शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

मोर्चातून राजने काय साधले?मोर्चातून राजने काय साधले?

   अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार त्याची उत्तरे शोधत आहेत. त्यामुळे जेवढी माणसे तेवढी वेगवेगळी उत्तरे समोर येत आहेत. कोणी म्हणतो त्याने शिवसेनेला हिंदूत्वात मागे टाकले आहे; तर कोणी म्हणतो आता वाट चुकलेला राज ठाकरे पुन्हा हिंदूत्वाच्या वळणावर येतो आहे. कोण म्हणतो विरोधी राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती राज भरून काढतो आहे; तर कोणाला त्यात राज विविध जाती प्रांतीय समाज घटकात भांडणे लावतो असाही साक्षात्कार झालेला आहे. हे असे मतप्रदर्शन करणार्‍यात सामान्य नागरिकांपासून मोठ्या अभ्यासू पत्रकारांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. मग एकच प्रश्न पडतो, की घडलेली घटना एकच आहे; तर त्याचे इतके भिन्न भिन्न अर्थ कसे लावले जाऊ शकतात? आणि त्याचे उत्तर सोपे आहे. प्रत्येकजण त्याकडे वेगवेगळ्य़ा कोनातून बघत असेल तर त्याला त्याला वेगवेगळेच दिसणार. आणि मग जे दिसले किंवा जे पाहिले त्याप्रमाणेच त्याचा अर्थ लावला जाणार. पण अशी अवस्था सामान्य माणसाची नसते. केवळ म्हणूनच चार दिवसाच्या घोषणेतून इतक्या मोठ्या प्रमाणात सामान्य जनता त्या मोर्चामध्ये अशी उत्स्फ़ुर्तपणे सहभागी झाली. आणि त्यातून राज ठाकरे यांनी काय साधले? बहूतेक राजकीय नेत्यांना आणि राजकीय अभ्यासकांना त्याच प्रश्नाने सतावले आहे. कारण त्यांना लोकांच्या भावनांशी कर्तव्य नसते तर घटनेमुळे राजकारणाचा लंबक कोणत्या दिशेने झुकणार यातच रस असतो. सहाजिकच पहिल्याच मोर्चाने लोकांचे डोळे दिपवणार्‍या राजने त्यातून साधले काय; हा त्या ‘असामान्य’ लोकांना सतावणारा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचे उत्तर शोधताना अशा मोर्चाची काय गरज होती आणि त्याला कोणी कोणी कसा प्रतिसाद दिला त्याचा अभ्यास केला, तर त्या प्रश्नाचे उत्तर सापडणे अवघड अजिबात नाही.

   ११ ऑगस्ट रोजी जी घटना मुंबईच्या आझाद मैदान परिसरात घडली, ती सामान्य दंगल नव्हती. त्यात सहभागी झालेल्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी पोलिसांची वाहने जाळली. त्यांनी माध्यमांच्या गाड्यांवर व पत्रकारांवरही हल्ला चढवला. त्यांनी महिला पोलिस व अन्य महिलांनाही सतावले. मो्डतोड केली. त्यांनी तिथेच असलेल्या अमर जवान स्मारकाचीही विटंनबा केली. आणि हे सर्व होत असताना तिथे मोठ्या प्रमाणावर पोलिस उपस्थित असूनही कुठली कठोर कारवाई झाली नाही. दंगा करणार्‍यांच्या हाती त्या परिसराचे सर्वाधिकार जणू पोलिस आयुक्तांनी सोपवून दिले असावेत अशीच परिस्थिती होती. म्हणुनच जितका वेळ त्या गुंडांना मस्ती करायची होती व जशी मोडतोड करायची होती, तशी त्यांनी केली आणि कंटाळा आल्यावर ते निघून गेले. ते निघून गेले म्हणून शांतता प्रस्थापित झाली. पोलिसांनी कारवाई करून व कायद्याचा बडगा उगारून शांतता प्रस्थापित केली नाही; की परिस्थिती नियंत्रणात आनली नाही. जशी वादळी लाट अडवता येत नाही म्हणुन ती ओसरण्याची प्रतिक्षा केली जाते, तसा कायदा व पोलिस यंत्रणा दंग्याचा भर ओसरण्याची प्रतिक्षा करत होते. जे लोकांनी पाहिले व त्याची दृष्ये आपापल्य कॅमेराने टिपली; त्यातून हेच सिद्ध होते. जेव्हा माणुस अशा अनुभवातून जातो व त्याला आपले पोलिस म्हणजे आपला रखवालदारच इतका हतबल झालेला दिसतो, तेव्हा त्याचा जगण्यातल्या शाश्वती व सुरक्षेवरचा विश्वासच उडून जातो. ते पहिल्याच दिवशी झालेले होते. पण नंतरच्या घटनाक्रमाने मुंबईकरांचा धीरच सुटत गेला. मुंबईत व महाराष्ट्रात सरकार व कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, अशी सामान्य माणसाची खात्रीच पटली. असुरक्षिततेच्या भावनेने लोकांना पछाडले होते. कारण चित्रण, छायाचित्रे व पुरावे उपलब्ध असतानाही पुढल्या आठवडाभरात पोलिस व सरकारकडून त्या दंगा माजवणार्‍या गुंडांना पकडण्याच्या कुठल्याही हालचाली होताना दिसत नव्हत्या. मग लोकांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचे? या मुंबईत व देशात आपला कोणीच वाली उरला नाही अशीच एक सार्वत्रिक भावना तयार झाली होती.  

   तिथेच हा घटनाक्रम संपत नाही. मुंबईत त्या मुस्लिम गुंडांनी जो हैदोस घातला त्यात महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण तरीही त्यांच्यावर झटपट कारवाई सरकार करत नसल्याने खुद्द पोलिस खात्यातच कमालिची अस्वस्थता पसरली होती. मग सामान्य माणसाची काय अवस्था असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. जे सरकार व पोलिस आयुक्त आपल्या महिला पोलिसांच्या अब्रूशी खेळल्यावरही गुंडांना हात लावायला धजावत नाहीत, त्याच्याकडून आपली सुरक्षा कशी होणार, असे लोकांना वाटणे स्वाभाविक होते. त्यातच मग अफ़वांचे रान पिकले. मुंबईत दंगल आणि त्यात पोलिसांना मारहाण झाली असताना चेन्नई, बंगलोर व पुणे-नाशिक सारख्या महानगरातून ईशान्य भारतातील लोकांचे स्थलांतार सुरू झाले. त्यांना फ़ोन किंवा मोबाईल संदेशातून रमझान संपला मग असामींची कत्तल होणार, अशा धमक्या दिल्या जात होत्या. त्यातूनच हे स्थलांतर सुरू झाले होते. याचाही परिणाम मग मुंबईच्या मनोधैर्यावर होणे स्वाभाविक होते. राज ठाकरे यांच्या मोर्चाच्या घोषणेला हीच पार्श्वभूमी लाभली होती. कोणीतरी अशा नाकर्तेपणा व गुंडगिरीच्या विरोधात आपल्याला आधार द्यायला आणि धमकावणार्‍याला आवाज द्यायला उभा रहावा; अशीच मुंबईकरांची अपेक्षा होती. पुर्वीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा आवाज द्यायला पुढे येत असत. हल्ली ते प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण त्यांच्या नुसत्या मतप्रदर्शानानंतर पुर्वी जशी मुंबईत शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटलेली दिसायची, तशी हल्ली दिसत नाही. त्यामुळे ती पोकळी भरून काढणारा कोणी आहे काय, अशा शोधात लोक होते. त्याच दिशेने पहिले पाऊल टाकत राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली.

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून राज यांनी काढलेला हा पहिलाच मोर्चा आहे. पण त्यांनी तो अशा मोक्याच्या क्षणी काढला, की नागरिकांचा त्याला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मि्ळेल याची हमीच होती. कारण जे घडले त्यावरील संप्ताप व्यक्त करण्याची संधी सामान्य माणूस शोधत होता. आणि सामान्य माणूस याचा अर्थ केवळ नागरिक असा नाही, तर त्यात पोलिसांचाही समावेश होता. अगदी उघडपणे आपल्या सेक्युलर मुखवट्याला तडा जाऊ नये म्हणून तसे न बोलणार्‍या पत्रकारांचाही त्यात समावेश होतो. अशा सर्वानाच मोर्चा हवा होता. त्यामुळेच त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी कुठलेही खास प्रयास मनसेला करावे लागले नाहीत. त्या मोर्चात एका पोलिस वसाहतीमधली पोलिसांची मुले मुद्दाम वेगळ्या वेशात आली होती. महिलाही मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी झाल्या होत्या. त्या दिवशीही राज ठाकरे आपल्या मराठी बाण्याला चिकटून राहिले, पण त्यांनी त्या दिवशी बिगर मराठी नागरिकांचीही मने जिंकली. त्या्चे पडसाद केवळ मुंबईतच नव्हेतर थेट आसाममध्येही उमटले. मोर्च्याचा दुसर्‍या दिवशी तिथल्या तमाम आसामी भाषिक दैनिकांनी राज ठाकरे व मनसेचा मुंबईतील मोर्चा; यांची पहिल्या पानावर नुसती बातमीच दिली नाही तर त्याच बातमीची हे्डलाईन केली होती. राजच्या सभेला लोटलेल्या गर्दीचे मोठमोठे फ़ोटो त्या वृत्तपत्रांनी का छापावेत? देशातले तमाम पक्ष व त्यांचे दिग्गज नेते आसामी जनतेला पाठींब्याचे व सुरक्षेचे हवाले देत आहेत. पण त्यांच्या बाबतीत आसामी माध्यमांनी इतकी आस्था कुठे दाखवली नाही. ती आस्था राजच्या त्या एका दणदणीत मोर्चाने का मिळवावी? आपल्याकडले राजकीय अभ्यासक त्याचा विचार तरी करणार आहेत काय? त्याचा विचार केला तरच राजने मोर्चा काढून काय साधले त्याचे खरे उत्तर मिळू शकेल.

   आजवर सतत मराठी बाणा घेऊन परप्रांतियांच्या लोंढ्यावर आघात करणार्‍या राजने सतत मुंबईतल्या अन्य भाषिकांचा राग ओढवून घेतला होता. पण एक मोर्चा नेमक्या वेळी काढून त्यांनी त्या सर्वांना जिंकून घेतले. कारण स्वत:ला राष्ट्रीय वा अखिल भारतीय म्हणवून घेणारे सर्वच पक्ष घडल्या प्रकाराबद्दल गप्प होते किंवा तोंडी प्रतिक्रिया देऊन गप्प झाले होते. कोणाला मुंबईच्या असुरक्षिततेची फ़िकीर नव्हती. मनोधैर्य गमावलेले पोलिस आणि भेदरलेला मुंबईकर यांच्या वेदनेवर फ़ुंकर घालायला आला तो राज ठाकरे. अन्य वेळी त्याच अमराठी मतांसाठी राजकारण करणारे मूग गिळून गप्प होते. जणू दंगल केली ते सगलेच परप्रांतिय असावेत आणि त्यांच्या विरुद्ध बोलले तर मते जातील; अशी सर्वांना भिती होती काय? की दंगा करणारे मुस्लिम आहेत म्हणुन त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे आपल्यावर हिंदूत्वाचा शिक्का बसेल म्हणून सगळे पक्ष गप्प होते काय? जे घडले ते मुस्लिम गुंडांकडून घडले तरी त्याचा धर्माशी संबंध नव्हता. आणि असेल तर त्याच्या पलिकडे जाऊन राष्ट्रप्रेमासाठी पुढे येण्याची गरज होती. कारण हैदोस घालणार्‍यांनी कुठले मंदिर पाडले म्हणुन मोर्चा काढायचा नव्हता. त्यांनी जो हल्ला चढवला तो कुणा हिंदूवर चढवला नव्हता. तो हल्ला तुमच्या आमच्या भारतीय असण्य़ावरचा हल्ला होता. भारतीय सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. महिला पोलिसांची अब्रू घेतली म्हणजे भारतीय महिलेची अब्रू घेतली होती. आणि त्यासाठीच त्या हिंसेच्या विरोधात अवाज उठवणे अगत्याचे होते. त्याला कोणी हिंदूत्व समजणार असेल तर पर्वा नाही, असे म्हणायची हिंमत दाखवायला हवी होती. ती राजने दाखवली. आणि म्हणूनच त्याने त्या एका मोर्चातून फ़क्त मुंबईकर महाराष्ट्राच्या जनतेचीच मने जिंकली नाहीत; तर हजारो मैल दूर असलेल्या आसामी जनतेची मने जिंकली. ते खुल्या दिलाने मान्य करायला तिथल्या पत्रकारांना लाज वाटली नाही. त्यांनी राजच्या त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात ठळक प्रसिद्धी देऊन त्याचीच साक्ष दिली आहे.

   महाराष्ट्रात आपण मराठी भाषेच्या आग्रहासाठी आक्रमक असलो तरी जेव्हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय तेवढा गंभीर असेल तेव्हा आपण तेवढेच आक्रमक होऊ शकतो आणि आहोत; हेच राजने दाखवून दिले. म्हणूनच त्याने त्या एका मोर्चातून देशाभिमानी भारतियांची मने मंगळवारी जिंकली आहेत. इथे मुंबईत दंगा करणारे, महिलांची अब्रू चव्हाट्यावर घेणारे, तिकडे उत्तरप्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची व बुद्ध मुर्तीची विटंबना करणारे, अमर जवान स्मारकाची मोडतोड करून पायदळी तुडवणारे; अशा अराजकासमोर उभा रहाणारा कोणीही नेता या देशात नव्हता. ना मायावतींनी तिकडे आवाज उठवला ना इथे दलित नेत्यांनी आवाज उठवला. ना मुंबईतल्या कोणा पक्ष वा नेत्यांनी घडल्या प्रकारानंतर रस्त्यावर येण्याची हिंमत दाखवली. त्यामु्ळे नुसते मुंबईकरच नव्हे तर संपुर्ण देशातच अस्वस्थता होती. कोण या रझा अकादमी नावाच्या झूंडशाही विरुद्ध उभा राहील, याची अवघ्या देशात प्रतिक्षा चालु होती. कारण झाला तो मुंबईवरचा हल्ला नव्हता, की पोलिसांवरचा हल्ला नव्हता. आणि झाला त्या हल्ल्यनंतरही राज्य सरकार व केंद्र सरकार गप्प होते. कुठेतरी सामान्य दंगल व्हावी असेच प्रतिसाद होते. प्रत्येकजण गुंड मुस्लिम आहेत म्हणुन त्यावर बोलायला बिचकत होता. राजने तीच कोंडी फ़ोडली. लोक काय म्हणतील वा आरोप काय होतील, याची फ़िकीर न करता त्याने मोर्चासाठी पुढाकार घेतला. तिथेच त्यांनी बाजी मारली.

   गुंड देशाच्या स्वाभिमानाला पायदळी तुडवतात, तेव्हा त्यांच्याकडे धर्माच्या नजरेने बघण्याचीच गरज नसते. आणि अशा गुंडांच्या विरोधात बोलणे किंवा मैदानात उतरणे म्हणजे हिंदूत्व असेल तर मग हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व होत नाही काय? देशाभिमानासाठी लढायला रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदूत्व असे कोणाला म्हणायचे आहे काय? त्याचा अर्थ उलट असा होतो, की सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना राष्ट्राभिमान पायदळी तुडवण्याची खुली मुभा. सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना महिलांच्या अब्रूशी खेळायचा खास अधिकार. तसेच या सेक्युलर म्हणून मिरवणार्‍यांना वाटते काय? नसेल तर त्यांनीच असा मोर्चा काढण्यात पुढाकार का घेतला नाही? आज राज ठाकरे काय बोलले त्याच्या विरोधात डरकाळ्या फ़ोडणारे आहेत, त्यांना महिला पोलिसांच्या अबृवरचा घाला लज्जास्पद वा्टत नाही काय? उत्तरप्रदेशात बुद्ध मुर्तीची विटंबना वा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर रागसुद्धा आला नाही काय? मग त्यांनी मुंबईत हल्ला झाल्यावर मोर्चा काढण्यात पुढाकार का घेतला नाही? की सेक्युलर विचार म्हणजे मुस्लिम गुंडांना कुणाच्याही विटंबनेचे खास अधिकार, असे त्यांचे सेक्युलर मत आहे? नसेल तर त्यांच्यापैकी कोणी मोर्चासाठी पुढाकार का घेतला नाही? तेच कशाला खुद्द मुस्लिमांची पार्टी म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजवादी पक्षाने किंवा मुस्लिमांच्या मतांसाठी सतत स्पर्धा करणार्‍या कॉग्रेस वा राष्ट्रवादी पक्षाने असा मोर्चा काढण्यात पुढाकार का घेऊ नये? अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्याबद्दल काही म्हटले म्हणून पितृतुल्य पवारांच्या प्रतिष्ठेसाठी ठाण्यात अण्णांचा पुतळा जाळणार्‍या जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्राभिमान कळव्याच्या मुस्लिम मतांखाली गाडला गेला आहे काय? त्यांनी या गुंडांच्या विरोधात मोर्चा का काढला नाही?

   यातल्या प्रत्येकाने एकच गोष्ट दंग्यानंतर सिद्ध केली, की सेक्युलर म्हणजे मुस्लिम धर्मांधतेचे चोचले पुरवणे. मुस्लिम धर्मांधतेसमोर राष्ट्राभिमान गहाण टाकणे. सेक्युलर राजकारण म्हणजे राष्ट्राभिमानाची पायमल्ली; असाच सिद्धांत यामुळे मांडला गेला आहे. किंबहूना या सर्व सेक्युलर पक्षांनी एकच गोष्ट या निमित्ताने दाखवली; की ते गुंड मुस्लिमांनाच मुस्लिम मानतात व जे मुस्लिम शांत जीवन जगतात, त्यांना इथले सेक्युलर मुस्लिम मानतच नाहीत. असल्या राजकीय भूमिकेने सामान्य मुस्लिम उर्वरित लोकांसमोर बदनाम होत आहे आणि त्याला त्या गुंडांपेक्षा सेक्युलर पक्ष व विचारवंतच जबाबदार आहेत. राजने आपल्या या मोर्चातून त्या सेक्युलर थोतांडालाही तडाखा दिला आहे. देशाभिमानी मुस्लिमांना सेक्युलर पक्ष साथ देत नाहीत; तर गुंड मुस्लिमांनाच साथ देतात, हे पितळ त्या मोर्चाने उघडे पाडले आहे. आणि तीच मला वाटते या मोर्चाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आपले धर्मनिरपेक्ष धोरण कायम राखताना आणि हिंदूत्वाची कास न धरताही, राजने सेक्युलर पाखंडाला नागडेउघडे करून टाकले आहे. कारण त्याने गुंडगिरीच्या विरोधात व रा्ष्ट्रद्रोहाच्या विरोधात मोर्चा काढला होता, त्यात जो कोणी हिंदूत्व शोधतो, त्याचा सेक्युलॅरिझम बेगडी आहे हे पुराव्यासह सिद्ध झाले. कारण या लोकांनी सेक्युलर म्हणून गुंड मुस्लिमांना पाठीशी घालताना देशाभिमान व सरकारी कायदा अपमानित व्हायलाही मान्यता दिलेली आहे. पण त्यामुळेच आता सामान्य लोकांसमोर स्पष्ट पर्याय उभे राहिले आहेत. यापुढे लोकांना काय हवे त्याचा निर्णय सोपा झाला आहे.

  सेक्युलर विचारवंत, पत्रकार, माध्यमे किंवा पक्ष यांचा राज ठाकरेवर कोणता आक्षेप आहे? त्यांनी मोर्चा काढला तो मुस्लिम गुंडगिरीच्या विरोधात काढला. त्या मुस्लिम गुंडांनी काय केले होते? त्यांनी अमर जवान स्मारकाची विटंबना केली होती. आणि राजने काय केले? त्याच गुंडगिरीच्या विरोधात मोर्चा काढला होता. असा मोर्चा काढणे म्हणजे सेक्युलर लोकांना हिंदूत्व वाटत असेल, तर हिंदूत्वाचा (त्याच सेक्युलर शहाण्यांच्या मते) काय अर्थ होतो? महिलांच्या अब्रूवर हात टाकणे म्हणजे सेक्युलॅरिझम. राष्ट्रीय स्मारकाची विटंबना करणे म्हणजे सेक्युलॅरिझम. आणि हिंदूत्व म्हणजे काय तर महिलांच्या अब्रूला संरक्षण, राष्ट्रीय स्मारकाचा अभिमान म्हणजे हिंदूत्व. कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलिस यंत्रणेच्या पाठराखणीला उभे रहाणे म्हणजे हिंदूत्व. तसे असेल तर लोकांनी आता निवड त्याच दोन पर्यायातून करायची आहे. लोकांना देशाचा अभिमान जपायचा आहे का? मग त्यांना आज सेक्युलर म्हणुन मिरवणार्‍यांची साथ सोडावी लागेल. महिलांना आपली अब्रू जपायची असेल तर त्यांना सेक्युलर विचारांच्या लोकांकडे पाठ फ़िरवून हिंदूत्वाची कास धरली पाहिजे. त्याऐवजी त्यांनी सेक्युलर पक्षांना साथ दिली तर त्यांच्या अब्रूचे पुढल्या काळात धिंडवडे निघणार आहेत. आणि त्यांच्यासाठी कोणीही सेक्युलर पुढे सरसावणार नाही. उलट सेक्युलर राजकारणी सत्तेवर असतील तर अब्रू लुटणार्‍यांना अभय मिलणार आहे. आणि त्या गुन्ह्याविरुद्ध कोणीही आवाज उठवणारा सुद्धा शिल्लक उरणार नाही.

   परवाच्या मोर्च्याने तेच सिद्ध झाले, राज ठाकरे यांनी तेच सिद्ध केले म्हणून तर आसामसारख्या दूरच्या प्रांतामध्ये त्याला इतकी अफ़ाट प्रसिद्धी मिळू शकली आहे. या एका मोर्चातुन राजने स्वत:ला थेट राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. या देशात सेक्युलर थोतांडाला जनता कंटाळाली आहे. त्यापासून मुक्ती देणार्‍या नेत्याच्या शोधात सर्वच प्रांतामधली जनता आहे. त्यामुळेच गुजरातच्या नरेंद्र मोदींना माध्यमे दहा वर्षे बदनाम करीत असूनही भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे लोक आशेने बघत आहेत. प्रत्येक चाचणीत तेच नाव अधिक पाठींब्याने पुढे येत आहे. राज ठाकरे यांनी नेमकी तीच भूमिका घेऊन मोठी राजकीय बाजी मारली आहे. त्यांनी काय साधले, त्याचे हे असे सोपे सरळ उत्तर आहे.

( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २६/८/१२)

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

अण्णा आणि रामदेव दोघात वेगळे काय?


   जुलै महिन्याच्या अखेरीस अण्णा टीमचे सदस्य पुन्हा जंतरमंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांच्या त्या आंदोलनाकडे सरकारने लक्षच दिले नाही. तर ऑगस्ट महिन्याच्या मध्यास रामलिला मैदानावर रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने त्यांचे हजारो समर्थक उपोषणाला बसले होते. त्यांच्याकडेही सरकारने पाठच फ़िरवली. मग त्यांनीही उपोषण सोडून आंदोलन आटोपते घेतले. एक वर्षापुर्वी सरकारने जी राजकीय चुक केली होती, ती यावेळी अजिबात केली नाही. म्हणूनच दोन्ही आंदोलने तशी शांततेत पार पडली. त्यात सरकारची कुठेही नाचक्की झाली नाही. किंवा आपल्यावर सरकारने जबरदस्ती केली वा अत्याचार केला असा आरोप कारायची दोन्ही आंदोलनकर्त्यांना संधी मिळाली नाही. पण त्यामुळे सरकार किंवा सत्ताधारी कॉग्रेसचा मोठा राजकीय विजय झाला असे, त्यांनी समजण्याचे कारण नाही. अर्थात तसे चित्र माध्यमांनी तयार केले असल्याने; या आंदोलनांचे फ़लित काय; असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात उभा रहाणे स्वाभाविक आहे. त्याचे कारणही माध्यमांचा भुलभुलैया हेच आहे. जर ही आंदोलने फ़सली असा कुणाचा दावा असेल तर त्यांना चळवळ किंवा आंदोलन म्हणजे काय, तेच कळत नाही असाच होऊ शकतो. कारण आंदोलने या लहान लढाया असतात. अशा आंदोलनातून लोकमत बनवले जात असते. त्याचे परिणाम दिर्घकाळाने दिसत असतात.

   महात्मा गांधी यांच्या आंदोलनतून कधी, कुठल्या व किती मागण्या लगेच मंजुर झाल्या होत्या? नसतील तर ती आंदोलने फ़सली होती म्हणायचे काय? आणि फ़सलीच असतील तर त्यानंतर स्वातंत्र्य कशाला मिळाले असते? कुठलेही आंदोलन हे दिर्घकालिन प्रक्रियेचा एक भाग असते. मोठा वृक्ष तोडताना जसे त्यावर एकामागून एक घाव घातले जात असतात, तेव्हा प्रत्येक घावाबरोबर झाड पडले किंवा नाही, असे घावागणिक त्या कामाचे मुल्यमापन होऊ शकत नाही. ती दिर्घकालीन प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे लोकपाल किंवा काळापैसा मायदेशी परत आणायची आंदोलने, ही दिर्घकालिन प्रक्रिया आहे. त्यातली ही धरणी किंवा उपोषणे एक एक घाव आहेत. शेवटचा किंवा शंभरावा घाव बसतो, तेव्हा वृक्ष कोसळताना दिसतो. पण ते काम त्य शंभराव्या घावाने केलेले नसते, तर प्रत्येक घावाने जो इवला तुकडा पाडलेला असतो. त्याचा एकत्रित परिणाम शेवटच्या घावानंतर दिसत असतो. तशीच आंदोलनाची प्रक्रिया असते. गांधीजींच्या आंदोलनातही दांडीयात्रा, असहकार आंदोलन अशा अनेक चळवळी झाल्या. त्या प्रत्येकातून स्वातंत्र्याची चळवळ पुढे जात होती. त्यातून ब्रिटीश सराकारची मर्जी संपादन करणे व त्यांच्याकडून काही पदरात पाडून घेणे; असा कुठलाही उद्देश महात्माजींनी डोळ्यासमोर ठेवला नव्हता. त्या प्रत्येक आंदोलनातून लोकांची हिंमत वाढवणे व जनमानसात सत्तेविषयी व कायदा प्रशासनाविषयी असलेली भिती संपवणे; हे त्यांचे खरे उद्दीष्ट होते. जसजशी ती भिती कमी होत गेली व भीड घटत गेली; तसतसा लोकांचा आंदोलनातील सहभाग वाढत गेला होता. आपली शासनाविषयीची नाराजी मनातल्या मनात न ठेवता प्रदर्शित करण्यासाठी लोक अधिकाधिक संख्येने पुढे येऊ लागले. तोच त्या आंदोलनांचा खरा हेतू होता. तो साध्य होत असला तरी त्यांचे आंदोलन कसे फ़सले, ते तेव्हाचा टाईम्स ऑफ़ इंडीया लिहित होता. म्हणूनच आजचे डझनावारी टाईम्स काय लिहितात वा अक्कल पाजळतात, त्याकडे बघण्याची गरज नाही. कारण अशी माध्यमे व वृत्तपत्रे किंवा त्यातले बुद्धीमंत; हे नेहमी सरकारचे मानसिक गुलाम असतात. त्यांच्या निदानावर जाण्याचे काही कारण नाही.

   अण्णा टीमचे जंतरमंतर येथील आंदोलन फ़सले असेल तर त्याला सरकार नव्हेतर तीच मंडळी जबाबदार आहेत. कारण त्यांना आंदोलनाची व्याप्ती किंवा दिशा अजून ठरवता आलेली नाही. वास्तविक हे उपोषण केजरिवाल व त्यांचे अन्य सहकारी करणार होते. मग त्यात अण्णांनी उडी घेतली. याचा अर्थच काही जमेना तेव्हा या लोकांनी त्यात अण्णांना पणाला लावले. मग आपल्याला सरकार वा पोलिस कसे जबरदस्तीने इस्पितळात भरती करणार ,याच्या बातम्या केजरीवालच देत होते. ते त्यांचा धीर सुटल्याचे लक्षण होते. मग त्यांची खिल्ली माध्यमांनी उडवली, तर दोष माध्यमांना देता येणार नाही. मुळातच अण्णा टीमने माध्यमांच्या आहारी जाण्याचे कारण काय? त्यांचे आंदोलन मुद्द्याचे असेल तर माध्यमे प्रसिद्धी देवोत किंवा न देवोत, त्याने आंदोलकांना काय फ़रक पडतो? उद्दीष्ट महत्वाचे. गर्दी नव्हेतर उद्दीष्ट महत्वाचे असते, हे गांधींचे नाव घेणार्‍यांना कोणी सांगायचे? महात्माजी म्हणतात, उद्दीष्ट नक्की करा, मग साधने आपोआप जमा होतात. पण मुंबईच्या उपोषणापासून मी बघतो आहे, की अण्णा टीम उद्दीष्ट विसरून साधने जोडण्यात अधिक गर्क असते. तिथेच त्यांच्या अपयशाची कारणे सामावलेली आहेत. मात्र म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला त्याचे फ़लित मी नाकारणार नाही. लोकांना ते अपयश आवडलेले नाही. आणि लोकांचे त्याबद्दलचे दु:ख वा लोकांच्या मनातली ती बोच, हेच त्यातले एक यश आहे. कारण ज्यांना जंतरमंतर फ़सल्याचे दु:ख झाले आहे; त्यांना त्यांना सरकारचा अधिकच राग आलेला आहे. आणि कुठल्याही आंदोलनात तेच तर मुख्य साध्य असते. कारण लोकशाहीत असा नाराज वर्गच शेवटी मतदार असतो. आणि त्याच्याच कृपेने सत्ताधार्‍यांना सता मिळत असते. तो हातातून सुटेल याची भिती सत्ताधार्‍यांना भयभीत करत असते. म्हणून तर रामलिला मैदानावरून संसदेकडे निघालेल्या रामदेव यांच्या शांत समर्थकांना अटक केली जाते. पण आझाद मैदान परिसरात प्रचंड हिंसक दंगा करणार्‍याना, रमझानचा सण चालू असल्याने हात लावायची हिंमत सरकारला होत नाही. असे का?

   त्यातच सगळे राजकारण दडलेले आहे. ज्यांनी मुंबईच्या आझाद मैदान भागात दंगल केली ते मुस्लिम आहेत आणि ते एकगठ्ठा मतदान करतात. ज्या पक्षाच्या विरोधात त्यांचे धार्मिक नेते फ़तवा काढतील; त्याच्या विरोधात सरसकट मतदान करतात. त्यामुळे मुस्लिमांचा रोष म्हणजे किमान आठदहा टक्के मते इकडची तिकडे होणे असते आणि त्याने विजयाचे पारडे पराजयाकडे झुकू शकत असते. म्हणुनच तिथे सरकार संयम पाळते. ते मुस्लिमांविषयी आस्था आहे म्हणून नव्हेतर मतांचे ते राजकारण आहे. हिंदूधर्मियांचा जगतगुरू म्हटल्या जाणार्‍या शंकराचार्याला पकडताना इथला कायदा किंवा पोलिस डरत नाहीत. पण रझा अकादमीच्या गुंडांनी धुडगुस घातला जाळपोळ केली, तर गुन्हा दिसणारा गुन्हा असूनही त्याला हात लावताना इथल्या कायद्याचे पाय डगमगतात. त्याचे कारण काय? मुस्लिम मते धर्मगुरूच्या फ़तव्यानुसार इकडची तिकडे होऊ शकतात. तसे हिंदू मतदार कुणा धर्ममार्तंडाच्या आदेशानुसार मत देण्याचा धोका नसतो. शिवाय हिंदू धर्ममार्तंड कधी त्या निवडणूकीच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणुनच हिंदूंच्या धार्मिक भावनांची सरकारला भिती वाटत नाही. तेव्हा मुद्दा इतकाच, की सरकार किंवा सत्ताधारी जे असतात वा सत्ताधारी होऊ इच्छित असतात, त्याना धर्म किंवा तत्वज्ञानाशी कर्तव्य नसते, त्यांना निवडणूकीत पडणार्‍या मतांशी कर्तव्य असते. त्या मतांना अण्णा किंवा रामदेव किती धक्का लावू शकतील, यानुसारच सरकार झुकत असते किंवा झुकते माप देत असते. आणि त्याच निकषावर दोन्ही आंदोलानांच्या फ़लनिष्पत्तीचे निदान करणे आवश्यक आहे.

   जंतरमंतरचे अण्णा टिमचे उपोषण आणि रामलिला मैदानावरील रामदेव समर्थकांचे धरणे; यांनी काय मिळवले किंवा साधले याचा हिशोब त्याच पद्धतीने करायला हवा. अण्णा टीमने नवा राजकीय पर्याय देण्याचा पवित्रा घेऊन आपले आंदोलन आवरले. काही मान्यवरांनी त्यांना तसे आवाहन केले आणि ते मान्य करीत अण्णा टीमने विषय संपवला. पण रामदेव यांची कहाणी वेगळी आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाला थेट सत्ताधारी कॉग्रेस पक्षाच्या विरोधात आणुन उभे केले आहे. मात्र त्यांनी नवा राजकीय पक्ष किंवा पर्याय देण्याची भाषा केलेली नाही. तर आज जे कोणी सरकार विरोधी राजकारणात आहेत; त्यांना आपल्या सोबत आणण्यात रामदेव यशस्वी झाले आहेत. गेल्या वर्षी रामलिला मैदानावरील त्यांच्या आंदोलनावर सरकारने लाठ्य़ा उगारल्यापासून रामदेव यांनी आपला कॉग्रेस विरोध उघडपणे मांडण्याचा पवित्रा घेतलेला होता. किमान तो लपवण्याचा प्रयास केला नाही. यावेळच्या आंदोलनात त्यांनी उघडपणे कॉग्रेस म्हणजेच कालाधन किंवा भ्रष्टाचार इथपर्यंत मजल मारली आहे. आणि त्यात त्यांनी बिगर कॉग्रेस पक्षांना आपल्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. त्याला यश म्हणायचे की अपयश म्हणायचे?

   कॉग्रेसचे दिग्विजय सिंग तोंडाळ नेते आहेत आणि त्यांनी हा सगळा संघाचा व भाजपाचा डाव असल्याचा जुनाच आरोप केला आहे. माध्यमांनी त्याचीच री ओढावी यातच माध्यमांच्या अकलेचे प्रदर्शन होते. कारण अण्णा आणि रामदेव यांना एकाच तागडीने मोजता येत नाही. त्यांच्या आंदोलनाचे विषय समान असले तरी दोघांच्या ताकदीमध्ये व आवाहनामध्ये जमीन अस्मानाचा फ़रक आहे. अण्णांचे आवाहन निवडणूकीत फ़रक पाडू शकत नाही. पण रामदेवांचे आवाहन मोठाच फ़रक पाडू शकते. त्याची प्रायोगिक झलक गोव्यात नुकतीच मिळालेली आहे. उत्तरप्रदेश बरोबर ज्या विधानसभा निवडणूका झाल्या, त्यातच गोवा या छोट्या राज्य विधानसभेची निवडणूक झाली. त्यात भाजपाने इतिहास घडवला. त्याचे श्रेय कोणी कधी रामदेव यांना दिले नसले, तरी तो माणूस ऐन मतदानाच्या कालखंडात तिथे ठाण मांडून बसला होता. योग शिबीरे घेऊन त्यात त्यांनी कॉग्रेस विरोधी प्रचाराची धमाल उडवून दिली होती. रामदेव यांच्या शिबीरात सर्वधर्मिय मोठ्या संख्येते हजेरी लावतात. तेवढेच नाही तर त्यांच्या भक्तीला लागतात. त्यामुळेच मतांवर त्यांचा किती प्रभाव पडतो; त्याची चुणूक गोव्यात मिळाली आहे. कारण दि्र्धकाळानंतर तिथे प्रथमच भाजपाला स्वत:चे बहुमत मिळाले आहे. पण त्या बहुमताचे वैशिष्ट्य असे, की भाजपाचे उमेदवार म्हणून चार कॅथलिक ख्रिश्चन निवडून आले आहेत. त्यांपैकी एकाला मंत्रीपदही देण्यात आले आहे. हे कसे घडते याचा बारकाईने अभ्यास केला; तरच रामदेव मतांचे पारडे कसे झुकवू शकतात, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. अटीतटीच्या लढाईत किरकोळ मतेही पारडे फ़िरवत असतात. एकदोन टक्क्यांनीही चमत्कार घडतो. 1984 साली राजीव गांधींच्या कॉग्रेसला पन्नास टक्क्यांपेक्षा किंचित कमी मते पडली होती. पण लोकसभेत त्यांनी 78 टक्के जागा जिंकल्या होत्या. 1998 सालात कॉग्रेसची मते भाजपापेक्षा थोडी जास्तच होती, पण जागा भाजपापेक्षा कमी मिळाल्या होत्या. असे निवडणूकीचे गणीत चमत्कारिक असते. आतासुद्धा बघा. तीन वर्षापुर्वी 2009 सालात झालेल्या निवडणुकीत दोन पक्षात दहा टक्के मतांचा फ़रक आहे पण जागांमध्ये मात्र दुपटीचा फ़रक आहे. तिथेच मोठा फ़रक असतो. तो फ़रक जो पाडू शकतो, तोच निवडणू्क निकालांना कलाटणी देऊ शकतो. ते गणित कळले वा समजून घेतले, तर रामदेव बाबा काय चमत्कार घडवू शकतील त्याचा अंदाज येऊ शकेल.

   2009 च्या निकालाचे आकडे बघा. कॉग्रेसला मिळालेली मते 28 टक्के तर भाजपाला मिळालेली मरे 18 टक्के होती. नेमक्या आकड्यात सांगायचे तर कॉग्रेसला 11 कोटी 91 लाख मते मिळाली. भाजपाला 7 कोटी 84लाख मते पडली. एकूण 41 कोटी 71 लाख लोकांनी केलेल्या मतातील मिळालेली ही मते आहेत. साधारण 70 कोटी मतदारांपैकी 42 कोटी मतदान झाले; म्हणजे 60 टक्केपेक्षा कमी मतदान झालेले आहे. यातला जो 40 टक्के म्हणजे 28 कोटी मतदार उदासिन आहे, त्यातला किती मतदानासाठी बाहेर काढला जातॊ त्यावर निकाल किती बदलू शकतात? किंवा जे मतदान होते, त्यात प्रभाव पाडणारा कोणी राजकारणबाह्य घटक असेल तर किती फ़रक पडू शकतो? मुस्लिम मौलवी किंवा इमाम जे करतात, तसाच फ़रक रामदेव पाडू शकतील का? सतरा टक्के मुस्लिम मतांपैकी आठदहा टक्के मुस्लिम मतदान करतात, ते अशा फ़तव्यामुळे एकगठ्ठा मतदान करतात, त्यातून ते निकालाचे पारडे झुकवत असतात. म्हणूनच भारतातले सर्वच पक्ष मुस्लिम भावनांना जपत असतात. ते आजवर हिंदूंच्या बाबतीत झालेले नाही. पण योगसामर्थ्याने रामदेव यांनी धर्मापलिकडचा प्रभाव हिंदूंसह अन्य धर्मियांवर निर्माण केला आहे. तो निवडणूकीत वापरायचे ठरवले तर मोठाच चमत्कार घडू शकतो. कुणा राजकीय अभ्यासकाला माझे हे मत किंवा निष्कर्ष हास्यास्पद वाटेल. कारण त्यांना रामदेवाची भगवी वस्त्रे तेवढी दिसत आहेत. पण त्याचे योगाने निर्माण केलेले स्थान बघता आलेले नाही. ते समजून घेतले तर त्याचा मतांवर पडू शकणारा प्रभाव समजू शकेल. त्याचे आवाहन धर्माचे नाही तर चिंतामुक्त, भ्रष्टाचारमुक्त, महागाईमुक्त, व काळापैसामुक्त राज्याचे आहे. आणि त्याला प्रतिसाद देणारा वर्ग त्याने वेळोवे्ळी समोर आणलेला आहे. तो वर्ग बाबाच्या आवाहनानुसार मतदानाला बाहेर पडू शकतो का?

   हा बाबा जिल्हा तालुक्याच्या गावात आठवडाभर भल्या पहाटे योगाची शिबीरे भरवतो, त्यासाठी पदरमोड करून लोक हजारांनी गर्दी करतात. नुसते पैसेच मोजत नाहीत तर अवेळी पहाटे उठून तिकडे हजेरी लावतात. त्यांची बाबावरील निष्ठाच त्यातून समोर येत नाही का? त्याच जोरावर त्यांनी आठवडाभर लाखभर लोकांना रामलिला मैदानावर आणून बसवले होते. ज्या निष्ठेने एवढे लोक तिकडे जमा होतात, त्याच्या शेकडोपटीने लोक जिल्हा तालुका पातळीवर बाबाला मतदानाचा प्रतिसाद द्यायला बाहेर पडू शकतात ना? ते काम योगशिबीरापेक्षा खुपच सोपे व कमी त्रासदायक आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या वेळेत जाऊन बाबा म्हणतील त्या उमेदवार किंवा पक्षाला मत द्यायचे आहे. असे किती मतदार असू शकतात? कुणा राजकीय विश्लेषकांनी विचार तरी केला आहे काय? मागल्या दहापंधरा वर्षात या बाबाने किमान हजारापेक्षा अधिक योग शिबीरातून दहापंधरा कोटी लोकांना प्रभावित केले आहे. त्यातले निम्मे तरी त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास मतदानाला निष्ठापुर्वक बाहेर पडले, तर त्यांची संख्या पाचसहा कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. त्यामुळे 42 कोटी ऐवजी एकुण मतदान 50 कोटींच्या घरात जाऊन पोहोचू शकते. किंवा जे मतदान आहे त्यातलेच तो पाचसात कोटी मतदार त्याला हवे तिकडे फ़िरवू शकतो. त्यामुळेच आजवरचे जे निवडणूकीचे समिकरण आहे, ते पुर्णपणे विस्कटून टाकायची कुवत त्याच्या आवाहनामध्ये आहे. आणि त्या बाबाने आपला कल रामलिला मैदानावरचे उपोषण आवरताना दाखवून दिला आहे.

   कालाधन वापस लाना है, कॉग्रेसको हराना है; लोकतंत्र बचाना है, कॉग्रेसको हराना है, याच रामदेव यांनी समारोप केलेल्या मेळाव्याच्या घोषणा होत्या. त्याचा अर्थच साफ़ आहे, की आजवर ज्यांनी मुस्लिम एकगठ्ठा मतांचे राजकीय हिशोब मांडले आहेत; त्यांना आता रामदेव बाबाच्या योगाने प्रभावित झालेल्या एकगठ्ठा मतांचा विचार करावाच लागणार आहे. त्यात अण्णा टीमच्या आंदोलनाप्रमाणे बेबनाव निर्माण करता येणार नाही. कारण रामदेव यांचे आंदोलन हे लोकशाही पद्धतीने विचारविनिमय करून चालत नाही, की आयोजीत केले जात नाही. त्याची धोरणे समिती बसून चर्चेनंतर निश्चित करत नाही. तिथे कुठली टीम वगैरे नाही. बाबा वाक्यम प्रमाणम अशी स्थिती आहे. शिवाय त्या बाबाला सेक्युलर वगैरे मुखवटा लावायची गरज भासलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर संघपरिवाराचे आरोप करून उपयोग नाही. त्यांनी थेट गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर बसून मोदींचा गौरवही केला आहे. त्यामुळे त्यानंतर लगेच दिल्लीत रामलिला मैदानावर झालेल्या उपोषणाच्या गर्दीत कुठला फ़रक पडू शकला नाही. आणि सर्व विरोधी पक्षांना व्यासपीठावर घेताना बाबांना कुठलीही अडचणही आलेली नाही. दिग्विजय सिंग किंवा अन्य कोणाचे संघसंबंधाचे आरोप बाबावर निरूपयोगी ठरले आहेत. थोडक्यात मुस्लिम मतांच्या एकगठ्ठा प्रभावाला शह देणारा दुसरा मतांचा गठ्ठा रामदेव यांनी तयार केला आहे. आणि त्यांनी मोदी यांचा खुल्या भाषेत सन्मान करून आपला भावी उमेदवार कोण तेही सुचित केले आहे. मात्र मोदींचे नाव आताच घेतलेले नाही.

   रामदेव बाबांनी आपले वजन नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात टाकले तर त्याचा अर्थ पा्चसहा कोटी मते असा होतो आणि त्याचाच दुसरा अर्थ मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा 30 टक्क्यांच्या पलिकडे जाणे असा होतो. आधीच उद्योगपतींनी मोदींच्या पारड्यात वजन टाकले आहे. मतचाचण्यांमध्ये मोदींनी मनमोहन सिंग यांना मागे टाकले आहे. त्यात पुन्हा रामदेव बाबांच्या पाठींब्याचे वजन पडले तर 2014 सालच्या निवडणुकांचे निकाल काय लागू शकतात? भाजपाकडे आहेत त्या जागा टिकवू शकेल असा नेता दुसरा कोणी नाही. पण असेल तर तो मोदीच आहे. पण त्यामुळे नितीश वा अन्य कुणी मित्रपक्ष विचलित होऊन बाजूला झाले, तर त्यांच्याशिवाय बाजी मारायला लागणारी मते द्यायला रामदेव बाबा पुढे येऊ शकतो. नव्हे त्यांनी तसा कल दाखवलाच आहे. अण्णा टीम आणि रामदेव यांच्यातला हाच मोठा फ़रक आहे. अण्णा टीमसमोर राजकीय पर्याय सोडा हेतूही स्पष्ट नाही की आपला चेहरा वा आपला मतदारही स्पष्ट नाही. तर रामदेव यांच्याकडे मोदी नावाचा चेहरा आहे. योगनिष्ठ मतदार ठरलेला आहे आणि कॉग्रेसला पराभूत करण्याचा राजकीय हेतूही स्पष्ट आहे. त्यांच्या योगनिष्ठेमध्ये गुंतलेल्या व त्यासाठी बाबांच्या इच्छेला प्रमाण मानणार्‍या पाचसात कोटी मतदाराला हिशोबात घेऊनच त्याचे राजकीय परिणाम मोजता येऊ शकतात. पण त्यासाठी पक्षनिरपेक्ष चष्मा राजकीय विश्लेषकांना डोळ्य़ावर चढवावा लागेल. तरच हे सत्य डोळसपणे बघता येईल वा सांगता येईल.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १९/८/१२)

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

मोदी अडवा(आ)णी, नितीशकुमार जिरवा

 

  पुढल्या सार्वत्रिक निवडणूकांना अजून वीस महिन्यांचा कालावधी बाकी आहे. दरम्यान अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. पण प्रत्येक राजकीय पक्ष २०१४ सालाकडे नजर लावूनच आपले डाव खेळतो असेच वाटते आहे. अगदी जे थेट संसदेच्या राजकारणात आज नाहीत व ज्यांना तशी आशा नाही तेसुद्धा त्यात लुडबुडताना दिसत अहेत. उलट ज्यांना त्या शर्यतीत ख्ररी संधी आहे असे मानले जाते; त्यांनी मात्र तिकडे पाठ फ़िरवल्याप्रमाणे त्यांचे वागणे आहे. कॉग्रेसने दिर्घकाळ राहुल गांधी यांना पुढल्या लोकसभेत पंतप्रधान बनवण्याचा मनसुबा मागल्या निवडणुकीतच बांधला होता. दिल्लीची सत्ता दुसर्‍यांदा काबीज केल्यापासून तशी मांडणी सुद्धा केली होती. त्यानुसारच राहुल यांनी आधी बिहार व नंतर उत्तरप्रदेशात जोरदार मुलुखगिरी केली. त्याचे कारणही स्पष्टच होते. जोवर या दोन उत्तरेतील हिंदी भाषिक राज्यात कॉग्रेस आपला भक्कम पाया पुन्हा निर्माण करत नाही, तोवर तिला लोकसभेत बहुमतच्या जवळ पोहोचणे शक्यच नाही. आणि स्वत:चे बहूमत असल्याशिवाय गांधी घराण्याला हुकूमत गाजवणे अशक्य वाटते. म्हणूनच त्यांनी बिहार उत्तरप्रदेशमध्ये युवराजांना मोकाट सोडले होते. पण त्यांनी इतका अतिरेक केला, की लोकसभेत ज्या सदिच्छा कॉग्रेसने मिळवल्या होत्या त्या विधानसभा निवडणुकीत गमावल्या. अगदी रायबरेली व अमेठी या आपल्या बालेकिल्ल्यातही त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यानंतर राहुल गांधी जवळपास विजनवासातच गेले आहेत. तर लागोपाठच्या घोटाळे व अण्णा-रामदेवांच्या आंदोलनाने कॉग्रेस मेटाकुटीला आली आहे. त्यामुळेच स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार आता कॉग्रेसने सोडला आहे. आहे तीच आघाडीची सत्ता टिकवण्याची धडपड सुरू आहे.

   या २०१४ च्या शर्यतीमधला दुसरा स्पर्धक अर्थातच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा आहे. पण जे तिकडे राहुळ गांधींचे झाले, तेच इकडे भाजपाच्या अनेक उतावळ्या नेत्यांचे झाले आहे. त्यातले अनेक भाजपा नेते अजून १९९५-२००० या कालखंडातून बाहेर पडू शकलेले नाहीत. तर त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आपली मुले शोभतील अशा पोरांमध्ये लुडबुडत आहेत. आपल्याला बॅटींग मि्ळाली नाही तर चेंडू किंवा बॅट घेऊन निघून जाणार्‍या पोरासारखे त्यांचे वागणे चकीत करून सोडणारे आहे. मागल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएने त्यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवले होते. पण दोन दशकापुर्वी केलेल्या रथयात्रेच्या कालबाह्य भ्रमातून अडवाणी अजून बाहेर पडू शकलेले नाहीत. त्यांनी साडेतीन वर्षापुर्वी तोच रथयात्रेचा खेळ केला आणि तो फ़सला तरी त्यांनी गेल्या वर्षी पुन्हा तेच नाटक केले. त्याचीही चांगलीच फ़सगत झाली. २००९ च्या निवडणुकीतला पराभव पचवून बाजूला होण्याचे शहाणपण त्यांना अजून सुचलेले नाही. उलट नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले, तेव्हापासून अडवाणी लहान मुलांना लाजविल असा पोरकटपणा करू लागले आहेत. गतवर्षी त्यांनी अण्णा हजारे यांच्या रामलिला मैदानावरील उपोषणानंतर भ्रष्टाचार विरोधी रथयात्रा काढली होती. तेव्हा त्यांनी मोदींना शह देण्यासाठी यात्रेची सुरूवात गुजरात ऐवजी बिहारमधून केली. आजवरच्या त्यांच्या सर्वच यात्रा गुजरातमधून सुरू झाल्या होत्या. पण मोदींना त्यांची जागा दाखवताना निदान आपली जागा कोणती, ते तरी अडवाणींना नक्की ठाऊक असायला हवे होते ना? कित्येक वर्षे ते गांधीनगर गुजरातमधून निवडून येत आहेत. मग मोदींची पंगा घेऊन ते लोकसभेत जाणार कसे? आणि लोकसभेत जायचाच मार्ग बंद झाला, असेल तर पंतप्रधान पदावर दावा करणार कसे?

   राहिला मुद्दा भाजपा नावाच्या पक्षाचा. आज जे कोणी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी म्हणुन वावरत असतात, ते बहुतेक अडवाणी यांचेच चेले आहेत. त्यामुळे त्यांना ज्येष्ठतेचा मान आहे. पण तो मान फ़क्त आशीर्वाद देण्यापुरता असावा, अशीच त्यांच्या चेल्यांची अपेक्षा आहे. शिवाय हे तमाम चेले एकमेकांचे पाय ओढण्याच्या डावपेचात अडवाणी आपल्या बाजूने असावेत अशी अपेक्षा करत असतात. यापेक्षा अडवाणी यांना भाजपामध्ये महत्व उरलेले नाही. त्यामुळेच त्यांनी आपली आजवरची मिळवलेली प्रतिष्ठा नको त्या स्पर्धेत मातीमोल केली म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचे तर अडवाणी हे दिल्लीच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरचे केशूभाई पटेल बनत चालले आहेत. मोदी हा केशूभाईंचाच चेला. पण आज त्यांना चेल्याचेच यश बघवत नाही. अडवाणींची अवस्था वेगळी वाटत नाही. तिकडे केशूभाई मोदीला संपवण्यासाठी अगदी कॉग्रेस बरोबर हातमिळवणी करायला सज्ज झाले, तर इकडे अडवाणी आपल्याला पंतप्रधान व्हायला मिळणार नसेल, तर भाजपात अन्य कुणाला होता येऊ नये, म्हणून कंबर कसत आहेत. म्हणूनच की काय त्यांनी कारण नसताना गेल्या आठवड्यातच पुढला पंतप्रधान कॉग्रेस वा भाजपाचा नसेल अशी भविष्यवा्णी करून ठेवली आहे. त्यांना एवढेच राजकीय भाकित करता येत होते तर त्यांनी मागच्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदासाठी धडपड कशाला केली होती? त्यांना उमेदवार केल्यावर भाजपाने आणखी जागा कमी करून घेतल्या हे भविष्य त्यांना तेव्हा कसे कळले नव्हते? आणि म्हणुनच त्यांचे आजचे भाकित हा राजकीय अंदाज असण्यापेक्षा आपलाच चेला नरेंद्र मोदी याला अपशकून करण्याचा प्रयास वाटतो.

   योगायोग तरी किती असावेत? मोदींना त्यांची जागा दाखवण्य़ासाठी गेल्या वर्षीची रथयात्रा बिहारमधून सुरू करताना आणि तिला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान नितीशकुमारांना देणार्‍या अडवाणी यांनी, आपले नवे राजकीय भाकित नेमके नितीश यांच्या आक्षेपाच्या बरोबरच कसे प्रसृत करावे? अजून लोकसभा निवडणुकीला पावणे दोन वर्षे असताना नितीश पंतप्रधान पदासाठी एनडीए तर्फ़े मोदी नकोत असा आग्रह धरतात, त्याचवेळी अडवाणी आपल्या ब्लॉगवर बिगर भाजपा-कॉग्रेस पंतप्रधान २०१४ साली असेल असे भाकित करतात, याला योगायोग मानता येत नाही. नितीश स्पष्टपणे मोदी नको असा आग्रह धरतात तर अडवाणी मोदी होऊ शकत नाही, असे सुचित करतात. यात दोघांची मिलीभगत दिसत नाही काय? एक मित्रपक्षाचा प्रमुख नेता भाजपाला अटी घालतो आणि त्याच भाजपाचा वरीष्ठ नेता दुरच्या लढ्यापुर्वीच अपशकूनाही भाषा करतो. यातले परस्पर संबंध शोधण्याची गरज आहे. इतक्यातच या दोघांना २०१४ सालची भ्रांत का पडली आहे? तर येत्या दोनतीन महिन्यात गुजरातच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यात तिसर्‍यांदा मोदींनी यश मिळवले, तर त्यांची प्रतिमा देशाच्या एकूणच राजकारणात कमालीची उंचावणार आहे. त्यातून ते थेट पंतप्रधान पदाचे दावेदार होणार आहेत. आणि असे आता सर्वांनाच वाटू लागले आहे. फ़क्त मोदी समर्थकच नव्हे, तर मोदींच्या कडव्या विरोधकांनाही तशी भिती वाटू लागली आहे. नाहीतर नितीश इतकी घाई कशाला करत आहेत? जो माणुस राष्ट्रपती निवडणूक घोषित झाल्यावरही एनडीएने उमेदवार ठरवावा म्हणुन आग्रह न करता परस्पर कॉग्रेस उमेदवार प्रणब मुखर्जी यांना पाठींबा देऊन टाकतो, त्याने दोन वर्षे नंतर येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी आतापासूनच आग्रह धरावा, ही बाब चमत्कारिक नाही काय?

   जो माणूस वा मित्र एनडीएला न जुमानता कॉग्रेस उमेदवार मुखर्जींना पाठींबा देतो, त्याने मोदींच्या नावाला आक्षेप घ्यावा काय? आतापासून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा आग्रह धरावा काय? आणि अडवाणी बिगरकॉग्रेस वा बिगरभाजपा पंतप्रधान म्हणतात; तेव्हा त्यांच्या समोर कोणाचा चेहरा किंवा नाव असते? तो नितीशचाच चेहरा नाही काय? नितीश यांना आपले नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणायचे आहे. पण तसे ते स्वत:च सुचवू शकत नाहीत, ही त्यांची व्यक्तीगत अडचण आहे. म्हणूनच त्यांना मोदींना गुजरातच्या विधानसभा निवडणूकीतच अपशकून करण्याची घाई झाली आहे. त्यातून हे डावपेच सुरू झाले आहेत. आणि नितीशनी इतकी दादागिरी भाजपाला का करावी? पंतप्रधान किंवा लोकसभेची गणिते बाजूला ठेवा. बिहारमध्ये अजून नितीश स्वबळावर उभे रहातील, इतकी त्यांची ताकद नाही. किंबहूना त्यांनी आपली ताकद भाजपाच्या जिवावर वाढवली आहे. १९९१ नंतर लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधला जनता दल पक्ष आपली घरगुती मालमत्ता बनवल्यावर नितीश वा जनता दल म्हणुन तिथे काय उरले होते? तेव्हा समता पक्ष म्हणून आपली वेगळी चुल मांडणार्‍या नितीश व फ़र्नांडिस यांच्या गटाला जीवदान मि्ळाले ते भाजपा सोबत गेल्यामुळेच. १९९६ पासूनच्या प्रत्येक निवडणूकांचे आकडे तपासले तर नितीश यांचा समता पक्ष किंवा संयुक्त जनता दल; भाजपाच्या आश्रयानेच टिकला व वाढला याची साक्ष मि्ळते. आजही मतांचे आकडे पाहिल्यास त्यांची ताकद लालूपेक्षा कमीच आहे. निवडून आलेल्या जागा दिसतात, त्या भाजपाच्या मदतीशिवाय शक्य नव्हत्या. अगदी १९९७ सालात भाजपाच्या व्यासपीठावर नितीशनी मुंबईत येऊन हजेरी लावली, त्या आधीच्या निवडणुकीत त्यांच्या समता पक्षाची अवस्था काय होती?

   लालूंपासून वेगळे होऊन नितीश यांनी वेगळी चुल मांडली तेव्हा त्यांना बिहार विधानसभेत फ़क्त २८ जागा जिंकता आल्या होत्या. त्यासुद्धा भाजपाच्या सोबत जाऊन. आणि त्यांचा भाजपाला कुठलाही लाभ मिळू शकला नव्हता. कारण आधी म्हणजे १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने स्वत:च्या बळावर लढताना ४१ जागा जिंकल्या होत्या, नितीशना सोबत घेतल्यावर भाजपाच्या जागा झाल्या ३९. ही २००० सालची गोष्ट. त्यानंतर कायम नितीश भाजपाचा सोगा पकडून निवडणूका लढवत राहिले. अगदी २००२ च्या गुजरात दंगली झाल्यानंतरही त्यांना मोदीचे वावडे नव्हते. मग २००५ च्या निवडणूका झाल्या. त्यात तर भाजपाच्या जागा आणखी घटल्या, पण नितीशच्या मात्र वाढल्या होत्या. लालूंचा प्रभाव बिहारमधून कमी होत असताना ती जागा भाजपाने व्यापली असती. तिचा लाभ दोस्ती करून घेत नितीशनी आपली ताकद वाढवली. म्हणून त्यांनी २००५ मध्ये २८ वरून ५५ जागापर्यंत मजल मारली. उलट भाजपा मात्र ३९ वरून ३७ पर्यंत खाली आला. तेव्हा लालूंना बहुमत गमवावे लागले आणि पासवान यांनी अडवणूक केल्याने कुणाचेच सरकार बनू शकले नव्हते. काही अपक्ष व पासवान यांचे आमदार एनडीएमध्ये यायला निघाले आणि त्यांचा दावा ऐकून घेण्यापुर्वीच विधानसभा बरखास्त करण्यात आली. एकही बैठक न घेता विधानसभा त्यावेळी बरखास्त झाली होती. पण या कालखंडात कधी नितीशना गुजरात दंगल किंवा मोदींची अडचण वाटली नाही. मग त्याच वर्षी पुन्हा विधानसभा निवड्णूका झाल्या आणि नितीश, भाजपा यांच्या आघाडीला काठावरचे बहूमत मिळाले. पुढल्या दोनतीन वर्षात नितीश यांनी आपले बस्तान बसवले आणि मगच त्यांना मोदींची अडचण भासू लागली. कारण आता मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले जाऊ लागले होते. त्यानंतर मुस्लिम मतांची नितीशना चिंता वाटू लागली, पण तेसुद्ध थोतांडच आहे.

   नितीश यांचा खोटारडेपणा उघड आहे आणि त्यावर पासवान किंवा लालूंनी नेमके बोट अनेकदा ठेवलेले आहे. गुजरात दंगल झाली तेव्हा नितीश भाजपा आघाडी म्हणजे एनडीएमध्ये मंत्री होते. पण त्यांनी दंगलीवर आक्षेप घेऊन राजिनामा दिला नव्हता. त्याचवेळी पासवानही मंत्रीमंडळात होते. त्यांनी मात्र दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाल्याचे कारण देऊन मंत्रीपद सोडले होते आणि एनडीएला रामराम ठोकला होता. पण नितीश मात्र गप्प राहिले होते. मग आजच त्यांना मुस्लिमांचा पुळका कशाला येतो आहे? जोवर आपले बुड बिहारमध्ये पक्के झाले नव्हते; तोवर त्यांनी गुजरात किंवा मोदी यांच्यावर मौन पाळले होते. आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणुन थोडे यश मिळवल्यावर त्यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पण तशी थेट मागणी करता येत नाही. कारण स्वपक्षाचे पन्नास खासदारही निवडून आणण्याची त्यांची क्षमता नाही. पण एनडिएमध्ये राहून पंचविस खासदारांच्या बळावर पंतप्रधान व्हायचा त्यांचा मनसुबा आहे. म्हणुन ते को्णती भाषा वापरत आहेत? एनडीएने सेक्युलर चेहरा असलेला उमेदवार पंतप्रधान पदासाठी आतापासून ठरवावा. तो चेहरा कोणता आहे? पहिली गोष्ट म्हणजे भाजपावर जातियवादी किंवा हिंदूत्ववादी असा आरोप होत असतो. म्हणजेच नितीश यांना कोणीही भाजपावाला उमेदवार नको आहे. मग एनडीएमध्ये सेक्युलर उरला कोण? खुद्द नितीशच ना? थोडक्यात २०१४ मध्ये एनडीएने आपल्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे अशी त्यांची मागणी आहे. भाजपामध्ये नरेंद्र मोदी सोडून आजतरी त्या पदाचा कोणी दावेदार नाही हे आता सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट होत आलेले आहे. त्या गडबडीत आपले नाव पुढे रेटण्याचा नितीशचा हा प्रयत्न आहे. दोन महिन्यांपुर्वी त्यांनी नुसत्या सेक्युलर चेहर्‍याची मागणी केली होती आता तर त्यांनी स्पष्टच शब्दात नरेंद्र मोदी नकोत, अशी मागणी भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

   आता योगायोग बघा. पंतप्रधानांनी मावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल यांना जी मेजवानी दिली, त्याच प्रसंगी नितीशनी गडकरी यांच्याकडे मोदी नको अशी मागणी केली. आणि नेमक्या त्याच पार्श्वभूमीवर अडवाणी आपली ब्लॉगवाणी करीत अहेत. त्याच मेजवानीमध्ये दोघा ज्येष्ठ कॉग्रेस मंत्र्यांनी अडवाणी यांना असे सांगितले, की ‘पुढल्या लोकसभा निवडणूकीत एनडीए किंवा युपीए यांच्या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मि्ळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच निकालानंतर तिसर्‍या आघाडीचे सरकार येऊ शकेल’. खुद्द अडवाणी यांना तशी शक्यता वाटत नाही. त्यांना वाटते कॉग्रेस किंवा भाजपापैकी एकाने पाठींबा दिलेला त्या दोन्ही पक्षाबाहेरचा कोणी तरी पंतप्रधान होऊ शकेल. हे भाकीत नेमके नितीशकुमार यांच्या स्वप्नाशी जुळणारे का असावे? तो निव्वळ योगायोग आहे, की अडवाणी त्याच दिशेने कामाला लागले आहेत? आपल्याला भाजपा संधी देणार नसेल; तर ती अन्य कुणा भाजपावाल्याला मिळू नये किंवा मोदींना मिळू नये, अशी आकांक्षा बाळगून अडवाणी कामाला लागले आहेत काय? नाहीतर दोन वर्षे आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाऊमेद करणारे असे भाकित करण्याचे प्रयोजन काय? स्वपक्षिय मोदींच्या विरोधात दंड थोपटून कार्यरत झालेल्या नितीशच्या भूमिकेला बळकटी देणारे हे भाकित (नितीशच्या मागणीच्या पाठोपाठ) आताच करण्याचा हेतू काय? "मोदी अडवा(आणी) नितीश जिरवा" योजना तर त्यामागे नाही ना?

   मात्र मोदी कच्च्या (अड्वाणी- केशूभाई) गुरूचा चेला असला तरी कच्चा अजिबात नाही. म्हणुनच त्याने या वादात मौन ठेवले आहे. कदाचित त्याचे मौनच या त्याच्या विरोधकांना अधिक भयभीत करते आहे, काय अशीच शंका येते. कारण सगळ्या गोष्टीच त्याच्या सोयीच्या घडत असताना त्याने विरोधकांच्या शंकांना उत्तरे द्यावीतच कशाला? जुन महिन्यात प्रथम नितीशनी मोदीविरुद्ध अप्रत्यक्ष आक्षेप घेतल्यावर बिहारमध्ये त्याच विषयावर एक माचाचणी घेण्यात आली. तिच्या निकालांनी नितीशसह अडवाणींची गाळण उडाली आहे काय? लेन्सऑनन्युज नामक संस्थेने केलेल्या या चाचणीचे बिहारमधले निकाल थक्क करून सोडणारे आहेत. ३६ टक्के बिहारी लोकांना नरेंद्र मोदी हाच उत्तम पंतप्रधान पदाचा उमेदवार वाटतो. तर राहुल १५ आणि नितिश १२ टक्के लोकांना. त्यापेक्षा धक्कादायक मतप्रदर्शन म्हणजे नितीश यांनी मोदी विरोधात घेतलेल्या भूमिकेवर ६१ टक्के बिहारी नाराज आहेत. पंतप्रधान होण्यासाठी मोदीकडे योग्य गुणवत्ता व पात्रता आहे असे ७१ टक्के बिहारींना वाटते. तर फ़क्त २१ टक्के बिहारींना नितीशविषयी तसे वाटते. याचा अर्थच नितीशपेक्षा बिहारी जनतेमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून अधिक मान्यता आहे. त्याच आकड्यांनी नितीश-अडवाणी यांना विचलित केले आहे काय? कारण काही महिन्यांपुर्वी अशी मतचाचणी देशव्यापी घेण्यात आली. त्यात सर्वाधिक १७ टक्के लोकांनी मोदींना कौल दिला होता, तर केवळ १६ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कौल दिला होता.

   म्हणजेच नरेंद्र मोदी यांना भाजपाने पुढल्या लोकसभा निवडणुकीत भावी पंतप्रधान म्हणून समोर आणले, तर मुस्लिमांची मते गमवावी लागतील हा बागुलबुवा फ़सवा आहे. कारण मुस्लिम भाजपाला कधीच मोठ्या संख्येने मतदान करत नाहीत. म्हणजेच भाजपाची मते मोदींमुळे कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. पण दुसरीकडे मोदी हाच नेता म्हणुन समोर आणला तर भाजपाकडे सामान्य मतदार अधिक ओढला जाऊ शकतो, असाच या चाचण्यांचा अर्थ आहे. त्याचे कारणही समजून घेयासारखे आहे. माध्यमांनी मोदींची दंगेखोर म्हणून कितीही बदनामी केलेली असली, तरी त्यांनी दहा वर्षात गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या दंतकथा लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि देशातला सर्वात खंबीर नेता म्हणुन त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, घोटाळे, कायदा सुव्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर खंबीरपणे धाडसी निर्णय घेणार्‍या नेत्याच्या शोधात आज भारतीय जनता आहे. आणि नरेंद्र मोदी हे त्यातूनच निर्माण झालेले आकर्षण आहे. शरद पवार किंवा कॉग्रेस खासदार विजय दर्डा यांनीही उघडपणे त्यासाठी मोदींचे कौतुक करावे तर सामान्य जनतेचे काय होत असेल? त्यांचे नाव भाजपाने पुढे केले तर नितीश एनडीएमधून बाहेर पडतील. पण भाजपाला दोनशे खासदारांचा पल्ला ओलांडणे सहजशक्य होईल. उलट मोदीशिवाय आज असलेल्या जागा टिकवणेही भाजपाला कठीण आहे. पण मोदींना पुढे केल्यास आहेत त्याच्या दुप्पट पल्ला गाठणे शक्य आहे. आणि त्यानेच नितीश व अडवाणी गडबडले आहेत.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १२/८/१२)

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट


    एक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्‍यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत होता. जवळच्या एका तळ्यात अंघोळ करायची व तिथेच जाऊन पाणी प्यायचे. बाकी त्याला कशाची गरज नव्हती. जीवनावश्यक वस्तूही नव्हत्या त्याच्यापाशी. संसार म्हणायचा तर अवघ्या दोन लंगोट्य़ा. त्यातली एक अंगावर असे तर दुसरी अंघोळीनंतर धुवून वाळत घातलेली असे. तळ्यावर जाई तेव्हा त्याला संसारात गांजलेले लोक दिसत व त्यांची त्याला खुप दया येत असे. पण तेवढाच त्याला जनसंपर्क होता. जनसंपर्क म्हणजे संसारी जगाशी तेवढाच संबंध. त्या गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना इतके कष्टप्रद जीवन जगणार्‍या संन्याशाविषयी भितीयुक्त आदर होता. तो सिद्धपुरूष आहे की नुसताच गोसावडा आहे, अशी चर्चा दबल्या आवाजात चालत असे. पण कोणी त्याला तो कुठून त्या रानात आला किंवा कधीपासून संन्यास घेतला; असे पश्न विचारण्याचे धाडस केले नाही. कधी एखादी देवभोळी महिला किंवा पुरूष आडरानात जाऊन सणासुदीला घरच्या पक्वान्नाचे जेवणाचे ताट त्या संन्याशाला भक्तीभावाने देत असत. तेवढाच त्याचा संसारी जगाशी संबंध येत असे. संन्यास किती सोयीचा असतो ना? कसल्या म्हणून कटकटी नाहीत. असे गावातल्या संसारी लोकांना वाटत असे. पण म्हणून खरेच त्या संन्यासाला कुठलीच समस्या नव्हती का?

   त्याचे जीवन असे विनासायास चालु असताना एक बारीकशी समस्या त्याला भेडसावू लागली. गावातून कधीतरी येणारे पक्वान्नाचे जेवण खाऊन जे खरकटे तो संन्याशी जवळच फ़ेकून देत होता, त्याचा एक उकिरडा तिथे तयार होत गेला आणि त्यातल्या नासल्या कुजल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचे काम निसर्गाला करायची वेळ आली. अर्थात निसर्गाचे काम कुठला कायदा वा घटनेनुसार चालत नसते. त्याने सर्वच शक्यता व शंकांचे उपाय खुप आधीपासून काढून ठेवलेले असल्याने संन्याशाच्या समस्येचा उपाय आपोआप कार्यरत झाला. त्याने आपल्या पर्णकुटीच्या जवळपास जो उकिरडा निर्माण केला होता त्याची विल्हेवाट लावायला तिथे एका उंदराची नेमणूक झाली. म्हणजे तिथे वास काढत एक उंदिर येऊन थडकला. तिथेच एक बिळ जमीनीत पोखरून वास्तव्य करू लागला. आता  पोटपाण्याची सोय लागली आणि बिळाच्या रुपाने वास्तव्याला घर मिळाल्यावर त्या उंदराच्या जीवनात स्थैर्य आले होते. मग त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली तर नवल कुठले? कारण त्याने संन्यास वगैरे घेतला नव्हता. संसार, संन्यास अशा मानवी संकल्पनांची बाधा त्याला झालेली नव्हती. त्यानेही एक सहचरी शोधून आणली आणि संन्याश्याच्या पर्णकुटीजवळच्या बिळात आपला संसार थाटला. लौकरच त्याच्या संसारात बहार आली आणि त्याचा त्रास बिचार्‍या संन्याशाला सुरू झाला.

   उंदराची पिल्ले बिळाच्या बाहेर पडून खेळूबागडू लागली. एकेदिवशी त्यांना एका नव्याच खेळण्याचा शोध लागला. त्यांना आसपासच्या रानातल्या नैसर्गिक वातावरणात न शोभणारी कापडी वस्तु दिसली आणि ती एका झुडूपावर लटकत होती, वार्‍याने उडत फ़डफ़डत होती. उंदराच्या पोरांसाठी ती नवीच वस्तू म्हणजे खेळणेच होते ना? त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि मग खेळून दमल्यावर असेल तिथेच ते कापड सोडुन बिळात विश्रांतीसा्ठी निघून गेली. हा ने्हमीचा प्रकार झाला. पण त्याचा त्या बिचार्‍या संन्याशाला मनस्ताप होऊ लागला. कारण रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाळत घातलेली लंगोटी त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी जागच्या जागी सापडेना. त्याने शेवटी दबा धरून शोध घेतला, तेव्हा त्याला जवळच उंदराने बिळ केल्याची व उंदिरच ही उचापत करीत असल्याचा शोध लागला. त्याचा बंदोबस्त कसा करावा ही त्याच्यासाठी समस्या तयार झाली. दिवसेदिवस त्या उंदरांच्या टोळीने उच्छादच मांडला आणि त्यांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे संन्याशाला जाणवले. त्याने गावातल्या जा्णकारांशी प्रथमच संपर्क साधून सल्ला घेतला तर त्याला खुप आश्चर्य वाटले. उपाय खुपच सोपा होता आणि आपल्यासारख्या तपस्व्याला तो का सुचला नाही, याचे त्या संन्याशाला वैषम्य वाटले.

   गावातल्या जाणत्यांनी त्याला एक मांजर पाळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर त्याला एक मांजराचे पिल्लूसुद्धा भेट दिले. पण एकदोन दिवसापेक्षा अधिक काळ तिथे पर्णकुटीच्या परिसरात ते मांजर टिकेच ना. एकदोन दिवस झाले की मांजर गावात पळून जायचे. मग त्याला शोधत फ़िरायची वेळ संन्याशावर यायची. त्याचा तपोभंग होऊ लागला. पण जेवढा वेळ मांजर तिथे असायचे, तेवढा काळ उंदरांचा बंदोबस्त चांगला होत असे. पण हे मांजर टिकवायचे कसे? तेव्हा गावकर्‍यांनी सल्ला दिला, की मांजराच्या दूधाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी संन्याशाने म्हैस पाळणे आवश्यक होते. जागच्या जागी दूध मिळू लागले तर मांजर कशाला पर्णकुटी सोडून जाईल? संन्याशाला ती आयडीया पटली आणि गावकर्‍यांनीच त्याला एक चांगली दुभती म्हैस भेट देऊन टाकली. पण मांजराच्या दूधाची समस्या सुटली तरी म्हैस बांधायची कुठे आणि तिला चारायचे कधी; ही समस्या दोनच दिवसात समोर आली. तेव्हा पुन्हा संन्याशाला बुजूर्ग गावकर्‍यांचा सल्ला घ्यायची वेळ आली. त्यांनी त्यासाठी छान उपाय सुचवला आणि त्यातून सर्वच समस्या सुटून गेल्या. म्हशीचा संभाळ व दूध काढण्याचे काम करायला एक परित्यक्ता संन्याशाच्या वस्तीवर येऊन राहिल आणि त्या दोघांसाठी छोटीशी झोपडी गावकरी बांधून देतील असा तो उपाय होता. आठवड्याभरात तेही काम मार्गी लागले आणि उंदरांचा कायमचा बंदोबस्त होऊन गेला. आता संन्याशाची लंगोटी जागच्या जागी राहू लागली. उंदराची वर्दळ संपली. फ़ार कशाला संन्याशाला पाण्यासाठी तळ्याकडेही फ़िरकण्याची गरज उरली नाही. ती म्हशीचा संभा्ळ करण्यासाठी आलेली महिला पाणी भरत होती, स्वत:सा्ठी स्वयंपाक करताना संन्याशालाही दोन घास घालत होती. त्याच्या अंघोळीचे पाणी गरम करून देत होती. संन्याशाचे जीवन सुखात व्यतीत होऊ लागले होते. इतक्या आपुलकीने आपली सेवा करणार्‍या त्या महिलेबद्दल त्याच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला नसता तरच नवल. आणि त्या स्नेहभावानेच तो संन्याशी कधी संसारी पुरूष होऊन गेला त्याचा त्याला किंवा गावकर्‍यांना पत्ता लागला नाही.

   एका पर्णकुटिच्या जागी चांगले शाकारलेले संसारी घर तिथे तयार झाले आणि तिथल्या अंगणातही मुले बागडू लागली. गावातल्या कुठल्याही घरात जशी भांडणे होतात व धिंगाणा होतो, तसाच तिथेही सुरू झाला आणि त्यात नवराबायकोच्या विसंवादाचाही भाग होताच. तपश्चर्या आणि संन्यास बाजूला पडला आणि कुठल्याही संसारी पुरूषाप्रमाणे तो संन्याशी गृहस्थ होऊन गेला होता. रोजच्या जीवनातील कटकटींना विटून गेला होता. ज्या महिलेविषयी स्नेहभावातून हे सर्व घडून आले, तिचा त्याला तिटकारा येऊ लागला. मग एकेदिवशी मोठेच भांडण जुंपले आणि ते ऐका्यला अवघा गाव गोळा झाला. तेव्हा संताप अनावर झालेला तो गृहस्थ आपल्या पत्नीला धमकी देत म्हणाला, "हे सर्व सोडून निघून जाईन, संन्यास घेईन." तेव्हा मात्र तिचा उसळलेला राग कुठल्या कुठे गायब झाला आणि मनसोक्त हसत ती उत्तरली, "मग हा संसार कशातून उभा राहिला? त्या तुमच्या संन्यासातूनच तयार झाला ना? साधी लंगोटी संभाळता येत नाही आणि संन्यासाच्या गप्पा कुणाला सांगता?" आपल्या सहचारिणीचे हे बोल ऐकल्यावर त्या गृहस्थाचे सर्व अवसान गळाले. हे वेगळे सांगायची गरज आहे काय? सुरूवात कुठून झाली होती? एका लंगोटीपासून ना? एका लंगोटीला उंदरांच्या तावडीतून वाचवताना तो संन्यासी कधी संसारी पुरूष होऊन गेला, त्यालाच काय पण गावकर्‍यांनाही कळले नव्हते. आणि एवढे झाल्यावर त्याने त्यातून सुटण्याचा उपाय कोणता काढला, तर पुन्हा लंगोटी नेसून संन्यास घेण्याचा. एक इवली लंगोटी सुद्धा कशी मोहाच्या जाळ्यात ओढत जाते, त्याचा हा किस्सा कुठल्या गावात घडला असेल?

   या गोष्टीतली सत्यता तपासून बघण्याची गरज नाही. ती नेहमी आपल्या इर्दगिर्द घडत असते. जेव्हा आपण समस्या किंवा सत्य नाकारून त्यापासून पळ काढत असतो तेव्हा अधिक समस्या निर्माण करत असतो. एक साधी गोष्ट आहे. ज्याने या संसारी जगाकडे पाठ फ़िरवली होती, त्याला लंगोटीची तरी काय गरज होती? झाडपालासुद्धा अब्रू झाकायला पुरेसा असतो. पण त्यापेक्षा लंगोटी अधिक सोयीची असते. सोयीसुविधांचा मोह टाळण्याची मानसिकता संन्यासामध्ये अगत्याची असते. आपल्याला घोर तप करायचे आहे आणि त्यासाठी आपल्या देहाच्या विकारांवर मात करण्याचा निर्धार म्हणजे तपश्चर्या असते. त्यात एका लंगोटीला शरण जाणारा माणूस संन्याशी होऊ शकत नसतो. आणि संन्याशीच कशाला आपल्या सामान्य जीवनातही आपल्याला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. दोन किंवा अनेक गोष्टींमधून एकीची निवड करावी लागत असते. त्याला प्राधान्य म्हणतात. जनलोकपाल किंवा भ्रष्टाचाराचे कठोर निर्मुलन करू शकणारा लोकपाल कायदा, हेच अण्णा टीमचे प्राधान्य आहे काय? असेल तर त्यांनी त्यासाठी कुठलीही तडजोड करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आरपारची लढाई होते, तेव्हा आपले कोण व परके कोण याचे निश्चितपणे ठरवणे भाग असते. पहिल्या दिवसापासून ही लढाई राजकीय होती आणि सताधारी कॉग्रेस पक्षाने ती राजकीय लढाई म्हणुनच लढवली होती. पण अण्णा त्याला राजकीय लढाई नाही म्हणून लढायचा हट्ट करत बसले. ही अण्णांची चुक होती. कॉगेसने पहिल्या दिवसापासून अण्णा टीमच्या विरोधात राजकीय अपप्रचार चालू केला होता, अण्णांच्या मागून राजकारण खेळले जात आहे असे एकटी कॉग्रेसच म्हणत होती. म्हणजेच कॉग्रेसने अण्णांवर चढवलेला प्रतिहल्ला राजकीय होता. त्याला अण्णांनी राजकीय प्रतिकार किंवा प्रत्युत्तर देण्याचे टाळले, ही गंभीर चुक होती. कारण त्या लढाईत अण्णांच्या बाजूने जे कोणी राजकारणी उभे रहातील, त्यांनाही अण्णा जवळ करू शकले नाहीत. किंबहूना त्यांना अण्णांपासून दुर करण्यात व अण्णांना एकाकी पाडण्यात कॉग्रेस यशस्वी झाली. त्यानंतर अण्णा टीमला जाग आली आहे व त्यांनी राजकीय पर्यायाची भाषा वापरली आहे.

   राजकीय पर्याय म्हणजे काय? अण्णा टीम आपला स्वत:चा राजकीय पक्ष काढणार आहे काय? त्याच्यातर्फ़े उमेदवार रिंगणात उतरवणार आहे काय? त्यासाठी पक्ष म्हणून जी भूमिकेची एकवाक्यता आवश्यक असते ते आजच्या अण्णा टीममध्ये आहे काय? लोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या विविध राजकीय भूमिकांच्या संस्था संघटनांच्या नेत्यांची एक अस्थायी हंगामी समिती; असेच आजच्या अण्णा टीमचे स्वरुप आहे. त्यात नक्षलवाद, जिहाद किंवा राष्ट्रवाद अशा अनेक मुलभूत मुद्द्यावर त्यांचे तीव्र मतभेद आहेत. साध्या लोकपाल विषयावर चालू असलेल्या लढ्यात कोणाला बरोबर घ्यायचे, याबद्दल त्या टीममध्ये अनेक मतभेद आहेत. अशा टीमकडून राजकीय पक्ष चालवणे किंवा त्याला नेतृत्व देणे शक्य आहे काय? त्याचे उत्तर फ़क्त नकारात्मक आहे. म्हणुनच नवा राजकीय पर्याय ही बाब बोलणे सोपे असले तरी तिला वास्तविक आकार देणे पराकोटीचे अशक्य आहे. आधी टीम म्हणवून घेतात, त्यांच्यात राजकीय विषयावर एकवाक्यता निर्माण करावी लागेल. संघटनात्मक स्वरुप ठरवावे लागेल. त्यासाठी पक्षशिस्त नावाचे स्वयंनिर्बंध लावुन घ्यावे लागतील. यातली एकही गोष्ट आजच्या अण्णा टीमच्या आवाक्यातली नाही. म्हणुनच कॉग्रेसने पहिल्या दिवसापासून राजकारणात येण्याचे आमंत्रण अण्णा टीमला दिलेले आहे. आणि त्याच सापळ्यात अण्णा टीम आज फ़सली आहे. कारण त्यातल्या एकालाही राजकारण कशाशी खातात, त्याचा काडीमात्र अनुभव नाही. शिवाय एका लोकपाल किंवा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी राजकीय पर्याय असू शकत नाही. राजकारण समाजाचे सर्वव्यापी नियंत्रण करत असते. म्हणुनच राजकारण करणार्‍याला समाजजीवनाच्या सर्वच अंगाविषयी आपली स्वतंत्र भूमिका असावी लागते. ती असते त्याला राजकीय पक्ष किंवा राजकीय पर्याय म्हणतात. मग त्यात राष्ट्रवादी, सेक्युलर, समाजवादी, जातियवादी असे भेदाभेद पडतात. अण्णा टीमची त्यातली भूमिका नेमकी काय आहे?

म्हणजेच निवडणूक ही नुसते उमेदवार उभे करून लढता येत नाही तर व्यापक भूमिकेतून लढवावी लागते. अण्णा आज कॉग्रेस विरोधी आहेत, तसाच भाजपा किंवा डावी आघाडी कॉग्रेस विरोधातच आहे. पण ते दोघे आपल्या राजकीय भूमिकेमुळे एकत्र येत नाहीत. त्याचाच फ़ायदा कॉग्रेसला मिळत असतो. उद्या नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राजकारणा उडी घेतली आणि त्यांनी सत्ता हाती आल्यास अण्णा टीमला हवा तसा लोकपाल कायदा बनवण्याचे वचन दिले तर काय? ते सेक्युलर नाहीत म्हणून अण्णा टीम मोदीच्या विरोधात उभी रहाणार आहे काय? म्हणजेच मोदींसह लोकपाल किंवा भ्रष्ट कॉग्रेससह सेक्युलर राजकारण यातून निर्णायक निवड करावी लागणार आहे. त्यात अण्णा टीम कुठला पर्याय निवडणार आहे? निदान ज्याप्रकारे राजकीय बिछायत आज समोर दिसते आहे; त्यात भ्रष्टाचारासह सेक्युलर राजकारण किंवा विकासाचे मोदीप्रणीत हिंदुत्ववादी राजकारण असेच पर्याय पुढल्या लोकसभा निवडणूकीत लोकांसमोर असणार आहेत. अण्णा टीमला त्यातून एकाच्या बाजूने कौल देणे अपरिहार्य ठरणार आहे. इथले थोडे आणि तिथले थोडे अशी निवड करायची सोयच नाही. जंतरमंतरच्या एप्रिल २०११ पहिल्या उपोषणानंतर अण्णांनी उघडपणे मोदीचे विकासासाठी कौतुक केले होते. तेव्हा त्यांच्याच सेक्युलर समर्थकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते. आजही अण्णांशी सहकार्य करायला रामदेव बाबा पुढे आल्यावर अण्णा टीमच्या अनेकांना पोटदुखी होते. यातून अण्णा कशी वाट काढणार आहेत? राजकीय पर्याय पत्रकार वा कॅमेरासमोर बोलताना सोपा वाटतो, तेवढा सोपा विषय नाही. नवा पक्ष काढणे तर अशक्यच आहे. म्हणजेच आहेत त्या उपलब्ध मालातुनच निवड करणे भाग आहे.

   पण अण्णा टीमची स्थिती पहिल्या दिवसापासून त्या संन्याशासारखी गोंधळलेली आहे. त्यांना आपले प्राधान्य ठरवता आलेले नाही. कुठल्याही किंमतीत लोकपाल अशी ठाम भूमिका असती तर आजपर्यंत मोठा पल्ला गाठता आला असता. जे लहानमोठे पक्ष प्रचलित राजकारणात आहेत, त्यांच्या मदतीने पुढे घोडे दामटता अले असते. पण आपण राजकारणी नाही वा सेक्युलर आहोत, असे भासवण्याच्या नादात अण्णा टीम कॉग्रेसने लावलेल्या सापळ्यात फ़सली आहे. "होय, लोकपाल मोदी आणणार असतील तर आम्ही त्यांनाही पाठींबा देऊ" इतकी ठाम भूमिका अण्णा टीम घेऊ शकते का? जो कोणी लोकपाल देईल त्याच्या राजकिय भूमिकेशी आम्हाला कर्तव्य नाही, इतके प्राधान्य अण्णा टीम देऊ शकते का? त्याला राजकीय पर्याय म्हणतात. मगच लोकांना स्पष्टपणे मतदान करताना पर्याय मिळू शकतील. लोकपाल हवा असेल व भ्रष्टाचार निपटून काढणारा पर्याय हवा असेल; तर लोकांना एकाच पक्ष वा आघाडीच्या मागे ठामपणे उभे रहाता येईल. ज्यांना सेक्युलर भ्रष्टाचारापेक्षा लोकपाल महत्वाचा नाही असे वातत असेल त्यांना लोकपालवादी असतील त्यांच्य विरोधात ठामपणे उभे रहाता येईल. कारण आता कॉग्रेसनेच अण्णा टीमसमोर आणि सामान्य जनतेसमोर दोन राजकीय पर्याय ठेवले आहेत. भ्रष्टाचारासह सेक्युलर राजकार्ण किंवा सेक्युलर नसलेले पण स्वच्छ असू शकणारे विकासवादी राजकारण, असे ते दोन पर्याय आहेत. त्यापलिकडे अण्णा कुठला पर्याय देऊ शकणार आहेत? कारण अण्णांना वा त्यांच्या सहकार्‍यांना आपली निवड लोकांसमोर ठेवावी लागणार आहे.

   एका लंगोटीच्या संभाळासाठी त्या संन्याशाला जसा हळुहळू करत सगळा संसारच उभा करावा लागला आणि मग त्याच संसाराच्या कटकटीचा कंटाळा आल्यावर पुन्हा संन्यास घेण्याची वेळ आली, त्यातलाच हा प्रकार आहे. आपला राजकारणाशी संबंध नाही म्हणुन रस्त्यावरच्या पादचार्‍याला भागत नाही तिथे एक देशव्यापी कायदा बनवायला निघालेल्या अण्णा टीमला राजकारणापासून पळ काढता येईल काय? कसोटीच्या वेळी कुठल्या तरी बाजूने उभे रहावेच लागते. संन्यास वाटतो तेवढा सोपा नसतो. उलट संसारी जीवनापेक्षा तो अधिक कष्टप्रद असतो. संसारी जीवनात तुम्ही दुसर्‍या कोणाच्यातरी डोक्यावर खापर तरी फ़ोडू शकता असता. संन्यासी जीवनात सगळेच गुणदोष आपले म्हणुन निमूट स्विकारावे लागत असतात. आत्मपरिक्षण व आत्मचिंतन अपरिहार्य असते. तोच आव आणणार्‍या अण्णा टीमने राजकीय पर्यायाची वेळ त्यांच्यावर का आली त्याचे आत्मपरिक्षण करावे. त्यासाठी त्या संन्याशाचा अनुभव मार्गदर्शक ठरू शकेल.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी ५/८/१२)