रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

अगतिक पत्रकारितेचे व्यथापुराण

ऑगस्ट महिन्यात माझ्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगच्या वाचनाची संख्या दहा लाख पार करून गेली. अवघ्या २५ महिन्यात ह्या माध्यमातून मिळालेला इतका प्रतिसाद मलाही थक्क करून गेला. काही तरूण मित्रांच्या आग्रहाखातर मी सोशल माध्यमात आलो. साडेचार दशके छपाई माध्यमात काम केलेल्या माझ्यासाठी संगणकावर टंकलेखनही अशक्य होते. भले इमेल वा अन्य कारणासाठी संगणक वापरत असलो तरी कधीकाळी मराठीत टंकलेखनानेच लिखाण करीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्याचेही कारण आहे. सलग शाईच्या पेनने लिहायच्या सवयीतून बाहेर पडून बॉलपेन वापरणेही ज्याला शक्य झाले नाही, त्याला टंकलेखनाचा विचारही कसा शक्य होता? एकप्रकारे हटवाद वा आडमुठेपणा म्हणायला हरकत नाही. पण २००९ च्या सुमारास ‘पुण्यनगरी’ दैनिकात ‘उलटतपासणी’ हे दैनंदिन सदर लिहू लागलो आणि त्याच्या लोकप्रियतेने माझ्यात हा मूलभूत फ़रक घडवून आणला. तिथे लेखाच्या शेवटी माझा मोबाईल क्रमांक छापलेला असायचा आणि नित्यनेमाने वाचकांच्या तुडुंब प्रतिक्रिया येत असत. त्यामध्ये शेकड्यांनी तरूण व विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याच मुलांनी ब्लॉग-फ़ेसबुक अशा सोशल माध्यमात येण्यासाठी माझा पाठलाग सुरू केला. पण नव्याने टंकलेखन शिकून नेहमीच्या गतीने लिहीणे शक्य नसल्याचे सांगत मी टाळाटाळ करत राहिलो. मात्र त्यातले दोन तरूण कमालीचे चिवट निघाले. लागोपाठ तीन दिवस घरी येऊन माझ्या जणू मानगुटीवर बसले आणि त्यांनी मला प्रयत्न करायला भाग पाडले. ब्लॉग वा फ़ेसबुकवरचा माझा वावर हे त्यांचे कर्तृत्व आहे. तीन आठवडे सलग रिकाम्या वेळात टंकलेखनाचा सराव केल्यावर मला गती आली आणि थेट टंकेलेखनाने लेख लिहीण्यापर्यंत मजल मारू शकलो. मग वृत्तपत्रासाठी लिहीलेले लेख अशा माध्यमातून वापरू लागलो. मला त्यासाठी आग्रह धरणार्‍या त्या मुलांचा मुद्दा तेव्हा पटला नव्हता. पण आज त्याची महत्ता लक्षात येते.

तशी ती दोन्ही मुले इंजिनीयरींगचे विद्यार्थी होती आणि ‘पुण्यनगरी’कडे तसा सुशिक्षित वाचक फ़ारसा नव्हता. मग अशी मुले त्या दैनिकात माझे वाचण्यापर्यंत कशामुळे आली, याचे मलाही नवल वाटायचे. तर त्यांचे दुखणे वेगळेच होते. त्यांना माझे आवडलेले लेख आपल्या मित्रांना पाठवायचे असत आणि स्कॅन करून पाठवले तरी वाचायला त्रासदायक व्हायचे. पण ते मित्रांनी व त्यांच्या पिढीने वाचून विचार करायला हवा असा त्यांचा अट्टाहास होता. त्यातून ते माझ्या मानगुटीवर बसायला आलेले होते. ब्लॉगमुळे ते काम सोपे होईल असे त्यांचे मत होते. कारण होते माझी सडेतोड कोणालाही झोडपून काढणारी लेखनशैली! आजकाल कोणी इतके स्पष्ट व नाव घेऊन बेधडक लिहीत नाही आणि उलगडून राजकारण समजावत नाही. अन्य वृत्तपत्रातही तितके परखड लेखन नसते, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. त्यातून २०१२च्या पुर्वाधात मी या माध्यमाकडे वळलो. फ़ेब्रुवारीच्या शेवटी माझे ‘पुण्यनगरी’तले लेख ‘उलटतपासणी’ याच नावाने ब्लॉग म्हणून प्रकाशित करू लागलो. त्याचा सारांश फ़ेसबुकवर टाकायचा आणि ब्लॉगचा दुवा जोडायचा. मग ज्यांना आवड असेल त्यांनी तिथे जाऊन संपुर्ण लेख वाचावा, अशी अपेक्षा होती. मात्र अशा रितीने वाचक गोळा होईल वा इंटरनेटच्या माध्यमातून वाचक इकडे मोठ्या प्रमाणात वळू शकतो, यावर माझा फ़ारसा विश्वास नव्हता. कारण इंटरनेट म्हणजे कटकटी, त्यासाठी संगणक हवा आणि तेवढ्या छोट्या पडद्यावर सरकून सरकून लेख वाचायचा, हे खुप त्रासदायक असल्याने माझे ठाम मत होते. पण सगळेच लेख निदान एका जागी सुरक्षित रहातात व जगाच्या पाठीवरून कुठेही ते मिळवता येतात, ही मला माझ्यासाठी सोय वाटली होती. म्हणून मार्च २०१२ पासून सातत्याने ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग प्रकाशित होऊ लागला. फ़ेसबुकवर मित्र परिवार वाढण्यावर त्याचे भवितव्य अवलंबून होते आणि हळुहळू ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचत होता. त्यात एक लाख लोकांनी ब्लॉगवरचे लेख वाचायला एक वर्षापेक्षा अधिक काळ गेला आणि योगायोग असा, की तोपर्यंत माझ्या ‘पुण्यनगरी’तल्या स्तंभावर गदा आली. हल्ली कुठलेही वृत्तपत्र आपल्या पायावर उभे राहू शकत नाही. त्याच्यापाशी उधळायला बुडवायला प्रचंड पैसा हवा किंवा राजकारण्याचा आशीर्वाद हवा. सहाजिकच त्यांच्या मर्जीला धुडकावून वृत्तपत्र चालवता येत नाही.

माझी पत्रकारिता नेहमी आडमुठी व स्वयंभू राहिली आहे. व्यावसायिक तडजोडी मला जमल्या नाहीत. म्हणून त्या आडमुठेपणाची ‘पुण्यनगरी’ने किंमत मोजावी असा होत नाही. माझे लेखन लोकप्रिय असले तरी त्या वृत्तपत्राच्या हिशोबाला परवडणारे नव्हते. सहाजिकच तिथून मे २०१३ मध्ये ‘उलटतपासणी’ बंद पडली. त्याबाबत चौकशी करणारे शेकडो फ़ोन पुढल्या काळात येत राहिले. याचा अर्थ लोकांना माझे लिखाण वाचायचे होते. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन माझ्यापाशी नव्हते. पण आता गप्प बसण्याचीही गरज नव्हती. मला लिहायचे ते मुठभर लोकांपर्यंत घेऊन जाणारा ब्लॉग माझ्या हाताशी होता. मजेची गोष्ट अशी, की मे २०१३ मध्ये ‘पुण्यनगरी’तला स्तंभ बंद पडल्यावर मी फ़ारसे त्या ब्लॉगवर नव्याने लिहीले नाही. अगदी महिन्यातून तीन चार लेख सवड मिळतील तसे लिहायचो. पण आधीचे लेख होते. त्यातले संदर्भ असणारी घटना घडली, मग तेवढी नवी बाब सांगून जुन्याच लेखाचा दुवा फ़ेसबुकवर टाकायचो. पण तेही जुने लेख अगत्याने वाचणारा वा़चक मिळतच राहिला. मे २०१३ मध्ये ब्लॉगचे नित्यनेमाने लेखन थंडावले तोपर्यंत केवळ लाखभर लोकांनी ते लेख वाचलेले होते. पण त्यात आणखी ३०-४० लेखांची अडीच वर्षात भर पडली असूनही आज त्याची वाचनसंख्या तब्बल चार लाख ओलांडून पुढे गेली आहे. म्हणजे शिळेपाके म्हणावे असे तेच जुने लेख ताजे असताना वाचले गेले, त्याच्या तिप्पट नंतरच्या दोन वर्षात वाचले गेले. हा सगळा प्रकार मला तरी धक्कादायक वाटला.

मग काही दिवस तसेच गेले आणि नव्याने ब्लॉगवर लक्ष द्यायचे ठरवले. जुना शिक्का नको म्हणून ‘जागता पहारा’ असा नवा ब्लॉग लिहायचा सपाटा लावला. रोजच तिथे लिहायचा चंग बांधला. जणू दैनिक असावे, तसे तिथे काहीतरी रोज लिहायचा छंद जोपासला. जुलै २०१३ मध्ये त्याची सुरूवात झाली आणि आज ११ लाखाचा टप्पा ओलांडून हा ब्लॉग पुढे गेला आहे. नेमके सांगायचे तर २५ महिन्याच्या कालखंडात या ब्लॉगला अकरा लाख वाचनसंख्या लाभली आहे. अजूनही मला त्याचे नवल वाटते. कारण जुन, जुलै व ऑगस्ट अशा तीन महिन्यात लागोपाठ एक लाखाची संख्या तिथे आलेली दिसते आहे. ब्लॉग हे दैनिकाप्रमाणे लोक वाचतात, असा त्याचा अर्थ होतो. कुठल्या वर्तमानपत्र वा वाहिनीच्या संकेतस्थळाशी माझा ब्लॉग निगडीत नाही. निव्वळ फ़ेसबुक मित्र व त्यांनी पुढे सरकवलेले दुवे यातून ब्लॉगची वाचक प्रियता इतकी मोठी होऊ शकते, हा चकित करणारा प्रकार मला वाटला. पण आयुष्य छपाई माध्यमात घालवले असल्याने मला नेहमीच या माध्यमाच्या प्रसाराबद्दल शंका वाटत राहिली. म्हणून इतके लोक असा ब्लॉग कशासाठी वाचतात आणि इतके कटकटीचे असताना का वाचतात? आवडलेले लिखाण वाचणे अपेक्षित असते. पण बाजारात डझनावारी वृत्तपत्रे स्वस्तात, किंबहूना फ़ुकट म्हणावी इतक्या नगण्य किंमतीत उपलब्ध असताना, माझ्यासह अनेकांचे ब्लॉग इतके लोकप्रिय कशामुळे होतात, हा प्रश्न मला सतावत राहिला. त्याचे उत्तर शोधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहिली, ती पत्रकारितेच्या विश्वासार्हतेची! सोपे स्वस्त छपाई माध्यम उपलब्ध असताना आज सोशल मीडीया म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशा माध्यमांकडे वाचक कशामुळे आकर्षित झाला आहे? तर त्याला प्रचलित मुख्य प्रवाहातील पत्रकार संपादकांची दिवाळखोरी कारणीभूत आहे, असेच माझे ठाम मत झाले आहे. अर्थात तो त्या पत्रकार पेशापुरता विषय असता तर गोष्ट वेगळी! पण विषय तितका मर्यादित नाही. तो समाजातील प्रबोधनात्मक माहितीविषयक आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणूनच आज घसरगुंडीला लागलेल्या पत्रकारिता व लोकप्रिय होत चाललेल्या सोशल माध्यमांचा गंभीर उहापोह आवश्यक बाब बनली आहे.

नुसतीच वृत्तपत्रांची लोकप्रियता घटलेली नाही. त्यांना बाजारात तग धरून टिकण्यासाठी लाजिरवाण्या कसरती कराव्या लागत आहेत. उदाहरणार्थ आपण आजच्या वृत्तपत्रिय बाजारातील विविध योजनांकडे बघू शकतो. कोणी वाचकांना आकर्षित करण्यासाठी अकस्मात पाच रुपयाची किंमत एक रुपया इतकी खाली आणतो, तर दुसरा कोणी रोजच्या अंकात काही कुपन छापून ती गोळा करण्याची स्पर्धा लावून लाखांची बक्षिसे जाहिर करतो. कोणी सहा महिन्यांसाठी अवघी दोनशे दिडशे रुपये वर्गणी भरून घरपोच अंक मिळण्याचे आमिष दाखवतो. तेव्हा नवल याचे वाटते, की हे लोक काय विकायला निघाले आहेत? वृत्तपत्र की साबण? तीन वड्या घेतल्यास चौथी वडी फ़ुकट, अशा उत्पादनाचा खप वाढवण्याच्या विविध योजना विसाव्या शतकाच्या अखेरीस झळकायच्या. ज्या वर्तमानपत्रात त्या झळकायच्या, ती वृत्तपत्रे आज त्याच बाजारू उत्पादनाच्या पद्धतीने आपला खप वाढवण्याची स्पर्धा कशाला करीत आहेत? जवळपास फ़ुकट वर्तमानपत्र घरी मिळेल, असे सांगायचे बाकी राहिले आहे. अशा योजना आणायला त्या वृत्तपत्रांकडे पैसा कुठून आला, असा प्रश्न कोणाला कशाला पडलेला नाही? अर्थात अशा फ़ुकट वा अल्पदरात मिळण्याने कुठलेही उत्पादन खपात वाढ दाखवू शकत नसते. आपण जो माल विकत घेतो, त्यात काही उपयुक्तता असावी, अशीही ग्राहकाची अपेक्षा असते, पुर्वीच्या काळात भांडवली वृत्तपत्रांनी वैचारिक वृत्तपत्रांना संपवण्यासाठी अधिक पाने कमी किंमतीत देवून बाजी मारली होती. मात्र त्यासाठी नुसतीच पाने अधिक दिली नव्हती, की लोकांनी ती जास्त व स्वस्त पाने घेतली नव्हती. त्यातली वाचनीयता टिकवण्याची काळजी त्यातले संपादक पत्रकार घ्यायचे आणि ग्राहकही रद्दी विकून येणार्‍या पैशावर डोळा ठेवून असायचे. आज कोणी रद्दीसाठी वर्तमानपत्राची चळत घरात बाजूला जपून ठेवत नाही. म्हणूनच वाढीव पानांची रद्दी ग्राहकाला आकर्षित करीनाशी झाली आहे. म्हणूनच अधिक पाने व कमी किंमत आकर्षण उरलेले नाही. पण दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. आज वाढलेल्या पानामध्ये वाचाय़चे काय, असा प्रश्न वा़चकाला सतावतो. कारण कुठल्याही वृत्तपत्राला आपला चेहरा वा काही ओळख उरलेली नाही.

गोविंद तळवलकर म्हणजे तर्कशुद्ध बुद्धीवादी अग्रलेख वा विवेचन किंवा निळूभाऊ खाडीलकर म्हणजे आक्रमक व सोप्या भाषेतील समजावणारे लेखन अशी ओळख आता कुठल्या वृत्तपत्राला उरली आहे? माजगावकरांचा ‘माणूस’, बेहर्‍यांचा ‘सोबत’ आणि नुसत्याच सविस्तर माहितीचे ढिग समोर टाकणारा ‘स्वराज्य’ ही ओळख आज कुठल्या नियतकालिकाला राहिली आहे? कुठलेही वृत्तपत्र घ्या आणि त्याच्यावरचे नाव बदला काहीही फ़रक पडत नाही; अशी सर्व ओळख हरवलेली वॄत्तपत्रे झाली आहेत. त्यातला कुठला मजकुर अगत्याने वाचावा, अशी स्थिती उरलेली नाही. साप्ताहिक, मासिक वा दैनिक अशा कुठल्याही प्रकारच्या नियतकालिकाला आपला असा चेहरा नाही. ही खरी समस्या आहे. एका बाजूला ही दुर्दशा आहे आणि दुसरीकडे त्यातील लेखनाची वाचनीयता जवळपास संपलेली आहे. एक ठराविक पद्धतीची पोपटपंची व खात्रीपुर्वक चुकीची माहिती, इतकीच हमी कोणीही देऊ शकतो. कालपरवाचीच गोष्ट घ्या. महाराष्ट्र सरकारने अविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा अध्यादेश काढला म्हणून गदारोळ सुरू झाला. त्याला ‘लोकसत्ते’ची हेडलाईन कारणीभूत झाली. बातमी लिहीणार्‍याला सरकारी किचकट भाषा उमजली नाही आणि त्याने अकलेचे तारे तोडल्यावर कल्लोळ सुरू झाला. वाहिन्यांवर त्याचे धुमशान झाले. पण ज्या विषयावर बोलत आहोत, तो निदान आपण समजून घ्यावा, अशी कुणाला इच्छाही झाली नाही. प्रत्यक्ष गोष्ट नेमकी उलटी होती. ज्या दंडविधान कलमाने अविष्कार स्वातंत्र्याच्या राज्यघटनेतील तरतुदीला बाधा येते, त्याच्या संबंधात कोणती काळजी घ्यावी, त्याविषयीच्या सूचना अंमलदारांना देण्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलेले होते. तेही हायकोर्टाच्या आदेशान्वये काढलेले होते. म्हणजे जे होऊ नये त्याची काळजी सरकारने घेतली, तेच नेमके सरकार करणार असल्याचा उफ़राटा गवगवा या बातमीने केला. जसजसा त्यातला मुर्खपणा लक्षात आला तसतसा एकेकाने पाय काढता घेतला. पण मूळ बातमी देणार्‍या ‘लोकसत्ता’सह कोणीही आपल्या चुक वा मुर्खपणाची माफ़ी मागण्याचे सौजन्य दाखवले नाही. ही आजची बेताल व बेजबाबदार पत्रकारिता आहे. मग लोकांनी ते वाचावे कशाला आणि त्यावर विश्वास तरी कसा ठेवावा? तीस चाळीस वर्षापुर्वी कुठल्याही भाषेतील वृत्तपत्रात इतका राजरोस व ठळक मुर्खपणा होऊ शकला असता काय? मथळ्याची अशी खोटी बातमी देवूनही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य संपादक दाखवत नाहीत, ही आजच्या पत्रकारितेची गुणवत्ता वा सभ्यता झाली आहे. अर्थात हा नुसता नमूना आहे. रोजची सर्व दैनिके गोळा केली आणि त्यातला बेतालपणा व मुर्खपणा दाखवायचा म्हटले, तर दहा बारा पानी स्वतंत्र दैनिकच चालवले जाऊ शकेल, इतका भरपूर मालमसाला आज उपलब्ध असतो.

जेव्हा असा बेतालपणा वा खोटेपणा बेदरकारपणे होऊ लागतो, तेव्हा तो लपून रहात नाही आणि सामान्य जनतेच्याही लक्षात येऊ लागतो. तेव्हा तुमची विश्वासार्हता लयाला गेलेली असते. मग खरी वा वास्तविक माहिती मिळवण्यासाठी लोक अन्य मार्ग शोधू लागतात. पुर्वी त्यासाठी काही सोयी नव्हत्या. पण आज इंटरनेट, गुगल अशा अनेक मार्गाने कोणीही भरपूर माहिती विनाविलंब मिळवू शकत असतो तपासुन बघू शकत असतो. मोबाईल फ़ोन, व्हाटसप, फ़ेसबुक, अशा कित्येक साधनांनी कोणालाही योग्य माहिती सहज उपलब्ध होण्याचे मार्ग प्रशस्त झाले आहेत. थोडक्यात पत्रकार वा वाहिन्या वा त्यांच्या हातातली माध्यमे, ह्यांची माहिती क्षेत्रातील मक्तेदारी कधीच संपुष्टात आलेली आहे. उपरोक्त ज्या परिपत्रकाच्या बातमीने गोंधळ उडाला, तेव्हा फ़ेसबुक माध्यमातून शेकडयांनी परिचित माझ्याकडे त्याची चौकशी करू लागले. माझे मत व खरेखोटेपणा विचारू लागले. काहींनी तातडीने ब्लॉगवर लेख टाकायचा आग्रह धरला. पण मला प्रत्यक्ष परिपत्रकाची प्रत मिळालेली नव्हती. मात्र मूळ बातमीचा गोंधळ वाचताच लक्षात येत होता, पण त्यांना चुकीचे ठरवण्याच्या घाईत माझ्याकडूनही उतावळेपणाने नवी चुक होण्याचा धोका होता. जेव्हा तशी प्रत मिळाली, तेव्हा मला धक्का बसला. पण जे मला खटकले होते तेच शेकडो लोकांना खटकले होते आणि त्याला मी वाचकाच्या प्रगल्भतेचे लक्षण मानतो. खरे म्हणजे तेच आजच्या पत्रकारितेपुढले मोठे आव्हान झालेले आहे. आम्ही छापू वा सांगू तेच निमूटपणे मान्य करा वा स्विकारा; असे म्हणायचे दिवस सोशल माध्यमांनी संपवले आहेत. शिवाय थेट संपर्काची व शोधाची साधने सहज उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण काय सांगत वा लिहीत आहोत, त्याविषयी काटेकोर असणे पत्रकारांसाठी सक्तीचे झाले आहे. मात्र त्याचे तसूभर भान आजच्या पत्रकार संपादकांमध्ये दिसत नाही. आपण प्रतिदिन विश्वासार्हता गमावत आहोत, याचेही भान पुर्णपणे सुटलेले आहे. त्याची सुरूवात आता झालेली नाही, तर आज दिसत आहेत ते दोन दशकापुर्वीच्या पापाचे दुष्परिणाम आहेत.  

साधारण तीन दशकापुर्वी याची सुरूवात झाली असे म्हणता येईल. आणिबाणी लादून इंदिरा गांधी यांनी अवघ्या देशालाच तुरूंगात टाकले होते. वास्तविक तेव्हा आजच्या इतकी माध्यमे शक्तीशाली नव्हती. पण त्यांचा शब्द प्रभावशाली नक्कीच होता. कारण जे छापून यायचे त्यावर सामान्य जनतेचा कमालीचा विश्वास होता. अमूकतमूक आपण पेपरात वाचले आहे, असे लोक मोठ्या छातीठोकपणे सांगत असायचे. त्याचा अर्थ असा, की वृत्तपत्रात छापून आले म्हणजे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे, असे लोक गृहीत धरायचे. मात्र त्यात खोटेपणा असू नये याचीही तितकी काळजी पत्रकारांकडून घेतली जात असे. माहितीची अन्य साधने सामान्य लोकांपाशी नव्हती. साधा घरातला फ़ोन खेड्यापाडयात पोहोचला नव्हता. त्यामुळे वर्तमानपत्र हाच माहितीचा एक मार्ग लोकांपाशी होता. म्हणूनच वर्गणीवर ‘माणुस’ वा ‘सोबत’ यासारखी साप्ताहिके चालू शकत होती. त्यातून लोकांचे होणारे प्रबोधन पुरेसे होते. शिवाय कुठल्याही तालुक्यापर्यंत पोहोचलेली वृत्तपत्रे आपल्या लेख व अग्रलेखातून जनतेचे शंकानिरसन करायचे व्रत असल्याप्रमाणे काम करायची. किंबहूना त्यात शुद्धलेखनाची चुक राहिली तरी चर्चेचा विषय व्हायचा. ‘अमृत’सारख्या माहितीपुर्ण मासिकात ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ असे एक वाचकांसाठी सदर होते. त्यात कुठल्या वर्तमानपत्रात काय मुद्रणदोष राहिला व त्यातून कोणती गंमत तयार झाली, त्याला प्रसिद्धी दिली जात असे. खेरीज ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ असेही एक मजेशीर सदर कुठल्या तरी नियतकालिकात होते. त्यातून वाचक किती सुबुद्ध व जागरूक होता, त्याची साक्ष मिळू शकते. आज असे एक अख्खे दैनिक काढता येईल, अशी परिस्थिती आहे. कारण छपाईपुर्वी लिखाणावर करडी नजर फ़िरत नाही, की अग्रलेखातही भयंकर चुका असतात. अशी स्थिती कशामुळे आली? त्याची सुरूवात आणिबाणी उठल्यावर अविष्कार स्वातंत्र्य हे राजकीय हत्यार बनव्ण्यापासून झाली. आपापले राजकीय हेतू व अजेंडा पु्ढे सरकवण्याची प्रवृत्ती माध्यमात घुसू लागली. त्यातून कुठल्याही वर्तमानपत्रात जो तटस्थपणा होता, तो क्रमाक्रमाने लयाला जाऊ लागला. त्याच्याही आधीच्या काळात विविध राजकीय पक्ष वा संघटनांची मुखपत्रे होती. पण त्यांना वगळता बाजारात मिळणारी अन्य वृत्तपत्रे कुठल्याही अजेंड्यापासून अलिप्त असायची. साधारण १९८० नंतरच्या काळात त्यापासून वृत्तपत्रसृष्टी हळुहळू ढळत गेली.

राजकारणात आपला अजेंडा मागे पडलेला बघून डाव्या विचारसरणीच्या अनेकांनी माध्यमांच्या प्रभावाखाली आपला अजेंडा पुढे रेटण्याचा पवित्रा घेऊन माध्यमांच्या क्षेत्रात उडी घेतली. ठराविक विचारसरणी व भूमिकांचा आग्रह लिखाणातून व विवेचनातून डोके वर काढू लागला. डाव्यांमध्ये असलेले अनेक अभ्यासक व व्यासंगी लोक योजनापुर्वक त्यात आले आणि त्यांनी पुढल्या काळात महत्वाच्या वृत्तपत्रात आपले बस्तान बसवले. एकदा तेवढे साध्य गाठल्यानंतर तर भिन्न विचारांच्या कोणालाही तिथे शिरू द्यायचे नाही; असा परिपाठच होत गेला. त्यामुळे १९९० साल उजाडताना समाज एका बाजूला व वर्तमानपत्रातला बुद्धीवाद दुसर्‍या टोकाला; अशी विभागणी होत गेली. अनेक राजकीय विषय, मुद्दे व प्रकरणे अशी दाखवता येतील, की जनमानसाला तयार करण्याचा अजेंडाच माध्यमातून राबवला जात असावा, तसे लिखाणाचे स्वरूप होत गेले. उदाहरणार्थ एका बाजूला सुप्रिम कोर्टाने शहाबानु खटल्यात महत्वाचा निर्णय दिला होता. पण त्याला मुस्लिम धर्मांधांनी विरोध केला आणि निकालाचे समर्थन करायला भाजपा संघ पुढे सरसावले होते. तर बोटचेपी भूमिका घेत राजीव गांधी यांनी कोर्टाचा निर्णय उलटा फ़िरवला. त्यामुळे एकूण बहुसंख्य हिंदू समाजात संतापाची भावना तयार झाली. तेव्हा कुठल्याही बुद्धीप्रामाण्यवाद्याने कोर्टाच्या समर्थनाला उभे रहाणे संयुक्तीक ठरले असते. त्यासाठी मुस्लिम धर्ममार्तंडांचे कान उपटणे, ही वर्तमानपत्रांची व पत्रकारितेची नैतिक जबाबदारी होती. पण संघ हिंदूत्ववादी कोर्टाच्या समर्थनाला उभे रहातात म्ह्टल्यावर माध्यमात दबा धरून बसलेल्यांनी पुरोगाम्यांनी कोर्टाच्या निकालाचीही पाठराखण करण्याचे साफ़ टाळले. त्यातून जी अस्वस्थता तयार होऊ लागली, त्याला खतपाणी घालून संघाच्या शाखा अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय घेऊन पुढे आल्या. शहाबानू प्रकरणाने अस्वस्थ झालेल्या बहुसंख्य हिंदू समाजाला त्याचे प्रतिक्रिया म्हणून आकर्षण वाटू लागले. कोर्टालाही जर मुस्लिम धर्मांधता जुमानणार नसेल, तर त्यांना राजकीय उत्तर देणेच आवश्यक आहे, अशी धारणा त्यातून वाढीस लागली. त्याला अर्थात राजीव गांधी यांचे बोटचेपे धोरण जितके जबाबदार होते, तितकाच पत्रकारितेचा पक्षपाती पवित्राही कारणीभूत होता. इथून मग पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला खरा फ़टका बसू लागला. तटस्थपणे जे समाजाच्या सामुहिक हिताचे व राष्ट्रहिताचे आहे त्याला आपल्या राजकीय हेतू व कारणास्तव गुंडाळून ज्यांनी तेव्हा लेखण्या चालवल्या, त्यांनीच राजकीय विश्वासार्हता व पर्यायाने पत्रकारितेला सुरूंग लावला होता. त्याचा परिणाम काय झाला?

१९७७ साली कॉग्रेस व इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनतेने दिलेला कौल ज्यांनी धुळीस मिळवला, तेच लोक तीच भूमिका घेऊन आता वर्तमानपत्रात दबा धरून आपला अजेंडा पुढे करत होते. थोडक्यात मुठभर समाजवाद्यांनी जनता प्रयोगाला सेक्युलर भूमिका रेटून सुरूंग लावल्याने त्यांची राजकीय विश्वासार्हता घसरलेली होती. तेच आता माध्यमातून राजकीय अजेंडा राबवून संघ वा हिंदुत्वविरोधी अजेंडा पुढे रेटत होते. पण प्रत्यक्षात त्यासाठी चाललेल्या बौद्धिक कसरती सामान्य जनतेला पटणार्‍या नव्हत्या. म्हणूनच पत्रकारिताही शंकास्पद भासू लागली. १९९० चे दशक सुरू होईपर्यंत पत्रकारितेवर डाव्या विचारसरणीने पुरता पगडा मिळवलेला होता आणि त्याच दरम्यान जगाचा चेहरामोहरा बदलू लागला होता. भारतातील राजकीय समिकरणे बदलू लागली होती. पुन्हा नवा जनता प्रयोग सुरू झाला आणि ज्या संघाला बाजूला ठेवण्यासाठी १९८० पुर्वी जनता पक्ष मोडला होता, त्याच संघाच्या राजकीय आघाडी असलेल्या भाजपाला सोबत घेऊन नव्याने डाव्यांना समिकरण मांडावे लागले होते. पण तेही नेहमीप्रमाणे फ़सले आणि पुन्हा कॉग्रेसला सत्ता मिळाली. मात्र दरम्यान भाजपा हा देशातला पर्यायी राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता. त्याला जितके राजकारणात वावरणारे पुरोगामी कार्यकर्ते व नेते जबाबदार होते, त्यापेक्षा अधिक माध्यमात दबा धरून बसलेले डावे लेखक पत्रकार कारणीभूत होते. एका गटाने राजकीय विश्वासार्हता लयाला नेली, तर दुस‍र्‍याने पत्रकरितेसह बौद्धिक विश्वासार्हता रसातळाला नेली. योगायोग असा, की याच दरम्यान जगाची आर्थिक व राजकीय रचना आमुलाग्र बदलू लागली होती. तांत्रिक यांत्रिक प्रगतीने जगण्याचे संदर्भ बदलू लागले होते. जुन्या संकल्पना, व्यवस्था व रचना ढासळून पडत होत्या आणि पर्यायाने समाजातील परस्पर संबंधांच्या व्याख्याही बदलू लागल्या होत्या. पण मजेची गोष्ट म्हणजे त्याचेही अर्थ व अन्वय जुन्याच कालबाह्य संदर्भात लावण्यात हेच डावे पत्रकार गर्क होते. आपण लिहीतो वा सांगतो, त्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, अशा भ्रमात त्यांची पत्रकारिता चालू राहिली आणि निकामी निरूपयोगी होत गेली. लोक पर्याय शोधू लागले होते आणि नवे पर्याय पुढे येऊ लागले होते.

१९९० नंतरच्या दशकात अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलला आणि परमीट-लायसन्सचा जमाना मागे पडला. खुली अर्थव्यवस्था भांडवलदारीच्या तालावर नाचू लागलेली होती आणि त्याच अर्थव्यवस्थेवर स्वार झालेल्या सत्तेला व सत्ताधीशांना खेळवण्यासाठी नवे साधन पैसेवाले, भांडवलदार शोधू लागले होते. कालपर्यंत सरकारने निश्चीत केलेल्या धोरणानुसार आपल्या लायसन्स वा परमीट मिळवण्याच्या रांगेत ताटकळत उभे रहाणार्‍यांना आता आपल्या धोरणानुसार सरकार चालावे, अशा महत्वाकांक्षांनी घेरले होते. मात्र त्यासाठी आता राजकीय नेते वा पक्षांची गरज उरली नव्हती. तर त्यांच्यावर लगाम असल्याप्रमाणे वापरता येईल, असे काही साधन शक्य दिसू लागले होते. राजकीय पक्ष व नेतेही आता जनतेचे सेवक उरले नव्हते, तर राजकारण पैसे कमावण्याचा पेशा झाला होता. त्यांना आपली जनमानसातील प्रतिमा उजळ करणारी साधने हवी होती. थोडक्यात पत्रकरिता हे आजवर प्रबोधनाचे साधन म्हणून विकसित झाले होते, त्याला मध्यंतरीच्या सेक्युलर पत्रकारांनी प्रसिद्धीचे हत्यार करून ठेवले होते. तिथे अशा तमाम लब्धप्रतिष्ठीत संधीसाधूंचे लक्ष गेले. मग हे नवे राजकारणी, व्यापारी, भांडवलदार, संधीसाधू वा दलाल नव्या युगाचे हत्यार म्हणून पत्रकारितेकडे आशेने पाहू लागले होते. त्यांना हे हत्यार आपल्या स्वार्थासाठी वापरायचे होते. मात्र त्यासाठी सुपारीबाज मारेकर्‍यासारखे काम करायला पत्रकार तयार व्हायला हवे होते. पण ती अडचण एव्हाना राहिली नव्हती. पत्रकारितेचे पावित्र्य केव्हाच संपले होते, तो निव्वळ दिवाळखोर धंदा झालेला होता. त्यात उत्पन्नाचे वा गुंतवलेल्या भांडवलाचे काही लाभ शक्य उरले नव्हते. लोकांचा विश्वास नव्हता की वाचनीयता उरलेली नव्हती. सहाजिकच वर्तमानपत्रांना उडवायला पैसे घालणारा कोणी हवा होता आणि पत्रकारांना आपल्या दिवाळखोरीचा बोजा उचलणारा कोणी हवा होता. दुसरीकडे विविध कारणास्तव आपली पापे झाकणारा व आपले हेतू तडीस नेणारा कोणी बुद्धीमान प्रेषित धंदेवाईकांनाही हवा होता. त्यातून मग विसाव्या शतकाच्या अखेरीस बुडीत पैसा घालवणार्‍या माध्यम समुहाचे नवे पेव फ़ुटले. एकाहून एक मोठे उद्योग समुह वा काळापैसावाले करोडो रुपये ओतुन माध्यमात प्रवेश करते झाले. तोवर किरकोळ पगारवाढ वा वेतनश्रेणीसाठी झुंजणार्‍या पत्रकारातील मुठभरांना हाताशी धरून ही मोहिम पार पाडली गेली. अवघी पत्रकारिता एकविसाव्या शतकाच्या उदय होईपर्यंत काळ्यापैशाची बटीक बनून गेली. १३०

कालपरवा ज्या इंद्राणी मुखर्जीचे प्रकरण चव्हाट्यावर आले तो आजच्या माध्यमांचा खरा चेहरा आहे. कोण ही इंद्राणी व तिचा माध्यमांशी संबंध काय? मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकीकरणाने जे भांडवल कुठल्याही देशातून कुठल्याही देशात जाऊ व येऊ लागले, त्याचा परिपाक इंद्राणी मुखर्जी आहे. आसामची एक महत्वाकांक्षी तरूणी जिचे बालपण अत्याचार सोसत गेल्याने सूडभावनेने अवघे नातेसंबंध बघणारी व जग जिंकण्याची मनिषा बाळगलेली ही तरूणी; कुठल्या गुणवत्तेवर देशभरच्या मोठमोठ्या पत्रकारांना बोटावर खेळवू लागली? तो मागल्या पाव शतकातील भरकटलेल्या पत्रकारितेचा इतिहास आहे, म्हणायला हरकत नाही. मुक्त अर्थकारणाच्या आरंभी उपग्रह वाहिन्यांचे तंत्रज्ञान स्वस्तात व सहज उपलब्ध झाले. त्यातून मग स्टार नेटवर्क हे पहिले खाजगी प्रक्षेपण भारतासाठी सुरू झाले. ऑस्ट्रेलियातील मोठा माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक याच्या पैशावर हे नेटवर्क भारतात कार्यरत झाले व केबलमार्फ़त दिसू लागले. तेव्हा इथे पुरेशा कार्यक्रमांची निर्मिती सुद्धा होत नव्हती. वृत्तवाहिनीतर दूरची गोष्ट होती. कारण इथून थेट प्रक्षेपण करायची मुभा नव्हती की तितकी तांत्रिक सज्जता भारतात खाजगी क्षेत्रात झालेली नव्हती. म्हणूनच स्टार नेटवर्कचे प्रक्षेपण हॉंगकॉंग येथून होत असे. तरी त्याचा मुख्याधिकारी पीटर मुखर्जी भारतीय होता व भारतातून सुत्रे हलवित होता. भारतातून मालिकांची निर्मिती व्हावी व प्रक्षेपणही करता यावे, यासाठी त्याचे खास प्रयत्न चालू होते. त्यांच्याच सज्जतेतून काहीकाळ आपले प्रक्षेपण करीत ‘झी’ नामक वाहिनी काही तासाचे कार्यक्रम दाखवत होती. स्टारप्लस, एम टिव्ही व बीबीसी अशा तीन वाहिन्या त्यातून दिसत असत. बहुतेक कार्यक्रम इंग्रजीत होते. पण दूरदर्शनच्या मक्तेदारीला ते आव्हान देऊ लागले. निदान शहरी मध्यमवर्ग त्याकडे वळत होता आणि नवा प्रेक्षकवर्ग तयार व्हायला लागला होता. दिल्लीत नवनवे स्टुडीओ उभारण्याची तयारी सुरू झाली होती. दिल्ली नजिकच्या नॉयडा औद्योगिक परिसरात चित्रनगरीसाठी भुखंड राखीव करून त्याला प्रोत्साहन दिले गेले. पत्रकारितेचे हे नवे भावंड तेव्हा जन्म घेण्याच्या जवळ आले होते. त्यातून मग स्टारने एक एक वाहिनी भारतीय वा हिंदी करण्याचा प्रयास सुरू केला, तर झी स्वतंत्रपणे वाहिनी म्हणून अस्तित्वात आली. नरसिंहराव यांचे सरकार गेले आणि देशात भाजपा नवा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला तोच हा काळ!

भाजपाचे हे यश माध्यमातील सेक्युलर लोकांना नावडते व परवडणारे नव्हते. त्यातून मग भाजपा वगळून सगळे सेक्युलर असा नवा सिद्धांत पुढे आला आणि देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनून गेले. पुन्हा जनता प्रयोग थेट कॉग्रेसच्या मदतीने जगवण्याचा प्रयास झाला आणि दोनच वर्षात अपेक्षेप्रमाणे धुळीस मिळाला. दरम्यान जनता प्रयोगातले काही वैफ़ल्यग्रस्त भाजपाच्या गोटात यायला सुरूवात झाली होती आणि त्यातूनच मध्यावधी निवडणूका अपरिहार्य होऊन शेवटी भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए नावाचे नवे सरकार सत्तेत आले. पण दरम्यान एक नवी सुरूवात राजकारणात अनुभवास आली. १९९८ सालात सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकार काही महिन्यातच पाडले आणि मग पर्याय म्हणून इंद्रकुमार गुजराल यांना सत्तेत आणले. मात्र त्यांना सरकार चालवू दिले नव्हते. त्यातून वैतागलेला मतदार पुन्हा कॉग्रेसच्या झोळीत मते टाकील, अशा भ्रमात केसरी व अनेक सेक्युलर बुद्धीवादी होते. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही किंवा घडणारही नव्हते. कारण यावेळी मतदाराने कुठल्याही जनता प्रयोगाला मते दिली नव्हती, तर कौल भाजपाला झुकता दिला होता. त्यालाच टांग मारण्याच्या सेक्युलर लबाडीचा लाभ कॉग्रेसला वा अन्य सेक्युलर पक्षाला होणेच शक्य नव्हते. मात्र तशी खुळी आशा माध्यमात टपून बसलेल्या अनेक पत्रकारांना होती. कारण आता पत्रकारिता जवळपास भाजपा विरोधकांची एक अघोषित आघाडी बनली होती. म्हणूनच निकाल लागेपर्यंत कोणाला लोकमताचा अंदाज येऊ शकला नाही. कॉग्रेसचे नुकसान झाले नाही, पण जनता पक्षासह अनेक डावे राजकीय गट धुळीस मिळाले. किंवा अनेकांनी आपला भाजपा विरोध सोडून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पवित्रा घेतला. पण त्या निवडणूकीचा पत्रकारितेच्या संदर्भातला भाग म्हणजे खाजगी वृत्तवाहिन्यांचा आरंभ! कॉग्रेस पक्षाचा प्रचार करायला सोनिया गांधी मैदानात उतरल्या होत्या आणि त्याचवेळी स्टार नेटवर्कने स्टारन्युज नावाची खाजगी वृत्तवाहिनी तडकाफ़डकी सुरू केली. ह्याला किती योगायोग म्हणायचे आणि किती नियोजनबद्ध खेळी म्हणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे.

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनियांनीच पक्षाचे नेतृत्व करावे म्हणून नारायण दत्त तिवारी व अर्जुन सिंग या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या दारात धरणे धरले होते. पण त्यांना दाद न देणार्‍या सोनिया अकस्मात १९९८ सालात पक्षाच्या प्रचाराला पुढे आल्या, तेव्हा त्यांना साधे हिंदीही बोलता येत नव्हते. पण रोमन लिपीत लिहून दिलेली भाषणे त्या बोलून दाखवीत. मात्र राजीवची विधवा असल्याने त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती व आकर्षण होते. नेमक्या त्याचवेळी अकस्मात स्टारन्युज वाहिनी सुरू व्हावी, याला योगायोग म्हणता येत नाही. कारण त्यांच्यापाशी कुठलीही यंत्रणा नव्हती आणि ते काम प्रणय रॉय यांच्या खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले. दूरदर्शनच्या माध्यमातून निवडणूक विषयक चाचण्या व पुढे निकालाचे अत्यंत नेटके विवेचन व विश्लेषण करण्यातून रॉय यांनी भारतीयांना आपली ओळख करून दिलेली होतीच. शिवाय राजीव यांच्याच कृपेने ‘वर्ल्ड धीस विक’ नावाचा बातमीवजा कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करण्याचा अनुभव रॉय़च्या गाठीशी होता. मात्र चोविस तास बातम्यांचा घाणा घालण्याइतपत सज्जता त्यांच्यापाशीही नव्हती. शिवाय खुप जिकीरीचे काम होते. थेट प्रक्षेपण अजून इथून खाजगीरित्या होऊ शकत नव्हते. अनेक मनोरंजनाच्या वाहिन्या सुरू झाल्या होत्या. पण त्यांचे कार्यक्रम परदेशातूनच प्रक्षेपित व्हायचे. ती मोठी कसरत वाहिन्यांना करावी लागायची. म्हणूनच बातमीदारी तेव्हा अवघड होती. असे असतानाही सोनियांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्याच मुहूर्तावर पहिली वृत्तवाहिनी मर्डोकच्या नेटवर्कने सुरू केली, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि त्यावरून मग तितक्याच निष्ठेने सोनियांचे कौतुकही होऊ लागले होते. मात्र त्याचा फ़ारसा उपयोग झाला नाही. भाजपाने सर्वात मोठा पक्ष होत आणि बहुमताचे दार ठोठावत यश मिळवल्यावर पर्याय राहिला नाही. भाजपाचे वाजपेयी सरकार सत्तेत आले. दरम्यान इथे महाराष्ट्रातही सत्तांतर घडले होते. थोडक्यात राजकारणाप्रमाणेच पत्रकारितेतही मोठी उलथापालथ सुरू झाली होती. छपाई माध्यमांचा जमाना मागे पडत होता आणि वाहिन्यांचा जमाना येऊ घातला होता. शिवाय पारंपारिक लेखक संपादकांच्या बुद्धी व लेखन कौशल्याची सद्दी संपत होती आणि पैसा ओतू शकणार्‍या व पत्रकारांना मांडलीक म्हणून सेवेत रुजू करून घेणार्‍या माध्यम कंपन्यांचा जमाना येऊ लागला होता. स्वाभिमानी व बुद्धीवादी पत्रकारांनी शरण जावे किंवा संपून जावे, इतकाच पर्याय शिल्लक ठेवलेला होता.

झपाट्याने पत्रकारिता शिकवणार्‍या महाविद्यालयांचे पेव फ़ुटले आणि त्यांना सामावून घेणार्‍या माध्यमांचेही पेव फ़ुटले होतेच. १९९८ सालच्या लोकसभा निवडणूकीचे निकाल लागायचे होते आणि मतमोजणी सुरू व्हायची होती. तो दिवस प्रणय रॉयसाठी मोठा निकराच्या लढाईचा होता. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत चालणार्‍या स्टारन्युज वाहिनीकडे सर्वांचे डोळे लागले होते आणि त्याचे दोन प्रमुख बातमीदार दोन प्रमुख पक्षाच्या दारात थेट प्रतिक्रिया द्यायला भल्या सकाळीच येऊन उभे होते. त्यातला श्रीनिवासन जैन भाजपाच्या मुख्यालयात होता, तर अर्णब गोस्वामी ओसाड निर्मनुष्य कॉग्रेस मुख्यालयाच्य दारात उभा होता. तिथे कोणीच दिसत नाही, असे प्रणयने विचारल्यावर कोवळ्या पोरासारखा लाजलेला अर्णब अजून आठवतो. आजचा आक्रमक अर्णब बघताना तेव्हाचा तो नवखा अर्णब गोस्वामी कोणी भलताच होता की काय अशीही शंका येते. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई त्यांच्यातले ज्येष्ठ म्हणायचे. कारण स्टुडिओत बसून ते अखंड किल्ला लढवायचे. मात्र वाजपेयी यांचे नवे सरकार सत्तेत आले आणि त्याने माध्यमांसाठी बंधने खुली करून टाकली. प्रथमच देशातून थेट प्रक्षेपणाची दारे खुली केली. जगातल्या अनेक देशातील बातम्या व वाहिन्या दाखवणार्‍या यंत्रणा मुक्तपणे मिळू लागल्या आणि सोपे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने किरकोळ वाटावे इतक्या गुंतवणूकीत वाहिन्या सुरू होऊ लागल्या. वाहिन्या इतक्या वेगाने येत गेल्या, की बघताबघता छपाई माध्यमांची जणू सद्दीच संपली. आपले अस्तीत्व टिकवण्याची केविलवाणी धडपड छपाई माध्यमांना करण्याची पाळी आली. कारण आता बातमीसाठी निदान शहरातल्या लोकांना वर्तमानपत्रावर अवलंबून रहाण्याची गरज उरलेली नव्हती. मोठ्या शहरात व महानगरात कुठलीही बातमी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचत होती. हे छपाई माध्यमांपुढले मोठे आव्हान होते. कारण आता त्यांना सनसनाटी उडवून देणार्‍या बातम्या शोधून आणणे भाग होते, किंवा माहित असलेल्या बातमीचे नवनवे पदर उलगडून दाखवण्याचा मार्ग उपलब्ध होता. संपादकीय वा बौद्धिक कौशल्य दाखवूनच वाचक टिकवण्याची धावपळ करण्याखेरीज पर्यायच नव्हता. नुसत्या बातमीसाठी वर्तमानपत्र खपण्याचे दिवस संपत चालले होते. 

मात्र दुर्दैव असे, की छपाई माध्यमात तोपर्यंत राजकीय बांधिलकीची निर्विवाद सत्ता आलेली होती आणि त्याचेच प्रतिबिंब वाहिन्यांवरही पडताना दिसत होते. आपण आपला राजकीय अजेडा लोकांच्या माथी मारू शकतो, याची खात्री असलेल्यांनीच पत्रकारिता जणू काबीज केली होती. त्यांना फ़क्त पैसा गुंतवणार्‍या मालकाची गरज होती आणि ज्यांना आपली हुकूमत सत्तेच्या केंद्रावर गाजवायची होती, ते अशा सुपारीबाज पत्रकार संपादकाचा शोध घेत होते. एकविसाव्या शतकाची सुरूवात अशी झाली. त्यात पत्रकारितेचे पावित्र्य आधीच लयास गेलेले होते. राजकीय बांधिलकीने पत्रकारिता तटस्थ राहिली नव्हती. तिला पैसा ओतणार्‍यांनी जणू आपल्या जनानखान्यात नेवून बंदिस्त करण्याचा घाट घातला होता. त्याला नामवंतांनीच प्रतिसाद द्यायला सुरूवात केल्यावर कशालाच धरबंद राहिला नाही. इंद्राणी मुखर्जीचा उदय त्यातलाच आहे. तिला त्याच काळात पीटर मुखर्जी सापडला आणि पुढला र्‍हास अतिशय वेगाने होत गेला. ‘आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी वाटेल त्या थराला इंद्राणी जाऊ शकते’ असे तिचा पहिला पती किंवा ज्याच्यापासून तिला दोन्ही मुले झाली तो दास नावाचा इसम म्हणतो. अशा महिलेने भारतातल्या एकाहून एक नामवंत संपादक पत्रकारांना बोटावर खेळवले, तोच हा काळ आहे. त्याची साक्ष अनेक वृत्तपत्रांचे संपादन करून नाव कमावणार्‍या शेखर गुप्ता व वीर संघवी यांचा समावेश आहे. त्यांनीच लिहीलेल्या लेखातून त्याचे भयंकर तपशील उपलब्ध आहेत. जी महिला आपल्या मुलांना कागदोपत्री हेराफ़ेरी करून भावंडे म्हणून दाखवते आणि पुढल्या काळात पैशाचे निमीत्त झाले म्हणून मुलीची थेट निर्घृण हत्या करू शकते, तिच्या इशार्‍यावर आपण वागलो वा खेळवले गेलो, याची कुठलीही घृणा या दोघांनी आपल्या लेखन किंवा बोलण्यात आजही दाखवलेली नाही. किळस येण्यासारखे जिचे वर्तन आहे, तिच्यापुढे आपली बुद्धी गहाण टाकण्याचे ज्यांना वैषम्यही वाटत नाही, त्यांना आज भारतीय समाजात मान्यवर संपादक बुद्धीजिवी म्हणून ओळखले जाते. अशी अवस्था देशातल्या राष्ट्रीय पातळीवरच्या संपादकांची असेल, तर आपापल्या पातळीवर जे स्थानिक संपादक वा भाषिक संपादक पत्रकार आहेत, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी काय बोलावे?  

वीर संघवी याला हाताशी धरून २००६ च्या सुमारास इंद्राणीने एक वाहिनी सुरू करायचे ठरवले. त्यासाठी स्थापन केलेल्या कंपनीचे ठराविक शेअर्स संघवीला संपादक म्हणून दिले होते. अनेक पत्रकार तंत्रज्ञांना नोकरीत घेतले गेले. पण शेवटी ती वाहिनी सुरूच झाली नाही आणि कंपनी विकली गेली. त्याबद्दल पत्रकारांनी तात्कालीन माहितीमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांनी अर्थमंत्री चिदंबरम यांच्याकडे तो विषय नेला. त्याच्या चौकशीचेही आदेश निघाले. पण आजवर त्या चौकशीतून काय निष्पन्न झाले, ते जगाला कळू शकलेले नाही. दरम्यान त्यात पावणे दोनशे कोटी रुपयांच्या रकमेची हेराफ़ेरी झाल्याचे म्हणतात. त्या कंपनीत अमेरिकन तुरूंगात पडलेला भारतीय घोटाळेबाज रजत गुप्ता याची गुंतवणूक होती म्हणतात. थोडक्यात जितके म्हणून उकरायला जाल, तितका उकिरडा घाणीचाच आहे. अशा पीटर मुखर्जी व इंद्राणीच्या संस्कारातून पुढल्या काळात अनेक वाहिन्यांचे संसार उभे राहिले. त्या दोघांच्या हाताखालून गेलेल्यांनी आपापली कंपनी काढून भारतात नेटवर्क व वाहिन्या सुरू केल्या. यापैकी कोणाला शिना बोरा खुनाला वाचा फ़ुटल्यावर अवाक्षर बोलावेसे वाटलेले नाही. कारण प्रत्येकाला आता आपल्या प्रतिष्ठेला लागू शकणारे ग्रहण उमजलेले आहे. जी कहाणी इंग्रजी वाहिन्या व वर्तमानपत्राची आहे, तीच कहाणी अन्य भाषिक माध्यमातल्या वाहिन्या व वर्तमानपत्राची सुद्धा आहे. मराठीत दोन वाहिन्या अशा आहेत, ज्यांचे भांडवल डान्सबार वा चिटफ़ंडातून आलेले आहे. तिथे संपादक पत्रकार म्हणून मिरवणार्‍या कुणाला अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे पातिव्रत्य तपासण्याचा कुठला नैतिक अधिकार पोहोचतो? आपण कुठल्या ‘भक्कम’ पायावर उभे आहोत, याची तरी खातरजमा त्यांनी करून घेतली आहे का? सहारा नावाचे एक नेटवर्क आहे. त्याचा मालक मागली दोन वर्षे देणेकर्‍यांचे हक्काचे पैसे देऊ शकत नाही, म्हणून सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये गजाआड पडलेला आहे. झी नेटवर्कच्या संपादकाला तर जिंदाल नावाच्या उद्योगपती राजकीय नेत्याने चोरट्या कॅमेराने खंडणी मागतानाच चित्रित केले आणि काही दिवस गजाआड पडायची वेळ आली. कोळसा घोटाळ्यात फ़सलेल्या त्या उद्योगपतीच्या संदर्भातल्या बातम्या वगळण्यासाठी व थांबवण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या जाहिराती द्याव्यात, असा सौदा करायला हे संपादक महोदय एका हॉटेलात बोलताना चित्रीत केलेले होते. ही आजच्या राष्ट्रीय पत्रकारितेची अवस्था आहे. 

प्रसार माध्यमांना प्रचार माध्यमे बनवण्याच्या कारस्थानातून हे घडत बिघडत गेले. त्याला कुठलाही बुद्धीवाद वा पावित्र्याचा विधीनिषेध राहिला नाही. आपण सांगू तीच बातमी व आपण दाखवू तेच सत्य, अशा मस्तवालपणातून एकप्रकारची सुपारीबाजी व गुंडगिरीच बोकाळत गेली. व्यक्तीगत चारित्र्यहनन वा बदनामी ही पत्रकारितेची हत्यारे बनत गेली. पर्यायाने पत्रकरिताच मारेकर्‍यांची टोळी बनत गेली. सार्वजनिक आयुष्यात सर्वच माणसे शुचिर्भूत नसतात आणि काहीतरी त्यांच्याकडून गडबड झालेली असते. त्याचे भांडवल करून त्यांना सतावण्याचे हत्यार अशी एकूण माध्यमांची उपयुक्तता बनत गेली. त्याचा पाया मात्र राजकीय बांधिलकीच्या आहारी गेलेल्या बेताल पत्रकारितेने केला. संपादकच राजरोस उचापती करू लागल्यावर खालच्यांचा कान पकडायला कोणी राहिला नाही, की संपादकांना तितके नैतिक धैर्य उरले नाही. विसाव्या शतकाच्या अखेरीस ‘महाराष्ट्र टाईम्स’सारख्या मान्यवर पत्रातील एका वार्ताहराला मंत्रालयातच आमदाराकडे खंडणी मागताना रंगेहाथ पकडले गेले. तेव्हा खरी मराठी पत्रकारितेची कसोटी लागली. कारण त्याची बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली नाही. पण तोंडी इतका गवगवा झाला होता, की त्या वर्तमानपत्राला त्याचा जाहिर खुलासा मात्र संपादकाच्या नावाने द्यावा लागला होता. जी बातमीच छापली नाही, त्याविषयी खुलासा कशाला द्यायचा? झाकलेली अब्रु गेल्याचा तोच पुरावा नव्हे काय? पण सवाल एकट्या ‘महाराष्ट्र टाईम्स’चा नाही. बाकीच्या कुठल्याच वर्तमानपत्राने ही साधी बातमी कशाला छापली नाही? माफ़ियाच्या भाषेत त्याला ओमर्टा म्हणतात. एकमेकांशी कितीही लढू वा परस्परांचे मुडदे पाडू. पण कुठल्याही परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यायची नाही, की आपसातील रहस्ये जगापुढे आणायची नाहीत, अशी शपथ अमेरिकन माफ़िया टोळीतल्या प्रत्येकाला घ्यावी लागते. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या शिरीष निपाणीकरला खंडणी प्रकरणी पकडल्यावर मराठी पत्रकारितेने ओमर्टाचीच साक्ष दिली नाही काय? मराठीतल्या मान्यवर दैनिकाचा वार्ताहर खंडणी घेताना पकडला गेला, त्यावर एकजात मौन कशाची साक्ष होती? मग खुलासा तरी काय आला? निपाणीकर त्यांच्या संपादक मंडळातला कुणी नोकरीतला पत्रकार नाही, तर प्रासंगिक स्थनिक बातम्यांसाठी नेमलेला वार्ताहर होता. सगळे पाप व गुन्हा त्याचा होता. बाकीचा ‘महाराष्ट्र टाईम्स’ व अन्य मराठी पत्रे धुतल्या तांदळासारखी पवित्र असल्याचाच देखावा त्यातून उभा करण्यात आला. पण म्हणून लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असेल काय?

ज्याची साधी बातमीही कुठल्या वर्तमानपत्रात आली नाही, त्याचा खुलासा ठळकपणे द्यावा लागला, यातच पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचे वाजलेले दिवाळे दिसून येते ना? कारण भले बातमी प्रसिद्ध झाली नसेल, पण गवगवा झालेला होता आणि सत्य किमान प्रमाणात का होईना वाचकांपर्यंत झिरपले होते. पुढल्या काळात झिरपण्याची गती वाढत गेली आणि माध्यमांनी लपवलेल्या बातम्या व सत्य, सामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ शकेल असे पर्यायच समोर येत गेले. त्यातून मग पत्रकारितेची उरलीसुरली विश्वासार्हता व गरज संपून गेली. नरेंद्र मोदी यांचा लोकसभेतील प्रचंड विजय हा राजकारणात सेक्युलर पक्षांचा भले पराभव असेल. पण विश्वासार्हतेच्या क्षेत्रात तो पत्रकारितेचा सर्वात दारूण पराभव आहे. मोदी भले कॉग्रेसमुक्त भारत बोलले असतील, पण व्यवहारात त्यांनीच पुढाकार घेऊन भारतीय माध्यमे पत्रकारितेला जणू निकालातच काढले. भारतीय समाजाला माध्यमांच्या गुलामीतून मुक्त केले, असेही म्हणता येईल. ज्या माध्यमातून मोदींना संपवण्याचा राजकीय डाव आधीच्या बारा वर्षात खेळला गेला, तोच माणूस माध्यमे व पत्रकारांना वाळीत टाकून देशातली सर्वात मोठी निवडणूक लिलया जिंकू शकला, हा म्हणूनच भारतीय पत्रकारितेचा सर्वात मोठा दारूण पराभव होता व आहे. २००२ च्या गुजरात दंगलीपासून माध्यमांनी व प्रामुख्याने त्यात दबा धरून बसलेल्या पुरोगामी पत्रकारांनी मोदींना लक्ष्य केलेले होते. मोदी व गुजरातच्या दंगलीचा आडोसा करून दिल्लीतील भाजपाचे राष्ट्रीय वर्चस्व संपवण्याचे राजकारण पक्षांपेक्षा माध्यमातून अधिक खेळले गेले. तरीही मोदींनी पुढल्या तीन निवडणूका गुजरातमध्ये जिंकल्या व तेच देशाच्या पंतप्रधान पदावर दावा करायला पुढे सरसावले. बारा वर्षे गुन्हेगार, मारेकरी वा खोटारडा म्हणून माध्यमे ज्याच्या मागे बदनामी करत हात धुवून लागली होती, त्याने इतकी मजल मारणे सोपे नव्हते. मात्र नुसता दावा करून न थांबता मोदींनी बहूमत मिळवण्याचा पराक्रमही केला. म्हणून त्याला पत्रकारितेचा दारूण पराभव म्हणावे लागते. कारण आधीच्या बारा वर्षात राजकीय पक्षांपेक्षा अधिक मोठे राजकारण मोदी विरोधात माध्यमे व पत्रकार करत होते. त्याची पुर्ण कल्पना असलेल्या मोदींनी म्हणून की काय पत्रकारांचीही विश्वासार्हता संपवण्याचा चंग बांधूनच लोकसभेची मोहिम राबवली. या काळात माध्यमांनी व पत्रकारांनी काय केले, ते त्याच्या खुप आधी ‘महाराष्ट्र टाईम्स’चे असताना कुमार केतकरांनी वर्तवलेले भाकित म्हणावे तसे लिहून ठेवलेले होते. 

‘सध्यातरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे, की जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले, की त्याच्यावरील आरोप पुर्णत: सिद्ध झाले आहेत, असेही मानण्याची प्रथा पडली आहे. ‘शोधक पत्रकारिता’ हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु परकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मानदंड निर्मांण करू शकलेले नाहीत.’

१६ आक्टोबर १९९६ च्या मटामधील ‘हितोपदेश’ शीर्षकाच्या अग्रलेखातील हा उतारा आहे. तेव्हा मोदी गुजरातच्याही सत्ताकारणात नव्हते आणि वाहिन्यांचेही पेव फ़ुटलेले नव्हते. पण केतकरांसारख्या व्यासंगी जाणत्याला पत्रकारिता कुठल्या दिशेने व किती वेगाने दिशाहीन भरकटत चालली आहे, त्याचा अंदाज आलेला होता. रमेश किणी मृत्यूच्या निमीत्ताने त्याचा अनुभव केतकरांनी संपादक म्हणून घेतला होता. पण पुढल्या काळात जसजशी माध्यमांची साधने व सुविधा वाढत गेल्या, तसतसा असल्या घसरगुंडीला धरबंदच राहिला नाही. आपण ठरवू ती दिशा व आपण सांगू तेच सत्य, इतक्या थराला पत्रकारांची मस्ती जाऊ लागली. ते बघणार्‍या व वाचणार्‍यालाही खटकत होते. राजकीय नेतेही भयभीत झालेले होते. पत्रकारिता जणू भस्मासूर झाल्यासारखा बेताल होत गेला. त्याला पर्याय आवश्यक होता. पण तो सोपाही नव्हता. नवे वृत्तपत्र काढणे वा पुढल्या काळात वाहिनीसारखे साधन उभे करणे, सामान्य माणसाला शक्य नव्हते. पण म्हणून पर्याय येणारच नाही असेही नसते. नरसिंहाचा अवतार कसा झाला? तसाच मग सोशल मीडिया नावाचा पर्याय साकारत गेला. बटू वामनाचा अवतार कसा किंचित आकाराने समोर आला आणि जग व्यापून शिल्लक उरला, तसा माध्यमांच्या भस्मासूराला पर्याय उभे रहात गेले. जितकी मुख्यप्रवाहातील माध्यमे अधिक बेताल होत गेली, त्यांना ही विस्कळीत व असंघटित सामाजिक माध्यमे पर्याय म्हणून पुढे येत गेली. नरेंद्र मोदींसारख्या धुर्त राजकारण्याने त्याचा चतुराईने वापर करून घेतला. पहिल्या पाचसहा वर्षात मोदींनी आपल्यावरील दंगलीचे बालंट पुसण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. झोपलेल्यांना उठवता येते, पण झोपेचे सोंग घेणार्‍यांना जागवता येत नाही. मोदींना हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या सफ़ाई व संपर्कासाठी सोशल माध्यमाचा सरसकट वापर सुरू केला. त्यातून आपले इतके अनुयायी व प्रचारक देशाच्या कानाकोपर्‍यात निर्माण केले, की त्यांच्यापुढे छपाई व वाहिन्यांचे माध्यम खुजे वाटू लागले. ह्या सामर्थ्यावर मग लोकसभेची लढाई लढताना मोदींना मुख्यप्रवाहातील माध्यमांची गरजच उरली नाही. उलट मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्यासाठी याच माध्यमांना मोदींचा पाठपुरावा करण्याची नामुष्की आली. तेव्हा त्यांच्यातल्या नामवंत संपादक वा पत्रकारांना खड्यासारखे बाजूला ठेवून मोदींनी साध्या प्रचाराच्या मुलाखतीही नाकारण्याचे धाडस केले. 

माध्यमातून राजकारण खेळले जाण्याच्या बदमाशीला मोदींनी दिलेला तो शह होता. कारण आदल्या वर्षभरात मोदींना पराभूत व नामोहरम करण्याचे राजकारण हेच पत्रकार खेळत होते. कर्नाटकातील भाजपाचा पराभव मोदींना खच्ची करणारा ठरवण्यासाठी बौद्धिक कसरती झाल्या. मग चार राज्यापैकी दिल्लीतच भाजपाचे बहुमत हुकले होते. तर मोदींचा करीष्मा शून्य असे भासवण्याची पत्रकारात स्पर्धाच झालेली होती आणि दिल्लीत यश मिळवलेल्या नवख्या केजरिवाल यांना मोदींचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी म्हणून पेश करण्याचा विडा उचलला गेला होता. डिसेंबर ते मार्चपर्यंत केजरीवाल यांनाही घोड्यावर बसवून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचे राजकारण अन्य कोणाचे होते? ह्या सर्वातून मोदींना पराभूत करणे माध्यमातील या बांधिल पुरोगाम्यांना साधले नाही. पण त्यांच्या याच राजकारणाने पत्रकारितेची सगळी़च विश्वासार्हता पुरती लयाला गेली. त्याच दरम्यान नवनवी प्रसार साधने लोकांच्या हाती येत होती आणि सामान्य माणसालाही आपले मत खुलेपणाने कुठेही व केव्हाही मांडायला परवडणारी व्यवस्था मिळत गेली. तिचा उपयोग मोदी व त्यांच्या अनुयायांनी इतका केला, की मुख्यप्रवाहातील माध्यमांना आता त्याच सोशल माध्यमांच्या मागे मागे फ़रफ़टावे लागते आहे. एका बाजूला माध्यमे व पत्रकारिता बेताल होत गेली आणि त्याला वैतागलेल्या सामान्य माणसाच्या हाती अन्य साधने येत गेली. तो एकाच काळातला बदल असल्याने इतका मोठा आमुलाग्र बदल होऊ शकला. कारण आता याच प्रमुख माध्यमांची तपासणी नित्यनेमाने सामान्य माणुस करू शकतो आहे व नेमक्या चुकांवर आणि खोटेपणावर राजरोस बोट ठेवू लागला आहे. त्याला गप्प करणे माध्यमातील संपादक वा पत्रकारांना शक्य उरलेले नाही. शिरीष निपाणीकरचे वृत्त जसे झाकून ठेवले, तसे आता करता येत नाही. कारण माध्यमातून झाकलेले विनाविलंब सोशल माध्यमात झळकू लागते आणि त्याचा अधिक गाजावाजा झाल्याने मग मुख्यप्रवाहातील पत्रकारांना तो विषय घ्यावा लागतो. त्यात पुन्हा चलाखी झाली तर त्याचीही झाडाझडती वा पोस्टमार्टेम खुलेआम होते. असे पोस्टमार्टेम लोकप्रियतेचा कळस गाठते, अशी अवस्था आहे. काही ब्लॉग वा व्यक्तीगत मतप्रदर्शनाला तर अनेक वाहिन्या वा दैनिकांपेक्षा अधिक मान्यता या सोशल माध्यमात मिळालेली आहे. त्याची लोकप्रियता व प्रसार वाढतो आहे, तितक्या प्रमाणात सर्वच मुख्य माध्यमांचे व्यवसाय व हिशोब बिघडत चालले आहेत. मात्र त्यासाठी अन्य कोणाला जबाबदार धरता येणार नाही. मागल्या तीन दशकातील राजकीय बांधिलकीच्या जोखडात बांधली गेलेली पत्रकारिता व त्यातून आलेल्या बेतालपणाचे ते दुष्परिणाम आहेत. कुमार केतकरांनी एकोणिस वर्षापुर्वी सुचवले होते त्याचा अवलंब झाला असता, तर ही वेळ आली असती का? त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कोणी दिले नाही. पण उत्तर टाळल्याने प्रश्न संपत नाही. उलट अधिक गंभीर बनतो. गुंतागुंतीचा होऊन जातो. आज जी पत्रकारिता म्हणून मिरवले जाते त्याला केतकर म्हणतात, तसे निव्वळ शहाजोगपणा म्हणावे लागते, ज्याच्यावर लोकांचा अजिबात विश्वास उरलेला नाही.

एकट्या कुमार केतकरांनाच तो धोका दिसला नव्हता. पत्रकारितेचे व अविष्कार स्वातंत्र्याचे दुसरे लढवय्ये शूरवीर निखील वागळे यांनी केतकरांपेक्षा अधिक स्पष्ट शब्दात येऊ घातलेल्या संकटाचे वर्णन केलेले होते. मात्र त्यांनाही त्याच मायाजालात फ़सण्याचा मोह आवरता आला नाही. १५ आक्टोबर १९९६ रोजी लिहीलेल्या कॅलिडोस्कोप या ‘महानगर’च्या साप्ताहिक स्तंभात वागळे काय म्हणतात वाचा,

 ‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने वृत्तपत्रसृष्टीला लागलेल्या एका रोगाकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. भ्रष्ट पैशावर उभं रहाणारं ‘आज दिनांक’ हे काही एकमेव वृत्तपत्र नाही. आज संपुर्ण देशात अशा वृत्तपत्रांची लाट आली आहे. उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, दारूवाले, ट्रकवाले, हॉटेलवाले यांच्याकडे वाममार्गाने मिळवलेला पैसा मुबलक आहे. हा पैसा वृत्तपत्रात घालून प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न यापैकी अनेकजण करत आहेत. उत्तरेतल्या राज्यात तर अशा दैनिकांचं थैमान चालू आहे. एकट्या दिल्लीत उदाहरणादाखल तीन-चार नावं सांगता येतील. राष्ट्रीय सहारा, कुबेर टाईम्स, जेव्हीजी टाईम्स ही अलिकडच्या काळात जन्माला आलेली काही वृत्तपत्रं. यामागे चिटफ़ंडवाल्यांचा पैसा आहे. गरीब जनतेकडून मोठ्या लाभाचं गाजर दाखवून पैसा मिळवायचा आणि चिटफ़ंड निर्माण करायचे. नंतर हा पैसा वेगवेगळ्या धंद्यात गुंतवून स्वत:चं उखळ पांढरं करून घ्यायचं. हा उद्योग अनेकांनी आरंभला आहे. गरीबाला आवाज नसतो यावर यापैकी बहुतेकजणांचा विश्वास आहे. म्हणूनच पैसे परत मागणार्‍यांना ते न देण्याची हिंमत ही मंडळी दाखवतात. वृत्तपत्राच्या जोरावर मिळवलेल्या ताकदीचा उपयोग सरकारी अधिकार्‍यांना दाबण्यासाठी आणि आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी ते करून घेतात. हजारो रुपये पगार देवून पत्रकारांना नोकर्‍या द्यायच्या, त्यांना गाड्या पुरवायच्या आणि छानछोकीच्या आयुष्याची चटक लावायची, असाही प्रकार ही मंडळी करतात. पत्रकार अचानक झालेल्या सुखप्राप्तीने खुश होतो आणि आपलं लेखन स्वातंत्र्य गमावून बसतो. हळूहळू राजकीय दलालीसाठी त्याचा वापर केला जातो. आपण कुणासाठी काम करतो आहोत, कशासाठी वापरले जात आहोत, याचं भान त्याला रहात नाही. वृत्तपत्राच्या जोरावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया ही मालक मंडळी करतात. राष्ट्रीय सहारा हे वृत्तपत्र याचं जळजळीत उदाहरण आहे. वृत्तपत्रसृष्टीत येणारा हा भ्रष्ट पैसा वेळीच रोखला नाही तर आपल्या सगळ्या स्वातंत्र्याचा बळी देण्याची पाळी पत्रकारांवर येईल. याचा पहिला फ़टका छोट्या वृत्तपत्रांना बसेल. देशातल्या बड्या वृत्तपत्रांची सुत्रं पत्रकारांच्या हातात कधीच नव्हती. त्यात आता छोट्या वृत्तपत्रांचाही बळी गेला तर सगळीच आशा संपून जाईल. युरोप अमेरिकेत रुपर्ट मर्डोकासारख्या बदमाशाने घातलेला हैदोस वृत्तपत्रसृष्टी अनुभवते आहे. आपल्याकडे सध्या दिसताहेत त्या याच मर्डोकच्या गावठी आवृत्त्या. म्हणूनच वृत्तपत्र स्वच्छ पैशावर कशी उभी रहातील याचा विचार झाला पाहिजे.’ .... ‘आज दिनांक’च्या मृत्यूच्या निमीत्ताने या गोष्टींचा गंभीरपणे विचार झाला तर बरंच काही साध्य होईल. नाहीतर नाटकं होतील, तमाशे होतील, हौतात्म्याचा आव आणला जाईल, पण वृत्तपत्रसृष्टीच्या पदरात काही पडणार नाही. म्हणून अंतर्मुख होऊन हा मृत्यू तपासायला हवा. असा मृत्यू आणखी कुणाच्याही नशिबी येऊ नये, या दिशेने ठोस प्रयत्न व्हायला हवेत. इमारत बांधण्यापुर्वी तिचा पाया मजबूत करणं शहाणपणाचं नाही काय?’

थोडक्यात पत्रकारितेला ग्रासायला आलेला विकृत भ्रष्ट पैसा व गुन्हेगारी प्रवृत्ती सर्वांना दिसत होती आणि तिच्या विरोधात आक्रमकपणे भाषणे देणारेच पुढल्या काळात प्रत्यक्षात त्याचे भागिदार व्हायला उतावळेपणाने धावत सुटले. केतकर असोत किंवा वागळे असोत. आजही ते पत्रकारितेचे पावित्र्य वा अविष्कार स्वातंत्र्याच्या गमजा करीत असतात. पण प्रत्यक्षात तो निव्वळ शहाजोगपणा असतो. नाटके, तमाशे व हौतात्म्याचा आव नक्की असतो. पण त्यात किंचितही सच्चाई वा प्रामाणिकपणा उरलेला नाही. किंबहूना आजची पत्रकारितेची अगतिकता व दुर्दशा करण्याला असेच म्होरके जबाबदार आहेत, म्हटल्यास वावगे ठरू नये. कुठल्याही स्वातंत्र्याला कुणी बाहेरचा आक्रमक येऊन संपवू शकत नाही वा गुलाम करू शकत नाही. तो दगाफ़टका आतूनच घरभेद्याने करावा लागतो, असे अब्राहम लिंकन यांच्यासारखा विचारवंत राजनितीज्ञ म्हणतो. ज्या अजाण व निरागस पत्रकारांना आजही पत्रकारिता शुचिर्भूत व स्वयंभू असावी असे वाटते, त्यांच्यासाठी लिंकनचे तेच शब्द मार्गदर्शक ठरू शकतील. म्हणूनच लिंकनचे नेमके शब्द सांगून हे पुराण संपवतो. ते वाचा, समजून घ्या आणि ठरवा स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे की आत्महत्येने संपायचे?

"Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide."  - Abraham Lincoln

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

दोन भयकथा आणि विवेकबुद्धीला आवाहन!

सगळी माणसे सारखीच हळवी, सौम्य किंवा हिंस्र असतात. मात्र त्यांच्यात खुप खोलवर दडलेल्या अशा सर्व प्रवृत्ती समोरच्या प्रसंग वा परिस्थितीनुसार उफ़ाळून बाहेर येतात. कार्यरत होतात. समोर कोण आहे? तो आपल्या कळपातला की विरुद्ध कळपातला, ही जाणिव छुप्या प्रवृत्तींना कार्यान्वीत करत असते. त्यातला आक्रमक आपल्या कळपातला असेल, तर त्याच्या हिंस्त्रपणाला टाळ्या पिटून प्रोत्साहन दिले जाते आणि त्यात जखमी जायबंदी होणारा आपल्या कळपातला असेल, तर हळवेपणाची उबळ येत असते. बाकी सगळीकडे तोच प्रकार असतो. चराअच दिवसांपुर्वी ‘चिन्ह’ मासिकाचे संपादक सतीश नाईक यांची एक भयकथा सोशल मीडियात अनेकांकडून पुढे करण्यात आली. ‘सनातन संस्था हिडीस आहे. तिचे समर्थक अतिशय विकृत आहेत. भारतीय राज्यघटनेचा गळा घोटणार्‍या कारवाया ते करीत आहेत’ अशा शब्दात माझे मित्र सुनिल तांबे यांनी त्याचे वर्णन केले आहे. त्यात नक्कीच तथ्य आहे. कथेतले वर्णन खरेच घाबरवून सोडणारे आहे. पण तशीच आणखी एक भयकथा आहे, त्याविषयी आजवर किती काटेकोर मौन पाळले गेले आहे? योगायोगाने नाईक ज्या समाजवादी कळपातले आहेत, त्याच कळपातले दुसरे संपादक (आज विधान परिषदेतील आमदार) कपील पाटील यांनी तशीच भयकथा १९९६ सालात संगतवार कथन केलेली आहे. (जुनी रद्दी शोधून त्या प्रदिर्घ भयकथेतील साधर्म्य असलेला उतारा पुढे दिला आहे. जुनेपाने शोधण्यात विलंब झाल्याबद्दल क्षमस्व). तेव्हा कितीजण व्याकुळ झाले होते? कोणी त्यातल्या हिडीस हिंस्र श्वापदाच्या मुसक्या बांधण्याचा विचार तरी केला होता काय? की आज हळवेपणाचे प्रदर्शन मांडणार्‍यांनी कायम त्याच हिंस्र श्वापदाला टाळ्या पिटून प्रोत्साहनच दिले आहे? दोन्ही कथा पाठोपाठ वाचून प्रत्येकाने आपल्यात शिल्लक असलेल्या सारासार विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावा. शक्य असल्यास आपल्यातल्या माणूसकीला साकडे घालावे आणि कळपाच्या बाहेर राहून आपण विचार करू शकतो किंवा जगाकडे पाहू शकतो काय, असा प्रश्न स्वत:लाच विचारावा. बघा जमते काय आणि किती?

----------------------------------------------
कपिल पाटील यांची भयकथा

 फ़ॉरेन फ़ंडींगवरून आठवलं, दिनू रणदिवेंचा उल्लेख वागळेंनी ‘कॅलिडोस्कोप’मध्ये केला आहे. प्रश्न विचारून वाचकांच्या मनात संशय निर्माण करण्यात वागळेंचा हात कोण धरणार? पण संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या दिनू रणदिवे यांना वागळे यांनी जी अपमानास्पद वागणूक दिली आणि अपशब्द वापरले ते ऐकले की डोळ्यात पाणी येतं. रणदिवे यांच्याच तोंडून मी ते ऐकलं आहे. रणदिवे स्वत:विषयी फ़ार बोलत नाहीत. पण वागळेंच्या परवाच्या लिखाणानेते घायाळ झाले.

वसई विधानसभा निवडणूकीत रणदिवे यांनी विवेक पंडीत यांच्या विरोधात पत्रक काढलं होतं. पंडीत स्वयंसेवी संस्थेसाठी परकीय मदत घेतात. हा रणदिवेंचा आक्षेप होता. मीही विवेक पंडीत यांचा प्रचार केला आहे. पण रणदिवेंचा मुद्दा बिनतोड होता. हे मला सांगितलं पाहिजे. मी त्यावेळीही त्यांच्याकडे कबुली दिली होती. पण या पत्रकाने वागळेंच डोकं फ़िरलं. त्यांनी रणदिवेंना फ़ोनवर फ़ोन करून अक्षरश: छळलं. त्यांची टिंगलटवाळी केली. रणदिवे नंतर ‘आज दिनांक’साठी लिहू लागले. त्यांचा पहिला लेख आमच्याकडे येताच वागळेंनी त्यांना फ़ोन करून त्यांच्यावर अपशब्दांची बरसात केली. रणदिवे ‘आज दिनांक’मध्ये लिहीताच भ्रष्ट ठरले होते. त्या फ़ोनच्या वेळी मी नेमका रणदिवेंना घरी भेटायला गेलो होतो. फ़ोनवर बोलत असताना रणदिवेंचं वृद्ध शरीर अक्षरश: थरथर कापत होतं. त्यांच्या पत्नीही घाबरून गेल्या होत्या. माझ्या पोटातही गोळा उठला होता. रणदिवेंना आता काही होतं की काय अशी आम्हा दोघांना भिती वाटली. फ़ोन खाली ठेवताच रणदिवे खाली कोचावर कोसळलेच. चहा प्यायल्यावर ते थोडे सावरले. तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा रहातो. इथं सांगितलं पाहिजे की, वागळेंची ‘साप्ताहिक दिनांक’मधून अचानक हाकालपट्टी झाली तेव्हा रणदिवेंनीच विश्वस्तपदाचा राजिनामा दिला होता. ‘महानगर’साठी रणदिवे पहिल्या दिवसापासून लिहीत होते. त्यांची वागळेंनी अशी गत केली.

(दै. ‘सांज दिनांक’ संपादक कपील पाटील, अबीर गुलाल, शनिवार ९ नोव्हेंबर १९९६)
----------------------------------------
सतीश नाईक यांची भयकथा ( समोर आली तशी)

Sunil Tambe
September 26 at 10:31am ·
सनातन संस्था हिडीस आहे. तिचे समर्थक अतिशय विकृत आहेत. भारतीय राज्यघटनेचा गळा घोटणार्‍या कारवाया ते करीत आहेत.

Sanket Kulkarni
काही महिन्यांपूर्वी एक मित्र म्हणाला, ज़रा जपून बोलत जा. परवा एका मिटिंगमध्ये तुझं नाव घेतलं गेलंय. ते काय असतं, हे या सतीश नाईकांच्या लेखातून अनुभवा.
आपल्या समाजाच्या पोटात काय ट्यूमर वाढतोय हे लक्षात येईल.

------------------------
सनातनी येती घरा…
------------------------

'नग्नता: चित्रातली आणि मनातली…' अंक प्रसिद्ध व्हायचा होता.त्याचं काम रितसर सुरु होतं.फेसबुकचा वापर करून त्या अंकाची गुणवैशिष्ट्यं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवता येतील या दृष्टीने अंकांची सारी टीम काम करीत होती.जे आम्ही करीत होतो त्याला छान प्रतिसाद मिळत होता.

असाच एक दिवशी सायंकाळी फोन वाजला. कुणी बाई बोलत होत्या.मी अमूक तमूक बोलतोय, ठाण्यातूनच बोलतेय.असं असं माझं नाव (ते नावही आता मी विसरून गेलोय.) असा असा माझा मुलगा पुण्याच्या एका आर्ट स्कूलमध्ये शिकतो.त्याला आता जेजेत प्रवेश घ्यायचाय तर त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवंय वगैरे… त्या बाई सांगत होत्या.

असे फोन वारंवार येत असतात.आणि त्यांना मी नेहमीच मला जमेल तसे योग्य ते मार्गदर्शन करतो आणि माझ्या कामाला लागतो.तसं मी ते केलं आणि फोन खाली ठेवला.मी हा प्रसंग विसरूनदेखील गेलो.पण त्या बाई बहुदा ते विसरल्या नसाव्यात.त्यांनी दोन-तीन दिवसांनी पुन्हा फोन केला,म्हणाल्या तुम्ही सांगितलं ते पटलंय. पण मला आणखी थोडं जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला येवून भेटू का ? खरं तर या गाठी-भेटी प्रकरणांचा उबग येवूनच मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला होता आणि या बाई आता भेटायला यायचं म्हणतायत, तर मी जरासा कावूनच गेलो.पण मग विचार केला आपल्या सल्ल्यामुळे कुणाचं जर भलं होत असेल तर आपण कशाला अडवा ? असा विचार करून काहीशा अनिच्छेनंच त्यांना म्हणतो की ' या ' पण ते ' या ' म्हणताना ' अहो पण मी शहरापासून लांब राहतो,भिवंडी वगैरे आमच्या इथून जवळ आहे ' असं सांगायला देखील विसरलो नाही.तर यावर त्या बाई म्हणाल्या काही हरकत नाही मला चालेल.आता यावर आपण काय बोलणार ? मी आपलं मुकाट्यानं त्यांना पत्ता देवू लागलो तर त्या म्हणाल्या ' नाही,नको ! आहे मजजवळ ! ' हे ऐकलं अन मात्र मी जरासा चक्रावूनच गेलो.आपला नवा पत्ता आपण अजून जवळच्यादेखील कुणाला दिला नाहीये आणि या अपरिचित बाईजवळ तो आला तरी कसा ? अशी एक शंका मात्र माझ्या मनात उभी रहिली.पण कामाच्या गडबडीत ती कडे माझं जरासं दुर्लक्षच झालं.फोन ठेवताना त्या बाई अमूक दिवशी अमूक वाजता येणार आहे.आणि हो सोबत दोन-तीनजण माझेच नातेवाईक येणारेत तर चालेलना ? त्यांनाही तुम्हाला शिक्षणाबाबत काही विचारायचं आहे वगैरे.मी म्हटलं ठीक आहे या !

एके दिवशी सकाळी….मी काम करीत बसलो असताना.बायको काहीशी भांबावून दोन मजले चढून वर आली. ही एवढी दोन जिने चढून वर आली म्हणून मी जरा अचंबीतच झालो,तर ती म्हणाली कुणी एक बाई तुला भेटायला आलीये,तू वेळ दिली होती म्हणतायेत.मी म्हटलं हो. बसव त्यांना खाली,मी आलोच,तर ती म्हणाली अरे पण त्यांच्या सोबत चार पुरुषदेखील आहेत.आणि सगळे कपाळावर लाल टिळा लावलेले आहेत.मला काही त्यांचं लक्षण बरं वाटत नाहीये.तू आधी खाली चल.

हातातलं काम तसंच बाजूला ठेवून मी खाली आलो तर घरातल्या चारीच्या चारी खुर्च्या भरलेल्या अन दिवाणावर त्या बाई बसलेल्या.काही तरी वेगळं जाणवलं खरं पण काय ते नेमकं मला सांगता येईना आणि समोर हे असे पाच जण बसल्यानं मला त्यावर विचारही करता येईना.

नमस्कार, चमत्कार झाल्यावर त्यांना जे काही कलाशिक्षणाविषयी सांगावयाचं होतं किंवा जे काही ' मार्गदर्शन ' वगैरे करावयाचं होतं ते मी केलं आणि चहापान झाल्यावर उठू लागलो तर त्यातले एक टिळेधारी ' चिन्ह ' च्या आगामी अंकाविषयी विचारू लागले.मी आपला मोकळेपणानं त्यांना माहिती देवू लागलो.मग आणखी एका टिळेकरांनी त्या संभाषणात भाग घेतला.आणखी एक प्रश्न,उपप्रश्न.आणखी एक टिळेकर त्यात सहभागी,असं करता करता चर्चा-वादविवाद कधी सुरु झाला ते मला कळलंच नाही.

आर्ट कॉलेजवरून ही चर्चा आता थेट ' चिन्ह ' च्या लेखावर येवू पाहत होती.मी जरासा सावध झालो.मग प्रश्न आला अंकात काय काय आहे ? मी सांगितलं असं असं आहे.तर त्यातला एक टिळा म्हणाला आणखी काय आहे ? मी मनात म्हटलं ' हे काय आपली उलट तपासणी घेतात की काय ? मी त्यांचा टिळा पाहून मुद्दामच संभाषणात हुसेनचं नाव घ्यायचं ठरवलं आणि तसं वाक्य टाकलंही.तर अपेक्षेप्रमाणे एक गदाटोळ उठलाच.

हुसेन नाव घेताच.ते चारी टिळे आणि ती टिळा झणझणलेच.त्यातला एक टिळा म्हणाला आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ती हुसेनचा लेख अंकात छापू नका ? मी मनातल्या मनात म्हटलं,आयला,हे मार्गदर्शन घेता घेता थेट शहाणपणाच शिकवायला लागले की.मी ठरवलं आता यांना अंगावर घ्यायचंच.आणि घेतलंही.

का ? का ? का हो का ?
तर एक टिळा म्हणालं ' तो ' हिंदूंच्या विरोधी आहे.दुसरा म्हणाला,त्याने हिंदू देवतांचा अपमान केलाय.तिसरा म्हणाला,त्याने सरस्वती नग्न चितारलीये !
वगैरे…वगैरे…वगैरे….
वगैरे…वगैरे…वगैरे….
वगैरे…वगैरे…वगैरे….

आता त्यांच्या टिळ्यामागचं रहस्य हळू हळू माझ्या लक्षात येवू लागलं होते.मग मी थेटच विचारलं की तुम्ही कोण ? तर म्हणाले ' आम्ही असं असं करतो तसं तसं करतो. हिंदू धर्माच्या प्रसाराचं आणि रक्षणाचं काम करतो.म्हणूनच तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या अंकात हुसेनवाला लेख छापू नका.बाकी तुमच्या अंकाविषयी आमचं काही म्हणणं नाही.फक्त हुसेनवरचा लेख छापायचा नाय ?
आता माझी सटकू लागली होती.
मी विचारलं ' ही विनंती की धमकी ? '
तर एक टिळा म्हणाला ही विनंती आहे पण…

तर मी म्हटलं
' मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे.'
मी भारतात राहतो,पाकिस्तानात रहात नाही.मला माझ्या घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बहाल केला आहे.त्याला तडा जाईल असं कोणताही कृत्य मी करणार नाही.मी लेख छापणार ! तो माझा हक्क तर आहेच पण अधिकारदेखील आहे.आणि माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणी अशी लुडबुड केली तर ते मला चालणार नाही.मी ते खपवून घेणार नाही.
संपादक म्हणून,लेखक म्हणून,चित्रकार म्हणून आणि माणूस म्हणून घटनेनं मला जे अधिकार दिलेत ते मी बजावणारच.

तर ते तिघेही म्हणाले ' हे फायनल ?'
मी ठामपणे म्हणालो,होय,हे फायनल
जाता जाता म्हणाले…पहा विचार करा !
मी म्हटले ' नाही ! '
हे असं उत्तर देताना मला ठाऊक नव्हतं की नंतर काही होईल किंवा होणार आहे.तसा विचारही माझ्या मनात डोकावला नाही.

आणि बरंच काही मी बोललो.
जवळ जवळ तीन-साडेतीन तास ते घरात होते.हे सर्वच लिहायचं तर त्याचं एक पुस्तकच होईल.म्हणून सारांशानंच हे देतोय.

मी नंतर माझ्या कामात गढूनदेखील गेलो.

दुसऱ्या दिवशी सोमवार होता.
सकाळी फिरून आलो तर फोन वाजू लागलेला.

' कोण नाईक बोलताय का ?'
'होय बोला !'
मी अमूक तमुक बोलतोय,काल आमची ठाण्यात मिटींग झाली.आमची माणसं तुमच्याकडे आली होती.त्यांना तुम्ही उद्दाम उत्तरं दिलीत.अपमान केलात.आज आमची मिटींग आहे.त्यात ठरेल काय करायचं ते ? समजेल तुम्हाला लवकरच.' बरं ओके ' असं म्हणून मी फोन ठेवून दिला.

नंतर काही वेळाने आणखी एक फोन आला ' कोण नाईक का ?'
होय बोला.
' अरे तुम्ही हिंदू ना,तुम्हाला आपल्या धर्माची जरादेखील चाड नाही.'
म्हटले हे सारं तुम्हाला कोणी सांगितलं ! तर तो माणूस म्हणाला ' सनातन प्रभात ' मध्ये वाचा अगदी हेडलाईन आलंय.
जास्त माज करू नका !

आता मात्र माझी सटकली.तोपर्यंत शांत राहू पाहणारा मी उसळलोच. प्रचंड आवाज चढवला.आणि त्या माणसावर तुटूनच पडलो.तर तो तितक्याच शांतपणे (हे बहुदा त्यांना त्यांच्या साधनेत शिकवलेलं असावं.) मला उत्तरं देत राहिला.मग आणखी एक फोन आला,मग दुसरा आला,मग तिसरा,मग चौथा,पाचवा,सहावा,सातवा,सत्ताविसावा,सत्तेचाळीसावा,सत्तावनावा वगैरे वगैरे
पहाटेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत कधीही फोन वाजे.आणि मग यथेच्छ गालीप्रदान सुरु होई.बाई,पुरुष,वृद्ध,तरुण साऱ्यांचेच फोन येत होते.बापरे साऱ्यांचीच भाषा एकच,भयंकर शिवराळ,अत्यंत अर्वाच्य शिव्या (हेही बहुदा साधनेतलंच असावं.)आणि नको नको ते बोलणं.आधी आधी मी रोखठोक उत्तर देवू लागलो मग माझ्या लक्षात आलं की असं करण्यानं आपण आपलीच शक्ती आटवणार आहोत.यात काहीच अर्थ नाही.शहाणपणा नाही.

मुंबई,नवी मुंबई,रायगड,गोवा,सांगली ,इचलकरंजी,कोल्हापूर,कर्नाटक कुठून कुठून फोन येत होते. सारेच्या सारे गालीप्रदान करणारे,काय बोलतोय ते ऐकूनच न घेणारे,धमक्या देणारे,बघून घेवू म्हणून दरडावणारे.मीच नाही तर माझी पत्नी,वृद्ध आई-वडील यांचा देखील उद्धार करणारे.बापरे ! आताही ते आठवलं की अंगावर काटाच उभा राहतो.सारं घर डिस्टर्ब झालं होतं.
मग नंतर कळलं ते असं की,ते जे टिळाधारी आले होते त्यांनी ते सारं 'सनातन प्रभात'
या त्यांच्या वृत्तपत्रात तिखट मीठ लावून छापून आणलं होते.त्यांनी माझे सारे फोन आणि ई मेल इतकंच नाही तर मी ज्या घरात तात्पुरता रहात होतो त्या घराचा पत्तादेखील दिला होता.त्यामुळे ते फोन मला येत होते.ते फोन कमी पडले म्हणून की काय मग भयंकर भयंकर SMS देखील येवू लागले.तेही कमी पडतील असं वाटून मग त्यांनी माझ्यावर ई मेल्सचा देखील मारा सुरु केला.

ती बातमी त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर देखील टाकली होती.त्यामुळे भारताच्या विविध राज्यातूनच नाही तर जगातल्या विविध देशातून मला ई मेल देखील येवू लागले.हे कमी पडेल का काय असं वाटून अत्यंत घाणेरडी पोस्टकार्ड देखील मला येवू लागली.जवळजवळ ८-१५ दिवस हेच सारं चालत होतं.

ज्यांनी हे केलं होतं त्यांना विचारावं तर ते फोन घेईनाच.दुसऱ्या फोन वरून फोन करून फोनवरच हासडलं तर त्यातल्या एकानं माझ्याविरुद्ध डोंबिवली पोलिस स्टेशनात जावून तक्रार केली,का मी त्यांना धमकी दिली म्हणून.तिकडून मला फोन - भेटायला या,अशी अशी धमकी तुम्ही दिलीय म्हणून. म्हटलं ' नाही येणार काय करायचे ते करून घ्या ! '

आता माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला वाटतंय तेवढं हे प्रकरण सोपं नाहीय.याला अनेक कंगोरे आहेत.आणि ही आलेली लोकं पण काही सरळ नाहीत.म्हणून मी ज्या पोलिस ठाण्याच्या कक्षेत आमचं गाव येतं त्या नारपोली पोलिस स्टेशनात रितसर तक्रार नोंदवली.पो.ऑफीसर ताठे. मोठा छान माणूस निघाला त्यांनी सारं ऐकून घेतले.म्हणाले ' काळजी करू नका.आम्हाला ठाउक काय ते कोण आहेत ते ! गडकरीमध्ये बॉम्बस्फोट केला होता तेच हे असणार.त्यांच्यावर आमचं लक्ष आहे.काही काळजी करू नका.त्यांनी लागलीच हाताखालच्या माणसांना सूचना दिल्या.तक्रार करून मी घरी परतेपर्यंत घरी दोन पोलिसदेखील येऊन गेले.म्हणाले,काळजी करू नका.आम्ही आहोत.

त्याच दिवशी रात्री ठाण्याच्या कुठल्यातरी पोलीस स्टेशनातून फोन आला.कुणा तरी एका बाईनं तुमच्याविषयी तक्रार केली आहे की,तुम्ही तिचा अपमान केला.तिला धमकी दिली,तिला वाईट वागणूक दिली वगैरे.काय म्हणणं आहे तुमचं ? म्हटलं त्यांनी विनयभंगाची वगैरे तक्रार तर नाही ना नोंदवली ? तर तो पोलीस हसायलाच लागला,म्हणाला नाही ! तर त्यावर मी सुटकेचा मोठा निश्वास टाकला.आणि त्याला प्रश्न केला की हे सारं मी कुठं केलं ? तिच्या घरी केलं की माझ्या घरी ? की सार्वजनिक स्थळी केलं ? याची पण नोंद केलीय का ? तर तो पोलीस आणखीनच जाम हसायला लागला.म्हणाला पाहतो मी सारं ! नावं देवू का त्यांची आणि फोन नंबर उपयोगात येतील नंतर,म्हटलं नको ! गरज नाही त्यांची.

फोन तर येतच होते,ई मेल येतच होते.शिवाय पत्रेही येतच राहिली.आठ-पंधरा दिवस हे सारं चाललं.मग हळू हळू थांबलं.

' चिन्ह ' चा तो ' नग्नता ' विशेषांक नंतर रितसर प्रसिद्ध झाला आणि गाजलादेखील त्यात तो हुसेनवरचा लेख होताच.दुर्देवानं नंतर काही दिवसातच हुसेन यांचं निधन झालं.त्यामुळे त्या लेखाचा उत्तरार्ध कोलते सरांनी लिहायलाच हवा असा मी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी तो मानलादेखील.तो उत्तरार्धदेखील त्या अंकात मी प्रसिद्ध केला.तो लेख तर खूपच गाजला.हे सारं आठवलं ते पानसरेंच्या हत्या प्रकरणात,कुणा समीर गायकवाड नावाच्या माणसाला पोलीस अटक केलीय ही बातमी वृत्तवाहिन्यांवर ऐकली तेव्हा आणि साऱ्या बऱ्या वाईट आठवण्यांना उजाळा मिळाला.

आता हे सारं आठवून लिहिताना मजेदार वाटतंय पण तेव्हा त्या अर्वाच्य फोननी अक्षरशः हैराण करून टाकलं होतं.बोलणारे समोर आले असते तर कदाचित त्यातल्या एखाद्याच्या गळा दाबायलादेखील मी प्रवृत्त झालो असतो की काय असं मला तेव्हा सारखं वाटे.निम्म्याहून अधिक फोन कॉल्स हे महिलांचे होते.बापरे ! काय त्यांची भाषा होती.माझी पत्नी आणि वृद्ध आई वडील यांच्याविषयी त्या महिलांनी काढलेले उद्गार हे फोनमधून महिलांसारखाच आवाज येत होता म्हणून महिलांचे मानायचे,अन्यथा…. असो.इंद्रायणी मुखर्जी प्रकरणाआधी स्त्रीयांमधल्या हिंन्स्त्रतेचा मी पाहिलेला तो पहिला अविष्कार असावा.

रात्री झोपेत कधी मला दचकून जाग येई.फिरायला गेलो असताना आपल्याला कोणीतरी लाठ्याकाठ्या,तलवारीनं किंवा गोळी मारली आहे आणि आपण कोसळलो आहोत.आणि आपला कुत्रा ते पाहून घाबरून घराकडे एकटाच धावत सुटलाय असे काहीतरी विचित्र भास होत.दाभोलकर,पानसरे प्रकरणं नंतर झाली,पण तेव्हा मात्र मला असे काही तरी विचित्र भास होऊन दचकून जाग देखील येई.

' आमचं लक्ष आहेच पण घरातून बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्या.माथेफिरू लोकं आहेत ' अशा पोलिसांच्या सूचना होत्या.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत होतो.माध्यमांमधून या प्रकरणाला नक्कीच प्रचंड प्रसिद्धी मिळाली असती,पण तो मोह देखील मी टाळला.कारण त्यामुळे मी अंकांच्या निर्मितीच्या कामावर परिणाम झाला असता.कदाचित गेल्या शतकातल्या पहिल्या ठरू शकणाऱ्या ' नग्नता ' सारख्या धाडसी विषयावरच्या अंकाच्या प्रकाशनाला आडकाठीदेखील येऊ शकली असती.आणि ते मला होऊ द्यायचं नव्हतं.मुख्य म्हणजे तो हुसेनवरचा तो लेख मला काहीही करून छापायचाच होता.आणि मी तो लेख छापलाच.
काहीही घडलं नाही.पुढं घडणार देखील नव्हतं हे मला ठाऊक होतं.कारण तसं पाहिलं तर तो लेख हुसेन यांच्यावर एक प्रकारे टीका करणारच होता.पण मी हे त्यांना का सांगू ?त्यांची ही असली सेन्सरशीप का मानू ? कोण लागून गेले ते ?
अरे हट….

या साऱ्या गदारोळात आपण डगमगलो नाही, वा घाबरलोही नाही किंवा गांगरूनदेखील गेलो नाही.
ताठ राहिलो.अन्य कुणाला वाटो न वाटो पण याचा माझा मलाच अभिमान वाटतो.

सतीश नाईक
संपादक ' चिन्ह '

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर>>>> दै. मराठा - आचार्य अत्रे



दै. मराठा - आचार्य अत्रे
गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख...
सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्याचां आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.
आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय. आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.
पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.
हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती, आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील!
आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते. धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही!' हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता.
अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा'वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा'वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!
नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, "जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!" आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.
'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे? घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे! दुर्भाग्य हिंदू समाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.
आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता. ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले.
त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे. अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली.
मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणारे होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही.
'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते.
महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे.
त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.
(मराठा : 7-12-1956)
विनय गुप्ते यांच्या what's app post वरून.

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी



ज्यांचे वय देखील शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा कमी असेल, अशा लोकांनी या नेत्याबद्दल बोलताना कोलांट्याउड्या असा शब्द वापरला, मग माझ्याही मनाला यातना होतात. कारण पवाराची राजकीय कारकिर्द आणि माझी पत्रकारिता जवळपास एकाच वेळी सुरू झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने महाराष्ट्राला दिलेले दोन मोठे नेते होत. त्यांच्याच प्रभावाखाली गेल्या साडेतीन दशकात महाराष्ट्राने वाटचाल केली. त्या दोघांची तुलना होऊ शकत नसली, तरी त्यांच्यातले विरोधाभास त्यांच्या मैत्री इतकेच चमत्कारिक कोडे आहे. एकाने सतत सत्तेच्या छायेत राहून आपला प्रभाव पाडला; तर दुसर्‍याने सत्तेला सतत झुगारून आपला दबदबा निर्माण केला. एकाला सत्तेशिवाय जगणेच अशक्य वाटले, तर दुसर्‍याच्या हाताशी सत्ता येऊनही तिच्यापासून दुर रहात त्याने व्यक्तीगत दरारा कायम राखला. अशा दोन टोकाच्या व्यक्तीमत्वांनी महाराष्ट्राला दिर्घकाळ नेतृत्व दिले. त्यातले बाळासाहेब आज हयात नाहीत. पण शरद पवार कालबाह्य होत असताना, नव्या पिढीतल्या कोवळ्या पोरांशी लढताना दिसतात, तेव्हा म्हणूनच ती केविलवाणी धडपड नकोशी वाटते. कालपरवाच लोकसभा विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे पवार व त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले. खरे तर त्याच्याही आधी त्यांनी आपण होऊन बाजुला व्हायला हवे होते. पण क्षणभरही राजकारणाचा त्याग त्यांच्या मनाला शिवत नसावा. त्यातून मग अशी दुर्दैवी परिस्थिती उदभवली आहे.

लोकसभेपासून विधानसभेपर्यंत पवार यांनी आपली पुरोगामी प्रतिमा टिकवण्यासाठी भाजपावर ‘अर्धी चड्डी’ अशी टिका चालवली होती आणि अशा लोकांच्या हाती राज्याची सत्ता सोपवणार काय, असा सवाल थेट मतदाराला केला होता. पण त्याच निवडणूकीचे निकाल स्पष्टही झालेले नव्हते, त्याआधी थेट त्याच भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाठींबाही पवारच देऊन मोकळे झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी एक राजकीय तर्कशास्त्रही मांडले होते. राज्यात राजकीय अस्थीरता नको म्हणून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पक्षाला जनतेने दिलेले कौल मान्य करून आपण बिनशर्त पाठींबा देत आहोत, असे त्यांनी म्हटले होते. पण आपल्याच विधानावर खुद्द पवारांचा तरी कितीसा विश्वास होता? जोपर्यंत निकाल स्पष्ट झालेले नव्हते, तोपर्यंत भाजपाचे बहूमत हुकल्याचे पवारांना कसे उमगले होते? निकालाचे आकडेच स्पष्ट नसताना भाजपाच्या सोबत अन्य कुठलाच पक्ष नाही, म्हणून त्यांना सरकार बनवण्यात अडचण येणार, हे ओळखायला पवार अंतर्यामी महंत आहेत काय? आदल्या दिवशीही भाजपा नेते जागा कमी पडल्यास शिवसेनेची मदत घेऊ असे म्हणत असताना, त्यांना बहूमताची अडचण आली आहे, याचा साक्षात्कार पवारांना कशाला व्हावा? अडचण येण्यापुर्वीच न मागितलेली मदत द्यायला धावण्याची ही धुर्त खेळी राज्याच्या स्थैर्यासाठी होती, यावर खुद्द पवार यांचा तरी विश्वास होता काय? त्यामुळेच पवारनिती म्हणूनच त्याकडे बघितले गेले आणि आता जी राजकीय अस्थीरता निर्माण झाली, त्याचे खापरही पवारांच्याच माथी मारले गेले. कारण आपल्या बिनमांगा पाठींब्याच्या घोषणेला महिना होत असताना त्यांनीच नेमके उलट अर्थाचे विधान करून टाकले. सरकार चालवायचा मक्ता आपण घेतलेला नाही, असे धमकीवजा विधान अलिबाग येथील चिंतन शिबीरात त्यांनी केले. आजचे त्यांचे विधान खरे मानायचे, तर मग महिनाभर आधी जुने विधान कशाला केले होते? तेव्हाही कोणी सरकार वा राजकीय स्थैर्याचा मक्ता शरद पवार यांना दिलेला नव्हता. मग मक्तेदार असल्यासारखी त्या पाठींब्याची घोषणा करायची काय गरज होती?

पवारांच्या याच परस्पर विरोधी विधानांमुळे वाहिन्यांवरच्या निवेदक वा वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी त्यांच्या अशा राजकीय खेळीला कोलांट्याउड्या असे संबोधन दिले. अर्थात असे पवारांनी प्रथमच केलेले नाही. त्यांच्या अर्धशतकाच्या राजकीय वाटचालीत गाजवलेले कर्तृत्व बघितले. तर अकस्मात उलट्या टोकाला जाण्याइतक्या भूमिका सहजगत्या बदलून त्याला तत्वाचा मुलामा चढवण्यात पवार वाकबगार राहिले आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळातले ज्येष्ठ राजकीय नेते व कार्यकर्ते साधेसरळ अब्रुदार होते. त्यामुळे बोललेले शब्द वा घेतलेल्या भूमिकांविषयी ठाम असायचे, व्यवहारी नुकसान सोसूनही आपल्या भूमिकेवर ठाम रहाण्याला नेतृत्व मानले जायचे. सोयीनुसार भूमिका बदलून त्याला तात्विक मुलामा चढवण्याला संधीसाधूपणा समजले जायचे. असल्या प्रथा परंपरांना शरद पवारांनी त्याच उमद्या कालखंडात बेधडक फ़ाटा दिला आणि केव्हाही संधी मिळेल तिथे स्वार्थाला तत्वांचा मुलामा चढवण्यात धन्यता मानली. मोजक्या लोकांनी त्यांच्या अशा संधीसाधूपणाला धुर्तपणा ठरवण्याचे काम मस्त पार पाडले. मग अशा या भ्रामक प्रतिमेत खुद्द पवारच इतके गुरफ़टत गेले, की त्यातून बाहेर पडून खराखुरा शरद पवार होणे, त्यांना अशक्यच होऊन गेले. त्यांना आवडणार्‍या क्रिकेटच्या खेळात एकदोन सणसणित फ़टके मारणार्‍या फ़लंदाजाचा प्रेक्षक डोक्यावर घेतात. त्याचा फ़टका चुकीचा असला तरी चौकार-षटकार गेल्यावर त्याची चुक कोणी विचारात घेत नाही, तर भर पडलेल्या धावांचा गौरव होतो. तिथेच मग तो फ़लंदाज टाळ्यांच्या गजराचा हावरा होऊन गेला, तर अकस्मात बाद होतो आणि लौकरच क्रिकेटमध्येही आपली शान गमावून बसतो. मोठी खेळी करणेही त्याला मग शक्य होत नाही. पवारांच्या दिर्घकालीन राजकीय खेळीचा तसाच सत्यानाश होऊन गेला आहे. त्यांच्या प्रत्येक फ़सव्या संधीसाधू कृतीला धुर्त, मुरब्बी, मुत्सद्दी, उस्ताद अशी विशेषणे मिळत गेल्याने त्यांच मोहात सापडून पवार राजकारणाचे पावित्र्यच विसरून गेले. तिथेच त्यांची घसरगुंडी होत गेली. सहाजिकच ताज्या राजकारणात नुकसान किती झाले, त्यापेक्षा आपल्या लबाड खेळीवर पवार खुश आहेत.

दोन दशकापुर्वी हाच माणूस महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात थेट पंतप्रधान पदावर दावा करायला गेला होता, यावर आज कोणाचा विश्वास तरी बसेल काय? राजीव गांधींची हत्या झाल्यावर कॉग्रेस पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढायला पवार संसदीय पक्षाचा नेता व्हायला दिल्लीला गेले होते. नरसिंहराव यांना आव्हान देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्यांचीच गुणवत्ता, अनुभव आणि कार्यक्षमता यावर मात करणार्‍या त्यांच्या धुर्तपणानेच त्यांचा बळी घेतला. महाराष्ट्रातल्याच खेळी तिथे करताना त्यांची अशी घसरगुंडी होत गेली, की त्यातून त्यांना अजून सावरता आलेले नाही आणि आता वेळ निघून गेली आहे. इथे ज्या स्थानिक व प्रादेशिक राजकारणात चलाख्या केल्या, त्यातून पवार क्रमाक्रमाने आपली विश्वासार्हता गमावत गेले होते. पण तीच प्रतिमा त्यांना राष्ट्रीय पातळीवर अडचणीची ठरली. देशभरच्या सर्वच राजकीय पक्षात पवारांचे दोस्त आहेत, असे अगत्याने सांगितले जाते. पण त्यापैकी किती पक्ष वा त्यांचे नेते पवारांवर विश्वास ठेवतात, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. आणि तीच पवार यांच्या राजकारणाची खरी शोकांतिका आहे. राजकारण हा कितीही संधीसाधूपणाचा खेळ असला, तरी तो विश्वासाच्या मैदानात खेळला जातो. म्हणूनच त्यात पवार क्रमाक्रमाने अपेशी ठरत गेले. त्यांची क्षमता-गुणवत्ता कोणी नाकारलेली नाही. पण त्या पात्रतेवर विश्वास ठेवून कोणी एक पाऊल पुढे टाकायला तयार नसतो. वाजपेयी सरकार एक मताने पडले, तेव्हा १९९९ सालात संसदेच्या पायरीवर उभे राहून पवारांनी घोषणा केली होती, ‘अभी सोनियाजीके नेतृत्वमे पर्यायी सरकार बनायेंगे’. ते शक्य झाले नाही आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली, तेव्हा अवघ्या तीन महिन्यात सोनिया परदेशी असल्याचे सांगत पवारांनी कॉग्रेस फ़ोडली होती. मग त्याच निवडणूकीच्या निकालानंतर त्यांनी पुन्हा सोनियांशी जुळवून घेतले.

आता पवार बोलतील त्यावर तासाभराने त्यांचाही विश्वास नसतो, ही त्यांची ख्याती त्यामुळेच झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर निवडणूक निकालानंतर त्यांनी भाजपाला दिलेला पाठींबा आणि कालपरवा अलिबाग येथे त्याविषयी दाखवलेली अनिश्चीतता, तपासणे भाग आहे. तिथेही आदल्या दिवशी त्यांनी जी भूमिका मांडली, त्याच्या नेमकी उलटी भूमिका दुसर्‍या दिवशी घेतली. असे करायची त्यांना काय गरज होती? आपला फ़ायदा प्रत्येक राजकीय नेता बघतच असतो. त्यामुळेच शरद पवार यांनी नि:स्वार्थी निरपेक्ष आजकारण करावे, अशी कोणी अपेक्षा करू शकत नाही. पण दोन दिवसात उलटसुलट भूमिका मांडून पवार यांचा कुठला लाभ झाला? एकीकडे त्यांच्या पाठींब्याविषयी भाजपाच्या मनात शंका सुरू झाल्या आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्ष पाठीराख्यात चलबिचल निर्माण झाली. इथे पवार नावाच्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू लक्षात घेण्यासारखा आहे. इतर राजकीय नेत्यांशी म्हणूनच पवारांची तुलना होऊ शकत नाही. कुठलाही लाभ किंवा तोटा विचारात न घेता पवार आपल्या खेळी करतात. प्रसंगी तोटाही ओढवून घेतात. पण आपण राजकारणात संदर्भहीन झालेलो नाही, असे भासवण्यासाठी काहीतरी विचित्र खेळी करून सर्वजनांना थक्क करून सोडण्याचा मोह त्यांना कधीही आवरता आलेला नाही. इथेही नेमक्या तशाच घटना घडलेल्या दिसतील. निकाल स्वच्छ होण्यापुर्वीच त्यांनी भाजपाला पाठींबा दिला होता. मग तीनदा त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन भाजपाचे सरकार कसे अल्पमतातही चालू शकेल, त्याचे खुलासे देण्याचे कष्ट घेतले. भाजपाचे नेतेही आपले सरकार बहूमतात आहे किंवा नाही वा बहूमत कसे सिद्ध करणार; त्याविषयी मौन बाळगून होते. पण पवार मात्र अगत्यपुर्वक राष्ट्रवादीच्या गैरहजेरीने फ़डणवीस सरकारचे बहूमत कसे सिद्ध होऊ शकते, त्याची ग्वाही देत होते. त्यातून काय दिसत होते किंवा दाखवले जात होते? भाजपाचे सरकार कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही, यासाठी वाटेल ते करायला पवार सज्ज आहेत. फ़डणवीस सरकारची भाजपापेक्षा पवारांना फ़िकीर आहे. त्याचा मराठीतला अर्थ, हे सरकार चालवण्याचा मक्ता खुद्द शरद पवार यांनीच घेतला आहे. असेच दिसत नव्हते का? पण मंगळवारी अलिबागेत शिबीरात बोलताना पवारांनी दुसर्‍या टोकाचे विधान केले. सरकार चालवायचा मक्ता आम्ही घेतलेला नाही.

ज्यांना सत्तेत सहभागी व्हायचे नाही व बाहेरून पाठींबा दिलेला आहे आणि ज्यांचा पाठींबा आपण घेतला आहे असे भाजपा अजून सांगायला धजावत नाही, त्याविषयी पवार यांची इतकी विधाने व अशा भूमिका धुर्तपणा म्हणायचा, की धरसोडवृत्तीचा नमूना म्हणायचा? यातून ज्या भाजपाला पवार मदत करत होते, त्यांचे राजकीय नुकसान व्हायचे ते झालेच. पण खुद्द पवार वा त्यांच्या पक्षाला तरी कुठला राजकीय लाभ होऊ शकला? आपल्यावरचे घोटाळ्याचे आरोप लपवायला आणि पापावर पांघरूण घालायलाच राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचा गवगवा होऊनच गेला. इतके झाल्यावर पवार म्हणतात सेना व भाजपा एकत्र आले नाहीत, तर राज्यात स्थीर सरकार येऊ शकणार नव्हते व त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊन सहा महिन्यात निवडणूका घ्यायची वेळ आली असती. पण सेना व भाजपा एकत्र येणार नाहीत, हे पवारांना अंतिम निकालापुर्वी कसे कळले? उलट त्यांनीच एकतर्फ़ी पाठींबा देऊन दोघांनी एकत्र येण्यात बिब्बा घातला होता. सहाजिकच यातला मानभावीपण लोकांनाही कळतो. पण लोकांना यातले काही कळत नाही, अशा भ्रमात पवार रहातात आणि आपलेच नुकसान झाले तरी अशा खेळी करीत रहातात. त्या फ़सण्यावरही तत्वज्ञान वा राजकीय तर्काचा मुलामा चढवतात. असल्या धुर्तपणाची लकाकी आता संपलेली आहे, त्या़चे त्यांना भान कशाला येत नाही, याचेच नवल वाटते. सततच्या असल्या चाली व खेळी बघून लोकांना आता पवार कुठे फ़सतील, हे समजू लागले आहे. परिणामी जे काही पवार बोलतात, त्याच्या नेमके उलटे वागतील, याविषयी लोकांना खात्री वाटू लागली आहे. त्यातून बाहेर पडण्याचे व नव्याने पक्षाची व आपल्या प्रतिमेची उभारणी करण्याचे वय राहिलेले नाही. पण सवय मात्र त्यांना शांत बसू देत नाही. म्हणून मग अशा पोरकट ठरणार्‍या कृती-उक्ती त्यांच्याकडून होत असतात.

दिर्घकाळ त्यांची राजकीय कारकिर्द व भलेबुरे दिवस बघणार्‍या व अभ्यासणार्‍या माझ्यासारख्या अनेक राजकीय पत्रकारांना त्याचे मानसिक क्लेश होतात. ज्याच्यापाशी कष्ट उपसण्याची जिद्द, गुणवत्ता व बुद्धी आहे आणि तरीही अशा हुशार मुलाने उनाडपणा करण्यात वेळ दवडून कॉपी करूनच मेरीट मिळवण्याचा अट्टाहास करण्यात उमेद वाया घालवावी, अशी एकूण पवार यांची वाटचाल म्हणावी लागेल. त्यांची धुर्त, मुरब्बी व चलाख प्रतिमा आरंभीच्या कालखंडात काही पत्रकारांनॊ उभी केली. पवार त्या प्रतिमेत इतके गुरफ़टून गेले, की स्वत:लाच त्यात हरवून बसले. पवार म्हटले की धुर्त आणि काहीतरी अजब खेळी करणारच, अशी जी समजूत आहे, तिला खतपाणी घालण्याच्या हव्यासाने एक चांगला पात्र राजकारणी महाराष्ट्राने गमावला. ज्याच्यापाशी पंतप्रधान होऊन राष्ट्रीय नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा होती, तितकीच कष्ट उपसण्याची उर्जाही होती. पण चलाखीच्या खेळाने त्याला व्यसनासारखे पछाडले आणि त्यात भरकटत जाताना, त्याला आपल्याच भल्याबुर्‍याचे भान ठेवता आले नाही. अशा व्यक्तीमत्वाला केविलवाणा बघताना कुठल्या राजकीय अभ्यासकाला यातना होणार नाहीत? सचिन इतकाच गुणी व पात्रता असलेला विनोद कांबळी अपयशी ठरून क्रिकेटबाहेर फ़ेकला गेल्याचा, कोणाला आनंद होऊ शकेल काय? विनोदच्या दुर्दशेचे खापर अन्य कोणावर फ़ोडता येत नाही, तसेच शरद पवार नावाच्या एका जिद्दी राजकारण्याच्या शोकांतिकेचे खापर इतर कोणाच्या डोक्यावर फ़ोडता येणार नाही. मग कुठल्या बिगबॉस मालिकेत पोरकटपणा करून आपले अस्तित्व टिकवायला धडपडणारा विनोद चमकतो, की केविलवाणा वाटतो? त्याला अशा कार्यक्रमात स्थान देणारे वा बोलावणारे त्याचा सन्मान करत नसतात वा त्या़च्या गुणवत्तेचा गौरव करत नसतात. ती विनोदमधल्या क्रिकेटरची विटंबना असते. आज पवार यांनी केंद्रापासून राज्यातल्या राजकारणात अस्तित्व राखण्यासाठी जे काही चाकविले आहे, त्यातून त्यांची तशीच दखल घेतली जात असेल, पण ती सन्मानजनक नाही, एवढे तरी त्यांच्या लक्षात कशाला येत नाही?

आपल्या मुलांच्या वयाच्या नेत्यांशी सध्या पवार धावायची शर्यत करतात आणि त्यातच त्यांची दमछाक होताना दिसते तेव्हा खरेच क्लेश होतात मनाला. त्यांच्या वयाला असली शर्यत मानवत नाही, त्याचप्रमाणे त्यात त्यांची दमछाकही बघवत नाही. वर्षभरापुर्वी भाजपाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. तेव्हही पवार यांनी आपल्या अनुभवाचे बोल ऐकवले होते. एका बाजूला राजकारण खेळाताना पवारांनी क्रिडाक्षेत्रातही खुप गोष्टी केल्या. त्यामुळेच त्यांच्या क्रिडा विषयक ज्ञानाकडे दुर्लक्ष करता येत नाही. लोकसभा निवडणूकीला तब्बल आठ महिने शिल्लक असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेची आघाडी उघडली होती. तेव्हा होऊ घातलेल्या चार विधानसभांच्या निवडणूकीत त्यांनी अग्रभागी राहुन सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे अन्य राज्यातही जाऊन मोठमोठ्या सभा घ्यायला आरंभ केला होता. त्याच संदर्भात पवारांनी एक वक्तव्य केले होते. मॅराथॉन ही जगातली सर्वात मोठ्या लांबीची धावस्पर्धा दौडणारा खेळाडू कधी घाई करीत नाही. अत्यंत संथगतीने आरंभ करतो आणि आपली शक्ती जपून वापरत अखेरच्या पल्ल्यात झेपावतो. उलट आधीच दौडत सुटलेला उतावळा धावक सगळी शक्ती पहिल्याच काही अंतरात धावताना थकून जातो आणि निर्णायक टप्पा आला, मग त्याची पुरती दमछाक होऊन जाते. असे विधान पवार यांनी केलेले होते. पण त्यांना त्यातून मोदींची घाई सुचित करायची होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणूका येतील तेव्हा मोदी थकलेले असतील व त्यांच्या प्रचाराची दमछाक झालेली असेल, असेच पवारांना सांगायचे होते. त्यांचा मुद्दा दुर्लक्षणिय नव्हता. पण त्यासाठी त्यांनी ज्या व्यक्तीकडे बोट दाखवले, त्यात गल्लत होती. कारण मोदी यांनी कुठल्याही पदापर्यंत पोहोचण्याचा उतावळेपणा केलेला नव्हता. पण उलट हे तत्वज्ञान सांगणार्‍या पवारांनाच ते उदाहरण चोख लागू पडत होते. आजची पवारांची दमछाक त्याचाच पुरावा आहे. मोदींनी खुप उशीरा निवडणूक व सत्तेच्या राजकारणात उडी घेतली आणि अल्पावधीत निर्णायक टप्पा गाठला. त्याच्या उलट पवारांची कहाणी आहे.

   पवारांनी पहिली निवडणूक तिशीच्या आधीच लढवली आणि तिशी पार होताना मंत्रीपदही मिळवले. अवघ्या दहा वर्षात मुसंडी मारून मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांची मजल गेली. राजकीय मॅराथॉन शर्यतीमध्ये आज पवार कुठे येऊन पोहोचले आहेत? पंतप्रधानपद ही त्यांच्या राजकीय शर्यतीचे लक्ष्य नव्हते का? मग त्यात पवार कुठवर येऊन पोहोचले? कितीही शॉर्टकट मारून त्यांना पंतप्रधान पदाच्या रेषेपर्यंत पोहोचताही आलेले नाही. असे कशाला झाले आहे? ही शर्यत मॅराथॉनची आहे, हे तेव्हा पवारांच्या लक्षात आलेले नसावे. मोदींची गोष्ट एकदम वेगळी आहे. तुलनेने मोदी खुपच उशीरा या शर्यतीत उतरले. खरे सांगायचे तर त्यांना पक्षाने जबरदस्तीने सत्तेच्या शर्यतीत उतरवले. पन्नाशी ओलांडल्यावर पक्षाने लादल्याने त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले आणि पुढल्या घडामोडींनी उठलेले टिकेचे मोहोळ आवरताना मोदी कधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊन पोहोचले; त्याचा त्यांनाही पत्ता लागला नाही. राजकीय कारकिर्दीला पद वा सत्ता मिळवण्याच्या हव्यासाने मोदींनी सुरूवात केली नाही. आपली शक्ती व सराव वाढवत नेल्याने आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत आणि पवार कुठल्या कुठे दूर फ़ेकले गेलेत. पवार त्या शर्यतीत उतरले तेव्हा मोदी आमदारकीच्याही जवळपास नव्हते. पवारांनी आपल्याला लागू होणारे निकष मोदींना लावण्याची अकारण घाई केली. म्हणून सव्वा वर्षापुर्वी त्यांनीच केलेले विश्लेषण आज खोटे पडले आहे. आपल्याच विश्लेषणात पवार यांची फ़सगत झाली आहे. पंतप्रधानपद दूरची गोष्ट झाली. महाराष्ट्रातील आपलेच बालेकिल्ले संभाळताना पवारांची तारांबळ उडालेली आहे. आणि त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसून, खुद्द पवारांनी केलेली घाईगर्दीच त्याचे एकमेव कारण आहे.

दुर्दैव असे, की अजून कुठल्याही गोष्टीत धुर्तपणा म्हणून धांदरटपणा करण्याचा शरद पवार यांचा हव्यास काही सुटलेला नाही. म्हणून तर वयाने पोरसवदा वाटणार्‍या नव्या पिढीच्या देशभरातील वा राज्यातील नेत्यांकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागते आहे. राज-उद्धव किंवा गडकरी-फ़डणवीस यांच्याशी पत्त्याचे डाव खेळल्यासारखे राजकारण पवार खेळतात, तेव्हा म्हणूनच त्यांना अभ्यासलेल्यांना क्लेश होतात. या नव्या पिढीतले नेते वा पत्रकार पवारांच्या कृतीची टवाळी करतात, ते यातनामय असते. आताही निकालापुर्वी भाजपाला पाठींबा द्यायचा, मग गैरहजर राहून बहूमत सिद्ध करायला मदतीचा हात पुढे करायचा आणि पुन्हा सत्ता टिकवण्याचा मक्ता आपण घेतलेला नाही असे उफ़राटे विधान करायचे; असली स्थिती बघितली मग दया येते. कुठल्याशा चित्रपटात नुसत्याच नाचापुरता दिसणारा भगवानदादा किंवा गर्दीतल्या प्रसंगात भारतभूषण बघितल्यावर जुन्या पिढीतल्या चित्रपट रसिकाला अस्वस्थ वाटायचे, तशी माझ्या पिढीतल्या पत्रकारांची अवस्था होते. जग-काळ व समिकरणे आता बदलून गेलीत आणि म्हणूनच व्यवहारासह धुर्तपणाचे स्वरूपही आमुलाग्र बदलून गेले आहे. नवी पिढी राजकारणात पुर्वीच्या नेत्यांप्रमाणे निरागस वा भोळसट राहिलेली नाही. म्हणूनच त्यांना अशा खेळी पहिल्या फ़टक्यात कळतात. शरदरावांना हे कधी उमगणार?
(पुढारी रविवार पुरवणी ‘बहार’ २३/११/१४)

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

स्थीर सरकारसाठी अस्थीर पाठींबा



आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी बघितल्या तर आणि त्याचे चाललेले विश्लेषण बघितले तर, वास्तवाचे कुणाला भान राहिलेले नाही असे वाटते. विधानसभा निवडणुका ज्या परिस्थितीत झाल्या किंवा त्या दरम्यान जशी राजकीय स्थिती निर्माण करण्यात आली, त्याचेच प्रतिबिंब निकालावर पडलेले आहे. पण म्हणुन राजकीय परिस्थिती तशीच राहील, किंवा त्यात आता कुठलाच बदल संभवत नाही, असे मानायचे कारण नाही. कारण राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. म्हणूनच निवडणूकीपूर्वी शरद पवार संपले असेच मानले जात होते. पण आज त्यांचा पक्ष पराभूत होऊन चौथ्या क्रमांकावर फ़ेकला गेला असतानाही, सुत्रे तेच हलवित आहेत असेच दिसते आहे. उलट ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या, तो भाजपा किंवा दुसर्‍या क्रमांकाच्या जागा जिंकणारी शिवसेना, चाचपडताना दिसते आहे. युती व आघाडी तुटण्यातून राजकारणाला जी कलाटणी मिळाली, त्यातून विस्कटलेले राजकीय चित्र अजून स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अर्थात ज्याच्या मताने असे चमत्कार घडत असतात, त्या अबोल मतदाराला यातले बारकावे नेमके कळत असतात आणि तोच त्यातून मार्ग काढत असतो. अन्यथा त्याने अशी त्रिशंकू अवस्था कशाला करून ठेवली असती? पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या दोन कॉग्रेसच्या सत्तेपासून लोकांना मुक्ती हवी होती, हे स्पष्टच दिसते. पण ते ओळखून राजकीय पक्षांनी चलाखी केली आणि आजवरच्या युत्या-आघाड्या तोडून मतदाराची झकास दिशाभूल केली होती. पण त्याच मतदाराने युतीतल्या पक्षांना सत्तेत एकत्र आणायचा साळसूद कौल दिलेला आहे. मात्र त्याला झुगारण्याची कृती आज तरी राजकारण्यांनी केली आहे.

युतीपक्ष एकत्र असते, तर मस्त बहूमताने त्यांना सत्ता राबवता आली असती आणि दोन्ही कॉग्रेसना नामोहरम करता आले असते. पण मतदाराला राजकारण्यांनी तशी संधी नाकारली. मग मतदाराने राजकारण पुन्हा तिथेच आणून ठेवले. त्याला भाजपा व सेना एकत्र सत्तेत हवे असल्याचा तो कौल होता. पण सेनेचा हटवादीपणा व भाजपाचे पवारप्रेम, यामुळे यात बाधा आलेली आहे. सहाजिकच सरकार स्थापन झाले. पण त्याला खंबीर बहूमताचा आधार राहिलेला नाही. सेनेला सोबत घेऊन भाजपाला बहूमत पक्के करता आले असते. पण त्यासाठी सेनेला पुरेसा हिस्सा द्यायची तयारी नाही. म्हणून मग सेनेला विरोधात बसायची पाळी आली आहे. दुसरीकडे भाजपाने सत्ता स्थापन केली आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा घेतला आहे. पण तो पाठींबा घेतला आहे किंवा त्यावर विसंबून आहोत, असे उघडपणे सांगायची भाजपामध्ये हिंमत नाही. कारण त्याच पक्षाने भ्रष्टाचारी राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र असा प्रचार केलेला होता. मग त्यात सेनेची मदत घेऊन भ्रष्टाचाराला निपटून काढायला भक्कम सरकार स्थापण्याची संधी त्या पक्षाने का साधलेली नाही? अशा प्रश्नांची उत्तरे राजकारणी कधीच देत नाहीत. चर्चा चालू आहेत, सकारात्मक चर्चा झाली, असली पोकळ थातूरमातूर उत्तरे दिली जातात. मात्र त्यातून उत्तर मिळण्यापेक्षा अधिकच गोंधळ उडत असतो. परंतु विधानसभेत बहूमताचे जे नाट्य रंगले त्यानंतर त्यात कुठले गुपित राहिलेले नाही. राष्ट्रवादीच्याच पाठींब्यावर भाजपाची मदार आहे, हे आता लपून राहिलेले नाही. अर्थात बहूमत सिद्ध करायची पाळी येऊ नये आणि राष्ट्रवादी पक्षावर अवलंबून असल्याचे दिसू नये, अशी अजब कसरत भाजपाला करावी लागते आहे. म्हणून मग आवाजी मतदानाची पळवाट शोधली गेली. समजा तसे शक्य झाले नसते आणि खरेच मतदान घ्यायची पाळी आली असती तर, राष्ट्रवादीने तटस्थ रहाणे किंवा अपरिहार्य म्हणून सरकारच्या बाजूने मतदान करणे, याचीही सज्जता राखली गेली होती. हे सर्वाच्या लक्षात आले, तरी भाजपा मान्य करणार नाही. कारण त्याला आता सत्तेसोबतच विश्वासार्हतेची चिंता भेडसावते आहे. उलट भाजपाची तीच समस्या लक्षात आल्यावर शिवसेनेने विरोधात बसण्याचा पवित्रा ठामपणे घेतला आहे.

थोडक्यात आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था अशी आहे, की सरकार स्थापन झाले आहे, पण ते परावलंबी अधिक आहे. पाठीशी पुरेसे हुकूमी बहूमत नाही आणि म्हणून त्याला ठामपणे कुठले धाडसी निर्णय घेता येणार नाहीत. दुसरीकडे ज्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करायची ग्वाही जनतेला दिलेली आहे, त्याला हात लावायला गेले तरी पाठींब्याचा आधार डळमळीत होऊन जाण्याचा धोका आहे. कारण भ्रष्टाचाराचे सर्वच आरोप असलेले नेते ज्या पक्षात आहेत, त्याच राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार उभे राहिले आहे. अशा पाठींब्यावर सत्ता स्थापण्याचा धोका भाजपाने कशाला पत्करावा, हे कुणालाही न उलगडणारे कोडे आहे. पण तसे ते रहस्यही नाही. भाजपातल्या बहुतांश नेत्यांचे पवारांशी असलेले मधूर संबंध त्याचे रहस्य आहे. तात्विक पातळीवर सेनेशी भाजपाची जशी जवळीक आहे; तितकीच भाजपा नेत्यांची राष्ट्रवादी नेत्यांची व्यवहारिक जवळीक असू शकते. त्यातून हा तिढा निर्माण झालेला आहे. सेनेशी वैचारिक प्रेम आणि राष्ट्रवादीशी व्यवहारी नाते, अशा गुंत्यात आज भाजपा फ़सला आहे. मग त्यातली एक बाजू संभाळताना दुसर्‍या बाजूचा तोल जातो. तीच नव्या सरकारची समस्या होऊन बसली आहे. पण त्यामुळेच नवे फ़डणवीस सरकार तारेवरची कसरत करत चालवावे लागणार आहे. कारण आता कालपर्यंतचा मित्र विरोधात बसला आहे आणि तोच नित्यनेमाने राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर कारवाई करायच्या मागण्या करणार आहे. त्याच मागण्या गेल्या तीन वर्षात खुद्द आजचे भाजपातले मंत्री आग्रहाने करीत होते. म्हणजेच भाजपाच्याच जुन्या मागण्यांची पुर्तता भाजपाने आता करावी, असा आग्रह धरला जाणार आहे. पण त्या कारवाया ज्यांच्यावर करायच्या, त्यांच्याच पाठींब्यावर भाजपाला सत्ताही टिकवायची आहे. मग ही कसरत चालणार क्शी? धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी भाजपाची अवस्था झाली आहे. पण त्यासाठी तो पक्ष अन्य कुणाला दोष देऊ शकत नाही. कारण ती अवस्था त्यानेच स्वत:वर ओढवून आणली आहे.

शिवसेनेला जागा कमी मिळाल्या, त्यांनी ताकद नसताना युती तोडायची वेळ आणली, उगाच भाजपा विरोधात अभद्र भाषा वापरली, भाजपाला शिव्याशाप दिले, अपमान केला, निकालानंतरही आपण सेनेला सोबत घेण्याचा आटापिटा केला, अशा गोष्टी भाजपा मागल्या दोन महिन्यापासून सातत्याने सांगतो आहे आणि त्यावर कोणी शंका घेतलेली नव्हती. पण गेल्या आठवड्यात ज्या क्रमाने घटनाक्रम घडला, त्यामुळे भाजपाच्या वर्तनाभोवती संशयाचे धुके दाट होत गेले. आधी मंत्रीपदे व खात्यांसाठी अडवून बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी फ़क्त क्षुल्लक मागणी केली आणि तिथेच राजकारणाचे चित्र एकदम बदलून गेले. शपथविधीवर बहिष्कार घालण्यापासून केंद्रातल्या मंत्रीपदासाठी हटवाद करणार्‍या शिवसेनेने, सहज मान्य करण्यासारखी कोणती मागणी भाजपाकडे केली? ‘आपण राष्ट्रवादीने देऊ केलेला पाठींबा नाकारतो, अशी घोषणा भाजपाने करावी, सेना विश्वासमतासाठी भाजपा सोबत येईल’, अशी ती मागणी होती. ज्याच्या भ्रष्टाचाराचे प्रचारात व मागल्या तीनचार वर्षात भाजपाने राजकीय भांडवल केले, त्याने देऊ केलेला पाठींबा नाकारण्यात भाजपाला काय अवघड होते? त्यांचे विश्वासमत संपादन करण्याचे काम एकदम सोपे होऊन गेले असते. १२२ अधिक ६३ म्हणजे १८५ इतके भक्कम बहूमत विधानसभेत दिसले असते. त्याखेरीज सोमवारी उद्धवची कुठलीच अन्य अट नव्हती. भाजपाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारण्यात काय अडचण होती? पण राजकारणाचा बारकाईने अभ्यास करणार्‍यांना नेमके कळू शकते, की तीच भाजपासाठी सर्वात अशक्यप्राय अट होती. मागल्या तीन वर्षात भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांशी राजकीय आरोपबाजीचे नाटक मस्तपैकी रंगवत असले, तरी व्यवहारात त्यांचे अनेक बाबतीत झकास संगनमत होते. त्यांनीच एकत्रितपणे युती व आघाडी मोडण्याचे डावपेच योजले व निवडणूकीच्या आधीपासून संयुक्तपणे राबवले होते. त्यानुसारच निकाल संपण्याआधीच राष्ट्रवादीने बाहेरून पाठींबा घोषित केला होता. मग तो पाठींबा कसा नाकारता येईल? किंबहूना भाजपा तो पाठींबा नाकारू शकत नाही आणि त्यातूनच आपण भाजपाचा चालू असलेला दुटप्पीपणा चव्हाट्यावर आणू शकतो, हे लक्षात आल्यावरच उद्धव यांनी तशी क्षुल्लक वाटणारी मागणी केली होती.

भाजपाला ती मागणी पुर्ण करता आली नाही आणि तिथेच गेल्या दोन महिन्यापासून राष्ट्रवादीधी चालू असलेली भाजपाची चुंबाचुंबी उघडी होऊन गेली. एका बाजूला भक्कम बहूमताची हमी सेनेकडून मिळत होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बेभरवशी पाठींब्याचा पर्याय होता. भाजपा तो बेभरवशी पर्याय कशाला नाकारू शकत नाही? तिथेच मग अवघे राजकीय कोडे उलगडत जाते. तसे त्यात उलगडण्यासारखे फ़ारसे काही शिल्लक नव्हते. पहिल्या दिवशी पवार बाहेरून पाठींबा देऊन मोकळे झाले होतेच. पण त्याबद्दल भाजपाचा कुठलाही जाहिर प्रतिसाद नसताना पवार तिनदा पत्रकार परिषाद घेऊन आपली रणनिती घोषित करीत होते. प्रसंगी अनुपस्थित राहून सरकारला स्थीर करू, हवे असले तर सरकारच्या बाजूने मतदानही करू, अशा गर्जना पवारांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन करायची काय गरज होती? सरकार भाजपाचे आणि त्याच्या स्थैर्याच्या चिंतेने पवारांना कशाला ग्रासलेले होते? आपल्या मागे कुठले बहूमत आहे, त्याचे स्पष्टीकरण भाजपाचा कुठलाही नेता देत नव्हता. उलट सेनेशी चर्चा चालू असल्याचे हवाले मात्र दिले जात होते. त्यात तथ्य असेल, तर पवारांना सरकारच्या अस्थैर्याची इतकी फ़िकीर कशाला होती? अशा प्रश्नांचा उहापोह केला, तर सेनेशी कुठलीही सकारात्मक चर्चा होत नव्हती आणि भाजपा राष्ट्रवादीच्याच पाठींब्यावर बहूमतासाठी विसंबून होते, इतकेच उत्तर मिळते. फ़क्त बहूमत सिद्ध करायची वेळ येईपर्यंत लोकांना झुलवत ठेवायचे, म्हणून ‘सकारात्मक’ चर्चेच्या आवया उठवल्या जात होत्या. दोन आठवड्याच्या ‘सकारात्मक’ चर्चेत नेमक्या कुठले मुद्दे चर्चिले गेले, त्याचा तपशील भाजपाने एकदाही जाहिर केला नाही. कारण तसे काही घडतच नसेल, तर तपशील असणारच कसला? मात्र दुसरीकडून पत्रकार परिषदा घेऊन पवार पाठींब्याचे हवाले देत होते. म्हणजे सेनेच्या पाठींब्याची गरज नाही, असे राष्ट्रवादीमार्फ़त भाजपा सेनेला संदेश देत होता. त्यात सामान्य जनताच नव्हेतर सेना व पत्रकारही गुरफ़टून गेले होते आणि शिवसेनेच्या सत्तालोलूपतेच्या कहाण्या रंगवण्यात मग्न होते. सेनेला फ़ाटाफ़ुटीचे भय असल्याच्याही वावड्या उडवल्या गेल्या. उद्धव यांनी अखेरची गुगली टाकली नसती, तर हेच नाटक अजूनही चालूच राहिले असते.

‘राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारा आणि पाठींबा घेऊन जा’, या उद्धवच्या एका खेळीने भाजपाच्या लपंडाव संपुष्टात आणला. कारण मंगळवारी उशीरापर्यंत त्याबद्दल भाजपा घोषणा करू शकला नाही आणि बुधवारी सेनेने विरोधी नेतेपदावर बसायची घोषणा करून टाकली. आदल्या रात्री पुन्हा दिल्लीतून ज्येष्ठ भाजपा नेत्यांकडून सेनेला आमिष दाखवण्याचा प्रयास झाला. पण त्याची गरज नव्हती. उद्धव यांनी पाठींब्यासाठी कुठल्याच पदाची मागणी केलेली नव्हती. मागणी अतिशय क्षुल्लक व सोपी होती. ‘राष्ट्रवादीची साथ नाही’ इतकेच भाजपाने जाहिरपणे म्हणायचे होते. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत तरी भाजपा ती फ़ालतू भासणारी मागणी पुर्ण करू शकलेला नाही. कारण जगासाठी आणि सेनेसाठी ती मागणी कितीही क्षुल्लक असली, तरी भाजपासाठी ती बहूमोलाची मागणी आहे. कारण सत्ताधारी व विरोधी पक्ष म्हणून गेल्या तीन वर्षातले राजकारण राष्ट्रवादी व भाजपा यांनी संगनमताने चालविले होते. तीच खरी महाराष्ट्रातील युती होती. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे नेते उमेदवार म्हणून भाजपाने आयात केले आणि तरीही भागले नाही, म्हणून निकालाच्या दिवशी साहेबांनी बाहेरून पाठींबा जाहिर करून टाकला. सवाल जगाला माहिती असलेल्या सेना भाजपा युती मोडण्याचा नव्हता. सवाल आहे तो पडद्याआडच्या भाजपा-राष्ट्रवादी या छुप्या युतीला मोडीत काढण्याचा. उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी नेमकी तीच मागणी केल्याने भाजपा कोंडीत सापडला आहे आणि त्यामुळेच आजचा राजकीय पेचप्रसंग उभा राहिला आहे. अनेकदा आपल्या धुर्तपणाच्या मस्तीत हुशार माणसेही चुका करून बसतात, तसेच काहीसे पवार आणि भाजपाचे झालेले आहे. त्यांनी एकाच वेळी अनेक समस्या अंगावर ओढवून घेतल्या आहेत. त्यातून मग लौकर बाहेर पडणे त्यांना शक्य होईल असे वाटत नाही. कारण आता शिवसेना विरोधात बसली आहे आणि सत्तेतल्या चार अधिक खुर्च्या अडवणारी सेना परवडली असती, असे म्हणायची पाळी पवार आणि भाजपावर येऊ शकते.

पहिली गोष्ट अशी, की जो पक्ष सत्तेत सहभागी असतो त्याला जाहिरपणे सरकारमधल्या गोष्टींची वाच्यता करता येत नाही. म्हणजेच सेनेला सत्तेत सहभागी करून घेतले असते, तर सरकारच्या कामकाज व निर्णयांबद्दल तिला जाहिरपणे बोलायची मोकळीक राहिली नसती. पण आता त्यापासून सेना मुक्त आहे. दिल्ली विधानसभा निकालानंतरची स्थिती आठवा. तिथे शीला दिक्षीत यांच्या विरोधात रान उठवून मोठे यश मिळवणार्‍या केजरीवाल यांनी त्याच कॉग्रेसच्या पाठींब्याने सत्ता पटकावली होती. पण मग त्यांना शीला दिक्षीतांच्या विरोधात काही करता येत नव्हते. तर विरोधात बसलेले भाजपा नेते डॉ. हर्षवर्धन सतत त्याबद्दलच विचारणा करत होते. मग केजरीवाल यांना निरूत्तर व्हायची पाळी यायची. तेव्हा हर्षवर्धन काय म्हणायचे? ‘तुम्हीच तर दिक्षितांच्या विरोधात साडेतीनशे पानांचे आरोप सभांमधून करत होता. मग त्यावर कुठली कारवाई केलीत?’ बिचारे केजरीवाल ओशाळवाणा चेहरा करून म्हणायचे पुरावे असतील तर आणा, मग कारवाई करतो. आता ज्या प्रचारावर इतक्या जागा मिळवल्या, त्याच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर कोणी कारवाई करायची? विरोधात बसलेले शिवसेनेचे नेते व आमदार आपल्याच जुन्या मित्रांना म्हणजे एकनाथ खडसे व फ़डणवीसांना तोच सवाल करणार आहेत. अजितदादा किंवा तटकरे यांच्या विरोधात आरोपाची आतषबाजी केली होती, तर आता कारवाई करा. मग खडसे वा तावडे यांना काय उत्तर देता येईल? अर्थात असे सवाल सेनेने करायची गरज नाही. विरोधात बसलेली कॉग्रेसही तोच सवाल करू शकते. पण पराभूत झाल्याने आणि बदनाम असल्याने, त्यांच्या शब्दाला कोण विचारतो? मात्र शिवसेनेने केलेल्या सवालांना वजन असेल. कारण कालपर्यंत सेना विरोधातच होती आणि भाजपाच्या सोबत होती. मग भाजपाच्या सरकारची कोंडी होणार आहे. तीच टाळण्यासाठी भाजपाला सत्तेत सेना सोबत हवी होती व आहे. मात्र त्यासाठी भरावी लागणारी किंमत भाजपाला मोजायची नाही. सगळी गफ़लत तिथेच होऊन बसली आहे.

भाजपाने सत्तेची सर्व सुत्रे आपल्याच हाती राखण्यासाठी आणि आरोपबाजीचा सूड उगवण्यासाठी इतक्या टोकाची भूमिका घेतली हे उघड आहे. मात्र त्याचा अतिरेक झाल्याने आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सेनेशी इतका दुरावा झाला आहे आणि भाजपाची दुबळी बाजू सेनेने ओळखली आहे. त्यामुळे आधी गोडीगुलाबीने साध्य झाले असते, तशी तडजोड आता सहजशक्य दिसत नाही. सौदेबाजी नेहमी दुबळ्यावर अटी लादून होत असते. निकालानंतर सेना अपयशाच्या दबावाखाली होती. म्हणुन किरकोळ सौदा करून तिला आपल्या गोटात ओढणे भाजपाला सहजशक्य होते. पण तसे होऊ नये म्हणुन पवारांनी त्यात दुरावा वाढण्याच्या हालचाली केल्या व त्याला भाजपा बळी पडला. त्यामुळे बोलणी ताणली गेली आणि आता उद्धव यांना भाजपाची लंगडी बाजू लक्षात आलेली आहे. आपल्याला भाजपाच्या सोबत जाण्यात फ़ायदा आहे, त्यापेक्षा आपल्या सोबतीची भाजपालाच अपरिहार्यता असल्याच्बे लक्षात आल्यावर, उद्धवनी सोपी अट घालून भाजपाला उघडे पाडले आहे, त्या डावपेचाचे महत्व आज कोणाच्या लक्षात आलेले नाही. पण नजिकच्या काळात जेव्हा भाजपा व राष्ट्रवादी यांच्या छुप्या युतीचे पदर उलगडत जातील, तेव्हाच उद्धवनी केलेल्या अखेरच्या खेळीतली भेदकता लक्षात येऊ शकेल. कारण पुढल्या काळात अल्पमताच्या सरकारला चालवणे भाजपाला अवघड होत जाणार असून जितके अवघड होत जाईल तसतशी ‘बाहेरून’ पाठींब्याची किंमतही हाता‘बाहेर’ जाईल. यात सेना व भाजपा यांच्या अहंकारालाच आपल्या राजकारणातली प्यादी बनवून शरद पवार यांनी अत्यंत मुरब्बी राजकारण खेळले आहे. त्यातून त्यांनी भाजपाला मिळालेल्या यशानंतरही आपल्यावरच विसंबून रहाण्याची स्थिती निर्माण केली आहे. स्थीर सरकारचा मुद्दा पुढे करून नवे सरकार कायमचे अस्थीर करून टाकले आहे. किंबहूना म्हणुनच ही विधानसभा पाच वर्षे चालेल किंवा नाही अशी शंका वाटू लागली आहे.

(दैनिक ‘पुढारी’ बहार पुरवणी रविवार १६ नोव्हेंबर २०१४)