सोमवार, २८ मे, २०१२

सत्यमेव जयते? म्हणजे काय होते?




   "जे कायदे अंमलात आणता येत नाहीत असे कायदे संमत करणे, यापेक्षा सरकार व कायद्याच्या विध्वंसाचा दुसरा प्रभावी मार्ग नाही." अल्बर्ट आईनस्टाईन

   आईनस्टाईन हा जगप्रसिद्ध वैज्ञानिक असला तरी तो त्याच्या मानवी विचारांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. ज्याचे सर्व आयुष्य व ताकद विज्ञानाची गुढ रहस्ये व निसर्गाच्या नियमांचा उलगडा करण्यातच खर्च झाली, त्याने सामाजिक व सांस्कृतिक विषयात व्यक्त केलेली मते, म्हणूनच कौतुकाचा विषय होऊन राहिली आहेत. वर सांगितलेले त्याचे शासन व्यवस्थेबद्दलचे मत म्हणुनच रोचक तेवढेच मार्गदर्शक मानावे लागेल. तो राज्यशास्त्राचा किंवा राजकारणाचा अभ्यासक नव्हता, की कुठल्या चलवळीचा प्रणेता नव्हता. पण स्वत:ला एक सामान्य माणुस समजून जगायला धडपडणारा त्यातून जगातल्या घटनांकडे डोळसपणे बघणारा नागरिक होता. म्हणुनच कुठल्याही पक्षपाती भूमिकेपलिकडे जाऊन तो मानवी व्यवहार व त्यातून होणारे सामाजिक, राजकीय परिणाम यांचे तटस्थपणे परिशिलन करू शकत होता. त्यातूनच त्याने अनेक गोष्टी सहजपणे जाता जाता सांगितल्या आहेत. वरील त्याचे चिंतन त्याचाच एक भाग आहे. सत्ता, सरकार व त्याच्या नियंत्रणाखाली चालणारा समाज; यांच्यात संघर्ष कुठून येतात, त्याचे इतके सुंदर विश्लेषण राजकीय जाणकारालाही करता येणार नाही. इथे आईनस्टाईनने नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. आपल्या वाहिन्यावर किंवा वृत्तपत्रातुन बौद्धिक कसरती करणार्‍या अभ्यासकांना ज्या रोगाचे निदानही करता आलेले नाही, त्याची नेमकी कारणे आईनस्टाईन या एका वाक्यात सांगतो आहे.

   आज भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशात कायमस्वरूपी अस्वस्थता व अशांतता अनुभवास येते आहे. बेचिराख झालेल्या अफ़गाणिस्तान व अराजकातच जगणार्‍या पाकिस्तानपासून थेट सुसंपन्न युरोपीयन देशातही अशी अस्वस्थता आढळून येत आहे. त्याचे जेवढे विश्लेषण व कारणमिमांसा राजकीय जाणकारांनी करून उत्तरे शोधली, त्यातून चांगले परिणाम मिळण्यापेक्षा परिस्थिती अधिकच बिघडत गेलेली दिसते आहे. भिक नको पण कुत्रा आवर किंवा रोगापेक्षा औषध भयंकर असे आपल्या मराठीत म्हणतात, तशी आजच्या मानव जगाची अवस्था झालेली आहे. आणि त्याला दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नसून तिथल्या नेते व राजकीय अभ्यासकांच्या उपायांनी ही दुर्दशा केलेली आहे. पण त्याची खरी कारणे शोधण्यापेक्षा त्यांनी त्याच उपायांचा अधिक जालिम डोस जनतेला पाजण्याचा अट्टाहास चालविलेला आहे. त्यातून प्रश्न संपण्यापेक्षा ते अधिकच वाढले आहेत व अधिकच जटील होत चालले आहेत. त्यातून प्रत्येक सत्ता व तिथल्या कायद्यांनीच अराजकाची परिस्थिती आणली असेच म्हणावे लागते आहे. आणि आईनस्टाईन तेच तर म्हणतो. जे कायदे अंमलात आणता येत नाहीत, तसेच कायदे संमत करणे कायद्याच्या राज्याचा व सरकार विषय़ीच्या विश्वासाचा विध्वंस करते; असे तो म्हणतो. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच, की लोकांचा कायद्याच्या राज्यावरील विश्वासच उडत असतो.

   आता जरा आपल्या देशातील परिस्थिती बघूया. गेला महिनाभर सर्व वाहिन्यावर आणि वृत्तपत्रातून आमिर खान या लोकप्रिय अभिनेत्याच्या एका टीव्ही कार्यक्रमाचे वारेमाप कौतुक चालले आहे. यातून आमिर प्रथमच छोट्या पडद्यावर येणार असल्याने त्याचा गाजावाजा होणे स्वाभाविक आहे. जाहिरातही होणारच. पण इथे एका कार्यक्रमाला चळवळीचे रूप देण्याचा या प्रसिद्धीतून पद्धतशीर प्रयत्न झाला आहे व होतो आहे. आज टीव्हीवर त्याच्या "सत्यमेव जयते" या मालिकेचा चौथा भाग प्रक्षेपित होईल. मागल्या तीन रविवारी त्याने भारतीय समाजाला भेडसावणार्‍या तीन महत्वाच्या विषयावर उहापोह केला आहे. अत्यंत सोप्या व साध्या भाषेत व पद्धतीने आमिरने गहन विषयाकडे भारतीयांचे लक्ष वेधले आहे. एका बाजूला कुठल्याही गंभीर विषयाची सनसनाटी माजवून त्याचे गांभिर्य संपवणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या जमान्यात, मनोरंजन करण्यात आयुष्य घालवणार्‍या आमिरने सामाजिक विषयाचे गांभिर्य काटेकोरपणे मांडायचा केलेला उत्तम प्रयत्न, पाठ थोपटण्य़ासारखाच आहे. त्याच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने अशा गंभीर विषयाकडे लोकांचे लक्ष हळुवारपणे वेधल्याने समाजाला संवेदनाशील बनवणे व अंतर्मुख करणे शक्य होणार; ही त्यातली जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते या मालिकेचे ते ऐतिहासिक यश आहे असेच म्हणावे लागेल. पण त्यातून लोकांना गंभीर व्हायला भाग पाडणारा जो परिणाम आहे, तो प्रेरणादायी कितपत होईल? बोचणारे, टोचणारे सत्य लोकांसमोर सहजगत्या आणले जाते व लोकांना अंतर्मुख व्हायला ते पुरेसे जरूर आहे. पण असा माणुस जेव्हा अंतर्मुख होतो, तेव्हा त्याला एकटा सोडुन विचार करायला सवड द्यायला हवी, ती दिली जाते आहे काय? की त्यातून धंदा मिळवण्यासाठी चाललेली धा्वपळ त्या यशावर पाणी ओतते आहे?

   ६ मे रोजी अमिरने पहिला भाग प्रक्षेपित केला. तो स्त्रीभृणू हत्येचा होता. त्यातून भारतीय समाजात घटणार्‍या मुलींच्या प्रमाणावर व त्याच्या सामाजिक दुष्परिणामांवर त्याने छान बोट ठेवले. तेवढेच नाही तर त्यासाठी जे कायदे केले आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना भेटुन पत्र देण्याची बूमिका घेतली. प्रेक्षकांनी त्याचे समर्थन करण्यासाठी एक मोबाईल संदेश पाठवावा व त्याचे पैसे सामाजिक कार्यासाठी दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. राजस्थानचे मुख्यमंत्रीसुद्धा त्यावर बेहद्द खुश होते. आमिर कधी भेटायला येतो यासाठी ते उत्सुक होते. तसे त्यांनी पत्रकारांना सांगितले सुद्धा. मग ती भेट झाली व मुख्यमंत्र्यांनी आमिरला आश्वासनही दिले. तोवर दुसरा रविवार उजाडला आणि आमिरने तेवढाच काळजाला हात घालणारा दुसरा विषय मांडला. बालकांचे लैंगिक शोषण असा तो विषय होता. मग त्यासाठी कायदे अपुरे आहेत व नवा कायदा संसदेत अनिर्णित पडून असल्याची माहिती देऊन पुन्हा लोकांच्या पाठींब्यासाठी मोबाईल संदेश पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. आमिरच्या त्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाने अशा क्षेत्रात काम करणार्‍या संस्थाकडे लोकांचे लक्ष गेले व त्यांना लोक प्रचंड प्रतिसाद देऊ लागले. तोवर तिसरा रविवार उजाडला. वरदक्षिणा किंवा हुंडा या जाचक कालबाह्य प्रथेवर हल्ला करीत आमिरने पुन्हा लोकांना चकित केले. आज चौथ्या रविवारी तो कुठला विषय घेतो ते मला ठाऊक नाही. पण त्याने समाजाला भेडसावणारे गंभीर विषय अत्यंत नाजूक तेवढ्याच समर्थपणे मांडले हे कोणी नाकारू शकणार नाही.

   पण मुद्दा आहे तो परिणामांचा. मला आठवते, त्याने पहिल्या भागात स्त्रीभृणूहत्या थांबवण्यासाठी आपल्याकडे जादूची छडी असल्याचा दावा केला होता. ती कितीशी उपयोगी पडली आहे? ती जादूची कांडी काय आहे? तर त्याने स्त्रीभृणू हत्येच्या विरोधात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना एक अर्ज देण्याचा पवित्रा घेतला होता. अशा प्रकरणात ज्या पत्रकारांनी छुप्या कॅमेराने माहिती गोळा केली, त्यासंबंधातले खटले एकत्र चालवण्यासाठी एकाच फ़ास्ट कोर्टात काम व्हावे असे त्याने म्हटले होते. त्याचा इतका गाजावाजा माध्यमांनी केला, की जणू आता ही समस्या निकालात निघाली असेच कोणालाही वाटावे. कारण मग महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही आमिरला पत्र लिहून या कामी मदत करण्याची विनंती त्याला केली होती. आमिर त्यांना कसली मदत करणार होता? त्याने एक अर्ज घेऊन आपल्याकडेही यावे, असे महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना वाटत होते का? की आमिरने अर्ज दिला मग स्त्रीभृणू हत्या आपोआप जादूची कांडी फ़िरल्याप्रमाणे थांबतात, असेच या आरोग्यमंत्र्यांना वाटते? कारण आमिरने अर्ज दिला किंवा नाही दिला तरी त्यांना कायदा, कारवाईचे अधिकार देतच असतो. कायद्याला आमिरच्या पत्राची वा अर्जाची गरज नाही. हे आरोग्यमंत्र्यंना ठाऊक नाही काय? कारण हे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आमिरला पत्र लिहित होते, तेव्हा त्यांच्याच अधिकारक्षेत्रात डॉ. सुदाम मुंडे नावाचा एक सैतान परळी वैजनाथ या शहरात अशा हत्याकांडाचा धुमाकुळ घालत होता. नुसती स्त्रीभृणूहत्याच करत नव्हता; तर त्यातले मृत अर्भक कुत्र्यांना खाऊ घालण्याचा राक्षसी प्रकार करत होता. त्याच्या मुसक्या बांधायला मंत्री शेट्टी, सरकार, तिथले प्रशासन, पोलिस यांचे हातपाय कोणी बांधून ठेवले होते काय? आणि आमिरखान येऊन त्यांचे बांधलेले हातपाय सोडणार होता काय? नसेल तर ते आमिरची मदत कशाला मागत होते?

   आमिरने जो विषय मांडला त्याला पायबंद घालण्यासाठी खुप कायदे आधीच केलेले आहेत. सवाल आहे तो त्यांच्या अंमलबजावणीचा. ज्यांच्यावर हे कायदे राबवण्याची जबाबदारी सोपवली आहे, तेच कुचराई करतात ही खरी समस्या आहे. आपल्या देशात अनेक कठोर व प्रभावी कायदे आहेत. पण ते राबवणारी यंत्रणा तरी नाही, किंवा असली तर पुरेशी नाही. किंवा जी आहे तिला कायदा राबवण्याच्या अनिच्छेने पछाडलेले आहे. आणि आईनस्टाईन त्याच रोगाचे निदान करतो आहे. राबवता न येणारे कायदे जेव्हा संमत केले जातात, तेव्हाच लोकांचा कायदा व सरकारवरचा विश्वास उडत असतो, असे तो म्हणतो. आमिरने जी समस्या मांडली ती नवी नाही. आज तिचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत. जर त्यासंबंधी कायदा झाला तेव्हापासून त्याचा काटेकोर व कठोर अंमल झाला असता; तर ही समस्या आज इतकी भीषण स्वरूप धारण करू शकली नसती. पण ते झाले नाही. कारण कायदा करायचा व लोकांच्या तोंडाला पाने पुसायची, ही सरकारी वृत्ती आजची खरी समस्या झाली आहे. आणि जे कायदा राबवत नाहीत वा हातपाय हलवतसुद्धा नाहीत, त्यांच्याकडेच अर्ज घेऊन जायची भाषा आमिर जादूप्रमाणे वापरू बघतो, तेव्हा गंमत वाटते. त्याने राजस्थानच्या मुख्यमंत्र्याला भेटून अर्ज देण्याचे प्रयोजनच काय? ते व तसे अर्ज शेकडो लोक रोजच्या रोजच करत असतात. असे हजारो लाखो अर्ज सरकरी दफ़्तरात कितेक वर्षे धुळ खात पडले आहेत. मग त्यात आणखी एका अर्जाची वा कागदाची भर घालणे, हा उपाय कसा असू शकतो? आमिरसारख्या नावाजलेल्या माणसाला भेटण्यात मुख्यमंत्र्याला उत्सुकता आहे, त्याने आणलेल्या समस्या सोडवण्यात नाही. म्हणूनच आमिरने अर्ज देण्याची गरज नाही, की त्यासाठी लोकांच्या सह्या वा संदेश गोळा करण्याची गरज नाही. त्याच्या प्रतिष्ठेचा त्याने वेगळ्या प्रकारे वापर केला पाहिजे.

   मुख्यमंत्र्याची भेट सामान्य माणसाला आयुष्यभर प्रतिक्षा करूनही मिळत नसते. मग तो सामान्य माणुस त्या सत्ताधीशाला जाब तरी कसा विचारणार? म्हणुनच ते काम ज्याला अशी भेट सहज मिळते, त्याने विचारला पाहिजे. आमिरने विचारला पाहिजे. त्याने मुख्यमंत्र्याला अर्ज देण्यापेक्षा इतकी वर्षे पुरावे असलेली प्रकर्रणे कोर्टात धूळ खात का पडली आहेत, असे खडसावून मुख्यमंत्र्याला विचारायला हवे होते. जे काम लोकांनी सत्ता हाती देऊन तुमच्याकडे सोपवले आहे, ते न करता तुम्ही झोपा काढता आहात काय, असे आमिरने विचारले असते तर? जो कायदा आहे व त्याच्यासाठीचा अंमलदारही आहे. पण तो काहीच करत नाही, तेव्हा त्याला आणखी एक अर्ज देणे काय कामाचे?

   परळीच्या डॉ. सुदाम मुंडे यांच्या विरोधात असे अनेक पुरावे व साक्षिदार सामाजिक संस्थांनी जमवले, त्याचे चित्रण केले, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर खटले भरले. पण पुढे काहीच झाले नाही. म्हणजेच आमिरच्या अर्जाची काय विल्हेवाट लागणार आहे, ते डॉ. मुंडे यांचा इतिहास पाहिला तरी कळू शकते. सवाल इतकाच आहे, की आमिरसुद्धा शो व देखावा करतो आहे काय? ज्या मार्गाने प्रश्न वा समस्या सुटलेल्या नाहीत, त्याच मागाने त्या सुटू शकतील; असे भासवण्याचा तर त्याचा प्रयत्न नाही? "हंगामा खडा करना मेरा मक्सद नही" असे त्याच्या मालिकेच्या जाहिरातीतून तो म्हणतो. पण मागल्या तीन आठवड्यात हंगामा खुप झाला, मात्र साध्य काय झाले हा प्रश्नच आहे. उलट त्या हंगाम्याखाली सत्य दडपले जाते आहे काय; अशी शंका घ्यायची वेळ आली आहे. आणि परळीचे डॉ. मुंडे प्रकरण त्याची साक्ष आहे. गेली अनेक वर्षे हा डॉक्टर राजरोसपणे कायदा धाब्यावर बसवतो आहे, त्याच्या विरोधात आलेल्या तक्रारी व गुन्हे यात पोलिस व सरकारी यंत्रणा चुप आहे. तेवढेच नाही तर कायद्याने दाद मागू पहाणार्‍यांना अंमलदारच धमकावतात, अगदी राज्याचे आरोग्यमंत्रीही हतबल असल्याची कबुली देतात. कायद्याच्या कचाट्यातून आरोपी मुंडे कसा सुटेल, याची काळजी प्रशासनच घेते. अशी अवस्था असताना आमिर त्याच प्रशसन व सरकारकडे जायचे आवाहन लोकांना करतो आहे, ही बाब चमत्कारिक नाही काय? जे सत्ताधारी हवे तेवढे कठोर कायदे बनवतात. पण त्यांचा अंमल होणार नाही अशीही व्यवस्था करतात, त्यांच्या नाकर्तेपणावर विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा आमिरचा मानस आहे काय? त्याच्या या नव्या मालिकेचा हेतू काय आहे? त्यातले सत्य काय आहे?  

   कायद्याच्या मार्गाने व संसदिय मार्गाने न्याय मिळतो ही लोकांची समजूत हळुहळू संपत चालली असताना, आमिर सत्यमेव जयते असे कशाच्या आधारे सांगतो आहे? परळीच्या डॉ. सुदाम मुंडे प्रकरणाचा इतिहास पाहिला, तर सत्यमेव हरते याचीच ग्वाही मिलते. आमिरचा कार्यक्रम ६ मे रोजी प्रक्षेपित झाला. त्याचा खुप गाजावाजा झाला. तरीही परळीमध्ये स्त्रीभृणुहत्येचा व्यापार राजरोस चालूच होता. तेवढेच नाही तर त्यासाठी केलेल्या गर्भपातामध्ये एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. पण तरी कायदा हातापाय हलवू शकला नाही. जेव्हा त्या घटनेचा गवगवा झाला व मृत महिलेचे नातलग जमू लागले, तेव्हा त्यांच्या तावडीत हा डॉक्टर सापडू नये म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मग तो संतप्त नातेवाईकांचा जमाव पांगल्यावर त्याला जामीनावर सोडून दिले. माध्यमांनी गदारोळ केल्यावरही प्रशासन व पोलिस शांत होते. त्या गुन्हेगाराला पळून जाण्याची पुर्ण संधी देण्यात आली. मगच त्याला फ़रारी घोषित करण्यात आले. माध्यमांनी त्यावर खुप गदारोळ केला नसता, तर ही भानगड चव्हाट्यावर आलीच नसती. कायद्याचे अंमलदार व प्रशासन आणि गुन्हेगार यांच्यातले हे उघड साटेलोटे जगाला कळलेच नसते. आजवर कळले नव्हते. कारण मुंडे यांचा हा पहिलाच गुन्हा नाही. अनेक वर्षे त्यांचा हाच उद्योग चालू आहे. त्याबद्दल तक्रारी झाल्या आहेत, त्यांना अटक झाली आहे. खटले चालू आहेत. पण तरीही त्यांची गुन्हेगारी थांबलेली नाही. मग सत्य काय आहे? यातले सत्यमेव काय आहे? त्याचा विजय झाला आहे काय? यात न्याय मिळावा व स्त्रीभृणूहत्या थांबावी, म्हणून अखंड लढत आहेत, त्यांना या एका प्रकरणात तरी सत्याचा विजय झाल्याचे समाधान मिळू शकले आहे काय? नसेल तर आमिर अर्ज द्यायला निघतो आणि पाठींब्यासाठी मोबाइल संदेश पाठवायचे आवाहन करतो त्यातले सत्य काय आहे?

   काही लाख लोकांनी संदेश पाठवले हे सत्य आहे. आमिरच्या या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली हे सत्य आहे. त्या लोकप्रियतेमुळे त्याचे प्रक्षेपण करणार्‍या वाहिनीला मोठ्या संख्येने प्रेक्षक मिळाला हे सत्य आहे. त्या मालिकेसाठी करोडो रुपयांचा मोबदला आमिरला मिळाला हे सत्य आहे. त्याच्या मालिकेचे प्रयोजन करणार्‍या रिलायन्स फ़ौंडेशनला प्रतिष्ठा मिळाली हे सत्य आहे. त्यात सहकार्य करणार्‍या मोबाईल कंपनी व बॅंकेला नवा ग्राहक मिळाला हे सत्य आहे. पण या सर्व दर्दभर्‍या कथानकातील जे बळी आहेत, पिडीत आहेत, गांजलेले आहेत, त्यापैकी कोणाला न्याय मिळाला आहे? ज्या भृणूहत्येचा मामला त्याने उठवला, ते सत्र लगेच थांबावे असे कोणी म्हणणार नाही. पण जितक्या राजरोसपणे ते चालू होते, त्याला तरी पायबंद घातला गेला काय? डॉ. मुंडे यांनी कृतीतुनच नाही असे उत्तर दिले आहे. शासनानेही नाकर्तेपणातून नकारार्थी उत्तर दिले आहे. आणि तरीही आमची माध्यमे व वाहिन्या जोराजोराने आमिरच्या मालिकेचा "असर" झाल्याचे ढोल पिटत आहेत. मग यातले सत्य काय आहे? ’सत्यमेव जयते"चे ढोल पिटताना सत्यच पिटाळून लावले जात आहे काय?

   जे कायदे राबवायची कुवत नाही, इच्छा नाही, शक्यता नाही असे कायदे बनवणार्‍यांनी गमावलेला जनतेचा कायद्याच्या राज्यावरचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आमिरला पुढे केला आहे काय? त्याच्या दुसर्‍या प्रक्षेपणात बालक शोषणाचा कायदा संमत करण्याचा आग्रह होता. तो आठवड्याभरात संमत झाला. त्याची अंमलबजवणी तरी कधी होणार आहे? की नुसते कायदे बनवून जनतेच्या तोंडाला पाने पुसायची आणि त्याचा कधीच अंमल करायचा नाही म्हणजेच सत्यमेव जयते? कारण ज्या सत्तेकडून व सरकारकडून हे कायदे संमत करून घेतले जातात, पण कधीच राबवले जात नाहीत; त्यांचेही ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" असेच आहे ना? २००९ च्या निवडणुकीत शंभर दिवसात महागाई संपवण्याची भाषा करणार्‍या मनमोहन सरकारला परवाच तीन वर्षे पुर्ण झाली. महागाई कमी करणे दुरची गोष्ट झाली. तीन वर्षात महागाई आकाशाला जाऊन भिडली आहे. साधे पेट्रोल ४० वरून ८० रुपयापर्यंत भडकले. हे सत्य आहे. जे जिंकत नाही त्याला सत्य म्हणतात. म्हणूनच मग प्रश्न पडतो, सत्यमेव जयते म्हणजे नेमके काय होते?
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २७/५/१२ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा