रविवार, १० मार्च, २०१३

लाटेवर स्वार झालेल्या निवडणुकांचे चमत्कार
   आजच्या पत्रकारितेमध्ये किंवा माध्यमात स्वत:ला राजकीय अभ्यासक म्हणवून घेणार्‍यांचे वय पाहिले मग एक गोष्ट लक्षात येते, की त्यातल्या बहुतेकांचे वय पन्नाशीच्या आतले वा आसपासचे आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव १९८० नंतरच्या दशकातला आहे. सहाजिकच त्याआधीच्या राजकारणातील घडामोडी वा प्रसंगांचे त्यांचे बहुतांश आकलन हे वाचनापुरते मर्यादित आहे. जे काही वाचले ते त्या कालखंडाशी सांगड घालून समजून घेतले नाही; तर आकलनामध्ये मोठा फ़रक पडत असतो. सहाजिकच त्यातून काढलेल्या निष्कर्षातही जमीन अस्मानाचा फ़रक पडतो. हा फ़रक सांगायची वेळ का यावी? तर यातले बहुतांश पत्रकार आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा करताना प्रत्येक पक्षाची आजची वा मागील निवडणुकीतली ताकद व मते इतकाच विचार करून बोलत लिहित असतात. त्यांना सध्याची परिस्थिती व लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा यांच्याशी निवडणुकीची सांगड घालायचे भान रहात नाही. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांनी सात लोकसभा निवडणुका बघितलेल्या आहेत व त्यात पुन्हा चाचण्यांच्या जमान्यातली ही पिढी आहे. सहाजिकच त्याच अनुषंगाने त्यांचे आडाखे व भाकिते असतात. पण त्या मागल्या सात निवडणुकांच्या आधीच्या चार लोकसभा निवडणूका तेवढ्याच महत्वाच्या होत्या, कारण आजची स्थिती व तेव्हाची स्थिती नेमकी समान आहे. त्या चारही निवडणूका योगायोगाने लाटेच्या मतदानाच्या होत्या. लाटेवर स्वार होणारे त्यात बाजी मारून गेले होते आणि पक्ष व संघटना हाताशी असलेल्यांचे दारूण पराभव त्यात झालेले होते.

   १९७१ सालात इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेने शिखर गाठले होते, पण त्यांच्या पाठीशी पक्षाची भक्कम संघटना नव्हती. उलट कॉग्रेस पक्षात संघटनात्मक मोठीच देशव्यापी फ़ूट पडलेली होती. इंदिराजींच्या हाताशी दुबळे खुजे लोक होते. आणि राज्याराज्यातील दिग्गज कॉग्रेस नेते त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण तरीही इंदिराजींनी दोन तृतियांश बहुमत १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत मिळवले होते. तेव्हाही तात्कालीन राजकीय अभ्यासक थक्क होऊन गेले होते. कारण लाटेचा अंदाज त्यांना आलेला नव्हता. लोकांनी इंदिराजींना इतके भरघोस मतदान केले, की अखेरीस निवडणूक आयोगाने त्यांच्याच कॉग्रेस गटाला अधिकृत कॉग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली होती. मग लोकांनी इंदिराजींना इतकी मते का दिली होती? तर त्या कालखंडात जे राजकीय अराजक देशात माजले होते, त्यातून इंदिराजीच खंबीरपणे देशाला बाहेर काढू शकतील; असा विश्वास त्यांनी जनमानसात निर्माण केला होता. किंवा जनमानसात तशाच स्वरूपाची अपेक्षा कुठल्या तरी कारणाने निर्माण झालेली होती. त्या अपेक्षेने मग पक्षीय संघटना व त्यांच्या बळावर मात केली होती. थोडक्यात आपला उमेदवार म्हणून ज्यांना इंदिराजींनी शेंदूर फ़ासला, त्याला लोकांनी डोळे झाकून मते दिलेली होती. त्याला लाट म्हणतात. त्या मतदानाला इंदिरा लाट असे नाव देण्यात आले. पुढल्या सहा वर्षांनी आणिबाणी उठवल्यावर झालेल्या निवडणुकीत इंदिराजींवर लोकांचा इतका राग होता, की केवळ इंदिराजींचा उमेदवार म्हणून अत्यंत दिग्गज म्हणता येतील अशाही नेत्यांचा कॉग्रेस उमेदवार म्हणून लोकांनी पराभव केला होता. उलट जनता पक्षाचा शेंदूर फ़ासलेला दगडही निवडून आलेला होता. त्याची दोनच उदाहरणे पुरेशी आहेत.

   त्या निवडणुकीत रामविलास पासवान नाव प्रथम लोकांच्या कानी आले, हा कोवळा पोरगा बिहारच्या हाजीपूर मतदारसंघात विक्रमी मतांनी निवडून आला व त्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले. असे काय कर्तृत्व होते तेव्हा पासवान यांचे? पण टिळा जनता पक्षाचा लागला आणि गड्याने बाजी मारली. तेच जॉर्ज फ़र्नांडिस यांचे होते. निवडणूका झाल्या तेव्हा फ़र्नांडीस तुरूंगात होते. त्यांच्यावर घातपाताचा आरोप होता. पण मुंबईचा हा समाजवादी नेता बिहारच्या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आला. त्याचे नावही तिथल्या मतदाराला माहित नसेल. पण समोर जो कोणी इंदिरा गांधींचा उमेदवार होता, त्याला पाडण्यासाठी लोकांनी जनता पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मते दिलेली होती. ही झाली लाटेवर स्वार झालेल्यांची कथा. दुसरी बाजू तेवढीच महत्वाची आहे. उत्तरप्रदेशात प्रतापगड ह्या मतदारसंघात तिथले जुने संस्थानिक दिनेशसिंग हे इंदिराजींचे विश्वासू व मंत्री होते. त्यांच्या विरोधात जनता पक्षाला कोणी उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीला तिथे नेऊन दिनेशसिंग यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आला. पण त्याच्याही प्रचाराला कोणी नव्हते. खुद्द तो उमेदवारही तिकडे प्रचारासाठी फ़िरकला नाही. पण मतमोजणी झाली; तेव्हा त्याच नगण्य अनोळखी उमेदवाराने दिनेशसिंग नावाच्या दिग्गजाचा दारूण पारभव केला होता. याला लाटेचे मतदान किंवा लाटेचे राजकारण म्हणतात. जो त्या लाटेवर स्वार झालेला असतो, त्याच्यामागे पक्षाची ताकद वा संघटना किती प्रभावी आहे, त्याला अर्थ नसतो. त्याचा विजय पक्का असतो.

   मात्र ही जनता लाट फ़ार काळ टिकली नाही. अवघ्या अडीच वर्षात जनता पक्ष म्हणून एकत्र आलेल्या चार पक्षात भाऊबंदकी सुरू झाली आणि दुफ़ळी माजली. त्यातल्या समाजवादी गटाने जनसंघियांना रा.स्व. संघाशी संबंध तोडायचा आग्रह धरून जे नाटक सुरू केले; त्यातून जनता पक्षात बेदिली माजली. पाडापाडीला आरंभ झाला आणि लोकांची कामे ठप्प झाली. सरकार आहे की नाही; म्हणायची वेळ आली. आज आपण जी स्थिती बघतो तशी स्थिती १९७९ सालात देशामध्ये आलेली होती. सरकार म्हणजे मंत्री व पंतप्रधान वगैरे होते. पण धोरणाचा व कारभाराचा पुरता विचका उडालेला होता. त्यामुळे लाटेवर स्वार झालेल्या जनता पक्षीयांबद्दल लोकांचा पुरता भ्रमनिरास होऊन गेला होता. या अराजक व अनागोंदीतून देशाला कोण बाहेर काढील, त्याच्या हाती सत्ता द्यायला लोक उत्सुक होते. त्याच परिस्थितीत जनता गटांनी देशाला आणून सोडला आणि मध्यावधी निवड्णूकीची पाळी आली. त्याच दरम्यान पुन्हा कॉग्रेसमध्ये दुफ़ळी माजलेली होती. यशवंतराव चव्हाण, देवराज अर्स, ब्रह्मानंद रेड्डी असे दिग्गज नेते इंदिराजींना दाद द्यायला तयार नव्हते. पण कमालीचा आत्मविश्वास बाळगणार्‍या इंदिरा गांधींनी पुन्हा पक्ष फ़ोडला आणि इंदिरा कॉग्रेसची स्थापना केली. तेव्हा नाव घेण्याजोगा कोणीही नामवंत नेता त्यांच्यासोबत आलेला नव्हता. पण काळाची पावले ओळखून एक एक नेता चव्हाण-रेड्डींना सोडून त्यांच्या गोटात दाखल होत गेला. मध्यावधी निवडणूकांची घोषणा होईपर्यंत निम्मी कॉग्रेस पुन्हा इंदिराजींच्या गोटात दाखल झालेली होती. त्या मध्यावधी निवडणूकीत इंदिराजींनी लोकांना जवळ घेण्यासाठी कोणता जाहिरनामा दिला होता? आजच्या किती राजकीय अभ्यासकांना तो १९७९ अखेरचा इंदिरा गांधींचा निवडणुक जाहिरनामा आठवतो? केवळ एका घोषणेवर इंदिरा गांधींनी त्या मध्यावधी निवडणूकीत आपली लाट निर्माण केली. ती दोनच शब्दांची घोषणा होती. ‘चलनेवाली सरकार’.

   कशी गंमत आहे ना? अवघ्या दोन शब्दांनी इंदिरा गांधींना दुसर्‍यांदा लोकसभेत दोनतृतियांश बहूमत व सत्ता दिलेली होती. आणि त्याच इंदिराजींचा तीनच वर्षापुर्वी मतदाराने दारूण पराभव केला होता. किती दारूण? १९७७ सालात रायबरेलीत इंदिरा गांधी व बाजूला अमेठीमध्ये संजय गांधी यांनाही मतदाराने धुळ चारली होती. आणिबाणीतल्या अत्याचाराचे ते परिणाम होते. पण तो सगळा राग अवघ्या तीन वर्षात संपून त्याचेच रुपांतर लोकप्रियतेमध्ये झाले होते. ती किमया इंदिरा गांधींच्या करिष्म्याची नव्हती, तो करिष्मा त्यांना जनता पक्षीय अनागोंदीने निर्माण करून दिलेला होता. जनता पक्षाने इतका सावळागोंधळ घातला, की त्यांच्यापेक्षा हुकूमशाहीचा कारभार करून देशात निदान खंबीर सरकार देऊ शकणार्‍या इंदिराजी लोकांना आवडू लागल्या होत्या. या लोकशाही गोंधळापेक्षा इंदिराजींची एकाधिकारशाही लोकांना परवडणारी वाटली होती. तेव्हा लोकांची आवडनिवड कशी बदलते, त्याची नोंद निष्कर्ष काढताना लक्षात घ्यावी लागते. जनता पक्षाने चांगला नाही, तरी सुसह्य समजूतदार कारभार पुढली पाच वर्षे चालविला असता; तर देशाचे राजकारण व राजकीय इतिहास खुपच वेगळा झाला असता. पण जनता पक्षीयांच्या नालायकीने जी गुढ पोकळी निर्माण केली; तिनेच इंदिराजींची नवी लाट निर्माण केली. खंबीर, आक्रमक व निर्णायक नेतृत्व देण्याची क्षमता या गुणवत्तेने पुन्हा इंदिराजींना सत्तेवर आणून बसवले व त्यांचे आणिबाणीतले अत्याचार विसरून जनता त्यांच्याच मागे धावली. मात्र अवघ्या चार वर्षात त्यांची हत्या झाली आणि १९८४ अखेर आणखी एक व शेवटची लाट आली.

   खलीस्तानच्या चळवळीचा बंदोबस्त धाडसाने करताना शीख समुदायाला दुखावण्याची हिंमत केलेल्या इंदिराजींची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केल्याने, त्याचे वारस म्हणून राजीव गांधी पंतप्रधान झाले व त्यांनी तात्काळ त्या सहानूभुतीचा लाभ उठवण्यसाठी निवडणूका घेतल्या. त्या मतदानाला राजिव लाट म्हटले जाते. पण प्रत्यक्षात ती सुद्धा इंदिरा लाटच होती. त्या लाटेने तर सगळ्याच विरोधी पक्षांना पालापाचोळ्यासारखे धुवून टाकले होते. दहा बारा जागा सुद्धा कुणाला लोकसभेत जिंकता आल्या नाहीत आणि वाजपेयी यांच्यासारखे दिग्गजही दुय्यम उमेदवारांकडून पराभूत झाले होते. शरद पवार यांनी लढवलेली ती पहिली लोकसभा निवडणुक होती. नवा पक्ष म्हणून प्रथमच मैदानात उतरलेल्या भाजपाला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या होत्या. त्याला लाट म्हणतात. ती कोणाची संघटनात्मक ताकद वा राजकीय विचारसरणीला जुमानत नाही. नेत्यामध्ये व त्याच्या लोकप्रियतेमध्ये तिची शक्ती असते. त्या नेत्याला सत्तेवर आणून बसवायला लोक मतदान करतात. अशा या लाटेच्या राजकारणाची पार्श्वभूमी व तात्कालीन परिस्थिती यांचे संदर्भ; आजच्या नव्या अभ्यासकांना ऐकून माहित असतील. पण त्यातले दाहक वास्तव किती माहित आहे? लाट व तिच्या परिणाम व मिमांसा कितपत ठाऊक आहे? या चारही लाटा एका परिस्थितीने निर्माण केलेल्या होत्या. अस्थिरतेचे भय, अनागोंदी, अराजकाची स्थिती, निर्नायकी अवस्था, राजकीय निष्क्रियता, अमाप भ्रष्टाचार आणि खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव; यातून अशा लाटा निर्माण होत असतात. आणि आज युपीए म्हणून जे काही देशात चालू आहे, त्यातून नेमकी तीच परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यातून मतदार चाचपडू लागला आहे.

   नरेंद्र मोदी यांच्याविषयी गुजरात बाहेरच्या लोकांमधले आकर्षण कुठून आले; त्याचा म्हणूनच राजकीय अभ्यासकांनी बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. तो माणूस त्याच्या वागण्याबोलण्य़ाने वा त्याने केलेल्या कारभारामुळे तुम्हाला आवडत नसणे, हा एक भाग झाला. पण देशातला मतदार सर्वसामान्य माणूसच सत्ता बनवत किंवा बिघडवत असतो. तेव्हा तो सार्वसामान्य माणूस कसा विचार करतो, तो मोदी व इतर नेत्यांकडे कसा बघतो, कुठली मोजपट्टी वापरून निवड करतो, त्याच्या पातळीवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. तरच मोदीविषयक आकर्षणाचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. १९७० च्या सुमारास संयुक्त विधायक दल म्हणून झालेल्या विरोधी पक्षीय एकजुटीच्या प्रयोगाने जी अस्थिरता निर्माण केली; त्याला कंटाळून लोक इंदिराजीच्या एकांगी हुकूमशाही प्रवृत्तीला शरण गेले होते. पुढे पुन्हा १९८० सालात जनता पक्षाच्या अराजकाला घाबरून लोकांनी त्याच एकाधिकारशाहीला डोक्यावर घेतले. आज युपीए सरकार व त्यांच्यासोबत सेक्युलर पोरकटपणाने देशात जी अस्थिरता व अराजक निर्माण केले आहे, त्यावर लोकांना खंबीर पर्याय हवा आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर लोकशाही म्हणून आकड्यांच्या खेळाने जो धिंगाणा घातला आहे, त्यापासून मुक्ती देणारे नेतृत्व आणि सत्ता लोकांना हवी आहे. ती सेक्युलर वा पुरोगामी असायला हवी, अशी जनतेची अजिबात अपेक्षा नाही. कारण गेल्या दहा वर्षात सेक्युलर या शब्दाचे दुष्परिणाम लोकांनी अनुभवले आहेत. सेक्युलर म्हणजे घातपात, भयंकर भ्रष्टाचार, घोटाळे, लुटमार, महागाई असा अर्थ होऊन बसला आहे. त्यापासून लोकांना मुक्ती हवी आहे. ती द्यायला कुठला खरखुरा पुरोगामी सेक्युलर पर्याय नसेल तर मोदी सुद्धा चालेल, अशी लोकांच मानसिकता झालेली आहे. त्यामुळेच अभ्यासक आपल्या चष्म्यातून बघत असतात आणि लोक साध्या डोळ्यांनी दिसेल तेवढे बघत असतात. मग लोकांना काय दिसते?

   गुजरातच्या दंगली ही आता खुप जुनी गोष्ट झालेली आहे. त्यानंतर गुजरातने खुप मोठी मजल मारलेली आहे. एकाहुन एक उद्योगपती त्याची साक्ष देत आहेत. परदेशातले दिग्गज येऊन मोदींचे कौतुक करीत आहेत. विकासाचे आकडेही केंद्रातील युपीए सरकारचे अपयश ठळकपणे दाखवत असताना, गुजरातची प्रगती नजरेत भरणारी आहे. म्हणजेच उत्तम कारभार मोदी नावाचा माणूस सरकार म्हणून देऊ शकतो, अशी आज तरी लोकांची समजूत झालेली आहे. ती किती खरी व किती खोटी; हा भाग वेगळा. पण आजतरी तशी समजूत पक्की झालेली आहे. दुसरीकडे त्या दंगलीनंतरच्या काळात गुजरात हे एकच असे राज्य आहे, की जिथे फ़ार मोठी कुठली घातपाताची घटना घडलेली नाही. म्हणजेच दहशतवाद मोडून काढायला मोदी हवा; अशी अपेक्षा आपोआप निर्माण होते. तिसरी गोष्ट म्हणजे एकूण देशाच्या कुठल्याही राज्यात वा केंद्रात जितक्या भ्रष्टाचाराच्या भानगडी मध्यंतरीच्या कालखंडात चव्हाट्यावर आल्या, त्याचा मागमूस गुजरातमध्ये दिसत नाही. म्हणजेच मोदी हा स्वच्छ चारित्र्याचा व कारभाराचा एकमेव नेता आहे, अशी धारणा जनमानसात तयार झालेली आहे. जेव्हा अशा गोष्टी दिसतात वा तशा समजूती तयार होतात; तेव्हा लोकांना पर्यायातून निवड करायची वेळ येत असते. सेक्युलर म्हणून असुरक्षितता, भ्रष्टाचार, अनागोंदी व अराजक सहन करायचे की दंगलीचा आरोप असलेला पण खंबीर चोख कारभार हवा, असे पर्याय लोकांपुढे असतात. मग सामान्य माणूस नेहमी व्यवहारी विचार करतो. कुठे कमी नुकसान होईल; त्याकडे त्याचा कल असतो. मोदींची लोकप्रियता त्यातून आलेली आहे. त्याचीच लाट होऊ लागली आहे. त्याचा अंदाज अभ्यासकांना व पत्रकार माध्यमांना आलेला नसला; तरी मोदींना त्याची चाहुल लागली आहे. म्हणूनच हा माणूस एनडीए आघाडीचे सरकार बनवायाचा मनसुबा बाळगून वाटचाल करीत नसावा. त्याचे ध्येय स्वपक्षाला संपुर्ण बहूमत मिळवून द्यायचे असावे, असेच आजतरी वाटते.

   लोकमताची लाट मोदींच्या दिशेने वहात असेल, तर त्यांनी मित्रपक्ष व आघाडीची गणिते मांडायची गरजच उरत नाही. देशाच्या कानाकोपर्‍यात आज मोदींचे नाव दुमदुमत नसते, तर माध्यमांनी त्यांच्यामागे सतत धाव घेतलीच नसती. मोदींचे भाषण असेल तेव्हा ते विनाव्यत्यय थेट अखंड प्रक्षेपित कशाला केले जाते? त्याला देशाच्या सर्व भागात प्रेक्षक असतो म्हणूनच ना? मग ती कसली कबुली आहे? मतचाचण्या तेच सांगत आहेत. ज्या नितीशकुमारांनी मोदीच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे, त्यांच्याच पक्षातले एक खासदार जयनारायण निषाद या आठवड्यात मोदीच पंतप्रधान व्हावेत म्हणून यज्ञ आयोजित करतात, हे पुरेसे नाही काय? सवाल ते पटवून घेण्याचा किंवा नाकारण्याचा नाही. सवाल आहे, तो मोदींच्या लोकप्रियतेची रहस्ये उलगडण्याचा आहे. आणि त्याकरिता तीन दशकांपुर्वीच्या चार लाटेच्या निवडणूकांचे निकाल, तात्कालीन परिस्थिती यांची समिकरणे मांडण्याची गरज आहे. तरच नरेंद्र मोदी नावाचे कोडे सोडवता येऊ शकेल. गुजरातची विधानसभा तिसर्‍यांदा लढवताना पुन्हा ती जिंकण्याचा मनसुबा मोदींचा नव्हता. तर तिथून पंतप्रधान पदापर्यंत झेप घेण्याचे मनाशी ठरवून ते सहा महिने आधी कामाला लागले होते. म्हणूनच विधानसभा जिंकल्यावर पहिल्या विजय सभेत बोलताना गुजराती ऐवजी मोदींनी हिंदीतून भाषण केले. कारण त्याचे थेट प्रक्षेपण देशाच्या कानाकोपर्‍यात जाते आहे, याची त्यांना जाणिव होती. गुजरातची निवडणूक संपली असली तरी लोकसभेची निवडणुक लढवायला मोदींनी त्याच दिवशी व त्याच विजय सभेपासून सुरूवात केली.

   आपल्याविषयी जनमानसात सुप्त लाट आहे याची पुर्ण जाणिव मोदींच्या देहबोलीतून दिसते. त्यांचे डावपेच बघितले तर त्यांची वाटचाल त्याच बाजूने चालली आहे. म्हणूनच भाजपावर प्रभूत्व मिळवायची पहिली लढाई त्यांनी पार केली आता निवडणूक समितीचे प्रमुख होत, त्यांनी आपणच पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचा गर्भित इशारा आपल्या विरोधकांना दिलेला आहेच. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी पक्षावरील हुकूमत स्पष्ट केलीच. आता आपल्याविषयी असलेली सुप्त लाट अधिक उघड व प्रभावी होण्यासाठी ते प्रयत्नशील होताना दिसत आहेत. तेव्हा त्यांना कुठले मित्रपक्ष स्विकारतात किंवा कोण त्यांना नाकारतात, यावर वायफ़ळ बोलत बसण्यापेक्षा मोदींचे डावपेच, उमेदवारी व सध्यस्थितीची जुन्या लाटेच्या निवडणूकांशी सांगड घालून अभ्यास महत्वाचा आहे. कारण तोच काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. काही रहस्ये उलहडू शकेल. अमेरिकेतील एक भाषण झाले म्हणून जो फ़रक पडणार नव्हता, तो त्याच्या रद्द होण्यातून साधला गेला आहे. ह्याला मोदीनिती म्हणतात. एक शब्दाची प्रतिक्रिया न देता मोदींनी त्यातून किती काय साधले, त्याची मोजदाद केली तर हा माणुस किती कुटील राजकारण खेळू शकतो, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. मग त्याची इंदिराजींशी तुलना का करायची तेही लक्षात येईल.

२ टिप्पण्या:

  1. इंदिरा गांधींच्या काळात प्रादेशिक पक्ष एवढे प्रबळ नव्हते आता प्रादेशिक पक्ष खूप बलवान झाले आहेत

    उत्तर द्याहटवा