रविवार, २२ जुलै, २०१२

राज आणि उद्धव एकत्र येतील का?


    गेल्या सोमवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना उपचारार्थ तडकफ़डकी इस्पितळात हलवावे लागले. तेव्हा मुंबईच्या बाहेर दौर्‍यावर गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे धावत मुंबईला परतले. इस्पीतळामध्ये जाऊन त्यांनी आपल्या चुलत भावाची अगत्याने चौकशी केलीच. पण संध्याकाळी उद्धव यांना सुट्टी मिळाल्यावर स्वत:च्या गाडीत घालून राजनी त्यांना मातोश्रीवर पोहोचते केले. त्यामुळे हे दोघे ठाकरेबंधू पुन्हा एकत्र येतील काय, या विषयाला नव्याने चालना मिळाली आहे. तसा हा प्रश्न गेले कित्येक महिने पत्रकार व माध्यमे उपस्थित करत आहेत. त्यावर चर्चा सुद्धा होत आहेत. अगदी महापालिका निवडणूका ऐन रंगात आल्या असताना सुद्धा त्याचा उहापोह चालू होता. वाहिन्यांवर ज्या खास मुलाखती घेतल्या जायच्या, त्यात तिन्ही ठाकरेंना तो प्रश्न हमखास विचारला जात होता. मात्र कोणीही त्याचे स्पष्ट उत्तर दिले नाही. मग मतदान होऊन सर्व पालिकांचे निकाल लागले. त्यात अर्थातच मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे महापालिकांना महत्व होते. कारण त्याच राज्यातील व देशातील मोठ्या व श्रीमंत महापालिका आहेत. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात तिथल्या घडामोडींची जास्त दखल घेतली जाते. त्यात पुन्हा मुंबई पालिकेच्ची उलाढाल केरळसारख्या प्रमुख राज्यापेक्षा मोठी असल्यावर, तिथल्या निवडणुक निकालांची दखल देशाच्या पातळीवर घेतली गेली तर नवल नाही. त्यात ठाणे वगळता अन्य तीन पालिकांत नवख्या मनसे या पक्षाने एकट्याच्या बळावर लढून मिळवलेले यश सर्वांना चकित करणारे होते. त्यातही पुन्हा मुंबईत सेना व मनसे यांनी मि्ळवलेल्या जागा निम्म्या आहेत. म्हणजे दोन ठाकरे बंधूतच मुंबई अर्धी वाटली गेली आहे. सहाजिकच ते दोघे एकत्र असते तर काय घडले असते, असे अंदाज राजकीय अभ्यास करणार्‍यांच्या मनाला मोह घालू लागले तर आश्चर्य नाही. त्यातूनच हा प्रश्न अधिक टोकदार बनला आहे. दोघे ठाकरे एकत्र येतील का?  

   दोन्हीकडे मुळचे शिवसैनिक विभागले गेले आहेत. दोन्हीकडल्या कार्यकर्त्यांची मानसिकता एकच आहे. दोघे शिवसेनाप्रमुखांना सारखेच मानणारे आहेत. दोघांच्या पाठिराख्यांचा मराठीबाणा समानच आहे. मग एकत्र येण्यात काय अडचण आहे? असा आपण बाहेर बसलेले बोलतो. आपल्यासाठी हे सर्व सोपे आहे. सचिनने तो बॉल सोडायला हवा होता. मधे बॅट घालायची कशाला? असे आपण टीव्ही समोर बसून मॅच बघताना बोलतो. आपल्यासाठी किती सोपे असते ना? कारण आपण मैदानात नसतो आणि समोरून येणार्‍या बॉलची दिशा, वेग याचा आपल्याला अंदाजही नसतो. त्या अनुभवातून एकटा सचिन जात असतो. म्हणुनच आपल्यासाठी बोलणे जेवढे सोपे असते, तेवढेच सचिनसा्ठी तो बॉल खेळणे अवघड असते. इथे दोन ठाकरे बंधू एकत्र येणे आपल्याला जेवढे सोपे वा्टते, तेवढेच त्या दोघांसाठी ते अवघड काम आहे. निवडणुकी आधी वेगळी चुल मांडणार्‍या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला कॉग्रेस सोबत निवडणुकीनंतर जाणे जेवढे सोपे होते, तेवढे हे काम सोपे नाही. कारण पवारांचा संघर्ष सत्तेपुरता मर्यादित होता. दोघा ठाकरे भावातला झगडा सत्तेपलिकडल्या संघर्षाचा आहे. पवारांना सत्ता मिळवण्यात रस होता. त्यासाठी मग तडजोड शक्य असते. उद्धव किंवा राज या दोघांमध्ये सत्तेपुरता झगडा आहे काय? तसे असते तर त्यांनी निवडणुकीपुर्वी वा निकालानंतर आपापसात सत्तेच्या तडजोडी केल्या असत्या. पण हे भांडण तसे नाहीच. एकत्र येऊन वा वेगळे राहून काय पदरात पडणार, यापेक्षा दुसर्‍याचे काय नुकसान केले, यात त्यांना बाजी मारल्यासारखे वाटत असेल; तर तडजोडीला जागा उरतेच कुठे?

   तीन वर्षे होत आली आता त्या गोष्टीला. मे २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात मनसेने पहिली लढाई लढवली. एकही जागा त्यांना निवडून आणता आली नाही. पण निकाल लागल्यावर राज ठाकरे यांनी ’हसतहसत’ पराभव स्विकारताना केलेली मल्लीनाथी आठवते कुणाला? त्यांनी अमिताभच्या "अमर अकबर अंथनी" चित्रपटातला डायलॉग पत्रकारांना ऐकवला होता. ’तुमने अपुनको बहुत मारा. अपुनने तुमको एकही मारा. लेकिन सॉलिड मारा. है के नही?’ त्यातला तो मिस्कील आनंद राज लपवू शकला होता काय? मुंबईच नव्हे तर ठाण्यातही सेनेने भाजपासह जवळपास सर्व जागा गमावल्याचा तो आनंद होता ना? आपण मार खाल्ल्याचे जराही दु:ख त्यात नव्हते. पण सेनेसह युतीचा मोठा पराभव त्यांना भलताच खुश करून गेला होता. अर्थात तो आनंद सेनेच्या पराभवाचाही नव्हता. तर उद्धव ठाकरे यांच्या पुढारपणाच्य परा्भवाचा आनंद होता. इतकेच नाही तर उद्धव सोबत राहिल्याने भाजपाचेही नुकसान होते, हा सिद्धांत सिद्ध झाल्याचा तो आनंद होता. असे एका भावाला दुसर्‍याबद्दल का वाटावे? त्या प्रश्नाचे उत्तरच हे दोघे एकत्र येतील काय, या प्रश्नाचे उत्तर आहे. दोघांमध्ये व्यवहारी वाद असेल तर व्यवहारी तडजोड निघू शकते. पण त्यांच्यातले भांडण त्यापलिकडे गेलेले आहे. त्यांना आपापले यश मिळवण्यापेक्षाही परस्परांच्या अपयशात रस असेल, तर ते एकत्र कशाला येतील?    

   दुसरी बाजू आहे ती महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाची. हे राजकारण राज ठाकरे यांनी वेगळी चुल मांडण्यापर्यंत दोन गटात विभागले गेले होते. एका बाजूला सेना-भाजपा तर दुसर्‍या बाजूला कॉग्रेस-राष्ट्रवादी, असे युती-आघाडीत राज्याचे सर्व राजकारण विभागलेले होते. १९९९ सालात ही आघाडी बनली तेव्हा त्याला सेक्युलर पक्षांची आघाडी म्हटले जात होते. पण तो बिगर कॉग्रेस पक्षांचा शुद्ध बावळटपणा होता. त्यांना वाटले आपणच सेना भाजपाचा हिंदुत्ववाद थोपवण्याची मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावत आहोत. प्रत्यक्षात त्यांची ती राजकीय आत्महत्या होती. त्यांनी दुभंगलेल्या व सत्ताभ्रष्ट कॉग्रेसला त्यातून सावरण्याची संधी दिली. म्हणुन सेना भाजपा युती संपली नाही. पण या तथाकथीत सेक्युलर पक्षांचा राज्याच्या राजकारणात कायमचा अस्त झाला. मग २००४ पासून युती व आघाडी असे राजकारण विभागले गेले. बाकी तिसरा कोणीही उरला नव्हता. सेक्युलर खुळेपणाने फ़सलेल्या अन्य अस्तंगत पक्षांना मग जाग आली, तेव्हा उशीर झाला होता. मतदाराने उरलेले काम २००४ च्या निवडणूकीत पार पाडले. या दुरंगी राजकारणात २००९ च्या निवडणुका युतीने सहज जिंकल्या असत्या. पण तशी वेळ आलीच नाही. कॉग्रेसला संपवण्यापेक्षा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत एकमेकांना संपवण्याचे डाव मोठ्या रंगात आलेले. त्यामुळे २००४ ते २००९ पर्यंत सेनेच्या नेतृत्वानेच स्वत:ला पांगळे करून घेण्याचे कार्य पार पाडले. जिथे कॉग्रेस वा राष्ट्रवादी कमी पडतील त्यांच्या मदतीला सेनेचे नवे नेतृत्व सज्ज होते.

   सत्ता हाती असताना पक्षातल्या महत्वाकांक्षी लोकांनी एकमेकावर कुरघोडी करावी हे समजू शकते. पण सत्तेपासून सहा सात वर्षे दुर असलेल्या शिवसेनेत कार्याध्यक्ष व त्यांचे विश्वासू सहकारी, आपल्याच लढवय्या साथीदारांना संपवण्याचे डावपेच खेळत होते. २००४ च्या निवडणुकीत युतीचे बहुमत आणायचे प्रयत्न बाजूला पडले आणि सेनेतले गट एकमेकांना निवडणुकीतून संपवायचे डाव खेळले. त्यातून सत्तेचे गणित हुकले आणि निकालानंतर त्याचे पडसाद उमटू लागले. उमेदवारी देण्यापासूनच सेनेत बेदिली माजली होती. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व त्यांचे निकटवर्तिय यांच्याबद्दल नाराजी उघड दिसू लागली होती. भास्कर जाधव, रमेश प्रभू इत्यादिंनी लगेच सेना सोडली, तर बाकीचे निकाल लागायची वाट बघत होते. निकालानंतर वर्षभरातच सेनेचा विधानसभेतील नेता व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, यांनी सेना नेतृत्वाला खुले आव्हान दिले. त्यांनी नुसती सेना सोडली नाही, तर अगदी रस्त्यावर उतरून सेनेशी दोन हात केले. तिथे सेनेची वट संपली होती. ’आवाज कुणाचा’ या घोषणेतली हवाच त्यातून निघून गेली. राणे एकटेच बाहेर पडले नाहीत, तर अर्धा डझन आमदार घेऊन बाहेर पडले. त्यातून कोकण हा सेनेचा बालेकिल्ला उध्वस्त झाला. एकेक आमदार सेना सोडून कॉग्रेसमध्ये जात राहिला आणि पोटनिवडणूकीत जिंकत राहीला. बाळासाहेबांनी एकट्याच्या हिमतीवर उभारलेली संघटना अशी क्रमाक्रमाने विस्कळीत होत चालली होती. पण कार्याध्यक्षांना त्याची तिळमात्र फ़िकीर नव्हती.

   अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी एके दिवशी सेनेतील सर्व पदांचे राजीनामे देत बाळासाहेबांना जाहीरपत्र लिहीले व तातडीने उपाय योजण्याची मागणी केली. आपली त्यांच्याविषयी तक्रार नसून विठ्ठलाभोवती वेढा देऊन बसलेल्या बडव्यांबद्दल तक्रार आहे असेही राजने तेव्हा सांगून टाकले होते. त्याने मुद्तही दिली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. कदाचित कार्याध्यक्षांच्या निकटवर्तियांना आनंदच झाला असेल. सुंठेवाचून खोकला गेला म्हणतात, तसे राजच्या सेना सोडण्याचे उद्धव गोटात स्वागतच झाले. मग महाराष्ट्राचा दौरा केल्यावर राजने आपला स्वत:चा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला. त्याची कोणाला भिती वाटण्याचे कारण नव्हते. जोवर एखादा पक्ष वा संघटना आपली निवडणुकीतली मते दाखवत नाही, तोवर त्याची कोणी गंभीर दखल घेत नसतो. सेनेचे विरोधक व पत्रकार चिडवण्यासाठी राजला प्रसिद्धी देतात, अशी समजूत त्याचे कारण होती. पण जेवढे शिवसैनिक कार्याध्यक्षांच्या कंपूकडून दुखावले जात होते, तेवढ्यांना आता मनसे हे नवे आश्रयस्थान निर्माण झाले होते. मात्र आपल्याच मस्तीत मशगुल असलेल्या उद्धव गोटाला त्याची दादफ़िर्याद नव्हती. दिड वर्षात आलेल्या पालिका नि्वडणुकीत मनसे फ़ारसा प्रभाव पाडू शकली नाही, म्ह्टल्यावर सेनेत निश्चिंती होती. राणे व राज असे दोघे बाहेर पडूनही मुंबई पालिकेची सत्ता टिकली, म्हणुन तो गोट निर्धास्त होता. चारच वर्षांनी आलेल्या लोकसभा निवडणुकीने त्यांना जाग आली. पण त्यापासून काही शिकण्याशी बुद्धी झाली नाही. म्हणुनच लोकसभेतील पराभवाची विधानसभेत पुनरावृत्ती झाली. तरीही धडा शिकला गेला आहे काय?

   प्रत्येक निवडणुकीत आपल्या मतांचा हिस्सा वाढवत मनसे व राज ठाकरे महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण करत चालले आहेत. त्याची दखल प्रतिस्पर्ध्याने घायला हवी. त्यालाच राजकारण म्हणतात. पण सेनेच्या नव्या नेतृत्वाला त्याची फ़िकीरच नाही. १९६९ सालात जसे निजलिंगप्पा व १९७८ सालात जसे चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी अधिकृत कॉग्रेस पक्ष आपल्या हाती आहे म्हणुन स्वप्नरंजनात मग्न होते, व इंदिरा गांधी बाजूला झाल्या त्याची गंभीर दखलही घायला तयार नव्हते, तशी आजच्या उद्धव गोटाची मनस्थिती आहे. तेव्हा कॉग्रेस आपल्या निशाणीसह निजलिंगप्पा व रेड्डी यांच्याकडे राहीली, पण मतदार मात्र इंदिराजींच्या नव्या पक्षाकडे झुकत गेला. हळुहळू सेना व मनसे यांचे तसेच होत चाललेले नाही काय? मुंबईत मागल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने सेनेच्या चारच्या तुलनेत सहा आमदार निवडून आणले. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत दादरच्या सर्व जागा मनसेने जिंकल्या. हे कशाचे लक्षण आहे? इतके होऊनही शिकण्याची तयारी आहे काय? घरगुती भांडण एका बाजूला व राजकारण दुसर्‍या बाजूला, एवढा तरी धडा यातून घ्यायला नको काय? दुर्दैवाने तसा विचारही कार्याध्यक्षांच्या मनाला शिवलेला दिसत नाही. राजकारण जिंकण्यापेक्षा त्यांचे व त्यांच्या सहकार्‍यांचे लक्ष राजला नामोहरम करण्यातच गुंतलेले आहे. मग त्यात त्यांचे वा शिवसेनेचे नुकसान झाले तरी बेहत्तर, अशीच एकूण त्यांची वाटचाल आहे. त्याचीच साक्ष त्यांनी ताज्या काही घडामोडीतून दिली आहे. म्हणजेच राज सेनेतून बाहेर पडण्याच्या वेळची जी स्थिती होती, ती आजही जैसे थे आहे. मग याला जबाबदार कोण? त्यातून मार्ग कसा निघणार? यांना एकत्र आणणार कोण?

   उद्धव सेनेचे कार्याध्यक्ष होईपर्यंत जी शिवसेना होती, ती कायम ठेवण्यात उद्धव अपयशी ठरले आहेत हे नक्की. त्याचे पुरावे देण्याची गरज नाही. त्यांच्या संघटनात्मक स्वरुपात काही बदल अपेक्षित होते. कुठलाही नवा नेता आला, मग संघटनेत काही बदल अपेक्षितच असतात. पण म्हणुन संपुर्ण स्वरूप बदलत नाही. आहे तिथून ती संस्था वा संघट्ना अधिक व्यापक व विस्तारीत व्हावी हीच अपेक्षा असते. पण दुर्दैवाने सेनेच्या बाबतीत तसे घडलेले दिसत नाही. जुने बाजूला होताना त्यातले खमके व प्रभावी नेतेही बाजूला पडत गेले आहेत व सेनेला एकप्रकारे अन्य पक्षांचे स्वरुप प्राप्त होत गेले आहे. भुजबळांनी सेना सोडली तेव्हा ते मुंबईत दोन महीने फ़िरकू शकले नव्हते. राणे यांनी सेना सोडली, तेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी सेनेची रंगशारदा सभागृहातील सभा उधळून लावली होती. हा फ़रक लक्षणिय आहे ना? बाळासाहेब व उद्धव यांच्या सेनेतला हा फ़रक विसरता येणार नाही. त्याच बदलाने सगळी गडबड झाली आहे. जी सेना साहेबांची होती, ती आज राहिली नाही, ही धारणा एका राजची नाही, तर अनेक सेना चाहत्यांची आहे. आणि त्यांना दोघांनी एकत्र यावे असे वाटते. कारण त्यातून पुर्वीची शिवसेना पुन्हा गर्जू लागेल, ही त्यांची अपेक्षा आहे. पण ती पुर्ण होणार कशी?

   या संदर्भात एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. पालिका निवडणुकीच्या दरम्यान अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा पहिले पाउल कोणी टाकायचे असे विचारले जात होते. त्यावेळी एका मुलाखतीत राज म्हणाला होता, एक पाऊल काय बाळासाहेबांसाठी शंभर पावले टाकीन. पण त्यात उद्धव असेल तर एकही पाऊल टाकता येणार नाही, असे न बोलताही त्याने सुचवले होते. आणि नंतरच्या घडामोडींनी त्याचीच साक्ष दिली आहे. राज वा साहेब किती पावले टाकतील त्याचा काहीही उपयोग नाही. त्यातून जे साधले जावे ही अपेक्षा आहे, ते उद्धव गोट साधू देणार काय, हा कळीचा प्रश्न आहे. पालिका निवडणूकांचे निकाल लागल्यावर ठाण्याची परिस्थिती अटीतटीची झाली होती. नगरसेवकांची पळवापळवी, अपहरण, लपवाछपवी सुरू झाली होती. सेनेच्या तीन आमदारांनी साकडे घातल्यावर राजने सेनेला बिनशर्त पाठींबा देऊन, त्या दिशेने सदिच्छेचे पहिले पाऊल टाकले होते. कुठलाही सौदा वा बोलणी न करता, त्याने पाठींबा दिला होता. तिथेच नाही. आधी बदलापुर, अंबरनाथ व कल्याण डोंबिवली अशा जागी सेनेला साथ दिली होती. या सदिच्छांची परतफ़ेड नाही, तर निदान पोच तरी व्हायला हवी ना? उलट नाशिक पालिकेच्या महापौर निवडणुकीत सेनेने गलिच्छ राजकारण खेळले. आपला निवडून आणण्यापेक्षा राज व मनसेचा महापौर होऊ नये, यासाठी जे डावपेच खेळले गेले; ते कशाचे द्योतक होते? त्यातून कटूता आली तर इतर अनेक ठिकाणी सेनेलाच समिकरणे जुळवताना अडचण होणार होती. तरीही ते उद्योग कशाला झाले? राजला अपशकून यापेक्षा त्याचे दुसरे वर्णन होऊ शकते काय?

   त्याचे परिणाम म्हणून ठाणे व औरंगाबाद जिल्हा परिषदेत युतीला सत्ता गमवावी लागली आहे. कल्याण डोंबिवली व ठाणे पालिकेत पेच पडणार आहे. याला राजकारण म्हणतात की मत्सर? आपले नाक कापले गेले तरी बेहत्तर, पण त्याचे बोट तुटले तर हवे आहे, अशा वागण्याला राजकारण म्हणताच येत नाही. उद्धवप्रणित सेनेचे असेच चालले आहे. मग त्यामागे स्वत: उद्धव आहेत वा त्यांचे अन्य कोणी निकटवर्ती हे करतात, त्याला महत्व नाही. जे होते आहे त्याची जबाबदारी उद्धववर आहे. तेच हा प्रकार थांबवत नाहीत, मग त्यांच्याच प्रेरणेने असे प्रकार होतात, असेच म्हणणे भाग आहे. जर हिच सेनेची ’राज’निती असेल तर दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार कसे? आपण लोकहित व मराठी हितासाठी सन्मान्य तडजोड करू शकतो, हे राजने वारंवार दाखवून दिले आहे. पण त्याला मिळणारा प्रतिसाद शंभर पावले मागे घेऊन जाणारा आहे. मग हे दोघे एकत्र येणार कसे? कोण त्यांना एकत्र आणणार व कशाच्या आधारावर? ते शक्य तरी आहे काय, हा प्रश्न येतो. त्याचे उत्तर हवे असेल तर मुळात या दोन भावात दुरावा का आला व ते बाजूला का झाले, त्याकडे बघावे लागते. तिथून प्रश्न सुरू होतो आणि तिथेच येऊन संपतो.

   सत्ता मिळवणे व सेना प्रभावशाली बनवणे, यातच उद्ध्व ठाकरे यांना रस असेल तर त्यांनी कुठल्याही तडजोडीला तयार असायला हवे. पण ती दुरची गोष्ट झाली. त्यांना आहे ती सेनेची ताकद सुद्धा टिकवण्यापेक्षा राजला संपवणे, त्याची नाचक्की करणे, त्याच्या पक्षाला अपशकून करणे, यातच रस असेल तर पुढले पाऊल पडणार कसे? ती इच्छा असती तर त्यांनी ठा्ण्याची परतफ़ेड नाशिकमध्ये करून एक पाऊल पुढे टाकले असते. पण उलट त्यांच्या गोटातून मनसेला वंचित ठेवण्यासाठीचे डाव खेळले गेले. त्यासाठी ठाणे व औरंगाबाद जिल्हा परिषद गमावण्याचीही तयारी ठेवली गेली. तिथे त्यांचे व शिवसेनेचे उद्दीष्ट स्पष्ट होऊन जाते, एकत्र येण्याची बात सोडा, त्यांना राजला राजकारणातून वा सार्वजनिक जीवनातून संपवण्याची तीव्र इच्छा आहे. नव्हे तेच आजच्या शिवसेनेचे प्राधान्य आहे. त्याचीच चुणूक नाशिकमध्ये दाखवली गेली. त्यासाठीच दोन जि.प. मध्ये किंमत मोजली गेली. ती काय सांगते? कॉग्रेस व राष्ट्रवादी सेनेचे पहिले शत्रू नाहीत, तर मनसे व राज ठाकरे त्यांचे प्रथम शत्रू आहेत. इतके स्पष्ट संकेत असताना, दोघे एकत्र येण्याला जागा शिल्लक उरते काय?

   उद्धव ठाकरे यांच्या हाती सुत्रे गेल्यानेच राजला शिवसेना सोडावी लागली असेल वा आजही त्यांच्याच हाती सेनेचे निर्णय असतील, तर राजला तिथे वावच काय उरतो? थोडक्यात उद्धवची शिवसेना हा कॉग्रेस व राष्ट्रवादीसाठी सत्तेचा विमा आहे. जोवर त्यांच्या हाती सेनेचा कारभार आहे, तोवर त्या आघाडीने घाबरण्याचे कारण नाही. कारण तोवर त्यांच्याऐवजी राजला संपवण्यासाठी सेनेची ताकद खर्ची पडणार आहे. कॉग्रेस राष्ट्रवादीला हरवायला राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष लढणारच नसेल, तर त्यांना निवडणुका जिंकण्याची चिंता करण्याचे कारण आहे काय? जेव्हा केव्हा मनसे बलवत्तर होईल, तेव्हाच त्यांना निवडणुका हरण्याची चिंता करावी लागेल. उद्धव कार्याध्यक्ष असेपर्यंत चिंतेचे कारण नाही. त्यामुळे शिर्षकातील प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. जोवर सेनेची धुरा उद्धवपाशी आहे तोवर दोघे ठाकरे बंधू एकत्र येणे कदापी शक्य नाही.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २२/७/१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा