शनिवार, ३ मार्च, २०१२

श्रीमंत ’कृपे’ने कॉग्रेस भिकारी


दोनच आठवड्यापुर्वी मुंबईत प्रतिष्ठेने वावरणारे कॉग्रेस पक्षाचे नेते व मुंबईचे पक्षाध्यक्ष कृपाशंकर सिंग आता त्याच मुंबईतून बेपत्ता झालेत आणि त्याबद्दल कोणी मनसे वा राज ठाकरे यांच्यावर आळ घेतलेला नाही. त्यामुळे हे गृहस्थ स्वेच्छेनेच मुंबईतून अज्ञातवासात गेले असावेत, असे मानायला हरकत नाही. ते मुळचे उत्तर भारतिय व मुंबईवर उत्तर भारतियांचा जन्मसिद्ध हक्क सांगणारे असल्याने, त्यांनी मुंबईतून परागंदा होण्यामागे मनसेचा हात असल्याचा आरोप होण्याची किंवा त्याविरुद्ध कोणी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण इथे न्यायालयानेच त्यांच्यावर असे फ़रारी होण्याची वेळ आणली असल्याने, बिचारे राज ठाकरे बचावले म्हणायचे.

   असो. तर हे शंकराची कृपा कायम डोक्यावर असलेले कॉग्रेस नेते, मुंबई सोडून का फ़रारी झालेत ते इथे तपशीलाने सांगण्याची गरज नसावी. कारण त्याचा आता खुपच बोलबाला झालेला आहे. ते आपली कातडी बचावण्यासाठी गायब झाले आहेत हे सर्व जाणतात, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांची सगळी संपत्ती जप्त करून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी मुंबईच्या पोलिस आयुक्तावरच आहे. शिवाय त्यात गडबड होऊ नये म्हणुन कोर्टाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभाही नाकारली आहे. मग कृपाजींनी काय करावे? समर्था घरीचे श्वान, जे करतात तेच त्यांनी केले. त्यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकार क्षेत्राबाहेर पळ काढला आहे. ते फ़रारी नसून दिल्लीत असल्याचे उघडकीस आले आहे. तिथे जाऊन त्यांना अटक करायची तर पोलिसांना दिल्ली पोलिसांची मदत घ्यावी लागणार आणि अशी मदत दिल्ली पोलिस सहसा देत नाहीत असा इतिहास आहे.

   पाच वर्षापुर्वी झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष व मनमोहन सरकारमधले कोळसामंत्री शिबू सोरेन असेच दिल्लीत फ़रारी होते. म्हणजे रांची कोर्टाने त्यांच्या विरुद्ध जारी केलेले पकड वॉरंट घेऊन झारखंडचे पोलिस, दिल्लीत वणवण फ़िरत होते. पण समोर दिसणार्‍या सोरेन यांना हात लावू शकत नव्हते. कारण सोरेन मंत्री होते आणि कॉग्रेस सोबत होते, दिल्लीत होते. तिथे त्यांना अटक करायची तर दिल्ली पोलिसांचे ते अधिकारक्षेत्र होते. म्हणजेच दिल्ली पोलिसांना सोरेन दिसायला हवे व त्यांनी सोरेन यांना बघायला हवे होते, तरच त्यांना पकडणार ना? मुंबई पोलिसांची तिच अडचण होणार आहे. किंबहूना कृपाशंकर यांना ती करायची आहे. म्हणूनच ते हक्काची मुंबई सोडून, दिल्लीच्या आश्रयाला गेलेले आहेत. तिथे त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करता आले नाही, तरी मुंबई पोलिसांच्या पकड वॉरंटपासून संरक्षण मिळू शकते. म्हणजे निदान अटक लांबवता येऊ शकते.  

   अर्थात किती दिवस ते अटक टाळू शकतात एवढाच सवाल आहे. कारण कोर्टाचे आदेश स्पष्ट आहेत. आणि ते मुंबई पोलिसांना दिले नसून थेट मुंबई पोलिस आयुक्तांना दिलेले आदेश आहेत. नाहीतर तिथेही घोळ घातला जाईल याची कोर्टाला खात्री असावी. यातून कॉग्रेस पक्षाचे चारित्र्य स्पष्ट होते. तो एक बनेल गुंड, दरोडेखोरांचा अड्डा बनला आहे. ज्याला कोणाला गुन्हा करायचा असेल, त्याने कॉग्रेसमध्ये जावे आणि निश्चिंत मनाने गुन्हे करावेत, अशी आज अवस्था झालेली आहे. जोपर्यंत कुठले न्यायालय त्याची दादफ़िर्याद घेत नाही  तोपर्यंत पोलिस वा कायद्याला घाबरण्याचे कारण नाही. कलमाडी, ए. राजा, शिबु सोरेन ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. मग कृपाशंकर यांनी घाबरण्याचे कारणच काय? एक छोटी समस्या आहे, ती बोभाटा होण्याची, बदनामीची. पण आता त्याचीही भिती बाळगण्याचे कॉग्रेसला कारण राहिलेले नाही, तमाम वकिल पेशातले प्रवक्ते नेमून तो प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. कुठल्याही कॉग्रेसवाल्यावर गंभीर आरोप झाला किंवा गुन्हा दाखल झाला, म्हणजे भाजपाच्या येदियुरप्पा यांच्याकडे बोट दाखवून आपले पावित्र्य सिद्ध करण्यात हे वकिल कुशल आहेत. मग चिंता कसली? तेव्हा मुद्दा इतकाच, की कृपाशंकर फ़रारी झालेले नाहित ते दिल्लीच्या आश्रयाला गेलेले आहेत.

   आता किती दिवस त्यांचा बचाव पक्षश्रेष्ठी करतात व त्यांना वाचवतात ते बघायचे. पण सवाल कृपाशंकर यांना वाचवण्याचा नसून कॉग्रेस पक्ष त्यांच्यासारख्यांपासून वाचवण्याचा आहे. कारण आता गांधीजींचा वारसा सांगणारा हा पक्ष, पुरता अशा चोर दरोडेखोरांचे आश्रयस्थानच झालेला नाही तर त्यांच्याच तावडीत सापडला आहे. त्यात चांगल्या प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्याला स्थानच उरलेले नाही. हा माझा आरोप वगैरे नाही. त्याच पक्षात दिर्घकाळ काम केलेले आणि अजुनही स्वत:ला कॉग्रेस कार्यकर्ता म्हणवणारे निलंबित पदाधिकारी, अजित सावंत यांचा दावा आहे. त्यांच्या रुपाने जगाला कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला पुरावा आहे. पक्षातून अजित सावंत यांना तडकाफ़डकी बडतर्फ़ करण्यात आले, त्याला अजुन महिना झालेला नाही. त्यांनी असा काय गुन्हा केला होता, की कसलीही नोटिस न देता व चौकशी न करता त्यांची पक्षातून तात्काल हाकलपट्टी व्हावी? तर त्यांनी याच कृपाशंकर सिंगावर पैसे खाल्याचा, पैसे घेऊन पक्षाची उमेदवारी दिल्याचा आरोप जाहिरपणे केला होता. तेवढेच नाही, तर त्यामुळे पक्षाचे निवडणूकीत नुकसान होईल असा इशाराही दिला होता. तो खराही ठरला आहे. तर त्यांच्या आरोपाची साधी चौकशीसुद्धा करण्यात आली नाही. उलट त्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. दुसरीकडे त्यांनी आरोप केलेल्या कृपाशंकरना आता कोर्टानेच गुन्हेगार ठरवून अटक करण्याचा आदेश दिला आहे. पण कॉग्रेस  पक्षातून त्यांना कोणी काढून टाकायला धजावलेले नाही. हा कुठला न्याय समजावा?  

   अजित सावंत यांच्यावर कुठली कारवाई झाली? कशासाठी कारवाई झाली? त्यांनी पक्षशिस्त मोडल्याचा आरोप ठेऊन त्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे कृपाशंकर यांच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. म्हणजे त्यांची हाकालपट्टी झालेली नाही. कोर्टाने दोषी मानले तरी कारवाई नाही. राजीनामा कृपाने आधीच दिला होता, तो स्विकारण्यात आल्यचे सांगितले जाते. याचा अर्थ कोर्टाने जो ताजा निकाल दिला आहे, त्याची पक्षाने दाखलही घेतलेली नाही. त्यात नवे काहीच नाही. कलमाडी प्रकरणात हेच झाले होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धा प्रकरणात सतत आरोप होत असताना, असे काहीही नाही, सर्व सुरळीत असल्याचा हवाला पंतप्रधान व पक्ष प्रवक्तेच देत होते. अखेर कोर्टानेच कलमाडी यांची गठडी वळण्याचा आदेश काढल्यावर, त्यांचा संसदीय सचीव पदाचा राजीनामा घेण्यात आला होता. बाकी कलमाडी अजुन कॉग्रेस पक्षात आहेत. त्यांचे दोन आठवड्यांपुर्वी पुण्यात तुरुंगातून सुटल्याबद्दल जोरदार स्वागतसुद्धा करण्यात आलेले होते. मग कृपाशंकराने भयभीत होण्याचे कारणच काय? त्याने कुठली पक्षशिस्त मोडलेली नाही. कदाचित त्याने पाळली त्यालाच कॉग्रेसमध्ये पक्षशिस्त म्हटले जात असावे. काय आहे ही पक्षशिस्त?  

   कलमाडी असोत, की कृपाशंकर असोत, त्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केलेत, त्यातून पक्षाची  जनमानसातील प्रतिमा भ्रष्ट केली, मलिन केली. याला पक्षशिस्त म्हणायचे काय? कारण अजित सावंत यानी नेमके तेच केलेले नाही, उलट असे जे कोणी करतात, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. असे लोक कॉग्रेस पक्षाला भ्रष्ट करीत असून पराभवाकडे घेऊन जात आहेत, असा इशारा देण्याची हिंमत सावंत यांनी दाखवली आहे, त्याला बेशिस्त म्हणायचे काय? नसेल तर त्यांची हाकालपट्टी कशाला  झाली आणि कृपाशंकर यांची हाकालपट्टी का झालेली नाही? अर्थात कृपाशंकर हेच एकमेव प्रकरण नाही. दोन वर्षापुर्वी झेंडा मार्च नावाचा एक तमाशा कॉग्रेस पक्षातर्फ़े महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी असेच प्रकरण उजेडात आलेले होते. त्यातल्या आरोपींना देखील शिक्षा झालेली नाही. उलट आज तेच सावंतसारख्या निष्ठावंताला बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. काय होते हे झेंडा मार्च प्रकरण?

   राज्य कॉग्रेसतर्फ़े शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी हजारो कार्यकर्ते जमवून मिरवणूक काढायची होती. त्यासाठी प्रचंड खर्च व्हायचा होता. त्याची जमवाजमव कशी करण्यात आली आणि त्यात कोणी कसे पैसे लुबाडले, पण पक्षाकडे जमा केले नाहीत; याचा तपशील प्रदेशाध्यक्ष बोलत असल्याचे टिव्ही कॅमेराने शब्दांसह टिपले होते, प्रक्षेपित केले होते. माणिकराव ठाकरे व कॉग्रेसनेते सतिश चतुर्वेदी यांच्यातला खाजगी संवाद नकळत चित्रित व मुद्रित झाला होता. झेंडामार्चसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील बोलणे संपल्यावर कॅमेरे बंद झालेत, अशा समजुतीत हे दोन्ही नेते हितगुज करत होते, पण योगायोगाने काही कॅमेरे व टेबलावरचे माईक चालू होते. त्यात ते हितगुज टिपले गेले. झेंडामार्चसाठी मंत्र्यांकडून कसे पैसे गोळा करण्यात आले. जास्त पैसे मागितल्यावर मंत्री कसे पाठ फ़िरवतात, मुख्यमंत्र्याने पैसे जमा केलेत पण देण्याची कशी त्याची दानत नाही. इतका खर्च आहे आणि पुन्हा दिल्लीला पैसे पाठवावे द्यावे लागतात, असा सगळा व्यवहारी तपशील त्यात नोंदलेला आहे. जगाने पाहिला सुद्धा आहे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. दिल्लीचे नेते इथे पक्ष कार्यक्रमाला येतात, तेव्हा त्यांना त्याचा लाखात, करोडोत मोबदला द्यावा लागतो. तो जो देऊ शकेल त्यालाच पक्षाची अधिकारपदे मिळू शकतात. हाच त्याचा अर्थ होतो. त्यालाच पक्षशिस्त म्हणत असावेत. ती अजित सावंत पाळू शकले नसतील आणि माणिकराव ठाकरे व कृपाशंकर ’शंभर टक्के" पाळत असतील. मग त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार कशी?    

   आज जो कृपाशंकर यांच्याविषयी गवगवा चालला आहे, तेव्हा त्याचे संदर्भ असे दुरपर्यंत जाऊन भिडत असतात. पण ते सांगा्यचे कोणी? वाहिन्या व वृत्तपत्रे तपासली तर त्यात एका कृपाशंकरला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करण्याची कसरत चालू आहे. जणू त्याला फ़ासावर लटकवले, म्हणजे सर्व काही साफ़ होणार आहे. बाकी काही बिघडलेले नाही, एक कृपाशंकर तेवढा नासका आंबा आहे, असे भासवण्याचा हा बनाव तर नाही? हे सारे तपशील सांगायचे राहीले बाजूला आणि मुर्ख केजरीवाल काय बरळला, त्यावर काहूर माजवले जात आहे. अण्णा टीमच्या नैतिक अहंकाराने संतप्त होणार्‍यांना भोवतालच्या दुर्गंधी उकिरड्याच साधा किळस पण येऊ नये का? कृपाशंकर आणि आदर्श घोटाळा यात नेमका किती फ़रक आहे? कृपाशंकर यांच्या गुन्ह्याचे पाढे वाचणार्‍यांना त्या माणसाची पक्षाच्या अधिकार पदावर नेमणूक करणारे निर्दोष, निष्पाप वाटतात काय? वरती किती रक्कम पाठवणार, त्यानुसार नेमणूका होत असतील, तर एकटा कृपाशंकर दोषी कसा? माणिकराव ’हायकमांडकोभी भेजना पडता है’ अशी ग्वाही सतिश चतुर्वेदींना देतात, तो कसला पुरावा असतो? तो न्यायालयात टिकणारा, चालणारा पुरावा नसेल, पण नैतिक राजकारणाला काळीमा फ़ासणारा पुरावा तर आहे ना? कृपाशंकर कुठल्या शिस्तीने पक्षात पदाधिकारी होतात, त्याची ती साक्ष असते ना? मग त्याचा मागोवा कोणी घ्यायचा? ते पत्रकारितेचे काम नाही काय?

   कृपाशंकर उगाच दिल्लीला निघून गेलेले नाहीत. त्यांना खात्री आहे, की त्यांनी पक्षशिस्तीत राहून काम केले आहे. जे कमावले त्यातला हिस्सा संबंधीतांना दिलेला आहे. मग त्याची किंमत एकट्याने का मोजायची? कमाईत भागिदार होता, तर आता परिणामात मला एकटा सोडू नका, हेच सांगायला ते दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. आमचा पंतप्रधान स्वच्छ चारित्र्याचा आहे, त्याच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही, असे प्रत्येक कॉग्रेस पुढारी अगत्याने ठणकावून सांगत असतो. मग असा प्रश्न पडतो, की त्या चारित्र्यसंपन्न पंतप्रधानाच्या पदराआड लपून, राजरोस चोर्‍या करण्यासाठीच त्याला त्या उच्चपदावर बसवले आहे की काय? कारण आजवर अनेक पंतप्रधानावर थेट आरोप झाले. पण तसा एकही आरोप मनमोहन सिंग यांच्यावर होऊ शकलेला नाही. मात्र त्या भ्रष्ट पंतप्रधानांच्या कारकिर्दीत जेवढा भ्रष्टाचार होऊ शकला नव्हता व घोटाळे होऊ शकले नाहीत; त्याच्या शेकडो पटीने अधिक भ्रष्टाचार मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झाला आहे. तो का झाला? का होऊ शकला? की त्यासाठीच त्यांच्यासारखा पंतप्रधान निवडण्यात आला आहे?

    अलिबाबा आणि चाळिस चोरांची ही नवी गोष्ट तर नाही? ज्यात एकटा अलिबाबा तेवढा साव आणि उरलेले सगळे चोर, असा काही मामला आहे काय? धान्य साफ़ करताना त्यातले खडे काढून टाकायचे असतात, इथे आज खड्यातून धान्य निवडायची वेळ आली आहे. एक प्रकरणाचा भर ओसरत नाही एवढ्यात दुसरे प्रकरण बाहेर येते आहे. हा घोटाळा झाकावा तर तो घोटाळा बाहेर डोके काढतो आहे. मुद्दा तोसुद्धा नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करते तेव्हा असे प्रकार होतात हे नाकरता येणार नाही. पण त्यालाच पक्षशिस्त बनवले जात असेल तर काय? मग कृपाशंकर सोकावणारच ना? ती शंकरचीच कृपा असते ना? भोळ्या शंकराने एका असुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले होते. ज्याच्यावर हात ठेवील त्याचे भस्म करण्याचे ते वरदान होते. त्यामुळे त्याला भस्मासुर हे नाव पडले. एकप्रकारे ती शंकराचीच कृपा असल्याने त्यालाही कृपाशंकर असेच म्हणायला हवे. आज पक्षशिस्तीच्या नावाखाली ज्यांना कॉग्रेस पक्षात सता व पदांचे वरदान दिले जात आहे व दिले गेले आहे, त्यातूनचे हे एकाहुन एक कृपाशंकर तयार झाले आहेत. ते आता थेट वरदान देणार्‍याचेच भस्म करायला निघालेले दिसतात. मग त्या गोष्टीत जसा स्वत: शंकरच जीव वाचवायला पळत सुटतो, तशी अवस्था हळुहळू कॉग्रेस श्रेष्ठींवर येणार आहे.

   स्पेक्ट्रम घोटाळा असो, आदर्श घोटाळा असो, राष्ट्रकुल घोटाळा असो, त्यात कोर्टाने सीबीआयकडे तपासकाम सोपवले, तरी त्यात सरकारला ढवळाढवळ, हस्तक्षेप करण्यास प्रतीबंध केला होता. थेट स्वत: कोर्ट त्यावर देखरेख ठेवत होते. इथेही मुंबई हायकोर्टाने पोलिसांना आपल्याकडेच अहवाल द्यायला सांगितले आहे. नुसती चौकशी नाही तर ठरल्या मुदतीत गुन्हा दाखल करून कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्यास फ़र्मावले आहे. ही इथल्या सरकारची आज न्यायालयीन विश्वासार्हता आहे. तेवढेच नाही. आयकर खाते व अंमलबजावणी खाते, यांनाही कोर्टाने सुनावले आहे. केजरीवाल, किरण बेदी यांच्या मागे लागलेल्या या खात्यांना कृपाशंकराकडे वक्रदृष्टी करण्यास सवड काढायला फ़र्मावले आहे.

   स्वातंत्र्यपुर्व काळात जळगाव जिल्ह्यातल्या फ़ैजपुर येथे कॉग्रेस पक्षाचे अधिवेशन व्हायचे होते. त्यात पत्रके छापण्यासाठी पैसे नव्हते तर ते मिळवण्यासाठी सानेगुरुजींनी ’श्यामची आई’ या आपल्या अप्रतिम कादंबरीचे अधिकार स्वस्तात विकून ते पैसे उभे केले. ज्या कादंबरीने एका पिढीवर संस्कार केले आणि त्यावर निघालेल्या चित्रपटाला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. ती आपली कष्टाची कमाई मातीमोल भावात पक्षासाठी विकणार्‍या कार्यकर्त्यातून उभी राहिलेली कॉग्रेस, आज कोणाच्या ताब्यात गेली आहे? पदरमोड करून पक्षकार्य करणार्‍यांची कॉग्रेस आज पक्षाच्या नावे लूटमार करणार्‍यांची कॉग्रेस झाली आहे. याचे कोणाला साधे वैषम्य तरी वाटते का? आज माध्यमात सानेगुरुजी यांच्या राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढल्याचे अभिमानाने सांगणारे डझनभर तरी मुखंड संपादक, विश्लेषक म्हणून वावरत असतात. त्यापैकी कुणालाही त्याच सानेगुरुजींची, तीच कॉग्रेस कृपाशंकराने व त्याच्यावर ’कृपा’ करणार्‍यांनी किती रसातळाला नेली; त्याची खेदखंत नसावी काय? सवाल कृपाशंकराच्या भ्रष्टाचाराचा नसून सानेगुरुजी, गांधीजी यांच्या चारित्र्याला संपत्ती मानणार्‍या कॉग्रेसचा आहे. कोणाला याची जाणीव तरी उरली आहे काय?

खिशात पैसा नसतानाही पक्षाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारे उदार मनाचे कार्यकर्ते ही कॉग्रेसची ओळख आज कुठल्याकुठे हरवली आहे. त्याजागी पक्षाच्या नावावर लोकांकडून लूट करणारे भामटे व भुरट्यांची टोळी, अशी कॉग्रेसची प्रतिमा झाली आहे.  सहा सात दशकात देश व त्याचे राजकारण, राजकीय पक्ष व बौद्धिक कुवत, कुठल्या रसातळाला जाऊन पोहोचली आहे, तेच कृपाशंकर दाखवतो आहे. कृपा. माणिकराव, कलमाडी हे पैसे लूटतात एवढाच मामला नाही. ते कोणाच्या नावाने ही लूट करत आहेत तो मामला गंभीर आहे. आपल्या फ़ाटक्या झोळीतले काहीतरी पक्षाला देणार्‍यांचा वारसा, आज जनतेच्या फ़ाटक्या झोळीतून पक्षासाठी चोरताना, परस्पर आपली तुंबडी भरणार्‍यांच्या हाती गेला आहे. ती अत्यंत शरमेची लजास्पद बाब आहे. त्याचा संताप सानेगुरुजी यांची नावे घेणार्‍यांना यायला हवा, तर ते अण्णा टीमचा अहंगंड मोजत बसले आहेत. की त्यांनाही सानेगुरुजी अव्यवहारी मुर्ख होता असेच वाटू लागले आहे? दरिद्री पण दाता असलेल्या कार्यकर्त्यामुळे श्रीमंत असलेली पुर्वीची कॉग्रेस संघटना, आज श्रीमंत कार्यकर्त्यांच्या गर्दीने पुरती भिकारी होऊन गेली आहे. कारण आता तिथे देणारे हात राहिलेले नाहीत. तर वाडगा घेऊन पक्षाच्या नावाने भिक मागणार्‍यानी त्याच कॉग्रेसला अठरविश्वे दारिद्र्यात आणून टाकले आहे. सवाल कृपाशंकरने किती मालमत्ता जमवली हा नसून, त्याने कॉग्रेसला कशी भिकारी करून सोडली हा आहे.  
पुण्यनगरी (प्रवाह) रविवार ४ मार्च २०१२

1 टिप्पणी: