सध्या कलानगरातील मातोश्री बंगल्याकडे थोरामोठ्यांची रिघ लागली आहे आणि कलानगरच्या गेटपाशी शिवसैनिकांनी ठाण मांडल्याने पोलिसांना हायवेकडून येणार्या रस्त्यावरील मुख्य वाहतुकीच रस्ताच बंद करावा लागला आहे. त्यातच वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या गाड्या आणि पत्रकारांचा घोळकाही अहोरात्र तळ ठोकून आहे. अशा गर्दीत एक छोटीशी बातमी अनेकांच्या नजरेत आलेली नसेल. पाकिस्तानचा जुना क्रिकेटपटू जावेद मियांसाद याने बाळासाहेबांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून व्यक्त केलेल्या शुभेच्छा. त्यानेच नाही तर पाकिस्तानच्या क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख झका अश्रफ़ यांनीही अगत्याने तेच काम केले आहे. ज्यांच्यावर बाळासाहेबांनी अखंड आगपाखडच केली, त्यांनीही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना कराव्यात, ही किमया करणार्याला जग शिवसेनाप्रमुख म्हणून ओळखते. काही वर्षापुर्वी मियांदाद भारतात आला, तेव्हा त्यांना मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटला होता. त्याने एक वाहिनीशी बोलताना त्याच जुन्या आठवणींना उजाळा दिला. वादावादीची गोष्ट बाजूला ठेवून बाळासाहेबांनी कौटुंबिक जिव्हाळ्याची बातचित कशी केली, तेच त्याने सांगितले. पाकिस्तानी क्रिकेट व त्यांचे भारतातील दौरे यांना विरोध केल्याने ही दखल घेतली जात असेल, असे कोणालाही वाटेल. पण तेवढ्यापुरती ही किमया मर्यादित नाही. काही महिन्यांपुर्वी पाकिस्तानच्या पत्रकारांचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौर्यावर आले होते. त्यांनी सांगितलेले किस्से तेवढेच महत्वाचे आहेत.
तेरा पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुंबई-पुण्याचा दौरा केला होता. तेव्हा मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांची भेट घेतलेल्या या पाक पत्रकारांनी इथल्या पत्रकारांशी वार्तालाप केला होता. त्यातही शिवसेनाप्रमुखांचा विषय निघालाच. हल्ली बाळासाहेब खुप गप्प असतात, त्यांच्याकडून काही ऐकायला मिळत नाही; असे पाक पत्रकारांनी सांगितले होते. आणि इथे आलेले असताना त्यांनी बाळासाहेबांचे पाक सरकारवर खुप दडपण असते; असेही सांगायला मागेपुढे बघितले नाही. पाक जनतेमध्ये या माणसाबद्दल मोठेच कुतूहल आहे, अशीही माहिती त्या पत्रकारांनी दिली होती. ‘हिंदुत्त्वाचा पुरस्कार आणि पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करणा-या बाळासाहेबांबद्दल पाकमधील जनतेला प्रचंड कुतूहल असल्याचे ब-याचदा जाणवले होते. भारतातील शिष्टमंडळे पाकमध्ये गेली की, बाळासाहेब कोण आहेत, कसे आहेत, ते कुठे राहतात, एवढे बिनधास्त कसे काय बोलू शकतात, असे अनेक प्रश्न तिथले लोक विचारत. पण आता, बाळासाहेबांच्या फारशा सभा होत नाहीत. ते पूर्वीइतके जहाल बोलत नाहीत. असे असले तरीही, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांबद्दल पाकिस्तानात जरा दबकूनच बोलले जाते.’ हे शब्द आहेत पाकिस्तानी पत्रकारांचे.
असे त्यांना का वाटावे? आणि इतक्या दूर पाकिस्तानातल्या लोकांना व पत्रकारांना, बाळासाहेब हल्ली जहाल वा फ़ारसे बोलत नाहीत याची जाणीव होत असेल, तर त्यांच्यावर अपरंपार प्रेम कारणार्या शिवसैनिक वा मराठी माणसाला त्यांचे मौन कसे सहन होईल? गेल्या नवरात्र उत्सवाची सांगता होत असतांना शिवाजी पार्कवर सेनेचा जो वार्षिक मेळावा झाला, त्यात त्यांची अनुपस्थिती लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणारी का ठरली; त्याचे उत्तर या दोन बातम्यांमध्ये सामावलेले आहे. तशी त्यांनी शारिरीक अनुपस्थिती शिवाजीपार्कला होती. त्यांचे चित्रित भाषण दाखवण्यात आले. पण ज्यांनी कित्येक वर्षे त्यांना दस्रर्याच्या मेळाव्यात समोर बघितलेले आहे व ती परंपराच बनवलेली होती, त्यांचे समाधान चित्रण पाहून कसे व्हावे? त्यांनी बोलायला उभे रहावे आणि समोरच्या गर्दीने एका सूरात ‘आवाज कुणाचा’ अशी डरकाळी फ़ोडावी; ही प्रथाच झाली होती. तिथे थकल्याभागल्या आवाजात बोलणार्या साहेबांचे चित्रण कोणाचे समाधान करणार होते? अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले ते त्यामुळेच. कारण त्यांना समोर पडद्यावर साहेब दिसत होते, ते बोलतही होते, पण त्यातला आवाज थकलेला व दमलेला वाटत होता. जो आवाज व जे शब्द हजारो मैल दूर पाकिस्तानात जाऊन लोकांच्या मनात धडकी भरवतात, तेच शब्द व तोच आवाज ओळखीचा वाटत नव्हता, म्हणून शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आपल्या शब्दांनी अनुयायांच्या मनात अंगार पेटवणार्या माणसाच्या थकल्या आवाजाने त्याच शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आणले होते.
त्यांच्याच कशाला माझ्या पत्नीला, स्वातीच्याही डोळ्यात गुरूवारी त्यांच्या आठवणीने अश्रू आले. तशी तिची त्यांची एकदाच भेट झालेली. सहा वर्षापुर्वी तिने ‘इस्लामी दह्शतवाद: जागतिक आणि भारतीय’ असे पुस्तक लिहिले, त्याचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते मातोश्रीमध्ये झालेले. तेवढीच तिची त्यांची भेट. ते पुस्तक लिहून झाल्यावर स्वाती मला म्हणाली हे पुस्तक मी बाळासाहेबांना अर्पण करणार आहे. कारण त्यांच्या भाषणातून स्फ़ुर्ती घेऊनच माझे विचार व अभ्यास या पुस्तकात आलेला आहे. तसा मी तीन वर्षे ‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक म्हणुन काम केले. पण पत्नी व परिवाराला साहेबांना भेटवण्य़ाचा योग कधीच आला नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिला साहेबांना भेटता आले. त्यांनाही अशा विषयाचा स्वातीने इतका गाढा अभ्यास केल्याचे खुप कौतुक होते. त्यांनी ते बोलूनही दाखवले. हीच त्या माणसाची जादू होती. कधीच मोजूनमापून शब्द वापरण्याचा त्यांचा स्वभावच नाही. आम्ही तिथे पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो. पण त्यांचा काय मूड लागला कोण जाणे, त्यांनी साठसत्तर वर्षे जुन्या प्रबोधनकार व त्यांच्या मित्रमंडळीचे अनुभव सांगायला सुरूवात केली. सगळेच अवाक होऊन ऐकत होते. तब्बल सव्वा तास त्या गप्पात सगळे रंगले, अखेरीस मी त्यांना प्रकाशनाची आठवण करून दिली. तर म्हणाले, ‘हल्ली असेच होते बघ. काही गोष्टी विसरायला होते.’ त्यात व्यंग होते आणि ते सहज बोलून गेले होते. व्यंग अशासाठी, की खुप जुन्या आठवणी सांगत होते आणि विसरायला होते असेही सांगत होते.
पण तोच त्यांचा स्वभाव होता आणि असे मी अनेकदा अनुभवले होते. अनेकदा त्यांना भेटायचा योग आला. मार्मिक’चे काम करताना किंवा नंतरही अनेकदा केवळ गप्पा ठोकायला ते बोलावून घेत. मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे. तसा मी सामान्य पत्रकार व कसलेही महत्वाचे काम घेउन त्यांच्याकडे कधीच गेलो नाही. पण जेव्हा जायचो वा त्यांनी बोलावले तर तास दोनतास सहज गप्पा मारायचे. मग लोकांची येजा चालू असली तरी त्यांना फ़रक पडत नसे. युतीची सत्ता आली तेव्हा मी एकच परिचित असा असेन, की कुठलेही काम करून घ्यायला गेलो नाही. त्याबद्दल त्यांनी उपरोधिक बोलूनही दाखवले होते. ‘झोळी खांद्याला लावून भिका मागत फ़िरतोस, आपले सरकार येऊन काय फ़ायदा?’ पण का कोण जाणे मला त्या माणसाकडे काही मागावेसेच वाटले नाही. आपल्याला वेळ देतो आणि गप्पा मारायला अगत्याने बोलावतो, यातच मोठे काही वाटले. आणि असे वाटण्याचेही कारण होते. त्यांच्याकडे उद्योगपती, क्रिकेटर, मंत्री वा आमदार, खासदार, कलावंत असे कोणीही बसलेले असत. पण त्यांचा गप्पांचा मुड असेल तर त्यांनी मला बसवून ठेवलेले असे. कधीकधी त्या अन्य पाहुण्यांना ओशाळल्यागत वाटायचे. कारण माझ्यासारखा गबाळा माणूस तिथे असायचा. पण त्यांच्या अस्वस्थतेला साहेबांनी कधी दादच दिली नाही. एकदा एका मित्राच्या आग्रहास्तव त्याचा दिवाळी अंक त्यांना द्यायला गेलो होतो, तेव्हाही त्यांनी थांबवून घेतले. तिथे पाकिस्तानचा सलामीचा फ़लंदाज मोहसिन खान त्यांना भेटायला आलेला होता. आणखीही काही मोठे लोक होते. आता त्याला भाऊ तोरसेकर नावाचा कोणी मराठी पत्रकार आहे, हे ठाऊक असायचे काय कारण होते? तर साहेब त्याला म्हणाले, ‘कमाल आहे, याला ओळखत नाहीस? हा मराठीतला अत्यंत आक्रमक लिहिणारा जहाल पत्रकार आहे.’ बिचार्या मोहसिनचा ओशाळलेला चेहरा मला अजून आठवतो.
हा विनोद नव्हता आणि नाही. माझी जहाल आक्रमक पत्रकारिता त्यांना आवडली, म्हणून पाकिस्तानी क्रिकेटरला मी कशाला ठाऊक असायला हवा? संबंधच काय येतो? पण त्यांना तसे वाटते. अत्यंत प्रामाणिकपणे वाटते. कारण या माणसामध्ये एक अगदी निरागस मुल दडलेले आहे. लहान मुल जशा निरागसतेने बोलते व वागते, तेवढी निरागस वृत्ती त्यांच्यामध्ये आजही आहे. त्यांनी स्वत:मध्ये दडलेले ते मुल कधी लपवले नाही, की त्याची गळचेपी सुद्धा केली नाही. जितक्या सहजतेने व्यासपीठावर उभा राहुन शिवसेनाप्रमुख म्हणुन ते बोलायचे; तेवढ्याच सहजपणे बंदिस्त खोलीत गप्पा करायचे. मीनाताईंचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर तीन आठवड्यांनी मी त्यांना गर्दी संपल्यावर भेटायला गेलो होतो. तर उशीर केल्याबद्दल त्यांनी तक्रार केली. मग इतरांना त्या दिवशी न भेटण्याचे ठरवून मला थांबवून घेतले. तेव्हा मातोश्री बंगल्याचे नुतनीकरण चालू होते आणि त्यांचे वास्तव्य हिंदू कॉलनीच्या एका इमारतीमध्ये होते. मी त्यांच्याकडे एकटाच गेलो नव्हतो. ‘पुण्यनगरी’चे मालक मुरलीशेठ शिंगोटेही माझ्या सोबत होते. त्या दिवशी गप्पा झाल्या नाहीत. जवळपास एकटेच साहेब बोलत होते. मीनाताईंच्या निधनाचा घटनाक्रम त्यांनी सविस्तर सांगितला. त्यांच्या अंत्ययात्रेचा आल्बमही दाखवला. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्यांना मनातले सगळे बोलून टाकायचे होते. पण ते ऐकणारा कोणतरी हवा होता. त्याची प्रतिक्रियाही त्याना नको असावी. स्वगत केल्याप्रमाणे ते बोलत होते, फ़ोटो दाखवत होते. दि्ड तासाने त्यांचे समाधान झाले. आणि अखेर त्यांनी एकच प्रश्न मला विचारला, म्हणजे मला बोलायची संधी दिली. ‘या दसर्याला सभा न घेण्याबद्दल तुझे मत काय आहे?’
मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. मी सामान्य पत्रकार आणि त्यांच्या संघटनेतला को्णीच नाही. मग त्यांनी मला हा प्रश्न विचारावाच कशाला? तेव्हा त्यांच्या डोळ्याचेही ऑपरेशन झाले होते. मीनाताईंच्या निधनाने ते कमालीचे विचलित झालेले होते. त्यामुळेच त्यावर्षीचा मेळावा रद्द करण्याच्या बातम्या चालू होत्या. पण मला कशाला विचारायचे? मी म्हटले सभा व्हायलाच हवी. मीनाताई सभेला यायच्या आणि व्यावपीठासमोर महिलांच्या गर्दीत पुढेच बसायच्या. कधी त्या व्यासपीठावर आल्या नाहीत. आणि त्यांच्या निधनासाठी सभाच रद्द? मला नाही पटत, असे मी बोलून गेलो. तर पुन्हा त्यांचा प्रश्न कायम. सभा व्हायलाच हवी? मीही माझ्या मतावर ठाम होतो. आणि खरेच सभा झाली, त्या रात्री त्यांनी अगत्याने फ़ोन करून विचारले; ‘सभेला आला होतास? कशी झाली सभा?’ मी उत्तरलो, टाळ्या घोषणा ऐकल्यात ना? मग कशी सभा झाली कशाला विचारता? तुम्ही तिथे उभे राहून बोलला म्हणजे झाले. शिवसैनिकांना तेच हवे असते. मग सभा यशस्वी होणारच. पुन्हा तेच. ‘तुझे समाधान झाले?’ कमाल आहे या माणसाची. माझ्या समाधानाचा विषय कुठे होता? पण मी होकारार्थी उत्तर दिले तेव्हाच त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणून फ़ोन ठेवला.
आणि असा मी एकटाच नव्हतो. असे अनेक भणंग त्यांनी जवळ केलेले होते. ज्यांची मते जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असायची. कदाचित माझ्यासारखा माणुस रस्त्याने पायपीट करीत चालतो, बस वा ट्रेनने प्रवास करतो. त्यामुळे लोकांच्या मनाचा अंदाज मला असू शकेल असे त्यांना वाटत असेल का? देवजाणे, पण त्यांच्या मताच्या विरुद्ध बोलत असूनही त्यांनी अनेकदा माझे बोलणे शांतपणे ऐकले होते. त्यावर शंकाही विचारल्या. आणि असाच एक अनुभव आहे. एकदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा खुप गर्दी होती. त्यांच्यासमोर एक भाजी विक्रेता महिला होती. बिचकत दबल्या आवाजात बोलत होती. तिला म्हणाले, चांगल्या चढ्या आवाजात बोल. मला दमात घेऊन बोल. माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वॉर्डात, मग घाबरून कशाला बोलतेस? मी काय घाबरायाला शिकवले का मराठी माणसाला?
एकीकडे अमिताभ बच्चन, उद्योगपती, परदेशी पाहुणे, बड्या मान्यवरांची मातोश्रीवर रेलचेल असायची आणि दुसरीकडे सामान्य गरजवंत माणसे झुंबड करून असायची. तिसरीकडे माझ्यासारखे कसलीही अपेक्षा नसलेले भणंग त्यांनी बोलावले म्हणुन जायचे. अशा सगळ्यांशी हा माणुस सारखाच कसा वागू शकतो, त्याचे रहस्य मला अजून उलगडलेले नाही. आणि उलगडले असेल तर त्यांच्यातली निरागसता एवढेच त्याचे उत्तर असू शकते. ज्याच्याकडे मोठमोठे उद्योगपती भेट मिळण्यासाठी प्रतिक्षा करत बसलेले आहेत; त्याने जुन्या कसल्या आठवणी माझ्यासारख्या भणंगाला सांगण्यात तास दिडतास खर्ची का घालावा, याचे उत्तर अवघड आहे ना? कदाचित येणारे काहीतरी मागायलाच येणारे असतील आणि एखादा तरी हात पसरायला न येणारा असावा; ही अपेक्षा माझ्याकडुन पुर्ण होत असावी काय? देवजाणे, पण हा माणूस अजब आहे एवढे मात्र खरे. कारण देशातल्या पत्रकारांना, राजकीय अभ्यासक, जाणकारांना त्याचा कधी थांग लागला नाही. पण इतक्या शहाण्यांना ज्याचे शब्द व भाषा कित्येक वर्षात कळली नाही, तोच माणून लाखो करोडो सामान्य लोकांना भुरळ घालू शकतो, हा चमत्कारच नाही काय? असामान्य पातळीवर जाऊन पोहोचलेला, पण सामान्य राहुन विचार करू शकणारा हा माणुस; आधुनिक युगातली एक दंतकथाच आहे. कारण त्यांच्याविषयी गेले दोनचार दिवस अनेक वाहिन्यांवर जे काही बोलले जात आहे, ते ऐकून मनोरंजन होते आहे तशीच चीडही येते आहे. ज्यांना त्या माणसाच्या यशाचे रहस्य उलगडता आलेले नाही, तेच त्याच्यावर भाष्य करत होते आणि ज्यांना तो माणूस अजिबात रहस्य वाटला नाही ते कलानगरच्या गेटपाशी ठाण मांडून बसले होते, किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते.
बाळासाहेबांची तब्येत बिघडल्याचे कळल्यावर त्यांना भेटायला मान्यवरांची रिघ लागली, त्यात अशोक पंडित या चित्रपट दिग्दर्शकाचाही समावेश होता. एका वाहिनीवरच्या चर्चेत भाग घेताना त्याने आपण ठाकरेविषयक आत्मियतेमुळेच तिकडे धावत गेलो, असे वारंवार सांगितले, पण दिल्ली विद्यापिठातील दिपंकर गुप्ता नावाच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापकाला ते अजिबात पटत नव्हते. जे कोणी प्रतिष्ठीत मान्यवर मातोश्रीवर जात होते; ते धाकापोटी व भयभीत होऊनच दहशतीखाली तिकडे हजेरी लावत होते, असा त्या प्राध्यापकाचा दावा होता. हे त्याचे मत कसे व कोणी बनवले होते? गेल्या चार दशकात पत्रकार आणि माध्यमांनी शिवसेना व ति्च्या सेनापतीविषयी ज्या काल्पनिक वावड्या उडवल्या आहेत, त्याचेच हे सर्व बुद्धीमंत बळी आहेत. वास्तविक बाळासाहेब ठाकरे व या बुद्धीमंतांच्या कल्पनेतील शिवसेनाप्रमुख यात प्रचंड तफ़ावत आहे. त्यातून बाळासाहे्व ठाकरे नावाची एक दंतकथा या चाळीस वर्षात तयार झाली आहे. त्याचेच हे परिणाम आहेत. हुकूमशहा, दहशतवादी, झुंडशाहीचा प्रणेता. अशी जी प्रतिमा माध्यमांनी तयार केली, त्याची माध्यमे जशी बळी आहेत, तसेच त्यावरच आपले ठाकरेविषयक मत बनवणारेही बळी आहेत. हत्ती आणि आंधळे अशी जी गोष्ट आहे, तशीच ठाकरे व माध्यमे-बुद्धीमंत अशी आधुनिक गोष्ट तयार झाली आहे. त्यात मग ऐकलेल्या व काल्पनिक गोष्टींचा भरणा अधिक झाला आहे. मग तिकडे पाकिस्तानात ठाकरे नावाचा वचक असतो आणि इथल्या बुद्धीवादी वर्गातही त्याच नावाचा भयगंड असतो. तो इतका भयंकर असतो, की खरेखोटे तपासायलाही आपले विचारवंत घाबरत असतात. आणि दुसरीकडे ज्याचे त्यांना भय आहे, तोच माणूस एका सामान्य भाजीवालीला म्हणतो, ‘घाबरू नकोस अगदी मलाही दमात घेऊन प्रश्न विचार.’ केवढा विरोधाभास आहे ना? पण गंमत अशी, की त्या विरोधाभासानेच या माणसाला एक दंतकथा बनवून सोडले आहे.
जेवढ्य़ा माणसांशी बाळासाहेबांबद्दल बोलाल, तेवढ्या दंतकथा ऐकायला मिळतील. जे त्यांना भेटले आहेत वा त्यांच्या सहवासात राहिले आहेत, त्यांच्या कथा आहेतच. पण ज्यांना त्या माणसाचा सहवास मिळाला नाही, पण सार्वजनिक जीवनात त्यांच्याशी दुरान्वये संबंध आलेला असेल, त्याच्याकडेही अशा ऐकलेल्या कथांचा संग्रह असतो. आणि दुसरीकडे ज्याच्याविषयी इतक्या दंतकथा रहस्यकथा आहेत, तो माणूस मात्र अशा सर्वच कथांपासून अलिप्त आहे. आपल्याबद्दल लोक काय बोलतात, त्याची बाळासाहेबांना काडीमात्र फ़िकीर नसते. इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचल्यानंतरही एक सामान्य माणसासारखा ते विचार करू शकतात व तसे वागूही शकतात. १९९७ सालात महापालिकेच्या निवडणुकांबद्दल त्यांच्या मनात शंका होती. पण तरीही मुंबईकराने त्यांना दगा दिला नाही. तर त्या विजयानंतर या माणसाने शिवाजीपार्कच्या मेळाव्यात व्यासपिठावरून चक्क समोरच्या जनसमुदायाला दंडवत घातला होता. एका अशाच विराट सभेत त्यांच्या भाषणापुर्वी कितीतरी वेळ फ़टाके वाजतच राहिले; तर चक्क बैठक मारून त्यांनी वैताग व्यक्त केला आणि अडवाणी, मुंडे, महाजन हे नेते बघतच राहिले होते. पण एक सत्य आहे, जे कोणी नाकारू शकणार नाही. हा गर्दीतला माणूस आहे आणि गर्दीवर त्याने अफ़ाट प्रेम केले. त्या दिवशी दसरा मेळाव्यात समोर गर्दी नसताना चित्रित केलेल्या भाषणात, समोर गर्दी नसल्याची व्यथा त्यांना लपवता आली नव्हती. आपण थकलो व शरीर साथ देत नाही हे मनमोकळेपणाने लोकांना सागताना त्यांनी किंचितही आढेवेढे घेतले नाहीत. आणि काय चमत्कार बघा, दसरा संपून दिवाळी चालू असताना त्यांचीच तब्येत बिघडली तर अवेळ असूनही गर्दी त्याच्या दारापर्यंत चालत आली. बाळासाहेब ही अशी गर्दीची एक दंतकथा आहे. इतक्या विपरित परिस्थितीतही तो माणूस अजून गर्दीतच रमला आहे. त्यांचा आवाज ऐकायला ती गर्दी तिथे हटून बसली होती आणि ‘आवाज कुणाचा’ अशी आपल्या लाडक्या शिवसैनिकांची घोषणा कानावर येण्यासाठी तो गर्दीचा सम्राट बंदिस्त बंगल्यात आजाराशी झुंजत होता काय?
bhau sir, thumhi bhagyawan ahat. tumhala balasahebancha sahavas labhla. hinduhruday samratala shradhanjali.
उत्तर द्याहटवाlekh khup apratim ahe. tumhi hi titkyach niragastene lihile ahe.
jan mansachya manavar ADHIRAJYA karnara RAJA aplya tun nigun gela tari tyanche vichar, tyanchya vishye anubhav anga varti kata ubha kartayat
उत्तर द्याहटवाआयुष्यात राहातात त्या आठवणी !
उत्तर द्याहटवाभाउ, हा लेख मी सलग वाचुच शकलो नाही..
उत्तर द्याहटवाप्रत्येक पॅराला डोळे भरून यायचे..
साहेब..
भाउ, हा लेख मी सलग वाचुच शकलो नाही..
उत्तर द्याहटवाप्रत्येक पॅराला डोळे भरून यायचे..
साहेब..