शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१२

उठ वेड्या तोड बेड्या
   महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. त्याचे निकालही आता जाहिर झाले आहेत. त्यात ज्या पक्षांमध्ये निवडणूकपुर्व समझोते झाले होते, त्यांनी मिळवलेले यश किंवा अपयश यावरच्या चर्चा, वाद, मतभेद आता उघडकीस येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे निकालानंतर सत्ता संपादनासाठी समझोते, तडजोडी यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत. यशाला अनेक बाप असतात, पण बिचारे अपयश नेहमीच अनॊरस असते. त्यामुळेच जिथे अशा युत्या आघाड्यांना यश मिळाले, तिथे आपल्यामुळेच एवढे मोठे यश मिळाले असा दावा मित्रपक्ष करणार हे उघड आहे. याच्या उलट जिथे अपयश पदरात पडले, तिथे मित्राने दगाबाजी केली, असेही आरोप होणे स्वाभाविक आहे. तेच सध्या चालू आहे. म्हणूनच कालपर्यंत कलमाडी यांच्यावर तुरूंगाची हवा खाणारा नेता अशी टिका करीत मते मागणारा राष्ट्रवादी पक्ष किंवा त्याचे ’स्वयंभू’ नेते अजितदादा पवार, आता त्याच कलमाडी कॉग्रेसकडे पाठींब्यासाठी सेक्युलर साकडे घालताना दिसत आहेत. मनसे या नव्या पण सर्वाधिक यश नाशिकमध्ये मिळवणार्‍या पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सेक्युलर राष्ट्रवादीचे नेते भुजबळ ’जातियवादी’ युतीशी हातमिळवणी करायला उत्सुक आहेत. त्याच गदारोळात आंबेडकरी चळवळीच्या विविध गटांची सुद्धा आपले अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.
 
   गेले आठ महिने, वर्षभर त्यातल्या आठवले गटाने चाकोरी मोडण्याचे मोठे धाडस करून हिंदुत्ववादी शिवसेना-भाजपा युतीशी हातमिळवणी केली होती. तिचे फ़लित या निकालातून दिसावे अशी सगळ्याचीच अपेक्षा होती. त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एका बाजूला त्या अपयशाने कॉग्रेस-राष्ट्रवादी खुश असतील. कारण त्यांना सोडून आठवले विरुद्ध बाजूला गेले होते. दुसरीकडे आंबेडकरी चळवळीचे इतर गट सुद्धा खुश असतील. पण त्याचे कारण वेगळे आहे. आठवले हे एकटेच आंबेडकरी समाजाच्या मतांचे मक्तेदार नाहीत, असे दाखवण्याची संधी या निकालांनी इतर गटांना मिळाली आहे. शिवाय खुद्द आठवले गटातील जे अस्वस्थ होते, त्यांनाही ’आम्ही म्हणालोच होतो’ असे चढ्या आवाजात बोलायची संधी आता साधता येणार आहे. म्हणजेच नव्या राजकीय परिस्थितीत आपले काय स्थान आहे, हे शोधायची वेळ एकूणच सर्व रिपब्लिकन गटांवर आलेली आहे. मात्र त्याचे गांभिर्य ओळखण्याची कुवत त्यापैकी किती नेत्यांमध्ये आहे, याची शंका येण्यासारखी स्थिती आहे. त्यांना सतत खेळवणार्‍या कॉग्रेसी राजनितीला ते फ़ायदेशीर आहे. कारण एकीकडे आठवले य़ांची रणनिती फ़सत असताना कॉग्रेसने दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांना आपल्याजवळ घेऊन त्यांच्याही अलिप्ततावादाला बाटवले आहेच. म्हणुनच या निकालानंतर आंबेडकरी चळवळीचे राजकीय भवितव्य काय, याचा व्यापक विचार करणे अगत्याचे झाले आहे. पण आजचे त्या विचारांचे नेते, ते कर्तव्य कितपत बजावतील याची शंकाच आहे. कारण त्यांना मुळ विचारापेक्षा आपापले अहंकार मोठे वाटत असतात.

   शिवसेनेशी आठवले यांनी दोस्ती केली, त्याला आता वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. जेव्हा नजिकच्या काळात निवडणूका नव्हत्या, तेव्हा ही राजकीय सोयरीक झाली होती. सेनेच्या उद्धव ठाकरे यांना राजच्या मनसेने निर्माण केलेले आव्हान पेलण्यासाठी, तीनचार टक्के मतांची युतीच्या पारड्यात भर घालणारा राजकीय घटक हवा होता. त्यामूळेच आठवले गटाला त्यांनी जवळ करणे, ही एक रणनिती होती. त्यामुळे पाचशे हजार मतांनी पराभूत होणार्‍या उमेदवारांना विजयापर्यंत जायला मदत होणार होती आणि ती झाली, हे कोणी नाकारू शकणार नाही. पण त्याचवेळी त्याचा फ़ायदा रिपब्लिकन आठवले गटाला सुद्धा मिळायला हवा होता. सेना, भाजपा यांनी लढवल्या, त्यातल्या निम्मे जागा त्यांनी मुंबईत जिंकल्या. मात्र त्यांच्या महायुतीमध्ये त्यांनी रिपब्लिकन आठवले गटाला सोडलेल्या २९ पैकी एकच जागा जिंकली. २८ जागी त्यांचा पराभव का व्हावा? की आठवले गटाला फ़क्त पराभवाच्याच जागा मुद्दाम सोडण्यात आल्या होत्या? दिसायला २९ जागा आणि जिंकण्यासारखी एकही नाही, असा मामला होता काय? मागल्या वेळी स्वबळावर लढून रिपाईने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी विजयी महायुतीत सहभागी असताना त्यांना तेवढ्याही टिकवता येऊ नयेत, ही बाब चमत्कारिक नाही काय? तीनाच्या पाच वा सात व्हाव्यात ही अपेक्षा चुक म्हणता येणार नाही. जी एक जागा जिंकली, ती सुद्धा डी. के. राव या छोटा राजन टोळीच्या गुंडाच्या भावाने धारावीत जिंकलेली जागा आहे. त्याचा आंबेडकरी चळवळीपेक्षा स्वत:च्या ’ताकदीचा’ विजय आहे.

    यापुर्वी १९९२ सालात आठवले गटाने कॉग्रेस पक्षाशी युती करून भरपुर म्हणजे तेरा जागा जिंकल्या होत्या. तेव्हा थेट मुंबईचे महापौरपद त्यांना मिळाले होते. त्याच्याशी तुलना केल्यास यावेळचे युतीतील अपयश निराशाजनकच नव्हे तर चकित करणारे आहे. त्यामुळेच युतीने आंबेडकरी मते वापरली, पण त्यांच्या पारड्यात आपली मते टाकली नाहीत, असाही आरोप होऊ शकतो. स्वत: रामदास आठवले यांनी तशी शंका बोलून दाखवली आहे.  ती अगदीच चुकीची म्हणता येणार नाही. पण दुसरीकडे तेवढेच विश्लेषण पुरेसे म्हणता येत नाही. कारण जिथे आठवले गटाचे उमेदवार पराभूत झाले, तिथे त्यांना त्यांच्याही समाजाची पुर्ण मते मिळालीच आहेत, असाही दावा त्यांना करता येणार नाही, अशी आकडेवारी आहे. म्हणुनच या निकालांचे विश्लेषण करतांना निवडणूकपुर्व राजकारण, अधिक जागावाटपाचा तिढा याचाही एकत्रित विचार करणे भाग आहे. मला त्याची आवश्यकता वाटते, कारण ही युती झाल्यावर त्याबद्दल सगळीकडून झोड उठली असताना, मी तिचे समर्थन करीत पुढल्या वाटचालीबद्दल काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. अधिक जागा मागणे, अधिक जागा जिंकणे, इतर कुठल्या पक्षाला धडा शिकवणे अशा जंजाळात रिपाईने अडकू नये, तर स्वत:ची संघटना बांधण्यासाठी युतीच्या राजकारणाचा वापर करून घ्यावा, असेच मी परोपरीने सुचवले होते. त्याची गंभीर दखल घेतली गेली असती तर आज अशी हास्यास्पद अवस्था आठवले गटाची झाली असती काय? मला वाटते अजुनही त्यांनी जे घडले त्यावर निष्कर्ष काढण्यापुर्वी माझे ते मुद्दे तपासून त्यावर आधी विचार करावा आणि मगच निकालांकडे बघावे.

   मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा चार प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीची खरी कसोटी होती. कारण सेना तिथेच खरी प्रभावी शक्ती आहे. पुणे, नाशिकमध्ये सेनेचीच ताकद घटली आहे. त्यामूळे रिपाईला सेनेचा लाभ मिळाला नाही, तर तक्रार करायला जागा रहात नाही. पण तसे मुंबई ठाण्याचे नाही. तिथे सेनेने आपली ताकद व सत्ता टिकवली आहे. त्यामुळेच तिथे रिपाईच्या महायुतीमध्ये असण्याची खरी कसोटी लागायला हवी. रिपाईची किरकोळ मते सेनेला सत्ता टिकवायला उपयोगी ठरली हे सत्य आहे. पण तिचा फ़ायदा रिपाईला कसा मिळू शकणार? कारण युती एकत्र लढत असली तरी तिच्या सर्व उमेदवारांचे निवडणूक चिन्ह सारखे नव्हते. आणि मतदानात चिन्ह खुप महत्वाचे असते. तोच १९९२ आणि २०१२ या दोन निवडणुकातला फ़रक आहे.

    तेव्हा रिपाईचे तेरा उमेदवार निवडुन आले, ते कॉग्रेसच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे कॉग्रेसच्या मतदारांना रिपाइच्या उमेदवारांना मत देताना चिन्ह शोधावे लागले नव्हते. मागल्या २००७ च्या निवडणुकीत रिपाइ उमेदवार स्वबळावर लढले, तरी त्यांची सर्व ताकद आपापल्या भागात पणाला लागली होती. अर्जात ते अपक्ष होते आणि त्यांना निवडणूक चिन्हासाठी खस्ता खाव्या लागल्या नव्हत्या. ती स्थिती यावेळी नव्हती. एकच सार्वत्रिक चिन्ह नाही. आणि त्याचा प्रचार युतीच्या मतदारापर्यंत पोहोचविणे त्रासदायक झालेले होते. जागावाटपात वेळ गेला आणि जे वॉर्ड वाट्याला आले, तिथे युती व रिपाई कार्यकत्यांची मोट बांधायला अवधी मिळाला नाही. सहाजिकच मतदानासाठी आवश्यक असलेल्या आपल्या उमेदवाराचे चिन्ह युतीच्या मतदारासमोर घेऊन जाण्यात रिपाई तोकडी पडली. हे देखील सत्य नाही काय? त्याऐवजी या पहिल्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांनी सेनेचे चिन्ह घेतले असते तर? त्यावेळी कॉग्रेस चिन्हाचा फ़ायदा झाला, तसाच यावेळीही लाभ झाला असता. भले निवडून येणारे पक्षाच्या नावावर दिसले नसते. पण त्यांच्या यशाचा एकूण पक्षसंघटना व पाठीराख्यांवर खुप परिणाम नक्कीच झाला असता.

    जेवढ्या जागा हाती पडल्या होत्या, त्यापैकी निदान आठ दहा नक्कीच जिंकल्या असत्या. सेनेलाही त्याचा फ़ायदाच झाला असता. दिसायला त्यांच्याच चिन्हावरचे उमेदवार जिंकलेले दिसले असते. आणि बसायला रिपाईचा गट वेगळा असला, तरी महायुतीमधे सत्तेचे भक्कम गणित जमले असते. ठाण्यात दोन बसपा उमेदवार जिंकले आहेत. त्या पक्षाची इथे महाराष्ट्रात कोणी दखल घ्यायला तयार नाही. पण त्यांचे असे उमेदवार जिंकतात ते सतत एकच चिन्ह राहिल्यामुळे. सर्व रिपाई गटांची खरी समस्या एकच आहे. ती कायमस्वरुपी निवडणूक चिन्हाची आहे. १९९२ मध्ये इतके नगसेवक झाल्यावर त्यांनी वॉर्ड पातळीवर संघटना बांधणीचे काम हाती घेतले असते, तर पुढल्या निवडणूकीत त्यांना त्याचा लाभ नक्कीच मिळाला असता. पण सगळी धडपड सतापदे मिळवण्यासाठी आहे. मात्र त्यासाठी लढण्याची, कष्ट घेण्याची तयारी नसेल तर उपयोग नसतो. हाच महायुतीमध्ये सहभागी होतानाच धोका मी सु्चित केला होता. एक जुन ते तेरा ऑगष्ट २०११ या कालखंडात मी ’पुण्यनगरी’मधून मुद्दाम शिवशक्ती भीमशक्ती यांच्या एकत्र येण्यासंबंधाने खास प्रदिर्घ लेखमाला लिहिलेली होती. त्यात आजवरच्या रिपब्लिकन चळवळी, गटबाजी, नेत्यांचे अहंकार, आंबेडकरी जनतेच्या भावना, त्यांचा इतर राजकारणात केला जाणारा गैरवापर, तरूण कार्यकर्त्यात येत चाललेले नैराश्य, अशा अनेक बाजूंचा उहापोह केला होता. त्यातच नुसत्या सतापदांसाठी एकत्र येण्यातले धोकेही नमूद केले होते. तेच आता निकालांनी खरे ठरवले आहेत.

   निवडणुक निकाल येत असताना चाललेल्या विश्लेषणात भाग घेतलेल्या आठवले गटाच्या अर्जुन डांगळे या एकाच नेत्याने त्याचा उल्लेख केल्याचे मला बघायला मिळाले. कुठल्या तरी वाहिनीवर ऐकायला मिळाले. चिन्ह उशिरा मिळाल्याचा तोटा संभवतो हे निदान त्यांनी तेव्हा सांगितले तरी. पण त्याचा एकूण अपयशाचे चिंतन करताना कितपत विचार झाला ते ठाऊक नाही. आधी निकालांचे चिंतन तरी झाले की नाही कोण जाणे. पण होणार असेल तर काही मुद्दे विचारात घ्यावेत, असे मी अगत्याने सुचवू इच्छितो. कारण नेत्यांना सत्तापदे मिळणे माझ्या दृष्टीने महत्वाचे नसून आंबेडकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याचे नैराश्य मला घातक वाटते. पहिली गोष्ट म्हणजे ही महायुती होताना आठवले यांनी पक्षाची नव्याने उभारणी करण्याची भाषा वापरली होती. संघटनात्मक कामाबद्दल ते बोलत होते. निवडणुका दूर आहेत आणि आपण लोकांच्या समस्या व प्रश्न घेऊन युतीसोबत उभे असल्याचे आठवले सांगत होते. मग निवडणूका जवळ आल्यावर त्यांच्यासह तमाम रिपाई नेत्यांना त्याचा विसर पडला आणि त्यांनी अधिकाधिक जागा युतीकडून मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले.

      रिडलोसचा प्रयोग करताना अधिक जागा स्वत:कडे घेऊन उपयोग नसल्याचा अनुभव त्यांना आलेला होता. मग जागांपेक्षा विजय महत्वाचा हे त्यांना कोणी वेगळे सांगण्याची गरज होती काय? निवडणूकीत किती जागा लढवल्या, यापेक्षा जिंकल्या किती याला महत्व असते. म्हणूनच राष्ट्रवादी मुठभर जागांसाठी मुंबईत हटवादी राहिला नाही. स्वबळावर शंभराहुन अधिक जागा लढवून त्यांना मागल्या दोन निवडणूकीत धडा मिळाला होता. रिपाईनेही मुंबईत जास्त जागा मागण्यात वेळ घालवण्यापेक्षा मिळतील त्या जागा जिंकण्याची तयारी करण्यात वेळ खर्ची घातला असता तर? देऊ केलेल्य २५ जागा घेऊन त्यापैकी दहा जिंकायच्याच अशी कंबर कसली असती तर? निदान दहा वॉर्डात तरी आज त्यांचे प्राबल्य दिसून आले असते. त्याउलट सेनेची मते मिळाली नाहीत, म्हणून उमेदवार जिंकले नाहीत म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. ती भुषणावह नाही. कारण त्यात आपली ताकद एकही वॉर्ड स्वबळावर जिंकण्याची क्षमता नाही, असे कबुल केले जात असते.

      चंद्रकांत हंडोरे यांनी एकदा १९९२ साली कॉग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक होऊन त्या भागात आपले बस्तान बसवले आणि नंतर विधानसभेसाठी आपण तुल्यबळ उमेदवार असल्याचे सिद्ध केले,  म्हणुनच त्यांना कॉग्रेस उमेदवारी देते. असे दहा पंधरा कार्यकर्ते मुंबईत उभे करणे या निमिताने शक्य होते. निवडुन येताना सेनेच्या वा कुणाच्याही कुबड्या घ्यायला हरकत नाही. पण नंतरच्या काळात आपल्या वैचारिक भूमिकेवर चालणार्‍या कार्यकर्त्यांची संघटना उभी करण्याचे उद्दीष्ट असायाला हवे, याचे विस्तृत विवेचन मी त्या लेखमालेतून केले होते. अनेक आंबेडकरी कार्यकर्ते व पाठीराखे आणि अन्य पक्षिय सहानुभूतीदारांनी त्याचे पुस्तकात रुपांतर करण्यासाठी आग्रह धरला होता. कारण ती लेखमाला फ़क्त महायुतीशी संबंधीत नव्हती, तर चळवळ, कार्यकर्ते, संघटना यांचा उहापोह करणारी होती. आता तिचे पुस्तक रुपात प्रकाशन झाले आहे. मला वाटते अजुन वेळ गेलेली नाही. ज्यांनी ती लेखमाला वाचलेली नसेल त्यांनी जरूर या पराभवाचा अभ्यास करताना त्यातले संदर्भ लक्षात घ्यावेत.

   आज जी अवस्था आठवले समर्थक वा रिपाईच्या विविध गटांची झाली आहे, तशी अवस्था १९७० च्या दशकातील प्रभावी असलेल्या जनता पक्ष(दल), कम्युनिस्ट पक्ष. शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना इत्यादींची झालेली आहे. रिपाईचे तरी काही गट कुठे हातपाय हलवताना दिसतात. पण त्या बाकीच्या पक्षांचे नामोनिशाण कुठे दिसत नाही. असे का व्हावे याचा विचारही होत नाही. कारण आजकाल वैचारिक राजकारणाची चर्चाही कुठे होत नाही. अगदी अभ्यासक म्हणवून घेणारेही, मते व जिंकलेल्या जागा यावरच आपले विवेचन करीत असतात. त्यात कार्यकर्ता, सामान्य जनता, लोकांच्या आशाआकांक्षा याची कोणाला दखलही घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळेच सर्व पक्ष हे नेत्यांचे, त्यांच्या सत्तास्वार्थाचे, कुटुंब घराण्याच्या वांशिक सत्तेचे, ठेकेदार, दलालांचे अड्डे बनले आहेत. त्यातून राजकारण बाहेर काढायचे असेल व जनताभिमुख करायचे असेल, तर पुन्हा कार्यकर्त्यांचे संघटन म्हणजे राजकीय पक्ष असे त्याला स्वरुप आणण्याची गरज आहे. त्यासाठीच मी ती लेखमाला लिहीली होती.

      सवाल एका आठवले गटाच्या निवडणूकीतील यशापयशाचा नसून, एकूणच महाराष्ट्रातील वैचारिक, तात्विक, संघटनात्मक, लोकाभिमुख राजकारण व कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक सहभागाचा आहे. बाजारी राजकारण की कार्यकर्त्यांच्या सहभागाचे राजकारण, सत्तापिपासेचे राजकारण की जनहिताचे राजकारण, लोकशाहीचे राजकारण की नोकरशाहीचे प्राबल्य असा सवाल आहे. त्याचे उत्तर शोधू पहाणार्‍यांनी या निकालांचा गंभीरपणे विचार करायला हवा आहे. त्यातला एक छोटा प्रयास म्हणुन हे पुस्तक उपयोगी ठरावे, एवढीच माझी अपेक्षा. निदान आंबेडकरी चळवळीचा तरूण व कार्यकर्ता त्या दिशेने वाटचाल करू इच्छित असेल अशी मला अशा आहे. सर्वच विचारांच्या तरुण व कार्यकर्त्यांना आता आपल्या अहंकारी, आत्मकेंद्री नेत्यांच्या तावडीतून सुटण्याची व आपल्या वैचारीक भूमिका जपण्याची गरज आहे. अशी हिंमत जे दाखवू शकतील ते आजच्या व्यहारात कोणाला वेडे जरूर वाटतील. पण दुरगामी राजकारणाला तेच दिशा देऊ शकतील, याची मला खात्री आहे. म्हणूनच माझे त्यांनाच आवाहन आहे, उठ वेड्या तोड बेड्या !

  सूचना: (’उठ वेड्या तोड बेड्या’ असे त्या मूळ लेखमालेच्या पुस्तकरुपाचे नाव आहे. ज्यांना ते पुस्तक हवे असेल, त्यांनी रोहिणी माळकर  यांच्याशी थेट संपर्क साधावा. त्यांचा संपर्क क्रमांक 9870253170).

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

शिवसेनेला मुंबईकरांचा ’मनसे’ पाठींबा


प्रतीक्षा संपली आणि शुक्रवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. त्यात सर्वाचे लक्ष ज्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले होते तिथे पुन्हा एकदा शिवसेनेने आपला भगवा फडकावला आहे. त्याचे श्रेय कुणाला, यावर शुक्रवारी दुपारपासूनच वाहिन्यांवर चर्चा रंगली होती. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील भांडणापासून उद्धव ठाकरे यांच्या सर्व गोष्टींचे कौतुक चालले होते. पण कोणालाही या भगव्या यशाच्या ख?र्‍या मानकर्‍याची आठवण राहिली नाही, हे पाहून मला तरी फार दु:ख झाले. मुंबईतील सेनेच्या यशाचा खरा मानकरी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच आहेत. त्यांच्या एका वाक्याने जी मदत शिवसेनेला केली तेवढी कोणी केली नव्हती. निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असताना काँग्रेसचे प्रमुख प्रचारक म्हणून पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरले आणि त्यांनी कारण नसताना सेनेवर तोफ डागण्याचा आव आणला, तोच काँग्रेसला महागात पडला. कारण आधीच मरगळलेल्या शिवसेनेला आणि तिच्या निराश सहानुभूतीदाराला त्या एका डिवचणा?र्‍या वाक्याने नवी ऊर्जा दिली. खरे सांगायचे तर त्याच एका वाक्याने मुंबईच्या निवडणूक प्रचाराला अखेरच्या टप्प्यात जोश आणला आणि निर्णायक वळण दिले. काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

'शिवसेनेला मुंबई पालिकेतून मिळणारी रसद तोडायची आहे. आम्ही ते काम करणार आहोत. या निवडणुकीनंतर सेनेचे मुंबईत नामोनिशाण शिल्लक उरणार नाही.'

कायम दिल्लीत राहिलेले आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाचा गंधही नसलेल्या चव्हाणांना इथल्या मराठी माणसाच्या भावनांचा थांगपत्ता नाही, म्हणूनच ते असे बोलू शकले. कुठलाही राजकीय नेता किंवा कार्यकर्ता, मग तो कुठल्याही पक्षातला असो किंवा मतदार असो, तो मराठी असेल तर असे बोलायला धजावणार नाही. अगदी शरद पवार यांच्यासारखा नेतासुद्धा असे कधी बोललेला नाही. त्याचे कारण राजकीयच आहे. 105 हुतात्मे देऊन मुंबई मिळवणा?र्‍या मराठी माणसाच्या भावना मुंबई इतक्याच शिवसेनेशी जुळलेल्या आहेत. सतत मुंबईत येणा?र्‍या बाहेरच्या परप्रांतीय लोंढय़ांबद्दल इतर पक्षांतले मराठी नेते बोलत नसले तरी त्याच कारणास्तव त्यांना ठाकरे बोलतात, त्याबद्दल सहानुभूती असते. तेच मुंबईतल्या मराठी माणसाचे आहे. त्यामुळेच मराठी म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे, असे समीकरण तयार झालेले आहे. साहजिकच सेना संपवणे म्हणजे मुंबईतील ठाकरे यांचा आवाज संपवणे. पर्यायाने मराठी माणूस संपवणे, असा लावला जात असतो. जेव्हा अशी भीती निर्माण केली जाते किंवा संभ्रम निर्माण केला जातो, तेव्हा शिवसेनेच्या पाठीशी तमाम मराठी जनता एकदिलाने उभी राहते, असा इतिहास आहे. 1985 पासूनचे आकडे त्याची साक्ष देतात. याची गंधवार्ता नसलेले मुख्यमंत्री कॉंग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून मुंबईत उतरले तेव्हाच सेनेच्या यशाची खूणगाठ बांधली गेली होती.

चव्हाण यांनी असे बोलण्याचे काही प्रयोजन नव्हते. अगदी लोकशाहीत कुठलाही पक्ष अशी भाषा वापरत नाही. सेनेला पराभूत करण्याची भाषा समजू शकते. पण नामशेष करण्याची भाषा? त्या एका वाक्याने मराठी मतदाराला खडबडून जागे केले. हेच 1985 साली झाले होते. विधान परिषदेत महाडिक व नवलकर या सेनेच्या दोन आमदारांनी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव काय, असा प्रश्न विचारला होता, तर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ते सहन केले जाणार नाही, असे बाणेदार उत्तर दिले होते. तेव्हा त्यांना मुंबईवर सत्ता गाजवू बघणा?र्‍या मुरली देवरा यांच्या आगाऊपणाला शह द्यायचा होता आणि झालेही तसेच. तोच मुद्दा सेनेने उचलला. 'मराठी माणसा जागा हो' अशी गर्जना सेनेने तेव्हा केली होती. परिणामी याच प्रकारे तेव्हा काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुंबईत जबरदस्त यश मिळवणा?र्‍या काँग्रेसला सेनेने एकाकी लढत देऊन धूळ चारली होती. म्हणूनच मुंबई हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचे भान सर्व पक्षांचे नेते ठेवतात. त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेला त्या मराठीपणाचे प्रतीक मानले जाते. त्या दुख?र्‍या बाजूला हात न लावता इथले राजकारण करावे लागते. पण कायम दिल्लीच्या राजकारणात राहिलेल्या मुख्यमंर्त्यांना त्याबद्दल काहीही ठाऊक नसावे. अन्यथा त्यांच्यासारख्या नेमस्त पुढा?र्‍याकडून अशी चूक झालीच नसती.

तसे पाहिल्यास लोकसभा, विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाने सेना खचली होती. शिवाय मनसे व राज ठाकरे यांच्या आक्रमक पविर्त्याने सेनेच्या नेत्यांसमोर नवे आव्हान उभे केले होते. त्याचा फायदा मागच्या दोन निवडणुकांत काँग्रेसला झाला होता. त्याचेही भान काँग्रेसला उरलेले दिसले नाही. आधीचे यश पक्षाच्या संघटनेचे नव्हे, तर सेनेच्या विभागलेल्या मतांमुळे म्ळिालेले होते. त्याला मनसे जबाबदार होती. हे खरे असले तरी त्यावरच जगायचा आणि जिंकायचा मनसुबा राखणे ही आत्महत्या होती. कारण त्याला आता दोन अडीच वर्षाचा काळ उलटून गेला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातून नवा मतप्रवाह समोर आलेला होता. तिथे यश मिळवताना मनसेने सेना नव्हे, तर राष्ट्रवादी व भाजपाचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले होते. म्हणजेच मनसे आता आपले स्वतंत्र स्थान निर्माण करते आहे आणि तसे करताना आपल्या मातृपक्षाप्रमाणेच इतर पक्षांची मते खाते आहे, हे उघडपणे दिसून आले होते. तिथे भाजपा राष्ट्रवादीची मते घेतली, कारण तिथे तेच प्रभावी पक्ष होते. मुंबईत ती पाळी कॉंग्रेसवर येऊ शकते, हे आधीच ओळखायला हवे होते. ते कृपाप्रसादानेच पक्षनेतृत्व मिळवलेल्यांना कसे कळावे?

मुंबईत काँग्रेस नेहमी अमराठी माणसांच्या बाजूने उभी राहते हा सेनेचा 45 वर्षे जुना आरोप आहे. 1968 साली पहिल्यांदा पालिका निवडणूक लढवतानादेखील सेनेने तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष हफिजका यांच्यावरच तोफा डागल्या होत्या. आज उघडपणे कृपाशंकर सेनेवर हल्ला करत असतील तर त्यांच्या तोडक्या मोडक्या मराठी बोलण्याने फरक पडणार नव्हता. उलट त्यांच्या नादाला मुख्यमंत्री लागले तिथेच सेनेचे काम सोपे होऊन गेले होते. त्यांनीच चव्हाण यांना तोंडघशी पाडले, असे आता म्हणायला हरकत नसावी. कारण याच माणसाने नुसती सेनेला संपवण्याची भाषा केली नाही, तर काँग्रेस पक्षातील मराठी माणसांना पक्षविरोधी बंड करण्याची पाळीसुद्धा आणली. त्याचा एकत्रित परिणाम मराठी मतांवर झाला. निवडून आलेल्या जागा पाहिल्या तरी त्याची साक्ष मिळते. मनसेने सेनेच्या जागा जिंकल्या आहेत, तर सेनेला आपल्या जागा टिकवण्यासाठी काँग्रेसच्या जागा घ्याव्या लागल्या आहेत. म्हणजेच काँग्रेस नेतृत्वानेच सेनेचे काम सोपे केले आहे.

ही झाली एक बाजू. दुसरी बाजू आहे माध्यमांची. या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून माध्यमांनी कधीच काँग्रेससमोर किती मोठे आव्हान आहे हे सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट जागावाटप आणि पक्षांतर्गत हाणामा?र्‍यांना खूप प्रसिद्धी दिली. तेवढेच नाही तर 2007 सालच्या निकालांचे आकडे देऊन दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या तर कशी सेना-भाजपाची सत्ता संपुष्टात येईल याचे चित्र रंगवण्याचा उद्योग चालला होता. अशा बेरजा आणि समीकरणे किती व कशी फसवी असतात याची झाडाझडती मी तेव्हाच म्हणजे 15 जानेवारीच्या दै. 'पुण्य नगरी'मधल्या लेखातून घेतली होती. किंबहुना मनसेचा धोका सेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला संभवतो, हे स्पष्ट केलेले होते. आज तेच खरे ठरले आहे. जेव्हा तमाम माध्यमे जागावाटपाचे व त्यातल्या मारामा?र्‍यांचे रसभरीत वर्णन करत होती तेव्हा मी 'राजकारणातील बदलती समीकरणे' या शीर्षकाचा तो लेख लिहिला होता. तेव्हा कोणी मनसेला हिशोबात घ्यायलाही तयार नव्हते. कारण तो सेनेची मते फोडणारा पक्ष इतकीच जाणकारांची मती कुंठीत झाली होती. समोरचे सत्य बघण्याऐवजी हे शहाणे 2007 च्या निवडणुकीतले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आकडे जोडण्यात धन्यता मानत होते. त्यांचेही पितळ आता उघडे पडले आहे.

आतासुद्धा वाहिन्यांवर जे विश्लेषण चालले आहे, त्याचा वास्तवाशी संबंध फारसा नाही. कारण तिथे फक्त निवडून आलेल्या जागांचे हिशोब मांडले जात आहेत आणि त्यातून कोणाचा महापौर होईल, कोणाला सत्तेचे गणित जुळवता येईल, अशीच चर्चा चालू आहे. म्हणूनच मनसेने किती जागा जिंकल्या तेवढय़ाच विचारत घेतल्या जात आहेत. मनसे कोणाला पाठिंबा देणार याची भाकिते केली जात आहेत. पण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या महानगरांत मनसेने किती मते मिळवली याची कोणाला फिकीर दिसत नाही. याला विश्लेषण म्हणत नाहीत, तर रंगल्या तोंडाचे मुके घेणे म्हणतात किंवा उगवत्या सूर्याला नमस्कार म्हणतात. आपली ताकद ओळखून या निवडणुकीत उतरलेल्या राज ठाकरे यांना कुठेही एकहाती सत्ता मिळण्याची अपेक्षा अजिबात नव्हती. फार तर नाशिकमध्ये बहुमतापर्यंत पोहोचू, अशी अपेक्षा त्यांनी केली असावी. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत ते शांत होते. निकाल आल्यावरही त्यांची  वृत्ती खेळकर होती. आपण पुढल्या लढाईचे मैदान तयार करतो आहोत, याच भावनेने तो तरुण नेता मैदानात होता आणि निकाल त्याच्या एकूण रणनीतीप्रमाणे लागले असल्याने तो खूश दिसत होता. त्याने काय मिळवले हे त्याला पक्के ठाऊक आहे आणि त्याने धूर्तपणे पहिल्या फटक्यात ते माध्यमांना सांगायचे टाळले आहे. दुर्दैव इतकेच की वाहिन्यांवरच्या थोर अभ्यासकांना त्याचा शोध घ्यावा, असेही वाटलेले नाही. राजचे लक्ष्य 2014 आहे. त्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून आपली खरी ताकद दाखवून द्यायची त्याने तयारी चालवली आहे. त्यात आताच्या पालिका निवडणुका रंगीत तालमीसारख्या त्याने वापरल्या आहेत. बाकीचे पक्ष किंवा राजकीय अभ्यासक त्याच्याकडे सेनेतून फुटलेला किंवा उद्धवला धडा शिकवू पाहणारा, रुसलेला भाऊ म्हणून बघत असले तरी राज त्या अवस्थेतून कधीच बाहेर पडला आहे. त्याने गेल्या विधानसभेनंतर महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पक्ष म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालविले आहेत. त्याला कुठलीही लहान मोठी सत्ता लगेच मिळवण्याची अजितदादांसारखी घाई, उतावळेपणा नाही. किरकोळ सत्तेसाठी कुणाच्या तरी दाढीला हात लावण्यापेक्षा स्वत:ची ताकद निर्माण करून आपल्या आश्रयाला इतर सत्तालोलूप पक्षांनी यावे आणि सत्तेसाठी त्यांना पाठिंबा देताना आपली प्रतिष्ठा वाढवावी, अशी राजची रणनीती आहे. एका बाजूला अशा रीतीने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची आणि दुसरीकडे आपल्या पक्षाचे संघटनात्मक बळ वाढवून स्वबळावर निवडणुका जिंकायची तयारी करायची, अशी त्याची रणनीती आहे. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे अशा चार पालिकांतील त्याने एकटय़ाच्या बळावर निवडणुका लढवताना मिळवलेली मते महत्त्वाची आहेत. विशेषत: मुंबईत तोच एक पक्ष सर्व जागा लढवणारा आहे आणि त्याने किती जागा जिंकल्या त्यापेक्षा त्याने सर्व प्रभागांमध्ये मिळवलेल्या मतांची बेरीज महत्त्वाची आहे. ती बहुधा उर्वरित चार प्रमुख पक्षांपेक्षा अधिक असणार आहे. म्हणूनच मनसेच्या जागा महत्त्वाच्या नसून त्याला पडलेल्या एकूण मतांची बेरीज महत्त्वाची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांपेक्षा ती जास्त असेल तर कोणाचे मुंबईत बळ वाढते आहे ते लक्षात येऊ शकेल.

सलग निवडणुकांत एकाच चिन्हावर मते देणारा मतदार निष्ठावंत होत जातो. मायावतींनी याचप्रकारे 20 वर्षात उत्तर प्रदेशात बहुमतापर्यंत मजल मारली. 1991 साली 12 आमदारांचा तो पक्ष 2007 सालात स्वबळावर उत्तर प्रदेशात सत्ता का आणू शकला, त्याचा अभ्यासकांनी थोडा अभ्यास केला तरी राज ठाकरेंनी या निवडणुकीत काय मिळवले ते लक्षात येऊ शकेल. आजही मनसे एकखांबी तंबू आहे. त्यांच्याकडे सभा जिंकू शकेल, असा राजच्या तोडीचा दुसरा वक्ता नाही. त्यामुळेच अधिक जागा लढवण्यापेक्षा मर्यादित जागी आपली ताकद केंद्रित करून अधिक प्रभाव पाडण्यावर त्यांचा भर आहे. त्या यशाने इतर भागातले लोक व तरुण प्रभावित झाल्याने नजीकच्या भविष्यात तिकडे मुसंडी मारता येऊ शकते. ते ओळखून मनसेने मुंबई, पुणे, नाशिक एवढय़ाच भागावर लक्ष केंद्रित केले आणि लक्षणीय यश मिळवले आहे.

आज मुंबईत बाजी मारली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी. लोक विसरले असतील आणि सेनेचे सेक्युलर विरोधक आणि पत्रकारसुद्धा एक ऐतिहासिक घटना विसरून गेलेले आहेत. नारायण राणे यांनी सेना सोडून काँग्रेस उमेदवार म्हणून मालवण येथून पोटनिवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या झंझावातासमोर बाळासाहेबांनीदेखील हात टेकले होते. तेव्हा मालवणात कशाबशा घेतलेल्या प्रचारसभेत बाळासाहेबांनी केलेल्या भाषणात आपण पुन्हा मते मागायला येणार नाही, असे सांगितले होते. त्यांनी तो शब्द कालपर्यंत पाळला. मात्र यावेळी ते पुन्हा मैदानात उतरले. हे काम उद्धवला जमणारे नाही, हे ओळखूनच ते रणांगणात उतरले. ठाणे, मुंबई अशा दोन सभा अधिक त्यांनी तीन वाहिन्यांना दीर्घ मुलाखती दिल्या. त्यातून परिस्थिती आटोक्यात येऊ शकली. पण अगदी साहेब मैदानात उतरले तरी राजने आपली छाप या निवडणुकीवर उठवली, हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचवेळी दोन भावांत स्वतंत्रपणे उभे राहण्याची व नेतृत्व करण्याची क्षमता कोणात आहे, याचेही प्रात्यक्षिक जगाला मिळाले आहे. शिवाय आपण महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सर्वात उत्तम तरुण नेते आहोत, याचा साक्षात्कार मराठी माणसाला घडवताना राजने फक्त उद्धवच नव्हे, तर अजितदादा यांनाही मागे टाकले आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे नाक आहे. तीनशे वर्षापूर्वी पोर्तुगालच्या राजकन्येच्या विवाहात ब्रिटिशांना आंदण दिलेल्या या मुंबई बेटाचा ताबा इथला पोर्तुगीज सेनापती द्यायला तयार नव्हता, त्यावरून युरोपातील त्या दोन देशांमध्ये युद्ध छेडले जाण्याची वेळ आली होती. त्या नकाराचे कारण त्या पोर्तुगीज अधिका?र्‍याने नेमके दिले होते. आज मुंबई बेट ब्रिटिशांना दिले, तर ते संपूर्ण हिंदुस्थान सहज काबीज करतील, असे त्याचे भाकीत होते. आज इतक्या वर्षानीसुद्धा तेच भाकीत खरे आहे. राजकीय मंचावर दोन भाऊ त्या मुंबईवर ताबा मिळवायची लढाई लढत आहेत. दुसरीकडे राज्याचा शक्तिमान मुख्यमंत्री त्याच लढाईत मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पराभूत झाला आहे. आगामी राजकारणात आपण लंबी रेस का घोडा आहोत, हे राजने दाखवून दिले आहे. मात्र या दोन भावांच्या लढाईत अकारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेमस्त पुढा?र्‍याचा नादाला लागून बळी गेला आहे.

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

महाराष्ट्राला नरेंद्र मोदी हवाय का?मंगळवारी टीव्ही पाहत असताना 'लोकमत' वाहिनीकडे लक्ष गेले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध महानगरांतील मतदारांच्या मनाचा कौल घेण्यात आला, त्याचे विश्लेषण चालू होते. त्यात पुणेकरांच्या मनाचा कौल सांगितला जात होता. इतर प्रश्नांबरोबर लोकप्रिय नेत्याचाही विषय होता. कोण पुण्याला न्याय देऊ शकेल? या प्रश्नावर 35 टक्के लोकांनी अजितदादा पवार, तर 25 टक्के लोकांनी राज ठाकरे यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यावरून चर्चा करणार्‍यांचे लक्ष एका नेत्याकडे एक हाती सत्ता देण्याकडे वळले आणि अजितदादा पुण्याचे नरेंद्र मोदी होतील का, यावरही ऊहापोह झाला. ती चर्चा म्हणूनच मला मनोरंजक वाटली.

हा नरेंद्र मोदी कोण ? अजितदादांनी तसे का व्हावे ? दादांना मोदी व्हायचे आहे काय ? असे अनेक प्रश्न मला पडले. कदाचित तो कार्यक्रम पाहणार्‍या हजारो लोकांनाही तोच प्रश्न पडला असेल. कारण मोदी म्हणजे गुजरात आणि गुजरात म्हणजे मुस्लिमांची कत्तल. दंगलींचा आगडोंब एवढेच गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या व देशाच्या वाचकांनी वाचलेले आहे. कारण गुजरात वा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात फक्त तेवढय़ाच बातम्या ठळकपणे आपल्या वाचनात येत असतात. मग पुणे कौलाची चर्चा करणारे निखिल वागळे किंवा उदय निरगुडकर काय सांगत होते ? अजितदादांनी मोदी व्हायचे म्हणजे पुणे महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या व मुस्लिमांची कत्तल करायची, अशी या दोघांची अपेक्षा होती काय? नसेल तर त्यांना महाराष्ट्रात, पुण्यात मोदी कशाला हवाय ? कारण मुस्लिमद्वेष्टा व दंगली पेटवणारा, एवढीच मोदींची ओळख माध्यमांनी करून दिलेली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोदी यांना मुंबईत प्रचारासाठी आणले, तेव्हाही हाच प्रचार झाला होता. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने त्यावर टीकेची झोड उठवली होती. सेना-भाजपाला महाराष्ट्रात मोदींचा गुजरात करायचाय, असा आरोपसुद्धा केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या अजितदादांना महाराष्ट्राचा मोदी व्हायला आवडेल का ? म्हणजे माध्यमांतून मोदींची जी प्रतिमा गेली दहा वर्षे रंगवली जात आहे तसा मोदी व्हायला अजितदादा तयार आहेत का ? की या वाहिनीवरच्या शहाण्यांना तसा मोदी हवा आहे ? आणि तसा नको असेल तर नरेंद्र मोदी यांना दुसरा काही चेहरा, ओळख आहे काय ? असेल तर ती ओळख काय आहे ? त्याबद्दल पत्रकार, माध्यमांनी आपल्या प्रेक्षक वाचकांना आजवर अंधारात का ठेवले ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

मोदींच्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवू. पुण्याच्या बीआरटी योजनेत मोदी यांचा अगत्याने उल्लेख केला जातो. महानगरातल्या सार्वजनिक बससेवेच्या गाडय़ांसाठी राखीव मार्ग असे त्या योजनेचे स्वरूप आहे. पुण्यात आधी ही योजना सुरू झाली. त्याबद्दल ऐकून मोदी यांनी गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे ती योजना राबवायचे ठरवले. त्यासाठी तिथले शिष्टमंडळ पुण्याला येऊन अभ्यास करून माघारी गेले. त्यांनी ती योजना अहमदाबादसाठी तयार केली, राबवली आणि यशस्वी केली. त्याचे श्रेय आता मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिले जाते. मात्र ज्या पुण्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली तिथल्या त्याच योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. हा फरक आहे.

मूळ योजना पुण्याची, त्यांना ती राबवता आली नाही. पण मोदींच्या सहकार्‍यांनी पुण्यात येऊन त्यामागची संकल्पना समजून घेतली. त्यानंतर अहमदाबादची रचना, गरज आणि सोय यानुसार फेरमांडणी केली. त्यातून वाहने, प्रवासी आणि पादचार्‍यांना सुविधा निर्माण करायचा प्रामाणिक हेतू मनाशी बाळगून ती योजना राबवली. म्हणून ती यशस्वी झाली. मोदींच्या एकहाती सत्तेमुळे ती योजना यशस्वी झाली नाही, तर लोकोपयोगी योजना किंवा धोरणात कुठल्याही राजकीय हितसंबंधांना हस्तक्षेप करू द्यायचा नाही, या मोदींच्या प्रामाणिकपणामुळेच योजना यशस्वी झाली आणि ती तेवढीच यशस्वी योजना नाही. दहा वर्षापूर्वी गुजरातची सत्ता हातात घेतल्यापासून त्यांनी अनंत राजकीय अडथळे आणि अपप्रचार यांच्याशी झुंज देत शेकडो योजना यशस्वी केल्या आहेत.

मोदींच्या हातात निरंकुश सत्ता आहे. पक्षात वा राज्यात त्यांच्यासमोर कुठे आव्हानच नाही म्हणून ते कुठलीही योजना यशस्वी करू शकले, ही समजूत आहे. वाहिनीवरचे शहाणे तसाच युक्तिवाद करत होते. अजितदादांच्या हाती तशीच पुण्याची सत्ता असती तर तेही पुण्याचा विकास घडवू शकतील, असे त्यांना सुचवायचे होते. याचा अर्थ ते मूर्ख तरी असावेत किंवा मोदींविषयी ते संपूर्ण अडाणी असावेत. मोदींकडे एकहाती सत्ता नव्हती. मुख्यमंत्री होईपर्यंत ते निवडणूक लढलेले नव्हते की त्यांनी दुसरे सरकारी पद भूषवले नव्हते. मुख्यमंत्री झाल्यावर सर्वप्रथम त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. मग दंगलीच्या कारणाने देशभरातील सेक्युलर माध्यमे व बुद्धिमंत त्यांच्या विरोधात एकवटले. पक्षातील दिग्गज एकामागून एक त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. या प्रतिकूल परिस्थितीतून मोदी यांनी वाट काढत विकासाची मुसंडी मारलेली आहे.

2002 च्या निवडणुकांत दंगलीनंतरचा विजय मिळविल्यावर मोदी यांची खरी कारकीर्द आरंभ झाली. तेव्हापासून आजतागायत त्यांनी गुजरातला देशातील सर्वात प्रगत व विकसित राज्य बनवले आहे. मात्र त्या प्रचंड विकासाची बारीकशी बातमीदेखील गुजरात बाहेरच्या राज्यात, माध्यमात छापली गेलेली नाही. त्याऐवजी दहा वर्षात दंगली, खटले, चौकशा एवढय़ाच गुजरातविषयक बातम्या देशात प्रसिद्ध झाल्या. फार कशाला? सहा वर्षापूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनने देशभरातील सर्व राज्यांच्या सरकारांचा अभ्यास करत मोदी सरकारला संपूर्ण देशातले उत्तम सरकार असल्याचा पुरस्कार दिला. त्या संस्थेच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. निवडणूक प्रचारात सोनिया गांधी या मोदींवर गुजरातचा सत्यानाश केल्याचा आरोप करतात, त्यांच्याच फाऊंडेशनने अभ्यास करून नरेंद्र मोदी यांना सर्वात्तम मुख्यमंत्री असल्याचे प्रमाणपत्र द्यावे, ही खळबळजनक बातमी नाही काय ? पण कुठल्याही मराठी वृत्तपत्रात त्याबद्दल एक ओळही छापून आली नव्हती. थोडक्यात सेक्युलर माध्यमांनी गेल्या दहा वर्षात मोदी ही जणू शिवी बनवून ठेवली होती. त्यामुळेच वागळे-निरगुडकर महाराष्ट्राचा मोदी असा अजितदादांचा उल्लेख करतात तेव्हा तो गौरव मानायचा की शिवी म्हणायची, असा प्रश्न पडतो.

ही झाली एक बाजू. अजितदादांना मोदी बनवायलाही हरकत नाही. पण त्याच्या अगोदर मोदी म्हणजे काय आणि तो गेल्या दहा वर्षात कसा व कशामुळे उदयास आला, त्याचाही थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. दंगलखोर मोदी नाही तर श्रेष्ठ विकास पुरुष मोदी, अशा कोलांटउडय़ा मारून उपयोग नसतो. अजितदादांना जसे आयते सत्तापद मिळाले तसे मोदींना मिळालेले नाही. सत्तानिरपेक्ष राहून पक्षात संघटनाकार्य करताना त्यांनी कधी निवडणुकीचे तिकीटही मागितले नव्हते. सत्तापद ही दूरची गोष्ट झाली. केवळ योगायोगाने 2001 सालात मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले. तेव्हा गुजरातमध्ये शासकीय अराजक होते आणि बहुमत असूनही पक्षात बेदिली माजलेली होती. अजितदादांची गोष्टच उलटी आहे. थेट निवडणूक लढवून व मंत्रीपद घेऊनच ते राजकारणात आले. सामान्य कार्यकर्ता, संघटना कार्य वगैरे त्यांनी कधीच केले नाही आणि आजही त्यांची सर्व धडपड मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासातून चालली आहे. म्हणजेच स्वभावत: मोदी व अजितदादा परस्परविरोधी टोकाला उभे असलेले राजकारणी नेते आहेत.

खुद्द नरेंद्र मोदी यांच्याच भाषेत सांगायचे तर जो शेतकरी दूरदृष्टीचा असतो तो फळबागेची लागवड करतो आणि उतावळा असतो तो हंगामी पिकातून उत्पन्न मिळवायची घाई करतो. या एका वाक्यातून मोदी यांनी स्वत:च आपल्या राजकीय वाटचालीचे उत्तम विश्लेषण केले आहे, ते पत्रकारांनाही समजू शकलेले नाही. त्याच वाक्याची कसोटी लावली तर अजितदादांचे उद्दिष्ट काय आहे ? महाराष्ट्राचा मोदी दूरची गोष्ट झाली. या दोघांची तुलना होऊ शकते काय, हाच प्रश्न पडतो.

दादांपेक्षा मोदींच्या राजकीय जीवनाची लांबी जास्त आहे. याच्या उलट दादांच्या सत्ताकाळाची तुलना केल्यास मोदींचा कार्यकाळ तोकडा पडतो. पण त्या अल्पकाळात त्यांनी मारलेली मजल मात्र डोळे दिपवणारी आहे. १९८९ साली अजितदादांनी निवडणूक लढवली. त्यानंतर बारा वर्षानी नरेंद्र मोदी निवडणूक लढले. १९९१ सालात अजितदादा राज्यमंत्री झाले. त्यानंतर दहा वर्षानी मोदी सत्तेवर आले. सत्ता व यश दादांना बारशात (आणि बारशात सुद्धा) मिळाले, तर मोदींना सत्ता मिळाल्यापासून जणू अवघ्या जगाच्या विरोधात झुंज द्यावी लागत आहे, कधी एकदाचे मोदींचे सत्तापद जाते याकडे त्यांचे प्रतिस्पर्धी व राजकीय विरोधकच डोळे लावून बसलेत, असे नाही तर देशभरातील तमाम प्रमुख सेक्युलर माध्यमे व बुद्धिवंत त्यांच्याविरोधात रमलेले आहेत. तेवढी प्रतिकूल परिस्थिती अजितदादांच्या वाटय़ाला कधीच आली नाही. म्हणजेच दोघांच्या तुलनेसाठी दोघांत किरकोळ साम्यस्थळेसुद्धा सापडत नाहीत. राहिला मुद्दा एक हाती सत्तेचा. ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही दादांकडे नाही की पक्षातही नाही आणि ती मिळवायचा किंवा प्रस्थापित करायला जेवढा संयम व सोशिकता हवी त्याचा पुरावा अजितदादा एकदाही देऊ शकलेले नाहीत. मोदी यांचे कर्तृत्व किंवा यश हे रहस्य अजिबात नाही. डोळसपणे पाहील त्याच्यासाठी ते खुले पुस्तक आहे. सत्ता हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीतील सर्वोच्च सत्तेवर सर्वाधिक विश्वास ठेवला आणि त्याच आधारावर राजकारण करायचे पथ्य पाळले. लोकशाहीत सामान्य मतदार म्हणजे जनता श्रेष्ठ असते. म्हणूनच विधानसभेतल्या आमदारांच्या पाठिंब्यापेक्षा मोदी यांनी सातत्याने जनतेचा निर्विवाद पाठिंबा आपल्याला मिळावा, यासाठी प्रयत्न केले. ते करताना आमदारांना दुखावण्याचा वा बहुमत गमावण्याचा धोकाही पत्करला. त्यामुळेच किती आमदार फुटले किंवा विरोधकांनी फोडले त्याची त्यांनी पर्वा केली नाही. मात्र आमदार घडवणार्‍या मतदाराला आपल्या हातून जाण्याची वेळ मोदींनी येऊ दिली नाही. तेच त्यांच्या सत्तेचे व यशाचे रहस्य आहे. अजितदादा तसे आहेत का ?

पुणे महापालिका असो, कुठली जिल्हा परिषद असो की महापालिका असो, अजितदादांनी काकांच्या पावलावर पाऊल टाकून प्रतिस्पर्ध्यांच्या पाठीराख्यांना फोडण्याचे व आपल्या गोटात आणण्याचे राजकारण केले आहे. मतदार जनतेला आपल्या पाठीशी ठाम उभे करत लोकाभिमुख नेतृत्व देण्याचा प्रयत्न दादांनी केलेला नाही. जनतेपेक्षा, मतदारांपेक्षा दादांचा विश्वास सभागृहातल्या बहुमतावर राहिला आहे. म्हणजेच परिणामी दादांचे सर्व राजकारण आता लगेच मिळणार्‍या सत्तेभोवती केंद्रित झाले आहे. पाच वर्षे, दहा वर्षे भविष्याकडे पाहून दादा राजकारण करत नाहीत. किंबहुना पुढल्या निवडणुकीकडेही त्यांचे लक्ष नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोदींच्या भाषेत सांगायचे तर दादांचा ज्वारी, बाजरी, हरभरा अशा हंगामी पिकांकडे ओढा आहे. मात्र त्यातून संत्री, मोसंबी, आंबा, फणस, नारळ अशा बहुवार्षिक रसाळ फळांची त्यांना अपेक्षा आहे, ते होणार कसे ? मोदीच कशाला ? नीतिशकुमार, रमणसिंग, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी असे आज नव्या शतकातले नेते उदयास आले आहेत आणि तेही दूरदृष्टीचे दीर्घकालीन राजकारण करत आहेत. दहा वर्षात पराभवाची चव विधानसभा निवडणुकांत चाखणार्‍या नितीशकुमार वा ममता बनर्जीचे आजचे यश बघून चालणार नाही. त्यांनी तात्पुरत्या हंगामी राजकीय स्वार्थाच्या मागे धावत जाण्याचा मोह आवरला आणि मतदारांचा विश्वास संपादन करत आपल्या राजकारणाचा भक्कम पाया घातला, हे विसरून चालेल काय ? ज्या कालखंडात आघाडीचे राजकारण अपरिहार्य झाले आहे म्हणून पंतप्रधान द्रमुकच्या मंत्र्याला रोखायला घाबरतो त्याच कालखंडात बिहारचा मुख्यमंत्री म्हणून नीतिशकुमार भाजपा नामक मित्रपक्षाला नरेंद्र मोदी प्रचारात आणायला नको म्हणून ठामपणे विरोध करतो, यामधला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तो आत्मविश्वास विधिमंडळातल्या बहुमताच्या संख्याबळाकडे पाहण्यातून येत नसतो, तर जनतेचा संपादन केलेला विश्वास त्याचा आधार असतो.

जिंकलेल्या सर्वाधिक बहुमताच्या जागांनी नरेंद्र मोदी वा नितीशकुमार निर्माण होत नसतात किंवा यशस्वी होत नसतात. जनतेचा निर्भेळ विश्वास संपादन करण्यातून ते आपले बहुमत निर्माण करतात. मिळालेल्या सत्तापदाने लोककल्याण करताना मतदाराला ठामपणे आपल्या पाठीशी उभे करू शकतात. त्यातूनच धोरणे, योजना, कल्पना राबवण्याची ताकद त्यांना मिळत असते. अजितदादांनी तसा प्रयत्न किंवा विचार तरी कधी केला आहे काय?

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

एका थपडेने नऊ जीव वाचवले असते
गेल्या आठवडय़ातली ही घटना आहे. पुण्यात स्वारगेट या एसटी स्थानकातल्या एका ड्रायव्हरने तिथे थांबलेली एक बस पळवली आणि भोवतालच्या परिसरात बेछूट चालवली. त्यात त्याने अनेक गाडय़ांचा चुराडा केलाच; पण अनेक निरपराध नागरिकांना जायबंदी जखमी करताना त्याने नऊ जणांचा हकनाक बळी घेतला. त्यांची चूक एकच होती की चुकीच्या प्रसंगी ते घटनास्थळी हजर होते.

या घटनेची खबर लागताच अनेक नागरिकांनी आपल्या परीने त्या बेभान ड्रायव्हरला रोखायचा प्रयास केला. पोलीसही धावले; पण उपयोग झाला नाही. एका विजेच्या खांबावर आदळून बस थांबली, तेव्हाच तो मानवसंहार थांबला. पुढे तो ड्रायव्हर मनोरुग्ण असल्याची चर्चा सुरू झाली. ते खरेच मानायचे तर आदल्या दिवशी त्याने गाणगापूर येथून प्रवाशांनी भरलेली बस सुखरूप पुण्याला कशी आणली असावी? दिवसा नव्हे तर रात्रीचा प्रवास करून त्याने अनेकदा प्रवाशांना सुखरूप आपापल्या गावी पोहोचवले होते. तो अचानक मनोरुग्ण वा माथेफिरू झाला म्हणजे काय ?

घटना घडून गेल्यावर त्याची मीमांसा सुरू होत असते. लोक तेवढय़ा दिवसापुरती रसभरीत चर्चा करतात आणि मग आपापल्या व्यापामध्ये ती घटना विसरून जातात. काहीसा तसाच प्रकार आजकाल प्रसारमाध्यमांतून होत असतो. अशा घटना घडल्या की मग कुणावर तरी दोषाचे खापर फोडून, माध्यमेही तिकडे पाठ फिरवतात. आरोपीला घातपाती, गुन्हेगार, मनोरुग्ण, माथेफिरू ठरवले मग या चर्चेला पूर्णविराम दिला जात असतो. ताज्या प्रकरणात अशा मनोरुग्ण ड्रायव्हरला सेवेत घेतला कसा, इथपासून एसटी सेवकांच्या हालअपेष्टांची, गैरकारभाराची चर्चा रंगवून विषय संपवण्यात आला. थोडक्यात, 'उथळ पाण्याला खळखळाट फार' या उक्तीप्रमाणे समाजचिंतन होत असते.

कधी तो बस ड्रायव्हर असतो, कधी पोलीस असतो, कधी आणखी कोणी बिथरलेला माणूस असतो. अकस्मात तो कोणाच्या तरी जीवावर उठतो आणि निरपराधांचे बळी घेतो. त्याच्यावर माथेफिरू, मनोरुग्ण अशी लेबले लावणे, हाच जणू आता मानसिक आजार झाला आहे. कारण अशी लेबले लावण्याने समस्या संपत नाहीत किंवा निरपराध मरणे-मारले जाणे थांबलेले नाही. थांबणेही शक्य नाही. जोवर आजाराचे कारण शोधून त्यावर उपाय योजना केल्या जात नाहीत, तोवर समाजाची त्या आजारातून सुखरूप मुक्तता होणार कशी ?

आता हा स्वारगेटचा ड्रायव्हर म्हणजे संतोष मानेच घ्या. त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते व त्याच्यावर डॉक्टरांचे उपचारही चालू होते, असे उघडकीस आले आहे. असे असताना त्याच्या भोवतालची माणसे त्याच्याशी सावधपणे वागणूक करत होती काय ? उपचार म्हणजे फक्त औषधे किंवा शस्त्रक्रिया नसतात. भोवतालचे वातावरण तेवढेच महत्त्वाचे असते. मानसिक संतुलन ठीक नाही म्हणजे समोरच्या परिस्थितीचे योग्य आकलन करून रास्त निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसात नसते. म्हणूनच त्याच्या भोवतालच्या लोकांनी त्याच्या मनाचा तोल जाणार नाही यासाठी काळजी घ्यायला हवी आणि या अनुभवातून तुम्ही आम्ही सगळेच रोजच्या रोज जात असतो. आजचे नागरी जीवन इतके धकाधकीचे, धावपळीचे, दडपण आणणारे झाले आहे की, निश्चिंत मनाने दिवसातले काही तासही माणसाला जगता येत नाहीत. अपेक्षा, इच्छा, गरजा, स्वार्थ, मोह, अगतिकता, अडवणूक अशा शेकडो गोष्टींच्या सापळ्यात माणूस अडकलेला असतो. एकाचा जीव सावरताना दुसरीकडचा तोल ढळतो, ही प्रत्येकाची अवस्था आहे. म्हणूनच आपण घरी, कामाच्या जागी, प्रवासात, समारंभामध्ये अत्यंत किरकोळ गोष्टीवरून चिडचिड करत असतो. या आपल्या चिडचिडय़ा वागण्याला मानसिक संतुलन म्हणता येईल काय? अशा स्थितीतली आपली सोशिकता, सहन करण्याची क्षमता म्हणजे मानसिक संतुलन असते. ज्याच्यापाशी जेवढी अधिक सोशिकता तेवढे त्याचे मानसिक संतुलन चांगले. ज्याच्यापाशी ती सोशिकता कमी त्याला आपण मनोरुग्ण म्हणतो. घरच्या, कौटुंबिक, आर्थिक, व्यवहारी समस्यांनी जे गांजलेपण वाढत चालले आहे त्यात थोडीफार अडवणूक सहन करण्याची क्षमताही आजकाल आपण गमावली आहे. संतोष मानेची अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती. म्हणूनच त्याचे वरिष्ठांशी सातत्याने खटके उडत होते. असे सांगण्यात आले की वरिष्ठ त्याला मुद्दाम त्रास देत होते. मुद्दाम रात्रपाळी त्याच्यावर लादली जात होती. त्यापेक्षा नोकरी सोडून देण्याचा विचारही त्याच्या मनात घोळत होता. म्हणजेच तो माथेफिरू मनोरुग्ण नव्हता. इतर समस्यांच्या गोंधळात घुसमटून गेलेल्या संतोष मानेला नोकरीतील छळवणूक असह्य झाली होती आणि ती स्थिती कोणाचीही असू शकते. अगदी लोकप्रिय शाहरूख खानसुद्धा त्यात येतो.

मानेच्या बातमीनंतर पाच-सात दिवसांतच शाहरूखची बातमी आली. 'अग्निपथ' नामक चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शनासाठी संजय दत्तने एका समारंभाचे आयोजन केले होते. त्यामध्ये अनेक नामांकित चित्रपट कलावंतांनी हजेरी लावली होती. शाहरूखही तिथे आलेला होता. तशीच फराह खान ही नृत्यदिग्दर्शिका आलेली होती. फराहचा पती शिरीष कुंदर तिच्या सोबत होता. इंटरनेटवर कुंदरने यापूर्वीच जाहीरपणे शाहरूखच्या 'रा-वन' चित्रपटाची खिल्ली उडवलेली होती. आता पार्टीमध्ये शाहरूख समोर आल्यावर कुंदर त्याला एकामागून एक टोमणे मारत राहिला. शाहरूखने तिकडे साफ दुर्लक्ष केले. तो कुंदरपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता; पण कुंदर त्याची पाठ सोडत नव्हता. एका क्षणी शाहरूखची सोशिकता संपली आणि त्याने कुंदरवर हल्ला केला.

ही पाळी शाहरूखवर कोणी आणली? त्याची सोशिकता संयम किंवा सभ्यतेचा कडेलोट व्हावा इतका अतिरेक झाला म्हणून पुढला प्रकार घडला. कुंदरवरचा राग शाहरूखने तिथल्या तिथे काढला. थप्पड मारली की लाथांनी तुडवले याबद्दल वाद आहे, पण त्यात कोणाचा जीव गेला नाही. आता यात शाहरूख हल्लेखोर दिसतो. समारंभातल्या सर्वाना ती मारहाण दिसली. कारण दूर अंतरावर असताना ही घटना दिसू शकते; पण शाहरूखलाच ऐकू यावे एवढय़ा आवाजात कुंदरने मारलेले टोमणे उपस्थितांना ऐकू आलेले नव्हते. मग कुंदरचे पाप झाकले जाते व शाहरूखची कृती दिसल्याने त्याला गुन्हेगार ठरवले जाते; पण मुद्दा तो नाही. शाहरूखने जो राग जागच्या जागी व्यक्त केला त्याचे आपण स्वागत करायला हवे. कारण ते कृत्य हिंसक असले तरी खूप सुसह्य असते.

तुम्हाला राग आला, समोरच्याचे वागणे असह्य झाले तर त्याला थप्पड मारणे, शिवी हासडणे सभ्य मानले जाणार नाही; पण साचलेला संताप, क्रोध व्यक्त करण्याचे ते मार्ग असतात. ओवीपेक्षा शिवी म्हणूनच मला श्रेष्ठ वाटते. कारण त्यातून रागाचा आवेश निघत जातो आणि कुणालाही इजा होत नाही. संतोष माने याने त्या दिवशी अशीच एक थप्पड त्याला छळणार्‍या वरिष्ठाला मारली असती तर? त्याही पुढे जाऊन चार-पाच ठोसे लगावले असते तर? त्याचा राग वरिष्ठांवर होता आणि तो जागच्या जागी व्यक्त झाला असता तर त्याच्या मनातल्या घुसमटीचा दुष्परिणाम अगदी किरकोळ झाला असता. त्या वरिष्ठाचा जीव त्यात गेला नसता, पण त्यामुळे राग शांत झालेला संतोष माने थंडावला असता आणि पुढची बस पळवण्याची अतिरेकी घटना घडलीच नसती. वरिष्ठांचा मुलाहिजा ठेवण्याच्या नादात तो आपला संताप दाबायला गेला आणि तिथून बाहेर आल्यावर त्याच्या मनाचा स्फोट झाला. त्याचे मनावर, स्वत:वरच नियंत्रण राहिले नाही. परिणामी, नऊ निरपराधांचे मात्र बळी गेले.

संतोषने सतावणार्‍या वरिष्ठाला तिथेच थप्पड मारली असती तर त्या एका थपडेने पुण्यातल्या त्या नऊ निरपराधांचे जीव नक्की वाचले असते. मानेकडून जे मानवी हत्याकांड घडले ते टळले असते. ऐकायला, वाचायला हे चमत्कारिक वाटेल; पण तेच वास्तव आहे. कोंडलेल्या वाफेला शिट्टीमधून बाहेर पडायची सोय नसेल तर कुकरचाही स्फोट होतोच ना? संयम पाळावा हा आदर्शवाद आहे; पण अखेर संयमाच्या सुद्धा मर्यादा असतात. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा कमी विघातक पर्याय स्वीकारायचा असतो. अपशब्द, शिवी हा तसाच उपाय आहे. त्याच्याही पुढे थप्पड हा उपाय होऊ शकतो. शाहरूखने तोच निवडला म्हणून पुढचा अनर्थ टळला आणि संतोष मानेला तो निवडता आला नव्हता, म्हणून तो नऊ निरपराधांचा मारेकरी होऊन बसला.

मराठीतल्या एका नामवंत संपादकाच्या अतिरेकी वागण्याने सोशिकता संपलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी शाहरूखप्रमाणेच थप्पड मारण्याचा मार्ग पत्करला होता, मात्र त्याचा फारसा गाजावाजा झालेला नव्हता. त्यापैकी एकजण आज आमदार आहे आणि तोच संपादक आठवडय़ापूर्वी थप्पड मारण्याच्या विषयावर आपले 'ठाम मत' व्यक्त करताना (त्या प्रसंगात आपले गाल चोळायला वापरलेले) हात चोळताना पाहून माझे खूप मनोरंजन झाले. 'संयम संपायची वेळ आली तर थप्पड मारण्याचा पर्याय लोकांना स्वीकारावा लागेल' असे अण्णा हजारे राळेगणसिद्धीला आलेल्या सिनेकलावंतांशी बोलताना म्हणाले. त्यावरून वाहिन्यांवर काहूर माजवण्यात आले होते. त्याचीच अचूक बातमी हा संपादक आपल्या वाहिनीवर देत होता. कारण असल्या शहाण्यांना अण्णा काय म्हणाले, त्याचा नेमका अर्थ काय, तेही कळत नसते.

शब्दांना हेतूशिवाय अर्थ प्राप्त होत नसतो तसाच कृतीला हेतूशिवाय अर्थ नसतो. त्यातला हेतू बाजूला ठेवला तर शब्द वा कृती निरर्थक होऊन जात असतात. अण्णांच्या म्हणण्यातला गर्भितार्थ समजून घेण्याची गरज आहे. थप्पड मारणे हा त्यांनी सांगितलेला उपाय नाही. संयम संपायची वेळ आणली गेली तर हानीकारक हिंसेच्या आहारी जाण्यापेक्षा किमान नुकसानीचा मार्ग पत्करावा, असे त्यांना सुचवायचे असते. संतोष माने याने वरिष्ठांना चपराक हाणली असती तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला नसता आणि अकारण नऊ जण मारले गेले नसते. राग येणे, मनाचा प्रक्षोभ होणे, सोशिकतेचा कडेकोट मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. तो लपवणे, दडपणे हा त्यावरचा उपाय नाही. कारण त्यातून स्फोटक परिस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. म्हणूनच रागाला, क्षोभाला सोपा मार्ग उपलब्ध करून देण्यात शहाणपणा असतो.

समोरचा माणूस सभ्य शहाणा वागत असताना त्याला थप्पड मारणे असंस्कृत असेल; पण समोरची व्यक्ती जाणीवपूर्वक तुमच्या सोशिकतेचा कडेलोट करू पहात असेल तर त्याला थप्पड मारणेच योग्य असते. एखादा दारुडा अतिरेक करतो तेव्हा त्याची नशा उतरवण्यासाठी त्याचाच मित्र वा हितचिंतक थप्पड मारतो. ती हिंसा नसते, तो हल्लाही नसतो. तो उपाय असतो. नशा फक्त दारूचीच असते असे नाही. सत्ता व अधिकाराची नशा त्यापेक्षा भयंकर असते. ती थप्पड मारून उतरवायचीही सोय नसेल तर गडाफीप्रमाणे थेट मुडदा पाडून उतरवावी लागते, असे मानवी इतिहासच सांगतो. इजिप्तचा हुकूमशहा होस्नी मुबारक याचे आदेश पाळायचा सैन्याने नकार दिला. ती त्याला मारलेली थप्पडच होती. तेवढय़ाने शहाणा झाला म्हणून पुढची हिंसा टाळता आली. गडाफीला थप्पड कळली नाही म्हणून पुढचा रक्तपात अटळ झाला.

एका बाजूने तुमच्या संयमाचा अंत पाहायचा आणि तुम्ही सोशिकता दाखवत बसायची अपेक्षा बाळगायची, ही सभ्य समाजाची व्याख्या नाही. सभ्य सुसंस्कृत समाजात प्रत्येकाचे वर्तन संयमी असावे लागते. एकाने संयम सोडल्यावर दुसर्‍यावर सोशिकता दाखवण्याचे बंधन उरत नाही. सामूहिक, सामाजिक व सुसंस्कृत समाजातल्ले  संतुलन तसेच टिकवता येते. गुंडगिरी, गुन्हेगारी, अन्याय यांचा अतिरेक होऊ लागला तर सोशिकता ही त्यांची ताकद बनत असते. सोशिकता हाच दुबळेपणा वाटू लागतो. तेव्हा समाज विघातक प्रवृत्तीचे मनोबल वाढत असते. त्यावर अधिक सोशिकता हा उपाय नसतो तर अपाय असतो. संयमाची व सभ्यपणाचीही एक लक्ष्मणरेषा असते. जेव्हा ती ओलांडली जाते असे दिसते तिथे संयम सोडून रुद्रावतार धारण करावाच लागतो. सभ्यपणाने आपण दुर्बल नाही हे दाखवून द्यावेच लागते. सशक्त सभ्यता व दुर्बल दुष्प्रवृत्ती हे समीकरण समाजाला सुखरूप ठेवू शकते. म्हणूनच वेळोवेळी अशा दृष्ट प्रवृत्तीला हिसका दाखवावा लागतो. अण्णा हजारे यांनी थप्पड मारण्याचा पर्याय सांगितला त्यामागचा हेतू गुंडगिरी वा दहशत असा नाही. त्या हेतूकडे पाठ फिरवून अहिंसेचे गोडवे गायचे मग आपण संतोष मानेसारखे धोके आमंत्रित करत असतो. त्याला सोशिकतेचे धडे देण्यापेक्षा त्याच्या मनाचा, संयमाचा कडेलोट करणार्‍यांना थप्पड मारून नियंत्रणात ठेवायची गरज आहे. नाहीतर मूठभर विद्वानांच्या बौद्धिक आदर्शवादासाठी निरपराधांना अकारण मरायची पाळी येत असते. ओवीच्या जागी ओवी आणि आवश्यक तिथे शिवी देण्याची म्हणूनच गरज असते. तेव्हा थप्पड वा शिवीच्या नावाने नाक मुरडण्याचे कारण नाही.

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

कैवारीच पत्रकारितेचे वैरी झालेत


मी स्वत: पत्रकार आहे आणि चार दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता करतो आहे. त्यामुळेच पत्रकारांचे आविष्कार स्वातंत्र्य मलाही मोलाचे वाटते. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो. त्यामुळेच आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्य पत्रकार - कलावंतांनी जपले नाही तर इतरांनी त्याची थोरवी मानायचे कारणच रहाणार नाही. आज आम्ही पत्रकार तेवढे प्रामाणिक राहिलेले आहोत काय? 'महाराष्ट्र टाइम्स' वर हल्ला झाला म्हणून ओरडणारे-रडणारे खोटय़ा बातमीबद्दल एकदा तरी माफ़ीची भाषा बोलले आहेत काय? जी बातमीच नव्हती तर निव्वळ अफवा होती ती पसरवण्याचे पाप हा कायदेशीर गुन्हा आहे. त्याची खंत कुठल्या पत्रकाराने व्यक्त केली आहे काय?

लागोपाठ दोन दिवस आपल्या स्तंभातून हेमंत देसाई अविष्कार स्वातंत्र्याची थोरवी सांगत असताना पत्रकारांच्या बदमाशीबद्दल गप्प कशाला? महाराष्ट्रात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे बारीकसारीक तपशील देताना त्यांना शिरीष निपाणीकर वा कैलास म्हापदी का आठवत नाहीत? राजकीय नेते लबाड व ढोंगी आहेतच. पण निदान चार चौघात ते दाखवण्यापुरते तरी हल्याचा निषेध करतात. अगदी आपल्याच पाठीराख्यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करतात. पण तमाम अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये पत्रकार त्यांच्यापेक्षा निर्ढावलेले बदमाश नाहीत काय? कारण अजून कुणा पत्रकाराने अफवा पसरवणार्‍या अशा बातमीचा वा ती देणार्‍या पत्रकाराचा निषेध केलेला नाही.

शिरीष निपाणीकर या पत्रकाराने आमदार निवासात येऊन एका आमदाराकडून खंडणी वसूल करण्याचा घाट घातला होता. तो पकडला गेल्यावर कुठल्या वृत्तपत्राने ती बातमी छापलेली नव्हती. ज्या पत्रात तो काम करत होता त्या महाराष्ट्र टाइम्सनेही 'तो आपला पुर्णवेळ कर्मचारी नाही' असे हात झटकणारी चौकट छापली होती. पण त्या निपाणीकरने काय केले त्याचे अवाक्षर छापलेले नव्हते. संपादक कुमार केतकरांनी ती चौकट छापली होती आणि माझ्या माहिती प्रमाणे हेमंत देसाई तेव्हा महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार होते. याला अविष्कार स्वातंत्र्याचा सदुपयोग म्हणता येईल काय?

पंधरा वर्षापूर्वी ठाण्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात एक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विजय तेंडुलकर त्यात प्रमुख वक्ते होते आणि हल्ले होतात म्हणजेच आपले काम योग्य दिशेने होत असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली होती. ते 'योग्य काम' कोणते याचा नंतर खुलासा झाला. कारण त्या परिषदेचे निमंत्रक कैलास म्हापदी होते आणि त्यांनाच खंडणी प्रकरणात अटक झाली होती. गुन्हा सिद्ध होऊन त्यांनी शिक्षा देखील भोगली आहे.

अगदी परवा मटा हल्ला प्रकरणानंतर 'स्टार माझा' वाहिनीवर बोलताना आमदार अभिजीत अडसुळांनी साम वाहिनीचा एक पत्रकार दिवाळी अंकात दोन हजाराची जाहिरात दिली नाही म्हणून खोटय़ानाटय़ा बातम्या कशा देतो त्याचा उल्लेख केला. तर त्यांना नावे घेऊ नका असा दम अँन्कर प्रसन्ना जोशी यांनी भरला. म्हणजे भामटे, चोरटे, खंडणीखोर पत्रकारांची नावेही घ्यायची नाहीत. पण पत्रकार खोटे आरोप मात्र नावानिशी करणार आणि ते अविष्कार स्वातंत्र्य म्हणायचे? ही शुद्ध भामटेगिरी झाली. 'वैरी-कैवारी' लेखात देसाईच म्हणतात 'राजकारणात गुंड व भ्रष्ट आहेत. तसेच पत्रकारातही ब्लॅकमेलिंग करणारे, फुकटे, पाकीटबाज व फ़्लटलाटू लोक आहेत. परंतु काहींच्या पापामुळे सार्‍या पत्रव्यवसायास आरोपीच्या पिंजर्‍यात बसवायचे कारण नाही.’ देसाईंचा निकष ते स्वत: तरी पाळतात काय? मुठभर शिवसैनिकांनी हल्ला केला तरी संपुर्ण शिवसेनेला गुंडसेना म्हणायचा मोह त्यांना तरी आवरता आल आहे काय? दुसरी गोष्ट एखाद्या पत्रकारावरचा हल्ला संपूर्ण पत्रव्यवसायच आपल्यावरचा हल्ला म्हणून कांगावा करत असेल तर एखाद्या निपाणीकर, म्हापदीसाठी संपूर्ण पत्रव्यवसायालाच आरोपी म्हणावे लागणार.

'महाराष्ट्र टाईम्स'ची बातमी खोटी व अफवा होती म्हणून तिचा निषेध अजून पत्रकार संघटना व देसाई यांनी केलेला नाही. पण प्रत्येक पत्रकार त्यांच्या गुन्ह्यावर पांघरुण घालायला धावला आहे. मग जनमेजयाप्रमाणे इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणणे भाग आहे. जेव्हा चांगले प्रामाणिक पत्रकार आपल्यातल्या बदमाशांना आवरण्याऐवजी, बाजूला करण्याऐवजी पापावर पांघरुण घालू लागतात, तेव्हाच सर्व पत्रव्यवसाय संशयित होत असतो. त्यातून सुटल्याचा खरा मार्ग कांगावखोरी नव्हे तर आपल्यातल्या बदमाशांना आपणच उघडे पाडणे व बाजूला करणे गरजेचे असते. त्याऐवजी त्यांचा कैवारी व्हायला पुढे येतात तेच पत्रकारितेचे वैरी असतात. मग जिग्ना शहा छोटा राजनची हस्तक होऊन जे.डे यांचा मुडदा पाडण्यापर्यंत मजल मारते. एक पत्रकारच दुसर्‍या पत्रकाराचा मुडदा पाडायला मदत करतो, मग बाजार बसवीने पतिव्रतेचा आव आणायचा प्रयत्न करून उपयोग होत नाही.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

मटा रडे खोटा रडे


गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकारांना अस्सल लोणकढी थाप मारली. सतत सनसनाटी व ब्रेकींग न्यूजच्या मागे धावणार्‍यांना ती खरी वाटली. मग काय विचारता? एक पक्षाचा अध्यक्ष व खासदार उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार आहे, अशी ती थाप होती. मग सबसे तेज बातमी देण्याच्या स्पर्धेला ऊत आला. खासदार व पक्षाध्यक्ष असलेल्या व्यक्तीचा शोध प्रत्येक राजकीय निरीक्षक आपापल्या अकलेनुसार घेऊ लागला. पण ज्याच्याकडे पक्षाध्यक्ष व खासदारकी अशा दोन्ही पात्रता आहेत असा उमेदवार कुठल्याच राजकीय अभ्यासकाला भिंग घेऊनही सापडेना. तेव्हा आजी खासदार व माजी पक्षाध्यक्ष, माजी खासदार व आजी पक्षाध्यक्ष माजी खासदार व आजचा संघटना अध्यक्ष अशा भिन्न गुणवत्तेच्या उमेदवारांचा शोध झपाटय़ाने सुरू झाला. अर्थात त्या पलिकडे स्वपक्षात नाराज ही आणखी एक गृहीत पात्रता होती. त्यामुळे आनंद परांजपे प्रमाणे नाराज खासदारांचा शोध देखील जारी होता. त्यामुळे वाहिन्या व वृत्तपत्रे यांनी डझनभर असे होतकरू फुटू शकणारे खासदार - नेते शोधून काढले.

चुकीची बातमी आणि ठाम मत, हीच जर आजकालच्या पत्रकारितेची गुणवत्ता झालेली असेल तर दहा बारा विद्यमान खासदार फुटणे अशक्य कसे असेल? त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या अर्धवट अकलेचे प्रदर्शन मांडत पक्षांतरापूर्वीच या खासदारांना नावानिशी राष्ट्रवादीमध्ये दाखल करून घेतले. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड बाजूला राहिले आणि जाणत्या पत्रकारांनी शिवसेना, कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या खासदारांना राष्ट्रवादीतर्फे पक्षात प्रवेशही देऊन टाकला. ती नावे वाचून त्या खासदारांना आपण काय करीत आहोत त्याचा शोध लागला आणि पवार-पिचडांना आपल्या पक्षात कोण कोण येणार आहेत त्याची चाहुल लागली. मात्र दुसर्‍या दिवशी दहा वाजता पिचडांच्या व्याख्येत जो राजकीय नेता बसून होता तोच राष्ट्रवादीत दाखल झाला आणि तमाम राजकीय विश्लेषक चांगले तोंडघशी पडले. कारण तो कॉंग्रेसचा विद्यमान जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचा माजी खासदार शिवाजी माने होता. हे नाव एकाही राजकीय विश्लेषकाला वर्तवता आलेले नव्हते कारण आजकालच्या राजकारणात त्याची दखल कोणीच घेत नव्हते. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात त्यातला प्रकार झाला. वृत्तवाहिन्यांच्या बातम्या तुटक्या फुटक्या असतात. त्याला ते ब्रेकींग न्यूज म्हणतात. वृत्तपत्रांनी तशी बातम्यांची मोडतोड करायची गरज नसते. शहानिशा करून बातमी द्यायला हवी. पण तिथले अर्धवटराव आता वाहिन्यांशी स्पर्धा करू लागलेत. म्हणूनच मग 'महाराष्ट्र टाइम्स' सारख्या जुन्या जबाबदार वृत्तपत्राने त्या उथळ पाण्यात उडी घेतली आणि ढोपर फुटायचा प्रसंग आला. मटाने शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार असल्याची ब्रेकींग न्यूज देऊन टाकली. त्यामुळे संतप्त झालेल्या अडसुळांच्या समर्थकांनी महाराष्ट्र टाईम्सच्या जाणकार लोकांना न्यूज ब्रेक करायला शिकवण्यासाठी कार्यालयापर्यंत धडक मारली. तिथे घुसून धुडगुस घातला व न्यूज ब्रेक कशी होते त्याचे प्रात्यक्षिकच दाखवले.

आता त्यांनी असे करणे कितपत योग्य आहे? वृत्तपत्राच्या कार्यालयावरील हल्ला लेखन स्वातंत्र्यावर हल्ला आहे काय याची चर्चा जोरात चालली आहे. पण पुन्हा मुद्दा बाजूला पडला आहे. अडसूळांच्या समर्थकांचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयात येऊन मोडतोड केली का? अडसुळांचे नाव त्या बातमीत नसते तर असला प्रकार घडला असता काय? जे हल्लेखोर म्हणून पकडले गेले त्यांना अटक होण्याची हौस आली होती का? ज्याने कोणी अशी बातमी दिली ती खोटी असेल तर त्याचा हेतू शुद्ध नव्हता. अडसूळ यांची बदनामी करणे, त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला चढवणे हाच त्याचा हेतू असतो. त्याला मटा प्रसिद्धी देणार असेल तर ते वृत्तपत्र तेवढेच गुन्हेगार नाही का? मग इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा या उक्तीप्रमाणे त्याच्यावरही हल्ला होणार ना? व्हायला नको का?

अविष्कार स्वातंत्र्य कुणाच्या प्रतिष्ठा अब्रुशी खेळण्याचा अधिकार आहे काय? अडसूळ किंवा तत्सम कुणा प्रतिष्ठीत व्यक्तीच्या दिर्घकालीन कामातून त्यांनी प्रतिष्ठा संपादन केलेली असते. तिच्याशी खेळण्याचा अधिकार पत्रकारांना कोणी दिला? त्यासाठी टाहो फोडणारे त्या बातमीतले एक अक्षर तरी खरे असल्याचा बचाव देऊ शकले आहेत का? नसतील तर त्यांनी आधी सभ्यपणे आपल्या कार्यक्षेत्रात ही जी गुन्हेगारी मनोवृत्ती घुसली व शिरजोर झाली आहे तिचा निषेध करायला हवा आणि तो सभ्यपणा पत्रकारांकडे नसेल तर त्यांनी राजकारणी वा गुंडाकडून कायदा पालनाची, सभ्यतेची अपेक्षा करून कसे चालेल? जे चूक कबूल करून प्रामाणिकपणा दाखवू शकत नाहीत तेही हल्लेखोरांइतकेच असभ्य असंस्कृत असतात ना? या प्रकरणात म्हणूनच बळी पडल्याचा आव आणणारा 'मटा' व पत्रकार रडतात तो निव्वळ खोटारडेपणा आहे.

एक बोधप्रद भाकडकथा


पुराणात परिक्षित नावाच्या एका राजाची गोष्ट ऐकलेली आठवते. त्याला सर्पदंशाने मृत्यू येणार, अशी शापवाणी असते. त्यामुळे तो स्वत:भोवती सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त उभारतो. एका मोठय़ा तलावात जलमहाल बांधतो आणि कुठल्याही रुपाने तिथे साप किंवा नाग पो्होचू शकणार नाही याची काळजी घेतो. त्या महालात येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण झडती घेतली जाते. त्या पुराणकाळात आजच्यासारखी यंत्रे, उपकरणे नव्हती. पण थोडक्यात आजकाल मंत्र्यांच्या भेटीला जाणार्‍यांची सुरक्षा झडती होते तेवढी काळजी परिक्षित राजासाठी घेतली जात होती म्हणायला हरकत नसावी. तरीही एका फळभाजीवाल्या महिलेल्या टोपलीतील बोरामध्ये अळीचे रुप घेऊन तक्षक नावाचा नाग त्या राजवाडय़ात पोहोचला होता. मग तपासणीतून सुटून महालात आल्यावर त्याने आपले खरे रुप धारण केले आणि परिक्षिताला दंश करून ठार मारले.

या घटनेने परिक्षिताचा वारस जनमेजय खूप संतापला. त्याने राजा म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर सूड म्हणून तक्षक या नागाला ठार मारण्याचा चंग बांधला. पण त्याला कितीही शोधून तक्षक सापडत नव्हता. तेव्हा त्याने सर्प संहाराचा निर्धार केला. एक असा महायज्ञ आरंभला की नुसत्या मंत्रोच्चाराने जगाच्या कानाकोपर्‍यातले साप व नाग आपोआप येऊन त्या यज्ञकुंडात पडू लागले आणि होरपळून मरू लागले. सगळेच साप मारायचा यज्ञ होता त्यामुळे त्यातून आपली सुटका होणार नाही याची तक्षकाला खात्री पटली होती. जगातच नव्हे तर अवघ्या विश्वात त्याच्यासाठी कुठे सुरक्षित जागा नाही, असे वाटल्यामुळे त्याने स्वर्गातल्या इंद्राकडे धाव घेतली. इंद्राच्या पायावर लोळण घेतली. स्वत:ला इंद्राच्या दोन्ही पायात गुरफटून घेतले. इथे जनमेजयाचा यज्ञ जोशात आलेला होता. त्यातही हजारो सापांचा व नागांचा होरपळून संहार झाला होता. मात्र तक्षकाचा त्यात समावेश नसल्याने सर्पसत्र चालूच होते. 'तक्षकाय स्वाहा' असा मंत्र जपूनही तो हवनाच्या आगीत येत नव्हता. तेव्हा जनमेजयाने हवनकर्त्याकडे विचारणा केली. त्यांनी अंर्तज्ञानाने शोध घेतला तर तक्षक इंद्राच्या पायांना गुंडाळून बसल्याचे आढळून आले. थोडक्यात इंद्राने त्याला संरक्षण दिले असल्याचे त्याच्या लक्षात आले. जनमेजय त्यामुळे खवळला. हवनकर्त्यांना त्याने आदेश दिला. पापी तक्षकाला इंद्र संरक्षण देत असेल, तर तक्षकासह इंद्राल्राही या यज्ञकुंडात जाळून भस्म करा. म्हणा, इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. याचा मंत्रोच्चार झाल्यावर इंद्राचे आसनही डगमगू लागले. जेवढय़ा आवेशात मंत्राचे उच्चारण चालू होते. तेवढे इंद्राचे आसन गडबडत गेले. अखेर पायात गुरफटलेल्या तक्षकासह इंद्र यज्ञाच्या दिशेने ओढला गेला आणि हवनाच्या जागेवर अधांतरी येऊन तरंगू लागला. त्याला त्रिशंकू अवस्था म्हणतात. हे सर्व कितपत खरे आहे याचा पुरावा उपलब्ध नाही म्हणून त्याला शहाणे लोक भाकडकथा म्हणतात. सवाल त्या कथेच्या खरेपणाचा नसतो तर त्यातून दिलेल्या बोधकथेचा असतो. कथेचा शोध घेऊन भागत नाही तर त्यातून बोध घ्यायचा असतो. दुर्दैवाने आपल्या समाजात शोधावर येऊन थांबण्यार्‍या शहाण्यांचा सुळसुळाट झाल्याने अशा बोधकथांच्या भाकडकथा बनून गेल्या आहेत.

'तक्षकाय स्वाहा' बाजूला ठेवून फक्त परिक्षित राजाच्या कडेकोट सुरक्षेची कहाणी तपासा. इवल्या बोरातून अळीच्या रुपाने तिथे तक्षक गेलाच कसा, असा प्रश्न मूर्खपणाचा आहे. कारण त्या कथेतून सुरक्षा कधीच परिपूर्ण नसते. हा बोध घ्यायचा असतो आणि त्याचे शेकडो पुरावे आज देखील एकविसाव्या शतकात उपलब्ध आहेत. सप्टेंबर 2001 मध्ये चार विमाने पळवून अमेरिकेमध्ये भीषण घातपात घडवणार्‍या 19 दहशतवाद्यांना कोणी रोखू शकले होते काय? ते वैमानिकाचे प्रशिक्षण घ्यायला तिकडे गेले आणि अमेरिकेच्या कडेकोट सुरक्षेला त्यांनी भेदून दाखवलेच ना? अळीचे रुप धारण करणारा तक्षक आणि विद्यार्थी म्हणून अमेरिकेत गेलेले लादेनचे दहशतवादी यात नेमका काय फरक आहे? योग्य संधी मिळताच अळीसारखा दिसणार्‍या तक्षकाने आपले वास्तव रुप धारण करून परिक्षिताला दंश केला तर लादेनच्या जिहादींनी योग्य संधी मिळताच साध्या प्रवासी विमानांचे महाविनाशक बॉम्ब बनवून गगनचुंबी जुळे मनोरे उद्ध्वस्त केले. परिक्षित राजाच्या कथेतला हा बोध आहे. सावध रहाणे ही सुरक्षा आणि गाफील राहणे हाच घात असा तो बोध आहे. मनोरंजक भाषेत समजावण्यासाठी बाकीची भाकडकथा रचलेली असते. आता या भाकडकथेवर मी इथे प्रवचन करण्याचे कारण काय? ते कारण त्याच कथेच्या उर्वरित भागात आहे. तक्षकाशी संबंधित आहे. पाप व गुन्हा करणार्‍याला कोणी संरक्षण देत असेल, तर गुन्हेगारासोबत आश्रयदात्यालाही शिक्षा फर्मावणे भाग असते, असा उत्तरार्धातील कथेचा अर्थ आहे. तक्षकाला इंद्र वाचवणार असेल, तर इंद्रालाही यज्ञातला बळी करायला हवे. गुन्हेगाराला पाठीशी घालतो तो तेवढाच गुन्हेगार असतो असा त्याचा बोध आहे. आजच्या संदर्भात तो न्याय कोणाला लागू होतो?