शनिवार, १२ जानेवारी, २०१३

कौनो लडत नाही.



   एखाद्या घरात बाप दारुडा, बेकार व कर्जबाजारी असतो आणि संसाराचे पुरते धिंडवडे निघालेले असतात. अशा घरातली मुलगी वयात आलेली वा तरूण असेल, तर तिची काय अवस्था असेल, ते इथे सांगण्याची गरज नाही. आपण अशा गोष्टी आसपास बघत असतो. कधी तिथे वयात येणारी मुलगी असते तर कधी त्या दारुड्याची पत्नीही असू शकते. पण परिणाम सारखेच असतात. कोणीही गावगुंड भुरटे त्याच्या व तिच्या अब्रूशी खुले आम खेळत असतात. कधीकधी तर असला बेशरमपणा विकोपास गेलेलाही असतो. त्याच गुंडाकडून आपल्या व्यसनाची पुर्तता करण्यासाठी असला नामर्द घरची अब्रू त्या गुंडाच्या चरणी अर्पण करीत असतो. मात्र वर तोंड करून त्या गुंडाला लौकरात लौकर मुलीशी लग्न कर, असेही धमकावत असतो. अशावेळी तो गुंड कसा फ़िदीफ़िदी हसतो, हे आपण कुठे ना कुठे बघितलेले दृष्य आहे ना? अतिशय संतापजनक व निर्लज्ज प्रसंग असतात असे. पण ते बघूनबघून आपलीही नजर व मन मेलेले असते. सातत्याने तसले तमाशे बघून त्याचे काही वाटेनासे होते. याला गावातल्या, गल्लीतल्या भानगडी म्हणतो आपण. पण तेच जर आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असेल, तर त्याला काय म्हणायचे? त्याला ‘अमन की आशा’ असे सोज्वळ नाव दिले जाते. आपल्या देशात आणि देशाच्या वेशीवर हा तमाशा अनेक वर्षे चालू आहे आणि आपल्या सर्वांची नजर व मने आता मेली आहेत. आणि खरे सांगायचे तर त्या दारुड्य़ाप्रमाणे आपणही नुसते फ़ुसके इशारे देणारे बोलघेवडे होऊन गेलो आहोत. मुर्दाडांचा देश अशीच इतिहास बहुधा आपल्या देशाची व समाजाची नोंद करील. 

   दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या धक्क्यातून भारतीय मानसिकता अजून सावरलेली नाही, इतक्यात सीमेवर आणखी एक भीषण बलात्कार झाला आहे आणि तो देशाच्या सार्वभौमत्वावर झाला आहे. कारण भारतीय भूमीवर व आपल्या हद्दीत गस्त करणार्‍या दोघा भारतीय जवानांवर हल्ला करून; त्यांना ठार मारून त्यांचे शीर कापून पळवण्य़ाची अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त होऊन थेट पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा बोलायचे सोडून, आमच्या सरकारने त्या दारुड्य़ाच्या भाषेत निषेधाची पोपटपंची केली आहे. तसा गोळीबार व तोफ़ांचा मारा अधूनमधून सीमेवर पाकिस्तानकडून होतच असतो. त्यात अनेकदा भारतीय जवान शहीद होतच असतात. पण तशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तरही दिले जात असते. त्यांच्यावर प्रतिहल्ला, गोळीबार व तोफ़ांचा भडीमार केला जातो. त्यामुळे आपले सैनिक शहीद झाले तरी पलिकडल्या सैनिकांनाही त्याची किंमत मोजावी लागत असते. अशाप्रकारे देशासाठी वीरगती प्राप्त करणार्‍या जवानांचा कोणालाही अभिमान वाटतो. पण जेव्हा लढाई होतच नाही आणि गाफ़ील पकडून दगाबाजीने घातपात केला जातो, त्यात बळी पडतात, त्यांना शहीद म्हणणे हा त्यांचाही अपमानच असतो. मग तो सीमेवरील सैनिकांचा असो किंवा कसाब टोळीकडून मुंबईत मारल्या गेलेल्या नि:शस्त्र नागरिकांची हत्या असो. स्वत:चा बचाव करण्याची संधी नाकारून केलेली हत्या हे हौतात्म्य नसते. तो खुन असतो. आणि म्हणूनच ज्यांना या आठवड्यात भारत पाक सीमेवर गाफ़ील मारण्यात आले, ते शहीद झाले असे मानणे ही आपण स्वत:ची केलेली फ़सवणूक असेल. त्यांच्याही मर्दानगीचा अवमान असेल. आपल्या नालायकीमुळे त्यांना असे अपमानास्पद मरण आले, ही वस्तुस्थिती, त्यांचे मृतदेह तिरंग्यात लपटले म्हणून झाकली जाणारी नाही. कारण त्यांच्यावर शस्त्राचा हल्ला पाकिस्तानी सैनिकांनी जरूर केला असेल. पण त्या आपल्याच जवानांना गाफ़ील ठेवून मृत्यूच्या सापळ्यात ढकलण्याचे पाप; आपण सर्वांनी केले आहे. त्यात आपले सरकार आहे, तसेच क्रिकेटप्रेमी व शांततावाद्यांचाही समावेश होतो. त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने आपण उरलेले निरपराध ठरत नाही. त्यांच्या भामटेगिरी व पापकर्माला रोखणे शक्य असून आपण गप्प बसतो, तेव्हा एकप्रकारे आपणही त्याच पापाला मान्यता देत असतो. मग आपणही तेवढेच गुन्हेगार नाही काय? 

   गेल्या दोन दशकात म्हणजे १९९० पासून भारतातच हस्तक निर्माण करून; कधी त्यांच्या मदतीने तर कधी आपले घातपाती पाठवून इथल्या पोलिस, सैनिक, रक्षक व नागरिकांना मारण्याचे उद्योग पाकिस्तान करतो आहे. त्यातली विविध नावे ही शुद्ध धुळफ़ेक आहे. हिजबुल, तोयबा, आयएसआय, इंडियन मुजाहिदीन किंवा पाक सेना व पाक सरकार; ही सगळी भिन्न भिन्न नावे असली तरी त्याची प्रेरणा व सुत्रधार समानच आहे. वेगवेगळी रुपे व विविध नावे धारण करून लोकांची दिशाभूल करणरा भुरटा भामटा असतो, तशी ही पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणाची विविध रुपे आहेत. तेव्हा त्यांच्या नावाशी खेळत बसणे महत्वाचे नसून, आपल्याला होणार्‍या जखमांचा विचार करण्याची आवश्यकता असते. ‘तो मी नव्हेच’ ही पाकिस्तानची निती आहे. आणि त्याचे वेळोवेळी पुरावे वा दाखले समोर आलेले आहेत. आपण भारताशी उघड खुले युद्ध करू शकत नाही, याची खात्री असल्याने १९७१ नंतर पाकिस्तानने ही रणनिती वापरली आहे. प्रत्यक्ष लढाई करायची नाही, तर घातपाताच्या मार्गाने अघोषित युद्ध चालवायचे, अशी ती रणनिती आहे. त्यासाठी मग काश्मिरचा प्रश्न वापरला जात असतो. त्यांच्या कब्जातील काश्मिरींना आधी जिहादी बनवून हल्लेखोर म्हणून सोडले जात होते. पुढे अफ़गाण जिहाद सुरू झाल्यावर त्यातलेही मुजाहिदीन पाकिस्तानने भारताच्या विरुद्ध वापरले आहेत. अफ़गाणिस्तानच्या युद्धाच्या निमित्ताने जगभरात जी धर्मासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण करण्यात आली; तिचा सढळ वापर पाकिस्तानने भारताच्या विरोधात केला, त्याचे काही अंशी परिणाम त्यांनाही आता तालिबानांच्या रुपाने भोगावे लागत आहेत. पण ज्या देशाची मानसिकताच मुळात द्वेषावर आधारलेली आहे, त्याला स्वत:च्या कल्याणाचे सुचणार तरी कसे? आपले किती व कोणते भले होते, त्यापेक्षा भारताचे नुकसान कसे होईल; यावर पाकिस्तानचे राजकारण स्थापनेपासून आधारलेले आहे. त्याचे सुत्र एकच आहे. आम्ही सुखाने जगणार नाही आणि तुम्हालाही सुखासमाधानाने जगू देणार नाही. 

   याच धोरणातून मग कुरापती काढून पाकिस्तानने भारताशी युद्धे सुरू केली. त्यात सपाटून मार खावा लागला तेव्हा त्यांनी आपली रणनिती बदलली आहे. त्याचे परिणाम मग जिहाद रुपाने समोर आलेले आहेत. मग इथल्या मुस्लिमातील असंतोषाला खतपाणी घालून चिथावण्या दिल्या जातात आणि त्यांनाच स्वदेशात हस्तक बनवून आतून दगाफ़टका निर्माण केला जातो. त्याचा परिणाम म्हणून मग या विषयाला धार्मिक वळण दिले जात असते. मग गुजरातची दंगल असो की मंदिर मशिदीचा वाद असो, त्यात पाकिस्तान नाक खुपसते आणि त्यातूनच ओवायसीसारखी बांडगुळे निर्माण होत असतात. त्याला रोखणे दुर रहाते आणि आपल्याकडले सेक्युलर दिडशहाणे त्याच्याशी तोगडीयाच्या मुर्खपणाशी तुलना करून जिहादी मनोवृत्ती पाठीशी घालत असतात. तोगडीयाच्या बरळण्याने कुठे दंगली पेटत नाहीत. त्याच्या मागे देशभरातले हिंदू एकवटले असे कधी दिसत नाही. उलट त्याचा निषेध करण्यात अधिकाधिक हिंदूंचाच भरणा दिसतो. पण ओवायसीने चिथावणीखोर बोलले तर किती मुस्लिम विचारवंत वा सेक्युलर मुस्लिम त्याच्या अटकेची मागणी करायला पुढे आले? जेव्हा असे होत नाही, तेव्हा मग तटस्थ विचार करणारा हिंदूही बेचैन होतो. त्याला तोगडीया वा नरेंद्र मोदीच योग्य असे वाटू लागते. अशी ही विभागणी पाकला हवीच असते. कारण मग इथल्या मुस्लिमांमध्ये एकाकी पडल्याची भावना वाढत असते. त्यातून आणखी जिहादी प्रेरणा मिळत असते. महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातला अबू जुंदाल मुंबई हल्ल्याचे कराचीत बसून नियंत्रण करीत होता. हे कशातून होते? पाकिस्तानी सेना व तिथले राज्यकर्ते धर्माच्या नावाने चालत असतील व भारताकडे हिंदू राष्ट्र म्हणूनच बघत असतील, तर ते तुमच्या समोर अन्य कुठला पर्याय ठेवत नसतात. त्यांना चोख उत्तर द्यायला इथल्या मुस्लिमांनी पुढाकार घेण्याची गरज असते. तेही होत नाही. ओवायसी किंवा अबु आझमी सारखे लोक इतल्या मुस्लिमांची प्रतिमा बनत चालले आहेत. आणि मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चाने धुमाकुळ घालून त्याला दुजोरा देण्याचे काम केले. 

   आज देशाची अवस्था अराजकासारखी झाली आहे. इथल्या जनतेला कुठल्या कायद्याचे वा सरकारचे संरक्षणच उरलेले नाही. गुंडगिरी मोकाट आहे, नक्षलवाद व दहशतवाद मोकाट आहे. पोलिस व सेनादल निष्प्रभ करून टाकण्यात आलेले आहे. सरकारी यंत्रणा पक्षाघात झाल्याप्रमाणे लुळीपांगळी पडली आहे. कुणी म्हणजे कूणी स्वत:ला सुरक्षित समजू शकत नाही अशी दुर्दैवी स्थिती आहे. अगदी सीमेवरचा सैनिक हाती बंदूक व हत्यार असूनही स्वत;ला असुरक्षित समजतो, इतकी दुर्दशा कधीच नव्हती. पाकिस्तानातही अराजकच आहे. पण निदान तिथले सत्ताधीश जगाला आपण समर्थ आहोत असे दाखवून तरी देतात. भारतात कोण सरकार आहे, कारभार कोण चालवतो व निर्णय कोण घेतो, ते खुद्द पंतप्रधानालाही माहित नाही, अशी स्थिती आहे. उलट पाकिस्तानकडे बघा. अमेरिकन सेनेने पाकच्या मित्रांनाही गाफ़ील ठेवून अबोटाबाद येथील कारवाई केली होती. त्यात पाकिस्तानचे नाक कापले गेले, यात शंकाच नाही. तिथल्या एका मोठ्या बंगल्यात ओसा्मा बिन लादेन लपल्याची कुणकुण अमेरिकन हेरखात्याला लागली होती. तर पाकिस्तानी पोलिस, लष्कर व हेरखात्याला खबर लागू न देता मोजक्या अमेरिकन सैनिकांनी अबोटाबादपर्यंत मजल मारून थेट धडक कारवाई केली. ओसामाच्या बंगल्यावर छापा मारून त्यालाही ठार मारून; त्याच्या मृतदेहासहीत त्या सैनिकांनी पळ काढल्यावर पाकला जाग आली. त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याची तक्रार पाकिस्तानने केली. पण भारताने निषेधाचे खलिते पाठ्वून गप्प बसावे तसे पाकिस्तानने केले नाही. त्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला व मित्र देशालाही चांगला धडा शिकवला. भारताच्या नेभळट सरकारने तेवढी हिंमत कधी दाखवली आहे काय?  

   अबोटाबादच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेच्या अफ़गाण भूमीतील सेनेला कराची बंदरातून होणारी रसद तोडली होती. त्यांचे सामान घेऊन जाणार्‍या ट्रक व वहानांना संरक्षण द्यायचे नाकारले होते. शेवटी अमेरिकेला उझबेगिस्तानच्या मार्गाने प्रचंड वळसा घालून आपल्या सेनेला रसद पाठवण्याची वेळ आली होती. अमेरिकेच्या नाड्या आखडण्याची कृती तरी पाकिस्तानने करून दाखवली, हे मानावेच लागेल. शेवटी ओसामाला ठार मारल्याच्या बढाया मारणार्‍या अमेरिकेला पाकिस्तानच्या काही अटी मान्य कराव्या लागल्या, तेव्हाच पुन्हा त्यांची रसद कराची मार्गे सुरू होऊ शकली. पाकिस्तानसारखा आर्थिक दुबळा व अमेरिकेच्या अनुदानावर चालणारा देशही इतका स्वाभिमान दाखवू शकतो, तर महाशक्ती होण्याच्या वल्गना करणार्‍या भारताला पाकिस्तानच्या नाड्या आवळणे अजिबात अशक्य नाही. पाकिस्तानला अनेक बाबतीत भारतावर अवलंबून रहावे लागते. त्याबाबतीत तरी भारताने कधी कठोर धोरण राबवून दाखवले आहे काय? उलट पाकिस्तानने एखादी आगळीक करावी, की आमचे महान राज्यकर्ते ‘गट्टी फ़ू’ म्हणून रुसून बसल्याचे नाटक करतात आणि दोन चार महिन्यात पाक राज्यकर्त्यांनी बोलणी करायची भाषा वापरली; मग कुठलीही अट मान्य न करता पाकिस्तानला नव्या सवलती देऊन टाकतात. यासारखा बेशरमपणा जगात कुठलेही राज्यकर्ते करत नसतील. मुंबई हल्ल्यानंतर असेच झाले होते. मग पुन्हा बोलण्यांचे वाटाघाटीचे आमिष पाकिस्तानने दाखवले आणि आमचे राज्यकर्ते क्रिकेट खेळण्यापासून अधिक पाकिस्तान्यांना विसा द्यायला धावत सुटले. तेवढेच नाही तर, पाक नेत्यांना खुश करण्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान केलेल्या कॅप्टन सौरभ कालीयाचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जायचीही टाळाटाळ भारत सरकारने केली. कुठली आई वा कुठला बाप आपल्या पोराला सैन्यात जायला देईल मग? 

   सरकार किंवा सत्ता असते कशाला असा प्रश्न आता प्रत्येक भारतीयाने स्वत:ला विचारण्याची पाळी आली आहे. कारण हे सरकार साधा रस्त्यावरचा सामुहिक बलात्कार रोखू शकत नाही. सरकारी कामकाजात चाललेले घोटाळे व भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. दंगली व घातपात थांबवू शकत नाही, की त्याचा बंदोबस्त करू शकत नाही. लढायला सैन्य आहे, त्याला प्रतिकार करा इतका आदेश देण्याची शक्तीसुद्धा गमावून बसलेले सरकार हवे कशाला असा प्रश्न पडतो. सत्यजित रे यांचा प्रेमचंदच्या कथेवर आधारित एकमेव हिंदी सिनेमा खुप गाजला होता. ‘शतरंज के खिलाडी’ नावाच्या त्या चित्रपटात ब्रिटीश व्यापारी हा देश हळूहळू काबीज करत चालले होते, तेव्हाच्या राजकीय इतिहासाचे चित्रण. कथन आहे. अवध हे संस्थान धोक्यात आलेले असते. तिथला नबाब नाचगाण्यात रममाण झालेला असतो आणि त्याचे सरदार जहागिरदार पुर्वजांच्या पराक्रमाची गाथा गुणगुणत बुद्धीबळ खेळण्यात गर्क असतात. कंपनी सरकार सेना घेऊन येते अशी खबर लागताच लढावे लागेल म्हणुन त्यातले दोन बुद्धीबळपटू सरदार खेड्यात पळ काढतात व शतरंज खेळत, हुक्का ओढत मौज करतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सेवा देणारा इवलासा गडी मुलगा दिवस उजाडताना येणारी कंपनीची फ़ौज एका झाडाआड लपून भयभीत होऊन बघत असतो. त्याला लढाईचे भय नसते. तो विषण्ण मनाने पुटपुटतो, ‘कौनो लडत नाही.’ त्याच्या त्या मोजक्या तीन शब्दातली वेदना खुप बोलकी व इतिहासाला झालेल्या यातनांची व्याकुळता सांगणारी आहे. परवा सीमेवर दोघा जवानांचे शीर धडावेगळे करून पळवण्याची बातमी आल्यावर जी संताप व भयाची लहर देहातून दौडत निघून गेली ती ‘शतरंज के खिलाडी’तल्या त्या मुलाची आठवण करून गेली होती. 

त्या मुलाचे काय जाणार होते? तो काय गमावणार होता? नबाब, सरदार, जहागिरदार, अमीर, उमरावांची सत्ता जाणार होती. संस्थान खालसा होणार होते. पण त्यामुळे त्या सेवकाचे काय जाणार होते? तो किंवा तिथली त्याच्यासारखी रयत गरीबीत जगत होती आणि तशीच जगणार होती. या दिवाळखोर सरदारांना सलाम करायचा तर, नव्या मायबाप सरकारला मुजरा करावा लागणार होता. ना त्याची गरीबी, दारिद्र्य संपणार होते, ना नव्याने गुलामी त्यांच्या नशीबी येणार नव्हती. त्याच्या जगण्यात कुठलाही फ़रक पडणार नव्हता, तरी त्या मुलाचा जीव कासाविस झाला होता. प्रतिकार व्हायला हवा, लढायला हवे असे त्यालावाटत होते. मात्र ज्यांनी आजवर सत्ता उपभोगली वा सत्तेची फ़ळे चाखली; सत्ताधीश म्हणून मुजरे घेतले, त्यांना संस्थान खालसा होऊ घातले होते, त्याची फ़िकीर नव्हती. फ़िकीर होती सामान्य रयतेला. जी रयत म्हणजे सामान्य जनता देश, राष्ट्र, राज्य असल्या अस्मितेसाठी आपला प्राण व सर्वस्व उपाशी पोटीसुद्धा पणाला लावते, कारण या उपाशी वा अर्धपोटी जगणर्‍यांना अनंत कष्ट सोसूनही जगण्याची उर्जा त्या अमुर्त अस्मितेतून व अभिमानातून मिळत असते. पैसा व साधनांपासून वंचित असणार्‍यांचा जगण्या झगडण्याचा तेवढाच आधार असतो. कारण तेवढीच त्यांची ओळख असते. त्यांनाच अवधचे स्वातंत्र्य जाणार याची फ़िकीर लागली होती. तशाच आजच्या अर्धपोटी सामान्य भारतीयांना जवानाच्या विटंबनेची वेदना असह्य झाली आहे. मात्र बुद्धीमान बुद्धीपटू विचारवंत साहित्य संमेलनातल्या चित्रे, नावे, स्मरणात रममाण झालेत. बौद्धिक हुक्का फ़ुंकत कौज करीत आहेत. आणि आपण सामान्य जनता मात्र  त्या मुलासारखे विषण्ण मनाने पुटपुटत आहोत, ‘कौनो लडत नाही.’ 
 
  आज जेव्हा सीमेवरील त्या दोघा जवानांची निर्धृण हत्या झाली व त्यांची शिरे धडवेगळी करण्यात आली तेव्हा आजचे सत्ताधीशही तशीच बुद्धीबळाच्या पटावरची प्यादी खेळवत बसले आहेत आणि उपाशी पोटी जगणारी, दारिद्र्यात पिचलेली, पण राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगणारी सामान्य जनता मात्र त्या दोघा जवानांसाठी अश्रू ढाळते आहे. आपण पाकिस्तानला धडा का शिकवत नाही? चोख उत्तर का देत नाही, अस सवाल विचारते आहे. त्या सामान्य नागरिक व ‘खिलाडी’मधल्या मुलाचे शब्द वेगळे आहेत काय? त्यांना पडलेला प्रश्न वेगळा आहे काय? त्यांना सतावणारी वेदना वेगळी आहे काय? कुठलीहीस सत्ता किंवा स्वातंत्र्य कुणा एका राजा, बादशहा किंवा नेत्याच्या पराक्रमाने संपन्न झालेले नसते. त्यामागे हजारो, लाखो सैनिक व जनतेच्या योगदानाचे दायित्व असते. त्यातूनचे राष्ट्र व देशसंस्कृती उभ्या रहात असतात, त्यांची भरभराट होत असते. त्याच त्यागातून कष्टातून त्या समाज व देशाला ओळख मिळत असते. आणि परकीयांच्या आक्रमाणातून व हल्ल्यातून तीच ओळख पुसली जाणार असते. त्या ओळखीलाच अस्मिता व स्वाभिमान म्हणतात. आज सामान्य भारतीय दोन जवानांच्या हत्येने वा शिरच्छेदाने विचलित झालेला नाही. असे शेकडो जवान विनाविलंब सैन्यात शहीद व्हायला भरती होतील. वेदना आहे ती बलिदान कोणासाठी द्यायचे? कशासाठी द्यायचे असा. जे सत्ताधारी लढायला व स्वाभिमान अस्मिता राखायलाही प्रतिकार करू बघत नाहीत, त्यांच्यासाठी प्राण पणाला लावायचे? लोकांच्या मनातले काहुर तेच आहे. शे दिडशे वर्षे उलटून गेली असतील त्या अवधच्या इतिहासाला, पण आपली वेदना त्याच सामान्य मुलाइतकी ताजी आहे ना? मन म्हणते ना? 

कौनो लडत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा