शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

कसाब फ़ाशी गेला, उद्या काय करायचे?



ही दोन माणसे महत्वाची २६/११ प्रकरणात. एकाने आपला प्राण पणाला लावून जगातला पहिला जिवंत फ़िदायिन पकडला; तर दुसर्‍याने आपली सर्व बुद्धी पणाला लावून त्याला न्यायाच्या कसोटीवर गुन्हेगार ठरवत फ़ाशीच्या दोरात अडकवला.


   होय, कबाब मेला. फ़ासावर लटकला. त्याला आता शंभरहून अधिक तास उलटून गेले आहेत. त्याने रंगवलेल्या रक्तरंजित नाटकाला उद्या चार वर्षे पुर्ण होत आहेत. मग आपण काय करणार आहोत? कसाब मेला किंवा फ़ासावर लटकला म्हणजे आपले जीवन सुखरूप सुरक्षित झाले आहे काय? ज्याच्यासाठी त्या तुकाराम ओंबळेने किंवा करकरे, साळसकर, कामटे वा उन्नीकृष्णन इत्यादींनी आत्मसमर्पण केले, त्यांचा या फ़ाशीतून आपण सन्मान केला आहे काय? त्यांनी बलिदान केले तेव्हा अनेकजणांनी गेटवेपाशी जाऊन मेणबत्त्या पेटवल्या आणि आपली जबाबदारी संपली ना? या शहिदांच्या मोठमोठ्या अंत्ययात्रा काढल्या आणि ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्यावर आपली जबाबदारी संपली ना? कोण अमर राहिला आहे त्यात? आपल्याला त्यांची आठवण तरी आहे काय? जिथे त्यांचे आत्मसमर्पण झाले त्याच परिसरात अडिच महिन्यांपुर्वी दिवसाढवळ्या एक भीषण दंगल झाली आणि त्याच छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये महिला पोलिसांच्या अब्रूशी खेळ करण्यात आला. यासाठी त्या शहिदांनी आत्मसमर्पण केले होते का? त्यांनी कोणासाठी बलिदान केले, त्याचेही आपल्याला स्मरण उरलेले नाही. म्हणुनच वारंवार असे प्रसंग येत आहेत, संपलेले नाहीत. कारण ओंबळे किंवा अन्य शहिदांनी कशासाठी व कोणासाठी आत्मसमर्पण केले, तेच आपल्याला कळलेले नाही. त्यांनी इतके दिवस पगार घेतला, तो कधीतरी असे मरावे लागणार यासाठीच घेतला होता; असा आपला समज आहे काय? तसे असेल तर मग मेणबत्त्या कशाला पेटवायच्या? श्रद्धांजलीचे फ़लक कशाला लावायचे?

   त्या दिवशी बुधवारी वाहिन्यांवरच्या किंवा कुठल्याही चर्चेत कसाबच्या फ़ाशीबद्दल बोलले जात होते. किती वाजता त्याला फ़ाशी दिले, कोणी त्याला मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगातून पुण्याला कसे गुपचुप नेले. तिथे त्याची कशी बडदास्त ठेवण्यात आली. त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळताना त्याला काय सांगण्यात आले वा विचारण्यात आले. त्याला काय खाऊ घातले, अशी मौजमजा चालू होती. पण तो फ़ासावर लटकण्यासाठी एका ओंबळे नावाच्या माणसाने आपले प्राण पणाला लावले; त्याचे कोणाला स्मरण नव्हते. कसाबला पकडला कसा ते सांगण्यापुरता ओंबळेचा उल्लेख आला जरूर. पण जगातला एकमेव फ़िदायिन जिहादी पकडण्याचा पराक्रम करताना तुकाराम ओंबळे शहीद झाला, त्याचे कुणाला कौतुकही नव्हते. जणू ओंबळेसारखे पोलिस व उन्नीकृष्णन सारखे सैनिक मरायलाच जन्माला येतात. तेव्हा त्यांच्या कौतुकावर चार शब्द खर्चायची कुणा शहाण्याला गरज वाटली नाही. त्यापेक्षा या लोकांनी पालघरच्या त्या कुणा थिल्लर मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावरच अधिक तोंडाची वाफ़ दवडली. आणि आता उद्या देखील हीच ढोंगी मंडळी २६/११ चे स्मरण म्हणून त्या शहिदांच्या नावाने गळा काढतील. पण शहीद म्हणजे कोण? त्याने देशासाठी, समाजासाठी काय के्लेले असते, त्याचा तपशील कोणीच बोलणार नाही. ओंबळे असो की करकरे असोत, त्यांनी कसाब किंवा त्यांच्या टोळीचा मुकाबला करताना हौतात्म्य पत्करले, असे सांगणे त्यांच्या आत्मसमर्पणाचा अपमान आहे. कधीतरी तशी वेळ येईल असे गृहीत धरूनच ही मंडळी त्या पोलिस खात्यात, सैन्यात वा सुरक्षा दलामाध्ये भरती होत असतात. आणि जिथे तसा प्रसंग ओढवला तिथे आपल्या प्राणाची बाजी लावत असतात. त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्या कामातल्या चुकांची सतत छाननी कोण करत असतो?  

   बारकाईने बघा आणि आठवा. काश्मिर वा आणखी कुठे सैनिकी वा लष्करी कारवाईमध्ये जेव्हा एखादा किंवा अनेक सैनिक मारले जातात, तेव्हा त्यांची नावेही माध्यमातून प्रसिद्ध होत नाहीत. आठ दहा वा पंधरा जवान शहिद, अशी बातमी असते. त्यांची छायाचित्रेही प्रकाशित होत नाहीत. सैनिकी इतमामाने त्यांच्या गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले जातात. तिथल्या स्थानिक वृतपत्रात एखादी बातमी वा छायाचित्र प्रसिद्ध होते आणि मग सर्वकाही विसरले जाते. आजवर कित्येक हजार असे सैनिक पोलिस अशा घातपाती वा जिहादी कारवायांचे बळी झालेले आहेत. त्यांच्या त्या बलिदानावर दरडोई एक मिनिट या हिशोबाने तरी कधी चर्चा वाहिन्यांवर झाल्या आहेत काय? त्यापेक्षा आपण कुठले थेट चित्रण प्रक्षेपित केले, त्यासाठी स्वत:ची पाठ थोपटू्न घेण्याचे काम चालू असते. आणि जेव्हा ते काम नसते; तेव्हा कुठल्या शहरात वा अन्यत्र पोलिसांनी लष्कराने अत्याचार केले, त्याच्या रसभरीत कहाण्या सांगण्य़ात ही मंडळी गर्क असतात. अशावेळी सैनिकी वेशातील जवान वा पोलिसी गणवेशातले पोलिसही माणसे आहेत व त्यांनाही मानवी भावना आहेत. याचे भान बौद्धीक पोपटपंची करणार्‍यांना कधी असते काय? एका छोट्या पालघर नावाच्या शहरात पोलिसांनी एका मुलीला ताब्यात घेण्याची घाई केली; तर अवघ्या पोलिस दलावर ठपका ठेवण्याची स्पर्धाच वाहिन्यांवर चालू होती. त्यावेळी हेच पोलिस दिवसरात्र सुरक्षेसाठी घरदार सोडून जीवाचे रान करतात, याची जाणीव कोणी ठेवायची असते?

   एक विशीतली मुलगी आपल्याला बंदमुळे घरात अडकून पडावे लागले, म्हणुन फ़ेसबुकवर तक्रार करते व अवमानकारक काही लिहिते. तेव्हा लोकभावना प्रक्षुब्ध होण्याचा धोका लक्षात घेऊन तिथले पोलिस तिला ताब्यात घेतात, तर बोंबाबोंब कोणी केली होती? कोणत्या अधिकारात पोलिसांनी तशी कारवाई केली; असा जाब विचारणार्‍यांना चार वर्षापुर्वी अनेक पोलिस अधिकार्‍यांनी नेमका तसाच आगावूपणा केला होता, याचे स्मरण तरी आहे काय? अशोक कामटे, हेमंत करकरे, साळसकर असे अधिकारी आपले कार्यक्षेत्र नसताना आझाद मैदानच्या परिसरात धावत आले आणि त्यांनी ज्या कारवाईत भाग घेतला, त्यांना त्याबद्दल जाब कोण्या शहाण्याने का विचारला नव्हता? तेव्हाही त्यांच्यासह अनेक पोलिसांनी आपल्या नियम व मर्यादांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घातला होता. त्यातच त्यांचा बळी पडला. आपण जे करीत आहोत, ते कायद्याच्या कुठल्या कलमात बसणारे आहे, याचा विचार करायला व कलमांचा अभ्यास करायला तेव्हा सवड नव्हती. ताजमहाल हॉटेलमध्ये तीन हल्लेखोर शस्त्रांसह घुसलेले होते, तिथे अवघ्या सहा गोळ्यांनी भरलेले पिस्तूल घेऊन घुसलेले अधिकारी नांगरे पाटिल यांनी आगावूपणाच केला होता. जीव धोक्यात घालणे हा कायद्यानुसार आगावूपणाच असतो. कमीतकमी जीवितहानी करायचे सुत्र पोलिसांनी पाळायचे असते. आणि त्यात त्यांचाही जीव समाविष्ट असतो. मग चार वर्षापुर्वी त्या प्रत्येक अधिकार्‍याने व पोलिसाने मर्यादाभंग केला होता. कारण त्यावेळी मोकाट सुटलेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून त्यांना मुंबई वाचवायची होती. आणि असे निर्णय घेताना नियम वाचत बसून चालत नाही. साध्य महत्वाचे असते. धोक्याची शक्यता असेल तर धोका टाळ्ण्यासाठी विशेष पावले उचलणे अपरिहार्य असते. नियम व कायदे ज्या हेतूने बनवलेले असतात, ते साधताना नियम आडवे येत असतील तर त्यांनाही बाजूला सारून निर्णय घ्यावे लागतात व कृती करावी लागत असते. ओंबळे असो की करकरे असोत, त्यांनी तेच केले होते. आणि परवा रविवारी नाजूक परिस्थिती असताना पालघरच्या त्या पोलिस अधिकार्‍यांनीही तसेच नियम बाजूला ठेवून निर्णय घेतले आहेत. त्यांनी त्या दोन मुलींना अटक केली असे म्हणतांना त्यामागची हेतू कोणी विचारात घ्यायचा?  

   ज्या जमावाने नंतर तिच्या काकाच्या इस्पितळावर हल्ला केला; तोच जमाव तिच्या घरी गेला असता आणि ती जमावाच्या ताब्यात सापडली असती तर कोणता प्रसंग ओढवला असता? तो कोणी व कसा रोखायचा होता? त्या जमावावर गोळ्या झाडायच्या असे कोणी शहाणा म्हणणार आहे काय? त्यालाही हरकत नाही. मग तेच शहाणे ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदान येथे मोकाट जमाव जाळपोळ करताना पोलिस शांत राहिले; म्हणून कौतुक तरी कशाला करतात? पस्तीस चाळीस हजाराच्या बेफ़ाम जमावाने पोलिसांवरच हल्ला करूनही गोळ्य़ा झाडायच्या नसतील; तर पालघरच्या पोलिसांनी काय करयला हवे होते? आणि तो प्रसंग पालघरपुरता नव्हता. पालघरमध्ये असे काही घडल्याचा सुगावा मुंबईत जमलेल्या पंचविस लाखाच्या जमावाला लागला असता, तर काय प्रसंग ओढवला असता? त्या अफ़ाट जनसमुदायाला पोलिसांनी कसे आवरावे असे या शहाण्यांचे मत आहे? पोलिस एखादी कारवाई का करतात, त्यामागचा हेतू लक्षातच घ्यायचा नाही काय? फ़ेसबुकवर लिहिले यासाठी त्या मुलीला शिक्षा करण्यापेक्षा तिच्याच सुरक्षेसाठी, तिला जमावापासून वाचवण्यासाठी, ताब्यात घेणे अगत्याचे होते. त्यामुळे इस्पितळाची मोडतोड झाली, पण मुलगी बचावली, हे त्यामागचे सत्य आहे. आणि त्याच मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य वा बंदविरोधाबद्दल बोलायचे असेल; तर तिला ताबडतोब काश्मिर वा श्रीनगरला पाठवून द्यावे. तोही प्रदेश भारताचाच अविभाज्य भाग आहे. तिथेही रोजच माणसे मरत असतात आणि काश्मिरचे व्यवहार खुप छान चालू आहेत. जरा तिथले स्वातंत्र्य तिला अनुभवू द्यावे. मग पालघर किंवा मुंबई महाराष्ट्रात बंदसुद्धा किती शांत व सुरक्षित असतो, त्याचा साक्षात्कार ति्ला होऊ शकेल.

   मित्रांनो, रविवारी बंदच्या निमित्ताने या मुलीने जी मुक्ताफ़ळे फ़ेसबुकवर उधळली; ती शिवसेनप्रमुखांचा अवमान आहे असे मला अजिबात वाटत नाही. त्यापेक्षा तो मला सार्वभौम भारताचाच अवमान वाटतो, तेवढेच नाही तर ज्यांनी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नाटक वाहिन्यांवरून रंगवले होते; ते लोक मला चार वर्षापुर्वी कसाबच्या हल्ल्यात बलिदान केलेल्या शहिदांचा अपमान करीत होते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्या व्यक्तीवर कुठलेही सत्तापद न भोगताही सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात, त्याच्याविषयी असे काही लिहिणे; म्हणजे भारतीय सार्वभौमत्वाचाच अवमान असतो. कारण बाळासाहेबांना तिरंग्यामध्ये लपेटून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या प्रसंगाविषयी असे मतप्रदर्शन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर नसतो; तर गैरवापर असतो. कारण चार वर्षापुर्वीसुद्धा ओंबळे, करकरे, कामटे वा साळसकर यांनाही तोच सन्मान देण्यात आला होता. त्या दिवशीच्या व्यवहारावर अशी टिप्पणी मृत व्यक्तीचा अवमान नसतो. तो त्या सन्मानाचाच अवमान असतो. आणि असा अवमान करण्यामागची मनोवृत्ती समजून घेतली पाहिजे. त्या मुलीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा आपल्या कुठल्या स्वातंत्र्याशी काहीही कर्तव्य नव्हते. तिला भारतीय सार्वभौमत्वाचाच अवमान करण्याची इच्छा असावी. आणि म्हणुनच मला त्यात ओंबळे व करकरे इत्यादी शहिदांच्या हौतात्म्याचा अवमान करायची तीव्र इच्छा दिसून येते.

   बाळासाहेब ठाकरे हा विषय बाजूला ठेवा, त्यांच्या मृत्यूच्या निमित्ताने झालेला बंदही बाजूला ठेवा. त्या निमित्ताने व्यक्त झालेली मानसिकता महत्वाची आहे. आणि तिच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे एक गोष्ट विसरून गेले, की ते स्वातंत्र्य पोलिस व प्रशासनच देत असते व राखत असते. करकरे किंवा ओंबळे यांच्यासारखी माणसे त्यासाठीच आत्मसमर्पण करत असतात. पुस्तकात वा कायद्याच्या शब्दात स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याचा उपभोग घेता येत नसतो. तर त्या स्वातंत्र्याच्या जपणूकीसाठी कोणीतरी आपले प्राण पणाला लावायला पुढे सरसावतो, म्हणून ते स्वातंत्र्य शाहीनसारख्या मुलीला उपभोगता येत असते. त्याची खरी किंमत वा मोल समजून घ्यायचे असेल; तर तिने आणि तिच्या समर्थक पत्रकार व बुद्धीमंतांनी काही महिने श्रीनगमध्ये जाऊन वास्तव्य करावे. मग किती हिंडण्याफ़िरण्याचे, मोकळ्या मनाने बोलण्य़ाचे स्वातंत्र्य आहे, त्याचा अनुभव त्यांना घेता येईल. स्वतंत्र भारतातच काश्मिर नावाचा प्रांत व श्रीनगर नावाचे शहर आहे. मग तिथे जाऊन आपल्या स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायला काय हरकत आहे? तिथे लाथा व दगड खाल्ले मग त्यांना पालघर वा मुंबई महाराष्ट्रामध्ये किती अधिक स्वातंत्र्य आहे; त्याचा साक्षात्कार होऊ शकेल. कारण त्यांना स्वातंत्र्य उपभोगता यावे, म्हणून ओबळे वा साळसकर यांच्यासारखे लोक आत्मसमर्पण करायला सिद्ध असतात. ते संपादक, पत्रकार, विचारवंत वा बुद्धीमंत नसतात. ते सामान्य पोलिस वा सैनिक असतात. आणि तेच उपकारावर स्वातंत्र्य उपभोगणारे इतके मुजोर झाले; तर कोण त्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावील?

   उद्याचा दिवस ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्राण वेचले त्यांचे स्मरण करण्याचा आहे. त्यासाठीच दर वर्षी मी २६ नोव्हेंबरला दिवसभर अनवाणी पायांनी चालतो. दिवसभर पायात चप्पल वा काहीच घालत नाही. जे आपल्याला अशक्य वाटते अवघड वाटते, ते करण्य़ाचे साहस त्या शहीदांमध्ये कुठून येते, त्याचा अनुभव घेण्य़ासाठी मी हे व्रत घेतले आहे. पायाला घाण लागेल. एखादा रस्त्यात पडलेला खिळा वा काच, पत्रा लागेल, चिखलात पाय मळतील, अनवाणी बघून लोक काय म्हणतील, अशा किरकोळ गोष्टींना आपण घाबरत असतो. मग प्राण पणाला लावायला किती हिंमत जुळवावी लागत असेल? चार वर्षापुर्वी त्या शहीद अधिकार्‍यांनी ती हिंमत कशी जुळवली, त्याची झलक या एका दिवसाच्या व्रतातून आपण मिळवू शकतो. आपणही काही करू शकतो, आपणही हिंमत जमवू शकतो, याचा साक्षात्कार स्वत:ला करण्याचा मला तो उत्तम मार्ग वाटतो. शिवाय आपण असे वागतो, तेव्हा लोक अचंब्याने विचारतील, तर आपण त्यांनाही त्याचे कारण सांगू लागतो, त्यामुळे बघा आपल्यात कशी उत्तेजना संचारते. लढण्याची व स्वत:च्या आत्मसन्मानसाठी हिंमत करण्याच्या इच्छेची ती सुरूवात असते. अर्थात तो उपचार नाही. ज्यांना मनापासून आपण काहीतरी करावे असे वाटत असेल, त्यांनी जरूर असेच काही करावे. माझे अनुकरण करावे असे मी सांगणार नाही. पण ज्यांना तसे वाटेल त्यांनी जरूर करावे. मात्र तशी ज्याची मनापासून तीव्र इच्छा असायला हवी. केवळ उपचार म्हणून असे काहीही करायची गरज नाही. मेणबत्त्या पेटवण्याइतके हे सोपे काम नाही. इथे आपल्या मनातील तीव्र इच्छा आवश्यक आहे. आपण दुसर्‍या कुणासाठी वा कुणाला आपल्या भावनांचे प्रदर्शन मांडण्यासाठी, असे करायची गरज नाही. ज्यांना आपण स्वत:साठी हे कष्ट व वेदना भोगायच्या आहेत, असे प्रामाणिकपणे वाटत असेल त्यानेच असे काही करावे.

   मित्रांनो, बुधवारी म्हणजे चार दिवस आधीच कसाब फ़ासावर लटकला आहे. तोही आज जिवंत नाही. पण त्याला फ़ासावर लटकवल्याने आपल्या डोक्यावर चढलेले करकरे, ओंबळे, साळसकर, कामठे, उन्नीकृष्णन यांचे ऋण फ़िटलेले नाही. कारण त्यापैकी कोणीही परत त्यांच्या कुटुंबात परत येणार नाही. त्यांच्या कुटुंबाने आपल्या या लाडक्यांना कायमचे गमावले आहे. आज जे हयात आहेत, पण आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावायला अहोरात्र सज्ज असतात, त्यांच्यासाठी आपण काहीच करायचे नाही काय? शेसव्वाशे किंवा हजार पाचशे रुपये देणगीतून त्यांच्या कुटुंबाने जे गमावेले, त्याची भरपाई आपण करू शकतो का? सरकारही त्यांना लाखांची भरपाई देते. आणखी कोणी काही देतात. पण त्यातून हरवलेल्या भावना व गमावलेले सुखाचे क्षण; यांची भरपाई होऊ शकते का? ती फ़ेसबुकवरची शाहीन म्हणते ना, तसे जग चालुच रहाते, माणसे मेल्यावर. तसेच त्या शहीदांचे संसार चालुच आहेत, दैनंदिन व्यवहार त्यांच्याही घरात चालुच आहेत. पण त्यातला एक महत्वाचा घटक तुमच्यामाझ्यासाठी हरवला आहे. जो आपण भरून देऊ शकत नाही, की आणून देऊ शकत नाही त्यांना. पण ज्या लाडक्यांना त्यांनी गमावले, ते केवळ त्यांचेच प्रियजन नव्हते; तर लाखो करोडो भारतीयांचेही प्रियजन होते, अशी जाणीव आपण आपल्या त्या शहीद पोलिस व सैनिकांच्या कुटुंबियांना करून देऊ शकतो ना? त्यांच्यासारखेच जे कोणी शेकडो हजारो पोलिस व सैनिक आजही आपल्यात आहेत व पालघरच्या त्या पोलिसांप्रमाणे धाडसी निर्णय घेऊन कारवाई करतात; त्यांना धीर देणे तर आपल्या हाती आहे ना? आज त्या शहीदांच्या कुटुंबियांप्रमाणेच एकाकी पडलेल्या पालघरच्या पोलिसांना त्यांच्या धाडसासाठी हिंमत देण्याची गरज आहे.

   यावर्षी मी दिवंगत ओंबळे, साळसकर आदी शहीदांच्याच स्मृतीसाठीच नव्हेतर त्यांच्यासारखेच पालघरचे पोलिस व मुंबई-पुण्यात शनिवार ते बुधवार ज्यांनी आपल्या कठोर कर्तव्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून दाखवली; त्यांच्यासाठी पायात काहीही न घालता २६ नोव्हेंबरचा दिवस अनवाणी फ़िरणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गेल्या रविवारी मुलीचे लग्न पुढे ढकलून कायदा सुव्यवस्थेचे कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले, त्याच्याविषयी चार शब्द बोलायचे सोडून ज्यांनी एका मुलीच्या बाष्कळ बडबडीसाठी आपली बुद्धी व शक्ती खर्च केली, त्या वाहिन्या व पत्रकारांच्या निषेधासाठी मी अनवाणी चालणार आहे. कसाब गेला, फ़ासावर लटकला, म्हणून माझे वा तुमचे कर्तव्य संपत नाही. शहीदांच्या कुटुंबियांचे आपण जे देणे लागतो, ते संपत नाही. त्याची स्वत:ला आठवण रहावी म्हणून मी अनवाणी चालणार आहे. उद्या मी पायात चप्पल घालणार नाही. तुम्ही काय करणार आहात?


( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २५/११/१२)

1 टिप्पणी: