्रत्येकाच्या बांधिलकीमुळे त्यांची सरशी होत असते. त्यात मग आधीची प्रस्थापित सत्ता वा व्यवस्था उध्वस्त होऊन जाते. तिची जबाबदारी नव्या टोळीने उचलून सत्ता राबवली; तर मग सत्तांतर नव्हेतर राजकीय स्थित्यंतर होते. ती जबाबदारी त्या जेत्या टोळीने उचाललई नाही तर पुन्हा आधीचीच खिळखिळी झालेली पराभूत सत्ता; नागरी समाजाची व्यवस्था डागडुजी करून कारभार चालवत रहाते. पण सत्ता म्हणून तिची शान व हुकूमत शिल्लक उरलेली नसते. ती नवनव्या आक्रमणाचा बळी होतच रहाते. थोडक्यात लुटमारीची शिकार यापलिकडे मग त्या समाजव्यवस्थेला अर्थ नसतो.
असे का होते? तर आधीची सत्ता ज्या टोळीने प्रस्थापित केली, त्या टोळीत लढणार्यांमध्ये बंधूभावाची एक निष्ठा प्रखर असते. एकमेकांसाठी जीव देण्याच्या मनस्थितीने त्या टोळीतले सर्वजण लढायला सज्ज असतात. त्यात कोणी राजा वा गुलाम नसतो. पण टोळीचा नेता नायक असतो, त्याच्या निर्णयशक्तीला सर्व सहकारी मान्यता देऊन त्याच्या शब्दाचा मान राखत असतात. परंतू आपली ताकद आपल्या सहकार्यांच्या निष्ठा व पराक्रमात सामावलेली आहे, याचे भान ठेवून तो म्होरक्या वागत असल्याने त्यांच्यामध्ये समता, बंधूता नांदत असते. सहाजिकच त्या टोळीने प्रस्थापित सत्ता उध्वस्त करून नवी राजसत्ता उभी केल्यास; त्यात तोच टोळीनायक वा म्होरक्या राजा होतो. बाकीचे त्याला राजा मानतात. पण राजसत्ता राबवताना तो नवा सत्ताधीश आपल्या सहकार्यांना सन्मानाने व सहाध्यायी म्हणूनच वागवत असतो. सर्व समान खेळाडूंच्या संघातला अंतिम निर्णय घेणारा संघनायक, इतकीच त्या टोळीनायकाची महत्ता असते. त्यापेक्षा त्याचे सहकारी त्याला मोठा मानत नाहीत, की तो नवा ‘राजा’ही स्वत:ला महापुरूष मानत नाही. त्यामुळेच नवी सत्ता सुरळीत चालू शकते. हाती आलेली सत्ता टिकवण्याची ताकदही त्या नव्या राजा व त्याच्या सहकार्यांमध्ये असते. मात्र जसजशी ही टोळी नवे सत्ताधारी म्हणुन प्रस्थापित होऊन नागरी समाजात रुपांतरीत होऊ लागतात; तसतशी त्यांच्यातली लढण्याची व प्राण पणाला लावण्याची इर्षा व इच्छा मावळत जाते. सुखवस्तू जीवनाची चटक लागून त्यांच्यातला लढवय्या शिथील व उदासिन होत जातो. पण हाताशी साधनसंपत्ती आलेली असते. त्यातून मग वेतनावर लढणारे भाडोत्री सैनिक लढवय्ये जमा केले जातात वा सेना उभारल्या जातात. हा सगळा घटनाक्रम राजाच्या पुढल्या पिढीच्या समोर घडत असतो. म्हणूनच सत्ता वा राजघराणे प्रस्थापित करणार्याच्या पुढल्या पिढीतला वारस आपल्या पित्याकडून नागरी सत्ता राबवण्याचे यशस्वी धडे घेतो. पण एकमेकांसाठी प्राण पणाला लावण्याची वृत्ती त्याला वारशात मिळत नसते. त्याचप्रमाणे पित्याच्या सहकार्यांच्या दुसर्या पिढीलाही समतेच्या मानसिकतेचा अनुभव येत नसतो. सहकार्यांना सरदार म्हणून मिळालेल्या सत्तेवर वाढणार्या त्यांच्या दुसर्या पिढीत त्यांचे हितसंबंध व स्वार्थ प्रस्थापित व्यवस्थेमध्ये गुंतलेले असतात. सहाजिकच मनगटशाहीने वा कर्तृत्वावर सत्ता हस्तगत करणे, हा विषय हळुहळू विस्मृतीमध्ये जात असतो.
दुसर्या पिढीने किमान आपल्या पित्याच्या सान्निध्यात टोळी जीवनातील समता बंधूता बघितलेली असते व काही प्रमाणात अनुभवलेली असते. त्यामुळेच मग काही प्रमाणात तरी त्यांच्यात ‘असाबिया’ म्हणजे परस्पर बंधूता, निष्ठा व बांधिलकीचे गुण टिकून असतात. एकमेकांशी वागण्या बोलण्यात त्याची चिन्हे दिसतात. पण त्याचवेळी राजा व त्याचे निष्ठावान अशी विभागणी सुरू झालेली असते. राजाच्या कृपेचे धनी अशी भावना टोळीतील इतरांमध्ये दुसर्या पिढीतच रुजू लागलेली असते आणि राजाचा वारस असतो, त्याला कर्तबगारीशिवाय हुकूमत गाजवण्याची सवय अंगवळणी पडू लागलेली असते. किंबहूना हळुहळू त्यांच्यात अस्थिर व विस्थापिताचा तिटकारा आणि प्रस्थापिताचे आकर्षण निर्माण झालेले असते. टोळीजीवनाचा लोप होत असतो. सहाजिकच धाडस व आक्रमकता कमी होते व हाताशी आहे, त्यावर मौज करण्याची आळशी बचावात्मक वृत्ती मूळ धरू लागते. नागर समाजाच्या उत्पादकतेच्या उद्यमी वृत्तीला सुरक्षा बहाल करण्याच्या बदल्यात मिळणार्या उत्पन्न, कर किंवा खंडणीच्या बदल्यातले सुखवस्तू जीवन, नव्या सत्ताधीशातला लढवय्या निकामी करीत असते. किंबहूना सुखवस्तू जीवन सोडून लढणे व स्वत:ला इजा करून घेण्याची सवय मोडीत जात असते. अशा अनुभवातून तिसरी पिढी वयात येत असते. तिला तर ऐषाराम केवळ आपल्या खानदानाचा जन्मदत्त अधिकार वाटणे स्वाभाविक आहे. भोवताली पित्याची खिदमत करणारे मान्यवर सरदार, अधिकारी पाहूनच अक्कल येणार्यांना मग शारिकीक कष्ट वा मेहनत, कर्तबगारी मुर्खपणा वाटल्यास नवल नसते. त्यामुळेच मग आपल्याच आजोबाने जीवाची बाजी लावून राज्य वा सत्ता मिळवल्याच्या कहाण्या त्या तिसर्या पिढीला गमतीशीर वाटतात. पराक्रम हे दुय्यम दर्जाहीन काम असल्याची धारणा घेऊनच ही तिसरी पिढी सत्तेचा उत्तराधिकारी व्हायला पुढे येत असते आणि तिच्या भोवतीचे तितकेच सुखवस्तू जीवनाला चटावलेले होयबा सोबती समता, बंधूता विसरून गुलामी मनापासून स्विकारलेले कर्तृत्वहीन कारस्थानी साथीदार असतात. त्यांच्या निष्ठा व श्रद्धा या गुणवत्ता वा कर्तबगारीपेक्षा आपापल्या सोयी व स्वार्थाशी निगडीत म्हणून सत्तानिष्ठ असतात. थोडक्यात साम्राज्य वा राजसत्ता प्रस्थापित करणार्या ‘असाबिया’ मानसिकतेचा अस्त होऊ लागलेला असतो. ज्या प्रस्थापित सत्तेला वा व्यवस्थेला उध्वस्त करून या विस्थापित टोळीने सत्ता मिळवलेली असते, ती रानटी टोळी पुर्णपणे नागरी मानसिकतेची होऊन बचावात्मक पवित्र्यात येत जाते. ज्या मनगटाच्या ताकदीवर सत्ता मिळवलेली असते, ती लढण्याची क्षमताच असे सत्तधीश गमावून बसतात आणि नव्या ‘असाबिया’ प्रभावित टोळीचे शिकार होण्यापर्यंत दुबळे होऊन जातात. त्यांच्यातली बंधूता व परस्परांसाठी प्राणाची बाजी लावण्याची टोळीनिष्ठा संपून प्रस्थापितामधले स्वार्थ प्रभावी होत जातात; हेच त्या दुबळेपणाचे खरे कारण असते. परंतू जोपर्यंत प्रस्थापिताच्या प्रभावापलिकडली दुसरी कुठली त्या सत्तेच्या परिघाबाहेरची टोळी नव्या जिद्दीने आव्हान देऊन समोर येत नाही, तोपर्यंत अशी दुबळी सत्ता आपल्या जागी अस्थीर, पण बस्तान मांडून टिकते.
अर्थात अशा प्रस्थापित सत्तेमध्ये किंवा त्या दोनतीन पिढ्या टिकलेल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये काही किरकोळ उलथापालथी होत असतात. कधी राजाचा पुत्र वा वारस झुगारून सहकार्याचा पुत्र वा पुतण्या सत्ता बळकावतो. कधी त्यांच्यातलाच कुणी एक सहकारी राजाला बाजूला सारून सत्ता काबीज करतो. कधीकधी त्याच सत्तेच्या व्यवस्थेच्या परिघातलाच कोणी दुबळ्य़ा वारसाला बाजूला सारून सत्तेमध्ये काहीसे परिवर्तन घडवून आणतो. पण बारकाईने बघितले तर मूळ व्यवस्था कायम असते. तिच्यातल्या विविध हितसंबंधांची पुरेपुर काळजी नवा सत्ताधीश घेत असतो आणि सत्तेची घडी विस्कटणार नाही, इतकाच फ़ेरबदल होत असतो. थोडक्यात सत्तेचा व प्रस्थापिताचा चेहरा बदलला, तरी आत्मा कायम असतो. परंतू तिसर्या पिढीमध्ये सत्ता व व्यवस्था खिळखिळी होण्याची प्रक्रिया ‘असाबिया’च्या अभावी सुरू झालेली असते. कारण सत्ताधारी वर्गामध्ये समता व बंधूतेचा अस्त होऊन गेलेला असतो. त्यात राजा व गुलाम, हुकूमशहा व हुकूमाचे ताबेदार अशी स्थिती आलेली असते. पण त्यातच आपापले हितसंबंध असल्याने सहसा कोणी त्याबद्दल तक्रार करीत नाही. ज्या आत्मसन्मान व अस्मितेसाठी टोळीतील आरंभीच्या सहकार्यानी सर्वस्व पणाला लावलेले असते; त्यांचेच वंशज अस्मितेला तिलांजली देऊन सुखवस्तू गुलामीचे पूजक होऊन जातात. मग तिसर्या पिढीत राजाने लाथा घातल्या, अपमानित केले; तरी त्यातच धन्यता मानण्य़ाची मानसिकता बळावलेली असते. कारण आत्मसन्मानापेक्षा सुखवस्तू जीवनाची चटक हे प्राधान्य बनलेले असते. कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज वाटेनाशी झालेली असते, किंबहूना त्याला हीन दर्जाचे काम मानले जात असते. तिथूनच मग पुन्हा नव्या टोळीने असाबियाच्या कुवतीवर या कर्तॄत्वहीन सत्तेला व त्यांच्या व्यवस्थेला उलथून पाडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होते आणि अशा अनेक लहान मोठ्य़ा टोळ्या व गट सत्ता परिघाच्या बाहेर त्याच हेतूने कार्यरत असतात. त्या व्यवस्थेच्या परिघाला धडका देतच असतात. त्यातून ही प्रस्थापित सत्ता अधिकच खिळखिळी होत जाते आणि परिघाबाहेरचा कुणी धाडसी आक्रमक नेता, आपल्या सहकार्यांना आवश्यक हिंमत देऊ शकला, तर ‘असाबिया’च्या बांधिलकीतून प्रस्थापित व्यवस्था उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते.
तिसरी पिढी येईपर्यंत सत्ता काबीज करणार्या टोळीच्या वंशजांनी असाबिया म्हणजे अस्मिता गमावलेली असते. त्यांच्या निष्ठा राजसत्तेशी म्हणून राज्यकर्त्याशी निगडीत दिसतात. पण प्रत्यक्षात सत्ताधारी वर्तुळातील वर्गाच्या निष्ठा सत्तेशी म्हणजे त्या सत्ता व व्यवस्थेमध्ये गुंतलेल्या आपापल्या स्वार्थाशी हितसंबंधांशी निगडीत असतात. सत्ता मिळवण्यासाठी आलेल्या टोळीतील त्यांच्या पुर्वजांनी सामुहिक अस्मितेची लढाई केलेली असते. त्यासाठी बलिदान दिलेले असते. पण आता टोळीची अस्मिता मागे पडून, स्वार्थाने प्रवृत्त होण्यापर्यंत घसरण झालेली असते. सहाजिकच हे सगळे व्यवस्थेचे गुलाम झालेले असतात. आपापल्या स्वार्थासाठी व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी ते एकत्र असतात. त्यालाच मग तिसर्या वा चौथ्या पिढीतला राजा आपल्याशी बांधलेल्या निष्ठा समजत असतो आणि आपल्या निष्ठावंतांवर अरेरावी करीत हुकूमत गाजवत असतो. दुबळे सरदार व इच्छा गमावलेले साथीदार यांच्या बळावर ती सत्ता फ़ारकाळ टिकू शकत नसते. तिला आव्हान देणार्या कुणा धाडसी आक्रमकाची प्रतिक्षा इतिहास करीत असतो. जेव्हा असे आव्हान उभे ठाकते; तेव्हा व्यवस्थेत स्वार्थ व हितसंबंध गुंतलेला प्रत्येकजण सत्तेच्या समर्थनाला हिरीरीने पुढे येतो. पण लढायला तयार नसतो. त्यातला कोणीही अंगाला झळ लागू न देता व्यवस्था सुरक्षित रहावी म्हणून धडपडू लागतो. तीच व्यवस्था टिकवण्यासाठी तिच्यात मूलभूत बदल करून नालायक सत्ताधीशाला हाकलण्याचे सामर्थ्य सगळेच गमावून बसलेले असतात. त्यामुळेच मग ती व्यवस्था नागर समाजासाठी बोजा झालेली असते. म्हणूनच ती व्यवस्था कुणा आक्रमकाने वा बाहेरून आलेल्याने मोडीत काढावी लागते. त्या आक्रमणाला व्यवस्थेतला कोणी तोंड देऊ शकत नाही. आणि सत्ताधारी वर्तुळाच्या तावडीतून सुटायला नागर समाजही उतावळा होत जातो. आळशी, ऐदी व खुशालचेंडू सत्ताधीश नागर समाजाला रक्तशोषकासारखे लुबाडत असतात. त्यापेक्षा बाहेरून येणारा कोणी आक्रमक रानटी सुद्धा परवडला; अशी त्या समाजाची मानसिक अवस्था होत जाते. त्यामुळेच अशा सडलेल्या, निकामी व कालबाह्य व्यवस्थेला बाजूला करण्यासाठी कुणा बाहेरच्यालाच पुढाकार घ्यावा लागतो. जो दुरान्वयेही त्या प्रस्थापित व्यवस्थेचा घटक नसतो. भारतात म्हणजे हिंदूस्तानच्या इतिहासात आक्रमकांनी प्रस्थापित केलेली साम्राज्ये व सत्तांची यादीच आपल्याला बनवावी लागते. त्या यादीतले शेवटची प्रस्थापित व्यवस्स्था नेहरू विचारसरणीचा परिवार आहे. आधीची दोन दशके आणि स्वातंत्र्योत्तर सहासात दशकांचा कालखंड घेतला तर तेच झालेले दिसेल. राहुल गांधी यांनी परवा आपल्याच कृपाप्रसादाने पंतप्रधान झालेल्या मनमोहन सिंगांची केलेली अवहेलना याच पार्श्वभूमीवर बघावी लागेल.
राहुल ही कॉग्रेस प्रमाणेच ब्रिटीशोत्तर भारतीय राजकारणातील चौथी पिढी आहे. नेहरूंनी आपल्या सहकार्यांना समता बंधूतेने वागवले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य करून लढवली; ती राष्ट्रीय अस्मितेची लढाई होती. पण पुढल्या कालखंडात त्यातला असाबिया म्हणजे अस्मिता लयास गेली. तिसर्या पिढीतच कॉग्रेसजन असणे म्हणजे नेहरू खानदानाचे गुलाम व त्यांच्या कृपेने पदरात पडेल त्यावर समाधानी असण्याची प्रवृत्ती बळावत गेली. नेहरू वाक्यम प्रमाणम ही मानसिकता बुद्धीवाद्यातही दिसते. नाममात्र पक्ष व संघटना; बाकी नेहरूंच्या वंशजांची निरंकुश हुकूमत; हेच राजकारणाचे सुत्र राहिले. अगदी त्याला वाजपेयी यांच्यासहीत बिगर कॉग्रेसी सत्ताधारी सुद्धा अपवाद म्हणता येणार नाहीत. कारण गेल्या सहा सात दशकात दिल्लीची सत्ता बळकावणारे वा उपभोगणारे बघितले, तर ते (देवेगौडांचा अपवाद करता) सगळेच्या सगळे दिल्लीच्या सत्ता वर्तुळातले आहेत. त्यांचे पक्ष वा विचारसरण्या भिन्न वाटल्या, तरी त्यापैकी कोणी नेहरूंच्या वैचारिक राजकीय व्यवस्थेला धक्का लावलेला नाही. त्यात मूलगामी बदल करण्याचा प्रयास केलेला नाही. आणि कुठल्याही पक्षाचे नेते-म्होरके असोत, त्यांनी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळाच्या बाहेरून येऊ बघणार्या बलशाली राजकारण्याची दिल्लीत डाळ शिजू दिलेली नाही. काहीकाळ तरी दिल्लीत येऊन स्थिरावलेल्या व दिल्लीच्या सत्ता वर्तुळाचा घटक झालेल्यांनाच देशाच्या सार्वभौम सत्तेवर हक्क सांगता आलेला आहे. जेव्हा कोणी दिल्लीसाठी उपरा असलेला नेता तसा प्रयास करू लागला; तेव्हा सर्वच्या सर्व विचारांच्या व संघटनातील दिल्लीकरांनी त्याच्या विरोधात एकजुट केलेली दिसेल. म्हणूनच सात आठ दशकातील सत्तेला नेहरू घराण्याचीच राजवट मानावे लागते. मोदी हा त्या अर्थाने आक्रमक वा बाहेरचा आहे आणि तो प्रस्थापित नेहरू राजवटीला आव्हान देण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. जे काही स्वातंत्र्योत्तर काळात चालू आहे, ते तसेच पुढे चालवण्याची त्याची तयारी नाही आणि त्यात आमुलाग्र बदल करण्याचा मनसुबा घेऊनच ह्या लढवय्याने पाऊल उचलले आहे. मोडकळीस आलेली प्रस्थापित नेहरूवादी व्यवस्था व राजकीय सत्ता यांना परिघाबाहेरून धडका देणारे अनेक गट त्यामुळेच मोदी भोवती जमा होऊ लागले आहेत. या व्यवस्थेने गांजलेले, नाडलेले, शोषण झालेले सगळे घटक, या व्यवस्थेच्या तावडीतून सुटायला उतावळे झालेले आहेत. त्यांच्या आकांक्षांना मोदी नावाचे स्वप्न भुरळ घालते आहे.
नरेंद्र मोदी ह्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीने त्यांच्याच पक्षातील अनेक दिग्गजांसह राजकारणातील बहुतेकांना अस्वस्थ करून सोडले आहे. तितकेच विविध क्षेत्रातील प्रस्थापित जाणकार बुद्धीमंतही मोदींच्या आव्हानाने विचलीत झालेले दिसतात, त्याचे हेच कारण आहे. आपण बारकाईने मोदींच्या विरोधात उभे असलेल्या व विविध मार्गाने त्यांना रोखू बघणार्यांना अभ्यासायला हरकत नाही. त्यातला प्रत्येकजण आजच्या प्रस्थापित व्यवस्थेत आपापले स्वार्थ जपणारा व तेच हितसंबंध धोक्यात आल्यासारखा भयभीत झालेला दिसेल. पक्ष, विचारसरणी, तत्वज्ञान, व्यवसाय अशा विविध घटकातून मोदींना एकमुखी विरोध करणार्यांचे प्रस्थापित चारित्र्य असे दिसेल, की त्यांचे हितसंबंध आजच्या व्यवस्थेत गुंतलेले आहेत. मोदी यांचे यश म्हणजे आपल्या हितसंबंधाला बाधा, अशी त्यांची पक्की धारणा आहे. म्हणूनच अन्य सर्व मतभेद गुंडाळून अशी परस्पर विरोधी क्षेत्रातली मंडळी मोदी विरोधात एकवटलेली दिसतील. कारण सात आठ दशकांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सत्तेच्या प्रस्थापित वर्तुळाच्या बाहेरचा कुणी दिल्लीच्या सत्तेला आव्हान द्यायला पुढे सरसावलेला आहे. तो दिसायला भाजपासारख्या एका प्रस्थापित राष्ट्रीय पक्षाचा नेता आहे. पण त्याची कार्यशैली व त्याचे सवंगडी, पाठीराखेही प्रस्थापिताच्या संकल्पनेला छेद देऊन पलिकडे जाणारे आहेत. अनेकदा मोदी यांच्यावर व्यक्तीमहात्म्याचे स्तोम माजवण्याचा आरोप होत असतो. पण वास्तवात वंचित, दुबळ्या, गांजलेल्या, नाडलेल्या, दुर्लक्षित समाज घटकांच्या नव्या अस्मितेचा हुंकार म्हणून मोदी एक प्रतिक बनले आहेत. प्रस्थापितापेक्षा वेगळे व वेगळा मार्ग चोखाळू पहाणारे म्हणून त्यांच्या भोवती नव्या निष्ठांचे जाळे विणले गेले आहे. दबलेल्या, चिरडल्या गेलेल्या व नाकारल्या गेलेल्या समाज घटकांतून मग एक ‘असाबिया’ उदयास आलेला आहे. गेली दहा वर्षे मोदींची ज्या प्रकारे अवहेलना व विटंबना करण्यात इथल्या प्रस्थापित वर्गाने धन्यता मानली; त्यातूनच करोडो संख्येतील नाकारल्या व हिणवल्या गेलेल्या दुर्लक्षित वर्गाला समदु:खी माणूस नेतृत्व करणारा सापडला आहे. त्याच्याविषयीची सहानुभूती मग त्याच्याविषयीच्या बंधूत्वाचे रुप घेऊन फ़ोफ़ावत गेली आहे. मोदीविषयक जनमानसातले आकर्षण त्यातून आलेले आहे.
कॉग्रेसचे एक अभ्यासू व्यासंगी नेते व केंद्रिय मंत्री जयराम रमेश यांनी मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे पहिलेच गंभीर आव्हान आहे, असे विधान केले. त्यामागची कल्पना ही अशी ऐतिहासिक आहे. म्हणूनच आजच्या राजकारणात मोदींचा उदय प्रचलीत राजकारणाचे निकष लावून उलगडता वा समजून घेता येणार नाही. मानवी इतिहासातली ‘असाबिया’ची मानसिकता समजून घेतली, तरच मोदीविषयक आकर्षणाचा अर्थ शोधता येईल. उमगू शकेल. तरच राहुल गांधींच्या पोरकटपणा व बालीशपणा समोर वयोवृद्ध कॉग्रेसजन नतमस्तक का होत आहेत; त्याचा उलगडा होऊ शकेल. अगदी जाणकार, बुद्धीमंत वा अभ्यासकही आज इतके सैरभैर का झालेले आहेत, त्याचे कोडे सोडवता येऊ शकेल. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात मोदींच्या उदयाने उदभवलेल्या त्याच ‘असाबिया’ मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयास केला आहे.