शनिवार, १७ मार्च, २०१२

मनसेचा ’वाघ’ झेपावला, सेनेचा वाघ झोपवला  राज ठाकरे यांनी अखेर मनसेचा उमेदवार नाशिकच्या महापौरपदी निवडून आणलाच. तसे पाहिल्यास ठाण्यातला शिवसेनेचा महापौरसुद्धा राजनेच निवडून आणला होता. कारण त्यांनी अखेरच्या क्षणी घोडेबाजार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला नसता, तर ठाण्यात काय काय घडले असते त्याचा अंदाजही करता येत नाही. निकाल लागल्यापासून तिथे नवनिर्वाचित नगरसेवक पळवण्याचा व लपवण्याचा आणि त्याचे आरोप दुसर्‍यावर करण्याचा सपाटाच चालू होता. दोन्ही बाजू अटीतटीने लढायला सज्ज झाल्या होत्या. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी झालेली होती. खरे तर त्यात सेनाप्रमुख बाळासाहेब व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, यांनी हस्तक्षेप करायला हवा होता. पण ते बाजूला राहिले आणि त्यांचे शिलेदारच एकमेकांवर वाघासारखे गुरगुरत होते. त्यांची ती गुरगुर अखेर राजच्या हस्तक्षेपाने थांबली. मजेची गोष्ट म्हणजे त्यात राजचा ना थेट राजकीय लाभ होता, ना त्याने कुणाशी त्यासाठी सौदेबाजी केली. राजकारणात किती विधायक विचार व कृती करता येते, याची त्याने कृतीतून साक्ष दिली. खरे तर ती नवी सुरूवात ठरायला हरकत नव्हती. पण ठाण्यातील राजच्या त्या विधायक चालीचा ना पत्रकारांना अर्थ कळला ना राजकीय नेत्यांना थांग लागला. त्यामुळेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नाशिक महापौर निवडणुकीत नाक कापले गेले. एका अर्थाने राजने आपला शब्द खरा ’करून दाखवला’.

   होय! नाशिकमध्ये राजने आपल्या पक्षाचा यतीन वाघ हा उमेदवार नुसता निवडूनच आणलेला नाही, तर कोणाशीही सौदा न करता व कोणासमोर शरणागती न पत्करता, तो विजय मिळवला आहे. तो जेवढा राजचा विजय आहे, त्यापेक्षा तो अन्य मुरलेल्या मातब्बर राजकारण्यांचा मोठा पराभव आहे. कारण राष्ट्रवादी, कॉग्रेस व शिवसेना त्या लढतीसाठी धावपळ करत होते. नाशिक या आपल्या बालेकिल्ल्यात एक मोठी नागरी संस्था नवख्या राजने काबीज केली म्हणुन छगन भुजबळ व्यथीत होते. मागल्या वेळी मिळवलेली सता गमावल्याने शिवसेना अस्वस्थ होती. भाजपाला जुना मित्र आणि सत्तेचे गणित यातून मार्ग काढताना नाकी नऊ आलेले होते. कॉग्रेसला तर सध्या महाराष्ट्रात काय करायचे त्याचाच थांग लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजने त्या पालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले नाही, तरी सर्वात मोठा पक्ष होऊन दाखवले होते. तेवढेच नाही तर कुठूनही बहुमताचे गणित जुळत नसताना, आपलाच महापौर होणार असे वारंवार ठामपणे सांगितले होते. खरे तर बाकीच्या जुन्यजाणत्या पक्षांनी त्याला उदार मनाने संधी द्यायला हवी होती. कारण त्याने आधी लोकसभा, मग विधानसभा निवडणुकीत नाशिकवर आपली छाप पाडून दाखवली होती. नाशिककरांना राजला संधी द्यायची आहे हे असे तिनदा सिद्ध झालेले होते. त्याकडे पाठ फ़िरवणे वा सर्वात्त मोठा पक्ष असूनही मनसेचा महापौर होण्यात अडथळे आणणे, हे राजकारण नव्हते तर कद्रुपणा होता. त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल, की सेना व भुजबळ यांचा तो राजकीय अडाणीपणा सु्द्धा होता.

   याचे पहिले कारण इथे महापौराची निवड व्हायची होती. तो निवडून येतो. त्याला कोणी बहुमत तपासून त्या पदाची आधी शपथ देत नाही, की नंतर बहुमत सिद्ध करायला मुदत वगैरे देत नाही. त्या निवडीत सर्वाधिक मते मिळवली की झाले. जसा खुल्या निवडणुखीत नगरसेवक, आमदार वा खासदार निवडून येतो, तसाच महापौर निवडून येत असतो. त्याची निवड झाली की बहुमताची मजा संपली. कारण त्याला सभागृह चालवायचे असते. राज्य चालवायचे नसते. त्याला वेळोवेळी बहूमताला सामोरे जावे लागत नसते. जिथे सभागृहाची संख्या तीन गटात जवळपास सारखीच विभागली गेली होती. तिथे तिरंगी लढत अपरिहार्य होती. त्यात अर्थातच ४० ही संख्या सर्वात मोठी होती. म्हणजे तीच बाजू जिंकणार होती. त्याला पाडायचे तर उर्वरीत दोन गटात विभागलेल्यांना एकत्र यावे लागले असते. तसे केल्यास मनसेला रोखता आले असते. पण त्यासाठी सेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी यांना एकच उमेदवार उभा करावा लागला असता. थोडक्यात जे ठाण्यात महापौर पदासाठी एकमेकांच्या उरावर बसले होते, त्यांनीच मनसेला अपशकून करण्यासाठी गळ्यात गळे घालायला हवे होते. ते अशक्य नव्हते. पण ठाण्यातला प्रकार ताजा असल्याने त्यांना थांबावे लागले. नाहीतर ठाण्याइतक्या हमरातुमरीने नाही तरी धावपळी चालू होत्या. खरे सांगायचे तर सेनेने एक चांगली बाजी हातची घालवली.

   राजने ठाण्यात कसलाही सौदा न करता पाठींबा दिलेला होता. त्याची परतफ़ेड म्हणून आधीपासून तटस्थ राहून, सेना त्याच्यासाठी मार्ग मोकळा करू शकली असती. त्यातून सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या सदिच्छा मिळवता आल्या असत्या. जे अखेरच्या क्षणी केले तेच आधीपासून घोषित केले असते तर? तिथले समिकरणच स्पष्ट होते आणि राजचा मार्ग त्याच समीकरणाने सुकर केला होता. तो मान्य करण्यात मोठेपणा होता. हे आमच्या वाहिन्यावरील वा वृत्तपत्रातील थोर अभ्यासक विश्लेषकांच्या गावीही नव्हते, की ही विधानसभा नसून पालिका आहे. तिथली सता बहुमताशी संबंधित नसते. पण सुदैवाने राजला हे ठाऊक होते. म्हणूनच त्याने पहिल्यापासून ठामपणे आपलाच महापौर होणार अशी ग्वाही दिली होती. अर्थात कॉग्रेस व युती एकत्र येणार नाहीत या विश्वासावरच राजचे गणीत अवलंबून होते. तेच खरे ठरले. अशा ठिकाणी मोठ्या अनुभवी पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवायचा असतो. तिथे ते कमी पडले. त्यामुळेच राज व मनसे यांना हा दुहेरी विजय मिळाला असेच म्हणावे लागेल. एकीकडे त्यांनी कोणत्याही तडजोडी न करता महापौरपद मिळवले. तर दुसरीकडे ठाण्यात आपली ताकद कमी असतांनाही, मोठ्या युतीच्या बाजूने वजन टाकून ओदार्यसुद्धा दाखवले. म्हणजेच मनसेच्या राजकीय चातुर्यावर नाशिककर फ़िदा होतीलच. पण त्याच्या आधी राजने त्यांना मोठा प्रतिसाद न देणार्‍या ठाणेकरांनाही जिंकले आहेच. बडेबडे अनुभवी बलवान पक्ष सत्तेसाठी अगतिक होत असताना, रुबाबात कमी संख्याबळात आपला महापौर निवडून आणण्याची ही किमया राजच्या राजकीय चातुर्याचा पुरावा मानावा लागेल.  

   पालिका सभागृहाची विभागणीच अशी झाली होती, की मनसेला रोखणे अवघड होते. आणि हे जाणुनच राज छातीठोकपणे मनसेचा महापौर ही भाषा बोलत होते. पण ते अगदी मुरब्बी पत्रकारांनाही कळत नव्हते. कारण ते बहुमताच्या आकड्यात अडकून बसले होते. त्यांना मुख्यमंत्री व महापौर यातला फ़रकच लक्षात राहिला नव्हता. मी मागल्या तीनचार लेखातून ठाणे पालिका, तिथे राजेने युतीला दिलेला पाठींबा या संदर्भाने लिहितो आहे. त्यात मी राजचे अतिशयोक्त कौतुक केले असे काही लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण ती अतिशयोक्ती नव्हती हे आता नाशिकच्या महापौर निवडीने सिद्ध झाले आहे. दुर्दैव इतकेच, की अशा या घोडेबाजार व सौदेबाजारात आमचे शहाणे पत्रकार विश्लेषक इतके अडकून पडले आहेत, की त्यांना राजकीय समिकरणेच समजेनाशी झाली आहेत. ती समजली असती तर त्यांनी राजच्या ठाण्यातील ऒदार्याचे कौतुक केले असते आणि त्याच्या नाशिकच्या रणनितीची चर्चाही केली असती. त्याऐवजी हे शहाणे नसलेले सौदे शो्धत बसले. आपले पत्ते या दिडशहाण्यांना राजसारख्या नवख्या पोराने कळू दिले नसतील तर यांच्या राजकीय समज व विश्लेषणाची कींव करायला हवी.

   एकीकडे या तरूणाने लोकांबरोबरच शिवसैनिकांची सहानुभूती कसलीही किंमत न मोजता मिळवली आहे. पण दुसरीकडे त्याने सहजपणे उद्धव ठाकरे यांच्या वागण्याला जगासमोर आपमतलबी ठरवून टाकले आहे. महापौर निवडून येताच राजने ’शिवसेनेच्या थयथयाटामुळे त्यांची खरी वृत्ती महाराष्ट्राने पाहिली’ अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ती अतिशय बोचरी जरूर आहे. पण कोणालाही ती पटणारी आहे. ठाण्यात तुमचे काम सोपे झाल्यावर तुम्ही परतफ़ेड करावी, अशीच लोकांची अपेक्षा होती. खरे तर त्याची राजला हिशोबाने गरज नव्हती. पण तसे करून सेनेला एक डाव परत फ़िरवता आला असता. ठाण्यात सेनेला राजची खरेच गरज होती. त्यामुळे त्याच्या मदतीने त्यांचे काम सोपे झाले. नाशिकला तसे नव्हते. पण पाठींबा नाही तरी आधीपासून तटस्थ राहून लोकांच्या सदिच्छा मिळवणे सहजशक्य होते. पण ते झाले नाही. त्यामुळे दुजाभाव वा द्वेष कोण कोणाचा करतो व त्यासाठी लोकभावनेची कोण पर्वा करत नाही त्याचे आयते प्रदर्शन सेनेने घडवले. जणू राजला हवा असलेला डाव सेनेकडून खेळला गेला म्हणायचा. अर्थात राज ठाकरे यांनी निरिच्छ वृत्तीने हे सर्व केले व ऒदार्य दाखवले, असेही मानायचे कारण नाही. उलट त्यातही मुरब्बी राजकारण त्यांनी खेळले आहे. तेही समजून घेण्यासारखे आहे.
==
   राजकारणात नेहमी स्वार्थ साधून परमार्थ साधला जात असतो. मात्र आपण परमार्थासाठीच सर्व काही करत आहोत, असे भासवले जात असते. राज ठाकरे त्यापेक्षा काहीही वेगळे करत नाहीत. ज्याला ही कला अधिक चांगली साधते, तो खरा राजकारणी असतो. ज्याला आपले मतलब वा स्वार्थ लपवून परमार्थाचे नाटक साधत नाही, तो त्यात फ़सत असतो. आपण ज्याला मुरब्बी राजकीय नेता म्हणतो वा समजतो, तो यात मोठा वाकबगार असतो. उदाहरणार्थ शरद पवार घ्या. त्यांची स्वत:ची साधी गाडीसुद्धा नाही, असे ते उमेदवार म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगतात. पण आपण त्यांना कधी बसच्या रांगेत उभे बघितले आहे का? टॅक्सी रिक्षामध्ये प्रवास करताना बघितले आहे का? त्यांच्या मालमत्तेची कधी चर्चा होते का? याला मुरब्बी राजकारणी म्हणतात. सर्व स्वार्थ साधूनही पवार आपली निरिच्छ प्रतिमा कायम ठेवतात. तसेच या महापौर निवडणूकीत राजेने केले आहे. जिथे स्वर्थ होता तिथे तो व्यवस्थित साधून घेतला आणि जिथे स्वार्थ शक्यच नव्हता, तिथे झकास परमार्थ करून लोकांची सहानुभूती छानपैकी मिळवली. ठाण्यात किंगमेकर तेच होणार असे भाकित पत्रकार करत होते. पण तेवढ्या त्यांच्या जागाच आल्या नाहीत. मग त्यांनी घोडेबाजार थांबवण्यासाठी तुटपुंज्या जागा वापरून वाहाव्वा मिळवली. आणि नाशिकमध्ये गणितच असे होते, की दुसर्‍यांनी राजकीय आत्महत्या केल्याशिवाय मनसेचा महापौर थोपवणे शक्य नव्हते.

   म्हणुनच उद्धवना आपली प्रतिमा उदात्त बनवण्याची ही छान संधी होती. ती साधण्यातुन त्यांना मोठा राजकीय पल्ला गाठता आला असता. राज त्यांच्यामुळेच सेनेतून बाहेर पडला असे मानले जाते. कि्तीही नाकारले तरी तसे लोकांना वाटते. त्यातून बाहेर पडण्याची ही संधी होती. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर येथे सेनेला थेट वा अप्रत्यक्ष पाठींबा देत, राजने आपण सेनेशी गद्दार झालेलो नाही, हे सतत दाखवून दिले होते. त्या सर्वाची परतफ़ेड करण्याची ही संधी होती. आपण भावाचे विरोधक असल्याची प्रतिमा पुसण्याची संधी होती. शिवाय राजने जसा ठाण्यात लोकमताचा आदर करण्याची भूमिका घेतली, तशीच भूमिका घेऊन मनसेची वाट मोकळी करता आली असती. भाजपा त्यासाठी उत्सुक होता. त्यालाही दुखावण्याची गरज नव्हती. तटस्थ रहाणे आधीपासून निश्चित केले असते तर झाकली मुठ म्हणतात, तशी सेनेची प्रतिष्ठा वाढली असती. उद्धवनी जरा सेनेचा जुना इतिहास तपासला तरी याचे दाखले त्यांना मिळाले असते.

   १९७३ सालात शिवसेनेने दुसर्‍यांदा मुंबई महापालिकेची निवडणुक लढवली. छगन भुजबळ तेव्हाच पहिल्यांदा नगरर्सेवक म्हणुन निवडून आले होते. तत्पुर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणूकीत सेनेचा दारूण पराभव झालेला होता. दादरमधून मनोहर जोशी एक लाख मतांनी भंडारे यांच्याकडून पराभूत झाले होते. तर विधानसभेत गिरगावमधून प्रमोद नवलकर हा एकमेव आमदार निवडून येऊ शकला होता. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही पालिका निवडणूक अटीतटीची झाली होती. सेनेसाठी अस्तित्वाची लढाई तेव्हाही अशीच होती. मग कळीचा मुद्दा झाला होता, वंद मातरम हे राष्ट्रगीत. कॉग्रेसचे मुस्लिम नगरसेवक अमीन खांड्वानी यांनी पालिका बैठकीत वंदे मातरमचा अवमान केला, म्हणुन सेनेने तोच त्या निवडणूकीत मुद्दा बनवला होता. त्यात खांडवानी यांना पराभूत करण्यासाठी माहीम भागातून एकच एक विरोधी उमेदवार उभा रहावा, म्हणून सेनेने शेकापचे कोळी उमेदवार भाई बंदरकर यांना पाठींबा दिला होता. मात्र निकाल इतके विचित्र लागले, की त्यात प्रथमच पालिकेत मुस्लिम लीगचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले. सेनेचे फ़क्त चाळीसच आले होते. तेव्हा पालिकेची सदस्यसंख्या फ़क्त १४० होती. लीगचे काही ९-१० नगरसेवक असावेत.

   तेव्हा देश इंदिरा लाटेत वहावत चालला होता. सहाजिकच कॉग्रेसला थोपवण्यासाठी विरोधक एकत्र येण्याच्या मनस्थितीत होते. त्याचा फ़ायदा घेऊन सेनाप्रमुखांनी मुंबईला सेनेचा दुसरा महापौर देण्याची मोठी धुर्त चाल खेळली होती. ज्या वंदे मातरम वरून त्या निवडणूकीत रणधुमाळी माजली होती, त्यात नेमकी सेनेविरुद्ध टोकाची भूमिका असलेल्या मुस्लिम लीगला बाळासाहेबांनी सोबत घेतले होते. वंदेमातरम बाजूला ठेऊन त्यांनी मुस्लिम लीग नगरसेवकांच्या हुकमी पाठींब्यावर सुधीरभाऊ जोशी यांना मुंबईचा सर्वात तरूण महापौर बनवले. तेव्हा साहेबांवर कोलांटी उडी मारल्याचा आरोप झाला होता. मुद्दा तो नाही. परिस्थिती व प्रसंग यानुसार आपले अहंकार व हटवाद बाजूला ठेऊन, पुढे जाण्याच्या धाडसी वृत्तीमुळेच बाळासाहेब दिर्धकाळ राजकारणात टिकून राहिले. ज्या सेनेने तेव्हा अवघ्या महिन्यात लवचिक भूमिका घेतली, तिला आज काय झाले आहे? ३९ वर्षात सेना अधिक मुरब्बी व व्यवहारी व्हावी अशीच कोणाचीही अपेक्षा असू शकते. ज्या सेनेने मुस्लिम लीगला सोबत घेतले, तिला मनसे बरोबर व्यवहार का जमत नाही? तिथे मग राजकीय भूमिका व विवादापेक्षा व्यक्तीगत कारणेच प्रभावी आहेत हे लपून रहात नाही.

   हा मामला दोन भावातला आहे. पण राजकारणात भांडणे तिसर्‍याला लाभदायक ठरणार असतील, तर लवचिक भूमिका घेऊन तडजोडी कराव्या लागतात. बाहेरच्या शत्रूशी लढताना एकमेकांवर हल्ले नाहीत. आणि बाहेरचे संकट नसताना एकमेकांशी लढू, हा पवित्रा कोणी नाकारत नाही. बांगलादेश युद्ध सुरू झाले तेव्हा विरोधातल्या अटलबिहारी बाजपेयी यांनी इंदिराजी आमच्या एकमुखी नेत्या आहेत असे जाहिरपणे सांगितले होते. तेवढेच नाही तर त्यांना रणचंडी असे आदराने संबोधले होते. त्याचा अर्थ त्यांनी आपला पक्ष गुंडा्ळला नव्हता. युद्ध संपल्यावर पुन्हा इंदिरा चिरोधी राजकारण सुरू झालेच होते. भांडण केव्हा आणि परस्पर सहकार्य कशासाठी, याचे राजकारणात भान ठेवावे लागते. कारण भांडण्यासाठी दोघांना आपापले अस्तित्व टिकवणे भाग असते. आपल्या भांडणाचा लाभ तिसर्‍याला देऊन, आपणा दोघांना संपवण्याची त्याला आयती संधी द्यायची नसते. त्याला राजकारण म्हणत नाहीत.

   उद्धवनी त्याचे भान सोडलेले दिसते. राजला त्याचे पुर्ण भान आहे. म्हणूनच सेनेचा विरोध करताना राष्ट्रवादी वा कॉग्रेस शिरजोर होणार नाहीत, अशा चाली खेळत त्याने तटस्थता, पाठींबा, विरोधाची हत्यारे सावधपणे उपसली आहेत. त्यातून सेनेचे शिवसैनिक, बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता, मराठीप्रेमी अशा सर्वाची सहानुभूती मिळवण्याचे डाव राज ठाकरे यशस्वीपणे खेळत आहेत. तेच डाव उद्धव यांनी या राजकीय भांडणात खेळायला हवेत. कारण त्यात त्यांचाही राजकीय लाभ आहेच. उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली वा नाशिक महापालिकांमध्ये सेनेपेक्षा मनसेने कॉग्रेस राष्ट्रवादीचे नुकसान केले, हे विसरून चालेल काय? जिथे मनसे आपल्या शत्रूला कमकुवत करते आहे, तिथे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणे यालाच राजकारण म्हणतात. साध्या भाषेत त्याला पाहुण्याच्या हाताने साप मारणे म्हणतात. याचे कुठलेही भान असते, तर उद्धवनी नाशिकची संधी हातची जाऊ दिली नसती.

   राहिला प्रश्न मनसेचे आमदार त्यांच्याकडे पाठींबा मागायला जाण्याचा. ठाण्याचे सेना आमदार राजकडे गेले होते. तसेच नाशिकचे मनसे आमदार आपल्याकडे यावेत, ही उद्धवची अपेक्षा होती. त्यांनी तसे सुचित केलेही होते. पण एकूण गणित बघता राजला तशा उघड पाठींब्याची गरज नव्हती. उद्धव असोत, की भुजबळ असोत, ते मनसेला स्वबळावर पाडण्याच्या स्थितीत नव्हतेच. आणि तिरंगी लढतीत वा कुणाच्याही तटस्थतेने मनसेचा उमेदवार हरणार नव्हता. मग राज वा मनसे आमदारांनी झोळी घेऊन, उद्धवकडे येण्याची अपेक्षाच चुकीची नव्हती काय? कारण इथे बहुमताचा आकडा महत्वाचा नव्हता तर सर्वाधिक मते मिळवण्याला महत्व होते. ती राजकडे होतीच. त्यामुळे उद्धवच्या सेनेचा वाघ नुसताच गुरगुरत झोपला तर राजचा ’यतीन’ वाघ झेपावला आणि शिकार करुन मोकळा झाला.
------------------------------------------------------------
पुण्यनगरी (प्रवाह) रविवार १८ मार्च २०१२

1 टिप्पणी:

  1. ठाण्याच्या महापौर निवडणुकीत राजकिय अभिनिवेश बाजूला सारत राज यांनी सेनेचा महापौर निवडून आणण्यात बिनशर्त्(?)मदत केली....आणि त्याबदल्यात फक्त सेनेने नाशिकात मनसेचा महापौर निवडून आणण्यात उदार मनाने मदत करावी अशी नि:स्वार्थी अपेक्षा व्यक्त केली...सध्या सेनेच्या चाणक्यांचा बुद्धीभ्रंश झाला आहे हे सर्वश्रुत झालय ...तेंव्हा अपेक्षित होते त्याप्रमाणेच सेनेने नाशकात मनसेचा महापौर होऊ न देण्याचा चंग बांधला पण मनसेने कुणाचीही मदत न घेता डावपेचाने यतिन वाघ यांना महापौरपदी .बसवले...नाशकात सेनेने मदत न केल्याचा रोष बाळगत ठाण्यात सेनेला स्थायीसमितीचे सभापतीपद मिळू नये म्हणून परराष्ट्रवादीच्या अव्हाडांशी अर्थात असंगाशी संग करत राज यांनी स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीच्या पदरात टाकले पण क्षणिक रोषापायी नाशकातले स्थायीसमितीचे सभापतीपद देखिल गमावाले..आणि नाशकात मनसेच्या पाठीत खंजिर खुपसला कुणी तर ज्यांच्यावर भिस्त ठेवली आणि ज्यांना ठाण्यातले स्थायीसमितीचे सभापतीपद मिळवून देण्यासाठी राज यांनी आपली विवेक बुद्धी ज्या आव्हाडांच्या पायाशी गहाण टाकली त्याच आव्हाडांच्या परराष्ट्रवादीने ......दुसर्‍यासाठी खड्डा खणताना आपणही त्या खड्ड्यात पडू शकतो यावर आता मनसे अध्यक्षांचा विश्वास बसला असेलच...
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

    उत्तर द्याहटवा