आता त्याला चार महिने होऊन गेले. मंत्रालयाला आग लागली ती घटना आपण विसरून गेलो नसू अशी अपेक्षा आहे. तिथे आग भडकली आणि पसरत गेली तेव्हा मंत्र्यांपासून सामान्य कर्मचार्यापर्यंत प्रत्येकाने काय केले? मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आग लागली तर ती विझवण्यासाठी अग्नीशमन दलाची स्थापना केलेली आहे. पण जेव्हा आग लागते, तेव्हा त्या इमारत वा वस्तीमधले लोक काय करतात? अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्याची प्रतिक्षा करतात का? की स्वत:चे हातपाय हलवून त्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात? मंत्रालयाला आग लागली तेव्हा मुख्यमंत्र्यापासून प्रत्येकजण आपला जीव वाचवायला पळत सुटला होता. अग्नीशमन दलाचे जवान येतील आणि आपल्याला वाचवतील, अशी प्रतिक्षा करत कोणी थांबला होता का? असे त्यांनी का करावे? असेच कोणीही आगडोंबामध्ये सापडलेला माणूस का करतो? जेव्हा आपला जीव धोक्यात आहे असे जाणवते, तेव्हा आपोआप माणसे स्वत:च्या बचावासाठी हातपाय हलवू लागतात. त्यातले अनेक उपाय नेहमीच्या आयुष्य़ात हास्यास्पद वाटणारे असतात. उदाहरणार्थ मंत्रालयाला आग लागली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित दादा जीव मुठीत धरून पळत सुटले होते. कदाचित आयुष्यात प्रथमच त्यांनी मंत्रालयाचा जिना उतरला असेल. अन्यथा नेहमी ते लिफ़्ट वापरतात. पण त्यांनी त्या दिवशी सहा जिने उतरण्याचा पर्याय पत्करला. दुसरीकडे त्यांचे अनेक सहकारी व अधिकारी खिडकीतून उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी तर जिन्याकडेही न जाता थेट खिडकीतून बाहेर पडून पाण्याच्या वा ड्रेनेजच्या पाईपला धरून खाली उतरण्याचा प्राणघातक मार्ग स्विकारला होता. असे करायला ही माणसे मुर्ख होती का? माणसे अशी केव्हा वागतात? जसा प्रसंग असतो तशी माणसे वागतात.
समजा त्या दिवशी तिथे मंत्रालयात आग लागलीच नसती आणि अजितदादा धावतपळत जिना उतरून खाली जाताना दिसले असते; तर लोकांनी त्यांना शहाणे म्हटले असते का? त्यांचे जे अधिकारी खिडकीतून सहा मजले खाली पाईप धरून उतरायला धडपडत होते, त्यांना पोलिसांनी संशयित म्हणुन अटक केली नसती का? पण यापैकी काहीच त्या दिवशी घडले नाही. उलट ज्यांनी असे विचित्र वाटणारे वर्तन केले; त्याचे पुढले काही दिवस धाडस वा साहस म्हणून कौतुक चालले होते. कारण तिथे परिस्थितीच तशी ओढवली होती. जेव्हा चमत्कारिक वा अतर्क्य काही घडत असते, तेव्हा माणसे्ही तर्काच्या पलिकडे जाऊन वागत असतात. म्हणूनच त्यांच्या वागण्याकडे तेव्हाच्या प्रसंगाचा संदर्भ घेऊनच बघावे लागते. त्या प्रसंगाची गरज लक्षात घेऊनच त्याचे विश्लेषण किंवा विवेचन करावे लागते. म्हणूनच नेहमीच्या प्रसंगी हास्यास्पद किंवा संशयास्पद वाटले असते अशा त्या वागण्याचे नंतर कौतुक झाले. तेव्हा कोणी नियम वा पद्धती, संकेताच्या चष्म्यातून त्यांच्या वागण्याकडे पाहिले नाही. मग त्याच निकषावर आपल्याला सामान्य माणसे चमत्कारिक का वागतात, त्याचाही विचार करणे भाग आहे. आणि चमत्कारिक वागणे, ही मोठ्या प्रतिष्ठितांचीच मक्तेदारी नसते हे लक्षात घ्यायला हवे.
नागपुरच्या सीताबर्डी भागातल्या वसंतराव नाईकनगर वस्तीमधल्या जमावाचे मंगळवारचे वर्तन म्हणुनच त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगानुसारच तपासायला हवे. काय झाले तिथे? काय केले त्या लोकांच्या जमावाने? त्यांनी इक्बाल शेख नावाच्या एका गुंडाला दगडांनी ठेचून ठार मारले. तेवढेच नाही तर त्याचा भाऊ अक्रम शेख जो पोलिस कोठडीत आहे, त्यालाही आपल्या ताब्यात द्यावे म्हणून त्या वस्तीमधला जमाव दोन दिवस पोलिस ठाण्याला घेराव घालून बसला होता. असे का व्हावे? आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे की नाही? जमाव कोणालाही दगडांनी ठेचून मारतो. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला ठार मारण्य़ासाठी आपल्या ताब्यात देण्य़ाची बेधडक मागणी करतो. हा सगळा काय प्रकार आहे? आपण जंगलात रहातो काय? नसेल तर असे घडूच कसे शकते? की ह्या नाईकनगरमध्ये वास्तव्य करणारी माणसे कोणी नरभक्षक आहेत काय? की हे लोक जंगली श्वापदे आहेत काय? ते लोक रानटी वगैरे आहेत काय? असतील तर आजवर त्यांनी असे किती लोकांचे मुडदे पाडले आहेत? किती लोकांना ठार मारले आहेत?
या सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. मग त्यांनी अचानक असे रानटी हिंस्र स्वरूप का धारण करावे? आजवर त्या वस्तीमध्ये असे कधीच घडले नव्हते. आपापले जीवन जगण्यासाठी धडपडणारी व अपार कष्ट करून पोटाची आग विझवण्यात जीवन खर्ची घालणारी, अशीच ही माणसे होती व आहेत. मग त्या दिवशी त्यांच्यात सैतान का संचारला होता. काय झाले होते त्यांना. ज्याला दगडांनी ठेचून मारला, त्या इक्बाल शेखने त्यांचे काय बिघडवले होते? उगाच टाईमपास म्हणून त्यांनी इक्बालचा बळी घेतला काय? त्याचेही उत्तर नकारार्थी आहे. लोकांना इक्बालचा बळी घ्यायचाच नव्हता. पण पोलिसांच्या कोठडीत आज जो सुरक्षित आहे, त्या अक्रमला ठार मारायचे कारस्थान त्या जमावाने निश्चित केले होते. त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. पण अक्रम जमावाच्या तावडीतून निसटला आणि पोलिसांच्या आश्रयाला गेला; म्हणूनच आज जिवंत आहे. मात्र इक्बाल तेवढा नशीबवान नव्हता. म्हणूनच अक्रम उर्फ़ भुरू पळल्यावर सगळा जमाव इक्बालवर तुटून पडला. अक्रमवरचा राग जमावाने इक्बालवर काढला आणि त्याचा बळी घेतला. पण त्याचा बळी घेण्याचे कारण काय? अक्रमने लोकांचे काय बिघडवले होते?
त्या वस्तीमध्ये अक्रम बेकायदा जुगाराचा अड्डा चालवत होता. तिथल्या बालकमंदीर या शाळेवर कब्जा करून त्याने हा अड्डा चालविला होता. त्याबद्दल वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती; किंवा किरकोळ कारवाई करून अक्रमला मोकाट सोडले जात होते. मग सुटून आलेला अक्रम लोकांना मारहाण करत होता, सतावत होता, मुलींची छेड काढत होता. महिलांना त्रास देत होता, बलात्कारही करत होता. पण लोकांनी जायचे कोणाकडे? दाद मागायची कुठे? हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे होते, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. कारण जे त्या वस्तीमधल्या लोकांना दिवसरात्र दिसत होते, ते पोलिसांच्या डोळ्यांना दिसत नव्हते. मग पोलिसांनी काय करावे? म्हणूनच अक्रम व त्याचा भाऊ इक्बाल, नाईकनरमध्ये धुमाकुळ घालत होते. मोकाट सुटलेल्या जंगली श्वापदाप्रमाणे दहशत माजवत होते. पोलिस ठाण्याला हप्ता मिळत असेल तर गुन्हे दिसतच नाहीत, हे आपल्या देशातले एक अनुभवी सत्य आहे आणि त्याचाच प्रयोग तिथे चालू होता. आणि पोलिस काहीच करत नाहीत तेव्हा गुन्हेगारांना अधिकच मस्ती चढते. त्यांना नुसतेच बेकायदा धंदे करून समाधान मिळत नाही. त्यांना आपली दहशत लोकांच्या नजरेत बघायचा मोह होतो. शेख बंधूंचे तसेच झाले होते. म्हणूनच त्यांनी काही कारण नसताना लोकांचे जीवन हराम करून सोडले होते. त्यांनी कोणाचे तरी अपहरण करून त्याचा मुडदा पाडला आणि त्याला त्याच बालकमंदिराच्या आवारात गाडले सुद्धा होते. पण पोलिसांना मात्र त्यातले काहीच ठाऊक नव्हते. जेव्हा लोक जमाव करून अक्रमच्या जीवावर उठले तेव्हाच पोलिसांना त्याने खुन केल्याची पहिली खबर मिळाली. त्यांनी आपला जीव वाचवायला धावत सुटलेल्या अक्रमला तात्काळ अटक केली.
म्हणजे पोलिसांनी काय केले? एका खुन्याला अटक केली नाही. तोच खुनी जमावाच्या तावडीत सापडून मारला जाईल, म्हणुन त्याचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी अक्रमला तडकाफ़डकी अटक केली. अशी आज आपल्या पोलिस खात्याच अवस्था आहे. त्यांना सामान्य माणुस वा नागिरक मारला जाईल याची फ़िकीर नाही. मात्र त्या गरीब नागरिकाचे जीवन हराम करून सोडणार्या गुन्हेगाराच्या जीवाची भयंकर काळजी असते. सहाजिकच सामान्य जनतेने काय करायचे? पोलिस वा कायदा आपल्या सुरक्षेला येण्याची शक्यता नसल्याने, आपला जीव स्वत:च वाचवणे व आपल्यावर आलेल्या धोक्याचा समाचार स्वत;च घेणे भाग होते ना? मग तसे करताना नेहमीच्या सारखे वर्तन करता येईल काय? आगीचा भडका उडाला, तेव्हा अजितदादा लिफ़्टने उतरले का? त्यांचे अधिकारी जिन्याने तळमजल्यावर आले का? त्यांनी आडवाटेने जाण्य़ाचा प्रयत्न केला का? मग हे नाईकनगरचे रहिवासी काय करतील? कायद्याने कुठलीच समस्या सुटणार नसेल, तर कायद्याला बगल देऊन त्यांनी आपापला उपाय योजायला हवा ना? त्यांनी तेच केले. पोलिस व कायदा ज्यांचा बंदोबस्त करत नव्हता, त्या शेखबंधूंचा स्वत:च बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलात आणला. त्याला मग जमावाने इक्बालची हत्या केली असे पत्रकार म्हणतात. प्रत्यक्षात लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी शेखबंधू नावाच्या श्वापदांना ठार मारण्याचा बेत केला व तडीस नेला. पोलिस त्यात आडवे आले नसते तर लोकांनी ती समस्या कायमची संपवली असती.
असा मार्ग चोखाळणारे नाईकनगरचे रहिवासी हे पहिलेच नाहीत. पहिलेच नागपुरकर सुद्धा नाहीत. पाचसहा वर्षापुवी त्याच नागपूरच्या जरीपटका विभागातील कस्तुरबनगरच्या रहिवाश्यांनी असाच धाडसी निर्णय घेऊन अंमलात आणला होता. तिथे अक्कू यादव नावाचा एक गुंड धिंगाणा घालत होता. चोरी, अपहरण. महिलांशी छेडछाड, बलात्कार असे त्याचे अनेक छंद होते. त्याची त्या वस्तीमध्ये मो्ठीच दहशत होती. त्याच्यावर डझनभरापेक्षा अधिक बलात्काराचेच गुन्हे नोंदलेले होते, ही एकच गोष्ट त्याच्या दहशतीचा पुरावा म्हणता येईल. प्रत्येकवेळी गुन्हा नोंदला मग अटक व्हायची; पण शिक्षा त्याला कधीच होऊ शकली नाही. प्रत्येकवेळी जामीनावर सुटून आल्यावार त्याचा दबदबा वाढत गेला आणि कुठलाही कायदा अक्कूचा बंदोबस्त करू शकत नाही, हे लोकांच्या लक्षात येत गेले. त्यामुळेच कायद्यावर विसंबून रहाणे, म्हणजे अत्याचार सहन करणे असाच अर्थ झाला होता. तेव्हा तिथल्या लोकांनी असाच स्वत:च्या बचावाचा निर्णय घेतला. अक्कू एका बलात्काराच्या आरोपात गजाआड होता. लौकरच जामीनावर सुटून तो कस्तुरबानगरात दहशत माजवायला येणार होता. मग करायचे काय? कायद्यावर विश्वास ठेऊन त्याचा अत्याचार सहन करायचा, की जामीन मिळण्यापुर्वीच त्याला संपवून धोका कायमचा संपवायचा, यातून लोकांना निवड करायची होती. लोकांनी दुसरा पर्याय निवडला आणि नाईकनगरच्या रहिवाश्यांप्रमाणेच कस्तुरबानगरच्या चारपाचशे लोकांचा जमाव कोर्टाच्या आवारात येऊन दबा धरून बसला होता.
दोन पोलिस अक्कूला घेऊन कोर्टात आले. वरच्या मजल्यावरच्या कोर्टात अक्कूला पुढली तारीख मिळाली आणि त्याला पुन्हा कोठडीत घेऊन जाण्यासाठी पोलिस त्याला तळमजल्यावर घेऊन आले. तिथल्या कोर्टाला सुट्टी होती म्हणून रिकाम्या कोर्टात पोलिस अक्कूसह गाडीची प्रतिक्षा करत बसले असताना तो रहिवाश्यांचा जमाव कोर्टाच्या इमारतीमध्ये घुसला आणि हातातल्या चाकु, सुरे, कुर्हाडीचे घाव घालून त्यांनी काही मिनिटातच अक्कूची अक्षरश: खांडोळी केली. त्या जमावामध्ये म्हातारे, तरूण, मुली, महिला व कोवळ्या वयाची मुले सुद्धा होती. माणसे अशी अमानुष का झाली? पण त्या घटनेनंतर कस्तुरबा नगर शांत झाले. कोणी तिथे पुन्हा बलात्कार किंवा दहशत माजवण्याची हिंमत केली नाही. लोकांनी कायदा हाती घेतला का? का घेऊ नये? ज्यांच्या हातात लोकांनी कायद्याची अंमलबजावणीचे काम दिले आहे, तेच काम करत नसतील तर लोकांनी काय करावे?
जेव्हा तुमच्या घरचा नोकर येत नाही, तेव्हा साफ़सफ़ाई वा स्वैपाक तुम्हीच करता ना? तुम्ही उपाशी रहात नाही की घाणीमध्येच जगत नाही. काम व्हावेच लागते. कायदे गुन्हेगारांचा शिक्षा देण्यासाठी असतात, धाक घालण्यासाठी असतात. ते काम कायदे राबवणारे करत नसतील, तर जनतेला तेच काम करणे भाग आहे. राहिला मुद्दा अमा्नुषतेचा. लोकांनी ज्याप्रकारची जंगली वृत्ती दाखवली आहे ती योग्य आहे का? का माणसे अशी अमानुष होतात. त्याला पर्यायच नसतो. जेव्हा एखादे श्वापद तुमच्या समोर येते, तेव्हा तुम्ही कसे वागता? कोणीही कसा वागतो? माणूस नेहमी परिस्थिती वा साद जशी घातली जाते, तसाच प्रतिसाद देत असतो. जर गुन्हेगार श्वापदासारखे अंगावर येत असतील तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिस म्हणजे कायद्याची असते. ती जबाबदारी जर पार पाडली जात नसेल तर लोकांनी काय त्या श्वापदाचा घास होऊन निमूट बळी जायचे? कुत्रा भुंकत अंगावर आला तर तुम्ही दगड उचलून त्याच्या अंगावर मारता ना? मग शेखबंधू असतील वा अक्कू यादव असेल, ते काय माणसासारखे वागत होते का? नसतील तर त्यांना माणसासारखा प्रतिसाद कसा देता येईल?
असे जगभर नेहमी सर्व युगात, सर्व समाजात होत आलेले आहे. जेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा आणि कायद्याच्या अंमलावरचा विश्वास उडतो; तेव्हा लोक स्वत:च कायदा हाती घेतात आणि न्याय करू लागतात. ते न्यायाची भिक मागत नाहीत. ते न्याय हिसकावून घेतात. न्याय करू लागतात. नागपुरात अक्कू यादवच्या पिडितांनी असाच न्याय मिळवला. आता नाईकनगरच्या लोकांनी तोच मार्ग चोखाळला. वर्षभरापुर्वी इजिप्तचे लोक त्याच मार्गाने गेले. जगात आनेक देशात अलिकडेच लोकांनी कायदे धुळीस मिळवले आहेत. कायद्याच्या नावावर अराजक निर्माण झाले, की लोकच कायदा उधळून लावत असतात. आपल्या देशाचा हळूहळू त्याच मार्गाने प्रवास सुरू झालेला आहे. अनेक राज्यात, अनेक शहरात, अनेक वस्त्यांमध्ये अशाच घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. ज्या प्रकारचे घोटाळे समोर आले आहेत आणि इतका प्रचंड भ्रष्टाचार करूनही सत्ताधारी जी मस्ती दाखवत आहेत, तेव्हा सामान्य जनता निमुटपणे सर्व सहन करील अशी त्यांची अपेक्षा आहे. पण लोकांचा धीर सुटला आणि कळपाची मानसिकता निर्माण झाली, मग बंदुका किंवा हत्यारांची भिती उरत नाही. झुंडीची मानसिकता शेवटी रानटी असते. तिच्याकडून माणसाप्रमाणे वर्तनाची कोणी अपेक्षा करू शकत नाही. माणसाचे कायदे जिथे योग्यरितीने राबवले जात नाहीत, तिथली सामान्य माणसामध्ये जंगलचा कायदा आपोआपच कार्यरत होत असतो. नागपूरच्या नाईकनगरमध्ये त्याचीच प्रचिती आली आहे. पण तिच्यापासून कोणी धडा घेणार आहे काय?
आता दोनचार दिवस अशा विषयावर निरथक चर्चा खुप रंगतील. पण त्यातले गांभिर्य वा दुरगामी परिणाम किती लोक समजून घेतील? कायद्याचा धाक असावा लागतो. तो धाक संपला मग कायदा नंपुसक होऊन जातो. असा नंपुसक कायदा असला, मग सामान्य जनता असुरक्षित होऊन जाते. नेभळट नवर्याच्या पत्नीकडे कोणीही वाकड्या नजरेने बघावे, तशी जनतेची दयनिय अवस्था होऊन जाते. अशा महिला मग स्वत:च कंबर कसून व पदर खोवून स्वसंरक्षणार्थ उभ्या ठाकतात, तेव्हाच त्यांची अब्रू शाबुत रहात असते. आज देशातला कायदा व तो राबवणारी यंत्रणाच नेभळट नवर्यासारखी होऊन गेली आहे. त्याचेच परिणाम अब्जावधीच्या घोटाळ्य़ापासून, अक्कू यादवपर्यंत आणि कसाबच्या हत्याकांडापासून दिल्ली हरयाणातल्या बलात्कारापर्यत राजरोस अनुभवास येत आहेत. कायदा म्हणजे पुराणातली वांगी झाला आहे. कायद्याचा गुन्हेगारांना धाक वाटण्यापेक्षा आधार वाटू लागला आहे. म्हणून तर भुरू उर्फ़ अक्रम जमाव अंगावर आला तेव्हा पोलिसांच्या आश्रयाला धावला. तिकडे भृणहत्येच्या प्रकरणात संतप्त नातलगांचा जमाव जमू लागला, तेव्हा डॉ. सुदाम मुंडे स्वत:च पोलिस ठाण्यात गेले होते आणि कागदोपत्री त्यांना अटक करून पोलिसांनी कारवाईचा देखावा छान तयार केला होता. गुन्हेगारांना हल्ली पोलिस व कायदा यांच्याविषयी कमालीचा विश्वास वाटू लागला आहे. मुंबईच्या रस्त्यावर दोनशे लोक जीवानिशी कसाब टोळीने मारले, त्यापैकी कोणाला कायदा संरक्षण देऊ शकला? पण त्यांना किडामुंगीप्रमाणे मारणार्या कसाबची सुरक्षा किती कडेकोट आहे ना?
उलट गुजरातकडे बघा. नागपुरात अधुनमधून घडते तो उद्योग गुजरातने दहा वर्षापुर्वी दोनतीन महिने केला आणि गेली दहा वर्षे तिथे कोणाला स्फ़ोट घातपात करायची हिंमत होत नाही. कारण गुजराती जनता कायद्यावर विसंबून नाही, तर स्वसंरक्षणार्थ सज्ज आहे. मुंबईकरांसारखी पोलिसांच्या येण्याची प्रतिक्षा करणार नाही. नुसता संशय आला तरी गुजराती जनता स्वत:च कठोर कारवाई सुरू करते आणि तिथला मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करत नाही; असा धाकच गुजरातमध्ये शांतता सुव्यवस्थेची प्रस्थापना करू शकला आहे. त्याचे श्रेय मुख्यमंत्री म्हणुन मोदी यांनी कितीही घेतले म्हणुन सत्य बदलत नाही. गुजरातमध्ये दहा वर्षात शांतता व सुरक्षितता आहे, ती दंगलखोरांनी केलेल्या थेट कारवाईचा परिणाम आहे. नागपुरकर तेच करू लागले आहेत आणि मोदींच्या विषयी देशातल्या लोकांना त्यामुळेच आकर्षण वाटू लागले आहे. कारण जिथे योग्य आहे तिथे मोदी जनतेला कायदा हाती घेऊ देतात, अशी समजूत त्याचे खरे कारण आहे.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १४/१०/१२)
chaan
उत्तर द्याहटवाExcellent analysis and argument in support of the incident.
उत्तर द्याहटवा