शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

खाया पिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना


 परवा अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर जे काहूर माजले आहे, त्याचा आढावा घ्यायचा तर खुप म्हणजे खुपच मागे जावे लागेल. म्हणजे जेव्हा (अजित)दादांनी राजकारणात पडायचा विचार सुद्धा केला नव्हता, त्या काळापर्यंत मागे जावे लागेल. मला वाटते ते १९७८ साल होते आणि तेव्हा दादांचे चुलते आणि आजचे त्याच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार खुपच तरूण व उत्साही नेता होते, तेवढे मागे जावे लागेल. तेव्हा शरद पवार आजच्या दादांच्या वयापेक्षाही तरूण होते. तरूण म्हणजे आजच्या जितेंद्र आव्हाडांना पितृतुल्य वाटण्य़ापेक्षा खुपच तरूण. कारण तेव्हा शरद पवारांनाच वसंतदादा पितृतुल्य वाटत असत. तेव्हा त्यांनी असाच राजिनामा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप घडवला होता. सर्व देशातच कॉग्रेसचे पानिपत झाले होते आणि तरीही इंदिराजींनी दुसर्‍यांदा कॉग्रेस पक्ष फ़ोडण्याचे धाडस केले होते. मग महाराष्ट्रात प्रथमच दोन कॉग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन झाले होते आणि तेसुद्धा अनेक अपक्षांच्या मदतीनेच स्थापन झाले होते. एक एक आमदाराची गणना करावी लागली होती आणि अंगात ताप व काविळीची बाधा असतानाही ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटिल यांनी दिल्लीला धाव घेऊन दोन्ही कॉग्रेसना एकत्र आणुन सत्ता मिळवायचे धाडस केले होते. ते सरकार बनले आणि नासिकराव तिरपुडे यांच्या रुपाने प्रथमच महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळाला होता. त्यात शरद पवार उद्योगमंत्री झाले होते. पण त्यांनी त्या खात्याचा कारभार संभाळताना एकच मोठा उद्योग केला, तो म्हणजे ते सरकार फ़ार काळ चालू दिले नाही. त्यांच्या पुढाकाराने बाविस आमदार सरकार व सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले आणि दादांचे सरकार गडगडले. मग समांतर कॉग्रेस असा गट स्थापन करून शरद पवार यांनी विधानसभेतील सर्वात मोठ्या जनता पक्षाशी हातमिळवणी केली आणि पुलोद सरकार बनवले. ही सगळी कसरत ऐन विधानसभा अधिवेशन चालू असताना घडली होती. त्यामुळे विधीमंडळात मांडलेला अर्थसंकल्प धु्ळ खात पडला होता. नव्या सरकारने त्यावर मंजुरी घेऊन तो संमत केला. पण त्याच दरम्यान विधीमंडळात माजी अर्थमंत्री यशवंतराव मोहिते आणि नवे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यात झालेला सुसंवाद मला अजून आठवतो.

   शरद पवारांनी पितृतुल्य वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा तेव्हापासून आरोप होत राहिला. पण त्यावेळी त्या अधिवेशनात पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप यशवंतराव मोहिते यांनी पवार यांच्यावर केला होता. त्याला चोख उत्तर देताना पवार म्हणाले होते, की आपण सामान्य कार्यकर्ता म्हणुन कॉग्रेसमध्येच वाढलो. मोहिते मंत्री व्हायला पक्षात आले आणि त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा वगैरे शिकवू नये. यातला एक मुद्दा खुप मोलाचा आहे. शरद पवार यांनी आपण सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात वाढलो आणि मंत्री व्हायला पक्षात अवतरलो नाही, असे अभिमानाने उच्चारलेले वाक्य. आज त्यांना काय भेडसावते आहे? ज्याने कधी पक्षातला सामान्य कार्यकर्ता म्हणुन काम केले नाही आणि थेट काकाचा पुतण्या म्हणुन निवडणुक लढवून मंत्रिपदावर दावे केले व मिळवले, त्यानेच पवार यांना आव्हान उभे केले आहे. अर्थात अजितदादांनी हे सत्य कधीच लपवले नाही. आपल्याला ते तिकडे दिल्लीत बसलेत त्यांच्याकडून तिकीट मिळत असते, त्यासाठी अर्ज करावे लागत नाहीत; असे अजितदादांनी एकदा स्पष्टपणे सांगून टाकलेले आहे. तेव्हा त्यांच्या स्पष्टवक्ता स्वभावाबद्दल शंका घेण्य़ाचे कारण नाही. पण ३३ वर्षात राजकीय परिस्थितीने किती कुस बदलली बघा, आज मंत्री व्हायलाच घरातून पक्षात आलेल्याने त्याच शरद पवार यांच्यासमोर घरगुती पक्षातच आव्हान उभे केले आहे. दिड वर्षापुर्वी भाजपामध्ये गोपिनाथ मुंडे यांची कुरबुर चालू होती. तेव्हा शरद पवार म्हणाले होते, की मुंडे यांना देण्यासारखे राष्ट्रवादीकडे काहीच नाही. मग आता असा प्रश्न पडतो, की अजितदादांना देण्यासारखे असून काकांनी काय द्यायचे बाकी ठेवले आहे? दुसर्‍यांच्या पुतण्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला तेव्हा टाळ्या पिटणार्‍या बारामतीच्या काकांची आता आपल्या पुतण्याची कुठली हौस भागवताना तारांबळ उडाली आहे?

   भुजबळांपासून वळसे पाटिल, आबा पाटिल किंवा विजयसिंह मोहिते पाटिल अशा सर्वच सहकर्‍यांना गप्प करायला पवारांना क्षणाचाही विलंब होत नाही, त्याच पवारांना घरच्या कुरबुरी अनावर झाल्यात का? तीन वर्षापुर्वी निवडणूका संपल्यावर विधीमंडळातील पक्षनेता निवडताना दादांनी लावलेली फ़िल्डींग उधळून लावत पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावर पुन्हा बसवले होते. पण जेव्हा आदर्श घोटाळा समोर आला तेव्हा पुतण्य़ाने १९७८ सालचा काकांचाच आदर्श इतिहास अनुसरून अशी खेळी केली, की राज्यात मुख्यमंत्र्यासोबतच उपमुख्यमंत्री सुद्धा बदलून गेला. पवारांची इच्छा नसतानाही दादांनी त्या पदापर्यंत मजल मारून दाखवली. त्याची सुरूवात त्यांनी निवड्णुकीपुर्वीच केली होती. आपल्याला नकोत अशा पवारनिष्ठांना उमेदवारी दिली, तरी आपले निष्ठावान त्यांच्या विरोधात उभे करून त्यांचा पत्ता परस्पर कापला होता. अशा अपक्षांची एक वेगळी तैनाती फ़ौज दादांनी आधीपासूनच उभी केलेली आहे. थोडक्यात तीन दशकांपुर्वी (वसंत)दादांना ज्या डावपेचांतून पवारांनी चितपट केले होते, तेच डावपेच आज नव्या पिढीचे (अजित)दादा वापरून राजकारण खेळत आहेत. काकांना सुगावा लागू न देता पुतण्याने एवढी मजल कशी मारली? तर त्याचेही धागेदोरे शरद पवार यांच्याच राजकीय तत्वज्ञानात सापडू शकतात. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणुन राजकारणात आपले बस्तान बसवताना शरदरावांनी कधीच चांगल्यावाईटाचा विधीनिषेध ठेवला नव्हता. म्हणुन तर त्यांनी राजकारणातील कार्य किंवा तपस्या यापेक्षा निवडून येण्याची क्षमता; यांना आपले राजकीय सहकारी व मित्र निवडताना प्राधान्य दिले. त्याचेच धडे गिरवत अजितदादांनी राजकीय जीवनाचा पाया घातला आहे. त्याचेच हे सर्व परिणाम आता दिसत आहेत. त्याला निमित्त काय झाले, हे बघण्यापेक्षा कुठल्या घटनाक्रमातून आजची राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याकडे बघण्याची गरज आहे.

या आठवड्याच्या आरंभी अजितदादांनी जो आपल्या पदाचा राजिनामा देऊन राजकीय पेचप्रसंग निर्माण केला आहे, तो त्या एकूण राजकीय पार्श्वभूमीचा परिपाक आहे. त्याला आजचे घोटाळे किंवा आरोप व चौकशा हे निव्वळ निमित्त आहे. अजितदादा हे प्रचंड महत्वाकांक्षी स्वभावाचे आहेत. त्या महत्वाकांक्षेला पुरेसे कर्तृत्व किंवा कौशल्य आपल्याकडे असायची त्यांना गरज वाटत नाही. या सगळ्या सुविधा काकांनी पुरवल्या पाहिजेत, असा त्यांचा हट्ट असेल तर चुकीचा मानता येणार नाही. कारण कार्यकर्ता म्हणुन संघटनेत काम करून वरच्या पदावर येण्याचे धडे त्यांना गुरूवर्य काकांनी कधी दिलेच नाहीत. संघटनात्मक काम व कर्तृत्व दाखवून मगच पवारांना आमदारकीचे तिकीट मिळाले होते. पाच वर्षे संसदिय सचिव म्हणून काम केल्यावर त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. पुढे त्यांनी राजकीय डावपे्चातून आधिक मजल मारली. यातले अजितदादांना काय करावे लागले? त्यांना काकाचा पुतण्या म्हणुन आधी सत्तापदे मिळाली आणि सत्तापदे वापरून त्यांनी पक्षात व संघटनेत जम बसवला. अशीच राजकीय वाटचाल केल्यावर तडकाफ़डकी निर्णय घेण्याची संवय त्यांना लागली तर त्यांचे काय चुकले?

   मागले काही महिने शरद पवार कधी मुख्यमंत्री तर कधी राज्यपालांवर शरसंधान करत होते. दुष्काळ बघायला राज्यपाल गेले नाहीत, इथपासून राज्य चालवणार्‍या आघाडीत समन्वय नाही; अशा तक्रारी खुद्द पवारांनी केल्या होत्या. त्यावर काही हालचाल झाली नाही, तेव्हा त्यांनीच युपीएमध्ये समन्वय नाही असा आवाज उठवला होता. पण त्याची फ़ारशी दखल घेतली गेली नाही. उलट तेच निमित्त करून राज्यातली आघाडी मोडायला अजितदादा निघाले; तेव्हा दिल्लीतल्या पवारांनी तिथल्या बंडाचा गाशा गुंडाळला होता. कारण पुतण्या आपला आडोसा घेऊन महाराष्ट्रातल्या बस्तानालाही धोक्यात आणु शकेल, याचीच त्यांना भिती वाटली होती. म्हणूनच पवारांची दिल्लीतली नाराजी लौकर मावळली होती. आणि जेव्हा महिनाभरात त्याच मुद्यावर ममतांनी दिल्लीत युपीए विरोधात बंडाचा झेंडा उभारला, तेव्हा पवार त्यापासून दुर राहिले. युपीएच्या घोळक्यात ज्येष्ठ म्हणुन तोंडदेखला मान मिळतो, त्यात ते समाधानी आहेत. कारण राज्यात स्वबळावर उभे रहाण्याची उमेद त्यांना उरलेली नाही आणि पुतण्या मात्र मुख्यमंत्री व्हायला उतावळा झालेला आहे. त्यातूनच आजचे नवे बंड उभे राहिलेले आहे. ते मुख्यमंत्री किंवा जलसंपदा खात्यातल्या घोटाळ्याच्या निमित्ताने पुकारलेले असले, तरी त्यात चाललेले शक्तीप्रदर्शन हा दोन पिढ्यांतील संघर्ष आहे. आपण काकांच्या छायेखाली राहिलेलो नाही तर स्वयंभू नेता बनलो आहोत; असे दाखवण्याचा मुख्य हेतू त्यामागे आहे. म्हणुनच कॉग्रेसने त्या राजिनामा किंवा शक्तीप्रदर्शनाची फ़ारशी दखल घेतलेली नाही. पण खुद्द काकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. म्हणूनच येत्या काही दिवसात किंवा महिन्यात महाराष्ट्र दोन पवारांमधला अजबगजब संघर्ष अनुभवणार आहे.

   गेल्या काही वर्षात किंवा महिन्यात राज्यात राष्ट्रवादीची ताकद खुप वाढली आहे आणि आपण आता मुख्यमंत्री पदावर दावा करण्याइतके सक्षम झालो आहोत; असा अजितदादांचा आत्मविश्वास आहे. त्यातूनच हा राजिनामा एक खेळी म्हणून पुढे आला आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकहाती कारभार करून दाखवाच असे उघड आव्हान दिले आहे. पण त्याचवेळी आपल्याला वेसण घालणार्‍या चुलत्याला आपण किती उधळू शकतो; याची चाहुल जागोजागी कार्यकर्ते रस्त्यावर आणून दिली आहे. म्हणून तर अनेक जागी मुख्यमंत्र्याचे पुतळे दादा समर्थकांनी जाळले, तर सातारा जिल्हा परिषदेने मुख्यामंत्र्यांनीच राजिनामा द्यावा असा ठरावही केला. राज्यातील आघाडीची परिस्थिती इतकी गंभीर आहे काय? ग्रामपंचायती किंवा स्थानिक संस्थामध्ये जिंकलेल्या निवडणुकांच्या आधारावर राज्याच्या निवड्णुकीचे आडाखे बांधता येत नसतात, हे थोरल्या पवारांना कळत असले तरी दादांना मान्य नाहीत. त्यातूनच आजची स्थिती उद्भवली आहे. लौकरात लौकर विधानसभेच्या निवडणूका घेऊन विधीमंडळात सर्वात मोठा पक्ष व्हायचे आणि मुख्यमंत्रीपद मिळवायचे अशा  महत्वाकांक्षेने दादांना घेरलेले आहे. त्यातूनच हे धाड्स त्यांच्या अंगात शिरलेले आहे. कुठलीही चौकशी करायची म्हटली तरी तिचे अहवाल पाचसहा वर्षे येणार नाहीत आणि राजिनामा फ़ेकला या हौतात्म्यावर निवडणूकीला सामोरे जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण भ्रष्टाचार किंवा नुसते आरोपच निवडणुकीत निर्णायक नसतात, तर महागाई व दरवाढही आपली छाप मतदानावर पाडु शकते, हे दादांच्या उत्साहाला दिसत नसले तरी शरद पवार यांच्या अनुभवी मेंदूला कळते. म्हणुनच त्यांना धाडसी पुतण्याची पाठ थोपटता आलेली नाही.

   त्याचे आणखी एक कारण आहे. राजिनाम्याने राजकीय दबाव निर्माण करता आला, तरी न्यायालयीन प्रक्रियेवर त्याचा अजिबात प्रभाव पडत नाही आणि राज्यातील घोटाळ्यामध्ये बर्‍याच प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यांचे निकाल लगेच लागणारे नाहीत. पण त्यातून जे वेळोवेळी तपशील बाहेर येतील, ते विरोधकांच्या हातातले कोलित असणार आहे. अशा प्रचारात सत्याला महत्व नसते तर लोकसमजूतीचा परिणाम मोठा असतो. १९९४-९५ सालात शरद पवार यांच्यावर जेवढे आरोप झाले, त्यापैकी बहुतेक सिद्ध झालेले नाहीत. पण त्याचा फ़टका त्यावेळच्या निवडणुकीत त्यांना बसलेला होता. तेव्हाही पवार यांच्या समर्थनार्थ कॉग्रेसने मोठाच मोर्चा काढला होता व खैरनार यांचा निषेध केला होता. पण त्या मोर्चाच्या भव्यतेने पवारांची सत्ता वाचवली नव्हती. मग आज अजितदादांच्या समर्थकांनी जागोजागी कुणाचे पुतळे जाळले, म्हणुन जनमानसातील प्रभाव कसा बदलू शकेल? जलसंपदा खात्यात घोटाळा झाला आणि त्यावर श्वेतपत्रिका काढायला मुख्यमंत्रीही तयार झाले, याचा अर्थच पाणी मुरते आहे अशीच लोकसमजूत होत असते. तिला पुन्हा कोर्टाच्या सुनावणीतून मिळणारे खतपाणी मोर्चेबाजीने रोखता येणार नाही. म्हणूनच अजितदादांनी राजिनामा देऊन नेमकी काय खेळी केली हा प्रश्न पडतो. त्यांना कोणाला राजकीय शह द्यायचा आहे, तेच लक्षात येत नाही. त्याला त्रागा म्हणता येईल. आणि त्रागा करून कधी राजकीय गुंता सुटत नसतो. उलट अधिकच गुंतागुंत होऊन जात असते.

   समजा दादांनी आपल्या राजिनाम्यातून मुख्यमंत्र्यांना सापळ्यात ओढायचा प्रयत्न केला म्हणायचे तर पृथ्वीराज कुठेही त्यात फ़सल्याचे दिसत नाही. त्यांनी राजिनामा टेबलाच्या खणात ठेवला आणि शरद पवारांचा सल्ला मागितला आहे. राजिनाम्याकडे दुर्लक्ष करून सरकारचे नित्यनेमाने काम चालू थेवले आहे. पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनी राजिनामे दिलेत त्यांची समजूत घालणे ही मग पवारांसाठीच डोकेदुखी झाली. त्यात पुन्हा भर म्हणून आमदारांचा ठराव आहेच. थोडक्यात राष्ट्रवादी पक्षाने स्वत:साठीच पेच निर्माण केला आहे. अजितदादांवरील निष्ठा दाखवण्यासाठी जरी हे सर्व झाले असले तरी आता त्यात अन्य काही साध्य न होता माघार घेणे हास्यास्पद ठरणार होते. मंत्र्यांचे राजिनामे मागे घेणे किंवा त्यांनी पुन्हा मंत्रालयात जाऊन कामाला लागणे ही नामुष्कीच म्हणावी लागेल. सांगायची गोष्ट अशी, की अवघ्या चोविस तासात शक्य असलेले सर्वच डाव खेळून अजितदादांच्या गटाने आपले सर्वच पत्ते संपवले. उलट समोर जो कोणी होता त्याने एकही पत्ता टाकलाच नाही. मग खेळ पुढे चालणार कसा? पक्षाचे मंत्री, आमदार व पाठिराखे अपक्ष आमदार असे सर्वच हुकूमाचे पत्ते दादांच्या गटाने पटापट टाकून दिले. त्यांच्या हातात काय शिल्लक आहे तेच शोधावे लागते. दुर्दैव असे, की समोरच्याने अजून एकही पत्ता फ़ेकलेला नाही. म्हणजे त्याच्यासाठी सगळा डाव शिल्लक आहे. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न दादा विरोधी गटापेक्षा दादांच्या पाठीराख्यांसाठी अवघड झाला आहे. थोडक्यात तलवार उपसून दादा मैदानात दौडले, त्यांनी सपासप वारही केले आणि आवेश संपला. मग बघितले तर समोर कोणच नाही, असा प्रकार झाला आहे ना? बम्बय्या हिंदी भाषेत बोलतात ना? ‘खायापिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना.’ त्यातलाच प्रकार नाही का? जितेंद्र आव्हाड किंवा तत्सम दादांच्या पाठीराख्यांनी जरूर त्यात "बहादूरी‘ शोधून ‘लाल’ करून घ्यावी. त्यातून त्यांच्या भ्रातृतुल्य अनुयायीत्वाचा दाखला मिळू शकेल. पण लोक मुर्ख नाहीत.

   ऐन गणेशोत्सवात अजितदादांना निदान आपल्या काकांचे राजकारण थोडेफ़ार कळले असेल तरी खुप झाले म्हणायचे. शरद पवारांचे राजकारण म्हणजे गजाननाप्रमाणे दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आणि चावायचे दात वेगळे, हे दादांसह त्यांच्या अनेक पाठीराख्यांना आता लक्षात आले असेलच. कारण या दादांच्या राजिनाम्यावर जे सर्व चर्वितचर्वण झाले, त्यात सुप्रिया ‘सुळे’ना काकांनी सहभागी करून घेतले. आणि राजिनामा मंजूर केल्याची घोषणा करण्यापुर्वी सुप्रिया ‘सुळे’ तिथून उठून गेल्याच्या बातम्या आहेत.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

दिल्ली सरकारला भेडसावणारा एम फ़ॅक्टर


  पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांचा पाठींबा काढून घेणार्‍या ममता. इशारे देणारे एम. करूणानिधी, नव्याने पाठींबा देण्याची शक्यता असलेले मायावती व मुलायम आणि पुढल्या पंतप्रधान पदावर दावा न सांगूनही भेडसावणारे नरेंद्र मोदी. या प्रत्येक नावात एम हे इंग्रजी अक्षर सामावले आहे. त्यातला कुठला एम. फ़ॅक्टर आजच्या राजकीय पेचप्रसंगाला खरोखर जबाबदार आहे?

  बरोबर तीन आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. २ सप्टेंबरची, त्या दिवशीच्या ‘पुण्यनगरी’त एक बातमी तुम्ही वाचली असेल. कदाचित संपुर्ण देशात ‘पुण्यनगरी’ या एकाच वृत्तपत्राने ती बातमी दिलेली असेल. अवघ्या माध्यमांमध्ये भाजपा व एनडीए यांनी संसद बंद पाडल्याच्या बातम्या गाजत होत्या, तेव्हा ‘पुण्यनगरी’ने देशात मध्यावधी निवडणूकांची शक्यता वर्तवली होती. आणि नुसती शक्यता वर्तवली नव्हती तर त्याची राजकीय कारणमिमांसाही केली होती. आजचे मनमोहन सरकार मध्यावधी निवडणूका घेण्याच्या विचारात असल्याची ती बातमी होती. पण जो पंतप्रधान राजिनामा द्यायला तयार नाही, तोच मध्यावधी निवडणूका कशाला घेईल? आणि तशी राजकीय परिस्थिती सुद्धा दिसत नव्हती. सरकारच्या पाठीशी खंबीर बहूमत होते आणि सरकार संकटातही नव्हते. मग मध्यावधी निवडणूका कशाला होतील? जे सरकार संसद चालू शकत नसताना विरोधकांना दाद देत नाही, ते असलेली आणखी दिड वर्षाची मुदत गमावण्याचा जुगार कशाला खेळणार, असेच तेव्हा तीन आठवड्यापुर्वी सर्वांना वाटत होते. पण मधल्या पंधरावीस दिवसात किती वेगाने स्थिती बदलत गेली बघा. या सरकारने स्वत:लाच राजकीय पेचप्रसंगात ओढून आणले आणि आता त्याच पक्षाचे बोलघेवडे सरचिटणिस दिग्विजय सिंग कॉग्रेस पक्ष मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याची भाषा वापरत आहेत. दुसरीकडे ज्यांच्या आधारावर सरकार टिकवायची समिकरणे मांडली जात आहेत; त्याच समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील नेते रामगोपाल यादव यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी लाचारी म्हणून हे सरकार वाचवण्याची भाषा केली आहे. याची संगती लावायची कशी? मध्यावधी निवडणुका आणि मोदी यांचा परस्पर संबंध काय आहे?    

   मागल्या लोकसभा निवडणूका २००९ च्या मध्यास झाल्या आणि त्यात यशस्वी झालेल्या पक्षांच्या मदतीने मनमोहन सिंग व कॉग्रेस यांनी पुन्हा सरकार बनवले. त्यासाठी राष्ट्रपतींकडे जी पाठींब्याची पत्रे देण्यात आली, त्यात ममता बानर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षाचा समावेश होता. म्हणूनच आता ममतांनी पाठींबा काढून घेण्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले, तर नव्याने संसदेतील बहूमत दाखवण्याची वेळ कॉग्रेसवर येऊ शकते. नसेल तर बहूमत गमावले म्हणुन नव्याने निवडणुका घ्यायची पाळी येईल. अशा वेळी राष्ट्रपती विश्वास मताचा ठराव संमत करून घ्यायला सांगू शकतात. तसे झाले तर सरकार टिकून राहू शकते. मायावती वा मुलायम यांचा पाठींबा घेऊन सरकार तग धरू शकते. पण त्याची किंमत नंतरच्या निवडणूकीत त्या पक्षांना मोजावी लागेल. कारण महागाई, परकीय गुंतवणूक व दरवाढ अशा विषयावर ममतांनी सरकारबाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. मग त्याच लोकांचा प्रक्षोभ करणार्‍या निर्णयाचे समर्थन करून मुलायम, मायावतींना सरकारच्या पाठीशी उभे राहून काय मिळणार? त्यांचाही तोटाच होण्याची शक्यता आहे. म्हणुनच त्यांना पाठींब्यासाठी उभे रहाणे अशक्य व्हावे अशाच विषयावर कॉग्रेसने ममतांना दुखावले आहे. थोडक्यात कॉग्रेसला सरकार टिकवायचेच नाही. पण सत्ता हातात असताना आणि बहूमत पाठीशी असताना मध्यावधी निवडणूका घेण्याचे कारण दाखवता येत नाही. म्हणून कॉग्रेसने जाणिवपुर्वक पेचप्रसंग निर्माण केला आहे. त्याला आगामी निवडणुकीतल्या यशाची फ़िकीर नाही. त्यापेक्षा भाजपाची सुत्रे नरेंद्र मोदी यांच्या हाती जाण्य़ाची चिंता कॉग्रेसला भेडसावते आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यास कॉग्रेस नुसती सत्ता गमावण्याचीच शक्यता नाही, तर भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आणि तीच शक्यता कॉग्रेसच नव्हेतर तमाम सेक्युलर पक्षाना भेडसावते आहे. त्यातूनच आजचा पेचप्रसंग ओढवून आणण्यात आलेला आहे.

   हातात सत्ता व पाठीशी स्पष्ट बहूमत असताना मनमोहन सिंग व कॉग्रेस यांनी अशी हाराकिरी का करावी? अजून दिड वर्षांनी येणार्‍या निवडणुकीपर्यंत सत्ता भोगण्यात काय अडचण होती? ती अडचण गुजरातमध्ये आहे. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात गुजरातमध्ये विकास करताना स्वत:ची जी प्रतिमा उभी केली आहे, त्याच्या जोडीला त्यांच्यावर बसलेल्या कडव्या हिंदूत्वाच्या शिक्क्याने त्यांचे पारडे कमालीचे जड केले आहे. आणि त्याला मिळणार्‍या प्रतिसादाने कॉग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांची झोप उडाली आहे. त्या मोदींच्या वाटचालीला काटशह देण्यासाठीच कॉग्रेसने आजचा राजकीय पेचप्रसंग उभा केलेला आहे. मुद्दाम निर्माण केला आहे. जेणेकरून गुजरात जिंकून मोदींना दिल्लीच्या मोहिमेवर निघण्याची उसंत मिळू नये असा तो डावपेच आहे. येत्या डिसेंबर महिन्यात गुजरातच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. त्यात मोदीच बाजी मारणार याविषयी खुद्द कॉग्रेसच्या मनात शंका उरलेली नाही. पण तो गुजरात विजय संपादन करून मोदी तिथेच थांबण्याची शक्यता नाही. त्याच भितीने पछाडलेल्या कॉग्रेसने हा राजकीय पेचप्रसंग मुद्दाम निर्माण केला आहे. तीन आठवड्यापुर्वी असा कुठलाही पेचप्रसंग निर्माण होण्याची शकयता नसताना ‘पुण्यनगरी’मध्ये २ सप्टेंबर रोजी मी दिलेली ही बातमी पुन्हा संपुर्ण वाचा मग अंदाज येऊ शकेल.

नरेंद्र मोदींच्या भितीने
मध्यावधी निवडणूका?

   नवी दिल्ली: शुक्रवारी अचानक कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात गेल्या आणि त्यांनी प्रथमच नव्या राष्ट्रपतींची ब भेट घेतली. त्याची कारणे कोणीही माध्यमांना कळू दिलेली नाहीत. पण त्यामागे मध्यावधी लोकसभा निवडणूकीची दाट शक्यता आहे. किंबहूना त्याच कारणासाठी सोनिया प्रणबदांना भेट्ल्या आहेत. त्या भेटीमागे त्यांच्यासह कॉग्रेसला भेडसावणार्‍या भितीचे नाव नरेंद्र मोदी असल्याचे एका जुन्या जाणकाराचे मत आहे. मोदी येत्या वर्ष अखेर होणार्‍या गुजरातच्या विधानसभा निवडणूका जिंकले तर त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखता येणार नाही. आणि मोदींना आणखी एक वर्ष दिल्लीच्या निवडणूकांची तयारी करण्यास सवड दिली; तर त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशा भितीने आता कॉग्रेस पक्षाला पछाडलेले आहे. त्याच बाबतीत प्रणबदांचे मत घ्यायला सोनियाजी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या, असा निष्कर्ष निघतो.

   मागल्या काही दिवसात लागोपाठ मतचाचण्यांचे निष्कर्ष येत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी यांना लोकांची मिळणारी पसंती कॉग्रेसची झोप उडवणारी ठरली आहे. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतलेल्या या चाचण्या मुळातच कॉग्रेस पुरस्कृत असून त्यातून मध्यावधी निवडणुकीची ती चाचपणी आहे. पण त्या प्रत्येक चाचणीत मोदी यांनाच लोकांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने कॉग्रेसची बेचैनी वाढली आहे. सर्व बाजूनी मतांची चाचपणी व्हावी, म्हणुन प्रत्येक चाचणीत विभिन्न विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. अण्णा, रामदेव किंवा राहुल, अडवाणी, नितीशकुमार यांच्यासह तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानाची कल्पना मांडूनही मोदींकडेच लोकमत झुकल्याचे प्रत्येक चाचणीने दाखवले आहे. त्यामुळेच मोदींनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्यापुर्वी लोकसभा निवडणूका उरकणे कॉग्रेसला सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामागे मोदींना गुजरातमध्येच रोखण्याचा डावही आहे.

   भारतीय गुप्तचर खात्यामध्ये दिर्घकाळ काम केलेले निवृत्त अधिकारी बी. रामन यांनी आपल्या ताज्या निबंधातून तशी शक्यता व्यक्त केली आहे. तेहरानला अलिप्त राष्ट्राच्या परिषदेला गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्तन आणि त्यांनी खूंटीस टांगून ठेवलेले पाकिस्तान भेटीचे आमंत्रण; या दोन गोष्टींचा आधार घेऊन रामन यांनी मध्यावधी निवड्णुकीही शक्यता ३१ ऑगस्ट रोजी शुक्रवारी लिहून टाकली. त्याच संध्याकाळी सोनिया प्रणबदांना भेटायला गेल्या. सत्ताधारी पक्षाच्या वतीने पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेतो, पक्षाध्यक्ष नाही. पण इथे सोनिया राष्ट्रपती भवनात गेल्या. याचा अर्थच त्या घट्नात्मक कामासाठी नव्हेतर राजकीय सल्लामसलत करायला गेल्या असणार. म्हणुनच त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यामध्ये ठेवण्य़ात आले (पत्रकारांना त्याची माहिती देण्यात आली नाही). कारण राष्ट्रपती म्हणून प्रणबदा कुठल्या राजकीय पक्षाचे हित बघू शकत नाहीत. पण गेल्या आठ वर्षात त्यांनीच प्रत्येकवेळी कॉग्रेस व युपीएला राजकीय संकटातून बाहेर काढण्याचे सर्व डाव खेळले होते. म्हणूनच मध्यावधी निवडणूकीबद्दल त्यांचा सल्ला घ्यायला सोनियाजी तिकडे गेल्या असणार. पण मोदींना गुजरातमध्ये अडकवून कॉग्रेसचा कोणता राजकीय लाभ होऊ शकतो?

   आज देशाच्या कुठल्याही भागात न जाता आणि स्वत:ला केवळ गुजरातमध्येच गुंतवून ठेवणार्‍या मोदींची लोकप्रियता संपुर्ण देशात सर्वाधिक आहे. त्यांना लोकसभा निवडणूकीत सर्वत्र फ़िरण्याची संधी मिळाली तर त्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच भर पडू शकते. पण गुजरातबाहेर त्यांना पडता आले नाही तर लोकप्रियतेचा पुरेपुर लाभही मोदी घेऊ शकणार नाहीत. आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका वार्‍यावर सोडून मोदी देशभर दौरे करणार नाहीत. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेतल्या; तर मोदी गुजरात बाहेर प्रचाराला जाऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ त्यांची लोकप्रियता असली तरी तिचा पुर्ण लाभ त्यांना एकत्रित निवडणूका झाल्यास घेता येणार नाही. गुजरात जिंकल्यावर त्यांना एक सव्वा वर्षाचा अवधी मिळाला, तर ते देशभर दौरे काढून आपल्या लोकप्रियतेचा भरपुर लाभ घेऊ शकतील. त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुजरात सोबत मध्यावधी लोकसभा निवडणूका होय.

   आताच लोकसभा मध्यावधी निवडणूक घेतल्यास कॉग्रेसचे आणखी दोन लाभ आहेत. एक म्हणजे अनेक घोटाळ्यामुळे जी बदनामी दिवसेदिवस वाढते आहे, तिचा प्रादुर्भाव पुढल्या दिड वर्षात आणखी हानीकारक होऊ शकतो, त्यापासून मध्यावधीमुळे आपले नुकसान कमी होऊ शकेल असे कॉग्रेसला वाटते आहे. दुसरीकडे मोदी व भाजपा वगळता जे अन्य विरोधक आहेत, त्यांना बेसावध गाठले तर अपुर्‍या तयारीमुळे त्यांनाही फ़ारसे यश मिळणार नाही. इतक्या अल्पावधीत तिसरी सेक्युलर आघाडी आकार घेऊ शकणार नाही, म्हणुनच ते एकत्रित निवडणूक लढू शकणार नाहीत. आणि सध्या अण्णा-रामदेव यांच्या प्रेमात पडलेल्या मतदाराला त्यांचे अनुयायी वापरू शकणार नाहीत. कारण इतक्या अल्पकाळात अण्णा टिमला आपल्या पक्षाची संघटनात्मक उभारणी करून निवडणूका लढणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्याकडून होणारे कॉग्रेसचे नुकसानही मध्यावधीमुळे टळू शकते.

   त्याच बाबतीत सल्लामसलत करायला सोनिया राष्ट्रपती भवनात जाऊन प्रणबदांना भेटल्या असाव्यात. आणि म्हणुनच त्या भेटीचे कारण गोपनिय राखण्यात आले आहे. एकतर राष्ट्रपती अशी राजकीय सल्लामसलत करू शकत नाहीत असे आहे आणि दुसरे कारण मध्यावधी निवडणूका विरोधकांसह मोदींना बेसावध गाठण्याचा डाव आहे. आणि तसे असल्यानेच पंतप्रधानांनी पाकिस्तानचे आमंत्रण असूनही तिकडे जाण्याबद्दल व ते स्विकारण्याबद्दल एक महिना उलटून गेल्यावरही टाळाटाळ चालवली आहे. सध्याचे संसदेचे गोंधळात सापडलेले पावसाळी अधिवेशन लौकर गुंडाळण्याचे पाऊल सरकारने उचलले, तर डिसेंबर अखेर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजावे. 

   जेव्हा ही बातमी दिली तेव्हा डिझेल दरवाढ सरकारच्या विचारातही नव्हती. किराणा व्यापारामध्ये परदेशी गुंतवणुकीचा विचारही नव्हता. मग अचानक या गोष्टी कुठून उपटल्या? ज्यामुळे विरोधक नव्हेतर मित्र पक्षही विचलित होतील असे सरकारने का वागावे? त्याचे उत्तर या बातमीत दडले आहे. सरकारलाच मध्यावधी निवडणूका हव्या आहेत आणि त्या येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात सोबतच घ्यायच्या आहेत. पण तसे करायला कारण हवे; तर राजकीय पेचप्रसंग उभा करायला हवा होता. तो करण्यासा्ठीच सहकारी व मित्र पक्षांना डिवचणारे निर्णय घेऊन सरकारने साळसुद पावले उचलली आहेत. सोनियांची राष्ट्रपती भवनाची भेट त्याची पुर्वतयारी होती. ती तयारी झाल्यावर आधी डिझेलची मोठी दरवाढ करून विरोधकात प्रक्षोभाची लाट निर्माण करण्यात सरकारने यश मिळवले. त्याच वेळी घरगुती गॅसच्या दरवाढीने मित्र पक्षांनाही अडचणीत टाकले. त्यावर संतप्त प्रतिक्रिया येऊ दिल्या आणि नंतर ममता चिडल्या आहेत याची खात्री करून, मुद्दाम परकीय गुंतवणुकीचे धाडसी निर्णय घेण्यात आले. ममतांनी पाठींबा काढून घ्यावा अशी पद्धतशीर पावले उचलण्यात आली. नुसता पाठींबा काढून घेतला जाणार नाही तर ममता सरकारवर तुटून पडतील, याचीही व्यवस्था करण्यात आली. एवढे झाल्यावर सरकार टिकणार कसे? बहूमत कसे जमणार वा कोणाची मदत घेऊन सरकार बहूमत टिकवू शकते; याची समिकरणे माध्यमे मांडत आहेत. पण त्याच्या इतका मुर्खपणा आजवर माध्यमांनी कधीच केलेला नसेल. कारण ज्यांचे सरकार कोसळायची वेळ आली आहे, ती कॉग्रेस निश्चिंत आहे आणि बाकीचे सेक्युलर पत्रकार व माध्यमेच चिंतित आहेत.

   मुलायम की मायावती? ममता की एम करूणानिधी? यातला कुठला एम सरकार वाचवू शकतो याचे आडाखे माध्यमातले मुर्ख बांधत असताना सर्वात महत्वाचा एम म्हणजे मोदी त्यांच्या मेंदूतही आलेला नाही. या सर्व राजकीय पेचप्रसंगातला मुख्य एम म्हणजे नरेंद्र मोदीच आहे. कॉग्रेसला त्यच्याच भितीने पछाडले आहे. सत्ता हाती घेतल्यावर मांड ठोकणारे मोदी सामान्य जनतेला आपल्या कामाने प्रभावित करतात आणि प्रशासनावरही हुकूमत गाजवतात. ज्याप्रकारे त्यांनी गुजरातमध्ये पक्ष संघटनेतील बुजुर्ग संपवले आणि सत्तेवरही मांड ठोकली; तसेच त्यांनी दिल्लीत येऊन केल्यास कॉग्रेसला पुन्हा दिल्लीतील सत्तेचे स्वप्नही बघायला मिळणार नाही, हे त्या भयगंडाचे खरे कारण आहे. म्हणूनच आजची सत्ता गेली तरी बेहत्तर, पण कुठल्याही परिस्थितीत नजिकच्या काळात मोदी यांना पंतप्रधान होण्याच्या संधीपासून वंचित ठेवायचे डावपेच कॉग्रेस खेळते आहे. भाजपाचा दुसरा कोणीही पंतप्रधान झाला तरी तो तात्पुरता धोका असेल. त्याच्यानंतर कॉग्रेसला सत्ता मिळवणे अवघड नसेल. पण मोदी पंतप्रधान पदावर आरूढ झाले, तर ते इंदीरा गांधींची पुनरावृत्ती करतील अशी शक्यता आहे. कॉग्रेस वजा इंदिरा म्हणजे शुन्य होते तशीच आजच्या भाजपाची स्थिती आहे. पण इंदिराजी म्हणतील त्या कॉग्रेसला मतदार मते देत असे. सगळी माध्यमे व पक्ष विरोधात असताना इंदिराजींची जी खंबीर नेतृत्वाची प्रतिमा जनमानसात ठसली होती, तशीच मोदींनी आपली प्रतिमा उभी करण्यात काही प्रमाणात यश मि्ळवले आहे. त्यांचा प्रयोग गुजरातमध्ये त्यांनी यशस्वी केला असून देशभर त्यांनी आपले चहाते निर्मांण केले आहेत. अजून त्यांनी स्वत: दिल्लीच्या राजकारणात पडायची भाषा केलेली नसली तरी प्रत्येक चाचणीत व चर्चेत त्यांचे नाव त्यामुळेच येते आहे. त्याचा अर्थ चर्चेत रमणार्‍या शहाण्यांना कळत नसला तरी दिर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या कॉग्रेसला येऊ घातलेले संकट कळते आहे.

   आताच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका कॉग्रेसलाच हव्या आहेत. गुजरात सोबत त्या घ्यायच्या तर पुढल्या महिन्याच्या मध्यास लोकसभा बरखास्त व्हावी लागेल. तरच डिसेंबर अखेर मध्यावधी मतदान होऊ शकेल. म्हणूनच ममतांनी पाठींबा काढून घेण्याची धमकी दिल्यावरही कॉग्रेसने बहूमत जुळवण्यासाठी कुठल्या अन्य पक्षाशी संपर्क केलेला नाही, की जमवाजमव सुरू केलेली नाही. उलट दिग्विजय सारख्या तोंडाळ नेत्याला पुढे करून मध्यावधी लोकसभा निवडणुकीचे पिल्लू चर्चेसाठी बाजारात सोडून दिले आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया जोखण्यासाठीच दिग्विजय यांनी पुडी सोडली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी जाता जाता सुचक इशारा दिला आहे. ‘जायचे तर लढत लढत जाऊ’ असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थच जायचे ठरले आहे. आणि जायचे तर लढत असल्याचा देखावा निर्माण केला आहे. ममतांनी पाठींबा काढून घेतल्यावर काही दिवस घोळ घातला जाईल आणि लोकसभा बरखास्तीचा सल्ला मनमोहन सिंग राष्ट्रपतींना देतील. हे सर्व ऑक्टोबरच्य उत्तरार्धात झटपट होईल आणि जवळपास सर्वच पक्षांना गाफ़िल ठेवून निवडणुकांमध्ये ओढले जाईल. तेव्हा मुलायम किंवा मायावती यांच्यासह अनेक पक्षांना कॉग्रेस विरोधात बोलायची संधीही उरणार नाही. कारण घोटाळे असोत की महागाई व दरवाढ असो, त्याचे पाप सरकारचे समर्थक म्हणून त्याही पक्षांच्या डोक्यावर फ़ुटणार आहे. ज्यांनी सेक्युलर म्हणून या सरकारची पाठराखण केली, त्यांनाच त्याची किंमत मोजायला लागावी असे डावपेच कॉग्रेसने खेळले आहेत. त्याचा लाभ भाजपाला मिळावा, पण मोदींना मिळू नये; अशी एकूण खेळी आहे. मोदी इतके धुर्त आहेत की त्यांनीही या एकूणच घडामोडीत मौन धारण केलेले आहे. पण आज जे राजकारण चालू आहे ते मध्यावधी निवडणुकीकडे होणारी वाटचाल आहे. जे सरकार व सत्ताधारी पक्ष इतके बहूमत व इतके मित्र पक्ष पाठीशी असताना मोदी नावाच्या एका मुख्यमंत्र्याला घाबरले आहेत, ते अशा मार्गाने नरेंद्र मोदी नावाच्या वादळाला रोखू शकतील काय? की इंदिरा गांधींचा नवा अवतार म्हणून नरेंद्र मोदी भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवतील? काळच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २३/९/१२)

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

तेरा महिन्यानंतरच्या गोष्टी


   आज १६ सप्टेंबर आहे. म्हणजे नेमके तेरा महिने पुर्ण झाले त्या घटनेला. काय घडले होते नेमके तेरा महिन्यांपुर्वी आपल्याला आठवते तरी काय? स्मरणशक्तीला थोडा ताण देऊन बघा. नाही ना आठवत? पण इथे आठवण करून दिली तर तुम्हीही चकीत व्हाल आणि म्हणाल, कमाल आहे आपण इतकी मोठी घटना विसरलो कशी? पण आपले असेच होत असते. रोजचे जगणे इतके असह्य आणि गुंतागुंतीचे होऊन गेले आहे, की तेरा महिनेच काय तेरा दिवसापुर्वीच्या गोष्टी आपल्याला आठवणे कठीण होऊन बसले आहे. मग तेरा महिन्यापुर्वीचे काही आठवेल कसे?

असो. तेरा महिन्यांपुर्वी १६ ऑगस्ट २०११ हा दिवस होता आणि त्याच दिवशी सुर्य उगवला तोच मोठ्या खळबळजनक बातमीसोबत. त्या दिवशी अण्णा हजारे आपल्या सहकार्‍यांना घेऊन दिल्लीतल्या रामलिला मैदानावर आमरण उपोषणाला बसणार होते आणि तत्पुर्वीच सरकारने त्यांना पोलिस पाठवून ताब्यात घेतले होते. त्यांना एकट्यालाच नव्हेतर किरण बेदी, शांतीभूषण, अरविंद केजरीवाल अशा अण्णांच्या अन्य प्रमुख सहकार्‍यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आणि ही बातमी पसरताच दिल्लीच्या सर्वच रस्त्यावर लोकांची गर्दी जमू लागली. वाहिन्यांवर अण्णांना कुठे पाठवण्यात आले, कुठे ठेवले आहे, त्याच्या बातम्या झळकत होत्या आणि त्याप्रमाणे लोकांचा जमाव तिकडे सरकत होता. अखेर अण्णांना तिहार तुरूंगात पाठवल्याची बातमी आली आणि बघताबघता तिहारचा परिसर हजारो लोकांच्या जमावाने व्यापला. दुसरीकडे जे लोक रामलिला मैदानावर पोहोचले, त्यांना अटक करून पोलिस एका स्टेडियममध्ये डांबत होते. पण माणसांचा पूर काही ओसरत नव्हता. त्यामुळेच सरकारची एकूणच नाचक्की झाली. मग त्या दिवशीचा सुर्य मावळण्याआधीच अण्णांना सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता अण्णांनी तुरुंगाच्या बाहेर पडायला नकार दिला. मग सरकारची आणखीनच तारांबळ उडाली. कारण तुरूंगाचे नियम किंवा कायद्यामध्ये सरकारला चलाखी करता येत असली, तरी कायदे झुगारून वागता येत नाहीत. जे काही करायचे ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागते. कुणाला तुरूंगाच्या बाहेर सोडायचे ठरवले तर त्याला पुन्हा योग्य आदेशाखेरीज आत पाठवता येत नाही. मग अण्णांचे करायचे काय, असा पेच सरकारपुढे उभा राहिला. ज्याच्या समर्थनार्थ लाखो लोक तिथे रस्त्यावर प्रतिक्षा करत उभे होते, त्याला गचांडी धरून तुरूंगाच्या बाहेरही फ़ेकता येत नव्हते. तेव्हा त्याच सरकारने अण्णांसमोर नांगी टाकली होती.

   तो दिवस आणि त्या घटना आपल्याला आठवत असतील तरी एक गोष्ट त्यात सर्वांकडून दुर्लक्षित झाली. ती गोष्ट म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासूनचे अण्णांचे मौन. अण्णा पोलिसांच्या ताब्यात आणि तुरूंगात होते. पण त्यांच्या मनात काय चालू आहे त्याचा कुणालाही बाहेर थांगपत्ता नव्हता. पण त्यामुळेच अधिकाधिक लोक प्रक्षुब्ध झाले होते. त्यातून जो तणाव निर्माण झाला, त्यापुढे सरकारने गुडघे टेकले होते. सुर्य मावळण्यापुर्वी अण्णांना सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण पुन्हा आपण रामलिला मैदानावर गेल्यास अटक होणार आणि इथेच आणले जाणार; तर जाऊच कशाला?  मला इथेच ठेवा असा पवित्रा अण्णांनी घेतला आणि सरकारची पुरती कोंडी होऊन गेली. जे सरकार मैदान वापरण्य़ाला अटी घालत होते, त्याच सरकारने विनाअट मैदान देऊ केले, इतकेच नव्हे तर तिथे योग्य तयारी करण्यास मदतही केली. हा सगळा अल्पावधीतला चमत्कार कशामुळे घडला, ते अण्णा टीमने कधी सामजून तरी घेतले काय? तिथेच विषय संपला नाही. अण्णांचे उपोषण हा अलिकडल्या कालखंडात जगातील सर्वात मोठा रियालिटी शो होऊन गेला. अहोरात्र वाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केलेला आणि सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला दुसरा कुठलाही कार्यक्रम किंवा बातमी नसेल. आणि त्याच दणक्याने सरकार आणखी नमले. संसदेने अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती करून त्यांचा मोठाच सन्मान केला. त्यासाठी एक पत्र पंतप्रधानांनी लिहून विलासराव देशमुख या मंत्र्याकरवी अण्णांकडे पाठवले. मुद्दाम अण्णांसाठी त्याचा मराठीतला तर्जुमा पाठवण्यात आला होता. त्या पंधरवड्याने अण्णांना स्वातंत्र्योत्तर सात दशकातला महापुरूष बनवून टाकले.

   आज त्यातले काही किती लोकांना आठवते? किती लौकर आपण हल्ली गोष्टी व घटना विसरून जातो ना? आज त्याला तेरा महिने पुर्ण होत असताना अण्णांचे ते जनलोकपाल आंदोलन कुठे येऊन पोहोचले आहे? त्यातली मंडळी कुठे आहेत आणि काय करत आहेत? त्याच आंदोलनाचा पुढला टप्पा म्हणून जे मुंबईत धरणे आंदोलन झाले, त्यात झळकलेल्या काही व्यंगचित्रांच्या सध्या बातम्या गाजत आहेत. असीम त्रिवेदी नामक तरूण कलाकाराने मुंबईच्या आंदोलनात डिसेंबर महिन्यात ही चित्रे काढली होती. त्यातून राष्ट्रीय सन्मानचिन्हांचा अवमान झाला, म्हणुन त्रिवेदीवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याच्या अटकेने गेला आठवडा गाजला. शेवटी पुन्हा तेरा महिन्यांपुर्वीच्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती झाली. आरोप, तक्रार व अटक झाल्यावर त्रिवेदी याने अण्णांच्याच मार्गाचा अवलंब केला. अटकेनंतर गदारोळ झाल्यावर सरकारची फ़जिती व्हायची पाळी आली. म्हणून त्रिवेदीला जामीन देण्याची पळवाट शोधण्यात आली. पण त्याने जामीन घ्यायचेच नाकारले. ज्या कायद्यान्वये अटक झाली, तो स्वतंत्र भारताच्या घटना व लोकशाहीला छेद देणारा कायदा असल्याने आपण आरोपच मान्य करत नाही आणि म्हणुन त्यानुसार मिळणारा जामीनच घेत नाही, असे म्हणत त्याने जामीन नाकारला. तेव्हा पुन्हा सरकारचीच नाचक्की झाली. हायकोर्टानेही सरकारला आरोपांचा पुनर्विचार करायला फ़र्मावले. मग त्रिवेदी मोठ्या विजयीवीराच्या थाटात तुरूंगातून बाहेर आला. जे मुंबईतील आंदोलन वेळेपुर्वीच गुंडाळावे लागले, अशी टवाळी गेल्या डिसेंबर महिन्यात झाली होती, त्याच आंदोलनातील ही कोणाला फ़ारशी आठवत नसलेली व्यंगचित्रे नऊ महिन्यांनी धमाल करून गेली.

   तेरा महिन्यांच्या कालखंडातल्या या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. मात्र त्यापलिकडे गेल्यावर काय हाती उरते? लोकपाल विधेयक किंवा ती मागणी जिथे दोन वर्षापुर्वी होती, तिथेच अडकून पडलेली आहे. त्यात कुठलीही प्रगती होऊ शकलेली नाही. दरम्यान ज्या भष्टाचाराच्या मुसक्या बांधण्यासाठी लोकपाल हा उपाय घेऊन अण्णांनी आंदोलन छे्डले होते, तो भ्रष्टाचार कधी नव्हे इतका मोकाट व विशालकाय रुप घेऊन समोर उभा आहे. आणि तोच भ्रष्टाचार करणारे उजळमाथ्याने वावरत आहेत. उलट अण्णांसह विरोधी पक्षांनाच देशाचे शत्रू व विकासातले अडथळे ठरवण्याइतके सत्ताधारी शिरजोर मुजोर झालेले आहेत. मग आपले व या देशाचे भवितव्य काय? गेल्या वर्षी अण्णांच्या हाकेला ओ देऊन रस्त्यावर उतरलेला तो सामान्य माणुस आज आहे कुठे? त्याचा तो उत्साह किंवा संताप कुठे गायब झाला आहे? अण्णांच्या आंदोलनाचे पुढे काय झाले आहे, काय चालले आहे? मध्यंतरी जुलैच्या अखेरीस अण्णांच्या सहकार्‍यांनी दिल्लीत पुन्हा उपोषणाचा घाट घातला होता. त्याला तेरा महिन्यांपुर्वी मिळाला तसा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळाला नाही. सरकारनेही विरोधात जाण्यापेक्षा तिकडे पाठ फ़िरवून दुर्लक्ष केले आणि धीर सुटल्याप्रमाणे केजरीवाल आदी मंडळीने उपोषण गुंडाळले. काही मान्यवरांनी संसदेकडून वा राजकीय पक्षांकडून लोकपाल होत नसेल, तर जनतेला राजकीय पर्याय देण्याचे आवाहन केले आणि ते स्विकारून त्या उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र त्यानंतर अण्णा हजारे यांच्याकडून लोकांनी फ़ारसे काही ऐकलेले नाही. आणि मध्यंतरी तर केजरीवाल यांनी स्वबळावरच दिल्लीत आंदोलन करून वेगळेपणा दाखवून दिला. दरम्यान अण्णा टीम म्हटले जायचे, तिचे अण्णांनीच विसर्जन करून टाकले आहे. तर केजरीवाल वेगळी राजकीय संघटना बनवून निवडणूक लढवण्याची भाषा बोलत आहेत. मग तेरा महिन्यापुर्वी देशाच्या सर्वशक्तीमान सत्तेला हादरवून सोडणार्‍या त्या लोकपाल आंदोलनाचे काय? ते संपले म्हणायचे, की विस्कटून गेले म्हणायचे?

   मला वाटते, की या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या टीममध्ये पुस्तकी मडळींचा भरणा अधिक होता. त्यापैकी किती लोकांना प्रत्यक्ष चळवळीचा अनुभव आहे याबद्दल माझ्या मनात शंका आहे. सोहळे. समारंभ, संमेलने, परिषदा भरवणे आणि यशस्वी करणे; याचा अनुभव केजरीवाल किंवा बेदी इत्यादी मंडळींना जरूर असेल. पण लोकचळवळ हा शिस्तबद्ध जमाव नसतो. तो भारावलेला मानव प्राण्यांचा कळप असतो. तो विचारांनी प्रवृत्त झालेला असला तरी भावनेवर झोके घेणारा मानवी कळप असतो. त्याच्या भावना जोवर धगधगत असतात, तोवरच त्याचा भडका उडवून समोरच्या व्यक्तीला चटके देणे शक्य असते. ती धग कमी झाली वा संपली, मग काम अवघड असते. म्हणूनच लोकचळवळ म्हणजे काय ते मुळात म्होरक्यांनी समजून घेतले पाहिजे. कळप किंवा जमाव म्हणजे माणसांची भावनाविवश झुंड असते आणि ती स्वार्थ किंवा हानी यांचा विचारही न करता दौडत असते. तिला विचारांनी प्रव्रूत्त करता आले तरी विचार तिला कार्यरत ठेवू शकत नसतात. भावनांचा अतिरेकच तिला हवाहवासा वाटत असतो. त्याला कसे हाताळायचे ते समजणाराच झुंडीवर राज्य करू शकतो. झुंडीला विश्लेषण किंवा मिमांसा नको असते. तिला थेट उत्तर व उपाय हवा असतो. तो खरा व उपयुक्त नसला तरी चालतो. ज्यांना ते साधता येते, तेच झुंडीला आंदोलनात ओढू शकतात. झुंजवत ठेवू शकतात. नेमक्या त्याच गुणांचा अभाव अण्णा टीममध्ये होता. त्यामुळेच ज्या प्रचंड झुंडी तेरा महिन्यांपुर्वी रस्त्यावर उतरल्या, त्यांचे काय करायचे व त्यांना कसे हाताळायचे याबद्दल टीमचे म्होरके पुर्णत: अनभिज्ञ होते. मी तेव्हाच त्याचे सविस्तर विश्लेषण (उलटतपासणी या माझ्या सदरातून वेळोवेळी) केलेले होते. आपल्या मागे इतक्या प्रचंड संख्येने लोक का आले आणि कशामुळे लोकांचा पाठींबा टिकून राहिल त्याचा विचारही या अण्णा टीमच्या म्होरक्यांनी कधी केला नाही. परिणामी जमलेली गर्दी त्यांच्यापासून दुरावत गेली. लोकपाल विधेयकाची मागणी टांगून पडली असताना, त्यासाठीच स्थापन झालेली अण्णा टीम मात्र बरखास्त झालेली आहे. मग या चळवळीचे भवितव्य काय?

   संसदेत जाणे हा एकमेव पर्याय आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या, त्याचे आत्मपरिक्षण किंवा मिमांसा होण्याची गरज आहे. माझ्या दृष्टीने सर्वात मोठी चुक म्हणजे आजच्या सर्वच राजकीय पक्ष व संघटनांप्रमाणे अण्णा टीम व तिचे आंदोलन, माध्यमांच्या खुपच आहारी गेले होते. जणू माध्यमे किंवा त्यांचे काही मुखंड जसा व ज्या दिशेने धक्का देतील; तसे आंदोलन भरकटत चालले होते. कोणीतरी काहीतरी आरोप करायचा, की टीम त्याचे खुलासे देत बसायची. कोणी काही प्रश्न समस्या वा मुद्दे पुढे करायचा आणि त्यातच टीम गुंतून पडायची. लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन या एकाच विषयापुरते टीमने स्वत:ला बांधील ठेवले नाही आणि जी सहानूभुती निर्माण झाली तिला संघटीत रुप देण्याचा कुठलाही कसोशीचा प्रयत्न झाला नाही. त्यापेक्षा अधिक शक्ती माध्यमांना खुश करण्यात किंवा आपले मुद्दे पटवून देण्यात खर्ची पडली. जर लाखो लोक तुमच्या समर्थनार्थ आलेच नसते तर माध्यमांनी तुमच्याकडे ढूंकून बघितले नसते. जे सामान्य लोकांना आधीच पटले होते, ते माध्यमांना पटण्याची काडीमात्र गरज नव्हती. पण त्यांना अधिक वेळ देण्यात आला आणि जे भारावून टीमकडे आशेने बघत होते, त्यांना संघटित करून जवळ घेण्याकडे साफ़ दुर्लक्ष झाले. पर्यायाने चळवळ माध्यमकेंद्री होत गेली आणि पहिली संधी मिळताच सरकारी वा सत्ताधारी इशार्‍यावर माध्यमांनी त्या चळवळीतली हवा काढून घेतली. हा धोका मी रामलिला मैदानावरील उपोषण सुरू होण्याच्या दोन दिवस आधी १४ ऑगस्ट २०११ च्या (उलटतपासणी) लेखातून सांगितला होता. कारण माध्यमांनी चळवळ माध्यमकेंद्री होईल अशीच रणनिती आधीपासून राबवली होती.

   दुसरी महत्वाची बाब म्हणजे खुद्द अण्णांच्या शब्दाला लाखाचे मोल आलेले होते. जेव्हा तुमच्या शब्दावर करोडो लोक विश्वास ठेवतात, तेव्हा तुमचे शब्द अत्यंत तोलूनमापून बोलावे लागत असतात. त्यासाठी सर्वात मोठे पथ्य म्हणजे माध्यमांपासून दुर रहाणे होय. आज देशाची सर्व अधिकारसुत्रे सोनिया गांधी यांच्या हाती आहेत. पण एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला, त्यांनी स्पेक्ट्रम, आदर्श, राष्ट्रकुल, कोळसा असा एकाहुन एक भयंकर घोटाळ्याविषयी एक शब्द तरी उच्चारला आहे काय? खुद्द अण्णांच्या उपोषणामुळे तेरा महिन्यांपुर्वी देश गडबडून गेला असताना राहु्ल गांधी एक चकार शब्द बोलले नव्हते. इतके घोटाळे व अब्जावधीचा भ्रष्टाचार पचवून ही मंडळी सुखरूप सत्तेवर बसली आहेत, पण त्यांना माध्यमांची भिती वाटत नसेल, तर अण्णा टीमने रोजच्या रोज माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची मुळात काय गरज होती? की तेच त्यांच्या आंदोलन वा चळवळीचे मुख्य उद्दीष्ट होते? त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. कारण आज अण्णा टीमचे अनेक चेहरे सा्र्वजनिक परिचयाचे झाले आहेत. पण आंदोलनाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आणि ते एका चमत्कारिक चक्रव्युहामध्ये फ़सलेले अभिमन्यू होऊन बसले आहेत. जॉर्ज फ़र्नांडीस यांनी चार दशकांपुर्वी एका युवक मेळाव्यात कथन केलेली जागतिक नेत्याचा अनुभव इथे बोलका ठरावा. ज्यांच्या कारकिर्दीत भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार पुढे आला ते ब्रिटनचे पंतप्रधान एटली यांचा तो अनुभव आहे.

   एटलींना समाजकारणाची आवड. तरूण वयातच ते रस्त्यावर उतरून मोर्चात व चळवळीत सहभागी होऊ लागले. एकदा त्यांना एका वयस्कर नेत्याने सांगितले, की लोकांच्या या समस्या रस्त्यावर उतरून नाही तर पालिकेत जाऊन सोडवल्या जातात, तेव्हा एटली निवडणूक लढवून पालिकेत गेले. तिथे छोटे-मोठे प्रश्न सुटले; पण मोठे प्रश्न तसेच राहिले. तेव्हा ते विधानसभेवर निवडून गेले. तिथेही काही प्रश्न धसास न लागल्यामुळे सल्ल्यानुसार ते संसदेत गेले. तिथेही विरोधी पक्षात बसून कळकळीने मुद्दे मांडत राहिले. तेव्हा एका अत्यंत बुजूर्ग नेत्याने सल्ला दिला, की जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत राजकारण्यांना जाग येणार नाही.

   म्हणजे गाडे पुन्हा तिथेच येऊन अडकते. संसदेला किंवा व्यवस्थेला नावे ठेवताना अण्णा टीमच्या सदस्यांनी त्याच व्यवस्थेमध्ये शिरण्याची तयारी चालविली आहे. आणि ती वाट कुठे घेऊन जाते त्याचा अनुभव एटली यांनी आठ दशकांपुर्वीच घेतला होता. त्यानंतरच्या अनेक पिढ्या त्यातूनच गेल्या आहेत. म्हणजे केजरीवाल नवे काही सांगत नाहीत आणि हे दुष्टचक्र नव्या अभिमन्य़ूला गुंतवायला छान आहे म्हणून तर तमाम राजकारणी ‘निवडून या’ असे आव्हान अण्णा टीमला देत होते. मुद्दा इतकाच, की आता पुढे काय? कारण निवडणूका लढवायच्या आणि जिंकायच्या तर पैसा लागतो आणि भ्रष्टाचारही करावा लागतो. मग त्यातून वाट काढायची कशी?

   लोक चळवळीची ताकद ओळखली तर त्यातून वाट काढता येईल. त्यासाठी निवडणुकीचा धोपटमार्ग शोधण्याची गरज नाही. निवडून येणार्‍यांना सत्ता मिळते. पण जोवर त्या सत्तेला सामान्य जनता जुमानते, तोवरच त्या सत्तेची मस्ती किंवा ताकद असते. जेव्हा लोक त्या सत्तेला जुमानत नाहीत, तेव्हा तीच सर्वशक्तीमान सत्ता किती अगतिक लाचार होत असते ते आपण तेरा महिन्यांपुर्वी बघितले आहे. कायद्याचे अधिकार किंवा बंदूका व त्यातून प्रस्थापित होणारी सत्ता ही शक्ती नसते; तेवढी सामान्य माणसाची संख्या प्रभावी व परिणामकारक शक्ती असते. ती लोकशक्ती जेवढी संघटित, तेवढी तिची ताकद प्रभावशाली असते. बहुसंख्य असूनही हिंदूंच्या भावना कधीही पायदळी तुडवणार्‍या या देशातील सेक्युलर सरकारला मुठभर मुस्लिमांच्या किरकोळ भावनातिरेकाचीही फ़िकीर का असते? तर इस्लामचे अनुयायी ही त्या धर्माची संघटित शक्ती आहे. तो संघटित धर्म आहे. ‘इस्लाम खत्तरेमे’ म्हटल्यावर लाखो मुस्लिम क्षणार्धात रस्त्यावर येतात. आणि हिंदूंच्या शंकराचार्याला अटक करून गजाआड डांबले, तरी हजारभर लोक रस्त्यावर उतरत नाहीत. मग सरकार त्यांना कशाला किंमत देईल? मुस्लिम गठ्ठ्य़ाने मतदान करतात, तर सगळे पक्ष सेक्युलर चेहरा दाखवायला धडपडतात. ती ताकद लोकसंख्येची असते. अण्णा टीम तेच विसरली आणि जमा झालेल्या लोकसंख्येला संघटीत करण्याचा विचारच झाला नाही, तिचे आंदोलनाचे अपयश नक्की झाले होते. म्हणून लोकांच्या मनातील त्यांच्या विषयीचे सहानूभूती संपलेली नाही. कारण अण्णांनी उचललेले प्रश्न लोकांच्या जीवनाला भेडसावणारे अस्सल प्रश्न आहेत. सवाल आहे तो त्यामागे संघटित लोकशक्ती उभी करण्याचा. कारण सरकार किंवा सत्ता त्याच लोकशक्तीला व लोकसंख्येला घाबरत असते. तेरा महिन्यानंतर शिकायचा धडा असेल तर तो हाच आणि एवढाच आहे.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १६/९/१२)

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

धडपडणारी मुले नव्हे तर तडफ़डणारी मुले


अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे. 

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो. 

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.


   पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील हा उतारा आहे. त्यात आजच्या सेक्युलर पत्रकारितेचे नेमके वर्णन आले आहे की नाही? गुरूजींना जाऊन आता सहा दशकांचा कालावधी लोटला आहे. मात्र त्यांच्या कथा व संस्काराची आठवण महाराष्ट्र विसरलेला नाही. पण दुर्दैव असे, की गुरुजींच्याच नावाने मळवट भरून मिरवणारे म्हणुन जे कोणी आजकाल समाजात उजळमाथ्याने वावरत असतात, त्यांनी मात्र गुरू्जींचे तेच विचार पुरते धुळीस मिळवले आहेत. आणि जर अशा सानेगुरूजी भगतगणांची नावे मी इथे सांगितली तर वाचकाला भोवळच येईल. कारण ज्यांना गुरूजी आपल्या कथेतून दंगलीत आगीचे तेल ओतणारे विघ्नसंतोषी म्हणुन दोष देत आहेत, ते बहुतांशी त्याच गुरूजींच्या परिवारातले आहेत ज्यांना सेवादलीय म्हणतात. सानेगुरुजी यांच्याच प्रेरणेने राष्ट्र सेवा दल नावाची संघटना स्वातंत्र्याच्या उदयकाली स्थापन झाली. आणि कायबीइन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यापासून प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रताप आसबे, समर खडस अशी तमाम सेवादलीय मंडळी स्वत:वर गुरूजींचे संस्कार असल्याचा नित्यनेमाने दावा करीत असतात. पण त्यांनी कधीतरी गुरूजींची ही कथा वाचली आहे काय? किंवा त्यापासून बोध घेण्याचा प्रयास तरी केला आहे काय? असता तर त्यांनी नेमकी सानेगुरूजींना नको असलेलीच पत्रकारिता कशाला केली असती? अवघ्या देशाचे मला माहित नाही. पण आजच्या मराठी पत्रसृष्टीवर सेवादलीय लोकांचा मोठाच पगडा आहे. आणि त्यातून ज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या आग विझवणार्‍या नसून आगीत तेल ओतणार्‍या असतील याची काळजी घेतली जात असते. किंबहूना राईचा पर्वत कसा करता येईल यासाठी अहोरात्र हातात भिंग घेऊन राई शोधत हे दिवटे फ़िरत असतात, हे आपण अनुभवत असतो. आणि असे करताना आपण सानेगुरुजींच्या भावना व विचार सातत्याने पायदळी तुडवतो, याची खंतही कोणाच्या चेहर्‍यावर दिसणर नाही.

   मला अचनक सानेगुरूजींची ही कथा गेल्या आठवड्यात आठवली. म्हणजे कंटाळा आला म्हणून मनोरंजनासाठी निखिल वागळेचा खुळेपणा मी बघत असतो. तर त्या दिवशी त्याने मनसेच्या आमदार प्रविण दरेकर यांच्यावर तोफ़ा डागण्याचा आवेश आणला होता. त्यात हा माणूस वेडगळ बोलण्याच्या नादात धडधडीत खोटे बोलू लागला, तेव्हा मला सानेगुरूजी आठवले. त्यांची स्वामी ही कथा आठवली. त्याच रात्री झोपण्यापुर्वी ते पुस्तक काढून आधी वाचले. मगच माझे समाधान झाले. मग मला दरेकर याच्यापेक्षा बिचार्‍या सानेगुरुजींचीच दया आली. दरेकरांपेक्षाही आज जे कोणी गुरूजींचे नाव घेतल्यावर हळवे होतात, त्या लोकांची अधिक कणव आली. कारण त्यातले बरेच निखिलला सेवादलीय समजतात. ज्याला आपण दैवत मानतो त्याच सानेगुरूजींच्या विचारांची अशी राजरोस पायमल्ली करणार्‍याचे कौतुक फ़क्त अंधभक्तांनाच असू शकते.

   त्या दिवशीच मला निखिलच्या आवेशातून गुरूजी का आठवले? तर नेमकी त्या दिवशी बहुतेक वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रात गुरूजींनी वर्णन केलेली कृ्ती घडत होती. गुरूजी काय लिहितात? ‘ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दंग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो कां तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो.’ निखिल वा अन्य वाहिन्या नेमके तेच करत होत्या ना?

   राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत काही विधान केले होते. त्याला अवास्तव प्रसिद्धी देऊन ही माध्यमे व वाहिन्या काय करू इच्छित होत्या? तर त्यातून आग भडकावी. हिंसक प्रतिक्रिया यावी यासाठीच त्या विधानाला वारेमाप प्रसिद्धी दिली जात होती ना? आणि प्रसिद्धी देताना मुळच्या विधानाचा विपर्यास होईल याची पुरेपुर काळजी घेतली जात होती. उदाहरणार्थ, निखिलच्या कार्यक्रमात सहभागी झालेले बिहारचे आमदार व नितीशकुमार यांचे निकटवर्तिय देवेंद्र ठाकूर पुन्हा पुन्हा सांगत होते, की मुळात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली; ती चुकीच्या बातमीवर केली आहे. बातमीच अफ़वा पसरवणारी आहे. बिहारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये येउ नये व परस्पर कोणाला अटक करू नये असे कळवले आहे. आणि मुंबईचे पोलिस तसे वागले तर त्यांच्यावरच अपहरणाचे गुन्हे नोंदले जातील; अशी धमकी त्या पत्रात दिली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. राज ठाकरे त्यावर प्रतिक्रिया देत होते. पण मुळातच तसे पत्र बिहार सरकारने पाठवले नसेल तर ज्याने तसे छापले; ते वृत्तपत्र खरा गुन्हेगार आहे. पण त्याबद्दल कोणीच बोलत नव्हते. उलट त्या अफ़वेवर प्रतिक्रिया उमटली, त्यावरच कल्लोळ माजवला जात होता. आहेना गंमत? गुन्हा केला कुठल्या वृत्तपत्राने व पत्रकाराने. अफ़वा पसरवली त्या पत्रकाराने. त्याचा गळा पकडण्याऐवजी त्यावर प्रतिक्रिया देणार्‍यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात होते. त्यासाठी राज्य सरकार राजवर कारवाई का करत नाही; असा जाबही विचारला जात होता. मग खरा जाब कोणाला विचारायला हवा होता?

   देशाचे नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी अलिकडेच अफ़वा पसरवणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मग ज्या पत्रकाराने व वृत्तपत्राने ही अफ़वा छापली, त्याच्या विरुद्ध कारवाई का करत नाही; असा जाब शिंदे व राज्याचे गृहमंत्री यांना विचारला जायला हवा होता. पण असे कुठेच घडले नाही. ते राहिले बाजूला आणि निखिलकुमारांसह तमाम वृत्तपत्रे व वाहिन्या राज ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करत होत्या. सानेगुरूजी यालाचा आगीत तेल ओतणे म्हणतात. देशबुडवेगिरी म्हणतात. आणि गुरूजींचे दुर्दैव असे, की त्यांच्याच संस्काराचे हवाले देणारे ते पाप आज करीत असतात. हा सगळा मामलाच गुन्हेगारी स्वरूपाचा होता. मात्र त्यातले गुन्हेगारच दुसर्‍या कुणा भलत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरत होते. खोटे बोलण्यात कायबीइन लोकमतचा कोणी हात धरू शकत नाही. आणि निखिल वागळेला तर सत्याची शिसारीच येते. म्हणून त्याने त्याच कार्यक्रमात प्रविण दरेकर यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अन्य राज्यात परप्रांतातून येणार्‍या कामगार स्थलांतरीतांची पोलिस नोंद करतात, असा दावा दरेकर यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी एका कायद्याचाही संदर्भ दिला होता. पण ओरडा करीत निखिलने त्यांना खोटे ठरवले आणि दरेकर व राज ठाकरे खोटे बोलतात असा बेछूट आरोप केला. आणि म्हणूनच मला दरेकर शंभर टक्के खरे बोलतात याची खात्री पटली होती. दुसर्‍या दिवशी मी त्या सत्याचा शोध घेतला आणि निखिलसह कायबीइन लोकमतचा खोटेपणा चव्हट्यावर आला. तो मी मग लगेच इंटरनेतद्वारे फ़ेसबुकवर टाकला. त्याला नेटीझन्सकडून प्रचंद प्रतिसाद मिळाला.

   गेल्या मे महिन्यातच केरळच्या विधानसभेत कॉग्रेसप्रणित आघाडीचे गृहमंत्री राधाकृष्णन यांनी त्यांच्या राज्यात ६३,२०० इतक्या परप्रांतिय कामगारांची पोलिसांनी नोंद केली असल्याचे उत्तर दिले होते. ज्यांना हवे ते इंतरनेटवर त्या बातमीचा शोध घेऊ शकतात किंवा केरळ सरकारच्या दफ़्तरातली नोंद तपासू शकतात. म्हणजे तिथे त्या चर्चेत दरेकर खरे बोलत होते आणि ओरडा करून निखिल खोटेपणाचा आळ त्या सत्यवचन करण्यावरच घेत होता. अयोध्येतील राममंदिराचा निखिलला इतका तिटकारा का असावा; त्याचे उत्तर कदाचित त्याच्या अशा वृत्तीमध्ये सापडू शकते. राम हा सत्यवचनी होता आणि निखिलसह लोकमत वाहिनीला सत्याचेच वावडे आहे. म्हणजे स्थलांतरीतांची नोंद करणे हा घटनात्मक गुन्हा नाही, हे केरळच्या सरकारी कृतीने सिद्ध होते. मग राज ठाकरे यांच्य विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा आगह धरणारे काय देशप्रेमी म्हणायचे? ज्यांनी अफ़वा पसरवल्या त्यांना किंवा त्यांना पाठीशी घालणार्‍यांना काय राष्ट्रप्रेमी म्हणायचे? जेव्हा देशाच्या एकात्मकतेचे प्रतिक असलेल्या अमर जवान स्मारकाची अवहेलना व विटंबना झाली; तेव्हा मूग गिळून गप्प बसालेले निखिलसारखे शेळपट पत्रकार आणि नितीश, लालू, मुलायम, निरूपम किंवा आणखी जे कोणी असतील, ते राष्ट्रप्रेमी असतात काय? राष्ट्रीय स्मारकाच्या विटंबनेनंतर ज्यांची वाचा बसते, ते शुरवीर देशप्रेमी ही अजब व्याख्या झाली ना? सामान्य वाचक किंवा प्रेक्षक यांना मुर्ख वाटतो काय? नसेल तर इतके बेधडक खोटे व बिनबुडाचे आरोप करण्याची हिंमत यांना होतेच कशी? की त्यांना आगी लावणे, आगीत तेल ओतणे म्हणजे देशाची एकात्मता वाटत असते? निदान सानेगुरूजींची व्याख्या तरी तशी नव्हती.

   आता थोडे दुसर्‍या खोटेपणाकडे वळू. देशाचा कुठलाही नागरिक कुठल्याही शहरात व राज्यात जाऊ शकतो, असे दावे छती फ़ुगवून केले जातात. किंबहूना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यात खुपच आघाडीवर असतात. त्यासाठी ते उत्साहात भारतीय राज्यघटनेचा आधार घेत असतात. राज्यघटनेट्ने आणि बाबासाहेबांनी आम्हाला हा अधिकार दिला आहे, असा त्यांचा नेहमीचा दावा असतो. तो अधिकार काय एकट्या उत्तर भारतीयांना किंवा अबू आझमी व नितीशकुमार यांनाच मिळाला आहे? की प्रत्येक भारतीयाचा तो मूलभूत अधिकार आहे? जर तो सर्वांचा अधिकार असेल, तर बिहारमध्येही ज्या कोणा भारतीयाला जायचे असेल त्याला मुंबई इतकीच मोकळीक असायला हवी. इथे जी भाषा राज ठाकरे बोलतात, त्याचा निषेध करणार्‍या नितीशनी तरी तशी भाषा बोलू नये ना? त्याचे त्यांना सोयरसुतक असते काय? मुंबईत मनसे शिवसेनेने उत्तर भारतीयांनद्दल आक्षेप घेतले, मग राज्यघटना ज्यांना आठवते त्यांची ही घटना कधी कालपरवा उदयास आली आहे काय? की सहा दशकांपासून तिचा अंमल भारतात चालू आहे? असेल तर हेच नितीशकुमार गेल्या वर्षी कुठली भाषा बोलत होते? ती राज ठाकरे यांचीच भाषा नव्हती काय? की राज बोलले तर पाप व गुन्हा होतो आणि नितीश वा लालू, पास्वान बोलले मग पुण्य होते? गेल्या वर्षी नितीश काय बोलत होते आणि हेच निखिलसारखे पत्रकार कशाला त्यांची पाठ थोपटत होते? कुणाला आठवते काय?

   वर्षभरापुर्वी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले होते. तेव्हा नितीशना मतदारांची मोठीच फ़िकीर होती. त्यामुळे आपल्या मतदार पाठीराख्यांच्या चिंतेने ग्रासलेले नितीश आपल्या मित्रपक्षालाच कुठल्या धमक्या देत होते? कोण आहे त्यांचा मित्रपक्ष? भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये आणता कामा नये, असा अट्टाहास कोणी चालविलेला होता? मोदींना बिहारमध्ये पाऊल टाकू देणार नाही, अशी भाषा कोण बोलत होता? ती भाषा राज ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी आहे काय? दरेकरना दम देऊन राज ठाकरे कोण लागून गेलेत, असे विचारणार्‍या निखिलने त्याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या बिहारी देवेंद्र ठाकूर यांना, हा सवाल कधी विचारला आहे काय? नरेंद्र मोदींना बिहार बंद करण्याची नितीश यांची भाषा कुठल्या राज्यघटनेत बसते? कारण राजने छटपूजेच्या निमित्ताने मुंबईत येऊ घातलेल्या नितीशनाही मुंबई बंद करू असे बजावले होते. तेव्हा नितीश म्हणाले होते, मुंबईत जायला व्हिसा लागत नाही. मग कुणा अन्य प्रांतातील भारतीयाला नितीशच्या बिहारमध्ये जायला व्हिसा लागतो काय? नसेल तर मोदींना बिहार बंद करण्याची भाषा त्यांनी का वापरली होती? आणि त्यांनी वापरली तेव्हा निखिल वा अन्य कुणा पत्रकाराने नितीशना जाब का विचारला नव्हता? की नितीश हा बिहारी व उत्तर भारतीय आहे म्हणुन त्यांना काहीही बरळण्याची राज्यघटनेने मुभा दिलेली आहे आणि मराठी नेत्यांनीच आपली भाषा वा शब्द तोलून मापून बोलावेत अशी राज्यघटनेत तरतूद आहे? नसेल तर यातला एकही माईका लाल पत्रकार तेव्हा नितीशच्या त्या बंदीच्या भाषेवर तुटून का पडला नव्हता? नितीश कोण लागून गेलेत, अशी भाषा निखिलसारख्या भडभुंज्याला का सुचली नव्हती?

   पुन्हा परिस्थिती उलटी दिसेल. तेव्हा त्याच भाषेसाठी व शब्दांसाठी हेच पत्रकार माध्यमे नितीशची पाठ थोपटत होते. त्यात नितीशचे कौतुक कशासाठी चालले होते? तर सेक्युलर माध्यमांच्या मनात नरेंद्र मोदींबद्दल अढी व द्वेष आहे. आणि माध्यमे ज्याचा द्वेश करतात, त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नसतो. त्यामुळे असे मोदी वा तत्सम भारतीयाचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवणार्‍याचे कौतुक होत असते. पण जेव्हा बाजू पलटते तेव्हा यांनाच राज्यघटना, मुलभूत नागरी अधिकार राष्ट्रीय एकात्मता अशा गोष्टी आठवू लागतात. अगदी स्पष्टपणे दिसेल असा हा भेदभाव आहे. एकीकडे समतेच्या गोष्टी करायच्या, सर्वांना समान न्यायाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्येक बाबतीत दुजाभाव दाखवायचा. राज हिंदी वाहिन्यांचा खेळ बंद करीन म्हणाले मग आविष्कार स्वातंत्र्यावर मोठाच हल्ला झाल्याचा कांगावा केला गेला. आणि जेव्हा ११ ऑगस्ट रोजी त्याच हिंदी वाहिन्यांच्या ओबी व्हॅन खरोखरच जा्ळल्या गेल्या, तेव्हा चकार शब्द त्यापैकी कोणी काढला नाही. म्हणजे बलात्कार झाला तर शब्द बोलायचा नाही आणि बघून घेईन म्हटले तर बलात्कार करून खुन पाडला असावा, इतका गदारोळ करायचा. इतका धडधडीत खोटेपणा चालू नाही काय?

   सानेगुरूजी खरेच किती द्रष्टे होते, त्याची यातून साक्ष मिळते. त्यांच्याच ‘धडपडणारी मुले’ या पुस्तकातील स्वामी या कथेतला उतारा मी आरंभी दिला आहे. त्यात त्यांनी सहा दशकांपुर्वी पत्रकारांचे अफ़वाबाज म्हणुन केलेले वर्णन किती सार्थ आहे त्याची जणु साक्ष देण्यासाठीच आजचे पत्रकार असे वागतात काय अशी शंका येते. पण त्याहीपेक्षा गुरूजींची दया येते, ती निखिल वा तत्सम त्यांच्याच राष्ट्र सेवा दलातील दिवाळखोर बेअक्कल मुले बघितल्यावर. आज गुरूजी असते आणि त्यांनी आपल्याच सेवा दलाचे संस्कार घेऊन निपजलेली अशी (समाजमनात विष कालवणारी) पिढी बघितली असती तर त्यांनी नवे पुस्तक त्यांच्यावर लिहिले असते व त्याला शिर्षक दिले असते, ‘तडफ़डणारी मुले’.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी ९/९/१२)

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

पुत्र व्हावा ऐसा गुंडा


   खुप जुनी गोष्ट आहे. म्हणजे मी नुकताच मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागलो होतो. त्या जमान्यात शाळेत असेपर्यंत मुलांच्या नशीबी लांब पॅन्ट नसायची आणि मुलींना मात्र मॅट्रिकच्या वर्गात असतानाच साडीसुद्धा नेसावी लागत असे. असा तो (आजच्या तुलनेत) अत्यंत मागासलेला जमाना होता. तर मी पहिल्या वर्षात आर्किटेक्चरचा विद्यार्थी होतो. कॉलेजच्या मुलांची अभ्यास सहल जायची होती. त्यासाठीची फ़ी दोनशे रूपये होती. पण चारशे मुलामुलींपैकी अवघी तीस पस्तीसच तेवढी फ़ी भरू शकली. बाकीच्यांना त्या सहलीला जाता आले नाही. मीसुद्धा न जाऊ शकलेल्यापैकीच एक होतो. त्याचा मनाला खेद जरूर झाला, पण आम्ही अशी मुले अजिबात दु:खी नव्हतो की, जे जाऊ शकले त्यांच्याबद्दल आमच्या मनात कसलीही असुया नव्हती. माझ्या पालकांचे मासिक उत्पन्नच मुळात तेव्हा दोनशे रुपयांपेक्षा कमी होते. मग एवढी फ़ी मागायची हिंमत तरी कुठून करायची? मी आणि बर्‍याच मुलांनी अशी काही अभ्यास सहल जायची आहे असे घरच्यांना सांगितले सुद्धा नाही. ज्याचा उपयोगच नव्हता तर सांगायचे तरी कशाला? शिवाय कॉलेजची फ़ी भरण्यात आणि लागणारे साहित्य मुलांना पुरवण्यातच तेव्हाच्या पालकाचे कंबरडे मोडायचे तर त्या पालकाकडून अशा चैनीची अपेक्षा तरी आम्ही कशी करणार होतो? मुळात शाळेतून कॉलेजपर्यंत मजल मारणार्‍यांची संख्याच तोकडी असायची. कारण घरातल्या त्यातल्या त्यात हुशार मुलालाच पुढे शिकवायचा प्रघात होता. त्यामुळे जी मुले कॉलेजला घातली जात त्यांना पालकाने आपल्यावर केले तेच उपकार वाटत असत. आठवड्यात एकदोन रुपये खर्चाला दिले तर पालक प्रसन्न झाला असेच आम्हाला वाटत असे.

   कारणही तसेच होते. आजच्यासारखे शिक्षण तेव्हा महाग झाले नव्हते आणि स्वस्तही नव्हते. महाग अशासाठी नव्हते, की ज्यांना समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा असे मनापासून वाटत असे, असेच लोक धडपड करून, देणग्या जमवून किंवा पदरमोड करून शिक्षण संस्था स्थापन करायचे व चालवायचे. मुलांकडून फ़ी किंवा देणगी मिळण्याची अपेक्षाही तेव्हा संस्थाचालक करीत नसत. कारण पालकाकडे शिक्षणासाठी बजेटच नव्हते. म्हणून शिक्षण स्वस्त होते किंवा महाग नव्हते. दुसरी बाजू अशी, की जेवढे पालकाचे उत्पन्न होते त्यातून थोडीफ़ार रक्कम बाजूला काढता आली तरच त्याला एकाद्या मुलाला उत्तम व उच्च शिक्षण देणे शक्य होत असे. त्यामुळेच होतकरू व गुणी मुलालाच शिकवले जात होते. प्राथमिक शिक्षण सोडले तर बाकीच्या माध्यमिक वा उच्चशिक्षणासाठी सरकारी अनुदान नव्हते, की सवलती नव्हत्या, मुलांचे शिक्षण ही पालकाची जबाबदारी होती आणि पालक त्याच्या हातातल्या अपुर्‍या पैशाचे नियोजन करून गुणी मुलांनाच शिकवत होता. बाकीच्या मुलांची शाळा सातवीत किंवा मॅट्रीक नंतर संपायची. जे नापास व्हायचे तेही मोठ्या अभिमानाने शिक्षण किती, तर नॉनमॅट्रीक असे सागत असत. ग्रॅज्युएट ही खुपच मो्ठी गो्ष्ट असायची तेव्हा. पण जे कोणी उच्चशिक्षण घ्यायला जायचे, त्यांनी आपल्या कुटुंबाचा भविष्यात भार उचलावा, हा अलिखित करार असायचा आणि तो पाळला जायचा. माझ्या पिढीतल्या अनेक भावांनी आपल्या हुशार भावाच्या शिक्षणासाठी काढलेल्या खस्ता मी बघितल्या आहेत. आणि त्या भावाने नंतर कर्ज फ़ेडावे तशा अन्य भावंडांच्या जबाबदार्‍या पार पाडलेल्या मी बघितल्या आहेत. त्याला कुटुंब म्हणायचे.

   आज आपण तेच कुटुंब गमावून बसलो आहोत. बाकीचे दिसतात ते त्याचे परिणाम आहेत. घरात एकच मुल असते. फ़ार तर दोन मुले असतात आणि प्रत्येकाला महत्वाकांक्षेने पछाडले आहे. मग जो कोणी हुशार असेल त्याला जेवढे मिळेल, तेवढेच दुसर्‍याला मिळायला हवे आणि मिळणार नसेल तर भावंडातच असुया सुरू होत असते. ही झाली विभक्त कुटुंबाची एक समस्या. त्याच्या पलिकडे अधिक सुबत्तेच्या मागे लागलेल्या पालकांनी अधिकाधिक पैसे मिळवण्याच्या नादात घर नावाची आस्थाच गमावली आहे. त्यामुळे जे छोटे कुटुंब असते, तेही आठवड्यात कधी एकत्र जमते की नाही याची शंका आहे, आईवडिल मुलांच्या गरजा आणि आपले सुखवस्तू जीवन, यांचे बजेट जुळवण्याच्या नादात नातीगोती विसरून गेले आहेत. एकच उदाहरण पुरेसे ठरावे. मुंबईच्या गिरणगावात लोअर परेल येथे वास्तव्य करणारा माझा एक तरूण मित्र आहे. ते सहा भाऊ व दोन बहिणींसह आईवडिल असे दहा जणांचे कुटुंब सव्व्वाशे चौरस फ़ुटाच्या खोलीत गुण्यागोविंदाने नांदले. पुढे मुले मोठी झाली प्रत्येकाने आज आपापले वेगळे संसार थाटले आहेत. त्यातल्या एका भावाने अलिकडेच एक व्यथा बोलून दाखवली. जुन्या काळात एखाद्या रविवारी अर्धा किलो मटन आणले तर ही दहा माणसे खाऊन खुश व्हायची. कोणाच्या वाट्याला त्यातले दोन तीन तुकडेही येत नसत. पण मटन खाल्ल्याचा जो आनंद होता, तो अवर्णनिय असायचा. आता एक किलो मटन दर रविवारी येते आणि त्या भावाच्या चारजणांच्या कुटुंबाला ते पुरत नाही. त्याचे म्हणणे असे, की पोटभर होते. पण त्यात त्या बालपणीच्या अर्धा किलो मटनातली मजा नाही. खायला भरपूर आहे, पण त्यातला आनंद संपुन गेल्याचे दु:ख त्याला सतावते आहे. या तरूण मित्राने तो किस्सा सांगून मला त्याचा उलगडा करायला सांगितला. मलाही बरेच दिवस त्याचा उलगडा होऊ शकला नव्हता. पण जेव्हा सर्वत्र बघत अनुभवत गेलो, तेव्हा त्यातले रहस्य उलगडले.

   पुर्वी त्यांच्या बालपणी ते मोठे कुटुंब अर्धा किलो मटनावर ताव मारत होते, तेव्हा त्यांना दुर्मिळ असल्यासारखे मटन खाल्ल्याचे समाधान मिळत होते. त्याचा पुरवठा कमी होता. पण मटनाने पोट भरण्यापेक्षा समाधानानेच पोट भरत होते. आता पोट मटनने भरते, पण समाधानाची भूक भागत नाही. हव्यासाने खाल्ले जाते, पण समाधान मात्र संपले आहे. आज सुखवस्तू होत चाललेल्या किंवा नवश्रीमंत म्हणुन जो मध्यमवर्ग नव्याने उदयास येतो आहे त्याला भौतिक सु्ख खुप मिळाली आहेत व मिळवली जात आहेत. पण त्या गडबडीत मिळवायचे काय व समाधान कशातून कसे मिळते; त्याचाच त्याला विसर पडला आहे. मग मिळते सगळे, पुरेसे नव्हेतर अधिक मि्ळते आहे. पण मिळाल्याच्या समाधानाला मात्र आपण वंचित होऊन गेलो आहोत. हव्यासाने आपले जीवन पोखरून काढले आहे. आणि ते समाधान गमवलेले आपण, मग कृत्रिम सुखे व चैनीच्या आहारी गेलो आहोत. आपण आता आपल्या समाधानाचा वा सुखाचा विचारही करायचे विसरून गेलो आहोत. आपण आता दुसर्‍यांसाठी जगतो, धडपडतो आणि आयुष्य खर्ची घालतो. पण आपल्या सुखासमाधानाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपले सुख, समाधान, आनंद कशात आहे; तेही आपल्याला कळेनासे झाले आहे. मग आपल्याला दुसर्‍याने दाखवावे, समजवावे लागते आणि त्याचे समाधान करण्यासाठी आपण आयुष्य खर्ची घालून मोकळे होतो. मात्र त्याची विकृत फ़लनिष्पत्ती समोर येते; तेव्हा आपण सैरभैर होऊन जातो. खरे नाही ना वाटत?

   जरा विसरून जा हे सगळे तत्वज्ञान आणि गेल्या आठवड्यात पुण्याच्या रिव्हरव्ह्यू नामक एका आलिशान हॉटेलमध्ये शाळकरी मुलांनी जो धुमाकुळ घातला त्याची बातमी आठवा. सातशे आठशे किशोरवयीन मुले मुली तिथे जमले होते आणि दारू वगैरे नशा करून धिंगाणा करत होते. शाळकरी म्हणजे विशीच्या आतल्या वयाच्या या मुलांनी नशापान करणे कुठल्याही पालकाला अयोग्यच वाटणार. पण ते त्या मुलांनी चोरूनही केलेले नाही. अगदी जाहिरपणे त्यांनी पार्टी योजली होती. त्यासाठी प्रत्येकी चारशे रुपये मोजण्यात आलेले होते. मुलींसाठी प्रवेश मोफ़त होता. त्याचे कारण वेगळे सांगायला हवेच का? मुली आल्या मग मुले आपोआपाच येणार, म्हणुन मुलींना फ़्री. याचा अर्थ इतकाच, की ज्या मुली "फ़्री" असतील त्यांच्यासाठीच पार्टी फ़्री होती. मग तिथे काय घडणार होते आणि जे घडणार होते, त्यामागचा हेतू काय असेल त्याचा नुसता अंदाजही पुरेसा आहे. पण असे एका दिवसात घडलेले नाही. म्हणुन तर पालकांनी हस्तक्षेप करूनही मुलांना रोखणे शक्य झाले नाही. पालकांनी पोलिसांची मनधरणी केली, तेव्हा ती पार्टी रोखणे शक्य झाले. त्यातून हा प्रकार चव्हाट्यावर आला. पण त्यासाठी पोलिसांची मदत मिळवताना पालकांना आपले पापही कबूल करावे लागले आहे. ही मुले अशी प्रथमच वागलेली नाहीत. त्यांच्या वागण्याचा पालकांना आधीपासून संशय आलेला होता. नशापानाचा वास किंवा वागणे यातून पालक चिंतेत पडले होते. पण मुलेही लपवण्याच्या पलिकडे गेली होती. त्यांनी आपला गुन्हा लपवण्यापेक्षा त्यापासून परावृत्त करू बघणार्‍या पालकांनाच धाब्यावर बसवले. ज्या वयात आमच्या पिढीला हॉटेलमधून भजी आणावी अशी इच्छा घरात बोलून दाखवायची हिंमत नव्हती, त्याच वयात ही मुले नशापान करायच्या पार्टीला जाण्यापासून अडवणार्‍या पालकांना उलट दमदाटी करत होती म्हणे. कालय तस्मै नम: म्हणून त्याकडे काणाडोला करायचा काय?

   पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. पण कुठलीही कठोर कारवाई करण्याचे टाळले. मग आमच्या माध्यमांनी, वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी त्यवरच काहूर माजवले. म्हणे त्या हॉटेलचा मालक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चुलत भाऊ होता; म्हणून पोलिसांनी झाकपाक केली. पण इथे मुद्दा राजकीय नेत्याच्या नातलगाचा किंवा पोलिसांच्या लपवाछपवीचा नाहीच. कारण हा कायद्यातला गुन्हा नसून कौटुंबिक समस्येचा विषय आहे. त्या मुलांनी जे काही केले, तो पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा गुन्हा नसून कौटुंबिक बेशिस्तीचा नमूना आहे. मुले किती बेफ़ाट आणि बेभान झाली आहेत, त्याचा विषय आहे. ते हॉटेल कुणाच्या मालकीचे आहे किंवा पोलिस किती गैरलागू वागले, हा भाग अत्यंत दुय्यम आहे. अजितदादांच्या चुलत भावाऐवजी अन्य कुणाचे ते हॉटेल असते, तर पोलिसांनी त्या मुलांवर कारवाई केली असती, म्हणजे समस्या सुटली असती काय? समस्या काय आहे? राजकीय नेत्यांना संबंध? की किशोरवयीन मुलांनी असे बेताल वागणे? की पालकांनी मुलांचे भवितव्य घडवण्याच्या नादात; त्यांचे अनाठायी लाड करून त्यांना बेताल होण्यास अनवधानाने दिलेले प्रोत्साहन ही समस्या आहे? शेवटचा मुद्दा हीच खरी समस्या आहे. पण त्याबद्दल कुठेही अवाक्षर बोलले गेले नाही. आपण मुलांसाठी इतक्या सोयी सुविधा उभ्या करतो आहोत, त्यांना काही कमी पडू नये म्हणुन अखंड पैसे मिळवण्याच्या मागे पळत आहोत. पण त्या सोयीसुविधा व महागडी साधने मुलांना पुरवताना. त्या मुलांना संस्कारी व जबाबदार बनवण्य़ाचे साफ़ विसरून गेलो आहोत. म्हणूनच आपण मुलांना समाजासाठी व  कुटुंबासाठी एक मुल्यवान व्यक्ती वा नागरिक बनवण्याऐवजी, समाजाच्या डोक्यावरचा बोजा बनवत आहोत. याचे आजच्या पालकाला भानच उरलेले नाही. त्यातून ही सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मग ह्या मुलांनी तिथे जाऊन नशापान केले, धिंगाणा घातला. तिकडे दिल्लीत कुणा उद्योगपतीच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन नशापान केल्यावर बेफ़ाम गाडी हाकताना काही लोकांचे जीव घेतले. यासाठी्च पालक मुलांना सुविधा देत आहेत काय? त्यांच्यावर पैसा उधळत आहेत काय? पुढे याचे पर्यवसान कुठपर्यंत जाते? मध्यंतरी मुंबईतल्या दोघा मित्रांनी तिसर्‍याचे अपहरण करून त्याच्या बापाकडे खंडणी मागण्यापर्यंत मजल मारली आणि ती मिळाली नाही, तेव्हा भयभीत होऊन त्या मित्राला ठार मारून टाकले.

   आरंभीच्या पार्ट्या व त्यात तयार होणारी वा फ़ोफ़ावत जाणारी बेफ़ाम वृत्ती, त्या वयात येण्याच्या काळातली उपजत प्रवृत्ती असते. तिला वेळीच लगाम लावण्यालाच संस्कार म्हणत असतात. त्या वेळी मुलांना पैसे किंवा महागड्या सुविधा देण्यापेक्षा वे्ळ देणे व विश्वासात घेऊन भविष्याच्या नियोजनाची दिशा दाखवणे अगत्याचे असते. किंबहुना त्यांच्या अंगात संचारणारी मस्ती जिरवण्यासाठी त्यांच्यासमोर विधायक आव्हाने ठेवणे अगत्याचे असते. जर ती आव्हाने नसतील मग मुले खो्ट्या, भ्रामक वा कृत्रिम आव्हानांच्या मोहात सापडत असतात. "आज काही तुफ़ानी करू या" अशी एक जाहिरात गेले काही महिने सर्वच वाहिन्यांवरून अहोरात्र झळकत असते. त्याची दिशा व रोख आपल्या लक्षात कधी आलेला आहे काय? एका उंच गच्चीवरून ती मुले दुसर्‍या इमारतीवर उडी घेतात. हे खरे आहे की भ्रामक? पण अशा भ्रामक गोष्टीची भुरळ पडण्याचेच ते वय असते. तेव्हा मुलांना सावरण्याची गरज असते आणि त्यासाठी पालकाकडे पैसे नको, तर वेळ असला पाहिजे. कारण आपल्याला मुलांना बिघडवायचे नसते ना? त्याने खुप शिकावे आपल्याही पुढे खुप मोठी झेप घ्यावी, असेच प्रत्येक पालकाचे स्वप्न असते ना? मग कुणा श्रीमंत मित्र वा परिचिताकडे बघू नका; तर त्या रिक्षाचालक नारायण जायस्वालकडे बघा. त्याच्याकडे मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी काय होते? पण त्याने हमालीसारखे कष्ट उपसून आपल्या पोराला उच्चशिक्षण घेण्याची प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि त्याच्यासमोर आव्हान उभे केले. मग त्याचा मुलगा गोविंद जायस्वाल आयएएस झाला. इथे त्या पितापुत्रांचा फ़ोटो मी मुद्दाम दिला आहे. त्या अत्यंत हुशार मुलाला आपल्या रिक्षाचालक बापाची लाज वाटते आहे का बघा? पुण्यातल्या पार्टीमध्ये नशापान करणारी हजार मुले ओवाळुन या गोविंदावर उधळून टाकावी, असाच तो पोरगा नाही काय?

   त्या बापाने आपल्या मुलाला काय दिले? शिकायचे तर फ़ी भरायला पैसे नाहीत म्हणून जमीनीचा इवला तुकडा होता, तो विकून त्याची फ़ी भरली.  आपला बाप दिवसरात्र कष्ट उपसतो आहे याचे त्या मुलाने भान ठेवले आणि आपल्या खर्चाला लागणारे पैसे किंवा पुस्तकांचे पैसेही त्याने शिकवण्या करून मिळवले. हे त्या मुलाने का केले? असा आपलाही मुलगा मुलगी निघावी असे कुठल्या आईबापांना वाटत नसेल? मग तसे होत का नाही? कारण रिक्षाचालक जायस्वालने जी बहूमोल देणगी आपल्या या सुपुत्राला दिली, तेवढे सोडून आपण आपल्या मुलांना सर्वकाही देतो. काय दिले त्या बापाने आपल्या मुलाला? त्याने संस्कार दिले, सुबुद्धी दिली आणि या अडाणी कष्टकर्‍याचा तो पुत्र सुपुत्र ठरला. पण कौतुक त्याच्या पुढेच आहे. मुलगा आता सनदी अधिकारी झाला तर त्याच्याकडुन काय अपेक्षा आहेत, असे बापाला विचारले तर तो रिक्षाचालक जायस्वाल म्हणाला; त्याने एकही पैसा लाच घेउ नये आणि इमानदारीने जनतेची सेवा करावी एवढीच माझी अपेक्षा आहे. ज्या रिक्षा चालवण्याने आयुष्य़ जगलो व मुलाला शिकवून मोठे केले, तो माझा धंदा पोटाला पुरेसा आहे. मी त्यातच समाधानी आहे. आणि सनदी अधिकारी झालेला तो मुलगा म्हणाला, एकही दिवस मी माझ्या बापाने प्रामाणिक कमाई करताना गाळलेला घाम मी विसरू शकणार नाही. आणि त्याने केलेल्या मेहनतीची मी कधीच परतफ़ेड करू शकणार नाही. याला संस्कार म्हणतात मित्रांनो. आपण यातले आपल्या मुलांना काय देतो; त्याचा नुसता विचार करा म्हणजे आपली मुले अशी का भरकटतात, त्याचे उत्तर सापडू शकेल

  साधने, पैसा, सुविधा किंवा सुखसोयी आपल्या गरजा नसतात, त्या सहाय्यक असतात. त्यांच्यामुळे पुढे जाता येत नाही, मजल मारता येत नाही, की प्रगती करता येत नाही. त्यासाठी सर्वात मोठी आवश्यकता असते ती इच्छेची आणि प्रेरणेची. मनात इच्छाच नसेल तर पाय असून चालता येत नाही, हात असून काही उचलता येत नाही. हलता डुलताही येत नाही. आणि इच्छा असेल तर लंगडाही चालतो. तेव्हा त्याला कुबड्या चालवत नाहीत. कुबड्या भार उचलतात, पण तो पांगळा पाय उचलून पुढे जाण्याची बुलंद इच्छाशक्ती मनातच असावी लागते. तीच त्या कमजोर पायांना चालवत असते. कुबड्या फ़क्त मदत करतात. त्यालाच काही तुफ़ानी करणे म्हणतात. जे जगाला चक्रावून सोडते, पण विधायकही असते. दरवर्षी चारपाच लाख मुले त्या परिक्षेला बसतात आणि त्यातले पाचसातशे पल्ला गाठतात. त्यात ४५ क्रमांकाने यशस्वी झालेला गोविंद जायस्वाल खरे तुफ़ानी कर्तृत्व गाजवत असतो. पण त्याची जाहिरात होत नाही. आणि आम्ही पालकही मुलांसमोर त्याचा तुफ़ानी आदर्श ठेवत नाही. मग आमची मुले शीतपेय किंवा तशीच मद्यपेय पिवून तुफ़ानी झिंगून आईबापांच्या अब्रूचे धिंडवडे काढतात. उलट अब्रुदार अशी ज्याची गणना होत नाही त्या रिक्षाचालक नारायण जायस्वालचा पुत्र मात्र बापाला अब्रुदार म्हणुन जगासमोर आणतो. असे का होते माहित आहे मित्रांनो? आपण काय मिळवायचे आहे आणि सुखसमाधान कशात आहे तेच विसरून गेलो आहोत. समाधान मिळवायचे विसरून गेलोत, म्हणुन मिळते खुप पण मिळाल्याचे समाधानच मिळत नाही. पोटभर मिळते आहे पण भूक मात्र भागल्यासारखे वाटत नाही. मुलांसाठी खुप करतो आपण; पण त्यांना आईबापच मिळत नाहीत आणि आपल्याला पुत्र कन्याही लाभत नाहीत. शेकडो सुविधा सोप्या करून आपण मुलांच्या आयुष्यातले आव्हानच संपवून टाकले आहे ना? तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आपण विसरलोय ना? म्हणुन आपण धोंडेच घडवतोय का? तुकोबा म्हणाले होते,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
नाहीतर माळावरचा धोंडा

( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २/९/१२)