शनिवार, २४ मार्च, २०१२

समर्थ रामदास ’आठवले’ तर काम अवघड नाही


   राज्यसभा निवडणूका लौकरच होणार आहेत आणि त्यात महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने रामदास आठवले नाराज आहेत. आपल्या अपेक्षा पुर्ण नाही झाल्या, तर माणूस नाराज होतोच. आठवले माणूस आहेत आणि म्हणुनच त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. शिवाय त्यांनी सेना भाजपाच्या युतीमध्ये येताना मोठा राजकीय धोका पत्करला होता. अर्थात त्याला धोका संबोधण्यात फ़ारसा अर्थ नाही. पण तसा धोका असल्याचा वर्षभरापुर्वी खुप गवगवा झाला होता. त्यामुळे त्यांनी धोका पत्करल्याचे म्हटले जात होते. कारण शिवशक्ती व भीमशक्ती हे परंपरागत शत्रू आहेत, असेच चित्र दिर्घकाळ रंगवण्यात आलेले आहे. ज्यांना पुर्वेतिहास माहितच नाही किंवा ज्यांना तो लपवायचा असतो, त्यांनी असा गवगवा करणे स्वाभाविकच होते. मात्र त्याला दाद न देता, आठवले यांनी धाडस केले हे नाकारता येणार नाही. मात्र ते धाडस करून भागणार नव्हते. जो प्रयोग करायचे त्यांनी ठरवले होते, तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक तयारी व सावधानता त्यांनी बाळगली नाही. त्यामुळे त्यात अपयश येणे अपरिहार्यच होते. मी हे अधिकारवाणीने सांगू शकतो. कारण अशा अपयशाची पुर्वसूचना मी महायुतीची जडणघडण होत असताना प्रदिर्घ लेखमाला लिहून दिली होती. आज त्याचे परिणाम दिसत आहेत.

   कुठल्याही दोन वा अधिक पक्षांची युती वा आघाडी ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते. दोघांची ताकद कमीअधिक असते. पण परस्पर सहकार्याने ते एकमेकांच्या उपयोगी ठरू शकत असतात. हे कागदावरचे गणित झाले. व्यवहारी गणित नेहमी वेगळे असते. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघात, जगातले उत्तम खेळाडू व फ़लंदाज होते. पण ते कागदावरचे गणित होते. त्या दर्जेदार खेळाडूंनी मैदाना्त खेळण्यावर यशापयश अवलंबून असते. ते नामवंत फ़लंदाज तिथे तसे खेळले नाहीत, त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे. युती वा आघाडी यांची गणिते तशीच असतात. मुंबई पालिका निवडणूकीत दोन्ही कॉग्रेसच्या मागल्या निवडणूकीतले आकडे दाखवून, इथल्या थोर अभ्यासक जाणकारांनी दोघांनी यशस्वी जागावाटप केल्यास त्यांच्या यशाचे मोठे आडाखे बांधले होते. तेही कागदावरचे गणित होते. मतदान होऊन निकाल लागल्यावर ते सगळे अभ्यासू जाणकारांचे आकडे तोंडघशी पडले. महायुतीमध्ये सहभागी झालेल्या आठवले यांच्या रिपाईची स्थिती वेगळी नव्हती. त्यांची ताकद ही कागदावरची होती. कारण आजवर त्यांनी कधी ती मतदानाच्या आकड्यातून सिद्ध करून दाखवलेली नाही. तसा प्रयत्नच त्यांनी कधी केलेला नाही. आणि तोच धोका मी सांगितला होता.

   निवडणुका लांब असताना त्यांनी ही महायुती केली होती म्हणजेच त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना आपले बस्तान काही शहरे व महानगरात चांगले बसवण्याची संधी त्यातून मिळणार होती. त्यात युतीकडून किती जागा मिळवायच्या, यापेक्षा किती किमान जागा जिंकायच्या यावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे होते. कॉग्रेस वा राष्ट्रवादी सोबत दोन दशके राहून त्यांनी सत्ता भोगली, पण कुठेही आपले प्रभावक्षेत्र निर्माण केले नाही, हाच त्यांचा व त्यांच्या पक्षाचा दुबळेपणा आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडून त्यांनी मागल्या विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या आघाडीचा रिडालोस प्रयोग करून पाहिला. त्यात त्यांच्यापेक्षा कमी जागा घेणारे पक्ष, काही यश मिळवू शकले. पण प्रमुख पक्ष म्हणुन अधिक जागा लढवूनही, रिपाईला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. त्याचे कारण त्यांनी कधी शोधायचा प्रयत्न तरी केला आहे काय? त्यांच्या तिसर्‍या आघाडीपेक्षा मनसेने स्वबळावर लढूनही रिडालोसपेक्षा अधिक जागा जिंकल्या. त्याचे कारण तरी तपासले का? रिपाई म्हणुन जो आठवले गट कार्यरत आहे, त्याने कधी तरी आत्मपरिक्षण करण्याचा प्रयास केला आहे काय? तिथेच खरी समस्या आहे. एक एक पर्याय स्विकारायचे व सोडून द्यायचे, असे त्यांचे राजकारण चालू आहे. स्वत:च एक पर्याय व्हावे, असा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला नाही. तिथेच सगळी गडबड होत असते.

   एक साधी गोष्ट घ्या. रिपाईने स्वबळावर अजुन कधी मोठे यश मिळवलेले नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे कोणी प्रभावी राजकीय शक्ती म्हणुन बघतच नाही. तोंडावर कोणी बोलणार नाही. पण व्यवहारात कुठलाच पक्ष रिपाईला गणतीमध्ये घेत नाही. शोभेची वस्तू म्हणून वापरण्याची त्यांची मानसिकता असते. त्यातून रि्पाईला बाहेर पडण्याची गरज आहे. स्वबळावर जागा जिंकण्याची गरज नसते. ताकद सिद्ध करण्यासाठी काही मतदारसंघात तुमचे लक्षणिय बळ दिसावे लागते. म्हणजे असे, की तुमच्यामुळे कुणीतरी पराभूत होतो, इतकी मते तुम्हाला मिळवावी लागत असतात. असे जेवढे मतदारसंघ असतात, तिथे तुम्हाला जवळचे पक्ष विचारात घेतात. १९८० सालात सर्वत्र पडायला उमेदवार उभे करणार्‍या कांशीरामच्या बसपाने १९९१ सालात अवघे बारा आमदार उत्तरप्रदेश विधानसभेत निवडून आणले. पण त्यांच्या पडणार्‍या उमेदवारांनी मुलायमचे जे ४०-५० उमेदवार पाडले. त्यातून बसपाला सोबत घेण्याची मुलायमला गरज वाटली. त्या युतीमध्ये मग कमी जागा लढवताना बसपाचे ४० आमदार झाले होते. पण त्याची ताकद पाहून तेव्हा पंतप्रधान नरसिंहराव यांनी १९९३ च्या निवडणुकीत कांशीराम यांचाशी युती केली होती. एवढा पल्ला गाठण्यासाठी आधी त्यांनी आपली ताकद सिद्ध केली होती. ती खुपच तुटपुंजी होती. ती ताकद निवडून येण्यास पुरेशी नव्हती. पण कुणाला तरी पाडण्यास पुरेशी होती. रिपाईने तेवढे तरी प्रयास कधी केले आहेत काय?

   समाजाची मते असे म्हटले जाते पण तमाम आंबेडकरवाद्यांची मते त्यांच्या मागे नाहीत. इतर अनेक गट त्यात भागिदार आहेत. निदान त्यातला प्रभावी गट होण्याच्या प्रयास आठवले यांनी केला आहे काय? कुठल्याही मतदारसंघात त्यांना एकहाती निवडून येता येणार नाही, कारण तेवढे त्यांच्या पाठीराख्याचे बळ नाही हे मान्य. पण जेवढे बळ आहे ते कोणाच्या तरी अपयशाला कारण होऊ शकते, यातही शंका नाही. मुंबईत निदान अर्धे तरी असे विधानसभा व पालिका मतदारसंघ आहेत, की ज्यात दलिताची मते निर्णायक ठरू शकतात. एक निवडणुक तेवढी ताकद दाखवली, तरी बाकीच्या पक्षांना रिपाईकडे डोळेझाक करता येणार नाही. तेही शक्य नसेल तर आज उगाच आघाडी वा युतीमध्ये जाऊन जास्त जागा मागण्यापेक्षा जास्त निवडून आणण्याचा विचार व्हायला हवा. मुंबईचीच गोष्ट घ्या. अखेरच्या क्षणापर्यंत २५ वरून रिपाईला २९ जागा मिळवण्यात वेळ खर्ची घातला गेला. त्याचा काय उपयोग झाला? त्यापेक्षा २५ नको तर २० जागा द्या. पण त्यातल्या निदान दहा निवडून आणायला युतीने सर्वतोपरी मदत करावी, असा प्रयत्न आठवले याच्याकडून झाला असता तर? समजा सातआठ निवडून आले असते तरी खुप झाले असते ना? जागा मागण्यापेक्षा मिळतील त्या निवडून आणण्याचा विचार महत्वाचा असतो. त्याकडे साफ़ उर्लक्ष झाले नव्हते का?
 
   मग असे वाटते, की जिथे युतीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नव्हती, त्याच जागा निवडुन रिपाइला देण्यात आल्या असणार. ज्या जागा वाट्याला येतील त्या निवडून कशा आणायच्या, याचा विचार का झाला नाही? त्याच दहा जागा जरी मुंबईत रिपाईने निवडून आणल्या असत्या, तरी त्यांच्या मतांची किंमत युतीला कळली असती. जे आपल्या मदतीने दहा जागा निवडून आणतात, त्यांची आपल्यालाही पुरेशी मते मिळाली आहेत, हे मित्रपक्षांना आपोआपच जाणवत असते. उलट तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या जागाही निवडून आणु शकला नाहीत,तर त्यांना तुमची मते मिळाली असा दावा करायला तरी जागा उरते काय? सेना भाजपाची मते आपल्या उमेदवारांना मिळाली नाहीत हा आरोप करणे सोपे आहे. पण त्याचा दाखला तरी हवा ना? याआधी कॉग्रेस बरोबरच्या मैत्रीत तरी रिपाईला मिळालेल्या जागांपैकी किती जागा जिंकल्या होत्या? १९९२ सालात कॉग्रेस चिन्हावर लढल्याने १३ जागा जिंकल्या होत्या. याही वेळी तेच केले असते तर युतीची मते रिपाई उमेदवाराला मिळणे सहजशक्य झाले असते. तीही चलाखी करण्यात आली नाही. जो निष्ठावान मतदार असतो त्याला उमेदवाराशी कर्तव्य नसते. तो चिन्हावर शिक्का मारत असतो. तशी सेना भाजपाचे चिन्ह रिपाईने वापरले असते, तर पहिल्या फ़टक्यात निदान काही अंशी काम सोपे झाले असते. मग पुढल्या पाच वर्षात किंवा दोन तीन वर्षात त्या उमेदवारांच्या मदतीने पक्षाची ओळख निर्माण करता आली असती. जे निवडून आले त्यांना आपापली प्रभावक्षेत्रे निर्माण करता आली असती. इतका दुरगामी विचार रिपाई व आठवले यांनी करायला हवा होता. किती जागा मिळणार वा किती मागायच्या, यापेक्षा जिंकायच्या किती याचे किमान गणित मांडायला हवे होते. त्याचा कुठेही थांगपत्ता नव्हता.

   एकूणच या महायुतीचा सगळा बाज राष्ट्रवादीला धडा शिकवणे यासाठीच असल्याप्रमाणे मंडळी वागत होती. मागल्या दोन दशकांपासून दोन राजकीय शक्ती मुंबईत आपली ताकद दाखवायला धडपडत आहेत. त्यात एकीकडे आठवले रिपाई गटआहे तर दुसरीकडे मुलायमचा मुस्लिम लीग म्हणुन चाललेला समाजवादी पक्ष आहे. त्या पक्षाने कधीच संपुर्ण मुंबईवर आपली ताकद खर्ची घातलेली नाही. मुस्लिम धाजिणेपणा लपवलेला नाही, की उत्तरभारतीय प्राधान्य नाकारलेले नाही. त्याचे निवडून आलेले आमदार नगरसेवक कधी राष्ट्रवादी वा कॉग्रेसने पळवले आहेत. त्याबद्दल तक्रारसुद्धा त्या पक्षाने केलेली नाही. पण त्याचवेळी त्याने आपला मतदार आपल्यापासून दुर जाणार नाही याची सतत काळजी घेतली आहे. मुस्लिम व उत्तर भारतीय आपल्या मुठीत ठेवण्याची किमया त्यांना राजकारणात महत्व देत असते. त्यातले नबाब मलिक, बशीर पटेल असे लोक राष्ट्रवादीमध्ये निघून, गेले म्हणुन समाजवादी पक्षाची ताकद मुंबईत घटली आहे काय? नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी आपले आठनऊ नगरसेवक स्वबळावर निवडून आणले आहेत. थोडक्यात त्यांनी आपला मतदार संभाळला आहे. त्याचे कारण त्यांनी सायकल हे निवडणूक चिन्ह मतदाराच्या मनात ठसवले आहे. रिपाईकडे असे चिन्ह कायमचे आहे काय? असेल तर त्यांचीमते हुकमी होत असतात. त्यांच्या पाठीराख्याला कुठे मत द्यायचे याची चिंता करावी लागत नाही, शोधाशोध करावी लागत नाही. प्रत्येक मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाचा बांधील नाही. पण ठराविक मुस्लिम त्यांना एकगठ्ठा मतदान करतो, हे आता सगळेच जाणून आहेत. तिथेच त्यांची राजकीय ताकद सिद्ध होत असते. अन्य पक्षांना समाजवादी पक्षाला हिशोबात घ्यावे लागत असते.

   १९९८ सालात सर्व पक्षांची आघाडी शरद पवारांनी केली,  तेव्हा त्यांनी त्या पक्षाला मुंबईत दोन लोकसभेच्या जागा उगाच दिल्या नव्हत्या. चार रिपाई नेत्यांना जेव्हा उमेदवारी दिली, तेव्हा समाजवाद्यांना दोन जागा का दिल्या? तर त्यातून हुकमी सर्व मुस्लिम मते त्यांना मिळवायची होती. पण तत्पुर्वी त्या पक्षाने आपली मुस्लिम मते मिळवून दाखवली होती. आठवले गटाने तसे आधी आपले शक्तीप्रदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी युतीबाहेर पडण्याची गरज नाही. पण युतीकडून ज्या जागा मिळतील त्यातल्या अधिकाधिक निवडून आणायची रणनिती आखली पाहिजे. ते अर्थातच त्यांच्या पक्षिय स्वार्थाप्रमाणेच आंबेडकरी मतदारांना आपल्या ताकदीचा साक्षात्कार घडवण्यासाठी मोलाचे आहे. आपले इतके निवडून आले,ही बाब सामान्य आनुयायी व पाथीराख्यांची हिंमत वाढवत असते. आज आठवलेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी नाराज आहेत. पण ते युतीबाहेर पडायची भाषा बोलत नाहीत. कारण बाहेर पडून करायचे काय, याचा त्यांनाही अंदाज नाही. परत कॉग्रेस राष्ट्रवादीकडे जायचे तर तिथे पराभूत म्हणून जाण्यात अर्थ नाही. अशी वेळ का आली, याचा विचार व्हायला हवा आहे. नुसते रागावून वा नाराज होऊन काय उपयोग? तुमच्या नाराजीने लोक गडबडले पाहिजेत.

   पालिका निवडणूकीत रिपाइचे उमेदवार अपेक्षेइतके निवडून आले नाहीत. त्याची नाराजी होतीच. आता सेना भाजपाच्या कोट्यातून आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणुन नाराजी आहे. पण असे का झाले याचा विचार करायचा नाहीच का? अधिक जागांसाठी भांडत न बसता कमी जागा घेऊन अधिक निवडून आणल्या असत्या व त्यासाठी महिनाभर सेना भाजप व रिपाई कार्यकर्त्यांची सांगड घालण्याची मेहनत घेतली असती तर ही वेळ आली असती का? मुंबई पालिकेत दहा नगरसेवक असले म्हणजे विधानसभेत चारपाच आमदार असण्यासारखे असते. पण तसे झाले नाही. कारण शिवसेनेच्या व भाजपाच्या बळावर आयते निवडून येण्याची स्वप्ने बघितली गेली होती. तेच कॉग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीत असताना केले होते. स्वत:ची ताकद व संघटना उभारायचा विचारच होत नाही,ही रिपाइची खरी समस्या आहे. त्यामुळे ते कोणाला पाडायच्या स्थितीत नाहीत, मग कोणाला निवडून आणायची ताकद तरी कशी दाखवतील? शिवाय रिपाइची ताकद म्हणजे फ़क्त बौद्ध समाजापुरती मानायचा संकूचितपणा कशासाठी? मुस्लिमधार्जिणा असला तरी समाजवादी पक्ष मुंबईत उत्तर भारतीयांना आपलासा वाटावा अशी भुमिका तो वेळोवेळी घेत असतो. त्याचाच फ़ायदा त्याला आपला मतदारसंघ विस्तारायला झालेला आहे. रिपाईने त्या दृष्टीने कधी विचार तरी केला आहे काय?

   मुंबईची बकालवस्ती प्रामुख्याने दलितांची प्रभावक्षेत्रे आहेत व तिथे त्यांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांचे प्रश्न घेऊन रिपाईने चळवळ केली तर त्यांचा विस्तार व्हायला वेळ लागणार नाही. पण त्याचा विचारच कधी होत नाही. तिथे मुठभर पण केंद्रित संख्या आहे. तिच्या संघटित ताकदीभोवती बाकीच्या अठरापगड जातीजमातींची ताकद उभी राहू शकते. जेव्हा त्यात रिपाईचा पुढाकार असतो, तेव्हा तिथला कार्यकर्ता बलवान होत असतो, त्याच्या माध्यमातुन कुठल्या पक्षाला बळ मिळणार आहे? ते बळ फ़क्त बौद्ध मतांचे नसेल तर सर्वसमावेशक असेल. ती आपोआप पक्षाची ताकद होत असते. दोनचार लाख दलित मतांच्या भोवती अन्य घटकातील पाचसात लाख मतांची बेरीज मुंबईचे राजकीय समिकरण बदलू शकते. मग रिपाईला कोणी उमेदवारी देण्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही. आपण फ़क्त बौद्ध समाजाचे प्रतिनिधीत्व करतो या समजुतीमधून आधी रिपाई नेत्यांनी बाहेर पडावे लागेल. आणि ते शब्दांनी, भाषणातून नव्हेतर कृतीतून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी उत्तम मार्ग समाजजीवनाशी संबंधित असलेल्या विषयावर आंदोलनात उतरण्याचा आहे. चळवळीचा आहे. आणि रामदास आठवले हा माणूसच मुळात चळवळीने आंबेडकरी विचारांना मिळालेली देणगी आहे. पॅंथर चळवळीने हा तरूण सार्वजनिक जीवनात आला. त्याला चळवळीची महत्ता मी सांगण्याची गरज नाही. जिथे त्याने चळवळीची कास सोडली तिथेच त्याची ताकद घटत गेली आहे.

   २०१४ ची लोकसभा वा विधानसभा हे आपले व महायुतीचे लक्ष्य आहे असे आठवले म्हणतात. तोपर्यंत ते काय करणार आहेत? कोण राज्यसभेची उमेदवारी देतो याची प्रतिक्षा करणार आहेत काय? त्यातून पक्ष कसा उभा राहिल? संघटनात्मक शक्ती कशी उभी राहिल? त्यापेक्षा बहुसंख्य दलितांना नियमित भेडसावणार्‍या विषयावर संघर्ष करण्याचा त्यांनी स्वबळावर पवित्रा घेतला तर? एकीकडे मुंबईतला व नागरी वस्तीतला दलित त्याच्यामागे गोळा होत जाईल. त्याचवेळी त्या वस्त्यांमधला अन्य समाजघटक त्यांच्याशी जोडला जाईल. तेव्हा त्यांच्या मतांसाठी लाचार कुठलाही पक्षा रामदास आठवले यांना हवी ती सत्तेची जागा द्यायला त्यांच्या दारापर्यंत येऊन उभा राहिल. कारण मग आठवले हा एका रिपाई गटाचा नेता असणार नाही, तर तो काही लाख मतांचा हुकमी पत्ता असेल. याची सुरूवात म्हणुनच लोकांमध्ये जाऊन करावी लागेल. आज जे त्यांचे निष्ठावान म्हणजे त्यांच्या भोवती घोटाळणारे लोक आहेत ते नव्हे, तर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून लढायला तयार आहेत,  अशा निष्ठावानांची मोजकी फ़ौज जमा करायला हवी आहे. सेना भाजपा बरोबर फ़िरण्यापेक्षा स्वत:ची चळवळ महायुती न सोडताही करता येईल. उलट युतीमध्ये असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण डोंबीवली अशा शहरात बकाल वस्त्यांमध्ये रहिवाश्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांच्या भीमसैनिकांना सत्तेकडून मदतही मिळू शकते. पण या रामदासाला समर्थ रामदासाचे थोडे स्मरण करावे लागेल. ते त्यांना आवडणार नाही कदाचित. पण समर्थ रामदास म्हणतात त्यातला बोध महत्वाचा आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे,
 जो जो करील तयाचे,
परंतू तेथे भगवंताचे,
अधिष्ठान पाहिजे.

इथे भगवंत म्हणजे देव परमेश्वर नव्हे, तर आपल्या विचार व भुमिकेवरील गाढ श्रद्धा असे समजून घेतले, तरी पुढला मार्ग खुप मोकळा व सोपा होऊ शकेल. त्यासाठी कुणाच्या मदतीची नव्हे तर दुर्दम्य इच्छाशक्तीची तेवढी गरज आहे.

२५/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा