शनिवार, २० एप्रिल, २०१३

पाक सेनापतींचा पळपुटा वारसा




   भारत पाक सीमेवर काश्मिरमध्ये नियंत्रण रेषा आहे. त्याला सीमा म्हणत नाहीत. कारण पाकच्या ताब्यात जो प्रदेश आहे, तो आपलाच आहे असा भारताचा दावा आहे आणि संपुर्ण काश्मिरच आपला आहे, असा पाकिस्तानचा आग्रह आहे. त्याविषयी राष्ट्रसंघात वाद चालू आहे. त्याचा निवाडा होईपर्यंत युद्ध थांबवण्याची घोषणा झाली असताना, जी रेषा निश्चित करण्यात आली; तिला नियंत्रण रेषा म्हणतात. त्या रेषेच्या अलिकडे पलिकडे काही प्रदेश निर्जन ठेवलेला असतो. अशा भागात हेलिकॉप्टरने एक फ़ेरी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ़ यांनी मारली होती, अशी माहिती अलिकडेच उघडकीस आलेली होती. त्यासंबंधी एका भारतीय वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात मुशर्रफ़ यांनी मोठी छाती फ़ुगवून आपण तसे केल्याची ग्वाही दिली होती. तेवढेच नाही तर आपण कमांडो आहोत आणि सेनापती म्हणून आघाडीवर राहून युद्ध खेळणारे योद्धे आहोत; असेही त्यांनी सांगितले होते. पण युद्धभूमीवर लढणे सोडा, थोडा बाका प्रसंग ओढवला; तरी हा इसम ढुंगणाला पाय लावून पळ काढणारा भगोडा आहे. नुसती तोंडाची वाफ़ दवडून कोणी योद्धा वा लढवय्या होत नाही. त्यासाठी मनगटात ताकद आणि काळजात हिंमत असावी लागते. पण मुशर्रफ़ हा पाकिस्तानी सेनापती म्हणजे युद्धापेक्षा पळ काढणारा आणि लपून वार करणारा दगाबाजच असू शकतो. हे सर्वांना ठाऊक आहे आणि तशीच त्यांची ख्याती आहे. पण गुरूवारी मुशर्रफ़ यांनी कृतीतून ते जगाला सप्रमाण दाखवून दिले. हा माणूस कोर्टाने जामीन नाकारला म्हणून एखाद्या फ़डतूस गुन्हेगारासारखा तिथून अक्षरश: पळून गेला. कोर्टाने त्यांचा जामीन अज फ़ेटाळला व त्यांना अटक करावी असा आदेश पोलिसांना दिला. पण अटकेच्या भयाने आपल्या अंगरक्षकांच्या गराड्य़ात मुशर्रफ़ यांनी कोर्टातून काढता पाय घेतला आणि थेट घर गाठले. ज्याला पोलिसांच्या अटकेचे भय वाटते, तो सीमेवर युद्ध कसले करू शकणार?

   लष्कराचा प्रमुख म्हणून अनेक घातपात केलेल्या या माणसाची लायकी खरी तर आग्रा शिखर परिषदेच्या वेळीच एका भारतीय सेनापतींनी उघड केलेली होती. तेव्हाच्या टिव्हीवरील चर्चेत भाग घ्यायला भारताचे निवृत्त लेप्टनंट जनरल अफ़सर करीम यांना एका वाहिनीने चर्चेत बोलावले होते. त्यांनी मुशर्रफ़ हा माणुस भगोडा आहे लढवय्या नाही; असे ठणकावून सांगितले होते. त्याच्यात समोरासमोर लढायची हिंमत नाही, तो पाठीत वार करणारा आहे, असेही करीम म्हणाले होते. कारण काही वर्षापुर्वी सियाचेन या भारतीय हिमच्छादित प्रदेशात पाकिस्तानने घुसखोरी केली, त्याचे नेतृत्व मुशर्रफ़ यांच्याकडे होते. तेव्हा त्यांना हुसकावून लावणार्‍या भारतीय सेनेचे नेतृत्व अफ़सर करीम यांनीच केलेले होते. आपण सियाचेनमधून पळवून लावलेला हा भगोडा आहे, असे करीम ठासून सांगत होते आणि मुशर्रफ़ यांची एकूण कारकिर्द तशीच दगाबाज व पळपुटेपणाची आहे. पण त्यांचीच कशाला पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांचा इतिहास व वारसाच पळपुटेपणाचा आहे. आगावूपणा करायचा आणि मग शेपूट घालून पळायचे; हा त्यांचा बाणा आहे. तेव्हा कोर्टातून मुशर्रफ़ पळाले, तर ते आपल्या पाकिस्तानी लष्करी ‘प्रतिष्ठेला’ जागले म्हणायचे. कारण ज्या पाक सेनापतींनी आजवर लष्करी क्रांती करून सत्ता बळकावली होती, त्यांची अवस्था अशीच केविलवाणी झाल्याचा इतिहास जुनाच आहे. अयुबखान हे पाकिस्तानात लष्करी सत्ता प्रस्थापित करून लोकशाही उलथून पाडणारे पहिले सेनापती. त्यांनी दिर्घकाळ सत्ता भोगली. निवडून आलेल्या पंतप्रधान व राजकीय नेत्यांचे खुन पाडून देशातील अस्थिरता काबूत आणण्यासाठी त्यांनी सत्ता बळकावली आणि ते तहहयात सत्ताधीश होऊन बसले. पण ती सत्ता त्यांना सुखनैव चालवता आली नाही. मग त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी भारताच्या कुरापती काढण्याचा नवा पायंडा पाडला होता.

   १९६५ सालात अयुबखान यांनी भारतावर युद्ध लादले. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे निधन होऊन नवे पंतप्रधान भारतात सत्तेवर आलेले होते. त्यांना दुबळे समजून अयुबखान यांनी आगावूपणा केला. पण तो त्यांना महागात पडला. कारण बटूमुर्ती असलेले लालबहादूर शास्त्री अत्यंत कणखर नेते होते. त्यांनी खंबीरपणे आक्रमणाला उत्तर दिले आणि पाकसेनेला पळता भूई थोडी झाली. तेव्हा अयुबखान यांची त्यांच्याच देशात छीथू झाली होती. मग त्यांनी तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल याह्याखान यांच्याकडे सत्तासुत्रे देऊन देशातून पळ काढला होता. ते लंडनला जाऊन स्थायिक झाले. मग याह्याखान यांनी लोकमत शांत करण्यासाठी पाकिस्तानात पुन्हा लोकशाही आणायचे आश्वासन दिले आणि निवडणूका घेतल्या. मात्र त्यात अवामी लीग या पूर्व पाकिस्तानातील पक्षाला मोठे यश मिळाले आणि त्याच पक्षाचे बंगाली नेते शेख मुजीबूर रहमान यांना पंतप्रधान करायची वेळ आली. पण पाकिस्तान म्हणजे सिंध व पंजाबचे वर्चस्व असल्याने, देशाचे नेतृत्व बंगाल्याकडे द्यायचे याह्याखान यांनी नाकारले. बहूमत मिळवूनही मुजीबूर यांनी भुत्तो यांचे सहाय्यक म्हणून काम करावे, असा आग्रह जनरल याह्याखान यांनी धरला होता. मुजीबूर यांनी त्याला नकार दिल्यावर त्यांना अटक करून याह्याखान यांनी पुर्व पाकिस्तानात त्यांच्या पक्षाचे नेते व पाठिराखे यांच्यावर धडक कारवाई सुरू केली. त्यामुळे बंगाली जनतेने उठाव केला आणि तो चेपून काढण्यासाठी याह्याखान यांना लष्करी कारवाई करणे भाग पडले, परिणामी भारतीय हद्दीत बंगाली पाक निर्वासितांचे लोंढे येऊ लागले आणि त्याबद्दल भारताने तक्रार करताच याह्याखान यांनी थेट भारताविरुद्धच युद्ध पुकारले. त्याची परिणती अखेर पाकिस्तानच्या विभाजनात झाली. पुर्व पाकिस्तान बांगलादेश म्हणुन अस्तित्वात आला. त्या युद्धात एक लाखाहून अधिक पाक सैनिकांना ढाक्यात भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करावी लागली. त्यात दुसर्‍या पाक सेनापतीचे नाक कापले गेले. त्यामुळे ते युद्ध संपताच उरलेला पश्चिम पाकिस्तान, तेव्हा निवडून आलेले नेते झुल्फ़ीकार अली भुत्तो यांच्याकडे सोपवून याह्याखान यांनी पळ काढला. तेही अयुबखान यांच्याप्रमाणेच लंडनला पळून गेले.

   थोडक्यात पाक लष्करशहा हा युद्ध छेडतो आणि त्यात पराभूत होऊन पळ काढतो, असाच त्या देशाच्या शौर्याचा इतिहास, या सेनानींनी तयार केला. १९७२ मध्ये भुत्तो यांच्या हाती सत्ता आल्यावर त्यांना भारताशी बोलणी करणे भाग होते. कारण हरलेल्या युद्धात त्यांनी पुर्व पाकिस्तान गमावलाच होता. पण पश्चिम पाकिस्तानचा बराच मोठा प्रदेश भारतीय सेनेने व्यापला होता. शिवाय लाखभर पाक सैनिक युद्धकैदी म्हणून भारताच्या ताब्यात होते. त्यावर तडजोड करण्यासाठी पाकचे नवे नेते म्हणून भुत्तो भारतात आले व इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची शिखर बैठक सिमला येथे झाली. त्यात जो करार झाला त्याला सिमला करार म्हणून ओळखले जाते. अर्थात पाक सेनाधिकारी जितके राजकारण करतात, तितकेच पाकचे राजकीय नेतेही आत्मघातकीच असतात. भुत्तो यांनीही आपल्या मृत्यूलाच आमंत्रण देऊन देशाचा कारभार सुरू केला होता. पाक सेनेत पंजाबी सेनाधिकार्‍यांचे वर्चस्व आहे, त्यांनी दगा देऊ नये म्हणून भुत्तो यांनी त्यातल्या ज्येष्ठांना डावलून झिया उल हक नावाच्या तुलनेने तरूण अधिकार्‍याला सरसेनापती बनवले. हेतू असा, की हा अननुभवी सेनाधिकारी आपल्या आज्ञेत राहिल. पण तोच दगाबाज निघाला. त्याने पाकसेनेवर आपले प्रभूत्व प्रस्थापित करताच भुत्तो यांना दाद दिली नाही. पाक सेनेला दोन दशके सत्तेत लुडबुड करण्याची चटक लागली होती. त्यामुळेच सत्ता काबीज करायला उत्सुक असलेल्या सेनापतीला सर्व सेना एकमुखी साथ देते आणि झिया उल हक यांच्या बाबतीत तेच घडले. त्यांनी सेनेवर हुकूमत प्रस्थापित करताच, एके रात्री थेट भुत्तो यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अटक केली आणि देशाची घटनाच रद्दबातल करून लष्करी कायदा जारी केला. घटनेत अनेक बदल करून पाकिस्तानला इस्लामीक राष्ट्र म्हणून घोषित करून टाकले. आपल्या कृत्याला मान्यता मिळवण्यासाठी झियांनी धार्मिक पक्ष व संघटनांना आश्रय दिला व प्रोत्साहन दिले. राजकीय उठावाची शक्यता राहू नये म्हणून भुत्तोंवर खटले चालवून त्यांना कोर्टाकडून फ़ाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था केली आणि इस्लामी कायद्यानुसार भर चौकात देशाच्या माजी पंतप्रधानाला फ़ासावर लटकावण्यात आले. पुढे लष्कराची निर्विवाद हुकूमत प्रस्थापित झाली. योगायोग असा, की त्याच दरम्यान सोवियत युनियनने अफ़गाणिस्तानमध्ये लालफ़ौजा घुसवून तो देश बळकावला होता आणि रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने अफ़गाण बंडखोरांना मदत करण्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली. त्यामुळेच मग झिया उल हक यांच्या लष्करशाहीला मान्यता मिळत गेली.

   अमेरिकेने देऊ केलेल्या खास लढावू विमानाच्या चाचणीसाठी झिया व अन्य सर्वच प्रमुख पाक सेनाधिकारी गेले असताना; त्याच विमानाला भीषण अपघात होऊन एका फ़टक्यात सगळेचे वरिष्ठ पाक जनरल मारले गेले. एकमेव सेनाधिकारी शिल्लक राहिले होते, त्यांनी मग पुन्हा निवडणुका घेऊन पाकिस्तानात लोकशाही प्रस्थापित करण्यास मंजुरी दिली. असा पाकिस्तानचा लोकशाही व लष्करशाहीचा इतिहास आहे. पहिले दोन लष्करशहा देश सोडून पळून गेले, तर तिसरा आपल्या विश्वासातील सर्वच सेनाधिकार्‍यांसह शंकास्पद अपघातात मारला गेला. त्यामुळे मग काही काळ पाकिस्तानात लोकशाही येऊ शकली. पित्याच्या हत्येनंतर देश सोडून परागंदा झालेल्या बेनझीर भुत्तो झियांच्या मृत्यूनंतरच मायदेशी परतल्या व निवडणुका जिंकून पंतप्रधान झाल्या. पुढल्या काही काळात लष्करातले अनुभवी व जाणते अधिकारीच शिल्लक नव्हते. म्हणून राजकीय नेत्यांच्या हाती कारभार राहू शकला. तरीही लष्कराचा राजकारणावरचा प्रभाव संपला नव्हता. नवाज शरीफ़ हा मुळात झियांच्या आशीर्वादाने नेता झालेला माणूस. बेनझीर भुत्तो यांच्या कारकिर्दीला लष्करी शह देऊन शरीफ़ यांनी मध्यावधी निवडणुका घ्यायची वेळ आणली. मग त्यांच्या हाती सत्ता आल्यावर पुन्हा बेनझीरला पळ काढावा लागला होता. आलटून पालटून शरीफ़ व बेनझीर दोनदा पंतप्रधान झाले. पण दुसर्‍यांदा पंतप्रधान झालेल्या शरीफ़ यांनी आपली सत्ता बळकट करण्यासाठी लष्कराला हाताशी धरण्याची जी चुक केली; तीच त्यांना महागात पडली. जी चुक झुल्फ़ीकार अली भुत्तो यांनी केली होती, तीच नवाज शरीफ़ यांनी केली. वरीष्ठ व अनुभवी अधिकारी डावलून मुशर्रफ़ यांना सेनापती नेमण्याची चुक त्यांना भारी पडली. झिया यांच्याप्रमाणेच मग मुशर्रफ़ यांनीही संधी देणार्‍या नेत्याचाच बळी घेतला.

   शरीफ़ यांनी आपल्या कारकिर्दीत भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयास केला त्याला भारतातील नवे पंतप्रधान वाजपेयी यांनीही साथ दिली होती. पण भारत पाक संबंध सुधारले, तर पाकिस्तानातील लष्कराची महत्ता संपुष्टात येते. तिथे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता व सुरक्षेचा मुखवटा लावून लष्कराने राजकीय हस्तक्षेप केलेला आहे. भारताविषयीचा भयगंड हेच पाक सेनेसाठी नेहमी भांडवल राहिले आहे. त्यामुळेच शरीफ़ यांच्या भारत मैत्रीचे प्रयास मुशर्रफ़ यांना खटकणारे होते. म्हणूनच त्यांनी त्यात ठरवून पाचर मारण्याचा पवित्रा घेतला. दिल्ली-लाहोर बससेवा सुरू झाली व वाजपेयी त्याच बसने पाकिस्तानात गेले; तर त्यांच्या स्वागताला हजर रहाण्याचा शिष्टाचारही मुशर्रफ़ यांनी पाळला नव्हता. लाहोर जाहिरनाम्याला सुरुंग लावण्यासाठी त्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी करून युद्धाची स्थिती निर्माण केली. पण अमेरिकेच्या दडपणामुळे त्यातही पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. तेव्हाच कुठे शरीफ़ना आपली चुक ध्यानात आली. त्यांनी मुशर्रफ़ यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला खुप उशीर झाला होता. श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेले मुशर्रफ़ मायदेशी परत येत असताना त्यांच्या विमानाला पाकिस्तानात उतरण्याची परवानगी शरीफ़ यांच्या सरकारने नाकारली. पण तोही डाव त्यांच्यावर उलटला. मुशर्रफ़ यांनी अशा प्रसंगाची तयारी आधीच करून ठेवलेली होती. शरीफ़ यांचे आदेश विमानतळाचे अधिकारी पाळत असताना आयएसआय व पाक लष्करातील एका गटाने चाल करून पंतप्रधानालाच अटक केली आणि मुशर्रफ़ पाकिस्तानात परतले. तात्काळ त्यांनी आणिबाणी घोषित करून स्वत:ला लष्करी प्रशासक म्हणून घोषित केले आणि देशाची घटना व न्यायालयांचे अधिकार रद्दबातल केले. खुद्द देशाच्या पंतप्रधानावरच देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याच्या तमाम कुटुंबिय व नातलगांना अटक करण्यात आली. एकूण शरीफ़ही भुत्तोंच्या मार्गाने फ़ासावर लटकणार; अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण सौदी अरेबियाने हस्तक्षेप करून शरीफ़ यांना तिकडे पाठवून देण्याचा प्रस्ताव दिला म्हणून ते वाचले. त्यांची सर्व संपत्ती जप्त करून  अंगावरच्या वस्त्रानिशी शरीफ़ कुटुंबियांना सौदीला जाण्याची मुभा मुशर्रफ़ यांनी दिली.

   जगभर त्यांचा निषेध झाला. पण राजकारण हा अत्यंत सोयीचा तत्वशून्य व्यवहार असतो. म्हणूनच सोयीचे असेल तेव्हा हुकूमशाहीला मान्यता मिळते आणि गैरसोयीचे असेल तेव्हा मोदीसारख्या लोकशाहीचे पालन करणार्‍यालाही हुकूमशहा ठरवले जात असते. योगायोगाने मुशर्रफ़नी सत्ता बळकावल्यावर अमेरिकेतील घातपाताची घटना घडली व अफ़गाणीस्तानला धडा शिकवण्यासाठी करायच्या युद्धात अमेरिकेला पाकिस्तानच्या मदतीची गरज भासू लागली. तेव्हा निमूटपणे मुशर्रफ़ यांच्या अन्याय्य सत्तेला अमेरिकेने व उर्वरित जगाने मान्यता दिली. तेव्हा आपणही जिहादी दहशतवादाचे विरोधक असल्याचे सिद्ध करून जगाची मान्यता आपल्या अवैध सत्तेला मिळवण्यासाठी मुशर्रफ़ हिरीरीने पुढे आले. पण प्रत्यक्षात तेव्हाही या भित्र्या पळपुट्या सेनापतीने शरणागती कशी पत्करली त्याची कबुली स्वत:च नंतर दिली. एकूण हा असा पळपुटा सेनापती आहे. पण जगाचे राजकारणाच सोयीचे व मतलबी असल्याने मुशर्रफ़ याच्यासारखे पळपुटे व भामटेही कसे यशस्वी होऊ शकतात त्याचा हा इतिहास आहे. तत्वाच्या व नितीमत्तेच्या आहारी गेलेल्या अतिशहाण्यांचा आपापल्या डावपेचात बदमाश लोक किती धुर्तपणे वापर करून घेतात व तत्वांनाच हरताळ फ़ासला जातो; त्याचा मुशर्रफ़ हा जीताजागता दाखला आहे. त्याने आपल्या देशातीलच नव्हेतर जगभरच्या राजकारणातील दिग्गजांना त्यांच्या अहंमन्यता व तात्विक अट्टाहासाच्या जाळ्यात अडकवून आपले दुष्ट हेतू कसे साध्य करून घेतले, त्याचा हा पुरावा आहे. साधूसंतालाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या जमान्यात युक्तीवाद व बुद्धीवादाचा इतका अतिरेक होतो, की त्यातून मग असे बदमाश भामटे आपली पोळी सहज भाजून घेतात आणि तेही स्वत:ला तत्वांचे पूजक समजणार्‍यांकडून.

   आज कोर्टाने साधा अटकेचा आदेश दिल्यावर चार दिवस गजाआड बसायची वेळ येईल, म्हणून भित्री भागूबाई होऊन पळ काढणारा हाच माणुस काही दिवसांपुर्वीच आपण कारगिलमध्ये किती मोठा पराक्रम केला, असे छाती फ़ुगवून सांगत होता. कारगिल हा आपला पराक्रम होता असे एका वाहिनीला मुलाखत देऊन सांगणार्‍या या पाक सेनापतीचा तोच पराक्रम आता कुठे बिळात दडी मारून बसला आहे? सामान्य लोकांना धर्माच्या नावाने चिथावण्या देऊन जिहादी व घातपाती बनवायचे व त्यांना शत्रूच्या तोंडी द्यायचे; ह्याला असे बदमाश स्वत:चा पराक्रम मानतात व शहाण्यांच्या ते असत्य गळी मारतात. प्रत्यक्षात कारगिलमध्ये पाक सैनिकांना मुजाहिदीन बनवून घुसवण्याचे पाप याच मुशर्रफ़नी केले होते आणि जेव्हा ते पाक सैनिक मारले गेले; तेव्हा त्यांचे मृतदेह घ्यायलाही हा माणूस तयार झाला नाही. त्यामुळे त्यांना बेवारस असल्याप्रमाणे अज्ञात स्थळी गाडावे लागले. हीच पाकिस्तानची नितीमत्ता राहिली आहे. मुंबई हल्ल्यातले जिहादी मारले गेल्यावर त्यांचेही मृतदेह स्विकारण्यास नकार देणारे हे शूरवीर सेनपती व राज्यकर्ते जोवर पाकिस्तानी लोकांना धर्माच्या नावावर खेळवू शकणार आहेत; तोपर्यंत पकिस्तानी जनतेला भवितव्य असणार नाही. पळपुट्या नेत्यांकडून देशाची उभारणी होत नसते हे पाकिस्तानी जनतेला जेव्हा कळेल; तेव्हाच त्यांची अशा नेत्यांपासून मुक्तता होऊ शकेल.

   एकूण काय तर मुशर्रफ़ यांनी त्यांच्या म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्ते व सेनापतींच्या पळपुटेपणाचा जो सहा दशकांचा वारसा आहे, तो उत्तम रितीने जपला आहे. पुढे चालू ठेवला आहे. युद्धाच्या व शौर्याचा बाता मारायच्या आणि संघर्षाची वा लढायची वेळ आली, मग मात्र ढुंगणाला पाय लावून पळ काढायचा. पन्नास वर्षापुर्वी जनरल अयुब खान यांनी जो पायंडा पाडला, तोच वारसा याह्याखान यांनी जपला आणि कालचे पाक सेनाप्रमुख मुशर्रफ़ त्याचेच अनुकरण करीत कोर्टातून पळाले आहेत. अशा देशाला व तिथल्या समाजाला कुठले भवितव्य नसते, की भविष्यकाळ नसतो. म्हणूनच आजच्या एकविसाव्या शतकातही पाक जनतेला विचारापेक्षा धर्माच्या व दैववादाच्या आधारावरच जगावे लागत आहे. दिशाभूल करणारे व त्यांचीच लूट करणारे नेते व शासन त्यांच्या वाट्याला आलेले आहे.

३ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख भाऊ! एकंदरीतच पाकिस्तानी नेते निम्नस्तरीय लायकीचे आहेत, यात शंकाच नाही. वाईट अशाचं वाटतं की भारतीय नेते (काँग्रेसी आणि भाजपी दोन्ही!) या दौर्बल्याचा लाभ उठवीत नाहीत. काहीतरी फालतू गोष्टी करीत बसतात. समझोता एक्सप्रेस काय अन् बस डिप्लोमसी काय अन् गुजराल डॉक्ट्रिन काय! नसती थेरं नुसती! म्हणूनच तर लोकांना मोदी हवेत की काय असा प्रश्न पडतो.

    असो.

    लेखातली एक गोष्ट बदलावीशी वाटली. ती म्हणजे भारत आणि पाक यांतील राष्ट्रसंघातला वाद. काश्मीरबाबत भारत आणि पाक यांच्यात राष्ट्रसंघात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. जो वाद आहे तो राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीबद्दल आहे.

    सुरक्षा समितीने पाकला घुसखोर मागे घ्यायला सांगितले होते. त्याबदल्यात भारताने सैन्य मागे घेऊन काश्मिरात सार्वमत घ्यावे असा ठराव पारित केला. भारताने पाकव्याप्त काश्मिरातून पाकिस्तानी घुसखोर हटवल्याखेरीज सार्वमत घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. ही भूमिका पाकला अर्थातच मान्य नाही.

    गेले ६४+ वर्षात परिस्थितीत बराच फरक पडला आहे. काश्मिरी हिंदूंच्या निर्वंशानंतर तिथे सार्वमत घेतले तर ते प्रातिनिधिक नसणार आहे. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनानंतरच सार्वमत घेतले जावे ही भारतीय जनतेची मागणी आहे. सरकारची अधिकृत भूमिका हीच हवी (प्रत्यक्षात असेलही).

    काश्मीरसंबंधी जो वाद आहे तो भारत आणि पाक यांचा अंतर्गत मामला आहे. त्याच्याशी राष्ट्रसंघाचा काहीही संबंध नाही. हा वाद दोन देशांनी आपापसांत सोडवायचा आहे. Kashmeer is a bilateral issue, या अर्थी शिमला करारात एक कलम आहे. नाही म्हणायला सुरक्षा समितीचे निरीक्षक काश्मिरात आहेत, मात्र त्यांचं काम सुरक्षा समितीच्या ठरावाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आहे. आणि ते काम निरीक्षण करून अहवाल बनवण्याचे आहे. मूळ वादाशी या निरीक्षकांचा संबंध नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ आपण एकाच लेखात पूर्ण पाकिस्तानचा इतिहास सांगितला आहे. एकत्रीत अशी माहिती कुठेही वाचलेली नाही. या अप्रतिम लेखाबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा