शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

कसाब फ़ाशी गेला, उद्या काय करायचे?ही दोन माणसे महत्वाची २६/११ प्रकरणात. एकाने आपला प्राण पणाला लावून जगातला पहिला जिवंत फ़िदायिन पकडला; तर दुसर्‍याने आपली सर्व बुद्धी पणाला लावून त्याला न्यायाच्या कसोटीवर गुन्हेगार ठरवत फ़ाशीच्या दोरात अडकवला.


   होय, कबाब मेला. फ़ासावर लटकला. त्याला आता शंभरहून अधिक तास उलटून गेले आहेत. त्याने रंगवलेल्या रक्तरंजित नाटकाला उद्या चार वर्षे पुर्ण होत आहेत. मग आपण काय करणार आहोत? कसाब मेला किंवा फ़ासावर लटकला म्हणजे आपले जीवन सुखरूप सुरक्षित झाले आहे काय? ज्याच्यासाठी त्या तुकाराम ओंबळेने किंवा करकरे, साळसकर, कामटे वा उन्नीकृष्णन इत्यादींनी आत्मसमर्पण केले, त्यांचा या फ़ाशीतून आपण सन्मान केला आहे काय? त्यांनी बलिदान केले तेव्हा अनेकजणांनी गेटवेपाशी जाऊन मेणबत्त्या पेटवल्या आणि आपली जबाबदारी संपली ना? या शहिदांच्या मोठमोठ्या अंत्ययात्रा काढल्या आणि ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्यावर आपली जबाबदारी संपली ना? कोण अमर राहिला आहे त्यात? आपल्याला त्यांची आठवण तरी आहे काय? जिथे त्यांचे आत्मसमर्पण झाले त्याच परिसरात अडिच महिन्यांपुर्वी दिवसाढवळ्या एक भीषण दंगल झाली आणि त्याच छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये महिला पोलिसांच्या अब्रूशी खेळ करण्यात आला. यासाठी त्या शहिदांनी आत्मसमर्पण केले होते का? त्यांनी कोणासाठी बलिदान केले, त्याचेही आपल्याला स्मरण उरलेले नाही. म्हणुनच वारंवार असे प्रसंग येत आहेत, संपलेले नाहीत. कारण ओंबळे किंवा अन्य शहिदांनी कशासाठी व कोणासाठी आत्मसमर्पण केले, तेच आपल्याला कळलेले नाही. त्यांनी इतके दिवस पगार घेतला, तो कधीतरी असे मरावे लागणार यासाठीच घेतला होता; असा आपला समज आहे काय? तसे असेल तर मग मेणबत्त्या कशाला पेटवायच्या? श्रद्धांजलीचे फ़लक कशाला लावायचे?

   त्या दिवशी बुधवारी वाहिन्यांवरच्या किंवा कुठल्याही चर्चेत कसाबच्या फ़ाशीबद्दल बोलले जात होते. किती वाजता त्याला फ़ाशी दिले, कोणी त्याला मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगातून पुण्याला कसे गुपचुप नेले. तिथे त्याची कशी बडदास्त ठेवण्यात आली. त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळताना त्याला काय सांगण्यात आले वा विचारण्यात आले. त्याला काय खाऊ घातले, अशी मौजमजा चालू होती. पण तो फ़ासावर लटकण्यासाठी एका ओंबळे नावाच्या माणसाने आपले प्राण पणाला लावले; त्याचे कोणाला स्मरण नव्हते. कसाबला पकडला कसा ते सांगण्यापुरता ओंबळेचा उल्लेख आला जरूर. पण जगातला एकमेव फ़िदायिन जिहादी पकडण्याचा पराक्रम करताना तुकाराम ओंबळे शहीद झाला, त्याचे कुणाला कौतुकही नव्हते. जणू ओंबळेसारखे पोलिस व उन्नीकृष्णन सारखे सैनिक मरायलाच जन्माला येतात. तेव्हा त्यांच्या कौतुकावर चार शब्द खर्चायची कुणा शहाण्याला गरज वाटली नाही. त्यापेक्षा या लोकांनी पालघरच्या त्या कुणा थिल्लर मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावरच अधिक तोंडाची वाफ़ दवडली. आणि आता उद्या देखील हीच ढोंगी मंडळी २६/११ चे स्मरण म्हणून त्या शहिदांच्या नावाने गळा काढतील. पण शहीद म्हणजे कोण? त्याने देशासाठी, समाजासाठी काय के्लेले असते, त्याचा तपशील कोणीच बोलणार नाही. ओंबळे असो की करकरे असोत, त्यांनी कसाब किंवा त्यांच्या टोळीचा मुकाबला करताना हौतात्म्य पत्करले, असे सांगणे त्यांच्या आत्मसमर्पणाचा अपमान आहे. कधीतरी तशी वेळ येईल असे गृहीत धरूनच ही मंडळी त्या पोलिस खात्यात, सैन्यात वा सुरक्षा दलामाध्ये भरती होत असतात. आणि जिथे तसा प्रसंग ओढवला तिथे आपल्या प्राणाची बाजी लावत असतात. त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्या कामातल्या चुकांची सतत छाननी कोण करत असतो?  

   बारकाईने बघा आणि आठवा. काश्मिर वा आणखी कुठे सैनिकी वा लष्करी कारवाईमध्ये जेव्हा एखादा किंवा अनेक सैनिक मारले जातात, तेव्हा त्यांची नावेही माध्यमातून प्रसिद्ध होत नाहीत. आठ दहा वा पंधरा जवान शहिद, अशी बातमी असते. त्यांची छायाचित्रेही प्रकाशित होत नाहीत. सैनिकी इतमामाने त्यांच्या गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले जातात. तिथल्या स्थानिक वृतपत्रात एखादी बातमी वा छायाचित्र प्रसिद्ध होते आणि मग सर्वकाही विसरले जाते. आजवर कित्येक हजार असे सैनिक पोलिस अशा घातपाती वा जिहादी कारवायांचे बळी झालेले आहेत. त्यांच्या त्या बलिदानावर दरडोई एक मिनिट या हिशोबाने तरी कधी चर्चा वाहिन्यांवर झाल्या आहेत काय? त्यापेक्षा आपण कुठले थेट चित्रण प्रक्षेपित केले, त्यासाठी स्वत:ची पाठ थोपटू्न घेण्याचे काम चालू असते. आणि जेव्हा ते काम नसते; तेव्हा कुठल्या शहरात वा अन्यत्र पोलिसांनी लष्कराने अत्याचार केले, त्याच्या रसभरीत कहाण्या सांगण्य़ात ही मंडळी गर्क असतात. अशावेळी सैनिकी वेशातील जवान वा पोलिसी गणवेशातले पोलिसही माणसे आहेत व त्यांनाही मानवी भावना आहेत. याचे भान बौद्धीक पोपटपंची करणार्‍यांना कधी असते काय? एका छोट्या पालघर नावाच्या शहरात पोलिसांनी एका मुलीला ताब्यात घेण्याची घाई केली; तर अवघ्या पोलिस दलावर ठपका ठेवण्याची स्पर्धाच वाहिन्यांवर चालू होती. त्यावेळी हेच पोलिस दिवसरात्र सुरक्षेसाठी घरदार सोडून जीवाचे रान करतात, याची जाणीव कोणी ठेवायची असते?

   एक विशीतली मुलगी आपल्याला बंदमुळे घरात अडकून पडावे लागले, म्हणुन फ़ेसबुकवर तक्रार करते व अवमानकारक काही लिहिते. तेव्हा लोकभावना प्रक्षुब्ध होण्याचा धोका लक्षात घेऊन तिथले पोलिस तिला ताब्यात घेतात, तर बोंबाबोंब कोणी केली होती? कोणत्या अधिकारात पोलिसांनी तशी कारवाई केली; असा जाब विचारणार्‍यांना चार वर्षापुर्वी अनेक पोलिस अधिकार्‍यांनी नेमका तसाच आगावूपणा केला होता, याचे स्मरण तरी आहे काय? अशोक कामटे, हेमंत करकरे, साळसकर असे अधिकारी आपले कार्यक्षेत्र नसताना आझाद मैदानच्या परिसरात धावत आले आणि त्यांनी ज्या कारवाईत भाग घेतला, त्यांना त्याबद्दल जाब कोण्या शहाण्याने का विचारला नव्हता? तेव्हाही त्यांच्यासह अनेक पोलिसांनी आपल्या नियम व मर्यादांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घातला होता. त्यातच त्यांचा बळी पडला. आपण जे करीत आहोत, ते कायद्याच्या कुठल्या कलमात बसणारे आहे, याचा विचार करायला व कलमांचा अभ्यास करायला तेव्हा सवड नव्हती. ताजमहाल हॉटेलमध्ये तीन हल्लेखोर शस्त्रांसह घुसलेले होते, तिथे अवघ्या सहा गोळ्यांनी भरलेले पिस्तूल घेऊन घुसलेले अधिकारी नांगरे पाटिल यांनी आगावूपणाच केला होता. जीव धोक्यात घालणे हा कायद्यानुसार आगावूपणाच असतो. कमीतकमी जीवितहानी करायचे सुत्र पोलिसांनी पाळायचे असते. आणि त्यात त्यांचाही जीव समाविष्ट असतो. मग चार वर्षापुर्वी त्या प्रत्येक अधिकार्‍याने व पोलिसाने मर्यादाभंग केला होता. कारण त्यावेळी मोकाट सुटलेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून त्यांना मुंबई वाचवायची होती. आणि असे निर्णय घेताना नियम वाचत बसून चालत नाही. साध्य महत्वाचे असते. धोक्याची शक्यता असेल तर धोका टाळ्ण्यासाठी विशेष पावले उचलणे अपरिहार्य असते. नियम व कायदे ज्या हेतूने बनवलेले असतात, ते साधताना नियम आडवे येत असतील तर त्यांनाही बाजूला सारून निर्णय घ्यावे लागतात व कृती करावी लागत असते. ओंबळे असो की करकरे असोत, त्यांनी तेच केले होते. आणि परवा रविवारी नाजूक परिस्थिती असताना पालघरच्या त्या पोलिस अधिकार्‍यांनीही तसेच नियम बाजूला ठेवून निर्णय घेतले आहेत. त्यांनी त्या दोन मुलींना अटक केली असे म्हणतांना त्यामागची हेतू कोणी विचारात घ्यायचा?  

   ज्या जमावाने नंतर तिच्या काकाच्या इस्पितळावर हल्ला केला; तोच जमाव तिच्या घरी गेला असता आणि ती जमावाच्या ताब्यात सापडली असती तर कोणता प्रसंग ओढवला असता? तो कोणी व कसा रोखायचा होता? त्या जमावावर गोळ्या झाडायच्या असे कोणी शहाणा म्हणणार आहे काय? त्यालाही हरकत नाही. मग तेच शहाणे ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदान येथे मोकाट जमाव जाळपोळ करताना पोलिस शांत राहिले; म्हणून कौतुक तरी कशाला करतात? पस्तीस चाळीस हजाराच्या बेफ़ाम जमावाने पोलिसांवरच हल्ला करूनही गोळ्य़ा झाडायच्या नसतील; तर पालघरच्या पोलिसांनी काय करयला हवे होते? आणि तो प्रसंग पालघरपुरता नव्हता. पालघरमध्ये असे काही घडल्याचा सुगावा मुंबईत जमलेल्या पंचविस लाखाच्या जमावाला लागला असता, तर काय प्रसंग ओढवला असता? त्या अफ़ाट जनसमुदायाला पोलिसांनी कसे आवरावे असे या शहाण्यांचे मत आहे? पोलिस एखादी कारवाई का करतात, त्यामागचा हेतू लक्षातच घ्यायचा नाही काय? फ़ेसबुकवर लिहिले यासाठी त्या मुलीला शिक्षा करण्यापेक्षा तिच्याच सुरक्षेसाठी, तिला जमावापासून वाचवण्यासाठी, ताब्यात घेणे अगत्याचे होते. त्यामुळे इस्पितळाची मोडतोड झाली, पण मुलगी बचावली, हे त्यामागचे सत्य आहे. आणि त्याच मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य वा बंदविरोधाबद्दल बोलायचे असेल; तर तिला ताबडतोब काश्मिर वा श्रीनगरला पाठवून द्यावे. तोही प्रदेश भारताचाच अविभाज्य भाग आहे. तिथेही रोजच माणसे मरत असतात आणि काश्मिरचे व्यवहार खुप छान चालू आहेत. जरा तिथले स्वातंत्र्य तिला अनुभवू द्यावे. मग पालघर किंवा मुंबई महाराष्ट्रात बंदसुद्धा किती शांत व सुरक्षित असतो, त्याचा साक्षात्कार ति्ला होऊ शकेल.

   मित्रांनो, रविवारी बंदच्या निमित्ताने या मुलीने जी मुक्ताफ़ळे फ़ेसबुकवर उधळली; ती शिवसेनप्रमुखांचा अवमान आहे असे मला अजिबात वाटत नाही. त्यापेक्षा तो मला सार्वभौम भारताचाच अवमान वाटतो, तेवढेच नाही तर ज्यांनी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नाटक वाहिन्यांवरून रंगवले होते; ते लोक मला चार वर्षापुर्वी कसाबच्या हल्ल्यात बलिदान केलेल्या शहिदांचा अपमान करीत होते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्या व्यक्तीवर कुठलेही सत्तापद न भोगताही सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात, त्याच्याविषयी असे काही लिहिणे; म्हणजे भारतीय सार्वभौमत्वाचाच अवमान असतो. कारण बाळासाहेबांना तिरंग्यामध्ये लपेटून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या प्रसंगाविषयी असे मतप्रदर्शन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर नसतो; तर गैरवापर असतो. कारण चार वर्षापुर्वीसुद्धा ओंबळे, करकरे, कामटे वा साळसकर यांनाही तोच सन्मान देण्यात आला होता. त्या दिवशीच्या व्यवहारावर अशी टिप्पणी मृत व्यक्तीचा अवमान नसतो. तो त्या सन्मानाचाच अवमान असतो. आणि असा अवमान करण्यामागची मनोवृत्ती समजून घेतली पाहिजे. त्या मुलीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा आपल्या कुठल्या स्वातंत्र्याशी काहीही कर्तव्य नव्हते. तिला भारतीय सार्वभौमत्वाचाच अवमान करण्याची इच्छा असावी. आणि म्हणुनच मला त्यात ओंबळे व करकरे इत्यादी शहिदांच्या हौतात्म्याचा अवमान करायची तीव्र इच्छा दिसून येते.

   बाळासाहेब ठाकरे हा विषय बाजूला ठेवा, त्यांच्या मृत्यूच्या निमित्ताने झालेला बंदही बाजूला ठेवा. त्या निमित्ताने व्यक्त झालेली मानसिकता महत्वाची आहे. आणि तिच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे एक गोष्ट विसरून गेले, की ते स्वातंत्र्य पोलिस व प्रशासनच देत असते व राखत असते. करकरे किंवा ओंबळे यांच्यासारखी माणसे त्यासाठीच आत्मसमर्पण करत असतात. पुस्तकात वा कायद्याच्या शब्दात स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याचा उपभोग घेता येत नसतो. तर त्या स्वातंत्र्याच्या जपणूकीसाठी कोणीतरी आपले प्राण पणाला लावायला पुढे सरसावतो, म्हणून ते स्वातंत्र्य शाहीनसारख्या मुलीला उपभोगता येत असते. त्याची खरी किंमत वा मोल समजून घ्यायचे असेल; तर तिने आणि तिच्या समर्थक पत्रकार व बुद्धीमंतांनी काही महिने श्रीनगमध्ये जाऊन वास्तव्य करावे. मग किती हिंडण्याफ़िरण्याचे, मोकळ्या मनाने बोलण्य़ाचे स्वातंत्र्य आहे, त्याचा अनुभव त्यांना घेता येईल. स्वतंत्र भारतातच काश्मिर नावाचा प्रांत व श्रीनगर नावाचे शहर आहे. मग तिथे जाऊन आपल्या स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायला काय हरकत आहे? तिथे लाथा व दगड खाल्ले मग त्यांना पालघर वा मुंबई महाराष्ट्रामध्ये किती अधिक स्वातंत्र्य आहे; त्याचा साक्षात्कार होऊ शकेल. कारण त्यांना स्वातंत्र्य उपभोगता यावे, म्हणून ओबळे वा साळसकर यांच्यासारखे लोक आत्मसमर्पण करायला सिद्ध असतात. ते संपादक, पत्रकार, विचारवंत वा बुद्धीमंत नसतात. ते सामान्य पोलिस वा सैनिक असतात. आणि तेच उपकारावर स्वातंत्र्य उपभोगणारे इतके मुजोर झाले; तर कोण त्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावील?

   उद्याचा दिवस ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्राण वेचले त्यांचे स्मरण करण्याचा आहे. त्यासाठीच दर वर्षी मी २६ नोव्हेंबरला दिवसभर अनवाणी पायांनी चालतो. दिवसभर पायात चप्पल वा काहीच घालत नाही. जे आपल्याला अशक्य वाटते अवघड वाटते, ते करण्य़ाचे साहस त्या शहीदांमध्ये कुठून येते, त्याचा अनुभव घेण्य़ासाठी मी हे व्रत घेतले आहे. पायाला घाण लागेल. एखादा रस्त्यात पडलेला खिळा वा काच, पत्रा लागेल, चिखलात पाय मळतील, अनवाणी बघून लोक काय म्हणतील, अशा किरकोळ गोष्टींना आपण घाबरत असतो. मग प्राण पणाला लावायला किती हिंमत जुळवावी लागत असेल? चार वर्षापुर्वी त्या शहीद अधिकार्‍यांनी ती हिंमत कशी जुळवली, त्याची झलक या एका दिवसाच्या व्रतातून आपण मिळवू शकतो. आपणही काही करू शकतो, आपणही हिंमत जमवू शकतो, याचा साक्षात्कार स्वत:ला करण्याचा मला तो उत्तम मार्ग वाटतो. शिवाय आपण असे वागतो, तेव्हा लोक अचंब्याने विचारतील, तर आपण त्यांनाही त्याचे कारण सांगू लागतो, त्यामुळे बघा आपल्यात कशी उत्तेजना संचारते. लढण्याची व स्वत:च्या आत्मसन्मानसाठी हिंमत करण्याच्या इच्छेची ती सुरूवात असते. अर्थात तो उपचार नाही. ज्यांना मनापासून आपण काहीतरी करावे असे वाटत असेल, त्यांनी जरूर असेच काही करावे. माझे अनुकरण करावे असे मी सांगणार नाही. पण ज्यांना तसे वाटेल त्यांनी जरूर करावे. मात्र तशी ज्याची मनापासून तीव्र इच्छा असायला हवी. केवळ उपचार म्हणून असे काहीही करायची गरज नाही. मेणबत्त्या पेटवण्याइतके हे सोपे काम नाही. इथे आपल्या मनातील तीव्र इच्छा आवश्यक आहे. आपण दुसर्‍या कुणासाठी वा कुणाला आपल्या भावनांचे प्रदर्शन मांडण्यासाठी, असे करायची गरज नाही. ज्यांना आपण स्वत:साठी हे कष्ट व वेदना भोगायच्या आहेत, असे प्रामाणिकपणे वाटत असेल त्यानेच असे काही करावे.

   मित्रांनो, बुधवारी म्हणजे चार दिवस आधीच कसाब फ़ासावर लटकला आहे. तोही आज जिवंत नाही. पण त्याला फ़ासावर लटकवल्याने आपल्या डोक्यावर चढलेले करकरे, ओंबळे, साळसकर, कामठे, उन्नीकृष्णन यांचे ऋण फ़िटलेले नाही. कारण त्यापैकी कोणीही परत त्यांच्या कुटुंबात परत येणार नाही. त्यांच्या कुटुंबाने आपल्या या लाडक्यांना कायमचे गमावले आहे. आज जे हयात आहेत, पण आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावायला अहोरात्र सज्ज असतात, त्यांच्यासाठी आपण काहीच करायचे नाही काय? शेसव्वाशे किंवा हजार पाचशे रुपये देणगीतून त्यांच्या कुटुंबाने जे गमावेले, त्याची भरपाई आपण करू शकतो का? सरकारही त्यांना लाखांची भरपाई देते. आणखी कोणी काही देतात. पण त्यातून हरवलेल्या भावना व गमावलेले सुखाचे क्षण; यांची भरपाई होऊ शकते का? ती फ़ेसबुकवरची शाहीन म्हणते ना, तसे जग चालुच रहाते, माणसे मेल्यावर. तसेच त्या शहीदांचे संसार चालुच आहेत, दैनंदिन व्यवहार त्यांच्याही घरात चालुच आहेत. पण त्यातला एक महत्वाचा घटक तुमच्यामाझ्यासाठी हरवला आहे. जो आपण भरून देऊ शकत नाही, की आणून देऊ शकत नाही त्यांना. पण ज्या लाडक्यांना त्यांनी गमावले, ते केवळ त्यांचेच प्रियजन नव्हते; तर लाखो करोडो भारतीयांचेही प्रियजन होते, अशी जाणीव आपण आपल्या त्या शहीद पोलिस व सैनिकांच्या कुटुंबियांना करून देऊ शकतो ना? त्यांच्यासारखेच जे कोणी शेकडो हजारो पोलिस व सैनिक आजही आपल्यात आहेत व पालघरच्या त्या पोलिसांप्रमाणे धाडसी निर्णय घेऊन कारवाई करतात; त्यांना धीर देणे तर आपल्या हाती आहे ना? आज त्या शहीदांच्या कुटुंबियांप्रमाणेच एकाकी पडलेल्या पालघरच्या पोलिसांना त्यांच्या धाडसासाठी हिंमत देण्याची गरज आहे.

   यावर्षी मी दिवंगत ओंबळे, साळसकर आदी शहीदांच्याच स्मृतीसाठीच नव्हेतर त्यांच्यासारखेच पालघरचे पोलिस व मुंबई-पुण्यात शनिवार ते बुधवार ज्यांनी आपल्या कठोर कर्तव्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून दाखवली; त्यांच्यासाठी पायात काहीही न घालता २६ नोव्हेंबरचा दिवस अनवाणी फ़िरणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गेल्या रविवारी मुलीचे लग्न पुढे ढकलून कायदा सुव्यवस्थेचे कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले, त्याच्याविषयी चार शब्द बोलायचे सोडून ज्यांनी एका मुलीच्या बाष्कळ बडबडीसाठी आपली बुद्धी व शक्ती खर्च केली, त्या वाहिन्या व पत्रकारांच्या निषेधासाठी मी अनवाणी चालणार आहे. कसाब गेला, फ़ासावर लटकला, म्हणून माझे वा तुमचे कर्तव्य संपत नाही. शहीदांच्या कुटुंबियांचे आपण जे देणे लागतो, ते संपत नाही. त्याची स्वत:ला आठवण रहावी म्हणून मी अनवाणी चालणार आहे. उद्या मी पायात चप्पल घालणार नाही. तुम्ही काय करणार आहात?


( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २५/११/१२)

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

आवाज कुणाचा? गर्दीच्या सम्राटाची दंतकथा
   सध्या कलानगरातील मातोश्री बंगल्याकडे थोरामोठ्यांची रिघ लागली आहे आणि कलानगरच्या गेटपाशी शिवसैनिकांनी ठाण मांडल्याने पोलिसांना हायवेकडून येणार्‍या रस्त्यावरील मुख्य वाहतुकीच रस्ताच बंद करावा लागला आहे. त्यातच वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या गाड्या आणि पत्रकारांचा घोळकाही अहोरात्र तळ ठोकून आहे. अशा गर्दीत एक छोटीशी बातमी अनेकांच्या नजरेत आलेली नसेल. पाकिस्तानचा जुना क्रिकेटपटू जावेद मियांसाद याने बाळासाहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून व्यक्त केलेल्या शुभेच्छा. त्यानेच नाही तर पाकिस्तानच्या क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख झका अश्रफ़ यांनीही अगत्याने तेच काम केले आहे. ज्यांच्यावर बाळासाहेबांनी अखंड आगपाखडच केली, त्यांनीही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना कराव्यात, ही किमया करणार्‍याला जग शिवसेनाप्रमुख म्हणून ओळखते. काही वर्षापुर्वी मियांदाद भारतात आला, तेव्हा त्यांना मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटला होता. त्याने एक वाहिनीशी बोलताना त्याच जुन्या आठवणींना उजाळा दिला. वादावादीची गोष्ट बाजूला ठेवून बाळासाहेबांनी कौटुंबिक जिव्हाळ्याची बातचित कशी केली, तेच त्याने सांगितले. पाकिस्तानी क्रिकेट व त्यांचे भारतातील दौरे यांना विरोध केल्याने ही दखल घेतली जात असेल, असे कोणालाही वाटेल. पण तेवढ्यापुरती ही किमया मर्यादित नाही. काही महिन्यांपुर्वी पाकिस्तानच्या पत्रकारांचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी सांगितलेले किस्से तेवढेच महत्वाचे आहेत.

   तेरा पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुंबई-पुण्याचा दौरा केला होता. तेव्हा मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांची भेट घेतलेल्या या पाक पत्रकारांनी इथल्या पत्रकारांशी वार्तालाप केला होता. त्यातही शिवसेनाप्रमुखांचा विषय निघालाच. हल्ली बाळासाहेब खुप गप्प असतात, त्यांच्याकडून काही ऐकायला मिळत नाही; असे पाक पत्रकारांनी सांगितले होते. आणि इथे आलेले असताना त्यांनी बाळासाहेबांचे पाक सरकारवर खुप दडपण असते; असेही सांगायला मागेपुढे बघितले नाही. पाक जनतेमध्ये या माणसाबद्दल मोठेच कुतूहल आहे, अशीही माहिती त्या पत्रकारांनी दिली होती. ‘हिंदुत्त्वाचा पुरस्कार आणि पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करणा-या बाळासाहेबांबद्दल पाकमधील जनतेला प्रचंड कुतूहल असल्याचे ब-याचदा जाणवले होते. भारतातील शिष्टमंडळे पाकमध्ये गेली की, बाळासाहेब कोण आहेत, कसे आहेत, ते कुठे राहतात, एवढे बिनधास्त कसे काय बोलू शकतात, असे अनेक प्रश्न तिथले लोक विचारत. पण आता, बाळासाहेबांच्या फारशा सभा होत नाहीत. ते पूर्वीइतके जहाल बोलत नाहीत. असे असले तरीही, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांबद्दल पाकिस्तानात जरा दबकूनच बोलले जाते.’ हे शब्द आहेत पाकिस्तानी पत्रकारांचे.

   असे त्यांना का वाटावे? आणि इतक्या दूर पाकिस्तानातल्या लोकांना व पत्रकारांना, बाळासाहेब हल्ली जहाल वा फ़ारसे बोलत नाहीत याची जाणीव होत असेल, तर त्यांच्यावर अपरंपार प्रेम कारणार्‍या शिवसैनिक वा मराठी माणसाला त्यांचे मौन कसे सहन होईल? गेल्या नवरात्र उत्सवाची सांगता होत असतांना शिवाजी पार्कवर सेनेचा जो वार्षिक मेळावा झाला, त्यात त्यांची अनुपस्थिती लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणारी का ठरली; त्याचे उत्तर या दोन बातम्यांमध्ये सामावलेले आहे. तशी त्यांनी शारिरीक अनुपस्थिती शिवाजीपार्कला होती. त्यांचे चित्रित भाषण दाखवण्यात आले. पण ज्यांनी कित्येक वर्षे त्यांना दस्रर्‍याच्या मेळाव्यात समोर बघितलेले आहे व ती परंपराच बनवलेली होती, त्यांचे समाधान चित्रण पाहून कसे व्हावे? त्यांनी बोलायला उभे रहावे आणि समोरच्या गर्दीने एका सूरात ‘आवाज कुणाचा’ अशी डरकाळी फ़ोडावी; ही प्रथाच झाली होती. तिथे थकल्याभागल्या आवाजात बोलणार्‍या साहेबांचे चित्रण कोणाचे समाधान करणार होते? अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले ते त्यामुळेच. कारण त्यांना समोर पडद्यावर साहेब दिसत होते, ते बोलतही होते, पण त्यातला आवाज थकलेला व दमलेला वाटत होता. जो आवाज व जे शब्द हजारो मैल दूर पाकिस्तानात जाऊन लोकांच्या मनात धडकी भरवतात, तेच शब्द व तोच आवाज ओळखीचा वाटत नव्हता, म्हणून शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आपल्या शब्दांनी अनुयायांच्या मनात अंगार पेटवणार्‍या माणसाच्या थकल्या आवाजाने त्याच शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आणले होते.

   त्यांच्याच कशाला माझ्या पत्नीला, स्वातीच्याही डोळ्यात गुरूवारी त्यांच्या आठवणीने अश्रू आले. तशी तिची त्यांची एकदाच भेट झालेली. सहा वर्षापुर्वी तिने ‘इस्लामी दह्शतवाद: जागतिक आणि भारतीय’ असे पुस्तक लिहिले, त्याचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते मातोश्रीमध्ये झालेले. तेवढीच तिची त्यांची भेट. ते पुस्तक लिहून झाल्यावर स्वाती मला म्हणाली हे पुस्तक मी बाळासाहेबांना अर्पण करणार आहे. कारण त्यांच्या भाषणातून स्फ़ुर्ती घेऊनच माझे विचार व अभ्यास या पुस्तकात आलेला आहे. तसा मी तीन वर्षे ‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक म्हणुन काम केले. पण पत्नी व परिवाराला साहेबांना भेटवण्य़ाचा योग कधीच आला नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिला साहेबांना भेटता आले. त्यांनाही अशा विषयाचा स्वातीने इतका गाढा अभ्यास केल्याचे खुप कौतुक होते. त्यांनी ते बोलूनही दाखवले. हीच त्या माणसाची जादू होती. कधीच मोजूनमापून शब्द वापरण्याचा त्यांचा स्वभावच नाही. आम्ही तिथे पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो. पण त्यांचा काय मूड लागला कोण जाणे, त्यांनी साठसत्तर वर्षे जुन्या प्रबोधनकार व त्यांच्या मित्रमंडळीचे अनुभव सांगायला सुरूवात केली. सगळेच अवाक होऊन ऐकत होते. तब्बल सव्वा तास त्या गप्पात सगळे रंगले, अखेरीस मी त्यांना प्रकाशनाची आठवण करून दिली. तर म्हणाले, ‘हल्ली असेच होते बघ. काही गोष्टी विसरायला होते.’ त्यात व्यंग होते आणि ते सहज बोलून गेले होते. व्यंग अशासाठी, की खुप जुन्या आठवणी सांगत होते आणि विसरायला होते असेही सांगत होते.

   पण तोच त्यांचा स्वभाव होता आणि असे मी अनेकदा अनुभवले होते. अनेकदा त्यांना भेटायचा योग आला. मार्मिक’चे काम करताना किंवा नंतरही अनेकदा केवळ गप्पा ठोकायला ते बोलावून घेत. मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे. तसा मी सामान्य पत्रकार व कसलेही महत्वाचे काम घेउन त्यांच्याकडे कधीच गेलो नाही. पण जेव्हा जायचो वा त्यांनी बोलावले तर तास दोनतास सहज गप्पा मारायचे. मग लोकांची येजा चालू असली तरी त्यांना फ़रक पडत नसे. युतीची सत्ता आली तेव्हा मी एकच परिचित असा असेन, की कुठलेही काम करून घ्यायला गेलो नाही. त्याबद्दल त्यांनी उपरोधिक बोलूनही दाखवले होते. ‘झोळी खांद्याला लावून भिका मागत फ़िरतोस, आपले सरकार येऊन काय फ़ायदा?’ पण का कोण जाणे मला त्या माणसाकडे काही मागावेसेच वाटले नाही. आपल्याला वेळ देतो आणि गप्पा मारायला अगत्याने बोलावतो, यातच मोठे काही वाटले. आणि असे वाटण्याचेही कारण होते. त्यांच्याकडे उद्योगपती, क्रिकेटर, मंत्री वा आमदार, खासदार, कलावंत असे कोणीही बसलेले असत. पण त्यांचा गप्पांचा मुड असेल तर त्यांनी मला बसवून ठेवलेले असे. कधीकधी त्या अन्य पाहुण्यांना ओशाळल्यागत वाटायचे. कारण माझ्यासारखा गबाळा माणूस तिथे असायचा. पण त्यांच्या अस्वस्थतेला साहेबांनी कधी दादच दिली नाही. एकदा एका मित्राच्या आग्रहास्तव त्याचा दिवाळी अंक त्यांना द्यायला गेलो होतो, तेव्हाही त्यांनी थांबवून घेतले. तिथे पाकिस्तानचा सलामीचा फ़लंदाज मोहसिन खान त्यांना भेटायला आलेला होता. आणखीही काही मोठे लोक होते. आता त्याला भाऊ तोरसेकर नावाचा कोणी मराठी पत्रकार आहे, हे ठाऊक असायचे काय कारण होते? तर साहेब त्याला म्हणाले, ‘कमाल आहे, याला ओळखत नाहीस? हा मराठीतला अत्यंत आक्रमक लिहिणारा जहाल पत्रकार आहे.’ बिचार्‍या मोहसिनचा ओशाळलेला चेहरा मला अजून आठवतो.

   हा विनोद नव्हता आणि नाही. माझी जहाल आक्रमक पत्रकारिता त्यांना आवडली, म्हणून पाकिस्तानी क्रिकेटरला मी कशाला ठाऊक असायला हवा? संबंधच काय येतो? पण त्यांना तसे वाटते. अत्यंत प्रामाणिकपणे वाटते. कारण या माणसामध्ये एक अगदी निरागस मुल दडलेले आहे. लहान मुल जशा निरागसतेने बोलते व वागते, तेवढी निरागस वृत्ती त्यांच्यामध्ये आजही आहे. त्यांनी स्वत:मध्ये दडलेले ते मुल कधी लपवले नाही, की त्याची गळचेपी सुद्धा केली नाही. जितक्या सहजतेने व्यासपीठावर उभा राहुन शिवसेनाप्रमुख म्हणुन ते बोलायचे; तेवढ्याच सहजपणे बंदिस्त खोलीत गप्पा करायचे. मीनाताईंचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर तीन आठवड्यांनी मी त्यांना गर्दी संपल्यावर भेटायला गेलो होतो. तर उशीर केल्याबद्दल त्यांनी तक्रार केली. मग इतरांना त्या दिवशी न भेटण्याचे ठरवून मला थांबवून घेतले. तेव्हा मातोश्री बंगल्याचे नुतनीकरण चालू होते आणि त्यांचे वास्तव्य हिंदू कॉलनीच्या एका इमारतीमध्ये होते. मी त्यांच्याकडे एकटाच गेलो नव्हतो. ‘पुण्यनगरी’चे मालक मुरलीशेठ शिंगोटेही माझ्या सोबत होते. त्या दिवशी गप्पा झाल्या नाहीत. जवळपास एकटेच साहेब बोलत होते. मीनाताईंच्या निधनाचा घटनाक्रम त्यांनी सविस्तर सांगितला. त्यांच्या अंत्ययात्रेचा आल्बमही दाखवला. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्यांना मनातले सगळे बोलून टाकायचे होते. पण ते ऐकणारा कोणतरी हवा होता. त्याची प्रतिक्रियाही त्याना नको असावी. स्वगत केल्याप्रमाणे ते बोलत होते, फ़ोटो दाखवत होते. दि्ड तासाने त्यांचे समाधान झाले. आणि अखेर त्यांनी एकच प्रश्न मला विचारला, म्हणजे मला बोलायची संधी दिली. ‘या दसर्‍याला सभा न घेण्याबद्दल तुझे मत काय आहे?’

   मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. मी सामान्य पत्रकार आणि त्यांच्या संघटनेतला को्णीच नाही. मग त्यांनी मला हा प्रश्न विचारावाच कशाला? तेव्हा त्यांच्या डोळ्याचेही ऑपरेशन झाले होते. मीनाताईंच्या निधनाने ते कमालीचे विचलित झालेले होते. त्यामुळेच त्यावर्षीचा मेळावा रद्द करण्याच्या बातम्या चालू होत्या. पण मला कशाला विचारायचे? मी म्हटले सभा व्हायलाच हवी. मीनाताई सभेला यायच्या आणि व्यावपीठासमोर महिलांच्या गर्दीत पुढेच बसायच्या. कधी त्या व्यासपीठावर आल्या नाहीत. आणि त्यांच्या निधनासाठी सभाच रद्द? मला नाही पटत, असे मी बोलून गेलो. तर पुन्हा त्यांचा प्रश्न कायम. सभा व्हायलाच हवी? मीही माझ्या मतावर ठाम होतो. आणि खरेच सभा झाली, त्या रात्री त्यांनी अगत्याने फ़ोन करून विचारले; ‘सभेला आला होतास? कशी झाली सभा?’ मी उत्तरलो, टाळ्या घोषणा ऐकल्यात ना? मग कशी सभा झाली कशाला विचारता? तुम्ही तिथे उभे राहून बोलला म्हणजे झाले. शिवसैनिकांना तेच हवे असते. मग सभा यशस्वी होणारच. पुन्हा तेच. ‘तुझे समाधान झाले?’ कमाल आहे या माणसाची. माझ्या समाधानाचा विषय कुठे होता? पण मी होकारार्थी उत्तर दिले तेव्हाच त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणून फ़ोन ठेवला.

   आणि असा मी एकटाच नव्हतो. असे अनेक भणंग त्यांनी जवळ केलेले होते. ज्यांची मते जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असायची. कदाचित माझ्यासारखा माणुस रस्त्याने पायपीट करीत चालतो, बस वा ट्रेनने प्रवास करतो. त्यामुळे लोकांच्या मनाचा अंदाज मला असू शकेल असे त्यांना वाटत असेल का? देवजाणे, पण त्यांच्या मताच्या विरुद्ध बोलत असूनही त्यांनी अनेकदा माझे बोलणे शांतपणे ऐकले होते. त्यावर शंकाही विचारल्या. आणि असाच एक अनुभव आहे. एकदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा खुप गर्दी होती. त्यांच्यासमोर एक भाजी विक्रेता महिला होती. बिचकत दबल्या आवाजात बोलत होती. तिला म्हणाले, चांगल्या चढ्या आवाजात बोल. मला दमात घेऊन बोल. माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वॉर्डात, मग घाबरून कशाला बोलतेस? मी काय घाबरायाला शिकवले का मराठी माणसाला?

   एकीकडे अमिताभ बच्चन, उद्योगपती, परदेशी पाहुणे, बड्या मान्यवरांची मातोश्रीवर रेलचेल असायची आणि दुसरीकडे सामान्य गरजवंत माणसे झुंबड करून असायची. तिसरीकडे माझ्यासारखे कसलीही अपेक्षा नसलेले भणंग त्यांनी बोलावले म्हणुन जायचे. अशा सगळ्यांशी हा माणुस सारखाच कसा वागू शकतो, त्याचे रहस्य मला अजून उलगडलेले नाही. आणि उलगडले असेल तर त्यांच्यातली निरागसता एवढेच त्याचे उत्तर असू शकते. ज्याच्याकडे मोठमोठे उद्योगपती भेट मिळण्यासाठी प्रतिक्षा करत बसलेले आहेत; त्याने जुन्या कसल्या आठवणी माझ्यासारख्या भणंगाला सांगण्यात तास दिडतास खर्ची का घालावा, याचे उत्तर अवघड आहे ना? कदाचित येणारे काहीतरी मागायलाच येणारे असतील आणि एखादा तरी हात पसरायला न येणारा असावा; ही अपेक्षा माझ्याकडुन पुर्ण होत असावी काय? देवजाणे, पण हा माणूस अजब आहे एवढे मात्र खरे. कारण देशातल्या पत्रकारांना, राजकीय अभ्यासक, जाणकारांना त्याचा कधी थांग लागला नाही. पण इतक्या शहाण्यांना ज्याचे शब्द व भाषा कित्येक वर्षात कळली नाही, तोच माणून लाखो करोडो सामान्य लोकांना भुरळ घालू शकतो, हा चमत्कारच नाही काय? असामान्य पातळीवर जाऊन पोहोचलेला, पण सामान्य राहुन विचार करू शकणारा हा माणुस; आधुनिक युगातली एक दंतकथाच आहे. कारण त्यांच्याविषयी गेले दोनचार दिवस अनेक वाहिन्यांवर जे काही बोलले जात आहे, ते ऐकून मनोरंजन होते आहे तशीच चीडही येते आहे. ज्यांना त्या माणसाच्या यशाचे रहस्य उलगडता आलेले नाही, तेच त्याच्यावर भाष्य करत होते आणि ज्यांना तो माणूस अजिबात रहस्य वाटला नाही ते कलानगरच्या गेटपाशी ठाण मांडून बसले होते, किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते.

   बाळासाहेबांची तब्येत बिघडल्याचे कळल्यावर त्यांना भेटायला मान्यवरांची रिघ लागली, त्यात अशोक पंडित या चित्रपट दिग्दर्शकाचाही समावेश होता. एका वाहिनीवरच्या चर्चेत भाग घेताना त्याने आपण ठाकरेविषयक आत्मियतेमुळेच तिकडे धावत गेलो, असे वारंवार सांगितले, पण दिल्ली विद्यापिठातील दिपंकर गुप्ता नावाच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापकाला ते अजिबात पटत नव्हते. जे कोणी प्रतिष्ठीत मान्यवर मातोश्रीवर जात होते; ते धाकापोटी व भयभीत होऊनच दहशतीखाली तिकडे हजेरी लावत होते, असा त्या प्राध्यापकाचा दावा होता. हे त्याचे मत कसे व कोणी बनवले होते? गेल्या चार दशकात पत्रकार आणि माध्यमांनी शिवसेना व ति्च्या सेनापतीविषयी ज्या काल्पनिक वावड्या उडवल्या आहेत, त्याचेच हे सर्व बुद्धीमंत बळी आहेत. वास्तविक बाळासाहेब ठाकरे व या बुद्धीमंतांच्या कल्पनेतील शिवसेनाप्रमुख यात प्रचंड तफ़ावत आहे. त्यातून बाळासाहे्व ठाकरे नावाची एक दंतकथा या चाळीस वर्षात तयार झाली आहे. त्याचेच हे परिणाम आहेत. हुकूमशहा, दहशतवादी, झुंडशाहीचा प्रणेता. अशी जी प्रतिमा माध्यमांनी तयार केली, त्याची माध्यमे जशी बळी आहेत, तसेच त्यावरच आपले ठाकरेविषयक मत बनवणारेही बळी आहेत. हत्ती आणि आंधळे अशी जी गोष्ट आहे, तशीच ठाकरे व माध्यमे-बुद्धीमंत अशी आधुनिक गोष्ट तयार झाली आहे. त्यात मग ऐकलेल्या व काल्पनिक गोष्टींचा भरणा अधिक झाला आहे. मग तिकडे पाकिस्तानात ठाकरे नावाचा वचक असतो आणि इथल्या बुद्धीवादी वर्गातही त्याच नावाचा भयगंड असतो. तो इतका भयंकर असतो, की खरेखोटे तपासायलाही आपले विचारवंत घाबरत असतात. आणि दुसरीकडे ज्याचे त्यांना भय आहे, तोच माणूस एका सामान्य भाजीवालीला म्हणतो, ‘घाबरू नकोस अगदी मलाही दमात घेऊन प्रश्न विचार.’ केवढा विरोधाभास आहे ना? पण गंमत अशी, की त्या विरोधाभासानेच या माणसाला एक दंतकथा बनवून सोडले आहे.

   जेवढ्य़ा माणसांशी बाळासाहेबांबद्दल बोलाल, तेवढ्या दंतकथा ऐकायला मिळतील. जे त्यांना भेटले आहेत वा त्यांच्या सहवासात राहिले आहेत, त्यांच्या कथा आहेतच. पण ज्यांना त्या माणसाचा सहवास मिळाला नाही, पण सार्वजनिक जीवनात त्यांच्याशी दुरान्वये संबंध आलेला असेल, त्याच्याकडेही अशा ऐकलेल्या कथांचा संग्रह असतो. आणि दुसरीकडे ज्याच्याविषयी इतक्या दंतकथा रहस्यकथा आहेत, तो माणूस मात्र अशा सर्वच कथांपासून अलिप्त आहे. आपल्याबद्दल लोक काय बोलतात, त्याची बाळासाहेबांना काडीमात्र फ़िकीर नसते. इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचल्यानंतरही एक सामान्य माणसासारखा ते विचार करू शकतात व तसे वागूही शकतात. १९९७ सालात महापालिकेच्या निवडणुकांबद्दल त्यांच्या मनात शंका होती. पण तरीही मुंबईकराने त्यांना दगा दिला नाही. तर त्या विजयानंतर या माणसाने शिवाजीपार्कच्या मेळाव्यात व्यासपिठावरून चक्क समोरच्या जनसमुदायाला दंडवत घातला होता. एका अशाच विराट सभेत त्यांच्या भाषणापुर्वी कितीतरी वेळ फ़टाके वाजतच राहिले; तर चक्क बैठक मारून त्यांनी वैताग व्यक्त केला आणि अडवाणी, मुंडे, महाजन हे नेते बघतच राहिले होते. पण एक सत्य आहे, जे कोणी नाकारू शकणार नाही. हा गर्दीतला माणूस आहे आणि गर्दीवर त्याने अफ़ाट प्रेम केले. त्या दिवशी दसरा मेळाव्यात समोर गर्दी नसताना चित्रित केलेल्या भाषणात, समोर गर्दी नसल्याची व्यथा त्यांना लपवता आली नव्हती. आपण थकलो व शरीर साथ देत नाही हे मनमोकळेपणाने लोकांना सागताना त्यांनी किंचितही आढेवेढे घेतले नाहीत. आणि काय चमत्कार बघा, दसरा संपून दिवाळी चालू असताना त्यांचीच तब्येत बिघडली तर अवेळ असूनही गर्दी त्याच्या दारापर्यंत चालत आली. बाळासाहेब ही अशी गर्दीची एक दंतकथा आहे. इतक्या विपरित परिस्थितीतही तो माणूस अजून गर्दीतच रमला आहे. त्यांचा आवाज ऐकायला ती गर्दी तिथे हटून बसली होती आणि ‘आवाज कुणाचा’ अशी आपल्या लाडक्या शिवसैनिकांची घोषणा कानावर येण्यासाठी तो गर्दीचा सम्राट बंदिस्त बंगल्यात आजाराशी झुंजत होता काय?

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

बियॉंड रिझनेबल डाऊट; अर्थात नि:संशय

अकरा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. नुकताच न्यूयॉर्कच्या जागतिक व्यापार केंद्रावरचा हल्ला झालेला होता. तिथले जुळे मनोरे प्रवासी विमाने आदळून उध्वस्त केल्याची घटना घडून पंधरा दिवस सुद्धा झालेले नसतील. तेव्हा सीएनएन या वाहिनीवर त्या महानगरातील पादचार्‍यांच्या मुलाखती दाखवल्या होत्या. तोपर्यंत त्या हल्ल्यामागे अल कायदा व त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन असल्याचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जाहिरपणे म्हटलेले होते. त्यामुळे त्याला आरोपी म्हणुन पकडून आणले तर काय; अशी चर्चा चालु होती. त्याच चर्चेला धरून या मुलाखती घेतल्या जात होत्या. ओसामावर न्युयॉर्कमध्ये खटला भरला तर त्यात तुम्ही ज्युरी म्हणून काम कराल काय, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा जवळपास प्रत्येकाने त्याला नकार दिला होता. याचे कारण काय असेल? इतक्या मोठ्या घातपात्याच्या विरोधात खटल्यामध्ये सहभागी व्हायला ते अमेरिकन नागरिक घाबरत होते का? अजिबात नाही. त्यातल्या प्रत्येकाने दिलेले उत्तर मला अजून स्पष्ट आठवते. ओसामा त्यात दोषी आहे, असे आपले मत आधीच बनलेले आहे, त्यामुळे आपण त्याच्या खटल्यात नि:पक्षपाती राहू शकणार नाही. म्हणुनच त्या खटल्यात ज्युरी म्हणजे न्यायपंचायतीत बसायला आपण योग्य नाही, असे नकार देणार्‍यांचे मत होते. केवळ त्यापैकी एकानेच आपण सहभागी होऊ असे म्हटले आणि तोही ओसामावर अन्याय होऊ नये या भूमिकेतला होता. अमेरिकेमध्ये खटले न्यायमुर्तीसमोर चालत असले, तरी दोषी वा निर्दोष ठरवण्याचे काम ज्युरी करते. प्रत्येक खटल्यासाठी आधी सामान्य माणसातुन ज्युरी निवडली जाते. सर्व खटला ऐकून व पुरावे तपासून ज्युरी निर्णय देत असतात. त्यांनी नि:पक्षपाती निर्णय द्यावा हीच अपेक्षा असते. आणि त्याचे भान तिथल्या नागरिकांना किती आहे, त्याचा पुरावा त्या मुलाखतींमधून मिळाला होता.  

   त्यानंतर बर्‍याच वर्षांनी एका वाहिनीवर खुप जुन्या काळातील एक इंग्रजी चित्रपट बघायचा योग आला. त्याचे नाव होते, ‘बियॉंड रिझनेबल डाऊट’. चित्रपटाचे कथानक खटल्याची सुनावणी संपतानाच होते. म्हणजे कोर्टात साक्षीपुरावे आटोपलेले आहेत आणि त्यावर दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तीवादही होऊन गेले आहेत. त्यानंतर आरोपी दोषी आहे की निर्दोष, ते ठरवण्यासाठी ज्युरींनी आपसात चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांना कायद्याच्या व नियमांच्या सूचना न्यायाधीश देतात, इथून चित्रपट सुरू होतो आणि जिथे ज्युरीचा निर्णय होतो तिथे चित्रपट संपतो. थोडक्यात ज्युरीचे काम कसे चालते त्यावरच सगळे कथानक आधारलेले आहे. आरोपीवर खुनाचा संशय आहे आणि तो दोषी असेल तर त्याला फ़ाशी देता येईल. पण ती सर्वात कठोर शिक्षा असल्याने त्याबाबत नि:संशय निवाडा झाला पाहिजे. म्हणजे ज्युरी एकमताने त्याला दोषी ठरवतील तरच त्याला फ़ाशी होऊ शकते; असे आरंभी न्यायमुर्ती ज्युरी सदस्यांना समजावून सांगतात. आणि नि:संशय म्हणजे प्रत्येक सदस्याला आरोपी नि:संशयपणे दोषी वाटत असेल, तरच त्याने तसे मत द्यावे. पण मनात किंचितही शंका असेल तर दोषी म्हणू नये, असेही सांगतात. मग त्या सर्व बारा ज्युरी सदस्यांना एका बंदिस्त खोलीत बंद केले जाते. त्यांच्यात चर्चा चालू होते. पण चर्चा बहुतेकांना नको असते. त्यांच्या दृष्टीने आरोपीवरील आरोप सिद्ध झालेले असतात. त्यावर चर्चेची गरज नाही असाच दावा केला जातो. म्हणूनच त्या ज्युरीचा म्होरक्या मतदान घेतो. एक सदस्य वगळता सगळेच ज्युरी आरोपी दोषी असल्याचा कौल देतात. पण त्यामुळे एकमेव वेगळे मत मांडणार्‍याकडे बाकीचे रागाने बघू लागतात. त्यांच्यात हुज्जत चालू होते. त्याचा दावा सोपा असतो. आरोपी दो्षी असल्याचे त्याला नि:संशय वाटत नसते. तेव्हा चिडलेल्यांना तो एकच सांगतो. त्यांनी आरोपीचा दोष त्या्ला ठामपणे पटवून द्यावा. कारण इथे एका माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज डोळे झाकून त्याच्या जीवाशी आपण खेळू शकत नाही असा त्याचा मुद्दा असतो. आणि मग तो आपल्या शंका त्यांच्या समोर मांडतो तर ते बाकीचे त्याचे शंका निरसन करू लागतात.

   जसजशी चर्चा लांबते आणि सरकत जाते तसतशी मते बदलत जातात. कारण इतरांच्या मनातही शंका निर्माण होतात आणि मताचे प्रमाण बदलू लागते. शेवटी एक विरुद्ध अकरा असे चित्र तयार होते. पुन्हा आरोप, साक्षी व पुरावे यांची तपासणी होते. शेवटी सगळेच त्याबाबतीत शंकाकुल होतात आणि आरोपी निर्दोष सोडून देतात. त्यांचा निवाडा ऐकून न्यायमुर्ती पोलिसांना त्याच पुरावे व साक्षीदारांच्या मदतीने खरा गुन्हेगार शोधण्याचे आदेश देतात. असे चित्र एकदम बदलून जाते. तो सर्व चित्रपट बघत असताना प्रेक्षकाचाही मेंदू गुंग होऊन जातो. आरंभी जो आरोपी आपल्याला निर्विवाद गुन्हेगार वा दोषी वाटत असतो, तोच बारकाईने समोरच्या साक्षी पुराव्याची तपासणी केल्यावर निर्दोष असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. कुठल्याही आरोपाची हीच गंमत असते. त्यात तुमच्या संशयी मनाला गुंग करण्याची किमया ज्याच्यापाशी असेल; तो तुमच्या मनात कुठल्याही गोष्टीबद्दल शंका निर्माण करून कुणालाही दोषी ठरवू शकतो. पण ज्याला निवाडा करायचा असतो, त्याने नि:संशय मनाने समोर आलेल्या गोष्टी तपासायच्या असतात. कारण त्याच्या हातून कोणाचे तरी भवितव्य ठरणार असते. त्याचे भान हाती अधिकार असलेल्याने ठेवायलाच हवे असते. तेच भान सुटले मग होणारे नुकसान होऊन जाते आणि न्यायाच्या नावावर अन्याय होतो. आज नेमके तेच सरसकट चालू आहे. ज्यांच्या हाती माध्यमे आली आहेत, त्यांना आपण लोकांच्या आयुष्य वा प्रतिष्ठेशी खेळतो आहोत; याचे भान सुटलेले आहे. त्यामुळे गुन्हेगार जगासमोर आणण्याच्या धुंदीत निरपराधांनाही बेधडक आयुष्यातून उठवले जात आहे. आपल्या हाती आलेले पुरावे किंवा मिळालेली माहिती खरी किंवा खोटी; याची छाननी करण्याची माध्यमाच्या मुखंडांना गरजही वाटत नाही. उलट कुणाच्याही प्रतिष्ठा वा अब्रूशी खेळण्याची अमानुष मजा घेतली जाते काय अशी शंका येते. नितीन गडकरी हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

   हल्ली दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी एकच वेळी समोर आल्या. आधी सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन विषयक व्यवहाराचे कागदपत्र अनेक माध्यमांकडे फ़िरत होते. पण त्याचा तपशील गोळा करावा असे कोणाला वाटले नाही. आणि केजरिवाल यांनी थेट प्रक्षेपणातून त्या कागदपत्रांचा गोषवारा जाहिर केल्यावर माध्यमांनी त्यावर भाष्य़ केले. पण लगेच केजरिवाल यांनी भाजपालाही भ्रष्ट ठरवण्यासाठी जे फ़ुसके आरोप केले, त्याला पुरावे सबळ नसतानाही वारेमाप प्रसिद्धी देण्यात आली. पुढे त्यावर गडकरी यांनी खुलासा केल्यावर त्या आरोपातील हवा गेली. पण मग गडकरी यांच्या कंपनीतील गुंतवणुकीचा शोध घेऊन पुन्हा आरोप झाले. त्यातही कितीसा दम आहे? गुंतवणूकदारांच्या कंपन्यांचा गोंधळ असेल. पण त्यासाठी गडकरी यांना आरोपी म्हणता येणार नाही. त्याच कालखंडात आणखी एक आरोप समोर आला आहे आणि तो गडकरी यांच्यापेक्षाही ब्गंभीर भ्रष्टाचाराचा आहे. कॉग्रेस पक्षाच्या निधीमधून काही कोटी रुपये नॅशनल हेराल्ड चालवणार्‍या कंपनीला बिनव्याजी देण्यात आले. त्या कंपनीचे संचालक कोण आहेत? सोनिया पक्षाच्या अध्यक्षा आणि राहुल गांधी त्याच पक्षाचे सरचिटणिस आहेत. तेच त्या कंपनीचे संचालक आहेत, आपल्याच कंपनीला पक्षाच्या तिजोरीतून बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. थोडक्यात पक्षाचे पैसे गैरमार्गाने खाजगी मालकीच्या कंपनीला दिले, म्हणजे प्रत्यक्षात स्वत:लाच दिले आहेत. गडकरी यांनी कुणाकडून पैसे घेतले असतील तर निदान त्यांनी ज्या कंपनीत घातले, त्या कंपनीने हजारो लोकांना रोजगार दिला आहे. त्याचा लाभ मिळाला असे सामान्य लोकही पुढे आले आहेत. म्हणजेच गडकरी यांनी व्यक्तीगत लाभासाठी त्या पैशाचा वापर केलेला नाही. त्यांनी नैतिकतेचा भंग केलेला असेल, पण त्यातून त्यांना व्यक्तीगत लाभ मिळालेला नाही, तर सामान्य माणसालाच त्याचा लाभ मिळालेला आहे. त्याकडे माध्यमांनी पाठ का फ़िरवावी?

   या दोन आठवड्याच्या काळात समोर आलेल्या या दोन प्रकरणात माध्यमांची भूमिका संशयास्पद नाही का? जिथे सज्जड पुरावे आहेत आणि जिथे केवळ तांत्रिक चुक झालेली आहे, त्यात कुणाला गुन्हेगार ठरवण्यात माध्यमांची ताकद लागली पाहिजे? जेव्हा माध्यमे अशी वागतात, तेव्हा एकूणच प्रकार संशयास्पद होऊन जातो. सोनिया व राहुल यांच्याशी संबंधित कंपनीचे व्यवहार कागदपत्रांनिशी शंकास्पद असल्याचे दिसत असताना माध्यमे सगळी ताकद गडकरी यांच्या नगण्य व्यवहाराचा गदारोळ करण्यासाठी का लावतात? तोही करायला काहीच हरकत नाही. पण दोन्ही प्रकरणे एकाचवेळी बाहेर आली असताना; दुसर्‍या प्रकरणाबद्दल माध्यमे मौन का धारण करतात? दोन्ही प्रकरणातील साम्य व फ़रकही लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातून आपल्या देशातील माध्यमे कशी पक्षपाती आहेत वा अन्याय करतात; त्याचाही अंदाज येऊ शकतो. गडकरी यांच्यावरचा सगळ्यात गंभीर आरोप काय आहे? त्यांच्या कंपनीने कुठलाही गैरव्यवहार केल्याचा दावा अजून तरी समोर आलेला नाही. पण त्यांच्या कंपनीचे शेअर्स ज्या अन्य कंपन्यांनी विकत घेतले, त्या कंपन्या बोगस किंवा शंकास्पद आहेत. म्हणजे त्या ‘पुर्ती’ कंपनीमध्ये शेअर्सची गुंतवणूक बेनामी आहे असाच दावा आहे ना? मग सोनिया-राहुल यांच्या कंपनीला देण्यात आलेले बिनव्याजी कर्ज कोणत्या नावाने आलेले आहे? कॉग्रेस पक्षाच्या निधीमधून ती कोट्यवधीची रक्कम नॅशनल हेराल्डला धंदा करण्यासाठी देण्यात आली आहे. हा करोडो रुपयांचा निधी कॉग्रेस पक्षाच्या खात्यात कोणाकडून आलेला आहे? त्या देणग्या देणार्‍या कंपन्या किंवा उद्योग समुहांचे नाव कोणाला माहित आहे काय? म्हणजेच कॉग्रेस पक्षाच्या निधीत जमा झालेला निधीसुद्धा बेनामीच पैसा आहे ना? मग गांधी खानदानाच्या मालकीच्या कंपनीला कॉग्रेसने देऊ केलेल्या बिनव्याजी कर्जाचा पैसाही बेनामी व्यवहार नाही काय? मग दोन कंपन्यांच्या बाबतीत माध्यमांचे वागणे भिन्न कशाला?

   अलिकडेच निवदणुक आयोगासमोर एक सुनावणी झाली. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या तिजोरीत येणार्‍या पैशाचा तपशील जाहिर करण्याबाबतची ती सुनावणी होती. त्यात सर्वच पक्षांनी ते तपशील जाहिर करण्याच्या विरोधात भूमिका मांडली. म्हणजेच प्रत्येक पक्षाला आपला कारभार चालविण्यासाठी बेनामी पैसा हवा आहे. आणि तोच बेनामी पैसा पक्षाध्यक्षा सोनिया व सरचिटणिस राहुल यांनी आपल्या खानदानी कंपनीला बिनव्याजी म्हणून दिला आहे. मग त्यांच्या गुंतवणूकीबद्दल माध्यमे गप्प का? गडकरी यांची चुकच असेल तर त्यांनी सोनियांप्रमाणे बेनामी व्यवहार केलेला नाही. म्हणजे ज्या कंपन्यांकडून त्यांना मदत मिळणार होती, त्यांना शेअर देण्यापेक्षा त्यांनी तीच रक्कम आपल्या पक्षाच्या तिजोरीमध्ये आधी जमा करायला हवी होती आणि मग तीच रक्कम त्यांनी आपल्याच ‘पुर्ती’ कंपनीला व्याजाने किंवा बिनव्याजी द्यायला हवी होती. मग तो गुन्हा झाला नसता, असे कोणाला म्हणायचे आहे काय? नसेल तर गडकरी यांचा गुन्हा नेमका काय आहे? त्यांनी पक्ष व कंपनी यांना वेगवेगळे मानून रितसर व्यवहार करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे काय? सोनियांच्या कंपनीप्रमाणे कुठलाही व्यवसाय न करता पैसे जमा करणारी कंपनी चालवण्याऐवजी गडकरी यांनी लोकांना रोजगार देणारी कंपनी चालवली हा गुन्हा आहे काय? वड्रा यांच्याप्रमाणे कामधंदा न करता कागदोपत्री कंपनी चालवून करोडो रुपये त्यात निर्माण केले; तसे न करता गडकरी खरीच कंपनी चालवत होते, व्यवसाय करत होते, हा त्यांचा गुन्हा आहे काय? जे काही असेल ते स्पष्ट व्हायला हवे आहे.

   कारण गेले दोन आठवडे जो प्रकार चालू आहे; तो नुसता संशयाचा धुरळा उडवून धुमाकुळ घातला जात आहे. की असे करून सोनिया-राहुल यांच्या गफ़लती लपवण्याची धडपड माध्यमांनी चालविली आहे? हा प्रकार आजकालचा नाही. अनेकांच्या आयुष्याशी माध्यमे आजकाल खेळत असतात. न्यायाधीशाच्या भूमिकेत बसल्यासारखे कोणालाही गुन्हेगार ठरवून बेताल वागत असतात. मार्कंडेय काटजू यांच्यासारख्या सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायमुर्तीनेही तेच मत मध्यंतरी राजदीपच्या आयबीएन वाहिनीवर बोलताना व्यक्त केले होते. तेवढेच नाही तर माध्यमांच्या या बेतालपणावर नियंत्रण आणण्याची गरज त्यांनी वारंवार प्रतिपादन केली आहे. आम्ही ठरवू तो गुन्हेगार आणि आम्ही ठरवू तो निर्दोष अशी; एक हुकूमशाहीची मानसिकता माध्यमांमधून बोकाळत चालली आहे. त्यातून माध्यमांची सुपारीबाजी उघडी पडू लागली आहे. सीबीआय आणि माध्यमे यात फ़रक उरला नाही असेच कधीकधी वाटू लागते. आतासुद्धा गडकरी आणि वड्रा प्रकरणात दोघांची वागणुक सारखीच नाही काय? वड्रा प्रकरणी हरयाणा सरकारच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने वड्रा यांच्या जमीन व्यवहाराच्या नोंदी रद्दबातल केल्या, तरी सीबीआय त्याकडे ढुंकून बघायला तयार नाही आणि तीच सीबीआय गडकरी प्रकरणी मात्र धाडी घालत सुटली आहे. तीच कार्यक्षमता वड्रा प्रकरणात कुठे दडी मारून बसते? माध्यमांचा चौकसपणा सुद्धा असाच नाही काय? नॅशनल हेराल्ड व गांधी खानदानाच्या व्यवहाराबद्दल मौन पाळणारी माध्यमे गडकरी प्रकरणातला उंदिर शोधायला डॊंगर पोखरत आहेत. पण त्यांना हेराल्ड व वड्रा प्रकरणाचा डोंगर चढायची इच्छाच का होत नाही? माध्यमे जेव्हा इतकी पक्षपाती होतात, तेव्हा त्यांच्याकडुन सत्य लोकांसमोर येऊ शकेल का?

   न्यायनिवाडा करताना किंवा कोणालाही दोषी ठरवताना नि:संशय खात्री पटण्याची गरज असते. कारण आपण कोणाच्या तरी जीवनमरणाशी खेळत असतो, याचे भान त्या ज्युरीने ठेवायचे असते. तसेच भान पत्रकार व माध्यमांनी ठेवायला हवे. कुठलाही नावाजलेला माणूस ती प्रतिष्ठा मिळवण्यासाथी आयुष्य़भर झगडलेला असतो. हे लिहित असताना भारताचा माजी कर्णधार अझरूद्दीन याला आंध्रप्रदेश हायकोर्टाने निर्दोष घोषित केले आहे. पण त्याच्यावरचा दोष धुतला जाईपर्यंत बारा वर्षाचा कालावधी खर्ची पडला आणि त्यात्ली आरंभीची दोनतीन वर्षे तो क्रिकेट खेळू शकला असता त्याला मुकला. त्याच्यावर आरोपांची रा्ळ उडवणारे ती उमेदीची वर्षे त्याला परत करू शकणार आहेत काय? राज ठाकरे यांनाही असेच १९९७ सालात रमेश किणी प्रकरणात बदनाम करून संपवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे तो तरूण पाचसहा वर्षे राजकारणातून बाजूला फ़ेकला गेला होता. जैन डायरीचे प्रकरण उकरून काढणार्‍यांनी खुराणा यांचे मुख्यमंत्रीपद घालवले. माधवराव शिंदे, लालकृष्ण अडवाणी यांना १९९६ च्या निवडणुकीतून बाहेर टाकले. अशी शेकडो लहानमोठी प्रकरणे सांगता येतील. ज्यात पुरावे नाही तर नुसता आरोपांचाच धुरळा उडवण्यात आला आणि अनेकांच्या सार्वजनिक आयुष्याची माती करण्यात आली. हा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे? माध्यमांना किंवा समाजाच्या वतीने न्यायाची लढाई करायला निघालेल्यांना कोणाच्या प्रतिष्ठेशी खेळण्याचा अधिकार मिळत असतो काय? असेल तर त्याच वेळी ‘बियॉंड रिझनेबल डाऊट’ म्हणजे नि:संशय आरोप करण्याची व त्याला पुरक पुरावे देण्याची जबाबदारी सुद्धा येत असते. ती जबाबदारी घ्यायची नसेल तर आरोप करण्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत तर स्वैराचार म्हणतात. आज त्याचाच धुमाकूळ चालू आहे असेच वाटते. कारण जिथे लोकांचा बळी जातो, तिथे निदान आपल्या चुका कबूल करण्याचेही सौजन्य माध्यमे दाखवत नाहीत. याला बनेल गुन्हेगार म्हणायला हवे.

   मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरात दंगल व गोळीबार झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता मुंबईत आले होते. राजभवनावर जाऊन शिवसेनाप्रमुखांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत राज ठाकरे होते. तर गुन्हेगाराला घेऊन ठाकरे गृहमंत्र्याला भेटले असे महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकीयात कुमार केतकर यांनी लिहिले होते. राज निर्दोष ठरल्यावर केतकर यांनी आधीच्या आरोपबाजीबद्दल एकदा तरी माफ़ी मागितली आहे काय? याला सभ्य समाजाचे प्रतिनिधी म्हणता येईल काय? आणि आज त्यांच्यासारखेच लोक माध्यमात बोकाळले आहेत. त्यामुळेच माध्यमे सुपारीबाज मारेकर्‍यासारखी वागतान दिसत आहेत. मात्र त्यातूनच त्यांची विश्वासार्हता संपत चालली आहे. कारण बातम्या किंवा त्यावरील चर्चा व उहापोह हे निव्वळ आरोपांचा धुरळा उडवण्याचा प्रकार झाला आहे. आरोप करणारेच नि:संशय खोटारडे असू शकतात असे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे.
==================================================

नसलेल्या बुद्धीचा वापर

एक मंदबुद्धीची मुलगी असते. तिच्या वयात येण्याने घरचे कुटुंबिय चिंतेत असतात. पण तिला खपवण्याचा मार्ग त्यांनी काढलेला असतो. बघायचा कार्यक्रम असतो, तेव्हा तिने एकही शब्द बोलू नये याची काळजी घेतली जाते. तिने फ़क्त पाहुण्यांसमोर चहाबिस्कीटे घेऊन यायचे असे ठरलेले असते. पाहुणे आल्यावर सर्वकाही व्यवस्थित पार पडते. दोन्हीकडची मंडळी व्यवहाराचे बोलून घेतात आणि अखेरीस मुलीला बोलावले जाते. ती चहाचा ट्रे घेऊन येते. पण त्यात बिस्कीटेच नसतात. तेव्हा अस्वस्थ होऊन वधूपिता तिला म्हणतो, ‘राधिका, ट्रेमध्ये बिस्कीटांची प्लेट होती ना? मग बिस्कीटे कुठे गेली?’ राधिका मस्त हसून म्हणते, ‘आणलीत ना बाबा बिस्कीटे. पाहुणे चहात बुडवूनच खातील ना? त्यांना कशाला त्रास म्हणून कपात बुडवूनच बिस्किटे आणली.’ असे सांगून ती घराची अब्रूच बुडवते. आधीच ‘पुर्ती’ कंपनीच्या भानगडीत फ़सलेल्या भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विवेकानंद व दाऊद यांची तुलना एका भाषणात केल्यावर कित्येक वर्षापुर्वी ऐकलेला हा किस्सा मला आठवला. नसलेल्या बुद्धीचा आगावू वापर करायला माणूस गेला, मग असेच होते.


==================================================
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी ११/११/१२)


शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२

भाजपा हारे तो नरेंद्रभाई मोदीनुं शुं थाय?


मोदी पंतप्रधान झाले तर;   बाकी नेत्यांचे काय होणार?    नुकतेच गेल्या रविवारी, विसनगर, गोविंदचकला पटेलवाडीमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या उपस्थितीत सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाघेला यांनी आपल्या भाषणात एक टिप्पणी केली. ’गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांपासून कॉंग्रेस हरत आली आहे. अजून एखाद्या वेळी कॉंग्रेस हरेलही, पण जर का गुजरातमध्ये भाजप हरला तर नरेंद्रभाई मोदींचे काय होईल?’

   तशी या घटनेची वा बातमीची राष्ट्रीय म्हणवणार्‍या माध्यमांनी फ़ारशी दखल घेतली नाही. कारण त्यात मोदी यांची टिंगल असली, तरी कुठला गंभीर आरोप वाघेला यांनी केलेला नाही. मात्र स्थानिक गुजराती वृत्तपत्रातुन ही बातमी झळकली. तरीही त्यासंदर्भात कुठला उहापोह करण्याची कोणाला फ़ारशी गरज वाटली नाही. यातूनच आपल्या माध्यमांचा उथळपणा लक्षात येतो. याचे कारण असे आहे, की गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दंगलीनंतर मोदी याच्या विरोधात देशभर माध्यमे व राजकीय विरोधकांनी सतत रान उठवले आहे. त्या सगळ्या विरोधी प्रचाराला झुगारून मोदी यांनी आपल्याला जे करायचे ते चालूच ठेवले आहे. त्यातून त्यांच्या पक्षातही त्यांचे अनेक विरोधक तयार झाले आहेत. त्यापैकी वाघेला व केशूभाई पटेल यांनी मोदी विरोधात उघडपणे आघाडीवर येण्याची हिंमत दाखवली आणि आयुष्य ज्यासाठी घालवले त्या पक्षाचाही त्याग केला आहे. आता गुजरात बाहेरही मोदी यांचे स्वपक्षात अनेक विरोधक तयार झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या राजकारणाला पुरक फ़ासे पडत आहेत, तोवर कोणाला दाद देण्याची त्यांना गरज नाही. पण निवडणुकीत पराभव झाल्यास त्यांच्या बाजूने कोण उभा राहिल; हा खरेच गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच वाघेला यांनी विचारलेल्या प्रश्नाला मोठाच राजकीय अर्थ आहे. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच, की सत्ता गेली मग भाजप तरी मोदींना संरक्षण देणार आहे काय? सत्ता गमावल्यास या माणसाच्या हाती काय शिल्लक राहिल, असा तो प्रश्न आहे.

   पण दुर्दैव असे, की कोणीच त्याची गंभीर दखल घेतली नाही. सर्वसामान्य पत्रकारांनी त्या विधानाला विशेष महत्व दिले नाहीच. पण ज्यांना मोदी यांचा पराभव बघायची मोठीच इच्छा आहे; अशा त्यांच्या सर्व क्षेत्रातील विरोधकांनीही वाघेला यांच्या त्या विधानाची चर्चाही करू नये, याचे खरेच नवल वाटते. इतकी अबाधित सत्ता भोगणारा व पक्षातही इतके शत्रू निर्माण करणार्‍या माणसाचा पराभव झाल्यास भवितव्य काय? असे वाघेला का म्हणाले ते आधी बघू. त्याचे कारण उत्तरप्रदेशात मायावतींनी सत्ता गमावली आहे. बिहारामध्ये लालुप्रसाद यांनी सत्ता गमावली आहे. कर्नाटकात येदीयुरप्पा स्वपक्षातही सत्तेसाठी काय कसरती करतात ते आपण बघतच आहोत. तिकडे बंगालमध्ये सत्ता गमावल्यापासून डाव्या आघाडीच्या लढवय्या नेत्यांचे पडलेले, कोमेजलेले चेहरे आपल्यासमोर आहेत. मग त्या सर्वांपेक्षा अधिक उर्मट व उद्धटपणे सत्ता राबवणार्‍या मोदींचे काय होईल; हा खरेच गंभीरपणे विचार करण्याचा विषय नाही का? पण तसे कुठे झाले नाही. गुजरातबाहेर कोणी त्या विधानाची दखलही घेतली नाही. पण एका किरकोळ गुजराती दैनिकाच्या जागरूक संपादकाने त्याची नुसती दखलच घेतली नाही, तर त्यावर सुंदर विश्लेषण केले आहे. तेवढ्याच एका जागरुक वाचकाने तो मजकूर माझ्याकडे पाठवून, त्यावर भाष्य़ करण्यास मला सुचवले. विलास भागवत असे त्या वाचकाने नाव अहे आणि त्यासाठी मी त्याचे मन:पुर्वक आभार मानतो. ‘पंजोकच्छ’ असे त्या गुजराती वृत्तपत्राचे नाव आहे आणि त्याच्या संपादकांनी वाघेला यांच्या विधानावर केलेले भाष्य़ मोठे मार्मिक आहे. ‘मोदीनुं शुं थाय?’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या त्या संपादकीयाचे स्वैर भाषांतर पुढीलप्रमाणे आहे.

   ‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी संत आत्मा आहेत.. ज्यांनी संसार, परिवार सोडून स्वत:चे जीवन गुजरात आणि देशासाठी समर्पीत केले आहे. नरेंद्रभाईना संत अशाकरिता म्हणायचे, की खरा संत जेव्हा आपला परिवार आणि कुटुंब सोडून देशसेवेसाठी बाहेर पडतो; तेव्हा तेव्हा तो परिवार आणि कुटुंबाची चिंता करीत नाही. अशा संतासाठी समग्र देशातील जनता परिवार बनून जाते. सद्यस्थितीत जेव्हा आपण अन्य राज्यांच्या मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्याशी मोदींची तुलना करतो, तेव्हा या लोकानीं सत्तापदे सांभाळल्यानंतर स्वत:चा आणि स्वत:च्या परिवारचा विकासा याशिवाय काही केलेले नाही. नरेन्द्र भाईना संत एवढ्यासाठी म्हणायचे, की त्यांना आपल्या परिवाराप्रति आपुलकीची भावना जरूर आहे. पण त्यांनी सत्तेचा गैरफायदा आपल्या परिवाराला मिळू दिलेला नाही. नरेन्द्रभाईच्या परिवारात सदस्य म्हणून विचार करताना पहिले नाव ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी, यांचे येते. सोमनाथभाई वडनगर येथे वृद्धाश्रम तर अहमदावाद येथे सर्वोदय सेवा ट्रस्ट चालवतात. समाज सेवेचे व्रत त्यांनी अंगिकारले आहे. त्यांच्याकडे आजमितीस स्वत:चे वाहन सुद्धा नाही. दोन क्रमांका्चे भाऊ अमृतभाई मोदी, मिलमध्ये नोकरी करून निवृत्त झाले असून सध्या अहमदावाद येथे सामान्य नागरीकाचे जीवन व्यतीत करीत आहेत. तिसरा क्रमांक नरेन्द्रभाईंचा. क्रमांक चारचे बंधू प्रल्हादभाई रेशनिंगचे दुकान चालवतात. ज्यांच्यात पण दामोदरदास मोदींचे रक्त सळसळते आहे. ते गुजरात राज्य रेशनिंग असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री भावापुढे लढा देण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत. पाचव्या क्रमांकाचे बंधु पंकजभाई मोदी गुजरात राज्य माहिती खात्यात नोकरी करतात आणि त्यांना मिळालेल्या सरकारी निवासात सामान्य सरकारी कर्मचार्‍याप्रमाणे रहातात. बंधु मुख्यमंत्री असुनही त्यांनी त्याचा दुरुपयोग करुन कोणत्याही प्रकारचे प्रमोशन मिळवलेले नाही. सर्वात लहान बहिण वासंतीबेन विसनगर इथे आयुर्विमा महामंडळात नोकरी करते आणि हसमुखभाई मोदींची ती धर्मपत्नी आहे. 

   डॉ. मिहिरभाई जोशींचे वडील द्वारकादास जो्शी यांनी स्वेच्छा-मरणासाठी अन्नपाण्याचा त्याग केला; तेव्हा नरेंद्रभाई द्वारकादास काकाना समजावण्यासाठी विसनगर येथे आले होते. त्यावेळी वासंतीबेन सामान्य प्रजेप्रमाणे नरेंद्रभाईंना पहाण्यासाठी गर्दीत उभ्या होत्या. नरेंद्रभाईनीं जेंव्हा आपल्या धाकट्या भगिनीला गर्दीत ओळखले, तेव्हा वहानांचा ताफा थांबवून ते बहीणीला भेटले होते. नरेंद्रभाईंच्या मातोश्री हिराबा मोदी, पंकजभाईकडे गांधीनगर येथे रहातात. नरेंद्रभाईं त्यांच्या वाढदिवशी आणि बेसतु वर्ष (दिवाळी पाडवा) या दोन दिवशी मातोश्रींची आशिर्वाद घेण्यासाठी पंकजभाईकडे गांधीनगर येथे जातात. नरेंद्रभाईंचा परिवार मोठा आहे. भाऊ, बहिण, पुतणे, पुतण्या, जावई, मेव्हणे, भाचे इत्यादी. पण त्यांच्या परिवारतील लोकानीं सत्तेचा कधी दुरुपयोग केला नाही. तसा एकही प्रसंग सांगता येत नाही. दुसरा कुणी एवढा मोठा नेता असता तर त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार सत्ता राबवून फळे चाखाण्यासाठी जमा होत असतात. जे मुख्यमंत्री नरेंद्रभाईंच्या शासन काळात कधीच पहाण्यास मिळाले नाही.  खर्‍या संतास कधी संपत्तीचा मोह नसतो. नरेंद्रभाईंच्या नावे मोठा बॅंक बॅलन्स आहे असे कधी पहाण्यात वा ऐकण्यात आले नाही. त्यांनी उद्योगपतींना प्रोत्साहन दिले, पण ते गुजरातच्या विकासासाठी. सार्वजनिक कार्यक्रमात मिळणार्‍या भेटवस्तू इतर नेते घरी घेउन जातात. पण नरेंद्रभाईं अशा मिळालेल्या भेटवस्तू गुजरात राज्याच्या कोषात जमा करतात. त्यांचा जाहिर लिलाव होतो आणि लिलावात मिळणारी करोडो रुपयांची रक्कम, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च होते. परिवाराच्या हिताकडे पाठ फ़िरवून देश आणि देशातील लोकांच्या सेवेचा ध्यास घेऊन जे कार्यरत रहातात; त्यांनाच खरे संत म्हणतात. या अर्थाने नरेंद्रभाई खरे संत आहेत. अशा महान पुरुषाच्या शक्तीचा, बुद्धीचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. सत्तेच्या लालची लोकांनी नरेंद्रभाईना दुषणे देण्याचे काहीच बाकी ठेवले नाही. अशा निस्पृह व्यक्तीकडे सत्ता असली काय किंवा नसली काय; त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. भाजप हरला तर नरेन्द्रभाईंना काहीच फरक पडणार नाही, पण सहा करोड गुजराती जनतेला मात्र जरुर फरक पडणार, हे निर्विवाद सत्य आहे.’  

   इथे त्या संपादकाला आपल्या कर्तबगार मुख्यमंत्र्याचे प्रचंड कौतुक आहे यात शंकाच नाही. त्याच्या साधेपणाने भारावून त्याने मोदी यांचे गुणगान केले आहे. तसेच मोदी यांना संतही ठरवले आहे. असे म्हटल्यावर टिकाकारांना लगेच बाकीच्या गोष्टी बाजूला पडून गुजरातची दंगल आठवणार यात शंकाच नाही. पण ज्यांना दंगल व तो हिंसाचार आठवतो, त्यापैकी कितीजणांनी मोदी यांच्या अशा व्यक्तीगत जीवनाची आजवर जाहिर वाच्यता केली आहे? नसेल तर का केली नाही? या संपादकाला त्याच मुख्यमंत्र्यामध्ये संत बघायचा असतो तर टिकाकारांना संतामधला सैतान बघायचा असतो. पण मला त्या वादात पडायचे नाही. माझा विषय आहे वाघेला यांचे विधान, मोदींचे काय होणार? मोदीनु सू थशे? आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्या संपादकाने शेवटच्या वाक्यात दिले आहे. ‘अशा निस्पृह व्यक्तीकडे सत्ता असली काय किंवा नसली काय; त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. भाजप हरला तर नरेन्द्रभाईंना काहीच फरक पडणार नाही, पण सहा करोड गुजराती जनतेला मात्र जरुर फरक पडणार आहे.’

   मोदी यांची सत्ता गेल्यावर काय, असा प्रश्न वाघेला विचारतात, तेव्हा त्यांनी मोदींची तुलना स्वत:शी वा अन्य सत्तालोलुप नेत्यांशी केलेली आहे. राजकारणात जायचे तर त्याचे स्वत:साठी व आपल्या आप्तस्वकीयांसाठी कोणकोणते लाभ उठवता येतील, त्यावरच डोळा ठेवून तिकडे लोक येत असतात. लोककल्याण व लोकसेवेच्या कर्तव्यभावनेने सार्वजनिक जीवनात येण्य़ाची संकल्पना आज कालबाह्य झाली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. मोदीसुद्धा आपल्यासारखा व इतरांप्रमाणे सत्तेसाठी व त्यातुन मिळणार्‍या लाभासाठी हपापलेला आहे, हे वाघेला यांचे गृहित आहे. तिथेच त्या प्रश्नातली गडबड आहे. कारण वाघेला यांचे गृहितच चुकीचे आहे. सत्ता कशासाठी व कोणासाठी यासंबंधी मोदी व अन्य नेत्यांच्या संकल्पनाच भिन्न आहेत. म्हणूनच दहा वर्षात त्यांच्यावर कुठलेही दंगल व कत्तलीचे आरोप होऊ शकले, तरी पैशाची अफ़रातफ़र किंवा भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी करू शकलेला नाही. त्याचवेळी घराणेशाही किंवा आप्त नातलगांना त्यांच्या सत्तेचा कुठला फ़ायदा मिळाल्याचे उदाहरण नाही. शिवाय ही बाब त्यांच्या व्यक्तीपुरतीच मर्यादित नाही. त्यांनी गुजरातची सत्ता राबवताना आपल्या पक्ष सहकार्‍यांनाही भ्रष्टाचार करू दिलेला नाही. किंबहुना त्यामुळेच केशूभाई किंवा झडापिया यांच्यासारखे त्यांचेच निकटवर्ति सहकारी त्यांच्यापासून दुरावले आहेत. हाच मोठा फ़रक आहे. म्हणूनच ‘मोदीनु सु थशे’ हा प्रश्न खरेच सर्वांनी गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे.

   ज्याच्या हाताल दंगलीत बळी पडलेल्या मुस्लिमांच्या हत्याकांडाचे रक्त लागलेले आहे, त्याला संत म्हणायचे काय, असा प्रश्न कुत्सितपणे विचारला जाऊ शकतो. तर त्याला उत्तर नाही. कारण असा प्रश्न उत्तरासाठी विचारला जातच नसतो, तर खिजवण्यासाठी विचारला जात असतो. मुद्दा आहे, तो मोदी संत असण्याचा वा नसण्याचा नाहीच. आजच्या परिस्थितीत मोदी हे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे, तेव्हा अशा प्रश्नाचे महत्व वेगळे आहे. लोक या माणसाकडे इतके आकर्षित का होत आहेत वा त्यांच्याविषयी देशभरातील मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षा का वाढत आहेत, याला महत्व आहे. म्हणून मोदींचे वर्णन एका गुजराती संपादकाने संत अशा शब्दात केले तर मी भारावून त्याकडे बघणार नाही. कारण तोंडावर संत म्हणायचे आणि पाठ वळली मग त्याच संताला सैतान ठरवायचे; याला हल्ली ‘अचुक बातमी ठाम मत’ म्हणतात. कायबीइन लोकमत वाहिनीचे मालक विजय दर्डा यांनीच अशा धोरणी पत्रकारितेची अलिकडे साक्ष दिलेली आहे. एका कार्यक्रमात त्यांनीही व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय संत अशी उपाधी दिली होती आणि त्याच्या बदल्यात त्यांचावर पक्षश्रेष्ठींची मोठीच अवकृपा होईल, असे भाकित मोदींनी तिथल्या तिथे केले होते. मग चोविस तास उलटण्यापुर्वी मोदींना संत म्हटल्याबद्दल विजय दर्डा यांना आपल्याच वृत्तपत्रातून लोटांगण घालण्याची वेळ आली होती. मग आपल्याला संत म्हणायचे नव्हते तर सैतानच कसे म्हणायचे होते, त्याचा खुलासा करीत दर्डा यांना दारोदार फ़िरावे लागले होते. म्हणूनच कुठल्या संपादकाने मोदींना संत ठरवल्याने मी त्यांना संतमहंत म्हणत नाही किंवा मानतही नाही. माझ्या दृष्टीने ज्याचे नाव भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे, म्हणूनच त्यांचे राजकीय व प्रशासकीय चरित्र काय आहे, तेवढी बाब मोलाची.

   आज भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापासून युपीए व कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी याच्या जावयापर्यंत, प्रत्येकाने राजकीय सत्तेचा फ़ायदा घेऊन देशाची व पर्यायाने सामान्य जनतेची लूट केली; अशा बातम्यांचा रोजच्या रोज भडीमार होत आहे, अशा पार्श्वभूमीवर मोदींबद्दलचे आकर्षण समजून घ्यावे लागेल. त्यासाठी मग सामान्य लोक कसा विचार करतात, तेच मुळात समजून घ्यायला हवे. ज्याला धान्य खरेदी करायचे असते, तो कधी कापडाच्या दुकानात जात नाही आणि कापड खरेदी करायचे आहे तो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात शिरत नाही. ज्याला टिव्ही घ्यायचा अहे तो पेट्रोल पंपावर जाणार नाही किंवा बस पकडणारा रेल्वेस्थानकात शिरत नाही. दुकान किती चांगले वा आकर्षक आहे, त्याकडे बघून ग्राहक तिथे जात नाही तर त्याच्या गरजेनुसारच तो दुकान निवडतो आणि तिथे जात असतो. सामान्य माणूस तसाच विचार करतो. आज देशातल्या जनतेसमोर ज्या बातम्या व घोटाळे येत आहेत, त्यातुन त्याच्या मनात अनेक विचार घोळत आहेत आणि भविष्यात आपण काय केले पाहिजे त्याचे आडाखे तो मनोमन बांधत असतो. त्याचा थांगपत्ता वातानुकुलीत केबिनमध्ये बसुन पुस्तकांचा अभ्यास करणार्‍यांना नसतो. म्हणूनच ते सामान्य माणसाप्रमाणे विचार करत नाहीत की त्याच्या निवडीचा अंदाज बांधू शकत नाहीत. ज्या घोटाळे, भ्रष्टाचार, अफ़रातफ़री व महागाई, अराजकाने आजचा समान्य माणूस रडकुंडीला आलेला आहे, तो आपली आवडनिवड संपादकाने कुणाला संत म्हटले, म्हणून त्याच्या भक्तीला लागण्याच्या दिशेने सरकू देत नाही. त्याची निवड आपल्या गरजा व त्यानुसार उपलब्धता यादृष्टीने होत असते. आज त्याचे जीवन वैचारिक भूमिकांमुळे गांजलेले नाही, तर त्या वैचारिक भूमिका मांडून सत्ता बळकावणार्‍यांच्या भ्रष्ट वर्तनाने उध्वस्त झालेले आहे. मग त्याचा धर्म वा जात, भाषा, प्रांत कुठलाही असो. त्यातून त्याला मार्ग शोधायचा आहे. त्यामुळेच त्याला सत्तेवर येणारा पक्ष किंवा सत्ता राबवणारा नेता कसा हवा; त्याबद्दल त्याचे ठोकताळे तयार होत आहेत. ते ठोकताळे काय असावेत?

   त्या सामान्य भारतीय जनतेला कोणी संतमहंत, त्यागी पुरूष सत्तेवर हवा आहे काय? त्याला धर्मनिरपेक्ष व पुरोगामी पक्ष हवा आहे काय? तोंडाने आम आदमीची चिंता करणारा व त्याच आम आदमीचे जीवन देशोधडीला लावणारा सत्ताधीश हवा आहे काय? की त्या सामान्य माणसाला त्याच्या गांजलेल्या जीवनातून दिलासा देणारा व स्वच्छ कारभारातून विकासाची हमी देणारा सत्ताधारी हवा आहे? त्याला स्वच्छ चरित्र्याचा पण राजरोस चालू असलेली लुटमार थांबवण्यात अपयशी ठरणारा चारित्र्यसंपन्न नेता हवा आहे, की खंबीरपणे योग्य निर्णय घेऊन सत्ता राबवणारा व पक्षहितापेक्षाही सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारा कोणी पंतप्रधानपदी हवा आहे? ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही, जो जीवनाला भेड्सावणार्‍या प्रश्नांना थेट भिडतो आणि विकासाची कास धरतो, कठोर निर्णय घेऊ शकतो व प्रसंगी कायद्याचे अवडंबर न माजवता लोकांचे प्रश्न सोडवू शकतो; असाच पंतप्रधान लोकांना हवा आहे का? असेल तर मग उपलब्ध नेत्यांमध्ये असा पर्याय कोणता आहे? ज्याचे नातेगोते सत्तेचा लाभ उठवून लुट करणार नाहीत, ज्याच्या पक्षाच्या नेत्यांना वा सहकार्‍यांना लूटमार करण्याची संधी मिळणार नाही. ज्याच्यावर असे कुठले आरोप दहा वर्षाच्या कारकिर्दीत होऊ शकलेले नाहीत. ज्याच्या राज्यात विकास होतो आहे आणि जनजीवन सुरक्षित व सुसह्य आहे. तिकडे आपोआप सामान्य माणसाचा ओढा असणार. राजकीय, आर्थिक व प्रशासकिय अराजकातून या समाजाला व देशाला वाट काढून देईल आणि ते करताना कोण काय म्हणतो; त्याची फ़िकीर करणार नाही असा खंबीर नेता लोकांना हवा आहे व लोक याच्या शोधात आहेत. आणि गुजरातबद्दल दहा वर्षात जे काही लोकांच्या कानी आले आहे; ते त्यांना मोदींकडे आकर्षित करते आहे. ते विचारवंत वा पत्रकार मंडळींना आवडणारे असो किंवा नसो, लोक तो पर्याय निवडत असतात. त्याचीच प्रचिती मग मतचाचण्यांतून येत असते.

   म्हणूनच वाघेला यांचा प्रश्नच चुकीचा आहे. ‘मोदीनु सु थशे’ असा प्रश्नच नाही. ज्याला स्वत:चे मोह, लोभ नाहीत त्याला सत्ता हाताशी असली किंवा गेली म्हणुन फ़रक पडत नाही. तो फ़रक ज्यांना पडतो, त्यात केशुभाई, वाघेला, लालू, अडवाणी, शरद पवार इत्यादींचा समावेश होतो. मोदींसाठी तो निकषच नाही. प्रश्न उलटा आहे. मोदी पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचले, तर मग उर्वरित राष्ट्रीय नेत्यांचे काय होईल? कारण गुजरातप्रमाणे मोदींनी देशाच्या कारभारात सुधारणा व प्रगती करून दखवली, तर वाघेलांसारख्या प्रवृत्तीचे जे डझनावारी राष्ट्रीय नेते दिल्लीत घोटाळत आहेत, त्यांचे काय होणार? गुजरातीमध्ये सांगायचे तर म्हणावे लागेल, ‘अगर मोदी वडाप्रधान थाय, तो बाकी नेतानु सु थशे?’ कारण मोदी नुसता स्वत: स्वच्छ रहात नाही. तो स्वत: पैसे खात नाहीच, पण दुसर्‍यांनाही खाऊ देत नाही ना?