शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

यशस्वी मोदीमंत्र, ‘ओम नमो नम:’




   गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सहज विजय मिळवणार हे गृहित होते आणि ते फ़क्त भाजपाचे गृहित नव्हते; तर अगदी त्यांना संपवायला टपलेल्या सेक्युलर पक्ष व माध्यमांचेही तेच गृहित होते. म्हणूनच गुरूवारी निकाल लागल्यावर जे आकडे गुजरातमधून समोर आले, त्यात काहीच अनपेक्षित नव्हते. जी स्थिती आधीच्या विधानसभेत होती, तशीच कायम राहिली. मोदी वा त्यांच्या चहात्यांना मोठी बाजी मारू अशी अपेक्षा असेल; तर मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला म्हणावे लागेल. पण अन्यथा मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा मिळवलेले यश खरेच दैदिप्यमान आहे. निदान आता तरी कोणी त्यांच्यावर हिंदूत्वाचा मुखवटा लावून निवडणूक जिंकल्याचा आरोप करू शकणार नाही. पण ज्यांना नाक मुरडायचेच असते, त्यांना कारण नव्हेतर निमित्त हवे असते, तेव्हा मोदींचा विजय केवळ हिंदू मतांवरच झालेला आहे; असे म्हटले जाणार यात शंका नाही आणि त्याची सुरूवात निकालाची दिशा स्पष्ट होताच झाली होती. खरे तर त्याच्या आधीच झाली होती. उमेदवार याद्या जाहिर झाल्या; तेव्हाच त्यात एकही मुस्लिम उमेदवार नाही, अशी तक्रार करण्यात आली आणि ती सुद्धा जातियवादाच्या विरोधात बोलणार्‍यांनी केली, हे लक्षात घेतले पाहिजे. एका बाजूला म्हणायचे, की मोदी मुस्लिम विरोधक आहेत आणि दुसरीकडे त्यांनी मुस्लिम उमेदवार उभा केला नाही; म्हणूनही तक्रार करायची. पण जो आरोप मोदी यांच्यावर झाला; तो कॉग्रेसवर सुद्धा होऊ शकतो. दहा टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही कॉग्रेसने गुजरात विधानसभेसाठी दहा मुस्लिम उमेदवारही उभे केले नाहीत. मग कॉग्रेसला हिंदूत्ववादी का म्हणू नये?

   असो. तो वादचा विषय नाही. कारण दहा वर्षात खुद्द मोदींनी त्या आरोपांना उत्तरे दिली आहेत आणि त्याकडे हल्ली साफ़ दुर्लक्ष केलेले आहे. शिवाय गुजरातमध्ये त्यांनी जवळपास निम्मे मते मिळवली आहेत. पण यावेळी गुजरातच्या विधानसभेसाठी मतदान होणार असले तरी त्याकडे दिड वर्षांनी येणार्‍या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून बघितले जात होते. त्या निवडणुकीत मोदी हे भाजपा व एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील काय; ही चर्चा मागल्या दोन वर्षापासून सुरू झाली आहे. त्याच चर्चेच्या संदर्भात गुजरातच्या निवडणुकीला महत्व होते. जर पुन्हा दणक्यात गुजरात जिंकला, तर मोदी थेट पंतप्रधान पदाचे दावेदार होतात; असे माध्यमांनीच सातत्याने चर्चेतून समोर आणले आहे. त्याबद्दल मोदी वा भाजपाला छेडण्याचा प्रयत्न झाला; तरी त्यांच्याकडून अशा चर्चेला प्रतिसाद मिळालेला नाही. पण राजकारणात कधी, कोणी अशा सर्वांना सांगुन चाली खेळत नसतो. मग मोदी त्याला कसे अपवाद असतील? त्यांनीही सध्या माझ्यासमोर गुजरात हेच उद्दीष्ट आहे; असे सांगून माध्यमांच्या तोंडाला पाने पुसली. तर भाजपा नेत्यांनी असे निर्णय पक्षात चर्चा करून घेतले जातात; म्हणत प्रश्नाचे उत्तर नेहमी टाळले. पण मोदी यांची देहबोली आणि एकूण हालचाली बघितल्या, तर त्यांची दिल्लीच्या दिशेने सुरू केलेली वाटचाल लपलेली नाही. त्यांनी तसे सांगण्याची गरज नाही. आणि तसे झालेच, तर दिड वर्षांनी म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल?

   एका वाहिनीच्या चर्चेत गुजरातचा पराभव पचवू न शकलेले व तोंडाळ असलेले नेते मणीशंकर अय्यर यांनी कॉग्रेसतर्फ़े मोदींच्या उमेदवारीचे स्वागतच केले. तेव्हा त्यात उपरोध भरलेला होता. मोदी यांना उमेदवार केल्यास भाजपाप्रणित एनडीए आघाडीत फ़ुट पडू शकते; असे त्यांना सुचवायचे होते आणि माध्यमातील सेक्युलर मंडळींचेही तेच मत आहे. त्यामुळे मोदी हा भाजपामध्ये आजतरी सर्वात प्रभावशाली व लोकमतावर प्रभाव पाडू शकणारा नेता आहे, याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण त्यांच्यावर गुजरातच्या दहा वर्षापुर्वीच्या दंगलीचे डाग ( हेच कॉग्रेस वा अन्य कोणाच्या बाबतीत बोलतांना आरोप) असल्याने मोदींना पंतप्रधान पदासाठी पुढे केल्यास भाजपाला मुस्लिम मतांसाठी मुकावे लागेल, अशी भिती घातली जाते. दुसरीकडे भाजपा हिंदूत्व मानणारा पक्ष असल्यानेच त्याला मुस्लिम मते मिळणार नाहीत वा मिळत नाहीत असाही दावा आहे. मग ज्याला मुस्लिम मते मिळतच नाहीत, त्याने मोदींना उमेदवार केल्याने मुस्लिम मते गमवावी लागतील; म्हणून घाबरायचे कशाला? पण हे सामान्य माणसाला पडणारे प्रश्न वाहिन्या व माध्यमातील बुद्धीमंतांना कधी पडत नाहीत. आरोप असल्याने वा बदनाम असल्याने मते मिळत नाहीत हा दावा कितपत खरा असतो? त्याची तपासणी करून बघण्याची माध्यमातल्या शहाण्यांना आजवर गरज भासलेली नाही. ती त्यांनी केली असती, तर भ्रष्टाचारासह कसलेही आरोप असले म्हणुन सामान्य माणुस आपले मत बनवताना किंवा मतदान करताना; त्याचा विचार करत नाही, तर समो्र असलेल्या पर्यायातून निवड करतो, हे सत्य आहे. तेच गुजरातमध्ये घडले, तेच उत्तरप्रदेशमध्ये झाले आणि तेच मागल्या लोकसभा निवडणुकीतही झाले होते. अगदी ताज्या निवडणूका घेतल्या, तरी त्याची मोठी साक्ष हिमाचल प्रदेशच्या निकालातून समोर येते. तिथे कॉग्रेस कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे?

   वीरभद्र सिंग हे हिमाचलचे दांडगे कॉग्रेस नेता आहेत. या निवडणूका होण्याआधी ते केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना पंतप्रधानांनी मंत्रिमडळातून वगळले होते. पण त्यांच्याखेरीज हिमाचलची लढाई लढवू शकेल, असा दांडगा नेता दुसरा नसल्याने तात्काळ त्यांनाच प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यावेळी याच दिल्लीत बसलेल्या माध्यमांनी कल्लोळ माजवला होता. भ्रष्टाचारासाठी ज्याला केंद्र सरकारा्मधून हाकलला, त्यालाच निवडणुकीची धुरा देऊन कॉग्रेसने आत्महत्या केली; असे निष्कर्ष याच दिल्लीतून पोपटपंची करणार्‍या वाहिन्यांवरील जाणकारांनी केली होती. त्यामुळे काय झाले? कॉग्रेसला हिमाचल गमवावे लागले का? तेवढेच नाही. याच निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेसने गॅस इंधन अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये भरघोस दरवाढ केली. त्याचाही विपरित परिणाम मतदानावर होणार अशी भाकिते होती. त्याचे काय झाले? हिमाचलमध्ये कॉग्रेस जिंकली आहे. मग त्या मतदाराने भ्रष्टाचाराला मत दिले असे समजायचे काय? गुजरातमध्ये लोकांनी पुन्हा मोदी यांना निवडून दिले, तेव्हा त्यांच्या हिंदूत्वाला किंवा मुस्लिम विरोधी दंगलबाजीला मते दिली आहेत काय? असे अजिबात नसते. सामान्य मतदार आणि वाहिन्यांसह माध्यमातले शहाणे; यांच्यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. मतदार व्यवहारी शहाणपणा करत असतो तर माध्यमातल्या शहाण्यांना वास्तवातल्या व्यवहाराशी कर्तव्य नसते. त्यांचे ज्ञान पुस्तकी असते. तसेच अंदाज आडाखेही पुस्तकीच असतात. त्यामुळेच माध्यमांना नेहमी तोडघशी पडायची वेळ येते. पण मुद्दा तो नसून या निकालांचा अर्थ काय व त्याचा भावी भारतिय राजकारणावर होणारा परिणाम काय; हा खरा प्रश्न आहे.

   राजकारण असो किंवा अन्य कुठलाही व्यवहार असो, त्यात जो नियम एका समिकरणाला लागतो, तोच दुसर्‍याही समिकरणाला लागत असतो. इथे जो नियम हिमाचलमध्ये वीरभद्र सिंग यांना लागतो, तोच मग गुजरात वा इतरत्र नरेंद्र मोदी यांना लागत असतो. वीरभद्र सिंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारमधून काढावे लागले; तरी त्यांना मते मिळू शकली, याचे कारण आरोपांना मतदार महत्व देत नाही, तर उपलब्ध असलेल्या पर्यायातून निवड करतो. हिमाचलमध्ये बदल करायचा होता आणि मतदारासमोर एकमेव पर्याय कॉग्रेस हाच होता. मग त्याचा नेता वीरभद्र आहे किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत; याच्याशी मतदाराला कर्तव्य नसते. त्याने तोच पर्याय निवडला. त्यामुळेच आरोप असूनही वीरभद्र सिंग कॉग्रेसला यश मिळवून देऊ शकले आहेत. आणि असे पहिल्यांदाच घडलेले नाही. उत्तरप्रदेशमध्ये वेगळे काहीही घडलेले नाही. तिथे लोकांसमोर दोन्ही पर्याय भ्रष्टच होते. मागल्या खेपेस त्यांनी मायावती यांना कौल दिला. मुलायम यांना हटवले होते. पाच वर्षे उलटून गेल्यावरही अन्य पर्याय कॉग्रेस वा भाजपा त्यांच्या समोर उभे करू शकले नाहीत. मग त्या मतदाराने काय करावे? त्यांनी आधीच भ्रष्टाचारी म्हणून हटवलेल्या मुलायमच्या पक्षाची निवड केली. पर्याय भ्रष्ट वा जातियवादी यातून निवडायचा नसतो. कोण शासन करू शकतो, कोण राज्य चालवू शकतो, या निकषावर लोक आपले मत बनवत व देत असतात. मुलायमला मस्ती आली; तेव्हा त्याला बाजूला करायला मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही संघटित असलेल्या बसपाकडे मतदार वळला होता. त्यांना पाडायची वेळ आली तेव्हा पुन्हा मतदार संघटित अशा मुलायमच्या समाजवादी पक्षाकडे वळला. त्याने राहुल गांधींच्या स्वप्नांना दाद दिली नाही.

   पाच वर्षापुर्वी मुलायमला संपवण्याची क्षमता कॉग्रेस वा भाजपामध्ये नव्हती आणि पाच वर्षानंतर मायावतींना रोखण्याची ताकदही त्या दोन्ही पक्षात नव्हती. ज्याला हटवायचे आहे, त्याला पराभूत करण्याची क्षमता व नेतृत्व कुठल्या पक्षात आहे; त्यानुसार तरंगता मतदार वळत असतो आणि तोच निर्णायक कल देत असतो. आज संसदेतील बहूमतासाठी मनमोहन सरकार सीबीआयचा वापर करून मुलायम वा मायावती यांना आपल्या बाजूला झुकवते असे उघडपणे म्हटले जाते, त्याचा अर्थ काय? दोघे भ्रष्ट आहेत व त्यांची प्रकरणे सीबीआयकडे आहेत, असाच अर्थ होतो ना? मग उत्तरप्रदेशच्या मतदाराने त्यांनाच इतकी मते का दिली? तुलनेने भ्रष्ट नसलेल्या कॉग्रेस वा भाजपाकडे पाठ का फ़िरवली? तर या दोन्ही दुबळ्या पक्षांकडे संघटना व ठराविक मतदार नक्कीच आहे. पण पारडे झुकवणारा निर्णायक मतदार हा नेता व क्षमता बघूनच मते देतो व पारडे फ़िरवत असतो. ती क्षमता असलेले नेते भाजपा कॉग्रेसने स्वत:च नामशेष केले आहेत. म्हणून उत्तरप्रदेशचे राजकारण माया मुलायम यांच्या भोवती केंद्रीत झाले आहे. वाजपेयी बाजूला झाल्यावर देशभरच्या लोकसंख्येला समान व व्यापक भुरळ घालू शकेल; असा नेता नसल्याने भाजपा मागे पडला होता. ती जागा अडवाणी यांना भरून काढता आली नाही. पण मोदींमध्ये ती क्षमता आहे. त्यांना पंतप्रधान पदाचा म्हणजे भाजपाचा राष्ट्रीय नेता बनवल्यास; त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जिंकण्याची इर्षा निर्माण करायची क्षमता मोदीमध्ये आहे. आणि ती इर्षा निर्माण झाली मग मरगळलेली संघटना चमत्कार घडवू शकत असते. मुलायम, मायावती, ममता, पटनायक, जयललिता अशा नेत्यांचे यश म्हणजे त्यांचे पक्षातील निर्विवाद स्थान होय. गुजरातमधील भाजपाचे यश म्हणूनच पक्षापेक्षा मोदींचे व्यक्तीगत यश आहे. पक्षावरिल त्यांची निर्विवाद हुकूमत; त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. जी त्यापुर्वी केशूभाई पटेल वा सुरेश मेहता असे मुख्यामंत्री दाखवू शकले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी त्या निर्विवाद स्थानी पोहोचले होते आणि अडवाणी यांना ते साधले नाही. पण दहा वर्षात गुजरातमध्ये केलेल्या कामाच्या बळावर देशभरच्या भाजपा कार्यकर्त्यांना तसा हुकूमत असलेला व निर्विवाद नेता मिळाला असे वाटू लागले आहे. आणि तीच मोदी यांची खरी ताकद आहे.

   देशाची सत्ता मिळवण्याची कल्पनाही भाजपाने १९९६ सालात केली नव्हती. पण संसदेतील सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारल्यावर मात्र अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळवण्याच्या नादात पक्ष, कार्यकर्ता व आपल्या भूमिकांना भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी तिलांजली दिली. तिथून त्याची वाढ थंडावली. हिंदूत्वाचा जो मुद्दा घेऊन भाजपाने १८६ खासदारांपर्यंत मजल मारली होती, त्याला सत्तेसाठी भाजपा नेतृत्वाने दगा दिला. सत्तेचे गणीत जुळवताना मतदाराला दिलेला शब्द सोडून दिला. मग तो मतदार गोळा करणार्‍या व मतदारांमध्ये वावरणार्‍या कार्यकर्त्याचा हिरमोड झाला होता. तिथून जी पक्षात मरगळ आली; तेव्हा तो पक्ष म्हणजे संघटना सत्तालोलूप नेत्यांच्या कब्जात गेली. सहाजिकच तो इतक्या यशापर्यंत घेऊन जाणारा भाजपा कार्यकर्ता निराश व निष्क्रिय झाला. त्याचे परिणाम मग पुढल्या निवडणुक निकालातून दिसले आहेत. पण असा कार्यकर्ता व मतदार पुन्हा सक्रिय झाला, तरच भाजपाला संसदेत मोठा पक्ष किंवा बहूमतापर्यंत मजल मारता येईल. ती मजल सेक्युलर चेहरा घेऊन मारता येणार नाही; तर हिंदूत्वाचा अजेंडा घेऊनच मारता येईल. आणि मोदी हाच त्यासाठीचा यथायोग्य नेता आहे. तो खमक्या, खंबीर व आपल्या भूमिकेवर ठाम उभा राहू शकणारा नेता आहे, अशी जी देशभरच्या भाजपा कार्यकर्त्यांची धारणा आहे, तिथूनच भाजपाचे पुनरुज्जीवन सुरू होऊ शकते. मुस्लिम मते देणार नाहीत, यावरचा उपाय मोदींनी गुजरातमध्ये दाखवला आहे. मुस्लिमांशिवाय पुरेशा मतांचा गठ्ठा उभा केला, तर बहूमतापर्यंत मजल मारता येते; हे त्यांनी तीनदा दाखवून दिले आहे. सवाल आहे तो तोच प्रयोग देशभर यशस्वी होऊ शकतो का?

   देशभर पसरलेल्या लोकसभा मतदारसंघांचे गणित मांडले तर त्याचे उत्तर मिळू शकते. दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचल, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात भाजपाकडे चांगले संघटन व लढायची कुवत आहे. त्यात साडेतीनशेच्या आसपास जागा आहेत. याखेरीज हरयाणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यामध्ये कॉग्रेस विरोधी पक्षांचे प्राबल्य आहे व ते भाजपासोबत येऊ शकतात. त्या राज्यातल्या जागांची संख्या सव्वाशे होते. म्हणजेच साडे चारशे लोकसभेच्या जागा अशा आहेत, की ज्यावर भाजपा बहूमताचे गणित मांडू शकते. मोदींमुळे जर अन्य सेक्युलर मित्र पक्ष सोबत आले नाहीत, तरी यातल्या भाजपा किमान साडेतीनशे जागी तुल्यबळ लढ्त देऊ शकतो. आणि मोदी विरुद्ध जेवढा हिंदू विरोधी प्रचार होईल; त्याचा हिंदूत्वाची मतपेढी निर्माण व्हायला हातभार लागतो. म्हणूनच मग या साडेतीनशे अधिक अन्य राज्यातील पन्नास जागा मिळून चारशे जागी भाजपा स्वतंत्ररित्या लडू शकतो. अगदी हिंदूत्वाच्या अजेंड्यावर लढू शकतो. नुसता लढू शकत नाही, तर अपप्रचारामुळे हिंदूत्वाची मते मिळवून दोनशे ते सव्वा दोनशे जागांपर्यंत मजल मारू शकतो. पण इतके धाडस करायला मोदी वगळता अन्य नेत्याचे ते काम नाही, हे सुद्धा स्पष्टच आहे. मग दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळवणार्‍या पक्षाला सेक्युलर नाही म्हणून टाळणे अन्य पक्षांना शक्य होणार नाही. त्यांनाही हिंदूत्वाचा अजेंडा स्विकारावाच लागेल, जसा गुजरातमध्ये कॉग्रेसने स्विकारला आहे. गेल्या तीन निवडणूकीमध्ये कॉग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांची संख्या गुजरातमध्ये १७ वरून सात इतकी खाली आलेली आहे. यावेळच्या निवडणुकीत त्या पक्षाने मुस्लिम हा शब्दही उच्चारायचे टाळले. हे कशाचे लक्षण आहे?

   ज्याची प्रतिमा खंबीर, धाडसी व निर्णय घेऊ शकणारा नेता अशी आहे आणि ज्याच्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही. ज्याने सुरक्षित आणि घातपात विरहित कारभाराचा दाखला दिलेला आहे; अशी मोदींची प्रतिमा आहे. आज तीच देशभरच्या मध्यमवर्गाला भुरळ घालते आहे. पण त्याच्याही पलिकडे हा माणूस जातो तिथे भाजपासह हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना तो आकर्षित करून घेतो. आणि हळूहळू मुस्लिम समाजातही त्याच्याविरुद्धच्या भावनेचा पुनर्विचार सुरू झालेला आहे. मग मोदी यांना को्ण रोखू शकणार आहे? जर वीरभद्र सिंग इतके आरोप असताना जिंकू शकतात, तर दहा वर्षापुर्वीच्या दंगलीचे आरोप मोदींना रोखू शकतील काय? ज्याला सेक्युलर माध्यमे कलंक म्हणतात, तीच बाब देशाच्या अन्य भागात आणि हिंदू समाजात मोदींसाठी शक्तीस्थान असेल तर मग भाजपासमोर पर्याय उरतो काय? एक आहे, कदाचित सेक्युलर पक्ष त्यांच्या विरोधात एकवटतील, पण मग संपुर्ण देशाचा गुजरात होणार नाही का? आणि मोदी तशा स्थितीत बाजी मारण्यात वाकबगार आहेत. मोदी विरुद्ध इतर असा सामना होण्याची शक्यता असली तर मोदींना ती हवीच असेल. कारण मग खरेच देशभरच्या मतांचे धृवीकरण होईल आणि जिथे आजही भाजपा दुर्बळ आहे; तिथेही त्याला पाय रोवण्याचे काम सोपे होईल. १९९८ नंतर भाजपाने सेक्युलर होण्याचा प्रयत्न सुरू केला; त्यातच त्याने आपला शक्तीक्षय करून घेतला. आपला कार्यकर्ता व पाठीराखा मतदार यांच्यापेक्षा भाजपाचे नेते माध्यमांच्या आहारी जाऊन सेक्युलर नाटक करू लागले, त्यातून त्यांचा हिंदूत्व पाठीराखा नाराज होऊन अलिप्त झाला आणि सेक्युलर म्हणतात, तसला पाठीराखा त्यांच्याकडे आलाच नाही. त्यातून बाहेर पडायचे तर त्या पक्षाला मोदींसारख्या खमक्या व आक्रमक करिष्मा असलेल्या नव्या चेहर्‍याचीच गरज आहे, आणि आरोप असून मतदार त्याकडे पाठ फ़िरवतो व जवळचा पर्याय निवडतो, हेच अलिकडल्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. कॉग्रेस व युपीएला पराभूत करू शकेल, असा पर्याय मतदारासमोर मांडला तरच त्याला दाद मिळू शकेल. सेक्युलर वगैरे पुस्तकी गोष्टी असतात. तो अभ्यासकांचा विरंगुळा किंवा टाईमपास असतो. त्याचा मतदार वा मतदानाशी संबंध नसतो. हे मोदी उत्तम जाणून आहेत. म्हणूनच पुढल्या काही महिन्यात ते दिल्लीच्या दिशेने वाटचाल करायचे, डावपेच खेळू लागतील. त्याची सुरूवात त्यांनी गुजरातमधून केली आहे. ‘ओम नमो नम:’ हा मंत्र गुजरातमध्ये गेले काही महिने चालू आहे. त्यातला ‘नमो’ म्हणजे नरेंद्र मोदी यातली अद्याक्षरे होत. आज मोदींच्या गुजरातमधील विरोधकांना तोच मंत्र म्हणायची वेळ आली आहे. उद्या कोणावर येईल?
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २३/१२/१२)

1 टिप्पणी: