शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

जिहाद आणि दहशतवाद: ही काय भानगड आहे?


   ‘उंटाच्या पाठीवरची काडी’ अशी इंग्रजीत उक्ती आहे आणि हैद्राबाद येथे झालेला बॉम्बस्फ़ोट हा त्याचाच नमुना आहे. खरे तर असे अनेक स्फ़ोट अलिकडल्या काळात देशामध्ये झालेले आहेत. अगदी आपले नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी त्यांच्या नव्या पदाचा भार घेतल्यावर त्यांचा पुण्यात पहिलाच जाहिर कार्यक्रम होता; पण ते येऊ शकले नाहीत. मात्र नेमका तोच दिवस साधून त्याच परिसरात म्हणजे जंगली महाराज रोड येथे स्फ़ोट घडवण्यात आलेले होते. ज्या पद्धतीचे ते स्फ़ोट होते, नेमके तशाच पद्धतीचे स्फ़ोट गुरूवारी हैद्राबादमध्ये झाले. त्यामुळे त्याबद्दल इतका कल्लोळ होण्याचे तसे काही कारण नव्हते. पण नको इतका गदारोळ या स्फ़ोटांनी घडवला. कारण या स्फ़ोटाचे संदर्भ वेगळे आहेत. आदल्या दिवशी गृहमंत्र्यांनी महिनाभरापुर्वीच्या आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली, त्याच संदर्भामुळे हैद्राबादच्या बॉम्बची स्फ़ोटकता वाढलेली आहे. कारण या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना अशा घातपाताची गुप्तचर विभागाला माहिती होती असे विधान केले. ही माहिती होती, तर त्याबद्दल सरकारने नेमके काय उपाय योजले, असा प्रश्न निर्माण होतो. तर त्याबद्दल कुठलीही हालचाल सरकारतर्फ़े झालेली लोकांना दिसलेली नाही. त्यामुळेच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक होते. अर्थात अशा सरकारी निष्काळजीपणाही नवा नाही. आजवर बहुतेक प्रसंगी असेच घडलेले आहे आणि आता सरकारचा नाकर्तेपणा लोकांच्या चांगलाच अंगवळणी पडलेला आहे. मग इतका प्रक्षोभ कशासाठी? तर त्याचे स्फ़ोटाच्या आदल्या दिवसाची गृहमंत्र्यांची दिलगिरी त्याचे खरे कारण आहे. अशी दिलगिरी शिंदे यांनी कशासाठी व्यक्त केली? असे काय बोलून त्यांनी चुक केली होती, की देशाच्या गृहमंत्र्याला दिलगिरी व्यक्त करायची पाळी यावी? 

   महिनाभरापुर्वी कॉग्रेसचे राजस्थानात जयपूर येथे चिंतन शिबीर भरलेले होते. तिथेच राहुल गांधी यांना पक्षातली महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच शिबीरात बोलताना गृहमंत्री शिंदे यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आणि देशभर कल्लोळ माजला होता. इतका कल्लोळ माजला, की त्या शिबीरातून राहुल यांना राष्ट्रीय रंगमंचावर आणायचा बेत वाया गेला. सगळीकडे त्या राहुलच्या भाषणाचीच चर्चा व्हावी; अशी मुळात योजना होती. बेत जमला सुद्धा छान होता. माध्यमांनीही राहुलचे भाषण उचलून धरले होते. पण नंतर त्याच व्यासपिठावरून बोलताना शिंदे यांनी संघ परिवार व भाजपा शिबिरांचे आयोजन करून दहशतवादाचे प्रशिक्षण देतात व त्यातून निर्माण होणार्‍या भगव्या दहशतवादाचा देशाला मोठाच धोका असल्याचे बेफ़ामपणे सांगुन टाकले होते. तसे त्यात नवे काहीच नाही. कॉग्रेसचे ज्येष्ठ तोंडाळ नेते दिग्विजय सिंग सातत्याने असे बेछूट आरोप करीत आलेले आहेत. पण त्याकडे कोणीही गंभीरपणे कधी बघितले नव्हते. शिंदे यांच्या आधीचे गृहमंत्री चिदंबरम यांनीही हिंदू दहशतवादाचे आरोप अनेकदा केलेले आहेत. पण थेट रा. स्व. संघ किंवा संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर असा थेट दहशतवादाची प्रशिक्षण शिबीरे घेतल्याचा आरोप कोणी कधीच केला नव्हता. कारण असे आरोप पुराव्याशिवाय करता येत नाहीत. पण जेव्हा देशाचा गृहमंत्री असे आरोप करतो, तेव्हा त्याला वजन येते. त्याच्याकडे पुरावे आहेत, असे आपोआपच मानले जात असते. आणि पुरावे असतील त्या संबंधित संस्था संघटनांच्या विरोधात कोणती कारवाई केली, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्या दोन्ही बाबतीत आनंद आहे. कारण हिंदु वा भगवा दहशतवाद म्हणून ज्याचा सातत्याने डंका राजकारणात पिटला जात असतो; त्यासाठी प्रत्येकवे्ळी मालेगावच्या स्फ़ोटाकडे बोट दाखवले जात असते. मात्र त्याचा तपास व धरपकड होऊन आता साडेचार वर्षाचा कालावधी उलटला आहे. पण सुनावणी करताना सरकार सतत टाळाटाळ करत आलेले आहे. त्यामुळेच मालेगावचा स्फ़ोट हे अत्यंत संशयास्पद प्रकरण झालेले आहे. पण तेही खरे मानले, तरी त्यात भाजपा व संघाचा कुठलाही संबंध जोडायला जागा नाही. मग गृहमंत्र्याने असा आरोप करणे गंभीर मामला होऊन जातो. 

   झालेही तसेच. भपकेबाज भाषण करण्याच्या उत्साहात शिंदे असे बोलून गेले आणि त्यांना पक्षाने संभाळून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी भाजपाने संसदेचे अधिवेशन अडवून धरण्याचा पवित्रा घेतल्यावर गृहमंत्र्यांसह सरकारची तारांबळ उडाली. कारण आरोप सोपे असतात, पुरावे अवघड काम असते. इथे पुन्हा मालेगाव आणि साध्वी प्रज्ञासिंग हे मोहरे पुढे करण्याने भागणार नव्हते. शिवाय त्यातही संघ भाजपाचा संबंध जोडणे अशक्यच होते. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला गृहामंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपली पाठ सोडवून घेण्याचा मार्ग पत्करला. उत्साहाच्या भरात आपण बोलून गेलो, त्यामुळे कोणी दुखावले असेल तर शब्द व आरोप मागे घेतो, अशी दिलगिरी शिंदे यांनी व्यक्त केली. पण त्यातून सरकार व संसदेचे अधिवेशन सुटले तरी आजवरच्या भगव्या दहशतवादच्या आरोपातील हवाच निघून गेली होती. त्यामुळे संसदेचे अधिवेशन बरे शांततेत पार पडेल अशी अपेक्षा होती. पण सत्य कसे भीषण व सत्वपरिक्षा घेणारे असते, त्याचा अनुभव गृहमंत्र्यांना यायचा होता. तेच नेमके हैद्राबादला घडले. त्यांच्या दिलगिरीमुळे संसदेच्या अधिवेशनाचे उदघाटनाचे भाषण शांततेत पार पडले आणि त्याच संध्याकाळी मावळतीला हैद्राबादमध्ये दहशतवादाचा खरा चेहरा समोर येऊन गृहमंत्र्यांच्या आरोपबाजीचा मुखवटा त्या स्फ़ोटाने टराटरा फ़ाडून टाकला. कारण हे स्फ़ोट जिहादी संघटनेने घडवले होते, आणि त्याची पुर्वसूचना गृहमंत्र्यांकडे होती. म्हणजे महिनाभर आधी त्यांच्याकडे इस्लामी जिहादी घातपात होणार असल्याची माहिती होती. पण ते सत्य सांगायचे सोडून गृहमंत्र्यांनी भगव्या दहशतवादावर रान उठवून लोकांची दिशाभूल केली होती. हातात माहिती व पुरावे जिहादी घातपात्यांच्या विरोधातले आणि आरोपी म्हणुन बोट दाखवले होते संघ भाजपाकडे. हैद्राबाद येथील स्फ़ोटानंतर जी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे, त्याचे कारण नेमके हेच आहे. गृहमंत्री देशाची व जनतेची घातपातापासून सुरक्षा करण्यापेक्षा जिहादी दहशतवादाला पाठीशी घालतात, अशी समजूत त्यातून निर्माण झाली. 

   तसा आरोप अजून तरी कोणी केलेला नाही. पण या स्फ़ोटामुळे बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजामध्ये तशी संतप्त प्रतिक्रिया उमटलेली आहे. ज्यांच्यापासून खरा धोका असल्याचे पुरावे व माहिती शिंदे व त्यांच्या गृहखात्याकडे होती, त्याबद्दल बोलायचे सोडून ते अकारण हिंदू दहशतवादावर तोंडसुख घेत जनतेची दिशाभूल करीत होते, अस अर्थ काढला गेला. अर्थात तो राजकारणाचा भाग आहे, म्हणुनच त्यात पडायचे कारण नाही. त्यापेक्षा इतकी वर्षे उलटल्यावरही अजून आपण जिहादी हिंसाचार व दहशतवादाचा बिमोड वा बंदोबस्त का करू शकलेलो नाहीत, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्याची योग्य कारणमिमांसा होत नाही, हे दुर्दैव आहे. याचे पहिले कारण म्हणजे त्यावर बकवास करणार्‍यांपासून त्याच्या बंदोबस्तामध्ये गुंतलेल्यापर्यंत सर्वांचेच; दहशतवाद या विषयावर असलेले अगाध अज्ञान होय. दहशतवाद आणि दंगली यांना समान लेखुन जो मुर्खपणा आपल्याकडे केला जातो, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. दहशतवाद हा कुठल्यातरी सत्तेला आव्हान देणारा असतो आणि त्याच्या मागे पुन्हा दुसर्‍या कुठल्या तरी सत्तेचे समर्थन असावे लागते. थोडक्यात एका सत्तेने दुसर्‍या कुणा शत्रू वा प्रतिस्पर्धी राष्ट्राशी चालू केलेले अघोषित युद्ध, म्हणजे दहशतवाद होय. जसे नक्षलवाद, उल्फ़ाचा आसामामधील हिंसाचार, काश्मिरातील जिहाद असे प्रकार दहशतवादामाध्ये येतात. पण मालेगावच्या स्फ़ोटासारख्या घटना माथेफ़िरूंच्या कारवाया असतात. कारण त्यामागे परदेशी शक्ती उभी नसते किंवा अशा घटना देशाच्या सार्वभौम सत्तेला आव्हान देणार्‍या नसतात. म्हणूनच दहशतवाद आणि दंगली यात फ़रक करणे अगत्याचे आहे, त्यांना समान लेखून उपाय करायला गेले; मग आपली गल्लत होत असते. तीच झाल्याने आजवर योग्य उपाय योजले गेले नाहीत, की दहशतवाद आटोक्यात येऊ शकलेला नाही. उलट फ़ोफ़ावतच गेलेला आहे. 

   साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांनी स्फ़ोटाचे प्रयास केले वा बॉम्ब बनवले हे खरेही असेल. पण त्यांना अन्य कुणा देश वा सत्तेने मदत केली आहे काय? उलट भारतातल्या जिहादी गटांना नेहमीच पाकिस्तानने, माओवाद्यांना चीनने व उल्फ़ाला बंगला देशने सहाय्य केलेले आहे. दुसरीकडे श्रीलंकेतील तामिळी वाघांच्या संघटनेला भारताची फ़ुस व मदत होती हे लपून राहिलेले नाही, आज पाकिस्तान तोयबा वा मुजाहिदांच्या पापावर पांघरूण घालते, मात्र बलुचीस्तान या प्रांतात चालू असलेल्या घातपाताचे खापर तोच पाकिस्तान भारताच्या डोक्यावर फ़ोडत असतो, हे विसरता कामा नये. जर पाकिस्तानातील सगळेच स्फ़ोट घातपाती करीत असतील; तर फ़क्त बलुचिस्तानच्याच बाबतीत पाकिस्तान आपल्यावर आरोप कशाला करतो? कारण बाकी शिया-सुन्नी यांच्यातल्या हिंसेला स्थानिक माथेफ़िरू कारणीभूत आहेत, त्यामागे कुठला दुसरा देश नाही, हे पकिस्तानला कळते. तसाच काहिसा प्रकार मालेगावच्या बाबतीतला आहे. तो दहशतवाद नाही. आणि बाकी जिहादी हल्ले, स्फ़ोट हे दहशतवादाचे प्रकार आहेत. त्याच्या मागे पाकिस्तान आहे. खलिस्तानी कारवायांच्या मागेही पाक सरकारचा हात होता. तसा तुम्ही भगव्या किंवा हिंदू दहशतवादाच्या बाबतीत कुठल्या परदेशावर आरोप करू शकता का? नसेल तर त्याला दहशतवाद म्हणताच येत नाही. म्हणूनच भारतात होणार्‍या दहशतवादी कारवायांना धर्माचे नाव किंवा रंग जोडता कामा नये आणि त्यात हिंदू मुस्लिम असा संघर्षही शोधता कामा नये. हा हिंदू मुस्लिम झगडा नाही. गुजरातची दंगल आणि दहशतवाद यातला हाच मोठा फ़रक आहे. पाकिस्तानला इथल्या किंवा त्यांच्याच भूमीतल्या मुस्लिमांच्या सुरक्षा वा जीवाची काळजी नाही. मग त्यांच्याकडून फ़ुस लावलेल्या घातपाती कारवायांना हिंदु मुस्लिम चष्म्यातून बघणे मुर्खपणाच नाही काय? जितका तो मुर्खपणा आहे; तितकाच मालेगावसारख्या घटनेमध्ये हिंदू दहशतवाद शोधणे निव्वळ मुर्खपणा आहे. ज्यांना याचेच भान नाही, तेच या समस्येचे निराकरण तरी कसे करू शकणार आहेत? इथले मुस्लिम सुडबुद्धीने हिंदूंच्या विरोधात काही कारवाया करीत असतील, तर त्यालाही दहशतवाद म्हणता येणार नाही. हा सुक्ष्म तितकाच ठळक फ़रक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत दहशतवादाचा बंदोबस्त करताच येणार नाही. 

   म्हणूनच आपले गाडे फ़सत गेलेले आहे. जी समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान म्हणून उभी ठाकली आहे, तिला आम्ही हिंदू मुस्लिम असा सामाजिक वैमनस्याचा रंग देऊन बसलो आहोत. मग त्याचाच फ़ायदा पाकिस्तान उठवत असते. या दंगली किंवा बेबनावात नाराज झालेले वा सुडबुद्धीने पेटलेले असतात, त्यांना मग पकिस्तान हाताशी धरून मायदेशाच्या विरोधात उभे करत असते. इथे अबु जुंदाल हा बीड महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम व अजमल कसाब हा पाकिस्तानातील मुस्लिम एकदिलाने मुंबई हल्ल्यात का काम करू शकले; ते लक्षात येऊ शकेल. यातला एक तोयबाच्या तालमीत तयार झालेला तर दुसरा गुजरातच्या दंगलीमुळे सुडबुद्धीने पेटलेला व पाकच्या सापळ्यात जाऊन अडकलेला आहे. तसाच पुरोहित व साध्वी असू शकतात. पण त्यांच्यामागे कुठला देश उभा नाही. खलिस्तानी चळवळीला पाकिस्तानचे पाठबळ मिळाले म्हणून ते दहशत माजवू शकले. पण पुरोहित वगैरे मंडळी एका गावातही दहशत माजवू शकलेले नाहीत. कारण त्यांना कुठल्या सत्तेचे पाठबळ नाही. हा मोठा फ़रक आहे. तोच लक्षात घेतला नाही; मग गृहमंत्री सुद्धा हिंदू वा भगवा दहशतवाद असा निरर्थक आरोप करू शकतात. आणि जे असा आरोप करतात, त्यांच्याकडून खर्‍या दहशतवादाचा बंदोबस्त होऊ शकत नाही, सगळी गडबड तिथेच  होऊन बसली आहे. त्यामुळे नुसते तपास होतात, खटले चालतात, आरोप होतात, शिक्षाही दिल्या जातात, पण दहशतवाद मात्र थांबवणे शक्य झालेले नाही. थांबणारही नाही. कारण ते अघोषित युद्ध आहे. पुरोहित आदी डझनभर माणसे पोलिसांच्या कोठडीत जाऊन पडल्यावर पुन्हा तत्सम कुठलीच घटना का घडू शकली नाही? कारण तो दहशतवाद नाही तर माथेफ़िरू कृती होती. त्यामागे सुसंघटित ताकद वा सत्ताही नव्हती. पण शेकड्यांनी जिहादी मारले गेले वा पकडले गेलेत; तरी अशा घटना का थांबत नाहीत? कारण ते अघोषित युद्ध म्हणजेच जिहादी दहशतवाद आहे. तेच नक्षलवादी, माओवादी. उल्फ़ावादी यांच्या बाबतीत घडलेले दिसेल. तामिळी वाघांची चहुकडून कोंडी करून त्यांना मिळणारे परदेशी सहाय्य श्रीलंका सरकारने तोडल्यावरच त्यांचा समू्ळ बिमोड झालेला दिसेल. जेव्हा परदेशी पाठबळ संपले तेव्हाच वाघांचा पराभव कायमचा होऊ शकला. 

   तसे पाहिल्यास अजून तामिळनाडूमध्ये वाघांचे पाठीराखे आहेत. अगदी उघडपणे त्यांचे समर्थन अण्णा द्रमुक वा अन्य पक्ष करीत असतात. पण श्रीलंकेमध्ये त्यांचा वरचष्मा संपलेला आहे. कारण भारत सरकारने त्यांचे पाठबळ काढून घेतलेले होतेच. पण युरोपीय देशात व चीनमधून मिळणारेही पाठबळ मध्यंतरी संपले आणि वाघांचा दहशतवाद संपुष्टात आला. दुर्दैव असे, की भारतात अजूनही दहशतवाद, जिहाद याकडे हिंदू मुस्लिम प्रश्नच्या चष्म्यातून बघितले जाते. मग इथले मुस्लिम जातियवादी पक्षही त्याला मुद्दामच धार्मिक रंग चढवत असतात. त्यासाठी मग अफ़जल गुरूला शहिद बनवला जात असतो. वेळच्या वेळी त्याला फ़ासावर लटकवला असता, तर ही वेळ आलीच नसती. ज्यांनी त्याचे इतका दिर्घकाळ राजकारण केले, त्यांच्याच घशाला आता गुरूची फ़ाशी फ़ास बनून अडकली आहे. उलट गुजरातची स्थिती दिसेल. गुजरातमध्ये तिथला मुख्यमंत्री मुस्लिमांना अन्यायाने वागवतो; असा खुप गवगवा झालेला आहे. पण त्याचा दुसरा परिणाम असा आहे, की असे उचापतखोर मुस्लिम तरूण गुजरातमध्ये गडबड करायला घाबरून असतात. त्याचे प्रमुख कारण तिथले मुस्लिमही अशा संशयितांना आश्रय देत नाहीत. आपल्यावर उगाच बालंट नको म्हणून जी सावधानता गुजरातमध्ये मुस्लिम बाळगतात, त्यातूनच तिथल्या जिहादी प्रवृत्तीला पायबंद घातला गेला आहे. नुसता संशय आला, तरी खैर नाही असे भय त्यामागे आहे; हे कोणी नाकारू शकणार नाही. पण दुसरीकडे त्याचे अन्य समाजावरही परिणाम झाले आहेत. दहा वर्षात गुजरातमध्ये हिंदू मुस्लिम खटका वा संघर्षही उडालेला नाही. पण मुद्दा तो नाही. सवाल आहे, तो तिथे कुणाला संरक्षण वा आश्रय मिळायची खात्री नाही असा आहे. आपोआपच पाकिस्तानही तिथे कुठल्या उचापती करू शकलेला नाही. 

   उलट आपण हैद्राबादकडे बघू शकतो. महिनाभरापुर्वी त्याच हैद्राबादमध्ये स्थानिक मुस्लिम अतिरेकी पक्षाचा आमदार अकबरुद्दीन ओवायसी याने अत्यंत भडक चिथावणीखोर भाषण केले होते. त्यावर खुप काहूर माजले, तरी सरकारने त्याला हात लावला नाही. अखेर कोर्टामध्ये दोन वकीलांनी दाद मागितल्यावर बळेबळे सरकारने व पोलिसांनी कारवाई केली. त्यातून कोणता संदेश पाकिस्तानला वा इथल्या दहशतवाद्यांना दिला जातो? रान मोकाट आहे, या आणि हवा तसा धुमाकुळ घाला; असाच संदेश दिला जातो ना? मग त्यांनी मोदींच्या गुजरातमध्ये अहमदाबादला जाऊन स्फ़ोट करायचे, की कॉग्रेसप्रणीत हैद्राबादला जाऊन बॉम्ब फ़ोडायचे? जिथे सुरक्षित व कमी धोका आहे, तिथेच जाऊन कोणी उचापत करणार ना? शिवाय देशाचा गृहमंत्रीच अशा घातपाताची शक्यता असताना नसत्या बेफ़ाम सनसनाटीत गुंतला; मग दुसरे काय होणार? खर्‍या दहशतवाद्यांना दिलासाच मिळणार ना? आपण बॉम्ब फ़ोडावेत, गृहमंत्री हिंदूत्ववाद्यांच्या डोक्यावर खापर फ़ोडायला उत्सुक आहे, असे दिसल्यावर त्यांची हिंमत वाढणारच ना? त्यामुळेच लोकांमध्ये प्रक्षोभ उसळला आहे. त्याला हैद्राबादच्या स्फ़ोटकापेक्षा जयपूरच्या राजकीय विधानाने स्फ़ोटकता अधिक बहाल केलेली आहे. आणि दुसरीकडे म्हणूनच लोकांना मुख्यमंत्री मोदींचे आकर्षण वाटू लागले आहे. नुसते एका माणसाच्या नावावर जिहादी गुजरातला धक्का लावत नसतील, तर असाच पंतप्रधान केलेला बरा, असे लोकांना वाटू लागले तर नवल नाही. शिवाय गुजरातसारखी आर्थिक प्रगती हा बोनसच असेल ना? अजून वेळ गेलेली नाही. युपीए व कॉग्रेसने मतांच्या राजकारणातून बाहेर पडून वास्तवाचे भान आणावे. हिंदू दहशतवाद असली पोपटपंची सोडून मुळात दहशतवाद म्हणजे काय ते समजून घ्यावे आणि राष्ट्रीय संकट व अघोषित युद्ध म्हणुन त्याला सामोर जाण्याच्या दिशेने पाऊल टाकावे, तरी परिस्थिती व संकटावर मत करणे शक्य होईल.



1 टिप्पणी:

  1. खूप सुंदर आणि वास्तववादी विवेचन. मला तुमचे लेख खूप पटतात. माझ्या मनातील विचार आपण फार वेगळ्या पद्धतीने आणि समजेल अशा स्वरुपात मांडता.--ऋषीकेश अकतनाळ -सोलापुर

    उत्तर द्याहटवा