शनिवार, २ मार्च, २०१३

दुष्काळातली ‘दादा’गिरी: आणि ‘राज’कारण सुद्धा


   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चा झालेला विषय म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येतील काय? पण त्याबाबतीत राज ठाकरे यांनी तीन महिने मौन धारण केले आणि पुढे उद्धव ठाकरे यांनी रितसर सेनेची सुत्रे हाती घेतल्यावरही राजनी त्याबद्दल न बोलणेच पसंत केले, अगदी सेनेची सुत्रे हाती घेतल्यावर उद्धवनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही टाळीसाठी पुढे केलेल्या हाताला राजनी नकारच दिला होता. पुढे जाऊन युती वगैरे आपल्या डोक्यात काही नाही. करायचे ते स्वबळावर असाच पवित्रा घेतला होता. त्यामुळे सामान्य लोकच नव्हेतर राजकिय अभ्यासकही बुचकळ्यात पडलेले होते. एकीकडे राजनी युती वा सेनेसोबत मैत्रीला नकार दिला असताना, आपण काय बोलायचे वा करायचे ते नव्या वर्षातच करू असे राजनी सांगितलेले होते. मात्र हा माणूस नव्या वर्षात काय करणार याचा थांगपत्ता कोणाला त्याने लागू दिला नव्हता. मग आधी उद्धव ठाकरे यांची दुष्काळ विषयक सभा मराठवाड्यात झाली आणि राजनी राज्यव्यापी दौर्‍याची मुलूखगिरी कोल्हापूरातून सुरू केली. त्याची सुरूवातच इतकी दणक्यात झाली, की माध्यमे व राजकीय पक्षांनाही तोंडात बोट घालण्याची वेळ आली. कोल्हापुरात एवढी मोठी सभा आजवर बाळासाहेब वगळता कोणी घेतलेली नाही. त्यामुळे राजच्या त्या सभेने सर्वांना थक्क केले तर नवल नव्हते. पण त्यातल्या गर्दीकडे बघताना सर्वजण एका गोष्टीला विसरले; ती म्हणजे त्या भागातील मनसेची ताकद. स्थापनेपासून राजच्या पक्षाचे सगळे बळ मुंबईत राहिले व त्यांनी पुढल्या काळात पुणे व नाशिक अशा परिसरात हातपाय पसरायचा प्रयास केला. थोड्या प्रमाणात त्यांनी मराठवाड्यात वाढणार्‍या औरंगाबाद शहरात आपले बस्तान बसवायचाही प्रयत्न केला. तरीही मोठी महानगरे व त्याच्या भोवतालचा ग्रामीण भाग असेच मनसेचे लक्ष्य राहिले. त्यामुळेच कोल्हापूरची अभूतपुर्व सभा हे कौतुकच होते. पण ती सभा कशाला व तिला इतकी गर्दी लोटली कशामुळे; याचा फ़ारसा विचार झालेला दिसला नाही.

   साधारणपणे सोपी उत्तरे शोधणे हा मानवी स्वभाव असतो. पण ती सामान्य माणसाची प्रवृत्ती असते. अभ्यासक व जाणकार त्याला अपवाद असले पाहिजेत. म्हणूनच सभेच्या गर्दीचे लोकांकडून कौतुक चालू असताना राजकीय निरिक्षक व अभ्यासकांनी जिथे मनसेची इतकी प्रभावी संघटना नाही, तिथे राज ठाकरेंनी इतकी मोठी सभा घेण्याचे धाडस का करावे आणि त्यात यशस्वी तरी कसे व्हावे, या गहन प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरज होती. पण त्यापेक्षा अभ्यासकांनी सुद्धा सोपी उत्तरे शोधण्यातच धन्यता मानली. त्यामुळे राज दिसतात व बोलतात बाळासाहेबांसारखे; तितकेच आक्रमक व मनोरंजक, अशी सोपी उत्तरे शोधली गेली. मनसेच्या विरोधकांनाही ती उत्तरे वा खुलासे आवडणारे होते. त्यामुळे तो विषय तिथेच संपला. पण एक गोष्ट विसरता कामा नये. त्या सभेची कॉग्रेस व राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांनी गंभीर दखल घेतली होती. मुद्दाम प्रसिद्धीपत्रक काढून त्या पक्षांनी राजच्या कोल्हापुर सभेवर आपल्या प्रतिक्रिया माध्यमांकडे पाठवल्या. त्याही अर्थातच हेटाळणी करणार्‍या व टवाळी करणार्‍या होत्या. ते स्वाभाविकच होते. कारण राजनी त्या अफ़ाट सभेमध्ये त्याच दोन्ही पक्षांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवलेले होते. पण कोणी विनोदी, मनोरंजक बोलतो म्हणुन इतकी गर्दी लोटते असे होत नाही. राजच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव नसता, तर ती गर्दी जमणे शक्यच नव्हते. शिवाय नुसत्या व्यक्तीमत्वाचा किंवा आक्रमक ठाकरी भाषेचाच तो प्रभाव नाही. जी तरूणाई त्या सभेसाठी लोटली होती, त्या वयोगटाला खुप महत्व आहे. कारण हा प्रदेश व सभोवारचे जिल्हे राष्ट्रवादी व कॉग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात. अगदी विरोधी पक्षाच्या तिथल्या गोष्टीही तेच दोन्ही पक्ष नियंत्रित करतात. म्हणजेच तिथले जे दांडगे लोक सेना भाजपामध्ये येतात किंवा पुन्हा फ़ुटून माघारी जातात, तेही राष्ट्रवादी-कॉग्रेस यांच्याच इशार्‍यावर चालत असते. सहाजिकच राजची सभा यशस्वी होण्यामागे तेच पक्ष असायला हवेत किंवा ते संपुर्णपणे मनसेचेच यश मानावे लागेल.

   ज्याप्रकारे या मुलूखगिरीला नंतर वळण लागलेले आहे, त्याकडे बघता निदान राजच्या कोल्हापूर यशाचा राष्ट्रवादी पक्ष भागीदार असू शकत नाही आणि कॉग्रेसनेही तात्काळ राजच्या भाषणावर व्यक्त केलेली नाराजी बघता, त्याही पक्षाची राजशी छुपी युती असण्याची शक्यता जवळपास नाही. मग इतकी मोठी सभा खरेच राजच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे काय? ती मनसेचे शक्तीप्रदर्शन आहे काय? असेल तर मग आजवर ही ताकद दिसली कशाला नव्हती? गेल्याच वर्षी तिथली महानगरपालिका निवडणूक झाली, त्याकडे मनसेने पाठ फ़िरवली होती. आज दिसणारी ताकद खरी असेल, तर मागल्या वर्षी पालिका निवडणुक मननेने लढवायला हवी होती. आणि तेव्हा ती ताकद नसेल तर मग वर्षभरात ही ताकद त्या नवख्या पक्षाकडे कुठून आली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. त्यातील पहिले उत्तर असे, की जी भव्यदिव्य सभा झाली व गर्दी लोटली, त्याने लोकांना प्रभावित केलेले असले, तरी त्याला मनसेची राजकीय शक्ती आज तरी मानता येणार नाही. पण त्या परिसरात त्या पक्षाने बस्तान मांडायचे ठरवले; तर त्याला किती उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळू शकतो, त्याचे प्रत्यंतर त्या सभेने आणुन दिलेले आहे. त्यामुळेच इतकी तरूण वयोगटातील गर्दी तिथे का लोटली होती, त्या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे. अनेक दिवस त्या सभेच्या जाहिराती व प्रचार झालेला असेल हे मान्य. पण तेवढ्याने खुप दूरच्या अंतरावरून इतकी गर्दी लोटणार नाही. याचा अर्थच अशी गर्दी राजना ऐकायला उत्सुक होती, हे मान्य करायलाच लागेल. पण तेवढ्यासाठी पन्नास शंभर मैलावरून कोल्हापूरात यायची गरज नव्हती, अनेक वाहिन्यांनी त्याचे सर्व भाषण थेट प्रक्षेपित केलेले होते आणि तसे करणार याचाही आधीच गवगवा केलेला होता. म्हणजेच घरात बसूनही राजच्या ‘नकलां’ची मौज लुटता आलीच असती. तेवढ्यावर समाधान न मानता ही तरूणांची गर्दी मैदानात धावून येते; ही बाब म्हणूनच मोलाची आहे. तिला राजच्या सोबत आहोत असे दाखवायची गरज का वाटावी? अजितदादा किंवा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातल्या तरूणाईला असे त्यांच्याचवरील कडव्या टिकेचे भागीदार व्हायची इच्छा कशाला असावी? ही रहस्ये उलगडण्याची गरज आहे.

   दोन लाखाहून अधिक राजच्या कोल्हापूरच्या सभेला गर्दी होती आणि तशीच गर्दी त्यांनी कोकणात खेड व सोलापुरच्या सभांमध्ये खेचली. त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी व प्राधान्याने अजितदादा यांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले होते. त्यांच्या ठाकरी भाषेवर आक्षेप घेतला गेला आणि नेहमीच घेतला जातो. त्यात आता नवीन काही राहिलेले नाही. पण त्यापेक्षा महत्वाची बा्ब आहे; ती राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात या नव्या नेत्याने केलेली यशस्वी मुलूखगिरी. तरूणाईचा त्याला मिळणारा प्रतिसाद दाखल घेण्यासारखा आहे. कारण अशीच तरूणाई १९८६-८७ या कालखंडात प्रथमच फ़िरणार्‍या शिवसेनाप्रमुखांना बघायला आणि ऐकायला धावलेली होती. तेव्हाही त्या गर्दीची अशीच टवाळी झालेली होती. मनोरंजनासाठी लोक जमतात. पण त्याची मते होत नाहीत असेच विश्लेषण तेव्हाही झालेले होते. पण १९९० सालात सेनेने भाजपा सोबत युती करून निवडणूका लढवल्या; तेव्हा तिचे ५५ आमदार निवडून आल्यावर मते कशी फ़िरतात, त्याच्या अभ्यासाला जाणकार लागले होते. नेमकी आज तशीच तरुणांची गर्दी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या मागे धावते आहे. ती फ़क्त गर्दी नाही तर तरूणांची गर्दी आहे हे विसरता कामा नये. मग विचार याचा करण्याची गरज आहे, की ज्या प्रदेशातला तरूण तेव्हा बाळासाहेबांच्या प्रभावाखाली गेला नव्हता आणि तेव्हाही शरद पवार यांच्याच नेतृत्वावर विसंबून राहिला होता; त्याच विभागात आज असा फ़रक का पडतो आहे? तिथे आधीच कमकुवत असलेल्या विरोधी राजकारणाची जागा भरायला अन्य प्रस्थापित पक्ष तोकडे पडले; तिथे हा नवजात पक्ष इतकी मुसंडी निदान लोकप्रियतेमध्ये कशामुळे मारतो आहे? राजच्या व्यक्तीमत्वाचा करिष्मा आहे, की शरद पवारांची जादू संपत असताना त्यांचे वारस तो बालेकिल्ला संभाळू शकलेले नाहीत काय? मला वाटते तोच खरा कळीचा मुद्दा आहे.

   गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ कॉग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे आणि शरद पवार यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात आपला जम बसवताना राज्याची सुत्रे आपल्या पुतण्याकडे क्रमाक्रमाने सोपवलेली आहेत. तो अधिकार हाती घेताना अजितदादा ती जबाबदारी किती यशस्वीरित्या पार पाडू शकले, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी शरद पवार व अजितदादा यांच्या कार्यशैलीतला फ़रक लक्षात घेण्याची गरज आहे. पवारांच्या राजकारणात अनेक दोष व लबाड्या असतील. पण एकाचवेळी धुर्त व स्वार्थी सोबत्यांना घेऊन चालताना; त्यांनी खर्‍या प्रामाणिक व कृतीशील कार्यकर्त्यांनाही आपल्या जवळ ठेवण्याचे कौशल्य नेहमीच दाखवलेले आहे. त्यासाठी असा विधायक क्षेत्रात राबणा‍र्‍यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पुण्याईतून आपल्या राजकारणाला पावित्र्याची जोड देण्याचा प्रयास केलेला होता. पण अजितदादांची कार्यशैली नेमकी उलट आहे. प्रभावशाली बलवान व धनदांडगे लोक सोबत घेऊन व त्यांनाच शक्ती देऊन आपला राजकीय वचक निर्माण करण्यावर दादांनी नेहमी भर दिला. त्यामुळेच त्यांची प्रतिमा राजकीय टग्या अशी झाली आणि स्वत: दादांनीच तोंडाने ते सांगूनही टाकलेले आहे. पण त्यामुळेचा धनवान, ठेकेदार, व्यापारी व सत्तेचे अधिकाधिक लाभ उठवून त्याखाली वंचित वर्गाला दाबून ठेवणारा अनुयायी दादांनी उभा केला. सहाजिकच त्यांच्यासह त्यांच्या पक्षाची तशीच प्रतिमा होत गेली. सत्ता, पैसा व दांडगाई या बळावर विरोध दाबून टाकणे किंवा फ़ोडाफ़ोड करून आपले वर्चस्व प्रस्थापित करणे; यावर दादांचा भर राहिला. त्यांच्या अनुयायांच्या या दडपेगिरीच्या विरोधात दाद मागणारा कुणी राहिला नाही. म्हणून त्याबद्दलची नाराजी संपलेली नव्हती. तो दबलेला वर्ग योग्य जागा व संधी शोधत होता. त्या कार्यकर्ता होऊ शकणार्‍या तरूणाला खंबीर आणि धडक देण्याची हिंमत असलेला नेता व पक्ष हवा होता. त्या तरूणाईचे लक्ष राज ठाकरे व मनसेकडे वेधले गेले. दडपलेल्यांचा आवाज होण्यासाठी दुसरा कुठला पक्ष वा नेता गेल्या दहा वर्षात पुढे गेला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षीय पोकळी राजकारणात निर्माण झाली. ती आधीपासूनच होती, पण थोरले पवार अतिशय कौशल्याने त्या पोकळीचा आपल्या राजकीय डावपेचात वापर करून घेत होते. त्यालाच अजितदादांच्या दबंग राजकारणाने फ़ाटा दिला आणि तीच तरूणाई मग पर्यायाच्या शोधात फ़िरू लागली. तिनेच कोल्हापूर व सोलापूरात गर्दी केली हे विसरता कामा नये.

   विरोधी भूमिका, राजकीय नाराजी व प्रक्षोभ आपल्या राजकारणाला प्रतिकुल होणार नाही व स्फ़ोटक होणार नाही, याची काळजी घेण्याची राजकीय खुबी शरद पवार दाखवत होते. तिच्या अभावामुळे नाराजांना वैफ़ल्यग्रस्त बनवण्याची किमया अजितदादांची आहे. त्यांच्या अनुयायी व पाठीराख्यांची भाषा त्याचा पुरावा आहे. पवारांचा पक्ष अजितदादांचा झाल्याचे त्याच भाषेतून स्पष्टपणे दिसते. त्यातूनच या वंचित वर्गातील नव्या पिढीला राजकीय पर्याय शोधायला भाग पाडलेले आहे. आपला दबलेला आवाज उठवणार्‍याच्या शोधात पाठवले आहे. आणि त्यातूनच मग राजच्या मुलूखगिरीला इतके यश मिळू शकले आहे. त्याला जशास तसे उत्तर देऊ; असे दादांच्या अनुयायांनी सांगितले असले तरी ती भाषा त्यांनाच राजकीय तोट्याची ठरणार आहे. कारण राज वा मनसेकडे गेलेला तरूण राजच्या प्रेमाने तिकडे ओढला गेलेला नसून; तो दादांच्या मुजोर धनदांडग्या अनुयायांच्या रागाने तिकडे वळला आहे. तो बंडखोरी करणार नाही, इतक्या मर्यादेत थोरल्या पवारांनी त्याला ठेवले होते, त्याच रणनितीला तिलांजली दिल्याचे हे परिणाम आहेत. पण ती जागा व्यापण्याची कुवत नाही किंवा शक्यता नसेल, तर तिथे राजने मुलूखगिरी करण्याला उद्धव ठाकरेंनी समर्थन देणे स्वाभाविक आहे. त्यातून राष्ट्रवादीचे बळ कमी होते आणि शिवसेनेचे काही नुकसान होत नाही. त्यामुळेच राजच्या गाडीवर हल्ला होताच, त्याला तितकेच हिंसक प्रत्युत्तर मनसेने देताच; उद्धव ठाकरे यांनी भावाची राजकीय पाठराखण केलेली आहे. की दोन्ही भावातले हे संगनमत आहे? विरोधी राजकारणातली जी जागा राजला हवी आहे; ती राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या प्रभावक्षेत्रात त्यांनी घ्यावी; असा हा समझौता असावा काय? एकदा सत्ता भोगलेल्या सेना व भाजपातील नेत्यांना आता मुलूखगिरीची उमेद राहिलेली नाही. त्यामुळेच जिथे पोकळी आहे; तिथे सेना भाजपा तिसर्‍या विरोधी पक्षाला छुपा पाठींबा देत असावेत असे वाटते.

   म्हणूनच राजने आपल्या राज्यव्यापी दौर्‍यासाठी निवडलेले जिल्हे व शहरे बघितली तरी लक्षात येते, की त्यात त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीला लक्ष्य करायचे योजलेले आहे. पण त्याचवेळी जिथे पर्यायी वा विरोधी पक्ष अगदीच नगण्य आहे; असाच सगळा प्रदेश आहे. जिथे शिवसेना किंवा भाजपाची ताकद क्षीण आहे. म्हणजेच त्या प्रदेशात आपले बस्तान बसवून पुढल्या निवडणुकीत युती नाही, तरी जागावाटपाची सज्जता ठेवायची रणनिती आखलेली दिसते. अजितदादा यांच्यासह त्यांच्या किती अनुयायांना त्या रणनितीची शंका आली असेल कोण जाणे? असती तर त्यांनी उर्मट उत्तरे व जशास तसे ही भाषा झाली नसती. उलट आपल्या बालेकिल्ल्यात इतक्या मोठ्या संख्येने तरूण वर्ग राजकडे कशाला ओढला गेला आहे, त्याचा अभ्यास केला असता. या दादा समर्थक नेत्यांना डिवचून त्यांची मुजोरीच राजला चव्हाट्यावर आणायची असेल, तर अशा भाषेतून ते त्याच्याच सापळ्यात फ़सत आहेत ना? त्यांचेच पितृतुल्य नेते शरद पवार यांनी अशा उतावळ्यांना दिलेला सल्ला किती लोकांनी गंभीरपणे लक्षात घेतला आहे? एका मुलाखतीमध्ये पवार म्हणाले होते, बाळासाहेब सत्तेत नाहीत. त्यामुळे त्यांना भाषेचे बंधन नाही. पण जो सत्तेत व जबाबदार पदावर असतो, तो राज्याचे प्रतिनिधीत्व करत असतो. म्हणूनच त्याला भाषेचा संयम राखणे भाग असते, अगदी वसंत दादांसारख्या अपुर्‍या शिक्षणाच्या मुख्यमंत्र्यानेही तो संयम दाखवला होता. याचे भान सत्तेत असलेल्याने सोडता कामा नये. हा सल्ला अजितदादा व त्यांच्या पाठीराख्यांसाठी होता. पण परवाच्या दगडफ़ेक प्रकरणानंतर त्यांची भाषा काय होती?

   यांची मुजोरी ठळकपणे दाखवणे आणि आपणच त्यांना मुहतोड जबाब देऊ शकतो असे जनमानसात भरवणे; हेच राज ठाकरे यांचे उद्दीष्ट असेल तर त्यामध्ये मनसे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली म्हणायला हवी. अर्थात उद्याच निवडणूका नाहीत आणि कुठे फ़सते आहे, ते ओळखण्याची क्षमता राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वामध्ये नसेल, तरी शरद पवार यांच्यात नक्कीच आहे. आणि कुठे हादरे बसत आहेत व बसलेत, त्याची जाण अभ्यासकांपेक्षा त्यांनाच अधिक असणार. म्हणुनच निवडणुका येण्याआधीच पवार डागडूजी नक्कीच करतील. पण ती करायची तर त्यांचे मानणारा कार्यकर्ता व अनुयायी आज त्यांच्याच पक्षात किती शिल्लक आहे, याची शंका आहे. त्यामुळेच ही दोन पुतण्यांची लढाई पुढल्या काळात अधिकच रंगतदार व हातघाईची होण्याची चिन्हे आहेत. त्यात सत्तेवर नसल्याने जेवढी कमी बंधने राज ठाकरे यांच्यावर नाहीत, तेवढी अजितदादांवर उपमुख्यमंत्री असल्याने येतात, हे विसरता कामा नये. म्हणूनच उद्धव ठाकरे यांची दगडफ़ेकीनंतरची प्रतिक्रिया मोजक्या शब्दातली व पण नेमकी आहे. ‘हातात दगडच घ्यायचा असेल तर सत्ता सोडा आणि मग बघूया’ हे उद्धवचे शब्द मोठे अर्थपुर्ण आहेत. एकीकडे त्यांनी भावाला पाठीशी घातला आहे आणि दुसरीकडे अजितदादांना त्यांच्या मर्यादाही सांगितल्या आहेत.

   सवाल इथून पुढे काय होणार असा आहे. दुष्काळ व त्याचे विस्कटलेले नियोजन; यामुळे आजचे सत्ताधारी कमालीचे बदनाम झालेले आहेत. त्याचाच फ़ायदा उठवायला राज ठाकरे मुलूखगिरीवर निघालेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी नेमके वारंवार निवडून दिलेले लाडके नेतेच कसे दिवाळखोर आहेत; त्यावर तोफ़ डागून लढाईचे बिगूल फ़ुंकलेले आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद अजितदादा यांनी ओळखण्याची गरज आहे, नुसतीच डोक्यात राख घालून काहीच साध्य होणार नाही. ज्या उर्मटपणाने दादा  बदनाम झाले आहेत, त्यातून बाहेर पडणे व संयमी भाषेत धुर्तपणे परिस्थिती हाताळणेच त्यावरला उपाय आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या उद्धट भाषा वापरणार्‍या व मुजोरी करणार्‍या अनुयायांना पायबंद घालणे अगत्याचे आहे. ते दादांच्या स्वभावाला कितपत शक्य आहे, त्यावरच पुढले परिणाम अवलंबून आहेत. कारण युद्ध मुंडे वा अन्य कुणाच्या मैदानावर नसून खुद्द राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच होऊ घातले आहे व त्यात नासधूस व पडझड होईल; ती तुमच्या साम्राज्याची होणार हे विसरता कामा नये. म्हणुन लढाई शत्रूच्या प्रांतात होईलम असे डावपेच शहाणपणाचे असतात हे विसरता कामा नये. आपली ‘पोरे’ राजच्या नादाला का लागली त्याचा शोध घेतला तरी खुप झाले. टाळी एका हाताने वाजत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. ते कुठल्या व कोणच्या हाताची बात करत होते? राजच्या अनुयायांनी धमाल केली असेल. पण जी टाळी वाजते आहे, त्यातला दुसरा हात राष्ट्रवादीचा नाही, असे कोण म्हणू शकेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा