रविवार, १८ मे, २०१४

मोदी जिंकले पण हरवले कोणाला?  गेल्या वर्षभर चाललेली लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता संपली आहे आणि सोळावी लोकसभा अस्तित्वात आलेली आहे. त्यात भाजपाचे नेतृत्व करणार्‍या नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सभागृहात निर्विवाद बहूमत मिळवून दिले आहे. सहाजिकच त्यांची भारताचे भावी पंतप्रधान म्हणून नियुक्ती होणे हा केवळ औपचारिक विषय राहिला आहे. पण उद्या त्यांचा शपथविधी सम्पून नवे सरकार कार्यरत झाले तरी आपल्या देशातील बहूतेक सेक्युलर विद्वानांना त्याची खात्री पटणे संभवत नाही. त्यांना कदाचित ते एक भया्वह स्वप्न आहे आणि लौकरच ते संपुष्टात येईल अशी आशा त्यांच्या मनात असू शकते. सहाजिकच त्यापैकी कोणाला त्या विजयाचे कारण समजू शकलेले नाही, तर त्यांच्याकडून त्या विजयाची मिमांसा तरी कशी होऊ शकेल? मिमांसा करताना प्रथम जे काही आहे वा घडते आहे ते तसेच स्विकारावे लागते. मग त्याची मिमांसा शक्य असते. प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणतो, सिद्धांताशी तपशील जुलत नसेल तर तपशील बदला.’ हे विधान फ़सवे आहे. सिद्धांताशी जुळत नाहीत म्हणून तपशील बदला याचा अर्थ तपशील खोटे वा बिनबुडाचे तपशील घ्यावेत असे त्याला म्हणायचे नाही. सिद्धांतावर विश्वास असेल तर जी परिस्थिती समोर आहे, त्यात बदल घडवून आपल्या सिद्धांतानुसार परिस्थिती निर्माण करा, असे त्याला म्हणायचे आहे. तिथेच आपल्या देशातील सेक्युलर उदारमतवादी राजकारण वा बुद्धीवाद तोकडा पडला आहे. त्यांनी आईनस्टाईनच्या विधानाचा विपरीत अर्थ लावून पळवाट शोधण्याचा प्रयास केला, त्यामुळे मोदी विजयी झाले किंवा गेली अर्धशतक चालू असली सेक्युलर थोतांड फ़सलेले आहे. परिणामी मोदींसह भाजपाच्या पराभवाची भाकिते करणार्‍यांना आता मोदींच्या प्रचंड विजयाचीही मिमांसा करणे अशक्य होऊन बसले आहे. जितकी आधीची भाकिते व विश्लेषणे फ़ुसकी व निरर्थक होती; तितकीच आज लोकसभेच्या निकालानंतर होणारी मिमांसाही बिनबुडाची आहे.

   शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आइ जसजसे आकडे समोर येत गेले, तसतशी विश्लेषणाची भाषा व रोख बदलत गेला. तसा तो आधीच मतदानोत्तर चाचण्यांच्या आकड्यांनी बदलू लागला होता. मोदी-भाजपा यांच्या यशाचे मूल्यमापन करण्यापेक्षा, कॉग्रेसच्या नाकर्तेपणा व अपयशाचे मोजमाप मोजणीपुर्वीच सुरू झाले होते. जणू कॉग्रेसला मोदी पराभूत करीत आहेत किंवा त्या सत्ताधारी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी घेतलेल्या राहुल गांधींमुळे मोदींचा विजय होत आहे; असाच एकूण विश्लेषणाचा सूर होता. पण म्हणून ती वास्तविकता होती काय? सामान्य माणसाला मोदी-भाजपा यांचे विरोधक निवडणूकीत पराभूत होताना दिसत होते. तेच वेगवेगळ्या किंवा आलंकारीक भाषेत सांगण्याला विश्लेषण म्हणता येत नाही. खरोखर कोणाचा पराभव होतो आहे आणि कशामुळे होतो आहे, याची मिमांसा आवश्यक असते. त्यासाठी मग जिंकणारा कोणाच्या विरोधात लढत होता व त्याच्या विरोधात कोण कोण उभे ठाकले होते, त्याचा संदर्भ सोडून मिमांसा कशी होऊ शकेल? निवडणूकीत मोदी जिंकले हे खरे असले व त्यांच्या समोर उभे ठाकलेले कॉग्रेस, समाजवादी, डावे किंवा बहुतांश सेक्युलर बिल्ले मिरवणारे पक्ष पराभूत झाले असले; तरी मोदींनी त्यांनाच पराभूत करायची लढाई छेडलेली होती काय? वास्तवात मोदी लोकसभा जिंकायला किंवा देशाची सत्ता पादाक्रांत करायला पुढे आले, हीच मुळात एक भ्रामक कल्पना आहे. मोदी हा एका विचारधारेने प्रभावित झालेला कार्यकर्ता आहे आणि सत्तेच्या जवळ आल्यापासूनही त्याने आपल्या आत बसलेल्या कार्यकर्त्याला कधी मरू दिलेले नाही. योगायोगाने सत्तेवर आल्यानंतर घडलेल्या गुजरातमधील घटनांमुळे तमाम सेक्युलर उदारमतवाद्यांनी मोदींना अथक लक्ष्य केले. यावेळी दुसरासा सत्ताधीश भयभीत होऊन पळाला असता. पण सत्तेवर मांड ठोकून परिस्थिती बदलण्याची हिंमत मोदींना दिली, ती त्याच अंतरंगातल्या कार्यकर्त्याने. त्या धक्क्यातून सावरल्यानंतर मोदींनी चंग बांधला तो, आपल्या विचारधारा व भूमिकेला आव्हान देणार्‍यांशी झुंजण्याचा. त्यात त्यांनी केवळ राजकीय विरोधक गृहीत धरून निवडणूका जिंकण्याचे उद्दीष्ट बाळगले नव्हते. त्यांनी आपल्या अंगावर आलेल्यांना पक्ष म्हणून ओळखले नाही, तर ज्या विचारधारेने त्यांच्यावर नेम धरला, त्यांनाच आव्हान द्यायचा चंग मोदींनी बांधला होता. तेच युद्ध शुक्रवारच्या निकालातून मोदींनी जिंकले. म्हणूनच तो एकट्या कॉग्रेसचा पराभव झालेला नाही.

    गुजरातच्या राजकारणात कॉग्रेस हाच मोदींचा विरोधक होता. पण तिथल्या दंगलीचे निमीत्त करून देशभरात असे वातावरण निर्माण करण्यात आले, की मोदी हेच भाजपावरचे ओझे आहे. सहाजिकच गेल्या दहा वर्षात अगदी भाजपाचे नेतेही मोदींपासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करीत होते. कारण मोदींशी संपर्क वा संबंध म्हणजे पाप अशी एक धारणा तयार करण्याचा देशव्यापी प्रयास झाला होता. तो एकट्या कॉग्रेसचा डाव नव्हता. स्वत:ला सेक्युलर, उदारमतवादी वा डाव्या विचारांचे मानणारा व नेहरूवादी विचारांचा जो वर्ग गेल्या सहासात दशकांपासून देशावर बौद्धीक व राजकीय हुकूमत गाजवतो आहे, त्याच्याशी आपल्याला झुंज घ्यायची आहे, हे जाणूनच मोदींनी दिर्घकाळ आपल्या युद्धाची सज्जता आरंभली होती. कालपरवा लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात नेहरू घराण्याच्या राजेशाहीवर त्यांनी केलेले हल्ले वा त्यापासून मुक्तीचे केलेले आवाहन इतके दुरगामी विचारातून उचललेले पाऊल होते. ज्या नेहरूवादी राजकारणाने वा राजकीय व्यवस्थेने अशा मानसिकता व विचारसरणीला इतकी वर्षे पोसले, तिच्याशी आपल्याला झुंजावे लागणार, हे ओळखूनच मोदी मैदानात उतरले होते. म्हणूनच मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागल्यावर असे तमाम विविध क्षेत्रातले लोक आपापल्या गुहा बिळातून बाहेर पडून मोदींच्या विरोधात खुलेआम बोलू लागले होते. कोणी देश सोडून जाण्याची भाषा बोलत होता, कोणी देशाचा पुर्ण सत्यानाश होईल अशी भिती दाखवत होता. चित्रपट, कला, विद्या, उद्योग वा पत्रकार, संपादक अशा बुद्धीवादी वर्गात लपलेले तमाम नेहरूवादी मोदींना विरोध करायला आपली सर्व शक्ती व प्रतिष्ठा पणाला लावून आखाड्यात उतरले होते. देशात आजवर पंधरा सार्वत्रिक निवडणूका झाल्या. पण त्यात कधी इतक्या मोठ्या प्रमाणात तमाम क्षेत्रातील मान्यवर मैदानात आलेले नव्हते. आणिबाणीनंतर कोंडमारा झाल्याने इंदिरा गांधींच्या विरोधात फ़क्त निवडणूक काळात मोजकी अशी अभिजन मंडळी खुल्या मैदानात आलेली होती. पण मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरले आणि झाडून सगळे उदारमतवादी सेक्युलर बुद्धीमंत अभिजन आखाड्यात येऊन दंड थोपटू लागले होते. त्यांच्या छातीवर कॉग्रेसचा बिल्ला किंवा घरावर सोनियांचे पोस्टर लागलेले नसेल. पण त्यांनी खांद्याला खांदा लावून आपण सोनिया राहुल यांना मोदींविरोधी लढाईत आपण साथीला असल्याचे दाखवलेले होते. त्यासाठी सर्वतोपरी प्रयास केलेले होते. म्हणूनच मोदींनी छेडलेले युद्ध केवळ विविध राजकीय पक्ष वा कॉग्रेसच्या विरोधातले नव्हते. हे युद्ध नेहरूवादी  पठडीतल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्था व राजकारणाच्या वर्चस्वाला दिलेले आव्हान होते. मग त्यात मोदी जिंकलेले दिसत असतील, तर त्यात फ़क्त कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्षांचाच पराभव झाला, असा बाळबोध निष्कर्ष कसा काढता येईल?  

   म्हणूनच आज मोदींनी यश मिळवले असेल आणि राजकीय लढाई जिंकलेली असेल, तर केवळ प्रत्यक्ष त्यात उतरलेली कॉग्रेस वा अन्य सेक्युलर पक्षांची सेना पराभूत झाली, अशी मिमांसा करणे ही शुद्ध फ़सवणूक आहे. त्यात समोर लढणारी सेना जशी पराभूत झाली आहे; तशीच पिछाडीवर राहुन त्या लढाईत सेक्युलर डावपेच आखणारेही मोदींनी पराभूत केले आहे आहे. सोनियांपासून तीस्ता सेटलवाडपर्यंत आणि अमर्त्य से्न, अनंतमुर्ती यांच्यापासून विविध संपादक वाहिन्यांपर्यंत प्रत्येकजण मोदींकडून पराभूत झाला आहे. आणि ही सगळी फ़ौज म्हणजे एक राजकीय पक्ष वा चळवळ नाही. ती एक ठराविक विचारधारा आहे. ती काही ठराविक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संकल्पना आहे. तिलाच नेहरूवाद म्हणतात. ज्यात तुम्ही भारतीय म्हणून, हिंदू म्हणून अभिमान बाळगणे वा कुठल्याही कारणास्तव आपल्या अस्मितेचा गर्व बाळगणे हा गुन्हा असतो. अशा ‘आयडीया ऑफ़ इंडिया’चा हा पराभव आहे. भारताला आजवर कुठल्या संकल्पनेने दरीद्री व दुबळे बनवून ठेवले, ते नेमक्या शब्दात मोदींनी कधीही आपल्या भाषणातून मांडलेले नाही. पण त्यांची विविध भाषणे, दिलेल्या मुलाखतींचे सार काढले, तर त्यात हा माणुस देशाची सत्ता किंवा लोकसभेत बहूमत मिळवण्यासाठी लढत असल्याचे दिसेल. पण त्यामागचा अघोषित हेतू स्पष्टपणे नेहरूयुगाचा शेवट असाच होता, हे लपून रहात नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार असे स्पष्ट झाल्यावर, नेहरूंनी आपली छाप पुढल्या शतकभर कायम रहावी म्हणून जी पायाभरणी केली, त्यातून आजवर भारताला बाहेर पडता आलेले नाही. अगदी अनेकदा राजकीय सत्तांतर झाले व विभिन्न पक्षाचे लोक सत्तेत येऊन बसले. पण जी नेहरूंनी घालून दिलेली राजकीय प्रणाली होती, तिला कोणी धक्का लावला नाही. त्यामुळेच भाजपाचे वाजपेयी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सत्तेला त्याच नेहरूवादी व्यापकतेने ओलीस ठेवलेले होते. सर्वच क्षेत्रातून चहूकडून अशी कोंडी नव्या राजकीय सत्ताधीशाची केली जायची, की आपण नेहरूंचा वारसा चालवतो असेच कबुल करून ती चौकट कायम राखणे, त्यालाही भाग व्हायचे. सहाजिकच सत्ताधीश बदलत होते, सत्ताधारी पक्ष बदलत होते. पण नेहरूवाद किंवा त्यांच्या राजघराण्याच्या उच्चतमतेला कुठे धक्का लागत नव्हता. मोदींनी त्यालाच आव्हान दिलेले होते. कॉग्रेसमुक्त भारत अशा भाषेमागचा खरा हेतू नेहरूवादमुक्त भारत असाच होता. म्हणूनच जितके अभिजन दोन दशकापुर्वी अयोध्याप्रकरणी वा वाजपेयी कारकिर्दीत भाजपा विरोधात सरसावलेले नव्हते, त्याच्या कित्येकपटीने तमाम सेक्युलर अभिजन मोदींच्या विरोधात खुलेआम मैदानात उतरले. मग पराभव झाला असेल, तर तो एकट्या कॉग्रेस वा सेक्युलर पक्षांचा कसा असेल?

   शुक्रवारी मोदी यांनी आपल्या राजकीय विरोधक वा कॉग्रेस पक्षाला पराभूत केलेले नाही. कारण त्यांनी पुकारलेली लढाई एका पक्षाच्या विरोधातली नव्हती, की सत्तासंपादनाची नव्हतीच. ती लढाई गेल्या सहासात दशकात नेहरूवादाच्या बेडीत अडकून पडलेल्या भारतीय समाजाला त्यातून मुक्त करण्याचे युद्ध होते. म्हणूनच त्यानी काय साध्य केले, ते बघताना केवळ संसदेतील बहूमताचे आकडे बघून चालणार नाही. त्यांच्या विरोधातल्या पक्ष वा नेत्यांना मिळू शकलेल्या जागांच्या हिशोबात त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. ज्या विचारांच्या प्रस्थापनेसाठी वा ज्याच्या उच्चाटनासाठी मोदी ही लढाई लढले वा जिंकले; त्याकडे बारकाईने बघणे अगत्याचे आहे. २००४ साली एनडीए सरकारने सत्ता गमावल्यापासून एक टुमणे सातत्याने कानी पडलेले आहे. मुस्लिमांच्या पाठींब्याशिवाय भारतातली सत्ता मिळवता येत नाही. मोदी मुस्लिमांना नको आहेत म्हणून आणि गुजरात दंगलीविषयी ते माफ़ी मागत नाहीत म्हणूनच; मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला सत्तेच्या जवळही पोहोचता येणार नाही, असे प्रत्येक राजकीय पंडीत व अभ्यासक आग्रहपुर्वक सांगत होता. सत्तेच्या मोहाने का होईना पंतप्रधान होण्यासाठी मोदींनी माफ़ी मागून टाकावी, असे अनाहुत सल्ले मोदींना सातत्याने दिले गेले. पण त्यांनी अट्टाहासाने त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा हा माणूस सत्तेसाठी कुठलीही तडजोड करणारा नाही, याची त्याने कृतीतून ग्वाही दिली होती. पण दुसरीकडे मुस्लिम व्होट बॅन्क नावाचा जो बागुलबुवा मागल्या काही शतकात निर्माण करण्यात आलेला आहे, त्यालाही नाकारत मोदींनी लढाई लढवलेली आहे. त्यात विजय संपादन करून त्यांनी मुस्लिम व्होटबॅन्क नावाची काही वस्तू नाही आणि असली तरी ती निवडणूकीच्या राजकारणात कुठलाही प्रभाव पाडू शकत नाही, हेच यातून सिद्ध केले. भाजपा मुस्लिमांना दुजाभावाने वागवते, म्हणुन मुस्लिम उमेदवारही उभे करत नाही; असे खुप आरोप झाले तरी त्यांनी त्याला भिक घातली नाही. त्यामागे त्यांचा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. मुस्लिम व्होटबॅन्क अस्तित्वात नाही आणि असली तरी तिला शह द्यायला उलट्या बाजूने हिंदू व्होटबॅन्क कार्यान्वीत होते, हेच त्यांना सिद्ध करायचे होते. मोठे यश मिळवून मोदींनी तेच थोतांड संपुष्टात आणलेले आहे. त्यामुळे यापुढल्या निवडणूकीत सेक्युलर म्हणून मुस्लिम मतांची गणिते मांडणार्‍या बहुतेक राजकीय पक्षांची समिकरणे पुरती उध्वस्त होऊन गेली आहेत. अशा मतांसाठी लाचार पक्षांना आता सेक्युलर शब्द व मुस्लिम व्होटबॅन्क सोडून हिंदू व्होटबॅन्केचे एटीएम शोधावे लागणार आहे.

   सेक्युलॅरिझम वा नेहरूवाद याचा अर्थ इथे समजून घ्यावा लागेल. अल्पसंख्य असलेल्यांनी बहुसंख्य असलेल्यांच्या भावना, श्रद्धा, इच्छा वा आकांक्षांवर कुरघोडी करणे; असे जे चित्र मागल्या तीनचार दशकात अट्टाहासाने व आक्रमकपणे निर्माण करण्यात आले होते, त्याच्या विरोधात हिंदू समाजामध्ये मोठीच नाराजी व क्रोध खदखदत होता. जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा जो आग्रह धरला जात होता. त्यामुळे विचलीत झालेला वर्ग प्रविण तोगडीया नव्हते, की अशोक सिंघल नव्हते. त्यांनी ते बोलून दाखवले असेल. पण ती धारणा करोडो लोकांच्या मनात घर करून होती, ठुसठूसत होती. मात्र तोगडीया वा तत्सम लोकांना त्याचे समर्थपणे उपाय शोधता आले नाहीत वा उपाय योजता आले नाहीत. तो उपाय होता, मताच्या मार्गाने अशा सेक्युलर पाखंडाला शह देऊन पराभूत करणे. गुजरात दंगलीचा बागुलबुवा करणार्‍यांनी तशी संधीच मोदींना मिळवून दिली. उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला मागेपुढे पहायचे नाही, असा स्वभाव असलेल्या मोदींनी बारा वर्षात संयमाने त्यावरचे उपाय शोधले, कुठलीही हानी अपाय होऊ न देता तेच उपाय गुजरातमध्ये अंमलात आणले. त्यातून त्यांची हिंमत वाढली आणि दुसरीकडे त्यांच्या उपायांचे उर्वरीत भारतातल्या अशा दुखावलेल्या समाजाला आकर्षण वाटू लागले. त्यातूनच मग थेट देशाचे नेतृत्व करून अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले. त्याचेच प्रतिबिंब मागल्या वर्षभर लोकसभा निवडणूकीत पडलेले होते. आपल्याला कॉग्रेस वा सेक्युलर पक्षांच्या सत्तेला वा राजकारणाला आव्हान द्यायचे नसून नेहरूवादाची पाळेमुळे खणून काढायला पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवायची आहे. त्याच ताकदीवर सेक्युलर नावाचे पाखंड उखडून टाकायचे आहे अशी गाठ मनाशी बांधूनच मोदींनी तीनचार वर्षापासून जमवाजमव सुरू केलेली होती. त्याची परिणती आपण बघितली.

   म्हणूनच शुक्रवारच्या निकालांनी कॉग्रेस वा अन्य पक्षांचा पराभव झालेला दिसला, म्हणून तो त्यांचा राजकीय पराभव नाही. तो एका राजकीय विचार व प्रस्थापित राजकीय राजव्यवस्थेच्या अस्ताचा आरंभ म्हणता येईल. निवडणूकीच्या दरम्यान कॉग्रेसला साठ वर्षे दिलीत आपल्याला फ़क्त साठ महिने द्या; असे बोलणारे मोदी निकाल स्पष्ट झाल्यावर वेगळी भाषा बोलू लागले आहेत. निकालाच्या संध्याकाळी पहिलेच भाषण करताना मोदींनी ‘पुढल्या दहा वर्षात’ अशी शब्दावली वापरली. याचा अर्थ त्यांना दोन मुदती पंतप्रधान रहायचे आहे असा घेतला जाईल. पण ती साफ़ चुक आहे. दहा वर्षे म्हणजे साधारण एका पिढीचे अंतर पडत असते. आज दहा वय असलेली मुले दहा वर्षांनी मतदार व्हायची आहेत. यावेळी पहिले मतदान करणारे तरूण दहा वर्षांनी पालक झालेले गृहस्थ असतील. आज गृहस्थ असलेली पिढी तेव्हा चाळीशी ओलांडून पन्नाशीच्या घरात पाऊल टाकत असेल. तेव्हा त्यांच्या मनात नेहरूवादाच्या भ्रामक सेक्युलर उदारमतवादाचे छाप बर्‍याच प्रमाणात पुसट झालेले असतील. अगदी हिंदूच नव्हेतर मुस्लिमांची पुढली पिढीही मोठ्या संख्येने तेव्हा असल्या भ्रामक कल्पनेतून बाहेर आलेली असेल. त्यासाठी पाच वर्षाचा कालावधी पुरेसा नाही. त्या दहा वर्षात धार्मिक, प्रांतीय वा जातीय अस्मितांमधून लोकांना बाहेर काढून प्रगत विकसित भारताची अस्मिता त्यांच्यात जोपासली गेली, तर नकारात्मक व निरूपयोगी कालबाह्य नेहरूवादातून भारताला कायमची मुक्ती मिळण्याची प्रक्रिया वेगवान झालेली असेल. कारण नेहरूवादाववर वतनदारी करणारे पोटार्थी बुद्धीमंत त्यातून मुक्त होतील आणि दुसरीकडे त्यापासून मुक्त असलेला नवा बुद्धीजिवी वर्ग उदयास आलेला असेल. मोदींचे उद्दीष्ट इतके साफ़ आहे. ज्याला अभ्यास करायचा असेल वा निवडणूकीची मिमांसा करायची असेल, त्याला ते उद्दीष्ट साफ़ दिसू शकेल. मात्र त्यासाठी आपापले जुने कालबाह्य वैचारिक चष्मे डोळ्यावरून उतरून ठेवावे लागतील. तर शब्दात, भाषणातही न दिसणारे मोदींचे हेतू, उद्धीष्टे बघता येतील. ज्यांना ते करायचेच नसेल वा स्वत:ची वैचारिक वंचना करण्यातच धन्यता मानायची असेल. त्यांनी नेहरूवादाच्या अस्तापायी येऊ घातलेल्या बौद्धिक वैधव्याचे दु:ख टाहो फ़ोडून केल्याने वास्तविकता बदलणार नाही. इतिहास बदलणार नाही.

इतिहासाच्या वर्तमानात जाऊन त्याचे आकलन करावे लागते, तसेच वर्तमानाचे आकलनही इतिहासात जाऊन करता येत नाही. त्या दोन दगडावर उभे रहाणार्‍यांनी चालत असल्याच्या कितीही भ्रमात रहावे, भविष्याच्या वाटेवर त्यांना पहिले पाऊल टाकताही येत नसते.

५ टिप्पण्या:

 1. भाऊ खरेच हा पराभव फ़क्त कांग्रसचा नसून त्यांच्या वळचनिला गेलेल्या प्रत्येक बुद्धिवंत, पत्रकार यांचा आहे. मिडियात असलेले केतकर, वागळे, आसबे, भटेवरा यांचा सगळ्यांचा पराभव आहे.
  आपला नम्र
  रामदास पवार

  उत्तर द्याहटवा
 2. "कॉग्रेसमुक्त भारत अशा भाषेमागचा खरा हेतू नेहरूवादमुक्त भारत असा"
  भाऊ, जे इतर कुठे ही वाचायला मिळत नाही असे विश्लेषण वाचायला नेहमीच आवडते.

  उत्तर द्याहटवा
 3. very true observation. Agreeable to all.However I feel that aggressive and assertive Hinduism was not the only asset of Modi. A good progressive and pro people administration was an essential element of Modi's campaign.A large number of urban youth got attracted towards Modi because of his developmental model and clean efficient administration of his Gujarat government which he very effectively advertised.Assertive Hinduism combined with good governance attracted both rural as well as urban voters at the same time.

  उत्तर द्याहटवा