शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

खोट्या लग्नाची खरीखरी गोष्ट


    वयात आलेल्या मुलीचा घोर घरच्यांना असतोच. पण मुलगी मतिमंद किंवा थोडी वेडपट असेल, तर तो घोर झोप उडवून देणारा असतो. तिला कुठे ‘खपवायची’ अशी ती चिंता असते. अशाच एका मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला खपवायची छान योजना आखली होती. बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पाडायची मस्त योजना (नेपथ्यरचना) तयार केली होती. बघायला येणार्‍यांना मुलीची अक्कल कळू नये, याची पुर्ण सज्जता केलेली होती. त्यानुसार सर्व बोलणी झाल्यावर मुलीने फ़क्त चहा व बिस्किटाचा ट्रे घेऊन पाहुण्यांसमोर यायचे अशी व्यवस्था होती. नमस्कार करायचा की संपले. त्यासाठी तिला पढवून ठेवलेले असते. कित्येक दिवस आधीपासून सरावही करून घेतलेला असतो. आणि तो दिवस उजाडतो. सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडत असते. बोलणी संपली आणि आता बघण्याचा शेवटच्या अंकातला शेवटचा प्रवेश असतो. माऊली बाहेरूनच हाक मारते, ‘सुजया, बेटा चहा घेऊन ये पाहुण्यांसाठी.’ छान सजलेली नटलेली मुलगी पडदा बाजूला करून चहाचा ट्रे घेऊन बैठकीच्या खोलीत येते. पाहुण्यांना हसून दाखवते आणि समोरच्या टेबलावर हातातला ट्रे ठेवून सर्वांना नमस्कारही करते. आईचा जीव भांड्यात पडतो. पण पिता मात्र अस्वस्थ असतो. कारण सुजयाने आणलेल्या ट्रेमधून बिस्किटे गायब असतात. तेव्हा कौतुकाच्या स्वरात पिता विचारतो, ‘बेटा सुजया चहा आणलास, बिस्किटेही आणायची होती ना सोबत?’ खरे तर इथे पित्याने नियम मोडलेला असतो. मुलीला पाहुण्यांसमोर बोलू द्यायचे नाही, असे आधीच ठरलेले असते आणि पिताच तिला प्रश्न विचारतो सर्वांच्या देखत. मग काय मजा? सुजया मस्त मुरका मारते आणि आपल्या नसलेल्या अकलेचे झकास प्रदर्शन पाहुण्य़ांसमोर मांडत म्हणते, ‘पप्पा, मी ना बिस्किटे चहात घालूनच आणली. नाहीतरी पाहुणे बुडवूनच खाणार ना? त्यांना कशाला तेवढा त्रास?’

   पुढे काय झाले ते सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ज्याक्षणी सुजयाने हे अकलेचे तारे तोडले, त्याक्षणी तिच्या मातापित्यांना परिणामांची कल्पना आलेली होती. पण बिचार्‍या सुजयाला त्याचा थांगपत्ता नव्हता. आपण काही भलताच मोठा शहाणपणा केला आहे. अशा थाटात ती तिथेच मिरवत उभी होती आणि पालकांना मात्र कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली होती. पाहुणे संतप्त होऊन व फ़सवणूकीचे आरोप करून निघून गेले होते, आणि लाडकी सुजया आपल्या पित्याला आश्चर्याने विचारत होती, ‘पप्पा पाहुणे चहा न घेताच का निघून गेले हो?’

   बाप बिचारा काय सांगणार, कप्पाळ? पण सुजया नशीबवान पोरगी होती. एकेदिवशी अशा ‘दिव्य’ कन्येची ख्याती दूरदेशी पोहोचली आणि तिथे वास्तव्य करणार्‍या ‘भास्करा’चार्यांचा पुत्र ‘कुमार’ वयात आला होता. त्याला अशीच सुजयासारखी उपवर अधूवधू भास्करचार्य शोधत होते. त्यांनी थेट सुजयाला मागणी घातली आणि त्यातून मग कुमार सुजयाचा ‘दिव्य मराठी’ संसार सुरू झाला. बिचारे भास्कराचार्य गणिताचा लिलावती ग्रंथ सिद्ध करण्याच्या धावपळीत असायचे आणि त्यांचे हे सुपुत्र सुजयासह अकलेचे तारे तोडण्यात गर्क असायचे. ज्ञानेश्वराने रेड्याकडून वेद वदवले तर आपण रेड्याचे दूध काढू शकतो, यावर नवदांपत्याची कमालीची श्रद्धा होती. त्यामुळे दुनियेला रेड्याचे लिलामृत पाजायचे काम त्यांनी हाती घेतले. एकाने अग्रलेख लिहायचा तर दुसर्‍याने शिघ्रलेख पाडायचा; असा छान संसार सुरू झाला. कोण अधिक मुर्खपणा करून बेअक्कलपणाचे शिखर गाठतो; अशी त्या दोघात अखंड स्पर्धा चालायची. त्यांच्यातली ही स्पर्धा थांबवताना बिचार्‍या भास्कराचार्यांना कुठले समिकरण मांडले वा सोडवले त्याचाही विसर पडायचा.

   गंमत वाटली ना, सुजयाच्या लग्नाची गोष्ट वाचून? पण बिचार्‍या भास्कराचार्यांची झोप उडाली आहे आणि त्यांच्या नादाला लागलेल्या वाचकांची सुद्धा. जोवर त्यांच्या संसारात त्यांचे पोरखेळ चालू असतात, तोवर आपण त्यात पडायची गरज नसते. पण हा बेअक्कलपणा आपल्याला त्रासदायक होऊ लागला, मग गप्प बसून चालत नाही. आणि त्या सुजयासारखे तद्दन बेअक्कल असतात, त्यांना तर आपल्या नसल्या अकलेचे प्रदर्शन मांडल्याखेरीज जगता येत नाही. म्हणून ही गोष्ट इथे तपशीलात सांगायची वेळ आली.

   किस्सा सांगणार्‍याने नुसती ‘बघण्याच्या’ समारंभाची गोष्ट सांगितली होती. मलाही हसू आले होते. अशी माणसे असतात हे आपल्याला कधी खरे वाटत नाही, कारण हे किस्से काल्पनिक व अतिरंजित असतात. पण सत्य अनेकदा कल्पनेपलिकडे भयंकर असू शकते. अलिकडेच सुजय शास्त्री नावाच्या एका पत्रकाराशी संबंध आला तेव्हा मला त्या गोष्टीत विनोदापेक्षा दडलेले सत्य अनुभवता आले. ‘दिव्य मराठी’ नामक दैनिकाचे अग्रलेख लिहिणार्‍या शास्त्रींनी जी अक्कल पाजळली होती, त्यातले असत्य व दिशाभूल मी नजरेस आणुन दिल्याने त्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी जे कही अकलेचे तारे तोडायला सुरूवात केली ते विचारू नका. उदाहरणार्थ त्यांचा फ़ेसबुकवर मला पाठवलेला शेवटचा संदेश आहे त्यातली दोन विधानेच बघा किती परस्पर विरोधी आहेत.

१) ‘तुम्ही जे काही मुद्दे मांडता आहात ते तुमचे मत आहे तसेच मत सुहास पळशीकर, राजेंद्र व्होरा, आणि तळवळकर यांचेही आहेत. या मान्यवरांना तुम्ही मोजत नसाल पण उभा महाराष्ट्र मात्र त्यांची दखल घेतो.’
२) ‘इतिहासाची मीमांसा करावीच लागते. लोकांनी डोक्यावर घेतलेल्या दैवतांचा बुरखा फाडायचा असतो.’

   पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेल्या तीन व्यक्तींची उभा महाराष्ट दखल घेतो; असे म्हणताना त्यांना महाराष्ट्र म्हणजे काय ते तरी ठाऊक आहे काय याचीच शंका येते. पण वादासाठी त्यांचा पहिला दावा मान्य केला तर त्याच तिघा मान्यवरांची मी मिमांसा करण्यातून सुजयच्या दुसर्‍या विधानाच पुष्टी मिळते ना? पण त्याने ते व्यथित झाले आहेत (यातल्या व्होरा-पळशीकरांनी मला पाठवलेले माफ़ीपत्र वाचले तर सुजयला हुडहुडी भरेल आणि त्याचा उभा महाराष्ट्र आडवा पडेल). बाळासाहेब ठाकरे यांना लोकांनी डोक्यावर घेतले तर त्यांचा बुरखा फ़ाडला पाहिजे, त्यांची मिमांसा केलीच पाहिजे. पण तळवलकर, व्होरा व पळशीकर यांची मात्र मिमांसा करता कामा नये. त्यांना डोळे झाकून मान्यवर म्हणून स्विकारले पाहिजे. हा कुठला बुद्धीवाद व युक्तीवाद आहे? एकाच परिच्छेदात दोन परस्पर विरोधी दावे करणार्‍या सुजयाला वस्तुस्थिती (fact) व मत (opinion) यातलाही फ़रक कळत नाही. त्यांच्या मुळ लेखात ज्या वस्तुस्थितीच्या चुका होत्या, त्याबद्दल आक्षेप घेणारे तपशील मी मांडले होते. त्याबद्दल खुलासा देण्यापेक्षा; ते मला त्या संदर्भात उपरोक्त लेखकांनी मांडलेल्या मतांनाच वस्तुस्थिती मानायला सांगत आहेत. उदाहरणच घ्यायचे तर त्यांनी बाळासाहेब यांच्या निधनानंतर गोविंद तळवलकर यांचा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचायला पाठवला होता. तो त्यांच्या दृष्टीने एकूणच शिवसेनेविषयी व्यापक चिंतन करणारा लेख आहे. पण त्यातही अनेक चुकीचे तपशील व त्यावर बनवलेली मते होती. त्यात गोविंदराव म्हणतात, ‘आता उद्धव ठाकरे सेनेचे कार्याध्यक्ष झाले आहेत.’ किंवा ‘पुढच्या वर्षी निवडणूक असल्यामुळे पुढच्या सहा महिन्यांत बेरजा व वजाबाक्या होतील.’ ह्या दोन विधानांचा अर्थ इतकाच की गोविंदरावांना काळाचे भान उरलेले नाही. उद्धव ठाकरे गेली बारा वर्षे सेनेचे कार्याध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातल्या निवडणूका पुढल्या वर्षी नसून दीड वर्षांनी (लोकसभा) व दोन (विधानसभा) वर्षांनी आहेत.

   हे माझे मत नाही तर ती वस्तुस्थिती आहे. तळवलकर मान्यवर असले म्हणून त्यांना काळवेळ बदलण्याचे विशेषाधिकार कोणी दिलेले नाहीत. राजकारणाची वा सामाजिक घडामोडीची मिमांसा करताना बुद्धीबळाच्या पटावरील सोंगट्यांप्रमाणे कोणालाही कुठल्याही जागी वा घरात उचलून ठेवण्याचा अधिकार मिमांसकाला मिळत नाही. पण सुजय शास्त्री अलिकडे दिर्घकाल कुमार केतकरांच्या सहवासात असतात, त्यामुळे त्यांना अवघे जग म्हणजे एक बुद्धीबळाचा पट वाटू लागला असावा. त्यात मग कुणालाही उचलून कुठल्याही घरात, खान्यात ठेवायचे आणि मग त्यानुसार मिमांसा करायची; असला धंदा सुरू होतो. ते कोणी गंभीरपणे वाचत नाही, म्हणजे तो मुर्खपणा उभ्या महाराष्ट्राने स्विकारला असा होत नाही. बेअक्कल माणसाच्या नादाला सहसा सामान्य माणसे लागत नाहीत; याचा अर्थ उभ्या महाराष्ट्राने दखल घेतली नाही असा त्याचा अर्थ होतो. पण सुजय त्यालाच दखल घेणे म्हणतात. तेही स्वाभाविक आहे. हे स्वत:लाच महाराष्ट्र समजतात. त्यामुळे त्यांनी दखल घेतली; मग महाराष्ट्राने दखल घेतली असाही सोयीचा अर्थ लावून मोकळे होतात. आणि खुद्द सुजयसारखे भाट तरी किती दखल घेतात याची शंकाच आहे. कारण दखल घेतली असती, तर आपण कुठल्या चुकीच्या संदर्भावर आधारित लिहितो, त्याचे पुरावे मुर्खासारखे मला पाठवले नसते. तळवलकर, पळशीकर सोडा, ज्या कुमार केतकरांसोबत सुजयनी संसार मांडला आहे; त्यांचे परस्पेक्टिव तरी त्यानी किती वाचले आहेत, याचीही मला शंकाच वाटते. अन्यथा त्यांनी आणखी एका संदेशातून ‘१९८२ ते २०१२ या ४० वर्षात शिवसेनेच्या नेतृत्त्वाने गिरणी कामगारांच्या पूनर्वसनासाठी एक ठोस योजना मांडली नाही’, असा सवाल मला केलाच नसता. उलट इतकी वर्षे होऊनही राज्यसरकार त्या गिरणीकामगारांच्या घराबद्दल निष्क्रिय कोणामुळे आहे त्याचा शोध घेतला असता.

   आपण ज्याच्या सोबत ‘मराठी दिव्य’ करण्याचा प्रपंच मांडला आहे, तो जगातला महान अलौकीक असा बिल्डर आहे आणि तोच गिरणीकामगारांना हवी तेवढी मोठी व मोफ़त घरे देऊ शकतो, हे सुजयच्या लक्षात आले असते. त्यांचे संपादक कुमार केतकर जगातले असे एकमेव बिल्डर आहेत; ज्यांना घरे बांधण्यासाठी जमीन वा चटईक्षेत्र वगैरेसह सिमेंट इत्यादी काही लागत नाही. त्यांच्या मनात आले, की ते कुठेही व कोणासाठीही पासष्टावे घर बांधून देत असतात. महिन्याभरापुर्वीच त्यांनी असेच पासष्टावे घार शिवसेनाप्रमुखांसाठी विनाविलंब बांधून दिले. सुजयला त्याचा पत्ता तरी आहे काय? १८ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झालेला ‘दिव्य मराठी’ सुजयने वाचलेला दिसत नाही. ‘झंजावात थांबला’ या लेखात केतकर लिहितात, ‘बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट जागा असतात. प्रत्येकाने कसे चालायचे हेही ठरलेले असते. हत्तीने सरळ, उंटाने तिरके, घोड्याने अडीच घरे वगैरे. सत्तेच्या सारीपाटाचे हे नियम बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाळले नाहीत. त्यांनी स्वत:चे पासष्टावे घर पटाच्या बाहेर उभे केले. त्या बाहेरच्या चौकटीतून त्यांनी त्यांचा रिमोट कंट्रोल चालवला आणि बाकी 64 घरांवर आपला अंमल ठेवला.’

   बाळासाहेब मातोश्री नावाच्या त्यांच्या बंगल्यात रहायचे. त्यांनी अशा कुठल्या पासष्टाव्या घराचा दावा कधीच केला नव्हता. पण ज्याअर्थी केतकर लिहितात, तो परस्पेक्टिव असल्याने सुजयने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्याकडूनच साठ सत्तर हजार गिरणीकामगारांसाठी मोफ़त घरे बांधून घ्यायला हवीत ना? केतकरांना चटईक्षेत्र, भूखंड किंवा सिमेंट वगैरे काहीही लागत नाही. मुख्यमंत्री सुद्धा त्याच आशेवर आहेत. त्यासाठी केतकरांच्या मागे लागून गिरणीकामगारांची यातायात संपवण्यापेक्षा सुजय मलाच शिवसेनेने कामगारांसाठी काय केले असे विचारतात. अर्थात केतकरांचा बांधकाम व्यवसायातला हा पहिलाच प्रकल्प नाही. सोळा वर्षापुर्वी त्यांनी असेच एक पासष्टावे घर बांधले होते. तेव्हा ते ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक होते आणि त्यांनी ते घर (सुजयला भेडसावणार्‍या) अण्णा हजारे नावाच्या व्हायरससाठी ‘आयसीयु’प्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले होते. पण कदाचित सुजय तेव्हा पाळण्यातले आपले पाय गोविंदरावांना दिसतील व त्यांचा सुजयविषयक परस्पेक्टिव तयार होईल; म्हणुन आशाळभूतपणे अंगठा चोखत असावेत. त्यामुळे केतकरांनी विकसित केलेला ‘अण्णा व्हायरस’ त्यांना अजून ठाऊक नसावा. मला तळवलकर वगैरे सांगण्यापेक्षा सुजयनी जरा आधी सोबत वावरणार्‍या केतकरांनी कुठे कुठे बिनभूखंडाचे इमले उभारलेत ते वाचून काढले तरी खुप होईल. ‘पासष्टावे घर’ याच शिर्षकाच्या त्या अग्रलेखात अण्णा नावाच्या व्हायरसचे काय गोडवे केतकरांनी गायले होते, ते ऐकून सुजयला स्वाईन, डेंग्य़ु असे कोणकोणते ताप येतील त्याची कल्पनाही थरारक आहे. अवघ्या सोळा वर्षापुर्वीची गोष्ट आहे सुजय, तेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखात केतकर काय लिहितात?

     ‘अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आव्हानाचा आशय आता पारंपारिक राजकारणाच्या सीमा आरपार भेदून पुढे गेला आहे. नेमकी तीच गोष्ट मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि स्वत:ला राज्याचे कर्तुमकर्तुम समजणार्‍या ठा्करे कुटुंबियांच्या ध्यानात आलेली नाही. युती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री जे जे प्रस्ताव मांडत आहेत ते ते सर्व दैनंदिन डावपेचाच्या राजकारणात बसणारे आहेत. अण्णा हजारे यांना समाजाच्या सर्व स्तरातून जो व्यापक पाठींबा मिळतो आहे, तो पहाता असल्या चलाख खेळ्या खेळून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार अण्णांवर मात करू शकणार नाही. भ्रष्टाचाराच्या गटारात आकंठ बुडालेल्या युती सरकारने आणि शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांनी हे लक्षात घ्यायची वेळ आलेली आहे, की राजकीय बुद्धीबळांच्या चौसष्ट घरांच्या बाहेर अण्णांनी स्वत:चे पासष्टावे घर केले आहे. त्याला शह दिला जाऊ शकत नाही.’ (२८ नोव्हेंबर १९९६ मटा)

   हे सोळा वर्षापुर्वी कुमार केतकरांनी लिहिलेले शब्द आहेत. तेव्हा अण्णा हा व्हायरस आहे, याची अक्कल सुजयपति केतकरांना नव्हती का? कारण आज केतकरच संपादक असलेल्या ‘दिव्य मराठी’मध्ये सुजय त्याच अण्णा व्हायरसबद्दल गळा काढतो आहे. तुम्हाला त्या व्हायरसने ताप चढतो, असेही बोंबलत असता. मग शे्जारी, बाजूचा केबिनमध्येच तो व्हायरस निर्माता बसला आहे, त्याला बेड्या ठोकायला काय हरकत आहे? सुजयने ‘दिव्य मराठी’मध्ये ‘भरकटलेले आंदोलन’ नावाचा अग्रलेख हल्लीच लिहिला होता, त्यावरच्या माझ्या प्रतिक्रियेने त्यांचे चित्त विचलित झाले. त्यात हे सुजय शास्त्री काय लिहितात? ‘दोन वर्षे देशात केजरीवाल आणि अण्णा यांनी अराजकतेचा व्हायरस जन्माला घातला. या व्हायरसमुळे निर्माण होत असलेली अस्थिरता आता आपण अनुभवत आहोत. देशाची प्रकृती आता दिवसेंदिवस लेचिपेची होत आहे. देशाला चार दिवस शांततेत गेले की ताप येतो.’

   सोळा वर्षापुर्वी अण्णा तेच करत होते आणि तेव्हा केतकर त्यांच्या आरत्या ओवाळत होते. अण्णांना सर्व स्तरातून मिळणार्‍या पाठींब्याचे कौतुक करत होते. तेव्हा ते आंदोलन होते आणि आता तोच अण्णा व्हायरस झाला आहे. किती बेशरमपणा आहे ना? इथे सुजय आज केतकर संपादक असलेल्याच दैनिकात लिहितो आहे आणि व्हायरस ही केतकरांचीच लाडकी भाषा आहे. अण्णा असो की सेना असो; त्यापैकी कोणाचीच बाजू घ्यायचे मला कारण नाही. पण जेव्हा व्हायरस युती सरकारला सतावतो; तेव्हा ते आंदोलन असते आणि जेव्हा तोच व्हायरस कॉग्रेस सत्तेला आव्हान देतो, तेव्हा तो तापदायक होतो? क्या बात है सुजयजी? यालाच मी सेक्युलर बेशरमपणा म्हणतो. सोयीचे असेल ते उचलायचे आणि त्याचे दाखले द्यायचे आणि अडचणीचे बोलायचे नाही. कुमार-निखिल असे लबाड निदान तेवढी तरी अक्कल बाळगून आहेत; की चुकले किंवा खोटारडेपणा केला, तर प्रतिवादाच्या भानगडीत पडत नाहीत. पण सुजय शास्त्रीना बौद्धीक शहाणपणाचा आव आणायचा असल्यावर तोंडघशी पडावेच लागणार ना? त्यांच्या मला आलेल्या प्रत्येक संदेश व खोट्याचे पोस्टमार्टेम करायचे तर छोटेखानी पुस्तिकाच करावी लागेल. कारण वाक्या वाक्यागणीक निव्वळ खोटेपणा किंवा मुर्खपणाचाच त्यात भरणा आहे. एका संदेशात ते म्हणतात, ‘१९८२ ते २०१२ या ४० वर्षात शिवसेनेच्या नेतृत्त्वाने गिरणी कामगारांच्या पूनर्वसनासाठी एक ठोस योजना मांडली नाही.’ आता वाचकांनीच हा कालखंड ३० वर्षाचा आहे की ४० वर्षाचा आहे ते बघावे, मग मुर्खनाम शिरोमणी कशाला म्हणतात त्याचा पुरावा मिळू शकेल. ज्याला ३०-४० किंवा वस्तुस्थिती व मत यातला फ़रक कळत नाही, त्याने अग्रलेख लिहायचे मग ते मराठीतले दिव्यच होणार ना? गुंडांच्या तावडीतून सोडवायचे नाट्क करणार्‍यानेच नंतर बलात्कार करावा, तशी आजच्या बौद्धीक वर्गाची स्थिती झाली आहे. देशाला व समाजाला लुटणार्‍या सतावणार्‍यांच्या सेवेत त्यांची बुद्धी राबते आहे आणि त्याचेच दुष्परिणाम अवघ्या समाजाला भोगावे लागत आहेत.

     ‘आम्ही कुठल्या विचारसरणीत वाढलेलो नाहीत त्यामुळे आम्हाला कुठल्या पक्षाच्या धोरणांशी देणेघेणे नाही. पण देणेघेणे आहे ते या देशाला बांधणार्‍या सेक्युलर, धर्मातीत मूल्यांशी. गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी बांधलेल्या देशाशी प्रामाणिक राहणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या देशात कोणत्याही पक्षाचा नेता या मूल्यांशी आपली राजकीय विचारधारा जोडत असेल तर त्याला समर्थन करणे हे महत्त्वाचे वाटते.’ हा सुजयचा आणखी एक दावा. यापैकी महात्माजींनी स्वातंत्र्य मिळताच कॉग्रेस बरखास्त करायला सांगितले होते, ते नेहरुंनी धुडकावून लावले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत आपली भूमिकाही राजिनाम्यानंतर मांडू न देण्याचे डावपेच नेहरू खेळले. त्या तिघांच्या एकत्रित मूल्यांचे हवाले हा माणूस देतो, याचा अर्थच त्याने त्यापैकी कोणाचे काहीही वाचलेले नाही. जो लेख तो मला वाचायला सांगतो, त्यातही गांधी व नेहरू यांचे भविष्यातल्या भारतीय मूल्यांविषयी मतभेद असल्याचे तळवलकरांनी नमूद केले आहे. पण तेही याने धड वाचलेले नाही. परस्पेक्टिव असे काही भोंगळ शब्द वापरायचे. दडपून रेटू्न खोटे बोलत रहायचे; हे गोबेल्सचे प्रचारतंत्र सेक्युलर शहाण्यांनी आपल्या देशात यशस्वीरित्या वापरलेले आहे. हा त्यातला नवा शास्त्रीबुवा आहे इतकेच. म्हणूनच त्याचा मुर्खपणा पुराव्यानिशी दाखवल्यावर सुद्धा तो गोष्टीतल्या सुजया प्रमाणे विचारतो, ‘पाहुणे चहा न घेताच का निघून गेले हो?’

३ टिप्पण्या:

  1. भाऊ ​या कुमार केतकर आणि सुजय शास्त्री नावाच्या इसमांना डेंग्यू नावाचा रोग झालाय असे मला वाटते कारण डेंग्यू मध्ये जसे माणसाचे सांधे दुखतात तसे यांचे मेंदू दुखतात आणि मग काहीतरी भलते सलते लिहिले जाते अर्थात मेंदू ज्वाराचीही शेंका आहेच किंवा हे दोन्ही रोग झालेले असू शकतात हे मात्र खरे आहे ​

    उत्तर द्याहटवा