खुप जुनी गोष्ट आहे. म्हणजे मी नुकताच मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागलो होतो. त्या जमान्यात शाळेत असेपर्यंत मुलांच्या नशीबी लांब पॅन्ट नसायची आणि मुलींना मात्र मॅट्रिकच्या वर्गात असतानाच साडीसुद्धा नेसावी लागत असे. असा तो (आजच्या तुलनेत) अत्यंत मागासलेला जमाना होता. तर मी पहिल्या वर्षात आर्किटेक्चरचा विद्यार्थी होतो. कॉलेजच्या मुलांची अभ्यास सहल जायची होती. त्यासाठीची फ़ी दोनशे रूपये होती. पण चारशे मुलामुलींपैकी अवघी तीस पस्तीसच तेवढी फ़ी भरू शकली. बाकीच्यांना त्या सहलीला जाता आले नाही. मीसुद्धा न जाऊ शकलेल्यापैकीच एक होतो. त्याचा मनाला खेद जरूर झाला, पण आम्ही अशी मुले अजिबात दु:खी नव्हतो की, जे जाऊ शकले त्यांच्याबद्दल आमच्या मनात कसलीही असुया नव्हती. माझ्या पालकांचे मासिक उत्पन्नच मुळात तेव्हा दोनशे रुपयांपेक्षा कमी होते. मग एवढी फ़ी मागायची हिंमत तरी कुठून करायची? मी आणि बर्याच मुलांनी अशी काही अभ्यास सहल जायची आहे असे घरच्यांना सांगितले सुद्धा नाही. ज्याचा उपयोगच नव्हता तर सांगायचे तरी कशाला? शिवाय कॉलेजची फ़ी भरण्यात आणि लागणारे साहित्य मुलांना पुरवण्यातच तेव्हाच्या पालकाचे कंबरडे मोडायचे तर त्या पालकाकडून अशा चैनीची अपेक्षा तरी आम्ही कशी करणार होतो? मुळात शाळेतून कॉलेजपर्यंत मजल मारणार्यांची संख्याच तोकडी असायची. कारण घरातल्या त्यातल्या त्यात हुशार मुलालाच पुढे शिकवायचा प्रघात होता. त्यामुळे जी मुले कॉलेजला घातली जात त्यांना पालकाने आपल्यावर केले तेच उपकार वाटत असत. आठवड्यात एकदोन रुपये खर्चाला दिले तर पालक प्रसन्न झाला असेच आम्हाला वाटत असे.
कारणही तसेच होते. आजच्यासारखे शिक्षण तेव्हा महाग झाले नव्हते आणि स्वस्तही नव्हते. महाग अशासाठी नव्हते, की ज्यांना समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा असे मनापासून वाटत असे, असेच लोक धडपड करून, देणग्या जमवून किंवा पदरमोड करून शिक्षण संस्था स्थापन करायचे व चालवायचे. मुलांकडून फ़ी किंवा देणगी मिळण्याची अपेक्षाही तेव्हा संस्थाचालक करीत नसत. कारण पालकाकडे शिक्षणासाठी बजेटच नव्हते. म्हणून शिक्षण स्वस्त होते किंवा महाग नव्हते. दुसरी बाजू अशी, की जेवढे पालकाचे उत्पन्न होते त्यातून थोडीफ़ार रक्कम बाजूला काढता आली तरच त्याला एकाद्या मुलाला उत्तम व उच्च शिक्षण देणे शक्य होत असे. त्यामुळेच होतकरू व गुणी मुलालाच शिकवले जात होते. प्राथमिक शिक्षण सोडले तर बाकीच्या माध्यमिक वा उच्चशिक्षणासाठी सरकारी अनुदान नव्हते, की सवलती नव्हत्या, मुलांचे शिक्षण ही पालकाची जबाबदारी होती आणि पालक त्याच्या हातातल्या अपुर्या पैशाचे नियोजन करून गुणी मुलांनाच शिकवत होता. बाकीच्या मुलांची शाळा सातवीत किंवा मॅट्रीक नंतर संपायची. जे नापास व्हायचे तेही मोठ्या अभिमानाने शिक्षण किती, तर नॉनमॅट्रीक असे सागत असत. ग्रॅज्युएट ही खुपच मो्ठी गो्ष्ट असायची तेव्हा. पण जे कोणी उच्चशिक्षण घ्यायला जायचे, त्यांनी आपल्या कुटुंबाचा भविष्यात भार उचलावा, हा अलिखित करार असायचा आणि तो पाळला जायचा. माझ्या पिढीतल्या अनेक भावांनी आपल्या हुशार भावाच्या शिक्षणासाठी काढलेल्या खस्ता मी बघितल्या आहेत. आणि त्या भावाने नंतर कर्ज फ़ेडावे तशा अन्य भावंडांच्या जबाबदार्या पार पाडलेल्या मी बघितल्या आहेत. त्याला कुटुंब म्हणायचे.
आज आपण तेच कुटुंब गमावून बसलो आहोत. बाकीचे दिसतात ते त्याचे परिणाम आहेत. घरात एकच मुल असते. फ़ार तर दोन मुले असतात आणि प्रत्येकाला महत्वाकांक्षेने पछाडले आहे. मग जो कोणी हुशार असेल त्याला जेवढे मिळेल, तेवढेच दुसर्याला मिळायला हवे आणि मिळणार नसेल तर भावंडातच असुया सुरू होत असते. ही झाली विभक्त कुटुंबाची एक समस्या. त्याच्या पलिकडे अधिक सुबत्तेच्या मागे लागलेल्या पालकांनी अधिकाधिक पैसे मिळवण्याच्या नादात घर नावाची आस्थाच गमावली आहे. त्यामुळे जे छोटे कुटुंब असते, तेही आठवड्यात कधी एकत्र जमते की नाही याची शंका आहे, आईवडिल मुलांच्या गरजा आणि आपले सुखवस्तू जीवन, यांचे बजेट जुळवण्याच्या नादात नातीगोती विसरून गेले आहेत. एकच उदाहरण पुरेसे ठरावे. मुंबईच्या गिरणगावात लोअर परेल येथे वास्तव्य करणारा माझा एक तरूण मित्र आहे. ते सहा भाऊ व दोन बहिणींसह आईवडिल असे दहा जणांचे कुटुंब सव्व्वाशे चौरस फ़ुटाच्या खोलीत गुण्यागोविंदाने नांदले. पुढे मुले मोठी झाली प्रत्येकाने आज आपापले वेगळे संसार थाटले आहेत. त्यातल्या एका भावाने अलिकडेच एक व्यथा बोलून दाखवली. जुन्या काळात एखाद्या रविवारी अर्धा किलो मटन आणले तर ही दहा माणसे खाऊन खुश व्हायची. कोणाच्या वाट्याला त्यातले दोन तीन तुकडेही येत नसत. पण मटन खाल्ल्याचा जो आनंद होता, तो अवर्णनिय असायचा. आता एक किलो मटन दर रविवारी येते आणि त्या भावाच्या चारजणांच्या कुटुंबाला ते पुरत नाही. त्याचे म्हणणे असे, की पोटभर होते. पण त्यात त्या बालपणीच्या अर्धा किलो मटनातली मजा नाही. खायला भरपूर आहे, पण त्यातला आनंद संपुन गेल्याचे दु:ख त्याला सतावते आहे. या तरूण मित्राने तो किस्सा सांगून मला त्याचा उलगडा करायला सांगितला. मलाही बरेच दिवस त्याचा उलगडा होऊ शकला नव्हता. पण जेव्हा सर्वत्र बघत अनुभवत गेलो, तेव्हा त्यातले रहस्य उलगडले.
पुर्वी त्यांच्या बालपणी ते मोठे कुटुंब अर्धा किलो मटनावर ताव मारत होते, तेव्हा त्यांना दुर्मिळ असल्यासारखे मटन खाल्ल्याचे समाधान मिळत होते. त्याचा पुरवठा कमी होता. पण मटनाने पोट भरण्यापेक्षा समाधानानेच पोट भरत होते. आता पोट मटनने भरते, पण समाधानाची भूक भागत नाही. हव्यासाने खाल्ले जाते, पण समाधान मात्र संपले आहे. आज सुखवस्तू होत चाललेल्या किंवा नवश्रीमंत म्हणुन जो मध्यमवर्ग नव्याने उदयास येतो आहे त्याला भौतिक सु्ख खुप मिळाली आहेत व मिळवली जात आहेत. पण त्या गडबडीत मिळवायचे काय व समाधान कशातून कसे मिळते; त्याचाच त्याला विसर पडला आहे. मग मिळते सगळे, पुरेसे नव्हेतर अधिक मि्ळते आहे. पण मिळाल्याच्या समाधानाला मात्र आपण वंचित होऊन गेलो आहोत. हव्यासाने आपले जीवन पोखरून काढले आहे. आणि ते समाधान गमवलेले आपण, मग कृत्रिम सुखे व चैनीच्या आहारी गेलो आहोत. आपण आता आपल्या समाधानाचा वा सुखाचा विचारही करायचे विसरून गेलो आहोत. आपण आता दुसर्यांसाठी जगतो, धडपडतो आणि आयुष्य खर्ची घालतो. पण आपल्या सुखासमाधानाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपले सुख, समाधान, आनंद कशात आहे; तेही आपल्याला कळेनासे झाले आहे. मग आपल्याला दुसर्याने दाखवावे, समजवावे लागते आणि त्याचे समाधान करण्यासाठी आपण आयुष्य खर्ची घालून मोकळे होतो. मात्र त्याची विकृत फ़लनिष्पत्ती समोर येते; तेव्हा आपण सैरभैर होऊन जातो. खरे नाही ना वाटत?
जरा विसरून जा हे सगळे तत्वज्ञान आणि गेल्या आठवड्यात पुण्याच्या रिव्हरव्ह्यू नामक एका आलिशान हॉटेलमध्ये शाळकरी मुलांनी जो धुमाकुळ घातला त्याची बातमी आठवा. सातशे आठशे किशोरवयीन मुले मुली तिथे जमले होते आणि दारू वगैरे नशा करून धिंगाणा करत होते. शाळकरी म्हणजे विशीच्या आतल्या वयाच्या या मुलांनी नशापान करणे कुठल्याही पालकाला अयोग्यच वाटणार. पण ते त्या मुलांनी चोरूनही केलेले नाही. अगदी जाहिरपणे त्यांनी पार्टी योजली होती. त्यासाठी प्रत्येकी चारशे रुपये मोजण्यात आलेले होते. मुलींसाठी प्रवेश मोफ़त होता. त्याचे कारण वेगळे सांगायला हवेच का? मुली आल्या मग मुले आपोआपाच येणार, म्हणुन मुलींना फ़्री. याचा अर्थ इतकाच, की ज्या मुली "फ़्री" असतील त्यांच्यासाठीच पार्टी फ़्री होती. मग तिथे काय घडणार होते आणि जे घडणार होते, त्यामागचा हेतू काय असेल त्याचा नुसता अंदाजही पुरेसा आहे. पण असे एका दिवसात घडलेले नाही. म्हणुन तर पालकांनी हस्तक्षेप करूनही मुलांना रोखणे शक्य झाले नाही. पालकांनी पोलिसांची मनधरणी केली, तेव्हा ती पार्टी रोखणे शक्य झाले. त्यातून हा प्रकार चव्हाट्यावर आला. पण त्यासाठी पोलिसांची मदत मिळवताना पालकांना आपले पापही कबूल करावे लागले आहे. ही मुले अशी प्रथमच वागलेली नाहीत. त्यांच्या वागण्याचा पालकांना आधीपासून संशय आलेला होता. नशापानाचा वास किंवा वागणे यातून पालक चिंतेत पडले होते. पण मुलेही लपवण्याच्या पलिकडे गेली होती. त्यांनी आपला गुन्हा लपवण्यापेक्षा त्यापासून परावृत्त करू बघणार्या पालकांनाच धाब्यावर बसवले. ज्या वयात आमच्या पिढीला हॉटेलमधून भजी आणावी अशी इच्छा घरात बोलून दाखवायची हिंमत नव्हती, त्याच वयात ही मुले नशापान करायच्या पार्टीला जाण्यापासून अडवणार्या पालकांना उलट दमदाटी करत होती म्हणे. कालय तस्मै नम: म्हणून त्याकडे काणाडोला करायचा काय?
पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. पण कुठलीही कठोर कारवाई करण्याचे टाळले. मग आमच्या माध्यमांनी, वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी त्यवरच काहूर माजवले. म्हणे त्या हॉटेलचा मालक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चुलत भाऊ होता; म्हणून पोलिसांनी झाकपाक केली. पण इथे मुद्दा राजकीय नेत्याच्या नातलगाचा किंवा पोलिसांच्या लपवाछपवीचा नाहीच. कारण हा कायद्यातला गुन्हा नसून कौटुंबिक समस्येचा विषय आहे. त्या मुलांनी जे काही केले, तो पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा गुन्हा नसून कौटुंबिक बेशिस्तीचा नमूना आहे. मुले किती बेफ़ाट आणि बेभान झाली आहेत, त्याचा विषय आहे. ते हॉटेल कुणाच्या मालकीचे आहे किंवा पोलिस किती गैरलागू वागले, हा भाग अत्यंत दुय्यम आहे. अजितदादांच्या चुलत भावाऐवजी अन्य कुणाचे ते हॉटेल असते, तर पोलिसांनी त्या मुलांवर कारवाई केली असती, म्हणजे समस्या सुटली असती काय? समस्या काय आहे? राजकीय नेत्यांना संबंध? की किशोरवयीन मुलांनी असे बेताल वागणे? की पालकांनी मुलांचे भवितव्य घडवण्याच्या नादात; त्यांचे अनाठायी लाड करून त्यांना बेताल होण्यास अनवधानाने दिलेले प्रोत्साहन ही समस्या आहे? शेवटचा मुद्दा हीच खरी समस्या आहे. पण त्याबद्दल कुठेही अवाक्षर बोलले गेले नाही. आपण मुलांसाठी इतक्या सोयी सुविधा उभ्या करतो आहोत, त्यांना काही कमी पडू नये म्हणुन अखंड पैसे मिळवण्याच्या मागे पळत आहोत. पण त्या सोयीसुविधा व महागडी साधने मुलांना पुरवताना. त्या मुलांना संस्कारी व जबाबदार बनवण्य़ाचे साफ़ विसरून गेलो आहोत. म्हणूनच आपण मुलांना समाजासाठी व कुटुंबासाठी एक मुल्यवान व्यक्ती वा नागरिक बनवण्याऐवजी, समाजाच्या डोक्यावरचा बोजा बनवत आहोत. याचे आजच्या पालकाला भानच उरलेले नाही. त्यातून ही सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मग ह्या मुलांनी तिथे जाऊन नशापान केले, धिंगाणा घातला. तिकडे दिल्लीत कुणा उद्योगपतीच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन नशापान केल्यावर बेफ़ाम गाडी हाकताना काही लोकांचे जीव घेतले. यासाठी्च पालक मुलांना सुविधा देत आहेत काय? त्यांच्यावर पैसा उधळत आहेत काय? पुढे याचे पर्यवसान कुठपर्यंत जाते? मध्यंतरी मुंबईतल्या दोघा मित्रांनी तिसर्याचे अपहरण करून त्याच्या बापाकडे खंडणी मागण्यापर्यंत मजल मारली आणि ती मिळाली नाही, तेव्हा भयभीत होऊन त्या मित्राला ठार मारून टाकले.
आरंभीच्या पार्ट्या व त्यात तयार होणारी वा फ़ोफ़ावत जाणारी बेफ़ाम वृत्ती, त्या वयात येण्याच्या काळातली उपजत प्रवृत्ती असते. तिला वेळीच लगाम लावण्यालाच संस्कार म्हणत असतात. त्या वेळी मुलांना पैसे किंवा महागड्या सुविधा देण्यापेक्षा वे्ळ देणे व विश्वासात घेऊन भविष्याच्या नियोजनाची दिशा दाखवणे अगत्याचे असते. किंबहुना त्यांच्या अंगात संचारणारी मस्ती जिरवण्यासाठी त्यांच्यासमोर विधायक आव्हाने ठेवणे अगत्याचे असते. जर ती आव्हाने नसतील मग मुले खो्ट्या, भ्रामक वा कृत्रिम आव्हानांच्या मोहात सापडत असतात. "आज काही तुफ़ानी करू या" अशी एक जाहिरात गेले काही महिने सर्वच वाहिन्यांवरून अहोरात्र झळकत असते. त्याची दिशा व रोख आपल्या लक्षात कधी आलेला आहे काय? एका उंच गच्चीवरून ती मुले दुसर्या इमारतीवर उडी घेतात. हे खरे आहे की भ्रामक? पण अशा भ्रामक गोष्टीची भुरळ पडण्याचेच ते वय असते. तेव्हा मुलांना सावरण्याची गरज असते आणि त्यासाठी पालकाकडे पैसे नको, तर वेळ असला पाहिजे. कारण आपल्याला मुलांना बिघडवायचे नसते ना? त्याने खुप शिकावे आपल्याही पुढे खुप मोठी झेप घ्यावी, असेच प्रत्येक पालकाचे स्वप्न असते ना? मग कुणा श्रीमंत मित्र वा परिचिताकडे बघू नका; तर त्या रिक्षाचालक नारायण जायस्वालकडे बघा. त्याच्याकडे मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी काय होते? पण त्याने हमालीसारखे कष्ट उपसून आपल्या पोराला उच्चशिक्षण घेण्याची प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि त्याच्यासमोर आव्हान उभे केले. मग त्याचा मुलगा गोविंद जायस्वाल आयएएस झाला. इथे त्या पितापुत्रांचा फ़ोटो मी मुद्दाम दिला आहे. त्या अत्यंत हुशार मुलाला आपल्या रिक्षाचालक बापाची लाज वाटते आहे का बघा? पुण्यातल्या पार्टीमध्ये नशापान करणारी हजार मुले ओवाळुन या गोविंदावर उधळून टाकावी, असाच तो पोरगा नाही काय?
त्या बापाने आपल्या मुलाला काय दिले? शिकायचे तर फ़ी भरायला पैसे नाहीत म्हणून जमीनीचा इवला तुकडा होता, तो विकून त्याची फ़ी भरली. आपला बाप दिवसरात्र कष्ट उपसतो आहे याचे त्या मुलाने भान ठेवले आणि आपल्या खर्चाला लागणारे पैसे किंवा पुस्तकांचे पैसेही त्याने शिकवण्या करून मिळवले. हे त्या मुलाने का केले? असा आपलाही मुलगा मुलगी निघावी असे कुठल्या आईबापांना वाटत नसेल? मग तसे होत का नाही? कारण रिक्षाचालक जायस्वालने जी बहूमोल देणगी आपल्या या सुपुत्राला दिली, तेवढे सोडून आपण आपल्या मुलांना सर्वकाही देतो. काय दिले त्या बापाने आपल्या मुलाला? त्याने संस्कार दिले, सुबुद्धी दिली आणि या अडाणी कष्टकर्याचा तो पुत्र सुपुत्र ठरला. पण कौतुक त्याच्या पुढेच आहे. मुलगा आता सनदी अधिकारी झाला तर त्याच्याकडुन काय अपेक्षा आहेत, असे बापाला विचारले तर तो रिक्षाचालक जायस्वाल म्हणाला; त्याने एकही पैसा लाच घेउ नये आणि इमानदारीने जनतेची सेवा करावी एवढीच माझी अपेक्षा आहे. ज्या रिक्षा चालवण्याने आयुष्य़ जगलो व मुलाला शिकवून मोठे केले, तो माझा धंदा पोटाला पुरेसा आहे. मी त्यातच समाधानी आहे. आणि सनदी अधिकारी झालेला तो मुलगा म्हणाला, एकही दिवस मी माझ्या बापाने प्रामाणिक कमाई करताना गाळलेला घाम मी विसरू शकणार नाही. आणि त्याने केलेल्या मेहनतीची मी कधीच परतफ़ेड करू शकणार नाही. याला संस्कार म्हणतात मित्रांनो. आपण यातले आपल्या मुलांना काय देतो; त्याचा नुसता विचार करा म्हणजे आपली मुले अशी का भरकटतात, त्याचे उत्तर सापडू शकेल
साधने, पैसा, सुविधा किंवा सुखसोयी आपल्या गरजा नसतात, त्या सहाय्यक असतात. त्यांच्यामुळे पुढे जाता येत नाही, मजल मारता येत नाही, की प्रगती करता येत नाही. त्यासाठी सर्वात मोठी आवश्यकता असते ती इच्छेची आणि प्रेरणेची. मनात इच्छाच नसेल तर पाय असून चालता येत नाही, हात असून काही उचलता येत नाही. हलता डुलताही येत नाही. आणि इच्छा असेल तर लंगडाही चालतो. तेव्हा त्याला कुबड्या चालवत नाहीत. कुबड्या भार उचलतात, पण तो पांगळा पाय उचलून पुढे जाण्याची बुलंद इच्छाशक्ती मनातच असावी लागते. तीच त्या कमजोर पायांना चालवत असते. कुबड्या फ़क्त मदत करतात. त्यालाच काही तुफ़ानी करणे म्हणतात. जे जगाला चक्रावून सोडते, पण विधायकही असते. दरवर्षी चारपाच लाख मुले त्या परिक्षेला बसतात आणि त्यातले पाचसातशे पल्ला गाठतात. त्यात ४५ क्रमांकाने यशस्वी झालेला गोविंद जायस्वाल खरे तुफ़ानी कर्तृत्व गाजवत असतो. पण त्याची जाहिरात होत नाही. आणि आम्ही पालकही मुलांसमोर त्याचा तुफ़ानी आदर्श ठेवत नाही. मग आमची मुले शीतपेय किंवा तशीच मद्यपेय पिवून तुफ़ानी झिंगून आईबापांच्या अब्रूचे धिंडवडे काढतात. उलट अब्रुदार अशी ज्याची गणना होत नाही त्या रिक्षाचालक नारायण जायस्वालचा पुत्र मात्र बापाला अब्रुदार म्हणुन जगासमोर आणतो. असे का होते माहित आहे मित्रांनो? आपण काय मिळवायचे आहे आणि सुखसमाधान कशात आहे तेच विसरून गेलो आहोत. समाधान मिळवायचे विसरून गेलोत, म्हणुन मिळते खुप पण मिळाल्याचे समाधानच मिळत नाही. पोटभर मिळते आहे पण भूक मात्र भागल्यासारखे वाटत नाही. मुलांसाठी खुप करतो आपण; पण त्यांना आईबापच मिळत नाहीत आणि आपल्याला पुत्र कन्याही लाभत नाहीत. शेकडो सुविधा सोप्या करून आपण मुलांच्या आयुष्यातले आव्हानच संपवून टाकले आहे ना? तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आपण विसरलोय ना? म्हणुन आपण धोंडेच घडवतोय का? तुकोबा म्हणाले होते,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
नाहीतर माळावरचा धोंडा
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २/९/१२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा