१७ ऑक्टोबरला वाजतगाजत केजरिवाल आणि अंजली दमाणियांनी भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचे पितळ उघडे पाडण्याचा मोठा समारंभ राजधानी दिल्लीत पार पाडला होता. पण त्यामुळे लपून बसण्यापेक्षा गडकरी उजळमाथ्याने पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी आपली सफ़ाई पेश केली. आपण स्वच्छ असून उलट आपल्यावर आरोप करणारेच भामटे आहेत असे चित्र निर्माण करण्यात गडकरी कमालीचे यशस्वी झाले. कारण केजरिवाल यांनी उडवलेला बार अगदीच फ़ुसका होता. आणि तसे मी गेल्याच रविवारी स्पष्ट केले होते. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन ह्यात केजरिवाल यांच्या हेतूविषयी मी शंका व्यक्त केली होती. कारणही मी दिलेले होते. ‘गडकरी यांची श्रीमंती किंवा वैभव त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीनंतर वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खुप काही मोठे घबाड नक्कीच मिळू शकते. पण ते शोधण्याचाही प्रयत्न न करता केजरिवाल यांनी एकप्रकारे गडकरींवर उपकारच केले म्हणायचे’. गडकरी हे साडेचार वर्षे मंत्रीपदावर राहिले तर त्यांच्याही भानगडी असू शकतात. सत्ता शेवटी माणसाला भ्रष्ट बनवते. त्यापासून अलिप्त रहायला गडकरी कोणी साधूसंत नाहीत. तेव्हा त्यांनी कितीही नियमात आपले व्यवहार बसवलेले असले, तरी भिग घेऊन तपासले तर त्यात कुठेतरी गफ़लत मिळणे शक्य होते. आणि तसेच झाले. टाईम्स ऑफ़ इंडिया नामक इंग्रजी दैनिकाने गडकरी यांच्या ‘पुर्ती’ कंपनीचे धगेदोरे तपासायचा पवित्रा घेतल्यावर त्यांना खुपच लफ़डी सापडली. एका आठवड्यात सगळे चित्रच पालटून गेले. जे गडकरी छाती फ़ुगवून माध्यमांसमोर आपली बाजू मांडायला सरसावले होते, तेच गडकरी आता आठवडा उलटत आला, तरी माध्यमांना चुकवत आहेत. मात्र ही गंमत तिथेच संपत नाही. एकीकडे गडकरी गायब आहेत तर दुसरीकडे त्यांच्यावर गंभीर आरोप करणारे केजरिवाल सुद्धा वाहिन्यांच्या कॅमेरा समोरून गायब आहेत. ही काय भानगड आहे?
अवघ्या दहाबारा दिवसात काय चमत्कार घडला आहे? आरोपांच्या आखाड्यात समोरासमोर उभे ठाकलेले दोन पेहलवान अचानक कुठे आणि कशाला गायब झाले आहेत? गडकरी यांचे गायब होणे समजू शकते. कारण त्यांना त्यांच्यावर ज्या प्रश्नांची सरबत्ती होणार, त्यांच्या उत्तरांची ‘पुर्ती’ करणे शक्य नाही. कारण आधीच छापून आलेले व विचारले जाणारे बहुतांश प्रश्न निरुत्तर करणारे आहेत. पण आरोपबहाद्दर केजरिवाल यांचे काय? त्यांनी दडी मारण्याचे कारण काय? सर्वप्रथम त्यांनी गडकरी यांच्यावर आरोप केल्यावर त्यांच्या सहकारी दमाणीयांबद्दल शंका विचारल्या गेल्या होत्या. त्यांच्या व्यवहाराबद्दल केजरिवाल यांच्याकडे उत्तरे नव्हती. तेवढेच नाही. त्यांचे महाराष्ट्रातील सहकारी वाय. पी. सिंग व किशोर तिवारी यांनी केजरिवाल यांच्यावरच गंभीर लपवाछपवीचे आरोप केले होते. शरद पवार व सिंचन घोटाळ्याबद्दल माहिती घेऊनही केजरिवाल त्याबद्दल बोलत नाहीत; अशी तक्रार होती. तेवढ्यावर हे आक्षेप थांबले नाहीत. दमाणिया व मयंक गांधी यांच्या व्यवहाराबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यावर तीन निवृत्त न्यायमुर्तींकडुन चौकशीची केजरिवाल यांनी घोषणा केली. मग त्यांच्या गाझियाबाद येथील निदर्शनात त्यांच्याच जुन्या सहकारी एनी कोहली यांनी प्रश्नांचा केजरिवाल यांच्यावर भडीमार केला. त्याला उत्तरे मिळाली नाहीत, म्हणून कोहली मग प्रशांत भूषण यांच्या घरी चाललेल्या बैठकीत गोंधळ घालायला पोहोचल्या. त्यांची समजूत वाहिन्यांच्या कॅमेरासमोरच घालायची वेळ केजरिवाल यांच्या्वर आली. बस्स, तिथपासून केजरिवाल गायब आहेत. त्यांच्याकडून कुठली बातमी नाही, की खबर नाही. किती अजब आहे ना? ज्या गडकरी यांच्यावर गंभीर आरोप सर्वप्रथम केजरिवाल यांनी केले; तेच गडकरी आता सापळ्यात अडकल्यावर केजरिवालही बेपत्ता आहेत. खरे तर त्यांनी आघाडीवर येऊन बघा, देशातले दोन्ही पक्ष कसे भ्रष्ट आहेत, त्याचा गवगवा करायला हवा. कारण वर्षभर केजरिवाल यांचा तो नेहमीचा आवडता सिद्धांत होता. त्याबद्दल त्यांच्या अनेक सहकार्यांनी तक्रार केली, तरी कॉग्रेस सोबत भाजपाला एकाच पंक्तीमध्ये बसवण्याची एकही संधी केजरिवाल सोडत नव्हते. मग आज तशी उत्तम संधी असताना तेच कुठे गायब आहेत? कशाला गायब आहेत?
ठिक आहे, की त्यांनी गडकरी यांच्यावर केजरिवालनी केलेले आरोप खरे ठरले नसतील. निकामी ठरले असतील. पण त्याच संदर्भाने दुसर्या कोणी संशोधन करून गडकरींना व त्यांच्यासोबत भाजपाला आरोपीच्या पिंजर्यात आणून उभे केले, असताना केजरिवाल का गप्प आहेत? कोळसा प्रकरण असेच दुसर्या कोणी चव्हाट्यावर आणले होते. खुर्शिद प्रकरण ‘आजतक’ वाहिनीने आधी मांडले. वड्रा प्रकरण सुद्धा कोणीतरी आणून केजरिवाल यांना आयतेच दिले होते. परंतू त्या प्रत्येक प्रकरणात केजरिवाल आपणच त्याचा गौप्यस्फ़ोट केल्याच्या आवेशात मैदानात उतरले होते. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची आहे. कुठल्याही वृत्तपत्राने वा राजकीय नेत्याने गडकरी यांच्यावर आरोप केला नव्हता. तो पहिला आरोप केजरिवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वप्रथम केला. अन्य भाजपा विरोधकांनी त्याचा फ़ायदा घेण्यापेक्षा शरद पवार यांच्यासारखे अन्य पक्षिय गडकरी यांच्या समर्थनाला पुढे आले. आणि आज टाईम्सच्या प्रयत्नामुले गडकरी खरेच सापळ्यात अडकले आहेत. त्यांच्या व्यवहार व कंपनीचा तपास सरकारी यंत्रणांनी हातातही घेतला आहे. मग त्याचे श्रेय घ्यायला तरी केजरिवाल यांनी पुढे यायला नको का? निदान आपण ज्या भाजपा नेत्यावर आरोप केला त्याची चौकशी आरंभली म्हणून सरकारचे आभार तरी मानायला केजरिवाल पुढे का आलेले नाहीत? चमत्कारिक गोष्ट आहे ना? की गडकरी यांच्याबाबतीत घडते आहे, त्याची केजरिवाल यांनी अपेक्षा केलेली नव्हती? करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा पश्चत्ताप त्यांना झाला आहे काय? नसेल तर ते गप्प कशाला आहेत?
केजरिवाल यांचे एक निकटवर्तिय सहकारी कुमार विश्वास यांनी एका मुलाखतीत केलेला खुलासा आठवतो, आमच्याकडे इतकी भ्रष्टाचाराची प्रकरणे येत आहेत, की त्याचा जाहिर बोभाटा करण्यासाठी भानगडींची कतारच लागली आहे. त्यामुळे एखादे प्रकरण मागेपुढे होत असेल. शरद पवार किंवा महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा मागे पडला कारण त्याचा नंबर केजरिवाल यांच्या कतारीत मागे पडला होता. चला तेही मान्य करू. पण मग आठवडा लोटला तरी केजरिवाल बेपत्ता कुठे आहेत? इतरांचे सोडून द्या. त्यांनी ज्या आपल्या सहकार्यांवरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा केली होती; तिचे पुढे काय झाले? ज्या न्यायाधीशांना पत्रे पाठवली होती, त्यांनी काम स्विकारून चौकशी सुरू केली आहे काय? कशाचाच खुलासा नाही. एकाच वेळी गडकरी प्रकरणाने भाजपा गारद झाला असताना, केजरिवाल यांच्या कार्याला ब्रेक का लागला आहे? मला याचे सर्वात आश्चर्य एवढ्यासाठी वाटते, की दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष सारखेच भ्रष्ट आहेत का केजरिवाल यांचा आवडता सिद्धांत आहे. आणि गडकरी प्रकरणाच्या तपशीलाने त्याच सिद्धांताची ‘पुर्ती’ झाली आहे, असे म्हणायला खुपच वाव आहे. मग त्याचा लाभ उठवायला केजरिवाल मागे का आहेत? जणू त्यांच्या गोटात स्मशानशांतताच आहे. ज्याप्रकारे त्यांनी वड्रा किंवा खुर्शिद प्रकरणात रस्त्यावर उतरुन लढावू बाण्याचा परिचय माध्यमांसमोर दिला होता; तो ओसरला काय? पंतप्रधान, सोनिया व गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने करणार्या केजरिवाल यांच्या सहकार्यांना कसली मरगळ आली आहे? गडकरी अडकल्याने केजरिवालांचा मोठाच विजय झालेला आहे. मग त्यांच्या गोटात सगळा शुकशुकाट कशाला आहे?
दरम्यान अनेक दिवस शांत राहिल्यावर अण्णा हजारे पत्रकारांशी बोलू लागले आहेत आणि एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी महत्वाचा गौप्यस्फ़ोट केला आहे. अण्णा व केजरिवाल यांनी वेगळे व्हायचे ठरवले, तेव्हा नेमके काय शिजले होते, त्याचा बाहेर उल्लेख कधी झाला नव्हता. अण्णांनी त्याचे रहस्य उलगडले आहे. आपण विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे केजरिवाल देऊ शकले नाहीत; असा अण्णांचा दावा आहे. त्यातला एक प्रश्न असा. आपण राजकीय पक्ष काढला मग त्यात कुठलेही लोक सहभागी होणार आणि ते भानगडखोर नाहीत किंवा त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही; याची हमी कशी देणार? कोण देणार? त्याचे उत्तर केजरिवाल देऊ शकले नाहीत, असे अण्णा म्हणतात. त्याच कारणास्तव अण्णांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असेल तर तेच कारण आजच्या केजरिवाल यांच्या मौनाचे कारण असू शकेल काय? कारण गडकरी प्रकरणात दमाणीयांना सोबत घेऊन पत्रकार परिषद केल्यावर केजरिवाल यांनाच आरोपांना उत्तरे देण्याची उलट परिस्थिती प्रथमच अनुभवायला मिळाली आहे. खुद्द त्यांच्याच एका सहकार्याच्या व्यवहाराची छातीठोक उत्तरे देणे केजरिवाल यांना अशक्य झाले. त्यांना न्यायाधीश नेमून चौकशी करतो, असा बचावात्मक पवित्रा घ्यायला लागला आहे. जे केजरिवाल वड्रा किंवा खुर्शिद यांचे पुरावे व कागदपत्रे पत्रकारांसमोर फ़डकावत होते, त्यांच्याच सहकार्यांना आपल्या व्यवहाराची कागदपत्रे लपवण्याची वेळ आली. कदाचित त्यानंतरच केजरिवाल यांना अण्णा हजारे यांचा प्रश्न लक्षात आला असावा. आपल्या पक्षात वा संघटनेत भ्रष्ट नाहीत, याची हमी देणे किती अवघड आहे; त्याचे दु:ख त्यांना आता कळले असावे. त्यामुळेच त्यांनी उतावळेपणा सोडून दमाने घ्यायचे ठरवले असेल का?
असो, केजरिवाल किंवा त्यांच्या सवंगड्यांना काय साधायचे आहे? खरेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे काय? आजवर जगात असा कुठला देश वा समाज संपुर्ण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकला आहे काय? डोळसपणे इतिहासाकडे बघितले, तर कधीच कुठलाही समाज व देश भ्रष्टाचारमुक्त होऊ शकलेला नाही. उलट भ्रष्टाचार व अन्यायमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या चळवळी झाल्या व क्रांती घडून आली; त्या क्रांतीच्या म्होरक्यांनी अधिक भ्रष्टाचार व अन्याय केल्याचे इतिहासाचे दाखले सांगतात. त्याला काही सन्मान्य अपवाद असतील. पण त्या अपवादांना न्याय वा नियम म्हणता येणार नाही. आजही आपल्या देशात जातीय, सावकारी, सरकारी व भांडवलदारी अन्यायाच्या विरोधात सशस्त्र उठाव करणार्या संघटना आहेत व त्यांनी काही प्रदेशात आपली घटनाबाह्य सत्ता प्रस्थापित केली आहे. कुठे त्यांना नक्षलवादी वा माओवादी म्हणतात, पलिकडल्या पाकिस्तान वा अफ़गाणिस्तानामध्ये त्यांना तालिबान म्हणतात. त्यांचे काम कसे चालते? ज्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला असतो, त्यापेक्षा त्यांच्या अधिकारात अधिक अन्याय होत असल्याच्या कहाण्या कानावर येतात की नाही? तेवढेही पलिकडे जायचे कारण नाही. आम्हाला सशस्त्र उठाव करायचा नाही, आम्ही घटनात्मक परिवर्तन करू इच्छितो, असे म्हटले जाते. त्यात काय होते? मार्क्सवाद्यांच्या तानाशाहीच्या विरोधात आवाज ऊठवून बंगालमध्ये सत्ता परिवर्तन घडवणार्या ममता बानर्जी यांच्यावर आज कुठले आरोप होत असतात? ज्यांनी त्यांना मार्क्सवाद्यांच्या विरोधात सर्वाधिक मदत केली, तोच बुद्धिवादी वर्ग आज ममतांवर नाराज कशाला आहे? ही शहाण्यांची अवस्था आहे, सामान्य माणसाची कहाणी तर त्यापेक्षा दयनिय असते. जो कोणी ममताबद्दल शंका घेईल तो नक्षलवादी किंवा माओवादी, असे त्यांनी सोपे लेबल बनवून ठेवले आहे. केजरिवाल यांची चळवळ त्यापेक्षा भिन्न मार्गाने चालली आहे काय?
त्यांनी गांधीजयंतीच्या मुहुर्तावर नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पण त्या पक्षाला अजून नाव नाही, त्याची कोणती घटना नाही, त्याचा अजून कुठला कार्यक्रम नाही. त्याचे अजून कुठले संघटनात्मक स्वरूप नाही. नवा पक्ष किंवा संघटना वा चळवळ म्हणजे एकच चेहरा आहे, अरविंद केजरिवाल. वर्षभरापुर्वी निदान अण्णा टिम असे ज्याला म्हटले जायचे, त्याची काही कोअर कमिटी होती. आज त्यातले काहीच उरलेले नाही. केजरिवाल म्हणतील ते धोरण व केजरिवाल बांधतील ते तोरण. एक दिवस त्यांच्या मनात आले, त्यांनी दिल्लीच्या कोणा रहिवाश्याच्या घरातील तोडलेला विजपुरवठा नव्याने जोडून देण्याचा कार्यक्रम केला. एक दिवस त्यांनी फ़रूखाबाद वा गाजियाबादला जाऊन निदर्शने करायचा पवित्रा घेतला. एक दिवस ते उठतात व पंतप्रधान वा अन्य कुणा नेत्याच्या दारात धरणे म्हणून ठाण मांडायचा पवित्रा घेतात. मग एक दिवस माध्यमांचे कॅमेरे आणतात आणि आरोपांची सरबत्ती उडवून देतात. याला काय म्हणायचे? राजकीय पक्ष, सामाजिक न्यायाची चळवळ की आंदोलन? सबकुछ केजरिवाल. आज तरी अशी परिस्थिती आहे; की त्यांच्या नव्या पक्षामध्ये काही सहकार्यांचा जमाव आहे आणि देशभरची माध्यमे ही त्यांच्या पक्षाची संघटना झालेली आहे. कारण माध्यमांच्या प्रसिद्धीझोतामध्येच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. कुठे, कशाला व कोणत्या दिशेने ते एकट्या केजरिवाल यांनाच ठाऊक. पण एक मात्र खरे, की त्यांनी उच्च व कनिष्ठ मध्यमवर्गामध्ये आपला एक चहाता वर्ग तयार केला आहे. ज्याला कुठलीही झळ न लागता क्रांती केल्याचे समाधान हवे असते; त्याच्यासाठी केजरिवाल यांनी मोठीच सुविधा उभी केली आहे. ७९
मुंबईत बॉम्ब फ़ुटला किंवा भीषण घातपात झाला, मग आपले षंढत्व लपवण्याची अनेकांना मोठीच गरज वाटू लागते. गेटवे किंवा अशाच कुठल्या मोक्याच्या जागी मेणबत्त्या लावून त्यांना आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घातल्याचे समाधान मिळत असते. तशी सुविधा वा योजना आखणारा मग समाजसेवक म्हणून मिरवत असतो. तसाच एक मोठा वर्ग आहे, ज्याला आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात काहीच करत नाही, अशी अपराधी भावना मनात बोचत असते. त्यांच्यासाठी केजरिवाल यांनी एक मस्त सोपा व आरामदायी रिसॉर्ट निर्माण केला आहे. त्यात मग दमाणिया किंवा मयंक गांधी यांच्यासारख्यांनाही क्रांती केल्याचे व लढल्याचे समाधान मिळवता येत असते. कुणाच्या तरी प्रायोजकतेच्या कृपेने दांडीया नाचायला गर्दी जमतेच ना? तशी गर्दी जमवता येते. पण अशी गर्दीही नित्यनेमाने जमत नाही. आपापली कामे संपवून सवड असेल, तेव्हा त्यामध्ये ती गर्दी येत असते. केजरिवाल तसे पहिलेच नाहीत. प्रेमात पडलेल्या तरूण मुलांना नेहमी असे वाटते, की जगात प्रेम करणारे आपणच पहिलेवहिले आहोत. आजवर असे प्रेम कोणीच केले नाही. त्यापेक्षा केजरिवाल आणि त्यांच्या भ्रष्टाचार मुक्तीच्या प्रेमात पडलेल्यांची अवस्था वेगळी नाही. म्हणूनच उत्साहाच्या भरात त्यांना सगळे सोपे वाटत गेले आणि आता प्रेम संपु्न संसार मांडायची वेळ जवळ येत चालली आहे. तसतशी तारांबळ उडू लागली आहे. कालपर्यंत इतरांवर आरोप करून धमाल उडवणार्यांना स्वत:वरच गंभीर आरोप झाल्यावर तोंड लपवायची वेळ आली. म्हणूनच मग प्रश्न विचारावा असे वाटते. गडकरी गप्प आहेत ते समजू शकते, त्यांना तोंद दाखवायला जागा नाही. पण केजरिवाल कशाला गप्प झाले आहेत?
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २८/१०/१२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा