शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

मोदी अडवा(आ)णी, नितीशकुमार जिरवा

 

  पुढल्या सार्वत्रिक निवडणूकांना अजून वीस महिन्यांचा कालावधी बाकी आहे. दरम्यान अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. पण प्रत्येक राजकीय पक्ष २०१४ सालाकडे नजर लावूनच आपले डाव खेळतो असेच वाटते आहे. अगदी जे थेट संसदेच्या राजकारणात आज नाहीत व ज्यांना तशी आशा नाही तेसुद्धा त्यात लुडबुडताना दिसत अहेत. उलट ज्यांना त्या शर्यतीत ख्ररी संधी आहे असे मानले जाते; त्यांनी मात्र तिकडे पाठ फ़िरवल्याप्रमाणे त्यांचे वागणे आहे. कॉग्रेसने दिर्घकाळ राहुल गांधी यांना पुढल्या लोकसभेत पंतप्रधान बनवण्याचा मनसुबा मागल्या निवडणुकीतच बांधला होता. दिल्लीची सत्ता दुसर्‍यांदा काबीज केल्यापासून तशी मांडणी सुद्धा केली होती. त्यानुसारच राहुल यांनी आधी बिहार व नंतर उत्तरप्रदेशात जोरदार मुलुखगिरी केली. त्याचे कारणही स्पष्टच होते. जोवर या दोन उत्तरेतील हिंदी भाषिक राज्यात कॉग्रेस आपला भक्कम पाया पुन्हा निर्माण करत नाही, तोवर तिला लोकसभेत बहुमतच्या जवळ पोहोचणे शक्यच नाही. आणि स्वत:चे बहूमत असल्याशिवाय गांधी घराण्याला हुकूमत गाजवणे अशक्य वाटते. म्हणूनच त्यांनी बिहार उत्तरप्रदेशमध्ये युवराजांना मोकाट सोडले होते. पण त्यांनी इतका अतिरेक केला, की लोकसभेत ज्या सदिच्छा कॉग्रेसने मिळवल्या होत्या त्या विधानसभा निवडणुकीत गमावल्या. अगदी रायबरेली व अमेठी या आपल्या बालेकिल्ल्यातही त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यानंतर राहुल गांधी जवळपास विजनवासातच गेले आहेत. तर लागोपाठच्या घोटाळे व अण्णा-रामदेवांच्या आंदोलनाने कॉग्रेस मेटाकुटीला आली आहे. त्यामुळेच स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार आता कॉग्रेसने सोडला आहे. आहे तीच आघाडीची सत्ता टिकवण्याची धडपड सुरू आहे.

   या २०१४ च्या शर्यतीमधला दुसरा स्पर्धक अर्थातच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा आहे. पण जे तिकडे राहुळ गांधींचे झाले, तेच इकडे भाजपाच्या अनेक उतावळ्या नेत्यांचे झाले आहे. त्यातले अनेक भाजपा नेते अजून १९९५-२००० या कालखंडातून बाहेर पडू शकलेले नाहीत. तर त्यांचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आपली मुले शोभतील अशा पोरांमध्ये लुडबुडत आहेत. आपल्याला बॅटींग मि्ळाली नाही तर चेंडू किंवा बॅट घेऊन निघून जाणार्‍या पोरासारखे त्यांचे वागणे चकीत करून सोडणारे आहे. मागल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएने त्यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवले होते. पण दोन दशकापुर्वी केलेल्या रथयात्रेच्या कालबाह्य भ्रमातून अडवाणी अजून बाहेर पडू शकलेले नाहीत. त्यांनी साडेतीन वर्षापुर्वी तोच रथयात्रेचा खेळ केला आणि तो फ़सला तरी त्यांनी गेल्या वर्षी पुन्हा तेच नाटक केले. त्याचीही चांगलीच फ़सगत झाली. २००९ च्या निवडणुकीतला पराभव पचवून बाजूला होण्याचे शहाणपण त्यांना अजून सुचलेले नाही. उलट नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले, तेव्हापासून अडवाणी लहान मुलांना लाजविल असा पोरकटपणा करू लागले आहेत. गतवर्षी त्यांनी अण्णा हजारे यांच्या रामलिला मैदानावरील उपोषणानंतर भ्रष्टाचार विरोधी रथयात्रा काढली होती. तेव्हा त्यांनी मोदींना शह देण्यासाठी यात्रेची सुरूवात गुजरात ऐवजी बिहारमधून केली. आजवरच्या त्यांच्या सर्वच यात्रा गुजरातमधून सुरू झाल्या होत्या. पण मोदींना त्यांची जागा दाखवताना निदान आपली जागा कोणती, ते तरी अडवाणींना नक्की ठाऊक असायला हवे होते ना? कित्येक वर्षे ते गांधीनगर गुजरातमधून निवडून येत आहेत. मग मोदींची पंगा घेऊन ते लोकसभेत जाणार कसे? आणि लोकसभेत जायचाच मार्ग बंद झाला, असेल तर पंतप्रधान पदावर दावा करणार कसे?

   राहिला मुद्दा भाजपा नावाच्या पक्षाचा. आज जे कोणी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी म्हणुन वावरत असतात, ते बहुतेक अडवाणी यांचेच चेले आहेत. त्यामुळे त्यांना ज्येष्ठतेचा मान आहे. पण तो मान फ़क्त आशीर्वाद देण्यापुरता असावा, अशीच त्यांच्या चेल्यांची अपेक्षा आहे. शिवाय हे तमाम चेले एकमेकांचे पाय ओढण्याच्या डावपेचात अडवाणी आपल्या बाजूने असावेत अशी अपेक्षा करत असतात. यापेक्षा अडवाणी यांना भाजपामध्ये महत्व उरलेले नाही. त्यामुळेच त्यांनी आपली आजवरची मिळवलेली प्रतिष्ठा नको त्या स्पर्धेत मातीमोल केली म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचे तर अडवाणी हे दिल्लीच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरचे केशूभाई पटेल बनत चालले आहेत. मोदी हा केशूभाईंचाच चेला. पण आज त्यांना चेल्याचेच यश बघवत नाही. अडवाणींची अवस्था वेगळी वाटत नाही. तिकडे केशूभाई मोदीला संपवण्यासाठी अगदी कॉग्रेस बरोबर हातमिळवणी करायला सज्ज झाले, तर इकडे अडवाणी आपल्याला पंतप्रधान व्हायला मिळणार नसेल, तर भाजपात अन्य कुणाला होता येऊ नये, म्हणून कंबर कसत आहेत. म्हणूनच की काय त्यांनी कारण नसताना गेल्या आठवड्यातच पुढला पंतप्रधान कॉग्रेस वा भाजपाचा नसेल अशी भविष्यवा्णी करून ठेवली आहे. त्यांना एवढेच राजकीय भाकित करता येत होते तर त्यांनी मागच्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान पदासाठी धडपड कशाला केली होती? त्यांना उमेदवार केल्यावर भाजपाने आणखी जागा कमी करून घेतल्या हे भविष्य त्यांना तेव्हा कसे कळले नव्हते? आणि म्हणुनच त्यांचे आजचे भाकित हा राजकीय अंदाज असण्यापेक्षा आपलाच चेला नरेंद्र मोदी याला अपशकून करण्याचा प्रयास वाटतो.

   योगायोग तरी किती असावेत? मोदींना त्यांची जागा दाखवण्य़ासाठी गेल्या वर्षीची रथयात्रा बिहारमधून सुरू करताना आणि तिला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान नितीशकुमारांना देणार्‍या अडवाणी यांनी, आपले नवे राजकीय भाकित नेमके नितीश यांच्या आक्षेपाच्या बरोबरच कसे प्रसृत करावे? अजून लोकसभा निवडणुकीला पावणे दोन वर्षे असताना नितीश पंतप्रधान पदासाठी एनडीए तर्फ़े मोदी नकोत असा आग्रह धरतात, त्याचवेळी अडवाणी आपल्या ब्लॉगवर बिगर भाजपा-कॉग्रेस पंतप्रधान २०१४ साली असेल असे भाकित करतात, याला योगायोग मानता येत नाही. नितीश स्पष्टपणे मोदी नको असा आग्रह धरतात तर अडवाणी मोदी होऊ शकत नाही, असे सुचित करतात. यात दोघांची मिलीभगत दिसत नाही काय? एक मित्रपक्षाचा प्रमुख नेता भाजपाला अटी घालतो आणि त्याच भाजपाचा वरीष्ठ नेता दुरच्या लढ्यापुर्वीच अपशकूनाही भाषा करतो. यातले परस्पर संबंध शोधण्याची गरज आहे. इतक्यातच या दोघांना २०१४ सालची भ्रांत का पडली आहे? तर येत्या दोनतीन महिन्यात गुजरातच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यात तिसर्‍यांदा मोदींनी यश मिळवले, तर त्यांची प्रतिमा देशाच्या एकूणच राजकारणात कमालीची उंचावणार आहे. त्यातून ते थेट पंतप्रधान पदाचे दावेदार होणार आहेत. आणि असे आता सर्वांनाच वाटू लागले आहे. फ़क्त मोदी समर्थकच नव्हे, तर मोदींच्या कडव्या विरोधकांनाही तशी भिती वाटू लागली आहे. नाहीतर नितीश इतकी घाई कशाला करत आहेत? जो माणुस राष्ट्रपती निवडणूक घोषित झाल्यावरही एनडीएने उमेदवार ठरवावा म्हणुन आग्रह न करता परस्पर कॉग्रेस उमेदवार प्रणब मुखर्जी यांना पाठींबा देऊन टाकतो, त्याने दोन वर्षे नंतर येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी आतापासूनच आग्रह धरावा, ही बाब चमत्कारिक नाही काय?

   जो माणूस वा मित्र एनडीएला न जुमानता कॉग्रेस उमेदवार मुखर्जींना पाठींबा देतो, त्याने मोदींच्या नावाला आक्षेप घ्यावा काय? आतापासून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा आग्रह धरावा काय? आणि अडवाणी बिगरकॉग्रेस वा बिगरभाजपा पंतप्रधान म्हणतात; तेव्हा त्यांच्या समोर कोणाचा चेहरा किंवा नाव असते? तो नितीशचाच चेहरा नाही काय? नितीश यांना आपले नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणायचे आहे. पण तसे ते स्वत:च सुचवू शकत नाहीत, ही त्यांची व्यक्तीगत अडचण आहे. म्हणूनच त्यांना मोदींना गुजरातच्या विधानसभा निवडणूकीतच अपशकून करण्याची घाई झाली आहे. त्यातून हे डावपेच सुरू झाले आहेत. आणि नितीशनी इतकी दादागिरी भाजपाला का करावी? पंतप्रधान किंवा लोकसभेची गणिते बाजूला ठेवा. बिहारमध्ये अजून नितीश स्वबळावर उभे रहातील, इतकी त्यांची ताकद नाही. किंबहूना त्यांनी आपली ताकद भाजपाच्या जिवावर वाढवली आहे. १९९१ नंतर लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधला जनता दल पक्ष आपली घरगुती मालमत्ता बनवल्यावर नितीश वा जनता दल म्हणुन तिथे काय उरले होते? तेव्हा समता पक्ष म्हणून आपली वेगळी चुल मांडणार्‍या नितीश व फ़र्नांडिस यांच्या गटाला जीवदान मि्ळाले ते भाजपा सोबत गेल्यामुळेच. १९९६ पासूनच्या प्रत्येक निवडणूकांचे आकडे तपासले तर नितीश यांचा समता पक्ष किंवा संयुक्त जनता दल; भाजपाच्या आश्रयानेच टिकला व वाढला याची साक्ष मि्ळते. आजही मतांचे आकडे पाहिल्यास त्यांची ताकद लालूपेक्षा कमीच आहे. निवडून आलेल्या जागा दिसतात, त्या भाजपाच्या मदतीशिवाय शक्य नव्हत्या. अगदी १९९७ सालात भाजपाच्या व्यासपीठावर नितीशनी मुंबईत येऊन हजेरी लावली, त्या आधीच्या निवडणुकीत त्यांच्या समता पक्षाची अवस्था काय होती?

   लालूंपासून वेगळे होऊन नितीश यांनी वेगळी चुल मांडली तेव्हा त्यांना बिहार विधानसभेत फ़क्त २८ जागा जिंकता आल्या होत्या. त्यासुद्धा भाजपाच्या सोबत जाऊन. आणि त्यांचा भाजपाला कुठलाही लाभ मिळू शकला नव्हता. कारण आधी म्हणजे १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने स्वत:च्या बळावर लढताना ४१ जागा जिंकल्या होत्या, नितीशना सोबत घेतल्यावर भाजपाच्या जागा झाल्या ३९. ही २००० सालची गोष्ट. त्यानंतर कायम नितीश भाजपाचा सोगा पकडून निवडणूका लढवत राहिले. अगदी २००२ च्या गुजरात दंगली झाल्यानंतरही त्यांना मोदीचे वावडे नव्हते. मग २००५ च्या निवडणूका झाल्या. त्यात तर भाजपाच्या जागा आणखी घटल्या, पण नितीशच्या मात्र वाढल्या होत्या. लालूंचा प्रभाव बिहारमधून कमी होत असताना ती जागा भाजपाने व्यापली असती. तिचा लाभ दोस्ती करून घेत नितीशनी आपली ताकद वाढवली. म्हणून त्यांनी २००५ मध्ये २८ वरून ५५ जागापर्यंत मजल मारली. उलट भाजपा मात्र ३९ वरून ३७ पर्यंत खाली आला. तेव्हा लालूंना बहुमत गमवावे लागले आणि पासवान यांनी अडवणूक केल्याने कुणाचेच सरकार बनू शकले नव्हते. काही अपक्ष व पासवान यांचे आमदार एनडीएमध्ये यायला निघाले आणि त्यांचा दावा ऐकून घेण्यापुर्वीच विधानसभा बरखास्त करण्यात आली. एकही बैठक न घेता विधानसभा त्यावेळी बरखास्त झाली होती. पण या कालखंडात कधी नितीशना गुजरात दंगल किंवा मोदींची अडचण वाटली नाही. मग त्याच वर्षी पुन्हा विधानसभा निवड्णूका झाल्या आणि नितीश, भाजपा यांच्या आघाडीला काठावरचे बहूमत मिळाले. पुढल्या दोनतीन वर्षात नितीश यांनी आपले बस्तान बसवले आणि मगच त्यांना मोदींची अडचण भासू लागली. कारण आता मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले जाऊ लागले होते. त्यानंतर मुस्लिम मतांची नितीशना चिंता वाटू लागली, पण तेसुद्ध थोतांडच आहे.

   नितीश यांचा खोटारडेपणा उघड आहे आणि त्यावर पासवान किंवा लालूंनी नेमके बोट अनेकदा ठेवलेले आहे. गुजरात दंगल झाली तेव्हा नितीश भाजपा आघाडी म्हणजे एनडीएमध्ये मंत्री होते. पण त्यांनी दंगलीवर आक्षेप घेऊन राजिनामा दिला नव्हता. त्याचवेळी पासवानही मंत्रीमंडळात होते. त्यांनी मात्र दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाल्याचे कारण देऊन मंत्रीपद सोडले होते आणि एनडीएला रामराम ठोकला होता. पण नितीश मात्र गप्प राहिले होते. मग आजच त्यांना मुस्लिमांचा पुळका कशाला येतो आहे? जोवर आपले बुड बिहारमध्ये पक्के झाले नव्हते; तोवर त्यांनी गुजरात किंवा मोदी यांच्यावर मौन पाळले होते. आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणुन थोडे यश मिळवल्यावर त्यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पण तशी थेट मागणी करता येत नाही. कारण स्वपक्षाचे पन्नास खासदारही निवडून आणण्याची त्यांची क्षमता नाही. पण एनडिएमध्ये राहून पंचविस खासदारांच्या बळावर पंतप्रधान व्हायचा त्यांचा मनसुबा आहे. म्हणुन ते को्णती भाषा वापरत आहेत? एनडीएने सेक्युलर चेहरा असलेला उमेदवार पंतप्रधान पदासाठी आतापासून ठरवावा. तो चेहरा कोणता आहे? पहिली गोष्ट म्हणजे भाजपावर जातियवादी किंवा हिंदूत्ववादी असा आरोप होत असतो. म्हणजेच नितीश यांना कोणीही भाजपावाला उमेदवार नको आहे. मग एनडीएमध्ये सेक्युलर उरला कोण? खुद्द नितीशच ना? थोडक्यात २०१४ मध्ये एनडीएने आपल्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे अशी त्यांची मागणी आहे. भाजपामध्ये नरेंद्र मोदी सोडून आजतरी त्या पदाचा कोणी दावेदार नाही हे आता सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट होत आलेले आहे. त्या गडबडीत आपले नाव पुढे रेटण्याचा नितीशचा हा प्रयत्न आहे. दोन महिन्यांपुर्वी त्यांनी नुसत्या सेक्युलर चेहर्‍याची मागणी केली होती आता तर त्यांनी स्पष्टच शब्दात नरेंद्र मोदी नकोत, अशी मागणी भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

   आता योगायोग बघा. पंतप्रधानांनी मावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल यांना जी मेजवानी दिली, त्याच प्रसंगी नितीशनी गडकरी यांच्याकडे मोदी नको अशी मागणी केली. आणि नेमक्या त्याच पार्श्वभूमीवर अडवाणी आपली ब्लॉगवाणी करीत अहेत. त्याच मेजवानीमध्ये दोघा ज्येष्ठ कॉग्रेस मंत्र्यांनी अडवाणी यांना असे सांगितले, की ‘पुढल्या लोकसभा निवडणूकीत एनडीए किंवा युपीए यांच्या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मि्ळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच निकालानंतर तिसर्‍या आघाडीचे सरकार येऊ शकेल’. खुद्द अडवाणी यांना तशी शक्यता वाटत नाही. त्यांना वाटते कॉग्रेस किंवा भाजपापैकी एकाने पाठींबा दिलेला त्या दोन्ही पक्षाबाहेरचा कोणी तरी पंतप्रधान होऊ शकेल. हे भाकीत नेमके नितीशकुमार यांच्या स्वप्नाशी जुळणारे का असावे? तो निव्वळ योगायोग आहे, की अडवाणी त्याच दिशेने कामाला लागले आहेत? आपल्याला भाजपा संधी देणार नसेल; तर ती अन्य कुणा भाजपावाल्याला मिळू नये किंवा मोदींना मिळू नये, अशी आकांक्षा बाळगून अडवाणी कामाला लागले आहेत काय? नाहीतर दोन वर्षे आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाऊमेद करणारे असे भाकित करण्याचे प्रयोजन काय? स्वपक्षिय मोदींच्या विरोधात दंड थोपटून कार्यरत झालेल्या नितीशच्या भूमिकेला बळकटी देणारे हे भाकित (नितीशच्या मागणीच्या पाठोपाठ) आताच करण्याचा हेतू काय? "मोदी अडवा(आणी) नितीश जिरवा" योजना तर त्यामागे नाही ना?

   मात्र मोदी कच्च्या (अड्वाणी- केशूभाई) गुरूचा चेला असला तरी कच्चा अजिबात नाही. म्हणुनच त्याने या वादात मौन ठेवले आहे. कदाचित त्याचे मौनच या त्याच्या विरोधकांना अधिक भयभीत करते आहे, काय अशीच शंका येते. कारण सगळ्या गोष्टीच त्याच्या सोयीच्या घडत असताना त्याने विरोधकांच्या शंकांना उत्तरे द्यावीतच कशाला? जुन महिन्यात प्रथम नितीशनी मोदीविरुद्ध अप्रत्यक्ष आक्षेप घेतल्यावर बिहारमध्ये त्याच विषयावर एक माचाचणी घेण्यात आली. तिच्या निकालांनी नितीशसह अडवाणींची गाळण उडाली आहे काय? लेन्सऑनन्युज नामक संस्थेने केलेल्या या चाचणीचे बिहारमधले निकाल थक्क करून सोडणारे आहेत. ३६ टक्के बिहारी लोकांना नरेंद्र मोदी हाच उत्तम पंतप्रधान पदाचा उमेदवार वाटतो. तर राहुल १५ आणि नितिश १२ टक्के लोकांना. त्यापेक्षा धक्कादायक मतप्रदर्शन म्हणजे नितीश यांनी मोदी विरोधात घेतलेल्या भूमिकेवर ६१ टक्के बिहारी नाराज आहेत. पंतप्रधान होण्यासाठी मोदीकडे योग्य गुणवत्ता व पात्रता आहे असे ७१ टक्के बिहारींना वाटते. तर फ़क्त २१ टक्के बिहारींना नितीशविषयी तसे वाटते. याचा अर्थच नितीशपेक्षा बिहारी जनतेमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून अधिक मान्यता आहे. त्याच आकड्यांनी नितीश-अडवाणी यांना विचलित केले आहे काय? कारण काही महिन्यांपुर्वी अशी मतचाचणी देशव्यापी घेण्यात आली. त्यात सर्वाधिक १७ टक्के लोकांनी मोदींना कौल दिला होता, तर केवळ १६ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कौल दिला होता.

   म्हणजेच नरेंद्र मोदी यांना भाजपाने पुढल्या लोकसभा निवडणुकीत भावी पंतप्रधान म्हणून समोर आणले, तर मुस्लिमांची मते गमवावी लागतील हा बागुलबुवा फ़सवा आहे. कारण मुस्लिम भाजपाला कधीच मोठ्या संख्येने मतदान करत नाहीत. म्हणजेच भाजपाची मते मोदींमुळे कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. पण दुसरीकडे मोदी हाच नेता म्हणुन समोर आणला तर भाजपाकडे सामान्य मतदार अधिक ओढला जाऊ शकतो, असाच या चाचण्यांचा अर्थ आहे. त्याचे कारणही समजून घेयासारखे आहे. माध्यमांनी मोदींची दंगेखोर म्हणून कितीही बदनामी केलेली असली, तरी त्यांनी दहा वर्षात गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या दंतकथा लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि देशातला सर्वात खंबीर नेता म्हणुन त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, घोटाळे, कायदा सुव्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर खंबीरपणे धाडसी निर्णय घेणार्‍या नेत्याच्या शोधात आज भारतीय जनता आहे. आणि नरेंद्र मोदी हे त्यातूनच निर्माण झालेले आकर्षण आहे. शरद पवार किंवा कॉग्रेस खासदार विजय दर्डा यांनीही उघडपणे त्यासाठी मोदींचे कौतुक करावे तर सामान्य जनतेचे काय होत असेल? त्यांचे नाव भाजपाने पुढे केले तर नितीश एनडीएमधून बाहेर पडतील. पण भाजपाला दोनशे खासदारांचा पल्ला ओलांडणे सहजशक्य होईल. उलट मोदीशिवाय आज असलेल्या जागा टिकवणेही भाजपाला कठीण आहे. पण मोदींना पुढे केल्यास आहेत त्याच्या दुप्पट पल्ला गाठणे शक्य आहे. आणि त्यानेच नितीश व अडवाणी गडबडले आहेत.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १२/८/१२)

३ टिप्पण्या:

  1. शंभर टक्के अनुमोदन. सध्या आपल्याला नरेंद्र मोदींसारख्याच नेत्याची गरज आहे. आपल्याकडे अत्ता सुद्धा तशी सोनीयांची एकाधिकारशाहीच आहे पण त्याने भ्रष्टाचार आणि अराजक वाढले आहे. हे जर वेळीच थांबले नाही तर लवकरच भारत देश हातातून गेलेला असेल. आता फक्त उत्तर एकच नरेंद्र मोदी पंतप्रधान!

    उत्तर द्याहटवा
  2. कारण काही महिन्यांपुर्वी अशी मतचाचणी देशव्यापी घेण्यात आली. त्यात सर्वाधिक १७ टक्के लोकांनी मोदींना कौल दिला होता, तर केवळ १६ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कौल दिला होता.

    उत्तर द्याहटवा