शनिवार, २७ एप्रिल, २०१३

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांचे वेध
   आत्महत्या करायला धावत सुटलेल्यांना कोण वाचवू शकतो? स्वत:च्याच गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत निघालेल्या गाय म्हशीला कोणी वाचवू शकतो काय? आज दिल्लीत बसून देशावर राज्य करणार्‍या कॉग्रेसप्रणित युपीएच्या मनमोहन सरकारची वागणुक नेमकी तशीच आहे. स्वत:लाच अडचणीत आणणार्‍या कृती एकामागून एक करण्यात या सरकारचा कोणी हात धरू शकणार नाही. त्यामुळेच सरकारमध्ये सामील होऊन किंवा त्याला बाहेरून पाठींबा देऊन जगवू पहाणार्‍या अन्य लहानमोठ्या सेक्युलर पक्षांची कॉग्रेसने इतकी कोंडी वा गोची केली आहे. आगामी निवडणूकांचा विचार करायचा तर ह्या पक्षांना अधिक काळ सरकारचे समर्थन अवघड होऊन बसले आहे. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशीच एकूण अवस्था आहे. हा लेख लिहीत असताना कोळसाखाण प्रकरणी सुप्रिम कोर्टाला सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, आपला तपासणी अहवाल कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी मागवला व तपासला; याची कबुली सीबीआयच्या संचालकांनी देऊन टाकली आहे. हा धडधडीत सुप्रिम कोर्टाचा अधिक्षेप आहे. कारण त्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने तपास करून थेट आपल्याला अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिलेले होते. त्यामुळेच त्यात लक्ष घालण्याचा कुठलाही अधिकार सरकार वा मंत्र्याला उरत नाही. असे असताना तो मागवणेच मुळात अवैध आहे. आणि आता तसे केल्यामुळे त्या मंत्र्याला हाकलणे पंतप्रधानांना भाग पडणार आहे. इतकेच नाही, तर तशी मागणी करून डाव्यांसह भाजपाने त्या मागणीसाठी संसदेची कोंडी केली आहे. मुद्दा असा, की अजून देशाचा अर्थसंकल्प संसदेत मंजुर व्हायचा आहे आणि त्यासाठी सरकारला संसदेत बहूमत नसल्याने मुलायम-मायावती यासारख्या मित्रांच्या पाठींब्याची गरज आहे. पण आजच्या परिस्थितीत कॉग्रेस सरकार वाचवणे किंवा सेक्युलर म्हणून त्यांना पाठींबा देणे; म्हणजे भ्रष्टाचाराचेच समर्थन करणे अशी नाचक्की मित्रपक्षांच्या वाट्याला येणार आहे. सहाजिकच हे सरकार आणखी एक वर्षासाठी असलेली मुदत कितपत पुर्ण करू शकेल, याची शंकाच आहे. त्यामुळेच मुदतीपुर्वीच मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने पावले पडू लागल्याची ही लक्षणे आहेत. एकीकडे जनतेसह मित्रपक्षांचा विश्वास गमावलेले सत्ताधारी व दुसरी्कडे दिवसेदिवस लोकप्रियता वाढणारे नरेंद्र मोदी; अशा विचित्र सापळ्यात आजचे राजकारण येऊन फ़सले आहे. त्यातून पुढे काय घडू शकते? लोकसभेच्या निवडणूका लौकर म्हणजे कधी होतील?

   कर्नाटकची विधानसभा निवडणुक पुढल्या रविवारी संपते आहे. म्हणजे त्या दिवशीच तिथे मतदान व्हायचे आहे. मोजणी नंतर होईल व निकाल लागतील. त्यात भाजपाला फ़ारशी अपेक्षा नाही. कारण तिथे गेल्या खेपेस काठावरचे बहूमत भाजपाला मिळालेले होते व त्यातही पक्षाच्या अंतर्गत कलहाने पक्ष विस्कळीत झालेला आहे. दुफ़ळी होऊन येदीयुरप्पा यांनी वेगळीच चुल मांडली आहे. सहाजिकच त्याचा राजकीय लाभ कॉग्रेसला मिळणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. पण तेवढ्या भांडवलावर कॉग्रेस आणखी एक वर्ष तग धरू शकणार आहे काय? कारण लोकसभेची मुदत पुढल्या मे महिन्यापर्यंत असून त्याच्या मध्यंतरी आणखीस सहा विधानसभांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. मात्र कर्नाटकात भाजपाच्या आत्मघातकी वागण्याने कॉग्रेसला जी जिंकण्याची संधी मिळाली आहे; तशी सोय अन्य सहा विधानसभा निवडणुकीत अजिबात नाही. त्यामुळेच कर्नाटकातील अपेक्षित विजयावर स्वार होऊन लोकसभा निवडणूका मध्यावधी घेऊन कॉग्रेस मोठे नुकसान टाळायची रणनिती अवलंबणार; याची आता भाजपालाच नव्हेतर कॉग्रेसच्या मित्र पक्षांनाही खात्री वाटू लागली आहे. म्हणूनच मुलायम, मायावती यांच्याप्रमाणेच शरद पवारही मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बाकीचे सोडा खुद्द कॉग्रेसमध्येही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या आपल्या सहकार्‍यांना मध्यंतरी तशा सूचना दिल्या आणि महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही दोनच आठवड्यांपुर्वी तसे सूतोवाच केलेले होते. थोडक्यात मध्यावधी निवडणुका हे एक सत्य ठरत आहे. ‘पुण्यनगरी’च्या अनेक लेखातून मी गेले सहा महिने त्याची शक्यता वर्तवत आलेलो आहे. आता ते घडताना दिसू लागले आहे.

   राजकारण असो, की युद्ध असो, त्यात रणनितीला महत्व असते. हल्ली आपल्याकडल्या वाहिन्यांचय बातम्यांमध्ये रणनिती हा शब्द सततच्या वापराने गुळगुळीत होऊन गेला आहे. जणू रणनिती म्हणजे कुठल्या समारंभाचे आयोजन असावे, अशीच चर्चा चालते. अमुकतमूक होणार त्यात कोणाची रणनिती काय असेल, असे प्रश्न पत्रकार विचारतात व बोलणारे त्याला उत्तर देतात, तेव्हा हसू येते. कारण रणनिती ही अत्यंत गोपनीय बाब असते. ती अंमलात आणली गेल्यावर लोकांना परिणामातून जाणवते आणि तेव्हा त्या रणनितीची चर्चा होत असते. उघड केलेले डावपेच म्हणजे रणनिती नसते. त्यामुळेच मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले गेल्यापासून पुढल्या लोकसभा निवडणुकीचे रणनिती सुरू झालेली होती. निदान राहुल व मोदी अशा लढतीची तयारी सुरू झाली होती. मागल्या म्हणजे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एका पत्रकाराने मोदींना प्रश्न विचारला होता, २०१४ सालात राहुल विरुद्ध मोदी अशी लढत होईल का? तेव्हा त्याच्या प्रश्नाला बगल देत मोदी यांची सूचक उत्तर दिले होते. तिथून ते पंतप्रधान पदाच्या लढाईत उतरणार असल्याची साक्ष खरे तर मिळाली होती. पण कोणी त्याकडे फ़ारसे गांभिर्याने बघितले नाही. मोदी त्या प्रश्नावर म्हणाले होते, राहुल गांधी कधी गुजरातमधून निवडणुक लढवतील असे मला वाटत नाही. त्यांनी शब्द असे योजले, की ऐकणार्‍याला राहुल गुजरात विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत असे वाटावे. पण मोदीचा रोख वेगळाच होता. उत्तरपदेशातील आपल्या पिढीजात सुरक्षित मतदारसंघाच्या बाहेर लढायची राहुलमध्ये हिंमत आहे काय? असाच मोदी यांचा प्रतिप्रश्न होता. आणि त्याची दुसरी बाजू अशी होती, की गुजरात बाहेर निवडणुक लढवायची हिंमत करीन, तेव्हाच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असेन. आणि आता त्याचीच बातमी आलेली आहे.

   नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या शर्यतीमध्ये असतील तर त्यांनी कर्नाटकात पक्षाचा किल्ला लढवायला गेलेच पाहिजे; अशी चर्चा रंगलेली असताना हा माणूस लोकसभेची निवडणुक थेट उत्तरप्रदेशातून लढवण्याच्या तयारीला लागलेल्याची ती बातमी आहे. म्हणजे गुजरातबाहेर आपली लोकप्रियता फ़क्त गर्दी दाखवून मोदी सिद्ध करू इच्छित नाहीत. तर गुजरात बाहेर थेट लोकसभा निवडणूक लढवायची तयारी त्यांनी चालवलेली आहे. खरे म्हणजे गुजरात त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. पण त्यांनी खरेच उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथून उभे रहायचे ठरवले; तर मोठीच राजकीय धमाल उडणार आहे. त्यांना तिथे पराभूत करण्याची संधीच ते त्यांच्या विरोधकांना देणार आहेत. कारण भाजपाचे उत्तरप्रदेशात बळ कमी असे मानले जाते. राहुल-सोनियांच्या विरोधात उमेदवार मिळत नाहीत आणि बाकी राज्यात मुलायम मा्यावतींचा प्रभाव आहे. अशा राज्यात उभे रहाण्याचा विचार करणेही मोठी हिंमत आहे. पण ज्याअर्थी मुंबईच्या एका मान्यवर दैनिकात तशी बातमी आली; म्हणजेच तसा विचार नक्की सुरू आहे. आणि बातमी अशी फ़ुटली म्हणजेच खुप आधीपासून तयारी सुरू झालेली असावी. लखनौ हा वाजपेयी यांचा जुना मतदारसंघ आहे आणि भाजपाचेही त्यावर प्राबल्य राहिलेले आहे. पण मोदीसारखा वादग्रस्त उमेदवार तिथे उभा ठाकला; तर विरोधकांनाही जोर चढणार आहे. मुलायम मायावतीसह कॉग्रेसही एकजुटीने मोदींना तिथे पराभूत करायला एकत्र येऊ शकतील. पण त्याखेरीज भाजपातले मोदी विरोधकही त्यांना जाऊन मिळतील; हे विसरता कामा नये. असे पुर्वीही झालेले आहे. १९९९च्या निवडणुकीमध्ये मंत्रीमडळातून वगळले म्हणून खवळलेले जेठमलानी वाजपेयी यांना शिव्या घालायचे. त्यांना कॉग्रेसने लखनौमधून वाजपेयी विरोधात उमेदवारी दिलेली होती. इतर पक्षांनीही साथ दिली होती. असा इतिहास असतानाही मोदी जर तिथून व गुजरात बाहेर लढायचा विचार करत असतील; तर त्यांची खुप आधीपासून तयारी झालेली असावी हे मान्यच करावे लागेल.

   याची दुसरी बाजूही समजुन घ्यायला हवी आहे. १९७७ सालात उत्तरेत कॉग्रेस सर्वत्र भूईसपाट झालेली होती. अगदी रायबरेलीत इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी थेट कर्नाटकात चिकमंगळूर येथून पोटनिवडणूक लढवून संसदेत प्रवेश मिळवला होता. त्याहीनंतर १९८० सालात मध्यावधी निवडणूका झाल्या; तेव्हा उत्तरप्रदेशची खात्री नसल्याने त्यांनी आंध्रप्रदेशातील मेढक मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. रायबरेलीमध्येही त्या जिंकल्या होत्या. अगदी १९९९ सालात सोनियांनी निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली; तेव्हाही त्यांनी अमेठीसह दक्षिणेत कर्नाटकच्या सर्वात सुरक्षित अशा बेल्लारीतून लोकसभेची निवडणुक लढवली होती. या सर्वच मतदारसंघात कॉग्रेस वर्षानुवर्षे अबाधित निवडून येण्याचा इतिहास होता. लखनौमध्ये मोदी त्याची पुनरावृत्ती करणार आहेत असे दिसते. आपण फ़क्त गुजरातचे व बाहेर आपल्याला कोणी विचारत नाही; अशी जी सार्वत्रिक टीका त्यांच्यावर चालते, त्याला चोख उत्तर देण्यासाठी त्यांनी अशी रणनिती आखलेली दिसते. ज्याप्रकारे अशा बातम्या बाहेर येत आहेत, त्यामुळेच कॉग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. जर इतक्या तयारीने मोदी व भाजपा लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असतील; तर मग त्यांचे लक्ष्य एनडीए इतकेच मर्यादित नसून देशातील कॉग्रेस विरोधी मतांवर स्वार होऊन भाजपा स्वबळावर सरकार बनवण्याचे समिकरण मांडतो आहे, असाच त्याचा अर्थ होतो. आणि तशीच मोदी व भाजपाची रणनिती असेल, तर त्यांना जितका अधिक वेळ मिळेल तितके त्यांचे काम सोपे व कॉग्रेसचे काम अवघड होत जाणार आहे. म्हणूनच त्यांना रोखायचा उत्तम मार्ग म्हणजे मुदतीपुर्वीच निवडणुका उरकणे असा होतो.

   कर्नाट्कच्या निवडणुका पुढल्या आठवयात होऊन त्यात कॉग्रेसने यश मिळवले वा बहूमताने सत्ता मिळवताना भाजपाला पराभूत केले; तर त्यांना पुढल्या सहा विधानसभा निवडणुकीत लढायला उमेद नक्कीच मिळु शकेल. पण त्या पाचसहा विधानसभा जिंकण्यासारखी त्या त्या राज्यात कॉग्रेसची स्थिती नाही. उलट तिथे कॉग्रेसला सपाटून मार बसण्याचीच शक्यता आहे. उदाहरणार्थ राजस्थान व दिल्लीत कॉग्रेसची सत्ता असून त्यांच्याविषयी कमालीचा संताप लोकांत आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाची सरकारे असली, तरी त्यांच्याविषयी लोकमत फ़ारसे नाराज नाही. म्हणजेच कर्नाटकात जशी कॉग्रेसला विजयाची अपेक्षा आहे; तशी नोव्हेंबरच्या पाच राज्यातील निवडणूकीत यशाची अपेक्षा नाही. त्यातले अपयश खांद्यावर घेऊन आणि चार वर्षातल्या भ्रष्टाचाराचे ओझे घेऊन लोकसभा निवडणूक लढणेच कॉग्रेसला अशक्य आहे. त्यामुळेच कर्नाटकच्या विजयावर स्वार होऊन आणि नोव्हेंबरातील अन्य पाच राज्यातल्या अपेक्षित पराभवाआधीच लोकसभा उरकणे; कॉग्रेससाठी सुरक्षित डाव असू शकतो. म्हणूनच नोव्हेंबरात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपरिहार्य होत चालल्या आहेत. त्यात यशाची वा सत्तेची शक्यता नसली; तरी एकपक्षिय बहूमत मिळवण्याचे भाजपा व मोदींचे मनसुबे त्यातून उधळले जाऊ शकणार आहेत. भाजपाला आघाडी सरकार बनवायचे, तर मोदी हा उमेदवार नको असा प्रचार होत असताना लोकसभा उरकणे योग्य आहे. एकदा पाच विधानसभांच्या प्रचारात मोदी फ़िरले व भाजपाने विजय मिळवला; तर मोदींची राष्ट्रीय व विजयी प्रतिमा तयार होते आणि मग त्यांना हरवणे अवघड जाईल. अशी कॉग्रेसची आजची मानसिकता आहे. पुन्हा सत्ता वा यश मिळवण्याची अपेक्षा त्या पक्षाला उरलेली नाही. पण एकहाती भाजपाला सत्ता मिळू नये व फ़ारतर मित्रपक्षांच्या पाठींब्यावर भाजपाला अवलंबून रहायची पाळी यावी; असे लोकसभेतील समिकरण तयार करण्याच्या धडपडीत कॉग्रेस आहे. त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मोदी व भाजपाला निवडणुकीसाठी सवड मिळता कामा नये. आणि विधानसभेसोबत लोकसभा उरकली; तरच ती सवड मोदींना नाकारली जाऊ शकते. खुद्द मोदींनीही अशा शक्यतांची चाचपणी खुप आधीच केलेली दिसते.

   मोदींचे नाव गुजरातच्या तिसर्‍या विजयानंतर पंतप्रधान पदासाठी उघड घेतले जाऊ लागले असले; तरी त्याची तयारी त्यांनी खुप आधीपासून केलेली आहे. पक्षाबाहेरचे विरोधक आणि पक्षातील प्रतिस्पर्धी विरोधक; यांच्या चाली ओळखून त्यांनी खेळी सुरू केल्या होत्या. त्यात त्यांना सतत यश मिळतांना दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे मोदी आपल्या योजना, भूमिका वा रणनिती याबद्दल उघडपणे बोलतच नाहीत. थेट काही घडते आणि मग त्यात मोदींचा संबंध शोधण्यात पत्रकारांची तारांबळ उडालेली असते. मग ते त्यांचे अमेरिकेतील होणारे भाषण असो किंवा रद्द होणारे भाषण असो. दिल्लीच्या हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी केलेले मार्गदर्शन असो, किंवा उद्योजक महिलांनी त्यांना मार्गदर्शनासाठी दिलेले आमंत्रण असो. बंगालमध्ये उद्योजकांनी बोलावलेले असो किंवा केरळात एका मठाच्या कार्यक्रमाला त्यांनी लावलेली हजेरी असो. त्याचा माध्यमातून गवगवा होतच रहातो आणि मग त्याचे विविध अर्थ लावण्यात पत्रकार जाणकार गढून जातात. मात्र त्यापुढे मोदी काय करणार व त्यांच्या योजना काय आहेत; त्याबद्दल संपुर्ण गोपनीयता असते. याची उलट बाजू अशी, की त्यांच्याशी दोन हात करणारा कुणी नेता आज त्यांच्या पक्षात नाही, की उर्वरित पक्षांमध्ये नाही. कॉग्रेसचा उदयोन्मुख नेता म्हणून राहुल गांधींना पुढे करण्याचा प्रयास अखंड चालू आहे. पण त्यांच्याच पक्षाच्या व मातेच्या हाती देशाचा कारभार असताना अमुक काही चांगले व जनहिताचे काम केले; असे राहुल छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. एका बाजूला राहुलना देशातील युवकांचा नेता म्हणून पेश केले जात आहे. पण गेल्या दोन वर्षात पाच सात वेळा तरी दिल्लीत युवक व तरूणांचा उफ़ाळलेला प्रक्षोभ दिसला; त्याचे नेतृत्व करायला किंवा त्याला विश्वासात घ्यायला राहुल एकदाही पुढे सरसावले नाहीत. पण त्याच काळात मोदी मात्र देश तरूणांचा आहे व त्यांच्याकडूनच घडवला जाईल, अशी आश्वासक भाषा बोलून किमान नऊ कोटी नव्या मतदारांना आपल्याविषयी उत्सुक बनवू शकल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. टेलीव्हिजनने व्यापलेल्या आजच्या जमान्यात एक आठवडा असा जात नाही, की मोदींबद्दल चर्चा होत नाही.

   जसजसे हे वाढत चालले आहेत, तसतशी कॉग्रेसला मोदींची भिती सतावू लागली आहे. त्यामुळेच लोकसभा अधिक काळ चालवणे पंतप्रधानांना अशक्य होत चालले आहे. कारण दोनचार महिन्यात नवी भ्रष्टाचार वा घोटाळ्याची भानगड चव्हाट्यावर येत असते आणि त्यातून कॉग्रेसच्या मतामध्ये घट वाढतच चालली आहे. विखुरलेले विरोधी पक्ष व प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाकडे खंबीर नेत्याचा अभाव; अशा स्थितीमुळे मागली आठनऊ वर्षे कॉग्रेससाठी सोयीची गेली. शिवाय सेक्युलर व जातीयवादी अशा देखाव्यानेही काम चालू शकले. पण त्यातली जादूही आता संपली आहे. मोदी नावाचे आव्हान अकस्मात समोर येऊन उभे राहिले आहे. गुजरातच्या दंगलीबद्दल बागुलबुवा केल्याने नऊ वर्षापुर्वी भाजपाला सत्तेपासून दूर करणे सोपे झाले होते. पण दहा वषांचा काळ उलटून गेल्यावरही त्या अपप्रचाराचा अतिरेक झाला आणि आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळेच ज्याला बदनाम करून भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचा डाव खेळला गेला, तो यशस्वी झाल्यावर तो अपप्रचार थांबायला हवा होता. पण तसे झाले नाही आणि मोदी यांची बदनामी करताना संपुर्ण देशात त्यांचे नाव पोहोचवण्याची चुक होऊन गेली. त्यामुळे भाजपापासून अन्य पक्ष तोडण्यात यश मिळाले. पण मोदींच्या गुजरातमधील प्रगतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचत गेली, तसा हाच भाजपा विरुद्ध वापरलेला मोहरा भाजपासाठी राजकीय पटावर हुकूमाचा पत्ता बनून गेला आहे. कारण मोदींनी केलेल्या प्रगती व विकासाचे लोकांमध्ये आकर्षण वाढले असून त्याचीच कॉग्रेसला भिती वाटू लागली आहे. तर मोदी आपल्या विकासाचे मॉडेल भारतीयांना सांगून भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन करू लागले आहेत. परिणामी दंगलीचा विषय कालबाह्य होऊन विकासाला प्राधान्य मिळू लागले आहे. पण त्याहीपेक्षा मोदी नावाची जादू भाजपाला एकपक्षिय बहूमत मिळवून देण्याचे भय निर्माण झाले आहे. सहाजिकच सत्ता वाचवण्यापेक्षा भाजपाला स्वत:चे बहूमत मिळू नये, असा डावपेच खेळायची नामुष्की कॉग्रेसवर आलेली आहे. त्यामुळेच मध्यावधी निवडणुकांची शक्यता वाढलेली आहे. विविध मार्गाने व घटकांच्या मदतीने मोदींनी आपल्या देशव्यापी मोहिमा सुरू केल्या आहेत. वाहिन्यांवर त्यांचे थेट प्रक्षेपण लोकप्रियतेची साक्ष देते आहे. अशा वेळी त्यांना अधिक दिवस, महिने देणे म्हणजे त्यांचे काम सुकर करणे ठरेल. ती संधी मोदी व भाजपाला नाकारण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्यावधी निवडणुका एवढाच एकमेव पर्याय कॉग्रेस समोर आहे. कर्नाटकचे निकाल लागल्यावर लोकसभा बरखास्तीची म्हणूनच शक्यता आहे.

शनिवार, २० एप्रिल, २०१३

पाक सेनापतींचा पळपुटा वारसा
   भारत पाक सीमेवर काश्मिरमध्ये नियंत्रण रेषा आहे. त्याला सीमा म्हणत नाहीत. कारण पाकच्या ताब्यात जो प्रदेश आहे, तो आपलाच आहे असा भारताचा दावा आहे आणि संपुर्ण काश्मिरच आपला आहे, असा पाकिस्तानचा आग्रह आहे. त्याविषयी राष्ट्रसंघात वाद चालू आहे. त्याचा निवाडा होईपर्यंत युद्ध थांबवण्याची घोषणा झाली असताना, जी रेषा निश्चित करण्यात आली; तिला नियंत्रण रेषा म्हणतात. त्या रेषेच्या अलिकडे पलिकडे काही प्रदेश निर्जन ठेवलेला असतो. अशा भागात हेलिकॉप्टरने एक फ़ेरी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ़ यांनी मारली होती, अशी माहिती अलिकडेच उघडकीस आलेली होती. त्यासंबंधी एका भारतीय वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात मुशर्रफ़ यांनी मोठी छाती फ़ुगवून आपण तसे केल्याची ग्वाही दिली होती. तेवढेच नाही तर आपण कमांडो आहोत आणि सेनापती म्हणून आघाडीवर राहून युद्ध खेळणारे योद्धे आहोत; असेही त्यांनी सांगितले होते. पण युद्धभूमीवर लढणे सोडा, थोडा बाका प्रसंग ओढवला; तरी हा इसम ढुंगणाला पाय लावून पळ काढणारा भगोडा आहे. नुसती तोंडाची वाफ़ दवडून कोणी योद्धा वा लढवय्या होत नाही. त्यासाठी मनगटात ताकद आणि काळजात हिंमत असावी लागते. पण मुशर्रफ़ हा पाकिस्तानी सेनापती म्हणजे युद्धापेक्षा पळ काढणारा आणि लपून वार करणारा दगाबाजच असू शकतो. हे सर्वांना ठाऊक आहे आणि तशीच त्यांची ख्याती आहे. पण गुरूवारी मुशर्रफ़ यांनी कृतीतून ते जगाला सप्रमाण दाखवून दिले. हा माणूस कोर्टाने जामीन नाकारला म्हणून एखाद्या फ़डतूस गुन्हेगारासारखा तिथून अक्षरश: पळून गेला. कोर्टाने त्यांचा जामीन अज फ़ेटाळला व त्यांना अटक करावी असा आदेश पोलिसांना दिला. पण अटकेच्या भयाने आपल्या अंगरक्षकांच्या गराड्य़ात मुशर्रफ़ यांनी कोर्टातून काढता पाय घेतला आणि थेट घर गाठले. ज्याला पोलिसांच्या अटकेचे भय वाटते, तो सीमेवर युद्ध कसले करू शकणार?

   लष्कराचा प्रमुख म्हणून अनेक घातपात केलेल्या या माणसाची लायकी खरी तर आग्रा शिखर परिषदेच्या वेळीच एका भारतीय सेनापतींनी उघड केलेली होती. तेव्हाच्या टिव्हीवरील चर्चेत भाग घ्यायला भारताचे निवृत्त लेप्टनंट जनरल अफ़सर करीम यांना एका वाहिनीने चर्चेत बोलावले होते. त्यांनी मुशर्रफ़ हा माणुस भगोडा आहे लढवय्या नाही; असे ठणकावून सांगितले होते. त्याच्यात समोरासमोर लढायची हिंमत नाही, तो पाठीत वार करणारा आहे, असेही करीम म्हणाले होते. कारण काही वर्षापुर्वी सियाचेन या भारतीय हिमच्छादित प्रदेशात पाकिस्तानने घुसखोरी केली, त्याचे नेतृत्व मुशर्रफ़ यांच्याकडे होते. तेव्हा त्यांना हुसकावून लावणार्‍या भारतीय सेनेचे नेतृत्व अफ़सर करीम यांनीच केलेले होते. आपण सियाचेनमधून पळवून लावलेला हा भगोडा आहे, असे करीम ठासून सांगत होते आणि मुशर्रफ़ यांची एकूण कारकिर्द तशीच दगाबाज व पळपुटेपणाची आहे. पण त्यांचीच कशाला पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांचा इतिहास व वारसाच पळपुटेपणाचा आहे. आगावूपणा करायचा आणि मग शेपूट घालून पळायचे; हा त्यांचा बाणा आहे. तेव्हा कोर्टातून मुशर्रफ़ पळाले, तर ते आपल्या पाकिस्तानी लष्करी ‘प्रतिष्ठेला’ जागले म्हणायचे. कारण ज्या पाक सेनापतींनी आजवर लष्करी क्रांती करून सत्ता बळकावली होती, त्यांची अवस्था अशीच केविलवाणी झाल्याचा इतिहास जुनाच आहे. अयुबखान हे पाकिस्तानात लष्करी सत्ता प्रस्थापित करून लोकशाही उलथून पाडणारे पहिले सेनापती. त्यांनी दिर्घकाळ सत्ता भोगली. निवडून आलेल्या पंतप्रधान व राजकीय नेत्यांचे खुन पाडून देशातील अस्थिरता काबूत आणण्यासाठी त्यांनी सत्ता बळकावली आणि ते तहहयात सत्ताधीश होऊन बसले. पण ती सत्ता त्यांना सुखनैव चालवता आली नाही. मग त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी भारताच्या कुरापती काढण्याचा नवा पायंडा पाडला होता.

   १९६५ सालात अयुबखान यांनी भारतावर युद्ध लादले. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे निधन होऊन नवे पंतप्रधान भारतात सत्तेवर आलेले होते. त्यांना दुबळे समजून अयुबखान यांनी आगावूपणा केला. पण तो त्यांना महागात पडला. कारण बटूमुर्ती असलेले लालबहादूर शास्त्री अत्यंत कणखर नेते होते. त्यांनी खंबीरपणे आक्रमणाला उत्तर दिले आणि पाकसेनेला पळता भूई थोडी झाली. तेव्हा अयुबखान यांची त्यांच्याच देशात छीथू झाली होती. मग त्यांनी तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल याह्याखान यांच्याकडे सत्तासुत्रे देऊन देशातून पळ काढला होता. ते लंडनला जाऊन स्थायिक झाले. मग याह्याखान यांनी लोकमत शांत करण्यासाठी पाकिस्तानात पुन्हा लोकशाही आणायचे आश्वासन दिले आणि निवडणूका घेतल्या. मात्र त्यात अवामी लीग या पूर्व पाकिस्तानातील पक्षाला मोठे यश मिळाले आणि त्याच पक्षाचे बंगाली नेते शेख मुजीबूर रहमान यांना पंतप्रधान करायची वेळ आली. पण पाकिस्तान म्हणजे सिंध व पंजाबचे वर्चस्व असल्याने, देशाचे नेतृत्व बंगाल्याकडे द्यायचे याह्याखान यांनी नाकारले. बहूमत मिळवूनही मुजीबूर यांनी भुत्तो यांचे सहाय्यक म्हणून काम करावे, असा आग्रह जनरल याह्याखान यांनी धरला होता. मुजीबूर यांनी त्याला नकार दिल्यावर त्यांना अटक करून याह्याखान यांनी पुर्व पाकिस्तानात त्यांच्या पक्षाचे नेते व पाठिराखे यांच्यावर धडक कारवाई सुरू केली. त्यामुळे बंगाली जनतेने उठाव केला आणि तो चेपून काढण्यासाठी याह्याखान यांना लष्करी कारवाई करणे भाग पडले, परिणामी भारतीय हद्दीत बंगाली पाक निर्वासितांचे लोंढे येऊ लागले आणि त्याबद्दल भारताने तक्रार करताच याह्याखान यांनी थेट भारताविरुद्धच युद्ध पुकारले. त्याची परिणती अखेर पाकिस्तानच्या विभाजनात झाली. पुर्व पाकिस्तान बांगलादेश म्हणुन अस्तित्वात आला. त्या युद्धात एक लाखाहून अधिक पाक सैनिकांना ढाक्यात भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करावी लागली. त्यात दुसर्‍या पाक सेनापतीचे नाक कापले गेले. त्यामुळे ते युद्ध संपताच उरलेला पश्चिम पाकिस्तान, तेव्हा निवडून आलेले नेते झुल्फ़ीकार अली भुत्तो यांच्याकडे सोपवून याह्याखान यांनी पळ काढला. तेही अयुबखान यांच्याप्रमाणेच लंडनला पळून गेले.

   थोडक्यात पाक लष्करशहा हा युद्ध छेडतो आणि त्यात पराभूत होऊन पळ काढतो, असाच त्या देशाच्या शौर्याचा इतिहास, या सेनानींनी तयार केला. १९७२ मध्ये भुत्तो यांच्या हाती सत्ता आल्यावर त्यांना भारताशी बोलणी करणे भाग होते. कारण हरलेल्या युद्धात त्यांनी पुर्व पाकिस्तान गमावलाच होता. पण पश्चिम पाकिस्तानचा बराच मोठा प्रदेश भारतीय सेनेने व्यापला होता. शिवाय लाखभर पाक सैनिक युद्धकैदी म्हणून भारताच्या ताब्यात होते. त्यावर तडजोड करण्यासाठी पाकचे नवे नेते म्हणून भुत्तो भारतात आले व इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची शिखर बैठक सिमला येथे झाली. त्यात जो करार झाला त्याला सिमला करार म्हणून ओळखले जाते. अर्थात पाक सेनाधिकारी जितके राजकारण करतात, तितकेच पाकचे राजकीय नेतेही आत्मघातकीच असतात. भुत्तो यांनीही आपल्या मृत्यूलाच आमंत्रण देऊन देशाचा कारभार सुरू केला होता. पाक सेनेत पंजाबी सेनाधिकार्‍यांचे वर्चस्व आहे, त्यांनी दगा देऊ नये म्हणून भुत्तो यांनी त्यातल्या ज्येष्ठांना डावलून झिया उल हक नावाच्या तुलनेने तरूण अधिकार्‍याला सरसेनापती बनवले. हेतू असा, की हा अननुभवी सेनाधिकारी आपल्या आज्ञेत राहिल. पण तोच दगाबाज निघाला. त्याने पाकसेनेवर आपले प्रभूत्व प्रस्थापित करताच भुत्तो यांना दाद दिली नाही. पाक सेनेला दोन दशके सत्तेत लुडबुड करण्याची चटक लागली होती. त्यामुळेच सत्ता काबीज करायला उत्सुक असलेल्या सेनापतीला सर्व सेना एकमुखी साथ देते आणि झिया उल हक यांच्या बाबतीत तेच घडले. त्यांनी सेनेवर हुकूमत प्रस्थापित करताच, एके रात्री थेट भुत्तो यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अटक केली आणि देशाची घटनाच रद्दबातल करून लष्करी कायदा जारी केला. घटनेत अनेक बदल करून पाकिस्तानला इस्लामीक राष्ट्र म्हणून घोषित करून टाकले. आपल्या कृत्याला मान्यता मिळवण्यासाठी झियांनी धार्मिक पक्ष व संघटनांना आश्रय दिला व प्रोत्साहन दिले. राजकीय उठावाची शक्यता राहू नये म्हणून भुत्तोंवर खटले चालवून त्यांना कोर्टाकडून फ़ाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था केली आणि इस्लामी कायद्यानुसार भर चौकात देशाच्या माजी पंतप्रधानाला फ़ासावर लटकावण्यात आले. पुढे लष्कराची निर्विवाद हुकूमत प्रस्थापित झाली. योगायोग असा, की त्याच दरम्यान सोवियत युनियनने अफ़गाणिस्तानमध्ये लालफ़ौजा घुसवून तो देश बळकावला होता आणि रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने अफ़गाण बंडखोरांना मदत करण्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली. त्यामुळेच मग झिया उल हक यांच्या लष्करशाहीला मान्यता मिळत गेली.

   अमेरिकेने देऊ केलेल्या खास लढावू विमानाच्या चाचणीसाठी झिया व अन्य सर्वच प्रमुख पाक सेनाधिकारी गेले असताना; त्याच विमानाला भीषण अपघात होऊन एका फ़टक्यात सगळेचे वरिष्ठ पाक जनरल मारले गेले. एकमेव सेनाधिकारी शिल्लक राहिले होते, त्यांनी मग पुन्हा निवडणुका घेऊन पाकिस्तानात लोकशाही प्रस्थापित करण्यास मंजुरी दिली. असा पाकिस्तानचा लोकशाही व लष्करशाहीचा इतिहास आहे. पहिले दोन लष्करशहा देश सोडून पळून गेले, तर तिसरा आपल्या विश्वासातील सर्वच सेनाधिकार्‍यांसह शंकास्पद अपघातात मारला गेला. त्यामुळे मग काही काळ पाकिस्तानात लोकशाही येऊ शकली. पित्याच्या हत्येनंतर देश सोडून परागंदा झालेल्या बेनझीर भुत्तो झियांच्या मृत्यूनंतरच मायदेशी परतल्या व निवडणुका जिंकून पंतप्रधान झाल्या. पुढल्या काही काळात लष्करातले अनुभवी व जाणते अधिकारीच शिल्लक नव्हते. म्हणून राजकीय नेत्यांच्या हाती कारभार राहू शकला. तरीही लष्कराचा राजकारणावरचा प्रभाव संपला नव्हता. नवाज शरीफ़ हा मुळात झियांच्या आशीर्वादाने नेता झालेला माणूस. बेनझीर भुत्तो यांच्या कारकिर्दीला लष्करी शह देऊन शरीफ़ यांनी मध्यावधी निवडणुका घ्यायची वेळ आणली. मग त्यांच्या हाती सत्ता आल्यावर पुन्हा बेनझीरला पळ काढावा लागला होता. आलटून पालटून शरीफ़ व बेनझीर दोनदा पंतप्रधान झाले. पण दुसर्‍यांदा पंतप्रधान झालेल्या शरीफ़ यांनी आपली सत्ता बळकट करण्यासाठी लष्कराला हाताशी धरण्याची जी चुक केली; तीच त्यांना महागात पडली. जी चुक झुल्फ़ीकार अली भुत्तो यांनी केली होती, तीच नवाज शरीफ़ यांनी केली. वरीष्ठ व अनुभवी अधिकारी डावलून मुशर्रफ़ यांना सेनापती नेमण्याची चुक त्यांना भारी पडली. झिया यांच्याप्रमाणेच मग मुशर्रफ़ यांनीही संधी देणार्‍या नेत्याचाच बळी घेतला.

   शरीफ़ यांनी आपल्या कारकिर्दीत भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयास केला त्याला भारतातील नवे पंतप्रधान वाजपेयी यांनीही साथ दिली होती. पण भारत पाक संबंध सुधारले, तर पाकिस्तानातील लष्कराची महत्ता संपुष्टात येते. तिथे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता व सुरक्षेचा मुखवटा लावून लष्कराने राजकीय हस्तक्षेप केलेला आहे. भारताविषयीचा भयगंड हेच पाक सेनेसाठी नेहमी भांडवल राहिले आहे. त्यामुळेच शरीफ़ यांच्या भारत मैत्रीचे प्रयास मुशर्रफ़ यांना खटकणारे होते. म्हणूनच त्यांनी त्यात ठरवून पाचर मारण्याचा पवित्रा घेतला. दिल्ली-लाहोर बससेवा सुरू झाली व वाजपेयी त्याच बसने पाकिस्तानात गेले; तर त्यांच्या स्वागताला हजर रहाण्याचा शिष्टाचारही मुशर्रफ़ यांनी पाळला नव्हता. लाहोर जाहिरनाम्याला सुरुंग लावण्यासाठी त्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी करून युद्धाची स्थिती निर्माण केली. पण अमेरिकेच्या दडपणामुळे त्यातही पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. तेव्हाच कुठे शरीफ़ना आपली चुक ध्यानात आली. त्यांनी मुशर्रफ़ यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला खुप उशीर झाला होता. श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेले मुशर्रफ़ मायदेशी परत येत असताना त्यांच्या विमानाला पाकिस्तानात उतरण्याची परवानगी शरीफ़ यांच्या सरकारने नाकारली. पण तोही डाव त्यांच्यावर उलटला. मुशर्रफ़ यांनी अशा प्रसंगाची तयारी आधीच करून ठेवलेली होती. शरीफ़ यांचे आदेश विमानतळाचे अधिकारी पाळत असताना आयएसआय व पाक लष्करातील एका गटाने चाल करून पंतप्रधानालाच अटक केली आणि मुशर्रफ़ पाकिस्तानात परतले. तात्काळ त्यांनी आणिबाणी घोषित करून स्वत:ला लष्करी प्रशासक म्हणून घोषित केले आणि देशाची घटना व न्यायालयांचे अधिकार रद्दबातल केले. खुद्द देशाच्या पंतप्रधानावरच देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याच्या तमाम कुटुंबिय व नातलगांना अटक करण्यात आली. एकूण शरीफ़ही भुत्तोंच्या मार्गाने फ़ासावर लटकणार; अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण सौदी अरेबियाने हस्तक्षेप करून शरीफ़ यांना तिकडे पाठवून देण्याचा प्रस्ताव दिला म्हणून ते वाचले. त्यांची सर्व संपत्ती जप्त करून  अंगावरच्या वस्त्रानिशी शरीफ़ कुटुंबियांना सौदीला जाण्याची मुभा मुशर्रफ़ यांनी दिली.

   जगभर त्यांचा निषेध झाला. पण राजकारण हा अत्यंत सोयीचा तत्वशून्य व्यवहार असतो. म्हणूनच सोयीचे असेल तेव्हा हुकूमशाहीला मान्यता मिळते आणि गैरसोयीचे असेल तेव्हा मोदीसारख्या लोकशाहीचे पालन करणार्‍यालाही हुकूमशहा ठरवले जात असते. योगायोगाने मुशर्रफ़नी सत्ता बळकावल्यावर अमेरिकेतील घातपाताची घटना घडली व अफ़गाणीस्तानला धडा शिकवण्यासाठी करायच्या युद्धात अमेरिकेला पाकिस्तानच्या मदतीची गरज भासू लागली. तेव्हा निमूटपणे मुशर्रफ़ यांच्या अन्याय्य सत्तेला अमेरिकेने व उर्वरित जगाने मान्यता दिली. तेव्हा आपणही जिहादी दहशतवादाचे विरोधक असल्याचे सिद्ध करून जगाची मान्यता आपल्या अवैध सत्तेला मिळवण्यासाठी मुशर्रफ़ हिरीरीने पुढे आले. पण प्रत्यक्षात तेव्हाही या भित्र्या पळपुट्या सेनापतीने शरणागती कशी पत्करली त्याची कबुली स्वत:च नंतर दिली. एकूण हा असा पळपुटा सेनापती आहे. पण जगाचे राजकारणाच सोयीचे व मतलबी असल्याने मुशर्रफ़ याच्यासारखे पळपुटे व भामटेही कसे यशस्वी होऊ शकतात त्याचा हा इतिहास आहे. तत्वाच्या व नितीमत्तेच्या आहारी गेलेल्या अतिशहाण्यांचा आपापल्या डावपेचात बदमाश लोक किती धुर्तपणे वापर करून घेतात व तत्वांनाच हरताळ फ़ासला जातो; त्याचा मुशर्रफ़ हा जीताजागता दाखला आहे. त्याने आपल्या देशातीलच नव्हेतर जगभरच्या राजकारणातील दिग्गजांना त्यांच्या अहंमन्यता व तात्विक अट्टाहासाच्या जाळ्यात अडकवून आपले दुष्ट हेतू कसे साध्य करून घेतले, त्याचा हा पुरावा आहे. साधूसंतालाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या जमान्यात युक्तीवाद व बुद्धीवादाचा इतका अतिरेक होतो, की त्यातून मग असे बदमाश भामटे आपली पोळी सहज भाजून घेतात आणि तेही स्वत:ला तत्वांचे पूजक समजणार्‍यांकडून.

   आज कोर्टाने साधा अटकेचा आदेश दिल्यावर चार दिवस गजाआड बसायची वेळ येईल, म्हणून भित्री भागूबाई होऊन पळ काढणारा हाच माणुस काही दिवसांपुर्वीच आपण कारगिलमध्ये किती मोठा पराक्रम केला, असे छाती फ़ुगवून सांगत होता. कारगिल हा आपला पराक्रम होता असे एका वाहिनीला मुलाखत देऊन सांगणार्‍या या पाक सेनापतीचा तोच पराक्रम आता कुठे बिळात दडी मारून बसला आहे? सामान्य लोकांना धर्माच्या नावाने चिथावण्या देऊन जिहादी व घातपाती बनवायचे व त्यांना शत्रूच्या तोंडी द्यायचे; ह्याला असे बदमाश स्वत:चा पराक्रम मानतात व शहाण्यांच्या ते असत्य गळी मारतात. प्रत्यक्षात कारगिलमध्ये पाक सैनिकांना मुजाहिदीन बनवून घुसवण्याचे पाप याच मुशर्रफ़नी केले होते आणि जेव्हा ते पाक सैनिक मारले गेले; तेव्हा त्यांचे मृतदेह घ्यायलाही हा माणूस तयार झाला नाही. त्यामुळे त्यांना बेवारस असल्याप्रमाणे अज्ञात स्थळी गाडावे लागले. हीच पाकिस्तानची नितीमत्ता राहिली आहे. मुंबई हल्ल्यातले जिहादी मारले गेल्यावर त्यांचेही मृतदेह स्विकारण्यास नकार देणारे हे शूरवीर सेनपती व राज्यकर्ते जोवर पाकिस्तानी लोकांना धर्माच्या नावावर खेळवू शकणार आहेत; तोपर्यंत पकिस्तानी जनतेला भवितव्य असणार नाही. पळपुट्या नेत्यांकडून देशाची उभारणी होत नसते हे पाकिस्तानी जनतेला जेव्हा कळेल; तेव्हाच त्यांची अशा नेत्यांपासून मुक्तता होऊ शकेल.

   एकूण काय तर मुशर्रफ़ यांनी त्यांच्या म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्ते व सेनापतींच्या पळपुटेपणाचा जो सहा दशकांचा वारसा आहे, तो उत्तम रितीने जपला आहे. पुढे चालू ठेवला आहे. युद्धाच्या व शौर्याचा बाता मारायच्या आणि संघर्षाची वा लढायची वेळ आली, मग मात्र ढुंगणाला पाय लावून पळ काढायचा. पन्नास वर्षापुर्वी जनरल अयुब खान यांनी जो पायंडा पाडला, तोच वारसा याह्याखान यांनी जपला आणि कालचे पाक सेनाप्रमुख मुशर्रफ़ त्याचेच अनुकरण करीत कोर्टातून पळाले आहेत. अशा देशाला व तिथल्या समाजाला कुठले भवितव्य नसते, की भविष्यकाळ नसतो. म्हणूनच आजच्या एकविसाव्या शतकातही पाक जनतेला विचारापेक्षा धर्माच्या व दैववादाच्या आधारावरच जगावे लागत आहे. दिशाभूल करणारे व त्यांचीच लूट करणारे नेते व शासन त्यांच्या वाट्याला आलेले आहे.

शनिवार, १३ एप्रिल, २०१३

इमारत कोसळून न्याय गाडला गेला
   ठाणे कल्याण दरम्यान एक सहासात मजली इमारत कोसळून पाऊणशे लोक त्यात गाडले गेले व प्राणाला मुकले, तेव्हा आपल्याला खडबडून जाग आलेली आहे. आपल्याला म्हणजे आपल्या सरकारला. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन शेकडो अशा बेकायदा व अनधिकृत धोकादायक इमारती जमीनदोस्त करायचे काम हाती घेतले आहे. त्यातून आपले सत्ताधारी काय सिद्ध करू पहात आहेत? ते अत्यंत कार्यक्षम आहेत आणि कायद्याला धाब्यावर बसवणारे कुठलेही कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही; असाच देखावा त्यातून उभा केला जात आहे. पण त्या देखाव्याच्या आड पाऊणशे निरपराधांचे जीव हकनाक गेले, हे सत्य दडपण्याचा प्रयास चालू नाही काय? जे काम आज युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात धरपकड चालू आहे; तो सुद्धा देखावाचा नाही काय? जणू असे काही बेकायदा होते आहे, त्याची खबरबात कोणालाच नव्हती; असे नाटक चाललेले नाही काय? याला नाटक एवढ्यासाठीच म्हणायचे, की ठाणे पालिकेच वरीष्ठ आधिकारी असलेल्यांनी या परिसरात काही हजार इमारती अशाच बेकायदा व अनधिकृत असल्याचे सांगितले आहे. त्या विधानाचा अर्थ काय होतो? ही काही नवी माहिती आहे? तो अधिकारी त्या विधानातून आपण व प्रशासन किती निष्क्रिय व नाकर्ते आहोत, त्याचा कबुलीजबाब देतो आहे. पण कोणी अजून तरी त्याला त्याबद्दल जाब विचारल्याचे माझ्या् तरी ऐकीवात नाही. इतक्या इमारती अनधिकृत व बेकायदा आहेत, तर त्या बांधाल्या गेल्याच कशा आणि त्यांचे बांधकाम चालू असताना हा अधिकारी वा त्याचे प्रशासकीय कर्मचारी काय करत होते? असे बांधकाम रोखणे व कुठलेही बांधकाम सुरक्षित होऊ देणे; हीच त्यांची जबाबदारी आहे व त्यासाठीच त्यांना वेतन मिळत असते ना? मग इतक्या इमारती बेकायदा असल्याचे उजळमाथ्याने सांगणे, हा गुन्हाच नाही काय? आणि असे सांगतांना त्याच्यासह इतरांना लाज कशी वाटत नाही?  

   आपल्यापाशी अधिकार आहे हीच आपली प्रतिष्ठा असते. त्या अधिकाराला कोणी जुमानत नसेल वा त्याचे उल्लंघन करून त्यावर मात करत असेल, तर ती शरमेची गोष्ट असते. ती निव्वळ माहिती नसते. जेव्हा बापच आपल्या मुलीवर किंवा घरातल्या महिलेवर कोणी बलात्कार केल्याचे माहिती द्यावी त्याप्रमाणे बोलतो; तेव्हा ती अत्यंत शरमेची गोष्ट असते. इथे काही अधिकार्‍यांकडे शहरातल्या इमारत बांधणीच्या सुरक्षेचे व नियंत्रणाचे काम व अधिकार आहेत आणि कोणी त्याला न जुमानता इतक्या इमारती बांधल्याचे म्हणतो; तेव्हा तो आपला नाकर्तेपणाच कबूल करत असतो. जे काम थोपवण्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे, ते काम इतक्या मोठ्या प्रमाणात राजरोस झाल्याची कबूली म्हणूनच भीषण गुन्हा आहे. अशा रितीने नियमबाह्य व असुरक्षित बांधकाम केल्यास तिथे वास्तव्य करणार्‍या नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, त्यातून एकुणच नागरी जीवनात व्यत्यय येऊ शकतात. म्हणूनच नागरी बांधकामाचे काही नियम व कायदे केलेले आहेत. त्याचे पालन व अंमलबजावणी होण्यासाठी यंत्रणा व प्रशासन उभे केलेले आहे. त्याला अनेक अधिकार दिलेले आहेत. पण त्याचा कुठलाही वापर केला गेलेला नाही. उलट तेच नियम व कायदे गुंडाळून मनमानी करण्याची किंमत हे राखणदार वसूल करत बसले, असेच धरपकडीतून दिसून येते आहे. याचे अनेक अर्थ होतात. त्यातला एक भाग आपण उचलून धरतो आणि बाकीच्या प्रश्नांकडे काणाडोळा करतो. भ्रष्टाचार ही नवी गोष्ट नाही. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट आहे; ती भ्रष्टाचारासाठीच कायदे, नियम व निर्बंध आणण्याची. कायद्याचे राज्य उध्वस्त करण्यासाठीच कायद्याचे राखणदार, अंमलदार व कायद्याचे जनक होण्याची ही प्रक्रिया अधिक घातक झालेली आहे. खरे तर आजच्या भारतीय नागरी जीवनाला भेडसावणारे सर्वच प्रश्न नेमक्या त्याच समस्येतून उदभवलेले दिसतील.

   ठाण्याचा विषय थोडा बाजूला ठेवून एक सांगा; या देशात जे शेकडो कायदे व नियम, निर्बंध आहेत; त्यापैकी कितीचे काटेकोर पालन होत असते? त्याचे तसे कठोर पालन व्हावे यासाठी कितीशी पुरक यंत्रणा आपल्याकडे सज्ज आहे? बारकाईने बघितले तर बहुतांश असे कायदे व नियम आढळतील की ते राबवण्याची यंत्रणा व सज्जताच आपल्यापाशी नाही. सहाजिकच मग असे कायदे हे; त्याच्या अंमलदाराच्या हातातले खेळणे होऊन बसले आहेत. त्यांना हवे तेव्हा व हवे तसा त्याचा अंमल होत असतो आणि त्यांना नको असेल तर तेच नियम कायदे गुंडाळून ठेवले जातात. म्हणजेच देशातले बहुतांश कायदे हे त्या त्या अधिकारावर असलेल्या व्यक्ती वा अंमलदारासाठीचा एक स्वेच्छाधिकार होऊन गेलेला आहे. त्या कायद्याची मोडतोड व पायमल्ली होताना निमूट बघत बसण्याचे, जे स्वातंत्र्य त्या व्यक्ती वा अधिकार्‍याला मिळालेले आहे; त्यातून ही दयनीय अवस्था आलेली आहे. प्रत्येक कायद्याच्या अंमलासाठी कुठलीच सक्ती नाही. म्हणजे असे, की त्या त्या कायद्यानुसार तो तो अधिकारी वागत नसेल; तर त्याच्यावर त्यासाठी तुम्हीआम्ही तशी सक्ती करू शकत नाही. इथेच ठाण्यातली गोष्ट घ्या. त्या वनखात्याच्या जमीनीवर बेकायदा बांधकाम होते, म्हणून पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले होते. पण त्याची अंमलबजावणी करायला गेलेल्या अधिकार्‍यांना धमकावण्यात आले. त्यांनी राज्याच्या वरिष्ठ सचिवांकडे तक्रार करून दाद मागितली. पण मंत्रालयात त्याची कोणी दाददिर्याद घेतली नाही. एका अधिकार्‍याने कर्तव्य बजावण्याचा प्रयास केल्यास, त्याला संरक्षण मिळत नाही आणि बाकीचे कर्तव्यालाच हरताळ फ़ासून लाचखोरी करतात. अशावेळी काय करायचे? मुळात अशा बेकायदा कामात संबंधितांनी लक्षच घातले नाही, तेव्हा कोणा नागरिकाने कोर्टात जाऊन दाद मागितली. हीच मुळात नाकर्तेपणाची साक्ष होती.  

   सवाल इतकाच, की कायदा हे शब्द व अक्षरे असतात. ते स्वत: कार्यरत होत नाहीत. त्यांना कोणीतरी कार्यरत करावे लागते. त्यांनीच तिकडे पाठ फ़िरवली, मग काय करायचे? त्या कोर्टात गेलेल्या नागरिकाने आपले पैसे व वेळ त्यासाठी खर्ची घातला. प्रत्येक नागरिकाला ते शक्य नसते. मग बहुसंख्य नागरिक गुन्हा व बेकायदा कृत्य दिसले, तरी तिकडे पाठ फ़िरवतात. पण समजा त्यांनीच तिथल्या तिथे हस्तक्षेप करायचा ठरवला तर? म्हणजे कायदा मोडण्याचे जे पाप चालू आहे; ते रोखण्यात सामान्य नागरिकाने पुढाकार घेतला तर काय होईल? कायदा मोडणारा मस्तवाल असतो, तो कायदा सांगायला गेल्यास निमूट ऐकणार नाही. म्हणजेच प्रसंग हातघाईवर येणार. असा गुंड गुन्हेगार एकटा नसतो आणि समंजसही नसतो. म्हणजेच प्रसंग हातघाईवर येणार. हाणामारीचा प्रसंग येणार. त्याची कायद्याच्या राज्यात कशी दखल घेतली जाते? ‘दोन गटात दंगल’ अशा बातम्या आपण ऐकतो ना? त्यातल्या बहुतांश दंगली अशाच स्वरूपाच्या असतात. एक गट बेछूटपणे कायदा धाब्यावर बसवत असतो आणि त्याकडे कायद्याचे रक्षक पाठ फ़िरवत असल्याने नागरिकांना असह्य होऊन ते स्वत:च ‘कायद्याचा अंमल’ करायला पुढे सरसावतात. मग त्यांनी कायदा हाती घेतला म्हणून त्यांनाही गुन्हेगार ठरवले जाते. कशी गंमत आहे बघा. ज्यांच्या हातात कायदा दिलेला आहे व त्याचा वापर करून जनसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे; तेच कायद्याचा वापर योग्य प्रसंगी करणार नाहीत. आणि आपल्याला त्रास होतो किंवा धोका आहे म्हणून सामान्य माणसाने स्वसंरक्षणार्थ ‘कायदेशीर’ कृत्य केले; तरी तो गुन्हाच मानला जाणार. म्हणजेच कायदा मोडणार्‍या रोखणेही आपल्या देशात गुन्हाच असेल तर गुन्हे संपायचे कसे?

   ठाण्याच्या त्या इमारतीचाच विषय घ्या. तिथे दिडदोन महिन्यात अशी इमारत उभी रहाते व वनखात्याच्या जमीनीवर अतीक्रमण करून उभी रहाते; याची अनेक नागरिकांना जाणीव होती. त्यांनी संबंधितांचे लक्ष तिकडे वेधलेले होते. पण ज्यांच्या हाती कायद्याचे अधिकार होते, त्यांनी वेळीच त्यात हस्तक्षेप केला असता तर पाऊणशे लोकांचे जीव वाचले असते. त्यांनी ते काम केले नाही. पण समजा त्यांच्या नाकर्तेपणानंतर त्याच नागरिकांनी एकत्र येऊन स्वत: ती इमारत व तिचे बांधकाम थोपवण्यात पुढाकार घेतला असता तर? त्यातून हाणामारी झाली असती, पण निदान गवगवा होऊन पुढला प्रसंग टाळला गेलाच असता. मारले गेले त्यांचे जीव बचावले असते. कारण अशा हाणामारीने त्या बेकायदा धोकादायक बांधकामाकडे जगाचे लक्ष वेधले गेले असते आणि काम ठप्प झाले असते. पण त्यासाठी शेदोनशे नागरिकांना स्वत: सत्कार्य केल्याबद्दल पोलिस केसेस लावून घेण्य़ाची किंमत मोजावी लागली असती. मात्र ज्यांनी हाती अधिकार असताना असे बांधकाम होऊ दिले होते, ते मोकाट राहिले असते. असे आपल्या देशातील कायद्याचे राज्य आहे. जिथे कायदे मोडण्यासाठी व धाब्यावर बसवण्यासाठीच कायद्याचे अंमलदार वा सत्ताधारी व्हायचे असते. त्यासाठीच निवडून यायचे असते. कुठला तरी अधिकार मिळवायचा असतो. अधिकार हाती आला, मग तुम्हाला गुन्हे करण्याचे वा गुन्हे माफ़ करण्याची दैवीशक्ती प्राप्त होते. आयन रॅन्ड नावाची प्रसिद्ध इंग्रजी लेखिका व विचारवंत होती. तिने या विषयात नेमके दुखण्यावर बोट ठेवलेले आहे. ती म्हणते,

   ‘गुन्हेगारीला वेसण घालणे व गुन्हे करणार्‍यांना शासन देणे; इतकेच समाजात सरकार नामक संस्थेचे मर्यादित कर्तव्य असते. पण समाजात मुठभऱच गुंड वा गुन्हेगार असतात. म्हणूनच सरकारला फ़ारसे काम नसते आणि म्हणूनच सरकारचे समाज जीवनातील महत्वही फ़ार मोठे नसते. मग सरकार आपले महत्व व काम वाढवण्यासाठी असे चमत्कारिक कायदे बनवते, की त्याचे पालन अशक्य होऊन अधिकाधिक लोकांना कायदा मोडावाच लागतो. त्यातून गुन्हे व गुन्हेगारांची संख्या वाढते व सरकारचे काम वाढते. त्यातून सरकारची लोकांच्या जीवनातील हस्तक्षेप व ढवळाढवळ वाढते. अधिकार वाढतो. म्हणून सत्ता नेहमी गुन्हे रोखण्य़ापेक्षा गुन्हेगारीलाच प्रोत्साहन देत असते. आपली हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी समाजाला अपराधी मानसिकतेमध्ये गुंतवण्याचा प्रयास सत्ताधारी करतात.’

   आता ठाण्याच्याच विषयात घ्या. लोकांनी स्वत:च पुढाकार घेऊन बेकायदा बांधकाम थांबवण्याचे काम केले असते तर तो गुन्हा कशाला मानायचा? कायद्याच्या अंमलबजावणीची अधिकार्‍यावर सक्ती करायचा जनतेला अधिकार का नसावा? किती अजब गोष्ट आहे ना? कायद्याचे राज्य आहे म्हणायचे आणि कायद्याच्या सक्तीचा हट्ट मात्र असता कामा नये. हीच आजची खरी समस्या आहे. अण्णा हजारे उपोषणाला बसल्याने दिल्लीत अराजक माजेल म्हणून त्यांना आधीच अटक करणारे पोलिस; तिथे नित्यनेमाने बलात्कार होतात, अशा संशयितांकडे वळूनही बघायला तयार नसतात. याला गुन्हेगारीला संरक्षण नाही तर काय म्हणायचे? कोणी आपल्याच जमीनीवर घर वा बांधकाम करणार असेल, तर त्याने पालिका व सरकारच्या विविध खात्यांची परवानगी घेतली पाहिजे वा तसे नकाशे आधी सादर करून मंजुरी घेतली पाहिजे. पण जो कोणी यातले काहीच पाळत नाही, त्याला काहीही करायला मोकाट रान आहे? जो शक्य तेवढे सर्व नियम पाळायचा प्रयास करतो, त्याचे काम मार्गी लागू शकत नाही. पण जो सर्वच नियम मोडण्याची हिंमत बाळगतो, त्याला कुठेही कसली अडचण येत नाही. आणि असे नियम मोडणार्‍याला सर्वच पातळीवर संरक्षंण मिळत असते. उल्हासनगर भागात हजारो अनधिकृत इमारती बांधलेल्या होत्या, त्या पाडून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते. मग सरकारने त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा बनवून त्या बेकायदा कृत्यालाच कायदेशीर करून टाकले. ह्याला आपल्याकडे कायद्याचे राज्य म्हणतात. तिथे असे होऊ शकले म्हणून मग अन्यत्र अशा बेकायदा अनधिकृत बांधकामांचे पेव फ़ुटले तर नवल नाही.

   सवाल त्या उल्हासनगरच्या रहिवाशांची समस्या सोडवण्याचा म्हणून कायदा करण्यात आला, हे सहानुभूती म्हणून मान्य करू. पण तशा बेकायदा बांधकामे करणार्‍यांना, त्यांच्याकडून पैसे उकळून ते गुन्हे करू देणार्‍यांना सहानुभूती कशाला दाखवली गेली? त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात आली? ती कारवाई होत नाही, तेव्हा अन्यत्रच्या अधिकार्‍यांना अशा बेकायदा बांधकामे व कृत्यांना संरक्षण देऊन पैसे कमावण्यालाच प्रोत्साहन दिले जात असते. सर्वच महानगरे व वाढत्या शहरीकरणाच्या क्षेत्रामध्ये अशा बेकायदा व धोकादायक बांधकामांचे त्यामुळेच पेव फ़ुटलेले आहे. आज बेकायदा बांधायचे आणि कायदेशीर करायला तिथे रहिवासी आणून सहानुभूतीचा विषय बनवायचा; हे त्यामागचे तंत्र झालेले आहे. पण जे काही कोणाला करायचे आहे, त्यासाठी मोकाट रान आहे. आणि जे काही कराल तो गुन्हाच असतो. असे गुन्हे तुम्ही केल्याशिवाय जगू शकत नाही आणि गुन्हे करत असल्याने लाच दिल्याखेरीज तुमची सुटका नाही. एकूणच कायद्याचे राज्य असा सभ्यपणे जगणार्‍यासाठी सापळा बनलेला आहे. ही समस्या जबाबदारी शिवाय मिळणार्‍या अधिकारातून आलेली आहे. सत्ताधार्‍यांपासून कुठल्याही क्षेत्रात बघा, तुम्ही अधिकार प्राप्त केला, मग बेजबाबदार वागायला मोकळे असता. तुम्हाला कोणी कसला जाब विचारू शकत नाही. पण हाती असलेल्या अधिकाराचा मनाला येईल तसा बेछूट वापर मात्र करू शकत असता. ठाण्यासारखे लाचार लोक अशाच अनधिकृत इमारतीमध्ये वास्तव्य करून राहिले, मग त्यांचे जीवन कायमचे अधांतरी टांगलेले रहाते, त्यांना कुठल्या ना कुठल्या नियम कायद्याच्या आधारे नोटिसा पाठवून गांजवता येते आणि मग त्यातून त्यांना दिलासा देणारे प्रेषित उभे रहात असतात. त्या प्रेषितांना अशा गांजलेल्यांचे हुकूमी मतांचे गठ्ठे आपल्या राजकीय जुगारात वापरता येत असतात. ठाण्याचा अनुभव वेगळा आहे काय?

   ज्या परिसरात हजारो बेकायदा इमारती उभ्या आहेत, तिथले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या बेकायदा इमारतीच्या रहिवाश्यांच्या डोक्यावरचे छप्पर जाऊ नये म्हणून ‘प्राण पणाला लावायची’ गर्जना केलेली आहे. त्यांना खरोखरच गरीब रहिवाश्यांच्या डोक्यावरच्या छप्पराची इतकी चिंता आहे काय? कारण डोक्यावर छप्पर म्हणजे सुरक्षित जीवन असा अर्थ होतो. आणि आज त्या बेकायदा इमारतीमध्ये वास्तव्य करणार्‍यांच्या डोक्यावर छप्पर म्हणून जो ढिसाळ बांधकामाचा ढिगारा उभा आहे; तो अत्यंत असुरक्षित असून त्यात त्याच रहिवाश्यांचे प्राण पणास लागलेले आहेत. कुठल्याही क्षणी अशी छप्परे टांगलेल्या तलवारीप्रमाणे कोसळून जीव घेतील अशी स्थिती आहे. त्याचा अर्थ इतकाच, की आव्हाड यांचे प्राण पणास लागलेले नसून त्या रहिवाश्यांचे प्राण आव्हाड यांनी पणास लावलेले आहेत. आणि दुसर्‍यांच्या, गरीबांच्या जीवावर आव्हाड इतके उदार कशाला झाले आहेत? तर त्यांच्या आमदारकीसाठी हेच असुरक्षित रहिवासी हुकूमी मतदार आहेत. आपला जीव कधीही धोक्यात आणणारे अनधिकृत बांधकामाचे छप्पर वाचवणारा आमदार; अशी ही बाब आहे. म्हणजेच कधीही इमारत कोसळून मरायची हमी देण्याच्या बदल्यात आव्हाड त्या रहिवाश्यांचे प्राण पणाला लावत आहेत. मात्र भाषा कशी उलटी आहे बघा. ऐकणार्‍याला आव्हाड त्यागी वाटतील. पण प्रत्यक्षात त्यांच्या आमदारकी व मतांसाठी त्या भोळ्या रहिवाश्यांचे प्राण पणाला लावले जात आहेत. अशी एकूण राजकीय, प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणेची स्थिती आहे. सामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्यालाच व त्याच्या दु:खाशी पोरखेळ करण्याला कारभार म्हटले जात आहे. आपण तिर्‍हाईतासारखे तिकडे बघत आहोत. ठाण्यात मेले-मारले गेले किंवा उद्या मरतील; ते सुपातले आहेत. आपण जात्यातले म्हणून स्वत:ला अत्यंत सुखरूप समजून खुश आहोत.

   ब्रिटीशांनी इथल्या रयतेला शिस्त लावण्यासाठी व गुलामी निमूट स्विकारण्यासाठी जी कायद्याची प्रणाली उभारली व राबवली; तीच आपण स्वातंत्र्योत्तर काळात जशीच्यातशी स्विकारली. त्यात नागरिकाला सबळ व स्वतंत्र करण्यासाठी आवश्यक बदल केले नाहीत, की नवे कायदे केले नाहीत. त्यामुळे ब्रिटिश जाऊन आपल्याला स्थानिक राज्यकर्ते गुलामासारखे वागवत असतात. आणि त्यालाच कायद्याचे राज्य वा न्याय समजायची आपल्यावर सक्ती आहे. दर पाच वर्षांनी आपल्यावर कोणी हुकूमत गाजवावी किंवा कोणी आपल्याला छळावे, नाडावे, त्याची निवड करायचे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे. कालपर्यंत आपल्या न्यायासाठी आवेशात बोलणारा, आज सत्ता हाती आल्यावर तसाच अन्याय आपल्यावर करत असतो. बदल होतो तो गुन्हे करू शकणार्‍यांच्या स्वातंत्र्यामध्ये. दोन वर्षापुर्वी बंगालमध्ये ममता बानर्जी जी भाषा बोलत होत्या, तीच आज तिथले मार्क्सवादी बोलत आहेत. तर त्याच डाव्यांच्या भाषेत ममता बानर्जींचे अनुयायी बोलत व वागत आहेत ना? मग बदल कशात झाला? सामान्य माणसाच्या न्यायाची भाषा निव्वळ देखावाच नाही काय? बदल सरकार, राज्यकर्ते वा पक्ष व नेत्यांमध्ये होऊन काहीही साध्य होणार नाही. जो कोणी कायद्यांसह त्यांच्या अंमलबजावणीची प्रणाली बदलण्यास तयार असेल व न्यायाधिष्ठीत कायद्यातून सामान्य नागरिकाला सबळ करायची हमी देत असेल, त्याच्या हाती सत्ता दिली; तरच यातून सुटका आहे. अन्यथा अन्याय तसाच राहिल. केवळ अन्याय करणारे बदलतील.

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

राहुल विरुद्ध मोदी आखाड्याची नांदी
   एकाच आठवड्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. भाजपाने आपल्या संसदीय मंडळात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्थान देऊन त्यांना राष्ट्रीय नेतृत्वात सहभागी केल्याची घोषणा केली आहे आणि नेमक्या त्याच मुहूर्तावर कर्नाटकातील विधानसभांच्या निवडाणूका जाहिर झाल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा म्हणजे सार्वत्रिक निवडणुकात राहुल विरुद्ध मोदी; असे समिकरण आकार घेऊ लागले आहे. तसे पाहिल्यास दोन्ही प्रमुख पक्ष आपल्या या नेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करायला कचरत आहेत. अतिशय जपून एक एक पाऊल टाकले जात आहे. त्याचेही कारण आहे. मोदी दंगलीच्या आरोपांना मागे टाकून, आता कुठे विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊ शकले आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दणदणित पराभवाची चव चाखल्यावर त्या धक्क्यातून आता कुठे बाहेर पडत आहेत. त्यामुळेच दोन्ही नेते व दोन्ही पक्ष सावधपणे आपल्या खेळी खेळत आहेत. पण नावे जाहिर करण्याचा सोपस्कार सोडला; तर दोन्हीकडल्या हालचाली त्याच दोन नावांना पुढे आणायच्या आहेत, हे लपत नाहीत. म्हणूनच अजून साधारण एक वर्ष बाकी असलेल्या त्या लोकसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांचे नेतृत्व करणार्‍या या दोन नव्या नेत्यांची तुलना होणे अपरिहार्यच आहे. पण जितली तुलना करायला जावी, तेवढे त्यांच्यातले विरोधाभासही टोकाचे आहेत.

   पहिली गोष्ट म्हणजे राहुल हे देशाचे नेतृत्व करणार्‍या नेहरू घराण्याचे लागोपाठचे पाचवे वारस आहेत. त्यामुळेच त्यांना मनात आणल्यापासून कॉग्रेस पक्षात नेतृत्व करायची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यांना नेतृत्व मिळवण्य़ासाठी व सिद्ध करण्यासाठी कुठला संघर्ष करावा लागलेला नाही. नेमकी उलट स्थिती नरेंद्र मोदी यांची आहे. संघाचा सामान्य स्वयंसेवक म्हणून त्यांनी कोवळ्या वयात सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि कुठल्याही सत्तापदाची अपेक्षा न बाळगता इथपर्यंत मजल मारलेली आहे. आयते पद मिळणे दुरची गोष्ट आहे, मोदींना दिल्लीत आपल्याच पक्षात महत्वाचे स्थान मिळवण्याचाही संघर्ष करावा लागला आहे. दुसरी गोष्ट एक महत्वाचा नेता म्हणून राहुलनी निवडणूक लढवायची घोषणा झाल्यापासून माध्यमांकडून त्यांचे अविरत कौतुक होत आलेले आहे. नेमकी उलट स्थिती मोदी यांची आहे. कधी आमदार वा खासदार होण्याची इच्छाही प्रदर्शित न केलेल्या मोदींना केवळ गुजरातमधील भाजपा पक्षातल्या विवादामुळे मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले आणि त्यानंतरच त्यांनी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवलेली आहे. त्यानंतर मागल्या दहा बारा वर्षात प्रसार माध्यमांकडून सतत त्यांच्यावर टिकेचे आसूडच ओढले गेले आहेत. सततच्या प्रतिकुल प्रसिद्धीतून त्यांना आपल्या नेतृत्वाची अग्नीपरिक्षा द्यावी लागलेली आहे. ज्या काळात राहुल माध्यमांचे आवडते; त्याच कालखंडात मोदी नावडते, असा योगायोग आहे. अशा एकदम दोन टोकाच्या परिस्थितीतून हे दोन प्रतिस्पर्धी पक्षाचे नवे नेते ,आता एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकत आहेत. त्यामुळेच त्यांना भारतीय जनता कसा प्रतिसाद देईल, याचे अंदाज बांधणे हा राजकीय अभ्यासकांचा आवडता छंद झाल्यास नवल नाही. परिणामी दोघे कुठे जातात, काय बोलतात व करतात; त्याची सातत्याने तुलना व समिकरणे मांडली जात आहेत. आणि त्यातही पुन्हा मोदी यांना प्रतिकुल स्थितीतच आरंभ करावा लागणार आहे.

   महिन्याभरात कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यात या दोन नेत्यांची खरी कसोटी लागेल, असे राजकीय अभ्यासक म्हणत आहेत. त्यात पुर्णांशाने तथ्य नाही. कारण तिथे एका राज्याच्या कारभारासाठी लोक आपले प्रतिनिधी निवडणार आहेत आणि त्यात आधी ज्यांना संधी दिली; त्या पक्षाने काय दिवे लावले, त्यावर जनमताचा कौल होणार आहे. गेल्या खेपेस प्रथमच भाजपाने तिथे सत्ता संपादन केली आणि त्याचे सरकार संपुर्ण पाच वर्षे चालले असले, तरी त्याला अनेक कारणाने लोकांच्या अपेक्षा पुर्ण करता आलेल्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतर्गत विवादाने त्या सरकारला खुप हैराण केले. बहूमत मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी त्याला महागात पडल्या. आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत पक्षाला कर्नाटकात उभे करणारे येदीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यापर्यंत पाळी आली. ते पुन्हा मिळवण्याचा हट्टाला पेटलेल्या येदींना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दाद दिली नाही आणि आज तेच येदी भाजपाला पराभूत करण्यासाठीच टपलेले आहेत. म्हणजेच एकीकडे कॉग्रेसचे आव्हान आणि दुसरीकडे पक्षातून फ़ुटलेल्या सहकार्‍याशीही झुंजावे लागणार आहे. या सर्व परिस्थितीला मोदी कुठेही जबाबदार नाहीत. पण त्यांनाच कर्नाटकच्या निवडणुकीचे आव्हान पेलायला उभे केले; तर आधीच्या चुकांचे खापर त्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाणार यात शंका नाही. त्यापासून बाजूला राहिले तर हा कसला राष्ट्रीय नेता, अशीही हेटाळणी होणार हे उघड आहे. म्हणजेच मोदीसमोर प्रतिकुल परिस्थिती आहे. नेमकी उलट स्थिती त्याच निवडणूकीत पुढाकार घेणार्‍या राहुलची असणार आहे. भाजपाने घाण केल्याचा आयता लाभ कॉग्रेसला या निवडणूकीत मिळणार आहे, पण प्रत्येक कॉग्रेसजन त्याचे श्रेय राहुलनाच द्यायला हिरीरीने पुढे येणार आहे. तीच कॉग्रेसची संस्कृती आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकात राहूलनी पक्षाचे नेतृत्व करून दोनशेपेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या. पण त्यात अपयश आल्यावर पक्षाचे कार्यकर्तेच नालायक निघाल्याचे सांगण्यात आले. ते सुख मोदी यांच्या नशीबी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

   म्हणजेच मोदी यांच्यासाठी दिल्लीचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. गुजरातमध्ये त्यांनी जे काही कर्तृत्व गाजवले आहे, ते राज्यापुरते मानले जाते. परंतू दुसरीकडे राहुल गांधींची शासकीय कारभाराची पाटीही कोरीच आहे. मोदींना निदान एका राज्याचे प्रशासन चालवण्याचा तरी अनुभव आहे आणि त्यांनी तिथे लागोपाठ तीनदा लोकमताचा कौल मिळवला आहे. पण त्यांच्यावर दंगलीच्या आरोपांची सतत दहा वर्षे चाललेली सरबत्ती; त्यांना डोके वर काढू देत नव्हती. त्यातून त्यांची सुटका खरे तर उद्योगपतींनी केली. तीन वर्षापुर्वी त्यांनी घेतलेल्या एका गुंतवणूक संमेलनात प्रथम टाटांसारख्या जाणत्याने मोदीच देशाचे पंतप्रधान व्हावेत; असे भाष्य करून तमाम राजकीय अभ्यासक व माध्यमांना धक्का दिला. तिथून मग मोदी दिल्लीच्या राजकारणात येण्याची भाषा सुरू झाली. पण त्याहीपेक्षा त्या भाष्याने मोदींची दंगलीच्या आरोपातून काही प्रमाणात सुटका केली. दंगल हा विषय बाजूला पडून मोदी पंतप्रधान होऊ शकतात काय; यावरच चर्चा सुरू झाली. तेवढया संधीचा लाभ उठवित मोदी यांनी आपल्या व्यक्तीमत्वाची छाप देशव्यापी भाजपावर पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. खरे तर त्यांना दिल्लीतील त्यांच्याच पक्षाचे अडथळे होते. तिथे बसलेल्या श्रेष्ठी नामक अडथळ्यांची शर्यत पार करायची होती. ती त्यांनी मोठ्या खुबीने पार केली. त्यांनी श्रेष्ठींना बाजूला टाकून थेट देशभरच्या भाजपा कार्यकर्त्याला जवळ घेण्याचा व उमेद देण्याचे प्रयास केले आणि सत्ता गेल्यापासून मरगळलेल्या कार्यकर्त्याला आपल्या विश्वासात घेतले. त्याचा परिणाम एकूणच पक्ष संघटनेत दिसू लागला. इथे राहुल व मोदी यांच्यातला फ़रक लक्षात घेतला पाहिजे. राहुल यांच्यासाठी पक्षात कुठलेही स्थान व पद मोकळेच आहे. मोदींना डझनभर स्पर्धक होते व आहेत.

   अशा पार्श्वभूमीवर मोदी यांनी गुजरातची निवडणूक संपताच आपल्या हालचाली सुरू केल्या. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या दहा वर्षे ज्या माध्यमांनी मोदी विरोधात आघाडी उघडली होती, त्यांच्या मोदीविरोधाची धार त्यांनी खुबीने वापरली. ज्यातून माध्यमांना खेळायला मिळेल अशी कृती वा विधान करून मोदी आपल्याला हवा तसा परिणाम साधत गेलेले आहेत. त्यामुळे नकळत माध्यमांनीच नव्हेतर विरोधकांचाही मोदींनी आपले व्यक्तीमहात्म्य वाढवायला उपयोग करून घेतला. त्यातूनच मग त्यांच्याविषयी देशभरच्या जनतेमध्ये एकप्रकारचे औत्सुक्य वाढेल याची काळजी घेतली आणि माध्यमांसाठी मोदींना दाखवणे आवश्यक करून टाकले. गेल्या विधानसभेचा निकाल लागल्यापासून मोदी यांचे प्रत्येक भाषण माध्यमे थेट प्रक्षेपणातून दाखवत आहेत आणि धुर्त मोदी कुठल्याही वाहिनीला व्यक्तीगत मुलाखत देत नाहीत. यातच चलाखी दिसून येत असते. माध्यमे विरोधात असताना त्यांचा आपल्याला हवा तसा नेमका वापर करायचे कौशल्य मोदींनी दाखवले आहे, तर ती संधी सतत उपलब्ध असून व माध्यमे अनुकूल असूनही राहुल त्यांचा पुरेसा लाभ उठवू शकले नाहीत. गेल्या तीन महिन्यात राहुल गांधी यांची दोन तर मोदी यांची तीन भाषणे थेट प्रक्षेपणातून लोकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यांची तुलना केल्यास काय दिसते? जयपूर येथे कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात राहुलना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले व त्यांनी कार्यकर्त्यांना भावनाविवश करणारे भाषण केले. त्यानंतर मोदी यांची एकूण तीन भाषणे झाली. एक दिल्लीतल्या अत्यंत हुशार विद्यार्थ्यांसमोर, दुसरे पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेसमोर आणि तिसरे ‘इंडिया टूडे’च्या समारंभात. या तिन्ही भाषणात वेगवेगळ्या वर्गाला त्यांनी भारावून टाकले. तर राहुल गांधींचे दुसरे भाषण उद्योगपतीं संघटनेच्या वार्षिक संमेलनात झाले. त्यामधून त्यांनी प्रथमच आपली राष्ट्रीय भूमिका मांडण्याचा प्रयास याच आठवड्यात केला. सहाजिकच या एकूण पाच भाषणाची तुलना होणे अपरिहार्यच आहे.

   या तुलनेत पहिला मुद्दा म्हणजे मोदी कुठेही लिहून आणलेले भाषण वाचून दाखवत नाहीत. त्यांनी आपले प्रत्येक भाषण अस्खलीत व उत्स्फ़ुर्तपणे केलेले आहे तर राहुल गांधी यांनी दोन्ही जागी आपली भाषणे वाचून दाखवली. म्हणजेच जे मुद्दे आहेत ते आपल्या डोक्यात पक्के आहेत आणि त्यावर आपण स्वत:चा विचार केला आहे, असे मोदी सिद्ध करीत असतात. तर राहुल स्वत:चे भाषणही कोणाकडून तरी लिहून घेतात व त्यातले विचार त्यांचे नसतात, अशी ऐकणार्‍याची समजूत होऊ शकते. कारण गुरूवारी लिहून आणलेले वाचतानाही कागद बदलल्याने राहूल दोनदा गडबडले अडखळले. प्रश्नोत्तरातही झाशीकी रानी ऐवजी त्यांनी रानीकी झाशी असा चुकीचा उल्लेख केला. दुसरा मुद्दा मोदी दिर्घकाळ मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी तिथे मोठाच विकास केला; असे अनेकजण सतत बोलत असतात. पण स्वत: मोदी मात्र त्याचे श्रेय घेत नाहीत, की गुजरातचा उल्लेख अनावश्यकरित्या आणत नाहीत. त्यापेक्षा गुजरातच्या अनुभवातून देशाच्या समस्यांवरची उत्तरे आपल्याला गवसली असल्याचे दावे करतात. तिथे राहुल तोकडे पडतात. कारण स्वत: राहुल कुठल्या पदावर नाहीत, की त्यांनी युपीएच्या कारभारात कुठला थेट हस्तक्षेप केल्याचे कधी दिसलेले नाही. विशेषत: गेल्या दोन वर्षात अण्णा, रामदेव, लोकपाल अशा आंदोलनापासून सामुहिक बलात्कारावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया अशा प्रसंगी राहुल गांधी यांनी कुठली प्रतिक्रियाही द्यायचे टाळलेले आहे. तरूणाईच्या गोष्टी करणारा हा तरूण नेता राजधानीतील तरूणाई रस्त्यावर उतरली तिच्यापासून तोंड लपवून बसला असेल, तर जनमानसावर त्याचा कुठला प्रभाव पडणार आहे? इथेच दोघांमधला मोठा ठळक फ़रक लक्षात येऊ शकतो. ज्या प्रतिकुल परिस्थितीला मोदी दहा वर्षे सामोरे गेले, तशी स्थिती काही दिवसांसाठी उदभवली तर राहुल तिला सामोरेही जाऊ शकलेले नाहीत. आणि अशा गोष्टींचा अभ्यासक विचार करीत नसले तरी सामान्य माणूस बारकाईने विचार करत असतो व आपले मत बनवत असतो. जेव्हा दोन नेत्यांच्या गुणवत्तेची व कर्तृत्वाची तुलना होते, तेव्हा असे सगळे मुद्दे लक्षात घ्यावेच लागतात. कारण त्याचेच प्रतिबिंब मतचाचण्यांमधून पडत असते.

   राहुल गांधींचे उद्योगपतींच्या वार्षिक सभेत भाषण होण्याच्या आदल्याच दिवशी कर्नाटक विधानसभा निवडणुक निमित्ताने आजतक वाहिनीने केलेली चाचणी समोर आलेली आहे. त्यात अर्थातच भाजपाच्या पराभवाचे भाकित करण्यात आलेले आहे. पाच वर्षे अंतर्गत सत्तास्पर्धा व लाथाळ्यांमुळे तिथला मतदार त्या पक्षावर नाराज आहे, त्याचाच लाभ तिथे कॉग्रेसला मिळणार आहे. शिवाय येदीयुरप्पा यांच्यासारखा दांडगा नेताच मते फ़ोडायला मैदानात असल्याने फ़टका बसणे स्वाभाविक आहे. मग अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये मोदींनी कर्नाटकात प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन अपयशाचे धनी व्हावे काय अशी चाचणीनंतर चर्चा सुरू होती. पण त्या आकड्यांपेक्षा त्यातील एका प्रश्नाला मिळालेली उत्तरे सुचक आहेत. मोदींनी कर्नाटकची जबाबदारी घेतली तर भाजपाला लाभ होऊ शकतो काय, या प्रश्नाला ६४ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. याचा अर्थ इतकाच, की कर्नाटकचा मतदार भाजपावर नाराज आहे. पण त्या पक्षापेक्षा त्याला मोदींकडून अधिक अपेक्षा आहेत. आणि हीच बाब लक्षात घेण्यासारखी आहे. तीन महिन्यांपुर्वी याच वाहिनीने देशव्यापी चाचणी घेतली होती आणि त्यात भाजपा व कॉग्रेस यांच्यात कशी मतविभागणी होऊ शकते, याचा अंदाज घेतला होता. तेव्हा ३९ टक्के लोक भाजपाला मत द्यायला तयार होते. परंतू त्याच भाजपाचे नेतृत्व मोदी करणार असतील तर मात्र ४९ टक्के लोक भाजपाला मत द्यायला राजी होते. हा मतातला फ़रक महत्वाचा असतो. कुठल्याही पक्षाची संघटनात्मक ताकद किती; यापेक्षा त्याचे नेतृत्व कोण करतो, यावर पक्षाला निवडणुकीत मिळणारे यश अवलंबून असते.

   रेल्वेपासून रोजगारापर्यंत आणि शेजारी देशाशी मैत्रीपासून जागतिक संदर्भात मोदी आपली भूमिका सुस्पष्ट करून मांडतात, तिथे राहुल गांधी तोकडे पडतात. शिवाय अनुकुल परिस्थितीमध्ये पुढे येण्याऐवजी दडी मारून बसण्याची त्यांची प्रवृत्ती गेल्या काही वर्षात उघड झाली आहे. त्यामुळेच या दोन नेत्यांची स्पर्धा अनेक अर्थाने विषम आहे. कर्नाटकामध्ये ज्या कारणास्तव कॉग्रेसचे काम सोपे झालेले दिसते, तशीच उलट स्थिती राष्ट्रीय राजकारणात आहे. मागल्या दोनतीन वर्षात युपीए व कॉग्रेसने लोकमत स्वत:च्या विरोधात जावे, यासाठी इतकी बेफ़िकीरी दाखवलेली आहे, की लोकांना पर्याय शोधण्यास भाग पडावे. कुठल्याच बाबतीत ठाम पावले न उचलणारे सरकार अराजकाला आमंत्रण देऊन बसले आहे. त्यामुळे कोणीतरी ठामपणे हाती चाबुक घेऊन सर्वकाही शिस्तीत आणू शकेल; अशा व्यक्तीचा लोक शोध घेत आहेत. जगाच्या इतिहासात डोकावले तर असेच वारंवार घडलेले दिसेल. अगदी आपल्या देशात जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांच्या अनागोंदीने वा राजकीय अराजकाला लोक कंटाळून गेले; तेव्हा त्यांनी कुठल्याही पक्षापेक्षा धाडसाने उभा रहाणारा खंबीर नेता शोधण्याचाच प्रयास केलेला आहे व त्याच्या हाती सत्ता सोपवलेली आहे. १९७१ साली कॉग्रेसची दयनीय अवस्था होती आणि १९८० सालात जनता पक्षाच्या अनागोंदीला लोक कंटाळले होते. दोन्ही वेळी त्यांनी विस्कळीत कॉग्रेस पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधींना प्रचंड मते दिलेली होती. ती सुप्त लाट राजकीय निरिक्षकांना दिसू शकली नव्हती. आज ज्याप्रकारे मोदी यांच्याविषयी बोलले जात आहे. आणि मोदी जे बोलत आहेत, त्यातून त्या आठवणी जाग्या होतात. १९८० सालात आणिबाणीने बदनाम झालेल्या इंदिरा गांधी कशा निवडून आलेल्या होत्या? त्यांची घोषणा पक्षाला मत देण्याची नव्हती. कोणाला आठवते ती घोषणा?

ना जातपर ना पातपर
इंदिराजी की बातपर
मुहर लगावो हाथपर

   तेव्हा कॉग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक बळावर वा पक्षासाठी मते मागितली नव्हती, की लोकांनी त्यांना कॉग्रेस म्हणून मते दिलेली नव्हती. इंदिराजी पंतप्रधान हव्या म्हणून ती मते दिली होती. आज इतक्या वर्षांनी नैराश्य, हताशा आणि त्यातून उदभवलेला आशावाद ही मोदींची खरी ताकद आहे. गुजरात विकासाचे मॉडेल व त्याचे जगभर चाललेले कौतुक; यातून तो नवा आशावाद उदयास आलेला आहे. त्यातून पुन्हा देश लाटेच्या राजकारणाकडे चाललेला आहे. कारण १९७०-८० दरम्यान जसा मतदार आघाडीच्या राजकारणाला कंटाळली होती, तशीच मानसिकता आज तयार झाली आहे. त्यामुळे मुसंडी मारून मोदी पक्षाच्या सर्वोच्च संसदीय मंडळात आलेले आहेत. त्यांना रोखायचे असेल तर राहुल गांधींना सुरक्षीत कोंडाळ्याच्या बाहेर पडून आमनेसामने संघर्ष करावा लागेल. नुसत्या कल्पनांचे बुडबुडे उडवून चालणार नाही, पुर्वजांची पुण्याई उपयोगाची नाही. आखाड्यात उतरावे लागणार आहे. पण दोन्ही भाषणात त्याचा अंक्त मिलत नाही. किंवा पडद्याआड राहून सुत्रे हलवण्यातच त्यांनी वेळ दवडला आहे. निदान येते वर्षभर त्यांनी खुल्या मैदानात येऊन पक्षाला नेतृत्व देण्याची हिंमत दाखवली पाहिजे व ती सामान्य माणसाला दिसली पाहिजे. सहकारी, अन्य नेते वा सरकारच्या मागे लपून त्यांना मोदींशी दोन हात करता येणार नाहीत. दहा वर्षाची सत्ता व मागल्या दोन वर्षाचे अपयश पा्ठीवर घेऊन राहुलना मतदाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना ते कितपत जमते त्यावरच मोदी-राहुल कुस्तीचा निकाल अवलंबून असणार आहे. त्याआधी त्यांनी आपल्या आजीच्या १९७१ व १९८० च्या लाटेवर स्वार झालेल्या निवडणुकांचा बारकाईने अभ्यास केला, तरच त्यांना काही योग्य उपाय सापडू शकेल.