गेली दोन वर्षे रोज कुठल्या ना कुठल्या अब्जावधी रुपये, लाखो, करोडो रुपयांचा घोटाळा, भ्रष्टाचाराचा मामला समोर येत असतो. कधी तो राज्य सरकारचा असतो, तर कधी तो केंद्रातील कॉग्रेसप्रणित युपीए सरकारचा असतो. आणि अजून त्यातल्या एकाही घोटाळ्याचा निचरा व खुलासा होऊ शकलेला नाही. गृहमंत्री होताच पुण्याला आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी या बाबतीत सत्य बोलून दाखवले तर त्यांच्या खर्या बोलण्यावर सगळीकडून टिकेची झोड उठली होती. तेव्हा कोळसा खाण घोटाळा नव्याने पटलावर आलेला होता. त्यावर भाष्य़ करताना शिंदे म्हणाले, लोक सगळे विसरतात आणि पुन्हा कॉग्रेसलाच निवडून देतात. पंचवीस वर्षे बोफ़ोर्स घोटाळ्य़ाला होऊन गेली. आता कोणाच्या लक्षात तरी आहे काय? किती खरे बोलले होते ना गृहमंत्री? आपण सर्व काही विसरतो आणि पुन्हा त्याच घोटाळे करणार्या कॉग्रेसलाच निवडून देतो, सत्ता त्याच पक्षाच्या हाती सोपवतो. मग आपल्याला भ्रष्टाचार नको असतो, असे कोण म्हणू शकेल? भ्रष्टाचार आपल्यालाच हवा असतो; म्हणून आपण हमखास आणि मोठा भ्रष्टाचार करतील, त्यांनाच पुन्हा पुन्हा मते देत असतो ना? नसेल तर मग दहा वर्षासाठी पुन्हा कॉग्रेसला सत्ता का मिळाली? कोणी दिली? त्याला जबाबदार कोण? कॉग्रेस वा त्याने तयार केलेली युपीए आघाडी सत्तेवर नसती, तर इतका भ्रष्टाचार झाला असता काय? म्हणजे भाजपा प्रणित एनडीए आघाडीच्या हाती सत्ता असती, तर इतका भ्रष्टाचार होऊ शकला असता काय? तसा भ्रष्टाचार सगळेच राजकारणी करतात. पण कॉग्रेस जितका मोठा व सातत्याने भ्रष्टाचार करू शकते; तेवढा भ्रष्टाचार दुसर्या कुठल्या पक्षाला आजवर करता आलेला नाही. मग आपण जेव्हा पुन्हा त्याच पक्षाला निवडून सत्ता सोपवतो; तेव्हा आपल्या अपेक्षा मोठा भ्रष्टाचार व्हावा अशीच नसेल काय? आज हेलिकॉप्टर घोटाळा समोर आल्यावर मुद्दाम हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण गेल्या दोन वर्षात मनमोहन सिंग यांच्या सरकारने नक्की कुठले काम केले, या प्रश्नाचे भ्रष्टाचार व घोटाळे या दोन शब्दापलिकडे दुसरे कुठले उत्तर देण्याची सोय उरलेली नाही.
नऊ वर्षापुर्वी देशात अटलविहारी वाजपेयी यांचे एनडीए सरकार होते. त्याच्यावरही लहानमोटे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. पण आधीच्या वा नंतरच्या कॉग्रेस सरकारने केलेल्या कुठल्या तरी भ्रष्टाचाराशी भाजपाच्या घोटाळ्याची तुलना होऊ शकते काय? उदाहरणार्थ तेव्हा कारगिल युदधाच्या निमित्ताने संरक्षण खात्याचे खरेदी केलेल्या शवपेट्यांचा घोटाळा विरोधकांनी खुप गाजवून संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडीस यांना संसदेत बोलूच दिलेले नव्हते. त्या घोटाळ्यातील रक्कम किती होती? त्याची एकूण खरेदी किंमत आजच्या एकेका घोटाळ्य़ात खाल्लेल्या कमीशनपेक्षाही नगण्य अशी आहे. म्हणजेच युपीए सरकार सत्तेवर आलेच नसते आणि भाजपाचे तथाकथित ‘भ्रष्ट एनडीए’ सरकारच पुढली नऊ वर्षे सत्तेवर राहिले असते; तर निदान इतक्या भव्यदिव्य प्रमाणात सरकारच्या पैशाची लूट होऊ शकली नसती, हे मान्यच करावे लागेल. त्यांनीही भ्रष्टाचार नक्कीच केला असता. पण ज्याला ‘तळे राखी तो पाणी चाखी’ म्हणतात, तेवढ्या प्रमाणात एनडीएने भ्रष्टाचार केला असता. काही कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नक्कीच झाला असता. पण आज जसा अब्जावधी, हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार अगदी राजरोस झालेला आहे, तेवढा तरी नक्कीच झाला नसता. मग हे असे हमखास मोठा भ्रष्टाचार करणारे सरकार कशासाठी आणले गेले? मतदाराने हे सरकार कशाला आणले? मतदाराने आणले नसेल तर कोणी आणले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता शोधावी लागणार आहेत. सामान्य जनता वा मतदार आपण भ्रष्टाचारासाठी हे सरकार सत्तेवर आणले हे मान्य करणार नाही. कारण जनतेला भ्रष्टाचार नको असतो, कुठली जनता आपल्याच पैशाची लूट करणारे सत्ताधारी मुद्दाम निवडून आणील काय? मग सवाल येतो, की जनतेने हे सरकार निवडलेले नाही वा त्याला भ्रष्टाचार करायची इतकी मोकाट संधी दिलेली नाही, तर ती संधी या सरकार वा सत्ताधार्यांना कोणी दिलेली आहे?
निवडणुकीतल्या मतदानाचे आकडे पाहिल्यास, या सरकारला जनतेने सत्तेवर आणलेले नाही हे निमुटपणे मान्य करावेच लागेल. तेव्हा आज जे अनंत कोटींचे भ्रष्टाचार व घोटाळे झालेले आहेत; त्याला सामान्य मतदार जबाबदार नाही, हे अगदी स्पष्टपणे दिसते. तेव्हा सामान्य जनतेला तीच कर्मदरिद्री आहे असे कोणी म्हणू शकणार नाही. कॉग्रेस सत्तेवर येऊ नये याची काळजी सामान्य मतदाराने १९८९ सालापासून कसोशीने घेतलेली आहे. गेल्या चोविस वर्षात देशामध्ये एकूण सात लोकसभा निवडणुका झाल्या. त्यात बोफ़ोर्स घोटाळा करणार्या कॉग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सामान्य मतदाराने कसोशीने प्रयास केलेला आहे. पण तसे करताना, ज्या अन्य पक्षांना पर्याय म्हणून सामान्य जनतेने मते दिली; त्यांनी मात्र त्याच मतदाराशी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे काय? की त्यांनीच सामान्य जनतेशी दगाफ़टका करून पुन्हा पुन्हा सरकारी तिजोरीची लुट करण्याची संधी कॉग्रेसला मिळवून दिली आहे? आजच्या या भयंकर व अफ़ाट भ्रष्टाचाराचे खापर कॉग्रेसच्या माथी फ़ोडणे सोपे आहे. कारण त्यात कॉग्रेसवाल्यांचे हात, पाय गुंतलेले दिसतच आहेत. पण त्या पक्षातले नेते, मंत्री भ्रष्टाचार करतात; ही नवी गोष्ट नाही. मग त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये, याची काळजी जनतेने घेतली असताना जनतेच्या अपेक्षांचा भंग करणारे खरे दोषी नाहीत काय? कोण आहेत हे जनतेशी दगाफ़टका करणारे लोक? कोण आहेत ज्यांनी भ्रष्टाचार करणार्या कॉग्रेसला जनमतावर बोळा फ़िरवून पुन्हा सत्तेवर आणून बसवण्याचे पाप केले आहे? ज्यांनी असे पाप केले तेच यातले खरे गुन्हेगार नाहीत काय? कधी आपण त्या छुप्या गुन्हेगारांचा वा साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे काय? चटकन कोणाला पटणार नाही वा अतिशयोक्ती वाटेल; पण या घोटाळ्याचे खरे पाप देशातील सेक्युलर म्हणून ओळखल्या जाणार्या प्रत्येकाने केलेले आहे. कारण त्यांनीच जनतेचा डोळ्यात धुळफ़ेक करून जनतेला लुटणार्या कॉग्रेसला सत्ता हाती घेऊन इतकी प्रचंड लुटमार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तो आरोप सिद्ध करण्यापुर्वी एक गोष्टीचा पुरावा मी वाचकांना सादर करणार आहे. जनतेला कॉग्रेस नको असल्याने मतदाराने कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याच्या माझ्या दाव्यात कितीसे तथ्य आहे?
मतदार किंवा जनतेच्या इच्छेचा पुरावा म्हणजे तिने प्रत्यक्ष मतदानातून व्यक्त केलेली इच्छा होय. ती इच्छा आपल्याला १९८९ च्या मतदानाच्या आकड्यातूनही स्पष्टपणे दिसू शकते. सामान्य माणसाची स्मरणशक्ती दुबळी असते. त्यामुळे पत्रकार व विचारवंत म्हणवून घेणारे भाव खात असतात. त्यातले अनेकजण प्रसंगी आपल्या डोक्यातले असत्य सामान्य माणसाला पटवून देण्यासाठी वाटेल ते खोटे बोलतात किंवा आकडे व शब्दांची मोडतोड करत असतात. २००४ सालात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या एनडीए आघाडीचा पारभव झाला हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण ज्याप्रकारे सोनियांनी बाजी मारली असे भासवले जात होते; त्यात किती तथ्य होते? त्या आधीच्या तीन निवडणूकांमध्ये कॉग्रेसची स्थिती काय होती? १९८४ च्या निवडणूकीत ४९ टक्के मते व ४१५ जागा जिंकल्यापासून पुढल्या सात लोकसभा निवडणूकात क्रमाक्रमाने कॉग्रेस लोकांनी कशी नाकारली आहे, याचे सत्य माध्यमांनी सतत लपवले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जुन्या निकालाची सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. ती बारकाईने अभ्यासली, तर सेक्युलर पत्रकार व माध्यमे लोकांची किती फ़सवणूक करतात; ते लक्षात येऊ शकेल. उदाहरणार्थ १९८४ सालात प्रचंडच नव्हेतर अभूतपुर्व यश मिळवणार्या राजीव गांधी यांचा १९८९ सालात दारूण पराभव झाला असे मानले जाते व सांगितले गेले. पण २००९ च्या निवडणुकीत सोनिया, मनमोहन यांनी मिळवलेले यश मात्र दैदिप्यमान आहे, असेच चित्र रंगवण्यात आले होते ना? त्या दोन निवडणूकातील आकडेच बोलणारे आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील सोनियांच्या कॉग्रेसला जितकी मते मिळाली त्यापेक्षा अवघ्या नऊ जागा (२०६-१९७) राजीव गांधींना १९८९ ह्या दारूण पराभवात कमी मिळाल्या होत्या. पण तेव्हा राजीव गांधींच्या कॉग्रेसने मिळवलेली मते २००९ च्या सोनियांपेक्षा अकरा टक्के अधिक होती. अगदी १९९१ सालात ऐन निवडणुकीत राजीवजींची हत्या झाली, तेव्हाही कॉग्रेसला ३६ टक्के मते होती, सोनियांच्या प्रचंड यशाला त्यापेक्षाही आठ टक्के मते कमीच पडली आहेत.
सोनिया आणि राजीव वा इंदिराजी यांच्या लोकप्रियतेची तुलनाच होऊ शकत नाही. सोनियांनी कॉग्रेसला मिळवून दिलेल्या यशाची तुलना नरसिंहराव यांच्या पराभूत कॉग्रेस बरोबर मात्र होऊ शकते. नरसिंहरावांच्या कॉग्रेसने १९९६ सालात जितकी मते स्वबळावर मिळवली होती; तेवढी सोनियांनी २००९ मध्ये द्रमुक, ममता, आदिंच्या मदतीने मिळवली आहेत. त्यामुळे कॉग्रेसच्या जागा मात्र वाढल्या. केसरी व नरसिंहराव यांच्या जवळपास सोनिया-कॉग्रेस यश मिळवू शकल्या. मात्र त्यांनी अन्य लहानमोठ्या पक्षांबरोबर आघाडी करून सत्ता पुन्हा कॉग्रेसकडे आणण्याचा धुर्तपणा करून दाखवला. बाकी लोकप्रियतेची गोष्ट सोडुन द्या. सोनिया गांधी यांची जनमानसातील लोकप्रियता केसरी वा नरसिंहराव यांच्यापेक्षा किंचितही अधिक नाही, हे निवडणुकीच्या आकड्यातूनच दिसते. पण हे सत्य कुणा पत्रकार वा माध्यमांनी आजवर सांगितले आहे काय? नसेल तर मग सोनियांनी कॉग्रेसचे पुनरुज्जीवन केले म्हणजे नेमके काय केले? तर कुवत व लोकप्रियता नसलेल्या कॉग्रेसला अन्य सेक्युलर खुळ्या पक्षांना हाताशी धरून पुन्हा सत्तेवर बसवण्याची यशस्वी चलाखी सोनियांनी करून दाखवली आहे. म्हणजे काय केले, तर भाजपाच्या हिंदूत्वाचा बागुलबुवा करून सोनियांनी अन्य डाव्या सेक्युलर पक्षांना सोबत घेतले आणि पुन्हा कॉग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभाराची सोय करून घेतली. कसे ते पुन्हा आकडेच दाखवतात. नरसिंहराव (१९९६) २८.८० टक्के मते, १४० जागा, सीताराम केसरी (१९९८) २६.८२ टक्के मते, १४० जागा कॉग्रेसने जिंकल्या. त्यानंतर पुढल्या तीन निवडणूका सोनियांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस लढली. त्यातली १९९९ निवडणूक पक्ष स्वबळावर लढला होता, त्यात कॉग्रेसला सोनियांनी मिळवून दिलेले यश किती? २८.३८ टक्के मते व ११४ जागा. पुढल्या दोन निवडणूकात अन्य पक्षांना सोबत घेऊन सोनियांनी लढवल्यावर मिळालेले यश किती? २००४ साली २६.५३ टक्के मते व १४६ जागा. तर २००९ साली २८.५५ टक्के मत व २०६ जागा. म्हणजे मतांच्या बाबतीत राजीवच्या पराभवाशीही सोनियांच्या यशाची तुलना होऊ शकत नाही ना? ती तुलना नरसिंहराव व केसरी यांच्या पराभवाशी होऊ शकते ना? पण सत्ता मिळवली म्हणजे सोनियांची लोकप्रियता इंदिरा गांधींच्य एवढी आहे, असा आभास कोणी निर्माण केला? माध्यामातल्या बदमाशांनी आणि त्यावर त्याच माध्यमातल्या अर्धवट विद्वानांनी विश्वास ठेवला. पण सामान्य जनतेने अजिबात विश्वास ठेवला नाही. म्हणूनच तीन निवडणूका झाल्या तरी मतदार कॉग्रेस वा सोनियांकडे नव्याने वळलेला नाही. त्यांनी अन्य सेक्युलर भोळसटांना हाताशी धरून सत्ता बळकावलेली आहे आणि मनसोक्त भ्रष्टाचाराचा धुडगुस घातलेला आहे.
माझा मुद्दा इतकाच; म्हणजेच पुन्हा कॉग्रेस सत्तेवर आली वा तिने मनसोक्त भ्रष्टाचार केला, म्हणुन त्या मतदाराला वा सामान्य जनतेला गुन्हेगार मानता येणार नाही. कारण तिने कॉग्रेसच्या हाती सत्ता जाऊ नये, म्हणुन शक्य होईल तो जवळचा पर्याय निवडून कॉग्रेसला बहूमत वा सत्ता मिळू नये याची पुरेपुर काळजी घेतली होती. मग तरीही कॉग्रेसच्या हाती सत्ता जाऊन देशात भ्रष्टाचाराचे भीषण थैमान घातले गेले असेल, तर दोष सामान्य जनतेचा कसा असेल? ज्यांनी भ्रष्ट कॉग्रेसच्या हाती सत्ता जाऊ दिली किंवा जनतेच्या इच्छा लाथाडून कॉग्रेसच्या हाती घोटाळे करायला सत्ता सोपवली; तोच गुन्हेगार मानायला हवा ना? तो गुन्हेगार कोण आहे? ज्याने सेक्युलॅरिझम हा बागुलबुवा माजवून सोनियांच्या व कॉग्रेसच्या हाती सत्ता जाऊ दिली, तो प्रत्येकजण त्यातला खरा गुन्हेगार नाही काय? मग तो सेक्युलर सरकार म्हणून एनडीएच्या विरोधात युपीएच्या, कॉग्रेसच्या मदतीला धावला व सेक्युलर भजन गात गात ज्याने जनतेची दिशाभूल केली; तो प्रत्येकजण यातला खरा गुन्हेगार नाही काय? कारण हे सेक्युलर नाटक व बागुलबुवा झालाच नसता; तर कॉग्रेसच्या हाती सत्ता जाऊच शकली नसती. कारण जनतेने तशी मतांची विभागणी नेमकी केलेली होती. कुठूनही कॉग्रेसला २६-२८ टक्क्यापेक्षा अधिक मते व दिडशेपेक्षा अधिक जागा मिळू नयेत याची काळजी मतदार घेत होता, तरीही त्याच कॉग्रेसच्या हाती घोटाळे करायचे अधिकार सोपवणाराच यातला घातपाती गद्दार नाही काय? तो कोण आहे? जो कोणी सेक्युलर म्हणून बोलतो, लिहितो, राजकारण वा राजकीय आघाड्या करतो, असा प्रत्येकजण त्याला जबाबदार नाही काय?
थोडक्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की आज जे घोटाळे बाहेर येत आहेत किंवा भ्रष्टाचाराचे थैमान माजले आहे; त्याला एकटा कॉग्रेस पक्ष वा युपीए तेवढे जबाबदार नाहीत. तर सेक्युलर म्हणून जे काही सांगितले, बोलले, केले जाते, ते जबाबदार आहे. सेक्युलॅरिझम या शब्दाचा आजचा एकमेव अर्थ आहे भ्रष्टाचार, घोटाळा, अनागोंदी, अराजक, घातपात. ज्याला म्हणून आपण आज वैतागलो वा कंटाळलो आहोत, ज्यामुळे आपले जीवन हराम होऊन गेलेले आहे, त्याला आजकालचा सेक्युलॅरिझम जबाबदार आहे. आपल्याला या नरकवासातून सुटायचे असेल, तर आधी आपल्याला या सेक्युलर नामक राक्षसाच्या तावडीतून सुटावे लागेल. कारण तो नुसता भ्रष्टाचार व घोटाळ्याचेच थैमान घालून राहिलेला नाही. त्यामुळेच कायदा निकामी झाला आहे, कायद्याचे राज्य मोडकळीस आलेले आहे. घातपाती सोकावले आहेत, जिहादी बोकाळले आहेत. भ्रष्टाचार शिरजोर झाला आहे. घोटाळे म्हणजेच राज्य कारभार होऊन बसला आहे. अराजक ही नित्याची बाब बनली आहे. गुन्हेगारांना संरक्षण मिळते आहे. या सगळ्याच्या मुळाशी जाऊन बघितलेत, तर त्या प्रत्येक गुन्हेगाराच्या हाती एकच जादूचा दिवा आहे, त्याचे नाव सेक्युलॅरिझम. मग यातून मुक्ती वा सुटका हवी असेल, तर त्याच सेक्युलर थोतांडापासून मुक्ती मिळवावी लागेल. जो कोणी सेक्युलर भाषा बोलतो, सेक्युलर जपमाळ ओढतो, सेक्युलर राजकारण करतो, अशा प्रत्येकापासून सावध रहाणे व त्याला पराभूत करणे; हाच एक सुटकेचा मार्ग आहे. कारण गुन्हे, असुरक्षितता, घातपात, दहशतवाद, घोटाळे, भ्रष्टाचार वा अराजक या सर्वांचा पोशिंदा सेक्युलॅरिझम; असेच आजचे चित्र आहे. जिथे सेक्युलॅरिझम नाही असा दावा केला जातो, त्या एका गुजरात राज्यात मात्र यातली एकही समस्या असू नये; हा योगायोग नाही ना? मग घोटाळे वा अन्य समस्यांचा जनक कोण? त्याच्यापासून मुक्ती नको घ्यायला?
तुम्ही आम्ही सामान्य मतदारांनी कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सतत मतदान करत आलो, त्या प्रत्येकवेळी मतदाराशी दगाबाजी कोणी केली आहे? सेक्युलर म्हणवून घेणार्यांनीच केली आहे ना? बिगर कॉग्रेसी सरकार पाडायचे पाप कोणी केले आहे? सेक्युलर लोकांनीच ना? आणि अलिकडल्या दोन प्रसंगी भ्रष्ट मनमोहन सरकार पाडायची वेळ आली, तेव्हा त्याला वाचवायला कोण धावले आहेत? २००८ सालात मुलायमने सेक्युलर भूमिकेचा धावा करून मनमोहन सरकार वाचवले. कालपरवा एफ़डीआय प्रकरणात सरकार विरोधी भाषण ठोकून पुन्हा मायावती व मुलायमनी कॉग्रेस युपीए सरकारच्या बाजूने मतदान कशासाठी केले? सेक्युलर सरकार वाचवण्यासाठीच ना? आणि ह्या सेक्युलर सरकारने गेल्या नऊ वर्षात आपल्याला काय दिले? भ्रष्टाचार महागाई, घोटाळे, अत्याचार, अन्याय, घातपात, जिहादी दहशतवाद, हिंसाचार, बलात्कार, अनागोंदी व अराजक यापेक्षा काहीही जनतेला देऊ न शकलेले सरकार सेक्युलर असेल; तर आपल्यावरचे खरे संकट सेक्युलॅरिझम हेच नाही काय? मग यावरचा जालीम उपाय कोणता? दहा वर्षापुर्वी सेक्युलर नाटक झालेच नसते तर ही वेळ आली नसती आणि म्हणूनच आपल्याला आधी सेक्युलॅरिझम नावाचे भूत निकालात काढावे लागेल. न रहेगा बास न बजेगी बंसुरी म्हणतात ना? तसे हे सेक्युलर अनटक निकालात काढले तर घोटाळे, भ्रष्टाचार अराजक व गुन्हेगारी अशा सगळ्याच संकटातून मुक्ती मिळू शकेल. म्हणूनच आजतरी सर्वप्रथम सेक्युलर भाषा बोलणार्यापासून तशा राजकारणात असलेल्यांच्या बंदोबस्ताला आपण लागलो, तर बाकीच्या समस्या आपोआपच निकालात निघतील. त्यासाठी युपीए वा कॉग्रेसला पराभूत करण्याची गरज नाही, ते आपण आधीच केले आहे. कॉग्रेसला पर्याय म्हणून मतदान करताना पर्याय सेक्युलर नाही याची आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. कारण सेक्युलॅरिझम हीच आता आपल्याला सर्वाधिक भेडसावणारी समस्या झाली आहे. बाकी आपण भोगत आहोत, ते सगळे त्या मूळ आजाराचे परिणाम आहेत इतकेच.
Tale rakhi to pani Chakhi......???????
उत्तर द्याहटवाSignal todun pannas rupaye lach denaryacha nishedh kela jaato ani varun tale rahki to pani chakhi ha nyay vaparla jaato, ha virodhabhas nahi ka????
bhrashtachar ha shevati bhrashtacharach tyache samarthan kase hou shakte......
Tale rakhi to pani chakhi ya vruttila survatila vaiet mhatle gele karan bhrashtacharachi survaat ithunch zali hoti pan pudhe praman jastch vadhlyamule apan tadjod karun ya vruttila pratishtha prapt karun denyacha prayatn karat ahot ka??????