शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

भाजपाचा सेक्युलर उमेदवार नरेंद्र मोदी



    किती विचित्र शिर्षक आहे ना? ज्याच्यावर गेल्या दहा वर्षात सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांनी तोफ़ा डागायची एकही संधी सोडलेली नाही, त्यालाच भाजपाचा सेक्युलर उमेदवार संबोधणे चमत्कारिक आहे ना? पण त्यात नेमके काय गैर वा चुकीचे आहे? कारण हे नाव तमाम सेक्युलर टिकेमुळेच भाजपाच्या माथी मारले गेले आहे. सेक्युलर गोटाकडून मोदी यांच्यावर इतका भडीमार झाला नसता, तर आज मोदी हे नाव गुजरात बाहेर किती लोकांना ठाऊक असते असा प्रश्न आहे. मोदी यांना मिळालेली इतकी प्रचंड प्रसिद्धी, लोकप्रियता किंवा या माणसाबद्दल देशाच्या अन्य भागात निर्माण झालेले कुतूहल; याचे श्रेय खुद्द मोदी व भाजपाला नक्कीचे देता येणार नाही. मग ते कोणाला द्यायचे? आज तरी गुजरातच्या बाहेर असा कुठला प्रदेश नाही, जिथे मोदी यांनी कुठले राजकीय काम केलेले आहे. दहा वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी तिथे आर्थिक व औद्योगिक विकास केल्याचे लोक ऐकून आहेत. ऐकून एवढ्यासाठी म्हणायचे, की त्यांच्याविषयी गुजरात बाहेरच्या लोकांना ऐकायला मिळालेल्या बातम्या म्हणजे त्यांनी २००२ सालात तिथे घडवून आणलेल्या दंगली. बाकी मोदींनी काही केले असेल, तर ते निदान भारतातल्या सेक्युलर माध्यमांना, पत्रकारांना व जाणकारांना तरी माहित नसावे. अन्यथा त्यांनी सतत नुसत्या दंगलीच्या व त्यातील तपास खटल्याच्याच बातम्या जगाला दिल्या नसत्या. पण दुसरीकडे अन्य मार्गाने लोकांपर्यंत जी माहिती जाऊन पोहोचली, ती खरी की खोटी; ते कळायला मार्ग नाही. मात्र जगभरचे उद्योगपती, गुंतवणुकदार तिकडे गुजरातमध्ये येतात, म्हणजे मोदी यांनी काहीतरी केलेले असावे. असेल तर नेमके काय केले? उद्योगपती व गुंतवणूकदार दंगली करण्यासाठी पैसा गुंतवत नाहीत; एवढे सामान्य माणसाला कळते. त्यामुळेच अंबानी व टाटा यासारखे देशातले सर्वात मोठे उद्योगपती मोदींच्या कार्यावर खुश असतील, तर ते काम नक्कीचे दंगलीचे नसून उद्योग विकासाचे असावे, अशीच लोकांची समजूत होणार. शिवाय पुन्हा पुन्हा तिथला मतदार मोदींनाच मुख्यमंत्री म्हणून मतदान करतो, त्याचा अर्थ होत असलेल्या कामाबद्दल तिथली जनता खुश असावी. हे अर्थात लोकांनी आपल्या तर्कशास्त्रानुसार शोधलेले उत्तर आहे. पण लोकांच्या मनात इतके कुतूहल मोदी या माणसाबद्दल ज्यांनी निर्माण केले; त्यांनाच मोदींच्या या लोकप्रियतेचे श्रेय द्यायला नको काय? आणि ते महत्वाचे काम त्यांना सतत दहा वर्षे लक्ष्य बनवणार्‍या सेक्युलर गोटाने केले आहे. मग त्याच मोदींना भाजपाचे ‘सेक्युलर’ उमेदवार म्हणणे गैर आहे काय? 

   कधीही एखाद्या विषयात लोकांना माहिती मिळत नसली; मग लोक त्याबद्दल अन्य मार्गाने माहिती मिळवत रहातात. अशावेळी योग्य मार्ग नाकारला गेला, तर अनेकदा अफ़वाही सत्यावर मात करतात. मोदींच्या बाबतीत तसेच काहीसे झालेले आहे. त्यांच्या विरोधातल्या अतिरेकी अपप्रचारामुळे त्या माणसाबद्दल बरेच कुतूहल गुजरात बाहेर निर्माण करण्याचे काम सेक्युलर माध्यमे व पत्रकारांनी केले. त्यामुळे हा एका राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचला. लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला. एका बाजूला असे होत असताना दुसरीकडे उद्योगपती व अन्य व्यापारी वर्गाकडून मोदींचे कौतुक चालू होते. विकासाच्या बातम्या लोकांपर्यंत पाझरत होत्या. तिसरीकडे पुन्हा सत्तेवर आलेल्या युपीएचे अपयश व भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत होते. याचा एकत्रित परिणाम अपरिहार्य होता. जेव्हा लोक एखाद्या पक्ष व नेत्याविषयी निराश व नाराज असतात; तेव्हा ते पर्याय शोधू लागत असतात. कॉग्रेस, युपीए व मनमोहन सिंग यांच्या सरकारचे गेल्या चार वर्षातले अपयश डोळ्यात भरणारे असेच होते. सतत वाढणारी महागाई, गॅस वा अन्य दरवाढी व कल्पनेपलिकडे जाऊन पोहोचलेला भ्रष्टाचार; अधिक कायद्याच्या राज्याचा बोजवारा, याला जनता विटलेली आहे. पण कॉग्रेसला पर्याय नाही व विरोधी पक्ष भाजप दुबळा व अन्य पक्ष विरोधी पक्ष विखुरलेले; अशी एक वैफ़ल्याची अवस्था जनमानसात आलेली आहे. कोणी तरी यावे आणि जादूची कांडी फ़िरवून हे सर्व बदलून दाखवावे; अशीच लोकांची आज अपेक्षा आहे. त्यात पुन्हा कॉग्रेसच्या मस्तवालपणाने लोकांहा संताप अनावर होऊन गेला आहे. पाठीशी बहूमत नसतानाही सेक्युलर पक्षांचा विरोध व पाठीब्याचा खेळ करून कॉग्रेस सत्तेवर टिकली आहे व मनमानी करते आहे. 

   तसे पाहिल्यास दंगल वा नरेंद्र मोदी हा गुजरात पुरता विषय होता. भाजपालाही त्याचा गाजावाजा करायचा नव्हता. पण दुसरीकडे सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांनी मोदींना कोलितासारखे वापरत भाजपाला बदनाम करण्यासाठी त्याच विषयाचा सतत वापर केला. पण या गडबडीत मोदी हे नाव सर्वतोपरी होत गेले. आता स्थिती उलटली आहे. ज्या मोदीला कलंक म्हणून भाजपाच्या माथी मारले जात होते; तेच नाव गुजरातच्या आश्चर्यजनक विकासामुळे भाजपासाठी जमेची बाजू होऊन गेली. त्याचा भाजपालाही अंदाज नव्हता. म्हणून कालपरवापर्यंत भाजपा मोदींबद्दल बोलायचे टाळत होता. तर भाजपाला अधिकच कोंडीत पकडण्यासाठी याचे सेक्युलरांनी मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरवून पोरकटपणा सुरू केला. राहुल व मोदी यांची तुलना सुरू केली. ती सर्वप्रथम टाटा व अंबानी यासारख्या उद्योगपतींनी उचलून धरली. मग सहजगत्या गंमत म्हणून सुरू झालेली ही कल्पना; सामान्य माणसाच्या मनात गेली आणि हळुहळू आकार घेऊ लागली. आज दिसत आहेत, ते त्याचेच परिणाम आहेत. कारण मागल्या दोन वर्षात कॉग्रेस सरकारच्या नालायकीच्या तुलनेत गुजरातचा विकास लोकांच्या नजरेत भरत गेला आणि तो मुद्दा कोणी खोडून काढू शकत नव्हता. परिणामी लोकमत बदलू लागले. गेल्या वर्षभरात ते कमालीचे बदलून मोदी हा भारतीय मतदारासाठी आशेचा किरण बनून गेला. नुकत्याच झालेल्या मतचाचण्यांमध्ये मोदी हेच सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार असल्याचे आकड्यातूनच दिसू लागल्यावर सगळे सेक्युलर गडबडून गेले आहेत. त्यांची अवस्था लंकेतल्या त्या राक्षसांसारखी झाली आहे; ज्यांनी मारूतीची शेपूट पेटवली होती आणि जेव्हा मोकाट मारूतीने लंका पेटवली तेव्हा त्यांनाच पळता भुई थोडी झाली होती. 

   त्या पुराणकथेचा खरेखोटेपणा बाजूला ठेवा. त्यातला बोध महत्वाचा आहे. मारुती हे माकड आहे म्हणून रावणाच्या सहकार्‍यांनी त्याच्या शेपटीला चिंध्या बांधून तिला आग लावली होती. मग त्याला सोडून दिले व तो जळत्या शेपटीचे चटके बसल्याने कसा उड्या मारतो; त्याची मौज त्यांना बघायची होती. पण या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारताना मारुतीने लंकाच पेटवून दिली होती. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवून भाजपाच्या नेत्यांची तारांबळ बघायची मजा करणार्‍यांना आपण मारुतीच्या शेपटीला आग लावतोय याचे भान नव्हते. कारण आता त्यांच्याच त्या कल्पनेने त्यांची सेक्युलर लंका पेटवून दिली आहे. कारण ज्याला गंमत म्हणून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवून सेक्युलर पत्रकार माध्यमांनी पेश केले; तोच मोदी नुसता भाजपाचा लोकप्रिय चेहरा बनताना दिसत नसून देशातील सर्वात लोकप्रिय नेत्यापैकी एक असल्याचे चाचण्यांचे निष्कर्ष निधू लागले आहेत. तर त्यामागची कारणे शोधायचे सोडून ते कसे अशक्य आहे; त्याचे तर्क मांडण्यात धन्यता मानली जात आहे. अनेकदा सत्य तुम्हाला आवडणारे नसले म्हणून नाकारता येत नाही, कारण ते सत्य असते. आजच्या परिस्थितीत मोदी हा भाजपासाठी नुसता लोकप्रिय चेहरा नाही, तर भाजपाची मते वाढवणाराही चेहरा आहे. अगदी वाजपेयींपेक्षा मोदी भाजपाला अधिक यश मिळवून देऊ शकतील; अशी स्थिती आहे. पण त्याचे श्रेय ना भाजपाला आहे ना मोदी यांचे व्यक्तीगत श्रेय असू शकते. त्याचे श्रेय द्यायचेच असेल; तर शेपूट पेटवायचा मुर्खपणा करणार्‍या सेक्युलर माकडांना द्यावे लागेल. कारण त्यांनीच सामान्य मतदारासमोर नरेंद्र मोदी हा पर्याय आणुन ठेवला आहे. ज्याला सेक्युलर शहाणे भाजपाचा दुबळेपणा ठरवत होते, तोच असा भाजपाचे बळ कसा होऊ शकला? 

   पहिली गोष्ट म्हणजे मोदी लोकांना आवडणारा नेता आहे असे अजिबात नाही. लोकांना पर्याय हवा आहे आणि त्यासाठी लोकांना दिसणारा तोच एकमेव आशेचा किरण आहे. अशी पाळी लोकांवर का आली व कोणी आणली, तेही बघावे लागेल. ती पाळी सेक्युलर थोतांडाने आणली, असे माझे प्रामा्णिक मत आहे. सामान्य मतदाराला हिंदूत्व किंवा सेक्युलर याच्याशी कर्तव्य नसते. त्यांना त्यांच्या आयुष्यात सतावणार्‍या समस्या सोडवणारे नेते व राजकारण हवे असते. इथे अशी स्थिती आज निर्माण झाली आहे, की मुठभर लोकांना सेक्युलर विचार व राजकारण हवे आहे आणि त्यासाठी सामान्य लोकांनी भ्रष्टाचार व अनागोंदी, अराजक सहन करावे, हालअपेष्टा सोसाव्यात; अशी अपेक्षा केली जात आहे. कारण वाजपेयी सरकार गेल्यापासुन भारतीय जनतेच्या वाट्याला तेवढेच आलेले आहे. कॉग्रेसला सत्ता मिळाल्यापासून अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार माजला, कायद्याच्या राज्याचा बोजवारा उडालेला आहे, महागाई शिगेला पोहोचली. पण त्यातून लोकांना दिलासा देणारा कुठलाही पर्याय वा उपाय सेक्युलर म्हणवणारे पक्ष देऊ शकलेले नाहीत. उलट कॉग्रेस सेक्युलर आहे, म्हणून त्याची पाठराखण इथले सेक्युलर पक्ष करीत असतात. म्हणजेच सेक्युलॅरिझमसाठी लोकांनी होतील ते हाल सोसावेत; असाच पर्याय लोकांसमोर ठेवला गेला आहे. त्याच्याशी गुजरातची तुलना केली तर सेक्युलर नाही म्हटल्या जाणार्‍या गुजरात सरकारचे व मोदींचे काम उजवे आहे. तिथे कायद्याचे राज्य आहे, तिथे कारभार चोख आहे, तिथे भ्रष्टाचार कमी आहे, तिथे विकास वेगाने चालू आहे. जणू सेक्युलर नसणे म्हणजेच नागरिकांचे जीवन सुसह्य; अशीच स्थिती म्हणावी लागेल. मग कॉग्रेस सत्तेवरून हटवायची असेल, तर उत्तम पर्याय कुठला असेल? लोक असा पर्याय शोधतात. त्यामुळेच सेक्युलर माध्यमांनी गंमत म्हणुन पुढे आणलेले मोदींचे नाव लोकांना का भावले; त्याचे हे उत्तर आहे. मोदी म्हणजे विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि ठामपणे निर्णय घेणारा नेता, अशा पायर्‍या मोदी चढत गेलेले आहेत. 

   राहिला प्रश्न, गुजरातचा एक मुख्यमंत्री भाजपाला इतके मोठे यश मिळवून देऊ शकेल का एवढाच. त्या प्रश्नाचे उत्तर आपण भाजपाच्या आजच्या संघटनाशक्ती व त्याची पक्ष म्हणून असलेली लोकप्रियता यावर मोजायचे नसते. १९७१ व १९७९ सालात इंदिरा गांधी कोणत्या परिस्थितीत मोठे यश मिळवू शकल्या; त्याकडे बघावे लागेल. त्या दोन्ही वेळी इंदिराजींनी कॉग्रेस फ़ोडलेली होती आणि त्यांच्या मदतीला नाव घेण्यासारखा कोणी मोठा कॉग्रेसचा नेता शिल्लक नव्हता. तरी त्यांनी अफ़ाट यश लोकसभा निवडणुकीत मिळवले होते. तेव्हा ती ताकद त्यांच्या पक्षाची नव्हती, तर इंदिराजींमुळे पक्षाला मिळालेले ते बळ होते. नेमके त्याचेच प्रतिबिंब नुकत्याच झालेल्या चाचणीमध्ये पडलेले दिसते. एबीपी या वाहिनीने घेतलेल्या चाचणीतून समोर आलेले आकडे त्याचीच आठवण करुन देणारे आहेत. ते काय सांगतात? उद्याच मतदान झाले तर भाजपाला ३९ टक्के लोक मत द्यायला तयार आहेत, तर अवघे २२ टक्के लोकच कॉग्रेसला मते देतील. पण तोही फ़रक महत्वाचा नाही. लोकांचा मुड ओळखायचा असेल तर पुढले आकडे महत्वाचे आहेत. ज्यांचा कल या चाचणीमध्ये बघण्यात आला, ते मोदी संबंधात काय म्हणतात? तेच मतदार म्हणतात, भाजपा मोदींना पंतप्रधान पदाचा करणार असेल, तर ४९ टक्के लोक भाजपाला मते द्यायला तयार आहेत. याचा अर्थ काय होतो? आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपाची मतदारामध्ये जी पत आहे, ती मोदी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व असेल तर आणखी दहा टक्क्यांनी वाढते. मग मोदी हा भाजपासाठी बोजा आहे की जमेची बाजू होते? मोदी पक्षाला दहा टक्के अधिक मते मिळवून देऊ शकतात. आणि हीच किमया तीस चाळीस वर्षापुर्वी इंदि्रा गांधी यांनी करून दाखवलेली आहे. पण त्यांना ते कशामुळे साध्य झाले होते? मोदी तशीच किमया का करू शकतील? इंदिराजींच्या वेळची जी स्थिती होती, तशीच आज स्थिती आहे काय? 

   १९७० सालात विविध आघाडी सरकारांमुळे राजकारण अस्थिर झालेले होते, तेव्हा खंबीर नेतृत्व करू शकणार्‍या इंदीराजींवर लोकांनी विश्वास दाखवला होता. मग १९७९ सालातही जनता पक्षाच्या नेत्यांनी भांडणातून इतकी अस्थिरता आणलेली होती, की ‘चालणारे सरकार’ एवढ्याच जाहिरनाम्यावर इंदिराजींना प्रचंड बहूमत लोकांनी दिले होते. आज नेमकी तशीच परिस्थिती कॉग्रेस, सोनिया गांधी, मनमोहन सिंग व अन्य सेक्युलर पक्षांनी आणलेली आहे. अशा अस्थिर स्थितीतून देशाला बाहेर काढू शकणारा कोणी खंबीर व धाडसी नेता लोकांना हवा आहे. तो कुठल्या पक्षाचा वा विचारांचा आहे, त्याच्याशी लोकांना कर्तव्य नाही. अशा नेत्याकडे लोकांचा ओढा असतो आणि ती गुणवत्ता आपल्यापाशी आहे असे मोदी यांनी गुजराताम्ध्ये दाखवून दिले आहे. माध्यमांच्या विपरित प्रसिद्धीने त्यांना थेट देशाच्या राष्ट्रीय मंचावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच देशाच्या अन्य भागातील लोक त्या नेत्याकडे आशेने बघू लागले आहेत. त्याचा पक्ष कुठला व त्याने आधी काय केले; याच्याशी अशावे्ळी लोकांना कर्तव्य नसते. इंदिराजींचे आणिबाणीतले अत्याचार व अरेरावी जनता अवघ्या अडीच वर्षात विसरली होती व तिने पुन्हा त्यांना प्रचंड बहूमताने सत्ता बहाल केली होती. मग गुजरातच्या दंगलीचे सेक्युलर माध्यमे व विचारवंतांना वाटणारे कौतुक जनतेला कशाला असेल? चाचण्यांमध्ये मोदी यांना मिळणारा कौल त्यांच्या कुवत व गुणवत्तेपेक्षा त्यांच्या विरोधकांच्या नाला्यकीचे फ़ळ आहे. म्हणूनच मोदी यांना भाजपाचे संघटनात्मक बळ किंवा पक्ष म्हणून असलेली लोकप्रियता, या आधारे मोदी यांना निवडणुकीत मिळणार्‍या मतांचे व जागांचे गणित मांडता येणार नाही. लोकांच्या मनात काय आहे, त्यावर आधारित हिशोब मांडावा लागेल. 

   दोन्ही वेळी इंदिराजींनी पक्ष फ़ोडल्यावर त्यांच्या मदतीला कॉग्रेसचे संघटनात्मक बळ काय होते? पक्षातले मातब्बर नेते त्यांच्या विरोधात उभे होते. संघटना नव्हतीच. पण ज्याला शेंदुर फ़ासला तो इंदीरेचा म्हणून निवडून आलेला होता. महाराष्ट्रात शरद पवार व यशवंतराव विरोधात होते. वसंत साठे, अंतुले आणि तिरपुडे असे नगण्य नेते इंदिरा कॉग्रेस म्हणून पाठीशी असताना ४८ पैकी ३९ जागा इंदिराजींनी १९७९ सालात जिंकल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाच्या अनागोंदीला लोक कंटाळले होते. अवघ्या तीन वर्षापुर्वी त्याच मतदाराने जनता पक्षाकडे संघटनात्मक बळ नसताना त्या पक्षाला प्रचंड बहुमताने सत्ता बहाल केली होती. ती त्या पक्षाची वा त्याच्या नेत्याची लोकप्रियता नव्हती. तर इंदीराजी व कॉग्रेसवरील नाराजीचा कौल जनता पक्षाला मिळाला होता. तसाच उलटा मग तीन वर्षानंतर इंदिराजींना कौल मिळाला होता. आज लोक मोदी यांना इतकी मते भाजपा उमेदवार, विकास पुरूष वा हिंदूत्वाचा चेहरा म्हणून द्यायला निघालेले आहेत असे समजणेच मुर्खपणा आहे. मोदींच्या लोकप्रियता व क्षमतेपेक्षा त्यांच्याकडे लोकांचा ओढा आहे, तो पर्याय म्हणून. सोनिया, राहूल व सेक्युलर थोतांड यावरला पर्याय म्हणून लोक मोदी यांच्याकडे बघू लागले आहेत. सेक्युलर थोतांडामुळेच आज कॉग्रेसची अनागोंदी या देशात मोकाट चालू आहे. त्यावर कुठलाही सेक्युलर पक्ष वा नेता पर्याय नाही, त्याचप्रमाणे भाजपासुद्धा पर्याय नाही. तो पर्याय मोदी का असू शकतो? तर कोणीही कसली टिका केली, आक्षेप घेतले म्हणून न डगमगणारा नेता; अशी मोदी यांची प्रतिमा माध्यमांनी मागल्या दहा वर्षात तयार केली आहे. ती कितपत खरी वा खोटी ते माध्यमातले जाणकारच सांगू शकतील. पण आज जनमानसात मात्र तशी मोदींची प्रतिमा आहे. आणि मतचाचण्यांचे जे आकडे समोर येत आहेत, ते त्याच प्रतिमेने तयार केले आहेत. चमत्कार मोदीच घडवू शकतो, असे त्या मानसिकतेचे स्वरूप आहे. म्हणूनच एबीपीचे आकडे काय सांगतात? भाजपाला ३९ टक्के लोक मत द्यायला तयार आहेत. पण त्या पक्षाने मोदींना उमेदवार केले तर ४९ टक्के. हे दहा टक्के मोदींसाठी अन्य पक्षांना टांग मारून भाजपाला मत द्यायला सज्ज आहेत. आणि असा मोदी भाजपाने घडवलेला नाही तर सेक्युलर माध्यमांनी गेल्या दहा वर्षात उभा केला आहे ना?

   मग सांगा नरेंद्र मोदी हिंदूत्ववादी, संघवाले किंवा भाजपाचे असले तरी त्यांना पंतप्रधान पदाचा उमे़दवार म्हणून कोणी उभे केले? सेक्युलर पक्ष, पत्रकार, विचारवंत व सेक्युलर गोटानेच त्यांना राष्ट्रीय मंचावर आणायचे कर्तृत्व गाजवलेले नाही काय? जवळपास तेवढेच कर्तृत्व व गुणवत्ता बिहारच्या नितीशकुमार यांनी आपल्या सात वर्षाच्या कारकिर्दीत दाखवलेली आहे. पण माध्यमांनी त्यांचे गुणगान करताना त्यांच्याविषयी मोदींप्रमाणे औत्सुक्य वा कुतूहल निर्माण केले नाही. मोदींप्रमाणे नितीशच्या दंतकथा होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे नितीश मागे पडले व मोदी हा आशेचा किरण बनून गेला. बाकीचे किरकोळ काम टाटा, अंबानी किंवा भाजपा, मोदी यांनी केले असेल. नितीश म्हणतात तसा एनडीए वा भाजपाला सेक्युलर माध्यमांनी सेक्युलर उमेदवार आयता मिळवून दिला आहे. किती चमत्कारिक आहे ना? कारण मोदींना सेक्युलर गोटाने भाजपाच्या माथी मारले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा