शनिवार, ४ मे, २०१३

हा सरकारी कारभार की, दादा कोंडकेंचा तमाशा?




   दादा कोंडके हा अस्सल सोंगाड्या म्हणून गाजलेला माणूस. त्यांचा पहिला चित्रपटच ‘सोंगाड्या’ या नावाचा होता. त्याआधी दादा रंगमंच गाजवत होते. हल्लीच्या पिढीला बहूधा दादांनी गाजवलेला रंगमंच माहितीसुद्धा नसेल. त्यामुळे आपल्या हजरजबाबी व प्रासंगिक विनोदाने त्यांनी रंगवलेले ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वसंत सबनीस लिखित वगनाट्य आताच्या पिढीसाठी दंतकथाच आहे. पण त्या काळात म्हणजे चार दशकांपुर्वी दादांचा जमाना होता, तो रंगमंचावरचा. ‘विच्छा’ बघायला समाजातील मान्यवरांची रीघ लागायची. कारण एका साध्यासुध्या वगनाट्याला दादांनी आपल्या प्रासंगिक विनोदाने प्रत्येक प्रयोगात नवे रूप दिलेले होते. पण बाकीचा वग व कथा ही ठरलेली आणि नेहमीचीच होती. वगनाट्य किंवा तमाशा म्हणजे त्यात राजा, प्रधान व हवालदार शिपाई आलेच. ‘विच्छा’मध्ये दादा हवालदार होते आणि त्यांची नजर कोतवाल पदावर असते. अशा कथेतला राजा अत्यंत झोपळू व आळशी होता. कधी झोपमोड झाली व जाग आलीच, तर राजा दरबार भरवायचा आणि राज्यात काय चालले आहे त्याची खबरबात घ्यायचा. अशाच एका प्रसंगाने वगनाट्य सुरू व्हायचे. जांभया देतच राजाची स्वारी येते आणि आपल्या राज्याच्या कारभाराची विचारपूस करते. ज्याला आजच्या कालखंडात राजकीय भाषेमध्ये ‘गव्हर्नन्स’ असे म्हणतात. तर राजा विचारायचा राज्य कसे चालू आहे. आणि मग प्रधानापासून प्रत्येक सरदार व दरबारी आपल्याकडे येणारा प्रश्न पुढल्यावर ढकलून मोकळा व्हायचा. शेवटी पाळी यायची ती बिचार्‍या हवालदार दादा कोंडके यांच्यावर आणि दादा आपल्या मजेशीर शैलीत त्याचे उत्तर देऊन राजाला समाधानी करायचे.

       ‘कारभार म्हंजे एकदम झक्क चाललाय म्हाराज. कायबी चिंतेच कारन न्हाई बघा. सगळं कसं जागच्या जागी आणि जिथल्या तिथं. चोर तेवढे चोर्‍या करतात, बाकी कोनाची हिंमत नाय. दरोडेखोर तेवढेच दरोडे डाके घालतात, बाकी कोनाची बिशाद नाय. बलात्कारी तेवढेच बलात्कार करतात आणि भेसळ करणारे सोडून कोणाची माय नाय व्याली भेसळ करायची. सगळं कसं एकदम झक्कास. साला कोणी म्हागाई करू शकत नाय साठेबाज व्यापारी सोडून, असा कारभार हाये बघा म्हाराज. एकदम जिथल्या तिथे.’

   दादांच्या अशा उत्तरावर राजा एकदम खुश होतो आणि पुन्हा झोपायला निघत असतो, इतक्यात काहीसे डोक्यात येते आणि वळूम म्हणतो, ‘पण हवालदार, मुडद्याचं काय हो? तेबी जागच्याजागीच हायेत व्हय?’ दादा आपल्या हजरजबाबी पद्धतीने तात्काळ राजाचे समाधान करणारे उत्तर देत.

      ‘नाय म्हाराज तेवढं काम आमी करतो ना, मुडदे हलवायचं. बाकी आमाला कामच काय हाये? सरकार फ़क्त मुडदे जागच्याजागी र्‍हावू देत न्हाई बघा. कारभार एकदम झक्कास. आपण निश्चिंत मनाने झोपा म्हाराज. काळजीचं कायबी कारन न्हाई.’ 

   सभागृहातले प्रेक्षक पोट दुखेपर्यंत अशा विनोदावर हसायचे. कारण राजा मग निश्चिंत मनाने झोपा काढायला मोकळा व्हायचा. त्या प्रेक्षकात आजचे अनेक ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ट नेते व राज्यकर्तेही असायचे, अगदी शरद पवार यांच्यापासून अनेक निवृत्त संपादकांपर्यंत अनेकांचा त्यात समावेश होता. भारताचे आजचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही त्यापैकीच एक आहेत. त्यांनीही दादा कोंडकेंच्या त्या विनोदाचा आस्वाद घेतलेला आहे. पण गुरूवारी जेव्हा शिंदे यांना टिव्हीवर पाहिले व ऐकले; तेव्हा चार दशकांपुर्वीचे दादा कोंडके आठवले. शब्द वेगळे असले तरी दादा कोंदकेच देशाचे गृहमंत्री म्हणून बोलत आहेत काय; असेच क्षणभर वाटून गेले. कारण शब्द वेगळे असले तरी शिंदे यांचे वक्तव्य नेमके दादांना अभिप्रेत असलेला अर्थच सांगत होते. मात्र दादांच्या विधानावर तेव्हा प्रेक्षागारातली गर्दी खिदळून हसत असायची. कारण तेव्हा तो विनोद होता. आज चाळीस वर्षांनी तो विनोद उरलेला नाही, तर आपल्या देशाच्या सरकारचे ते राष्ट्रीय कारभाराचे धोरण बनून गेले आहे. कारण दलबीर कौर नावाच्या पीडित महिलेला तिच्या भावाचा मृतदेह पाकिस्तानातून इथे आणून सुखरूप पोहोचवला जाईल, हे आश्वासन द्यायला शिंदे गेले होते व त्यानंतर टिव्हीच्या कॅम्रेरा समोर येऊन आपल्या सरकारचा पराक्रम सांगत होते.

   गुरूवारी शिंदे यांनी जे काम केले ते वगनाट्यातल्या दादा कोंडके यांच्या हवालदारापेक्षा वेगळे होते का? गेल्या दोनतीन वर्षात युपीए सरकारचा जो कारभार चालू आहे, तो दादांच्या वर्णनापेक्षा वेगळा आहे काय? आज सर्वजीतच्या मृत्य़ुचा कल्लोळ चालू आहे आणि तीन महिन्यांपुर्वी दिल्लीतल्या एका तरूणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर तिच्याही मृतदेहाचे हस्तांतरण करण्याचीच घटना होती ना? त्यातून कोणाला हे सरकार वाचवू शकले आहे? सीमेवरून भारतीय जवानांची हत्या करून मुंडके कापून पळवले जाते. त्याचाही मृतदेह सन्मानपुर्वक त्याच्या गावी व कुटुंबापर्यंतच पोहोचवण्याचे काम भारत सरकारने केले नव्हते का? त्या जवानाची हत्या किंवा विटंबना, याबद्दल पाकिस्तानला कुठला जाब हे सरकार विचारू शकले होते का? पाकिस्तान तरी दुसरा देश आहे व तिथे आपली हुकूमत चालू शकत नाही. पण ज्या दिल्लीत बसून या सरकारची देशभर हुकूमत चालते, त्या दिल्ली नावाच्या महानगरात तरी यांच्या सत्तेचा दबदबा आहे काय? कोणी गुन्हेगार, दहशतवादी किंवा गुंड समाजकंटक यांना दाद देतो काय? कायदा मोडायची कोणाला भिती वाटते काय? सर्वकाही सर्वत्र ठप्प झालेले म्हणजे जिथल्या तिथे आहे ना? सरकार वा कायद्याच्या राज्याचा मागमूस कुठे सापडतो काय? आणि सरकार म्हणजे तरी काय आहे? कधीतरी झोपमोड झाल्यासारखी जाग आली, तर डोळे उघडून बघायचे तशी मंत्रीमंडळाची वा कोअर ग्रुपची बैठक होत असते. की पुन्हा सगळे सरकार झोपा काढायला मोकळे; अशीच एकूण स्थिती नाही काय? त्या वगनाट्यात दादा म्हणतात, मुडदे तेवढे आम्ही हलवतो, बाकी सरकारला कामच काय आहे? आजचे युपीए सरकार त्यापेक्षा वेगळे काही करताना आपल्याला दिसते आहे काय?

   चिनी सीमेवर चिनी सैनिकांनी दहा बारा किलोमिटर्स इतकी घुसखोरी केली आहे. त्याच्यावर इतका गवगवा झाला आहे. माध्यमांनी काहूर माजवले म्हणून; अन्यथा सरकारने त्याची दखल तरी घेतली होती काय? पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांना प्रश्न विचारला, तर त्यांना कुठली घुसखोरी व कुठल्या सीमेवर त्याचाही थांगपत्ता नव्हता. आणि इतका कल्लोळ झाल्यावर पंतप्रधान थंडपणे म्हणतात, त्यात काही मोठे नाही. स्थानिक प्रश्न आहे. मनमोहन सिंग यांना स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यातला फ़रक तरी कळतोय का? दोन देशांच्या सीमेवर जेव्हा वाद होतात, त्याला स्थानिक नव्हेतर आंतरराष्ट्रीय समस्या म्हणतात, हे देशाच्या पंतप्रधानाला पत्रकारांनी सांगायचे असते काय? चीनने भारतीय हद्दीत शिरकाव करून तंबू ठोकले व सेनेच्या चिलखती गाड्या आणुन तळ ठोकला; तर मनमोहन सिंग यांना तो तामीळनाडू कर्नाटकामधला कावेरी पाण्याचा वाद वाटतो की काय? जणू वगनाट्यातला राजा जांभया देत बोलायचा; तसेच आजचे पंतप्रधान बोलतात व त्यांचे गृहमंत्री नुसते मृतदेह हलवण्याचे काम करतात, ही वस्तूस्थिती झाली आहे ना? मग असे वाटते, की चार दशकांपुर्वी शिंदे ‘विच्छा’ बघून मनोरंजन करत होते, की चार दशकानंतर देशाचा कारभार करण्याचे दादा कोंडके यांच्याकडून धडे गिरवत होते? कारण आता त्यांनी मोठाच काही पारक्राम केल्याप्रमाणे सर्वजीतचा मृतदेह पाकिस्तानातून आणून दाखवल्याचा आव आणला आहे. एका खंडप्राय देशाचा कारभार वगनाट्य किंवा तमाशासारखा चालू आहे, असे नाही तर दुसरे काय म्हणायचे? आणि याबद्दल विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले, तर राजकारण करू नका असेही सल्ले दिले जातात. मग राजकारण कशाला म्हणतात? विरोधकांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून सवाल करायचे नसतील, तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे नेमके काय काम असते? सरकारच्या मुर्खपणाचे विरोधी पक्षाने कौतुक व गुणगान करण्याला लोकशाही म्हणतात काय?

   एकूणच देशात सध्या काय चालले आहे, त्याचा कोणाला अंदाज करता येणार नाही. दर महिन्यात दिल्ली या देशाच्या राजधानीत लाखो हजारो लोक रस्त्यावर उतरतात आणि जनजीवन ठप्प करून टाकतात. एका मोठ्या शहरातल्या इतक्या लोकांना आठदहा दिवस कामधंदा सोडून रस्त्यावर येणे परवडेल का आजच्या महागाईच्या जमान्यात? एक दिवसाचा रोजगार बुडवला तर संध्याकाळी घरातली चुल कशी पेटेल, अशी चिंता करणार्‍या लोकांचीच ही गर्दी असते आणि त्यांचा सुखरूप जीवनावरचा विश्वास उडाल्याने ते इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात, एवढेही समजण्याची संवेदनक्षमता आपल्या सरकारमध्ये उरलेली नाही काय? सरकार म्हणून आपल्या कोणत्या जबाबदार्‍या आहेत, याचेही भान राज्यकर्त्यांना उरलेले नाही काय? बरे अशी स्थिती दिल्ली वा मुंबई अशा एखाद्या शहरातली सुद्धा म्हणता येत नाही. सीमेवर सैनिकांची कत्तल होते आणि दुसरीकडे आपल्या सीमेमध्ये चिनी सैनिक येऊन तळ ठोकतात. त्याचीही फ़िकीर या सरकारला नाही. कोणी विचारले तर त्यावर राजकारण नको म्हणायचे. राजकीय हेतूने आरोप केला म्हणायचे. सीमेवरच शत्रू गडबड करतो म्हणायचे, तर सरकारची तिजोरी तरी शाबूत आहे काय? तिथे हजारो व लाखो करोडो रुपयाची सरकारी संमतीनेच लूट झाल्याची प्रकरणे दर महिना उजेडात येत आहेत. मग सरकार म्हणून जे लालदिव्याच्या गाड्यांमधून मिरवत असतात, ते नेमके काय करतात? झोपा काढतात, यापेक्षा दुसरे कुठले उत्तर आहे काय? साध्यासरळ भाषेत यालाच अराजक म्हणतात. कायदा म्हणून कुठे त्याचा दबदबा दिसत नाही. बेकायदा इमारती उभ्या रहातात, त्याही कोसळून शेकडो लोक त्याखाली गाडले जातात. कोणी उठतो आणि कुठेही बॉम्बस्फ़ोट घडवून आणतो. ज्यांना कोर्टाने शिक्षा दिल्या आहेत, त्यांना फ़ाशी देतानाही सरकारचे पाय लटलटा कापतात. मग सरकार म्हणायचे कोणाला आणि गुन्हेगारांनी कोणाला घाबरून रहायचे?

   खरे बघायला गेल्यास दादांच्या त्या वगनाट्यासारखी देशाची अवस्था होऊन गेलेली आहे. राजा आहे, प्रधान आहे, सरदार व दरबारी आहेत, फ़ौजदार व अधिकारी आहेत. पण कोणाला कसली चिंता नाही, की फ़िकीर नाही. सगळा कारभार हवालदार नावाच्या तळातल्या अंमलदारावर सोपवून सगळे झोपा काढत आहेत, अशीच स्थिती नाही काय? दिल्लीत सामुहिक बलात्कारानंतर लोकांमध्ये जी संतापाची लाट उसळली, ती राजकीय समस्या होती, लोकांना सामोरे जाऊन राज्यकर्त्यांनी समजूत घालायचे धाडस दाखवायला हवे होते. पण सगळे राज्यकर्ते बिळात दडी मारून बसले व पोलिसांना जमावाचा बंदोबस्त करायचे काम सोपवण्यात आले. दीड वर्षापुर्वी रामदेव यांनी काळ्यापैशाच्या विरोधात आंदोलन छेडले, तर त्यांना विश्वासात घ्यायचे सोडून त्यांच्याही अंगावर पोलिस घालण्यात आले. मग महिन्याभरात अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी उपोषण करायचे ठरवले; तर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची फ़ौज पाठवण्यात आली. बलात्काराचा निषेधार्थ लोक राष्ट्रपती भवनाकडे गेले; तर त्यांच्याही अंगावर पोलिस सोडण्यात आले. कुठेही जा तिथे लोकांना विश्वासात घेण्याची सरकारला गरजच वाटत नाही. थेट पोलिसांना लाठीमार, अश्रूधूर वा गोळीबार करायचे आदेश दिले जातात. ह्यालाच कारभार म्हणायचे असेल तर मग इतके मंत्री व सचिव वगैरे हवेतच कशाला? पोलिस व त्यांचे अधिकारी असेच शासन उभे करावे. वगनाट्यामध्ये जसा सगळाच कारभार हवालदार चालवतो, तसेच आजचे युपीए सरकार चाललेले नाही काय? कुठल्याही प्रश्न व समस्येवर पोलिस हेचा त्यांच्याकडे एकमेव उत्तर व उपाय दिसतो. हीच मानसिकता असेल तर मग एकूणच राज्यकारभाराचा तमाशा होऊन गेला, तर नवल कुठले?

   देशाची संसद सुद्धा ठिक चाललेली नाही. हे सरकार वा सत्ताधारी विरोधी पक्षांना सभागृहात प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. रस्त्यावर आलेल्या जनतेला सामोरे जात नाहीत, की तिची समजूत काढत नाहीत. महिलांना सुरक्षा देऊ शकत नाहीत. घरातल्या इवल्या बालिकेला वा शाळेतल्या विद्यार्थिनीला सुरक्षेची हमी देऊ शकत नाहीत. मग सरकार आहे कशाला आणि हवे कशाला? परदेशाशी असलेले संबंध त्याला संभाळता येत नाहीत, की शेजारी देशातून होणारी सेनेची वा माणसांची घुसखोरी थोपवता येत नाही. आणि सर्वकाही झकास चालू आहे, असे उत्तर पुन्हा दिले जाते. इतका कारभार उत्तम चालू आहे; तर लोक वेडाचार म्हणून कामधंदा सोडून रस्त्यावर येतात असे म्हणायचे काय? जगात आपली बेअब्रू होते आहे, याचेही भान राज्यकर्त्यांना उरलेले नाही. अवघ्या नऊ वर्षापुर्वी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना २००४ या कालखंडात चीनशी स्पर्धा करणारा देश; अशी आपली जगात ख्याती होती. एकविसाव्या शतकातील उगवती महासत्ता म्हणून चीनशी भारताची स्पर्धा चालू आहे, असे म्हटले जात होते. तोच भारत आज कुठे येऊन कोसळला आहे? आज कोणी भारताला उगवती महासत्ता म्हणत नाही. एक केविलवाणा दुबळा देश म्हणुन जग व शेजारी आपल्याकडे बघत असतात. दुबळ्या सिंहाच्या तोंडचा घास हिसकावून घेणार्‍या गिधाडांप्रमाणे चीन वा पाकिस्तान सोडा मालदीव सारखा इवला बेटवजा देश आपल्याला डोळे वटारून दाखवत असतो. चीनने घुसखोरी केल्याबद्दल तक्रार केली, तर त्याचे साधे उत्तर देण्यापेक्षा चिनी सेना आणखी दोन ठाणी उभारते. आणि सर्वजीतला कोर्टाकडुन फ़ाशी देण्याचा मार्ग मोकळा नाही, म्हणुन पाकिस्तान कैद्यांकरवी त्याची तुरूंगातच हत्या घडवून आणते. त्याचा जाब विचारणे दूरची गोष्ट झाली. इस्पितळात अखेरच्या घटका मोजणार्‍या सर्वजीतला भेटायला त्याच्य कुटुंबियांना पाकिस्तानचा व्हिसा मिळवून देण्यासाठी भारत सरकारला गयावया कराव्या लागतात. याला राजा म्हणायचे की सोंगाड्या?

   आणि अशा स्थितीत असूनही आमचे पंतप्रधान व गृहमंत्री सर्वकाही जिथल्या तिथे असल्याची भाषा बोलतात तेव्हा मनाचा प्रचंड संताप होतो, आपलाच नव्हेतर त्या सर्वजीतची बहीण दलबीर कौर माघारी परतल्यावर वाघा सीमेवरच पत्रकारांशी बोलताना जो आक्रोश करत होती, तो काळीज पिळवटून टाकणारा होता. तिने तर थेट भारत सरकार व पाकिस्तान सरकार अशा दोघांनी कारस्थान करून सर्वजीतला मारल्याचा गंभीर आरोप केला आणि तो करताना ती छाती बडवून म्हणाली, ‘शर्म करो प्रधानमंत्री’. तिच्या त्या शब्दांचा व भावनेचा ज्यांच्यावर किंचितही परिणाम झाला नाही, त्यांना लोकशाहीतले राज्यकर्ते म्हणायचे काय? वाघा सीमेवरून दलबीरने भारताच्या पंतप्रधानावरच आपल्या नागरिकाला पाकिस्तानच्या तुरुंगात मारल्याचा आरोप केला, तेव्हा मला माझ्या भारतीय असण्याचीही शरम वाटली होती. पण आपल्या पंतप्रधान वा गृहमंत्री यांच्यावर त्याचा तीळमात्र तरी परिणाम झाला काय? अत्यंत मख्ख चेहर्‍याने पंतप्रधान, व गृहमंत्री बोलत व उत्तरे देत होते. कुणाही देशप्रेमी भारतीयाला आज आपल्या देशाची अशी अवस्था बघून शरम वाटल्याशिवाय रहाणार नाही. ज्या देशात पाच वर्षाच्या बालिकेला सुरक्षेची हमी नाही, जिथे हमरस्त्यावर सामुहिक बलात्कार होतात व जिथे सरकारच्या पहार्‍यात सरकारी तिजोरीवर डाका घातला जातो आणि आपल्याला काहीच ठाऊक नाही, म्हणत पंतप्रधान कानावर हात ठेवतो, त्या देशाचे नागरिक असणे कोणाला अभिमानास्पद वाटेल? त्या देशाला जगात कोण प्रतिष्ठा देईल? त्याचा जगात कुठला दबदबा असेल?

   विरोधी पक्ष पाडत नाहीत किंवा पाठीशी बहूमत आहे; म्हणून सत्तेची खुर्ची उबवत बसण्यात धन्यता मानंणार्‍यांना जनता कशी वागणूक देते; त्याचे दाखले अलिकडल्या इतिहासात जगाने आसपासच पाहिले आहेत. आदल्या दिवसापर्यंत लोकांवर रणगाडे घालण्याची धमकी देणारा इजिप्तचा हुकूमशहा, आज आजारी अवस्थेमध्ये तुरूंगात खितपत पडला आहे आणि लोकांच्या संतापावर विमानातून बॉम्बफ़ेक करणार्‍या गडाफ़ीला लिबीयामध्ये कसा मृत्यू आला? भारतात लोकशाही असल्याने तेवढी शोकांतिका शक्य नाही. पण लोकांचा सतत वाढत चाललेला क्षोभ आणि वैफ़ल्य; या सरकारच्या शेवटाचीच नांदी आहे. जेवढ्या लौकर आजचे राज्यकर्ते तो आक्रोश व घंटानाद ऐकू शकतील, तेवढे त्यांना सत्तेवरून उतरताना कमी अपमानित व्हावे लागेल. पण आजचे एकूण लोकमानस बघता भारतातल्या आजवरच्या कुठल्याही सरकारविषयी सामान्य माणसाच्या मनात इतकी घॄणा कधीच नव्हती. कितीही कमी कुवतीचे नेते पंतप्रधान होऊन सत्तेवर आरुढ झालेले असतील, पण त्यापैकी कोणी राज्यकारभाराचा इतका हास्यास्पद तमाशा केला नव्हता, एवढे मात्र नक्की. स्वर्गात कुठून तरी भारताकडे बघत असलेले दादा कोंडकेही मनातल्या मनात म्हणत असतील, आपण वगनाट्य रंगवले तेच देशाचे भवितव्य होते की काय?

४ टिप्पण्या:

  1. yath raja tatha praja, kharetar murdad prajech murdad raja, kay honar itar deshat ase aste tar sarkarla 10 wela payutar whave lagale aaste.

    उत्तर द्याहटवा
  2. नमो यांच्या गुजरात मधील कार्यप्रणालीच्या अनुभवातून देशाचा कारभार त्यांना चालवायचा संधी मिळाली तर वगनाट्यातील हवालदारांच्या हातून विचारवंत व तज्ज्ञ लोकांच्या हाती जाऊन देशाचे जगात नाव होईल.

    उत्तर द्याहटवा
  3. इतक्या वर्षांनी हा लेख वाचतोय जर मोदी परत नाही आले तर पुन्हा हीच परिस्थिती येणार.

    उत्तर द्याहटवा