रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

एका थपडेने नऊ जीव वाचवले असते




गेल्या आठवडय़ातली ही घटना आहे. पुण्यात स्वारगेट या एसटी स्थानकातल्या एका ड्रायव्हरने तिथे थांबलेली एक बस पळवली आणि भोवतालच्या परिसरात बेछूट चालवली. त्यात त्याने अनेक गाडय़ांचा चुराडा केलाच; पण अनेक निरपराध नागरिकांना जायबंदी जखमी करताना त्याने नऊ जणांचा हकनाक बळी घेतला. त्यांची चूक एकच होती की चुकीच्या प्रसंगी ते घटनास्थळी हजर होते.

या घटनेची खबर लागताच अनेक नागरिकांनी आपल्या परीने त्या बेभान ड्रायव्हरला रोखायचा प्रयास केला. पोलीसही धावले; पण उपयोग झाला नाही. एका विजेच्या खांबावर आदळून बस थांबली, तेव्हाच तो मानवसंहार थांबला. पुढे तो ड्रायव्हर मनोरुग्ण असल्याची चर्चा सुरू झाली. ते खरेच मानायचे तर आदल्या दिवशी त्याने गाणगापूर येथून प्रवाशांनी भरलेली बस सुखरूप पुण्याला कशी आणली असावी? दिवसा नव्हे तर रात्रीचा प्रवास करून त्याने अनेकदा प्रवाशांना सुखरूप आपापल्या गावी पोहोचवले होते. तो अचानक मनोरुग्ण वा माथेफिरू झाला म्हणजे काय ?

घटना घडून गेल्यावर त्याची मीमांसा सुरू होत असते. लोक तेवढय़ा दिवसापुरती रसभरीत चर्चा करतात आणि मग आपापल्या व्यापामध्ये ती घटना विसरून जातात. काहीसा तसाच प्रकार आजकाल प्रसारमाध्यमांतून होत असतो. अशा घटना घडल्या की मग कुणावर तरी दोषाचे खापर फोडून, माध्यमेही तिकडे पाठ फिरवतात. आरोपीला घातपाती, गुन्हेगार, मनोरुग्ण, माथेफिरू ठरवले मग या चर्चेला पूर्णविराम दिला जात असतो. ताज्या प्रकरणात अशा मनोरुग्ण ड्रायव्हरला सेवेत घेतला कसा, इथपासून एसटी सेवकांच्या हालअपेष्टांची, गैरकारभाराची चर्चा रंगवून विषय संपवण्यात आला. थोडक्यात, 'उथळ पाण्याला खळखळाट फार' या उक्तीप्रमाणे समाजचिंतन होत असते.

कधी तो बस ड्रायव्हर असतो, कधी पोलीस असतो, कधी आणखी कोणी बिथरलेला माणूस असतो. अकस्मात तो कोणाच्या तरी जीवावर उठतो आणि निरपराधांचे बळी घेतो. त्याच्यावर माथेफिरू, मनोरुग्ण अशी लेबले लावणे, हाच जणू आता मानसिक आजार झाला आहे. कारण अशी लेबले लावण्याने समस्या संपत नाहीत किंवा निरपराध मरणे-मारले जाणे थांबलेले नाही. थांबणेही शक्य नाही. जोवर आजाराचे कारण शोधून त्यावर उपाय योजना केल्या जात नाहीत, तोवर समाजाची त्या आजारातून सुखरूप मुक्तता होणार कशी ?

आता हा स्वारगेटचा ड्रायव्हर म्हणजे संतोष मानेच घ्या. त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते व त्याच्यावर डॉक्टरांचे उपचारही चालू होते, असे उघडकीस आले आहे. असे असताना त्याच्या भोवतालची माणसे त्याच्याशी सावधपणे वागणूक करत होती काय ? उपचार म्हणजे फक्त औषधे किंवा शस्त्रक्रिया नसतात. भोवतालचे वातावरण तेवढेच महत्त्वाचे असते. मानसिक संतुलन ठीक नाही म्हणजे समोरच्या परिस्थितीचे योग्य आकलन करून रास्त निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसात नसते. म्हणूनच त्याच्या भोवतालच्या लोकांनी त्याच्या मनाचा तोल जाणार नाही यासाठी काळजी घ्यायला हवी आणि या अनुभवातून तुम्ही आम्ही सगळेच रोजच्या रोज जात असतो. आजचे नागरी जीवन इतके धकाधकीचे, धावपळीचे, दडपण आणणारे झाले आहे की, निश्चिंत मनाने दिवसातले काही तासही माणसाला जगता येत नाहीत. अपेक्षा, इच्छा, गरजा, स्वार्थ, मोह, अगतिकता, अडवणूक अशा शेकडो गोष्टींच्या सापळ्यात माणूस अडकलेला असतो. एकाचा जीव सावरताना दुसरीकडचा तोल ढळतो, ही प्रत्येकाची अवस्था आहे. म्हणूनच आपण घरी, कामाच्या जागी, प्रवासात, समारंभामध्ये अत्यंत किरकोळ गोष्टीवरून चिडचिड करत असतो. या आपल्या चिडचिडय़ा वागण्याला मानसिक संतुलन म्हणता येईल काय? अशा स्थितीतली आपली सोशिकता, सहन करण्याची क्षमता म्हणजे मानसिक संतुलन असते. ज्याच्यापाशी जेवढी अधिक सोशिकता तेवढे त्याचे मानसिक संतुलन चांगले. ज्याच्यापाशी ती सोशिकता कमी त्याला आपण मनोरुग्ण म्हणतो. घरच्या, कौटुंबिक, आर्थिक, व्यवहारी समस्यांनी जे गांजलेपण वाढत चालले आहे त्यात थोडीफार अडवणूक सहन करण्याची क्षमताही आजकाल आपण गमावली आहे. संतोष मानेची अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती. म्हणूनच त्याचे वरिष्ठांशी सातत्याने खटके उडत होते. असे सांगण्यात आले की वरिष्ठ त्याला मुद्दाम त्रास देत होते. मुद्दाम रात्रपाळी त्याच्यावर लादली जात होती. त्यापेक्षा नोकरी सोडून देण्याचा विचारही त्याच्या मनात घोळत होता. म्हणजेच तो माथेफिरू मनोरुग्ण नव्हता. इतर समस्यांच्या गोंधळात घुसमटून गेलेल्या संतोष मानेला नोकरीतील छळवणूक असह्य झाली होती आणि ती स्थिती कोणाचीही असू शकते. अगदी लोकप्रिय शाहरूख खानसुद्धा त्यात येतो.

मानेच्या बातमीनंतर पाच-सात दिवसांतच शाहरूखची बातमी आली. 'अग्निपथ' नामक चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शनासाठी संजय दत्तने एका समारंभाचे आयोजन केले होते. त्यामध्ये अनेक नामांकित चित्रपट कलावंतांनी हजेरी लावली होती. शाहरूखही तिथे आलेला होता. तशीच फराह खान ही नृत्यदिग्दर्शिका आलेली होती. फराहचा पती शिरीष कुंदर तिच्या सोबत होता. इंटरनेटवर कुंदरने यापूर्वीच जाहीरपणे शाहरूखच्या 'रा-वन' चित्रपटाची खिल्ली उडवलेली होती. आता पार्टीमध्ये शाहरूख समोर आल्यावर कुंदर त्याला एकामागून एक टोमणे मारत राहिला. शाहरूखने तिकडे साफ दुर्लक्ष केले. तो कुंदरपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता; पण कुंदर त्याची पाठ सोडत नव्हता. एका क्षणी शाहरूखची सोशिकता संपली आणि त्याने कुंदरवर हल्ला केला.

ही पाळी शाहरूखवर कोणी आणली? त्याची सोशिकता संयम किंवा सभ्यतेचा कडेलोट व्हावा इतका अतिरेक झाला म्हणून पुढला प्रकार घडला. कुंदरवरचा राग शाहरूखने तिथल्या तिथे काढला. थप्पड मारली की लाथांनी तुडवले याबद्दल वाद आहे, पण त्यात कोणाचा जीव गेला नाही. आता यात शाहरूख हल्लेखोर दिसतो. समारंभातल्या सर्वाना ती मारहाण दिसली. कारण दूर अंतरावर असताना ही घटना दिसू शकते; पण शाहरूखलाच ऐकू यावे एवढय़ा आवाजात कुंदरने मारलेले टोमणे उपस्थितांना ऐकू आलेले नव्हते. मग कुंदरचे पाप झाकले जाते व शाहरूखची कृती दिसल्याने त्याला गुन्हेगार ठरवले जाते; पण मुद्दा तो नाही. शाहरूखने जो राग जागच्या जागी व्यक्त केला त्याचे आपण स्वागत करायला हवे. कारण ते कृत्य हिंसक असले तरी खूप सुसह्य असते.

तुम्हाला राग आला, समोरच्याचे वागणे असह्य झाले तर त्याला थप्पड मारणे, शिवी हासडणे सभ्य मानले जाणार नाही; पण साचलेला संताप, क्रोध व्यक्त करण्याचे ते मार्ग असतात. ओवीपेक्षा शिवी म्हणूनच मला श्रेष्ठ वाटते. कारण त्यातून रागाचा आवेश निघत जातो आणि कुणालाही इजा होत नाही. संतोष माने याने त्या दिवशी अशीच एक थप्पड त्याला छळणार्‍या वरिष्ठाला मारली असती तर? त्याही पुढे जाऊन चार-पाच ठोसे लगावले असते तर? त्याचा राग वरिष्ठांवर होता आणि तो जागच्या जागी व्यक्त झाला असता तर त्याच्या मनातल्या घुसमटीचा दुष्परिणाम अगदी किरकोळ झाला असता. त्या वरिष्ठाचा जीव त्यात गेला नसता, पण त्यामुळे राग शांत झालेला संतोष माने थंडावला असता आणि पुढची बस पळवण्याची अतिरेकी घटना घडलीच नसती. वरिष्ठांचा मुलाहिजा ठेवण्याच्या नादात तो आपला संताप दाबायला गेला आणि तिथून बाहेर आल्यावर त्याच्या मनाचा स्फोट झाला. त्याचे मनावर, स्वत:वरच नियंत्रण राहिले नाही. परिणामी, नऊ निरपराधांचे मात्र बळी गेले.

संतोषने सतावणार्‍या वरिष्ठाला तिथेच थप्पड मारली असती तर त्या एका थपडेने पुण्यातल्या त्या नऊ निरपराधांचे जीव नक्की वाचले असते. मानेकडून जे मानवी हत्याकांड घडले ते टळले असते. ऐकायला, वाचायला हे चमत्कारिक वाटेल; पण तेच वास्तव आहे. कोंडलेल्या वाफेला शिट्टीमधून बाहेर पडायची सोय नसेल तर कुकरचाही स्फोट होतोच ना? संयम पाळावा हा आदर्शवाद आहे; पण अखेर संयमाच्या सुद्धा मर्यादा असतात. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा कमी विघातक पर्याय स्वीकारायचा असतो. अपशब्द, शिवी हा तसाच उपाय आहे. त्याच्याही पुढे थप्पड हा उपाय होऊ शकतो. शाहरूखने तोच निवडला म्हणून पुढचा अनर्थ टळला आणि संतोष मानेला तो निवडता आला नव्हता, म्हणून तो नऊ निरपराधांचा मारेकरी होऊन बसला.

मराठीतल्या एका नामवंत संपादकाच्या अतिरेकी वागण्याने सोशिकता संपलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी शाहरूखप्रमाणेच थप्पड मारण्याचा मार्ग पत्करला होता, मात्र त्याचा फारसा गाजावाजा झालेला नव्हता. त्यापैकी एकजण आज आमदार आहे आणि तोच संपादक आठवडय़ापूर्वी थप्पड मारण्याच्या विषयावर आपले 'ठाम मत' व्यक्त करताना (त्या प्रसंगात आपले गाल चोळायला वापरलेले) हात चोळताना पाहून माझे खूप मनोरंजन झाले. 'संयम संपायची वेळ आली तर थप्पड मारण्याचा पर्याय लोकांना स्वीकारावा लागेल' असे अण्णा हजारे राळेगणसिद्धीला आलेल्या सिनेकलावंतांशी बोलताना म्हणाले. त्यावरून वाहिन्यांवर काहूर माजवण्यात आले होते. त्याचीच अचूक बातमी हा संपादक आपल्या वाहिनीवर देत होता. कारण असल्या शहाण्यांना अण्णा काय म्हणाले, त्याचा नेमका अर्थ काय, तेही कळत नसते.

शब्दांना हेतूशिवाय अर्थ प्राप्त होत नसतो तसाच कृतीला हेतूशिवाय अर्थ नसतो. त्यातला हेतू बाजूला ठेवला तर शब्द वा कृती निरर्थक होऊन जात असतात. अण्णांच्या म्हणण्यातला गर्भितार्थ समजून घेण्याची गरज आहे. थप्पड मारणे हा त्यांनी सांगितलेला उपाय नाही. संयम संपायची वेळ आणली गेली तर हानीकारक हिंसेच्या आहारी जाण्यापेक्षा किमान नुकसानीचा मार्ग पत्करावा, असे त्यांना सुचवायचे असते. संतोष माने याने वरिष्ठांना चपराक हाणली असती तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला नसता आणि अकारण नऊ जण मारले गेले नसते. राग येणे, मनाचा प्रक्षोभ होणे, सोशिकतेचा कडेकोट मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. तो लपवणे, दडपणे हा त्यावरचा उपाय नाही. कारण त्यातून स्फोटक परिस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. म्हणूनच रागाला, क्षोभाला सोपा मार्ग उपलब्ध करून देण्यात शहाणपणा असतो.

समोरचा माणूस सभ्य शहाणा वागत असताना त्याला थप्पड मारणे असंस्कृत असेल; पण समोरची व्यक्ती जाणीवपूर्वक तुमच्या सोशिकतेचा कडेलोट करू पहात असेल तर त्याला थप्पड मारणेच योग्य असते. एखादा दारुडा अतिरेक करतो तेव्हा त्याची नशा उतरवण्यासाठी त्याचाच मित्र वा हितचिंतक थप्पड मारतो. ती हिंसा नसते, तो हल्लाही नसतो. तो उपाय असतो. नशा फक्त दारूचीच असते असे नाही. सत्ता व अधिकाराची नशा त्यापेक्षा भयंकर असते. ती थप्पड मारून उतरवायचीही सोय नसेल तर गडाफीप्रमाणे थेट मुडदा पाडून उतरवावी लागते, असे मानवी इतिहासच सांगतो. इजिप्तचा हुकूमशहा होस्नी मुबारक याचे आदेश पाळायचा सैन्याने नकार दिला. ती त्याला मारलेली थप्पडच होती. तेवढय़ाने शहाणा झाला म्हणून पुढची हिंसा टाळता आली. गडाफीला थप्पड कळली नाही म्हणून पुढचा रक्तपात अटळ झाला.

एका बाजूने तुमच्या संयमाचा अंत पाहायचा आणि तुम्ही सोशिकता दाखवत बसायची अपेक्षा बाळगायची, ही सभ्य समाजाची व्याख्या नाही. सभ्य सुसंस्कृत समाजात प्रत्येकाचे वर्तन संयमी असावे लागते. एकाने संयम सोडल्यावर दुसर्‍यावर सोशिकता दाखवण्याचे बंधन उरत नाही. सामूहिक, सामाजिक व सुसंस्कृत समाजातल्ले  संतुलन तसेच टिकवता येते. गुंडगिरी, गुन्हेगारी, अन्याय यांचा अतिरेक होऊ लागला तर सोशिकता ही त्यांची ताकद बनत असते. सोशिकता हाच दुबळेपणा वाटू लागतो. तेव्हा समाज विघातक प्रवृत्तीचे मनोबल वाढत असते. त्यावर अधिक सोशिकता हा उपाय नसतो तर अपाय असतो. संयमाची व सभ्यपणाचीही एक लक्ष्मणरेषा असते. जेव्हा ती ओलांडली जाते असे दिसते तिथे संयम सोडून रुद्रावतार धारण करावाच लागतो. सभ्यपणाने आपण दुर्बल नाही हे दाखवून द्यावेच लागते. सशक्त सभ्यता व दुर्बल दुष्प्रवृत्ती हे समीकरण समाजाला सुखरूप ठेवू शकते. म्हणूनच वेळोवेळी अशा दृष्ट प्रवृत्तीला हिसका दाखवावा लागतो. अण्णा हजारे यांनी थप्पड मारण्याचा पर्याय सांगितला त्यामागचा हेतू गुंडगिरी वा दहशत असा नाही. त्या हेतूकडे पाठ फिरवून अहिंसेचे गोडवे गायचे मग आपण संतोष मानेसारखे धोके आमंत्रित करत असतो. त्याला सोशिकतेचे धडे देण्यापेक्षा त्याच्या मनाचा, संयमाचा कडेलोट करणार्‍यांना थप्पड मारून नियंत्रणात ठेवायची गरज आहे. नाहीतर मूठभर विद्वानांच्या बौद्धिक आदर्शवादासाठी निरपराधांना अकारण मरायची पाळी येत असते. ओवीच्या जागी ओवी आणि आवश्यक तिथे शिवी देण्याची म्हणूनच गरज असते. तेव्हा थप्पड वा शिवीच्या नावाने नाक मुरडण्याचे कारण नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा