बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

मटा रडे खोटा रडे


गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकारांना अस्सल लोणकढी थाप मारली. सतत सनसनाटी व ब्रेकींग न्यूजच्या मागे धावणार्‍यांना ती खरी वाटली. मग काय विचारता? एक पक्षाचा अध्यक्ष व खासदार उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार आहे, अशी ती थाप होती. मग सबसे तेज बातमी देण्याच्या स्पर्धेला ऊत आला. खासदार व पक्षाध्यक्ष असलेल्या व्यक्तीचा शोध प्रत्येक राजकीय निरीक्षक आपापल्या अकलेनुसार घेऊ लागला. पण ज्याच्याकडे पक्षाध्यक्ष व खासदारकी अशा दोन्ही पात्रता आहेत असा उमेदवार कुठल्याच राजकीय अभ्यासकाला भिंग घेऊनही सापडेना. तेव्हा आजी खासदार व माजी पक्षाध्यक्ष, माजी खासदार व आजी पक्षाध्यक्ष माजी खासदार व आजचा संघटना अध्यक्ष अशा भिन्न गुणवत्तेच्या उमेदवारांचा शोध झपाटय़ाने सुरू झाला. अर्थात त्या पलिकडे स्वपक्षात नाराज ही आणखी एक गृहीत पात्रता होती. त्यामुळे आनंद परांजपे प्रमाणे नाराज खासदारांचा शोध देखील जारी होता. त्यामुळे वाहिन्या व वृत्तपत्रे यांनी डझनभर असे होतकरू फुटू शकणारे खासदार - नेते शोधून काढले.

चुकीची बातमी आणि ठाम मत, हीच जर आजकालच्या पत्रकारितेची गुणवत्ता झालेली असेल तर दहा बारा विद्यमान खासदार फुटणे अशक्य कसे असेल? त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या अर्धवट अकलेचे प्रदर्शन मांडत पक्षांतरापूर्वीच या खासदारांना नावानिशी राष्ट्रवादीमध्ये दाखल करून घेतले. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड बाजूला राहिले आणि जाणत्या पत्रकारांनी शिवसेना, कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या खासदारांना राष्ट्रवादीतर्फे पक्षात प्रवेशही देऊन टाकला. ती नावे वाचून त्या खासदारांना आपण काय करीत आहोत त्याचा शोध लागला आणि पवार-पिचडांना आपल्या पक्षात कोण कोण येणार आहेत त्याची चाहुल लागली. मात्र दुसर्‍या दिवशी दहा वाजता पिचडांच्या व्याख्येत जो राजकीय नेता बसून होता तोच राष्ट्रवादीत दाखल झाला आणि तमाम राजकीय विश्लेषक चांगले तोंडघशी पडले. कारण तो कॉंग्रेसचा विद्यमान जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचा माजी खासदार शिवाजी माने होता. हे नाव एकाही राजकीय विश्लेषकाला वर्तवता आलेले नव्हते कारण आजकालच्या राजकारणात त्याची दखल कोणीच घेत नव्हते. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात त्यातला प्रकार झाला. वृत्तवाहिन्यांच्या बातम्या तुटक्या फुटक्या असतात. त्याला ते ब्रेकींग न्यूज म्हणतात. वृत्तपत्रांनी तशी बातम्यांची मोडतोड करायची गरज नसते. शहानिशा करून बातमी द्यायला हवी. पण तिथले अर्धवटराव आता वाहिन्यांशी स्पर्धा करू लागलेत. म्हणूनच मग 'महाराष्ट्र टाइम्स' सारख्या जुन्या जबाबदार वृत्तपत्राने त्या उथळ पाण्यात उडी घेतली आणि ढोपर फुटायचा प्रसंग आला. मटाने शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार असल्याची ब्रेकींग न्यूज देऊन टाकली. त्यामुळे संतप्त झालेल्या अडसुळांच्या समर्थकांनी महाराष्ट्र टाईम्सच्या जाणकार लोकांना न्यूज ब्रेक करायला शिकवण्यासाठी कार्यालयापर्यंत धडक मारली. तिथे घुसून धुडगुस घातला व न्यूज ब्रेक कशी होते त्याचे प्रात्यक्षिकच दाखवले.

आता त्यांनी असे करणे कितपत योग्य आहे? वृत्तपत्राच्या कार्यालयावरील हल्ला लेखन स्वातंत्र्यावर हल्ला आहे काय याची चर्चा जोरात चालली आहे. पण पुन्हा मुद्दा बाजूला पडला आहे. अडसूळांच्या समर्थकांचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयात येऊन मोडतोड केली का? अडसुळांचे नाव त्या बातमीत नसते तर असला प्रकार घडला असता काय? जे हल्लेखोर म्हणून पकडले गेले त्यांना अटक होण्याची हौस आली होती का? ज्याने कोणी अशी बातमी दिली ती खोटी असेल तर त्याचा हेतू शुद्ध नव्हता. अडसूळ यांची बदनामी करणे, त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला चढवणे हाच त्याचा हेतू असतो. त्याला मटा प्रसिद्धी देणार असेल तर ते वृत्तपत्र तेवढेच गुन्हेगार नाही का? मग इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा या उक्तीप्रमाणे त्याच्यावरही हल्ला होणार ना? व्हायला नको का?

अविष्कार स्वातंत्र्य कुणाच्या प्रतिष्ठा अब्रुशी खेळण्याचा अधिकार आहे काय? अडसूळ किंवा तत्सम कुणा प्रतिष्ठीत व्यक्तीच्या दिर्घकालीन कामातून त्यांनी प्रतिष्ठा संपादन केलेली असते. तिच्याशी खेळण्याचा अधिकार पत्रकारांना कोणी दिला? त्यासाठी टाहो फोडणारे त्या बातमीतले एक अक्षर तरी खरे असल्याचा बचाव देऊ शकले आहेत का? नसतील तर त्यांनी आधी सभ्यपणे आपल्या कार्यक्षेत्रात ही जी गुन्हेगारी मनोवृत्ती घुसली व शिरजोर झाली आहे तिचा निषेध करायला हवा आणि तो सभ्यपणा पत्रकारांकडे नसेल तर त्यांनी राजकारणी वा गुंडाकडून कायदा पालनाची, सभ्यतेची अपेक्षा करून कसे चालेल? जे चूक कबूल करून प्रामाणिकपणा दाखवू शकत नाहीत तेही हल्लेखोरांइतकेच असभ्य असंस्कृत असतात ना? या प्रकरणात म्हणूनच बळी पडल्याचा आव आणणारा 'मटा' व पत्रकार रडतात तो निव्वळ खोटारडेपणा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा