रविवार, ८ जुलै, २०१२

सकारात्मक नकारात्मक म्हणजे नेमके काय?


    मंत्रालयाला आग लागली, त्यानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा मंत्रालयातील काम चालू झाले; असा दावा बांधकाममंत्री छगनराव भुजबळ यांनी केला होता. तेवढेच नाहीतर आगीवर प्रश्न विचारण्यापेक्षा काम सुरू झाले, त्याकडे सकारात्मक (पॉझिटिव्ह) नजरेने बघायला शिका, असा सल्ला भुजबळांनी प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांना कॅमेरा समोरच दिला होता. जे काही काम चालू झाले त्याला "मंत्रालय चालू झाले" असेच म्हणायचे असेल; तर जे दोघे त्या आगीत होरपळून, घुसमटून मरण पावले, त्यांच्यासाठी बंद असलेली बारामती देखिल दुसर्‍याच दिवशी चालू झाली होती, असेही म्हणायला हवे. भुजबळाच्या भाषेत बारामतीकरांनी व मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातलगांनीही, बारामती पुन्हा कामाला लागली, याकडे सकारात्मक नजरेने बघायला शिकले पाहिजे. कारण जे विपरित घडले वा नुकसान झाले, त्याबद्दल प्रश्न विचारणे नकारात्मक असेल, तर सकारात्मक म्हणजे काय असाही प्रश्न उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांचे इमानदार दोघे चोपदार, जे कार्यालयाची राखण करताना मेले; त्यांची चिंता करण्यापेक्षा, एवढ्य़ा आगीतून मुख्यमंत्री सुखरूप बचावले, याकडे सकारात्मक नजरेने बघायला हवे ना? ही असली भाषा अलिकडे फ़ार वापरली जाते. मग त्याचा नेमका अर्थ ठाऊक नसतानाही लोक त्या शब्दांचा सर्रास वापर करू लागतात. केलेली टिका किंवा दाखवलेल्या चुका, म्हणजे नकारात्मक दृष्टी; असे लोक बोलू लागतात. कारण सकारात्मक वा नकारात्मक यांचा संदर्भाने अर्थ बदलत असतो, हेच अनेकांना ठाऊक नसते.

   उदाहरणार्थ परवाच्या ’सत्यमेव जयते’मध्ये आमीर खान याने नशापान वा दारूच्या दुष्परिणामांबद्दल टिकेचा सुर लावला होता. त्याला सकारात्मक म्हणायचे की नकारात्मक म्हणायचे? दारूच्या उत्पादन वा विक्रीतून लाखो लोकांना रोजगार मिळतो, सरकारला करोडो रुपयांचे कर उत्पन्न मिळते. त्यातून लाखो लोकांना अनुदान वा आरोग्य सेवा देता येते. मग दारू या विषयाकडे कसे बघायचे? त्यातून येणार्‍या पैशामुळे इतरांना सुविधा मिळतात, म्हणुन त्या उद्योगाचे स्वागत केले, मग तो सकारात्मक विचार झाला काय? आणि दारूमुळे ज्यांचे संसार व आरोग्य-आयुष्य मातीमोल होते, त्याबद्दल बोलणे हा नकारात्मक विचार होतो काय? तसे असेल तर मरणार्‍यांकडे काणाडोळा करून उत्पन्नाकडे बघणे, हा सकारात्मक विचार ठरतो. तोच निकष मग औषध उत्पादनाला लावता येईल. महाग औषधांमुळे कोणाचा जीव जातो, त्यापेक्षा अशा कंपन्यांमध्ये काम करणारे, त्याची विक्री करणारे, त्यातून नफ़ा काढणारे किंवा महाग औषधे परवडल्याने वाचणारे, यांच्या लाभाकडे बघणे व गरीबाच्या हाल अपेष्टांकडे पाठ फ़िरवणेही सकारात्मक ठरू शकते. पण व्यवहारात बघितले तर उलट स्थिती असते. असे शब्द अनेकदा फ़सवे असतात किंवा फ़सवणूक करण्यासाठीच वापरलेले असतात. मंत्रालय तिसर्‍या दिवशी सुरू झाले, याचे कौतुक करायचे, तर झालेल्या नुकसानाकडे पाठ फ़िरवणे योग्य आहे का? त्यात ज्यांनी कामचुकारपणा केला त्यांना माफ़ी दिली जात असते. मग अशी मफ़ी हा सकारात्मक विचार आहे काय? कारण व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते. पण त्याला कोणीच जबाबदार नाही, असाच हा सकारात्मकपणा झाला ना? पण ती शुद्ध फ़सवणूक आहे. तोच खरा नकारात्मक विचार असतो. झाले गेले गंगेला मिळाले, हा नेहमी सकारात्मक विचार नसतो. कुठे, केव्हा व कसे यानुसार एखादी प्रतिक्रिया सकारात्मक व नकारात्मक ठरत असते.

   मी मंत्रालयाच्या आगीसंदर्भात काही लेख सलग लिहिले. आमीर खानच्या ’सत्यमेव जयते’बद्दलही मी सलग काही लेख लिहून त्यातील त्रुटी दाखवायचा प्रयत्न केला होता. त्यात एकेक माहिती व त्यासंबंधातील बातम्यांची उलटतपासणी केली. तर काही वाचकांनी ते लिखाण नकारात्मक आहे, असे मत व्यक्त केले. "पुण्यनगरी"च्याच प्रवाह या रविवार पुरवणीमध्ये मी १० जुन २०१२ रोजी एक लेख लिहिला होता. त्याचे शिर्षक होते, "खलनायकालाच नायक केला तर? त्यात मी आमीरच्या नकारात्मक भूमिकेबद्दल उहापोह केला होता. खाप पंचायती, जात पंचायती असोत, त्यांना समाजासमोर खलनायक म्हणुन पेश करण्यापेक्षा त्यांचीच मदत सुधारणेसाठी घेतली तर, अशी माझी सूचना होती. मी पुढील मुद्दे मांडले होते,

   १) एक गोष्ट मान्य करावी लागेल, की देशाच्या मोठ्या भागात व मोठ्या लोकसंख्येत, आजही अशा जात पंचायती, खाप पंचायती, जमात पंचायती यांचे वर्चस्व आहे. अगदी कायद्यापेक्षा त्यांचा शब्द त्या त्या समाज घटकात प्रमाण मानला जात असतो. जेवढा कायदा व सरकार त्या समाज समुहांवर हुकूमत गाजवू शकत नाहीत, तेवढी या पंचायतींची त्यांच्यावर हुकूमत चालते. त्यांचा शब्द, निवाडे, निर्णय, आदेश मानले जातात. स्विकारले जातात. याचाच अर्थ तिथे आजचे सरकार व कायदे हुकूमत चालवू शकत नाहीत, शासन तोकडे पडते. मग त्यांचाच म्हणजे पंचायतींचा नव्या कायद्याच्या राज्याने सकारात्मक वापर का करून घेऊ नये?
   २) या पंचायती जुने कायदे म्हणजे रिवाज रुढीनुसार चालतात. त्या चालवणारे मुठभरच आहेत. देशभरातले पंचायतीवाले एकत्र केल्यास लाखभर सुद्धा होणार नाहीत. मग त्यांनाच लक्ष्य बनवून त्यांना नव्या कायद्यासाठी प्रशिक्षित करणे, त्यासाठी त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणणे अशक्य आहे काय? स्त्रीभृणूहत्या, मुलींचे शिक्षण, बालविवाह, प्रेमविवाह अशा बाबतीत करोडो लोकांचे प्रबोधन अवघड आहे. पण त्या करोडो लोकांवर प्रभूत्व असलेल्या या मुठभर बुजूर्गाचे मतपरिवर्तन खुप मर्यादित स्वरूपाचे काम आहे.
   ३) जे कळीचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून याच पंचायतीना; मतभेदाचे मुद्दे नाहीत तिथे सामावून घेता येणार नाही का? त्यातून जी जवळीक कायदा प्रशासन व पंचायतीमध्ये तयार होईल, ती त्यांच्यातले मतभेद कमी करून संवादाचा पाया घालू शकेल. तो संवाद दोघांमधे विश्वासाचे बीजारोपण करू शकेल. जेव्हा हे विश्वासाचे वातावरण तयार होते, तेव्हा मतभेदाच्या विषयांना संवादातून संपवता येऊ शकेल. पण तसा प्रयत्नच कधी झालेला नाही.

   याला सकारात्मक मांडणी म्हणतात. कशी ते मी नव्हेतर खुद्द आमीर खानच्या नकळत त्याच्याच "सत्यमेव जयते" कार्यक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे.  २४ जुनच्या ’सत्यमेव जयते’मध्ये आमिरने जैविक किंवा सेंद्रिय शेती हा विषय मांडताना रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांवर उहापोह केला होता. त्यातही त्याने बरेच काही वरवरचे सांगितले हा भाग वेगळा. पण जे सांगितले व दाखवले, त्याचा सकारात्मक परिणाम सामान्य जनतेवर किती झाला ते अजून दिसायचे आहे. पण त्याच सादरीकरणाने आमिरवर आधी चिडलेले खाप पंचायतवाले, त्याच्या जैविक शेतीवर मात्र खुश झाले. ज्यांनी प्रेमविवाह व जातीच्या संबंधातील आमिरचे ऐकून त्याच्यावर बहिष्कार घालण्याची जाहिर भूमिका घेतली होती, तेच खाप पंचायतवाले त्याच आमिरचे जैविक शेतीबाबत अनुकरण करायला निघाले आहेत. म्हणजेच त्यांना खलनायक म्हणुन पेश करणार्‍या आमिरने पुढाकार घेतला नसताना तेच खलनायक (खापवाले) नायक होऊन चांगल्या बाबतीत आमिरचे ऐकायला तयार झाले आहेत. इथे मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. ज्यांनी आमिरच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायची भूमिका घेतली होती, तेच पुढे आले आहेत. त्यांनी आमिर सांगतो त्यातला आपला फ़ायदा ओळखून पुढाकार घेतला आहे. त्याचे महत्व इतक्यासाठीच आहे की खाप पंचायत ही मूळात शेती व्यावसायिकांवर प्रभुत्व गाजवणारी संघटना आहे. त्यांनी फ़तवे काढल्यावर खुन करण्यालाही त्यांचे अनुयायी तयार असतात. तेव्हा त्यांनी पुढाकार घेतला, तर त्यांचे अनुयायी जैविक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळू शकणार आहेत. यात मुद्दा इतक्या ठासून मांडण्याचे श्रेय आमिरला जरुर जाते. पण त्याचा पाठपुरावा आवश्यक असतो. तो कोण करणार आहे? ज्यांना प्रेमविवाह प्रकरणात खलनायक म्हणून पेश करण्यात आले ते खाप पंचायतवाले. जर ते एका बाबतीत असा पुढाकार घेऊ शकतात, तर अन्य बाबतीत का घेणार नाहीत? मुद्दा आहे तो त्यांचा विश्वास संपादन करण्याचा.

   जैविक शेती व रासायनिक शेतीमधला फ़रक त्यांना समजू शकला आणि जैविक शेतीमधले लाभ त्यांना पटू शकले, म्हणूनच ते त्या बदलासाठी पुढाकार घ्यायला तयार झाले. मग त्यांना खलनायक ठरवण्याची घाई न करता त्यांच्याशी मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून संवाद साधला, तर समाज परिवर्तनाच्या कामात त्यांचा सहभाग का मिळणार नाही? जैविक शेतीच्या बाबतीत आमिरने त्यांना जवळ घेऊन समजावलेले नाही. पण त्यांनीच त्याचा कार्यक्रम पाहून त्यातला लाभ ओळखला. अशा मुद्द्यापासून चर्चा सुरू झाली तर संवाद सुरू होतो. त्यातून जी जवळिक निर्माण होते, ती विसंवाद कमी करत असते. मग दोन्ही बाजू एकमेकांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत येतात. हळुहळू एकमेकांविषयी मनात असलेली अढी कमी होते. परिणामी बदलाला पोषक परिस्थिती निर्माण होऊ लागते. अशा संवादाच्या जागा शोधणे, ही सकारात्मक वाटचाल असते. इथे खाप पंचायतवाले बदमाश नाहीत वा जाणीवपुर्वक सत्याकडे पाठ फ़िरवणारे नाहीत. म्हणुनच त्यांनी आमिरच्या कार्यक्रमावर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. पण जेव्हा त्यातही काही घेण्यासारखे आहे, असे  दिसताच त्यांनी आमिरवरचा राग म्हणुन जैविक शेतीच्या विषयाकडे पाठ फ़िरवली नाही. जर त्यांनी तसे केले असते तर तो नकारात्मक पवित्रा झाला असता.

   एखादा माणुस झोपलेला असेल तर त्याला आपण हाका मारून जागा करू पहातो. तरीही जागा होत नसेल तर आपण त्याला हलवून व गदगदा हलवून त्याची झोप उडवू बघतो. पण तरीही जेव्हा माणुस जागा होत नाही तेव्हा काय करायचे? जो खरेच झोपलेला असतो तो एवढ्या प्रयत्नांनी जागा होतो. पण जो जागेपणी झोपेचे सोंग आणत असतो, त्याला अशा प्रयत्नांनी उठवता येत नाही, की जागवता येत नाही. त्याला थप्पड मारून वा अंगावर पाणी ओतून, लाथ मारूनच जागे करावे लागते. अशा लाथ मारण्याला काय म्हणायचे? सकारात्मक की नकारात्मक? समोरचा माणूस कसा वागतो, त्यानुसार अशा गोष्टी व उपाय ठरत असतात. झोपलेल्याला हाका मारून उठवणे सकारात्मक असते. तर झोपेचे सोंग आणणार्‍याला लाथ मारून जागा करणेही सकारात्मक असते. मंत्रालयात आग लागल्यावर वेळीच अग्नीशमन दलाला पाचारण न करणारे व नंतर मंत्रालय भस्मसात झाल्यावर तीन दिवसात मंत्रालयाचे कामकाज सुरू झाल्याचा दावा जे करतात, ते झोपलेले नसतात, तर झोपेचे सोंग आणत असतात. आपल्या नाकर्तेपणातून आग भडकली व पसरली असताना, त्यातून कोणाला वाचवले व कसे मदतकार्य केले, त्याची कौतुके सांगत बसतात, ते झोपेचे सोंग आणत असतात. त्यांच्या त्या कौतुकाला टाळ्य़ा वाजवणे नकारात्मक असते. कारण असे कौतुक त्यांना अधिकच कामचुकार व बेजबाबदार बनवत असते. उलट त्यांच्या त्या लबाडी व बेशरमपणाला जागच्या जागी चपराक मारणे ही सकारात्मक कृती असते. भुजबळ पॉझिटिव्ह विचार करायला सांगतात, तेव्हा ते नकारात्मक व्हा असेच सुचवत असतात. त्यांच्या विधानाचा अर्थ काय होतो?

   कसाब आपल्या साथीदारांसह इथे आला असेल. त्यांनी पावणे दोनशे निरपराधांचा जीव घेतला असेल. हजारो लोक जखमी झाले असतील. शेकडो अनाथ व उध्वस्त झाले असतील. पण दोनच दिवसात मुंबई पुन्हा कार्यमग्न झाली ना? मग सर्वकाही विसरून जा. मरणारे मरण्यासाठीच जन्माला आले होते. आगीत जळून मेले ते होरपळण्यासाठीच जन्मले होते. ज्यांचे नुकसान झाले, ते तसेच कर्मदरिद्री होते. त्यांच्या वेदना, यातना, दु:ख, दैन्य, दुर्दशा, आक्रोश, उध्वस्तता यांचा विचार करणे, त्याबद्दल बोलणे वा विचारणे, भुजबळांच्या भाषेत नकारात्मकता असते. जे वाचले किंवा सुदैवाने सुटले, त्यांचा विचार करा, म्हणजे सकारात्मक होय, असेच भुजबळांना म्हणायचे आहे. त्याच नियमाने काही वर्षापुर्वी सलमान खानच्या भरधाव गाडीखाली चिरडून मेले, त्यांच्या हक्काचे वा न्यायासाठी बोलणे नकारात्मक असते. त्यापेक्षा सलमानचे कुठले चित्रपट गाजले व चालले, त्याबद्दल बोलणे सकारात्मक असते. त्याच्या चित्रपटातले मुन्नी गीत गाजले, त्यावर बोलणे सकारात्मक असते. असेच भुजबळांचे तत्वज्ञान नाही काय? जे नुकसान झाले वा ज्याच्यामुळे झाले, त्यावर न बोलता, त्यातून बचावले काय, त्यावर बोलणे सकारात्मक असते, असा हा नवा शोध आहे. एकदा आपण त्या मार्गाने वाटचाल सुरू केली मग नुकसान, हानी, इजा, अपाय, अपघात, घातपात, समस्या, अड्चणी यातले काहीच शिल्लक रहात नाही. जे राहिले ते आपले. जे गेले ते गंगेला मिळाले. चिंता कशाची म्हणुन नाही. पुर्वीच्या काळात लोक अशा विचारसरणीला नकारात्मक म्हणायचे. आज त्याच नकारात्मकतेला आधुनिक बुद्धीमंत छगनराव भुजबळांनी सकारात्मक करून टाकले आहे. याला क्रांती म्हणतात.

   पुर्वी लोक नशीबावर हवाला ठेवून जगायचे. इश्वरेच्छा बलियसी, ठेविले अनंते तैसेची रहावे. म्हणजेच जे बरेवाईट होईल त्याबद्दल तक्रार करायची नाही, अशी जी वृत्ती होती, तिला उदासिनता म्हणायचे. त्यालाच भुजबळ सकारात्मक विचार म्हणत आहेत. आपले नशीब म्हणायचे, त्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था नाही. नाहीतर बलात्कार झालेल्या स्त्रीया मुलींना त्यांनी हाच सल्ला दिला असता. "अहो, बलात्कार झाला म्हणुन काय ओरडत बसलात. बलात्कार करणार्‍याने मुलीला ठार मारले नाही. ती जिवंत आहे ना? ती जमेची बाजू नाही का? मग बलात्कारिता जिवंत आहे ह्याकडे बघा. पॉझिटिव्ह विचार करा", असेच त्या महिलेला भुजबळ म्हणाले असते ना? दरोड्यात घरदार लुटले गेल्यावर जिवंत आहात तेच नशीब समजा; असेच भुजबळ म्हणतील ना? भुजबळांची ही सकारात्मकता आजच्या सत्ताधार्‍यांचे धोरण बनली आहे. म्हणुनच मंत्रालयाला आग लागो किंवा कसाब टोळीने शेकडो लोकांचे मुडदे पाडो. आजचे सरकार त्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघत असते. किती मेले? त्यांना पाचसात लाख रुपये भरपाई देऊन टाका. मग घरातले कोण मेले, कोण गमावले; त्यापेक्षा त्यांनी त्यामुळे किती लाख घरात आले त्याचाच सकारात्मक विचार करावा; असे एकूण धोरण आहे. मात्र या नव्या सकारात्मकतेमुळे आपण आयुष्याकडेच नकारात्मक होऊन बघू लागलो आहोत. दोन्हीतला फ़रकच लोकांना कळेनासा झाला आहे. त्याचेच भव्य टोलेजंग गगनचुंबी स्मारक आज आदर्श सोसायटी म्हणून उभे राहिले आहे. पण त्याकडे कोणी सकारात्मक नजरेने बघत नाही हेच भुजबळांचे दुर्दैव आहे.

   कोणी कसले नियम धाब्यावर बसवून आदर्श सोसायटीला भूखंड दिला, त्याचे चटईक्षेत्र वाढवून दिले, मजले वाढवण्याचे परवाने दिले, त्यावर काहुर माजवण्यात आले आहे. तो नकारात्मक दृष्टीकोन आहे ना? इवल्या जागेवर इतकी उंच इमारत उभी केली, त्याचे कुणाला कौतुकच नाही. इतक्या लोकांना त्यात सामावून घेतले त्याची कदर नाही. जिथे नियमानुसार दहा मजली इमारत बांधणे अशक्य आहे, तिथे पस्तीस चाळीस मजले उभे करण्यातला पराक्रम बघायचे सोडून नियम मोडले बोलायचे आणि इमारत उभी केली, त्याकडे काणाडोळा करायचा; हा नकारात्मक दृष्टीकोन नाही तर काय? माझ्यासारख्या काही लोकांचे दुर्दैव असे, की भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात स्वत:ची नॉलेज सिटी उभारण्यापुर्वीच आमचे शिक्षण घेण्याचे वय संपुन गेले होते. मुंबईतल्या पालिका शाळेत आमचे शिक्षण झाले. त्यामुळे आमाच्यासारख्यांना भुजबळांकडून सकारात्मकतेचे धडे गिरवण्याची संधीच मिळाली नाही. ज्यांच्या नावाची जपमाळ ओढत भुजबळांनी इतकी सकारात्मक प्रगती केली, त्या जोतीराव फ़ुल्यांनाही भुजबळ नॉलेजपासून वंचित रहावे लागले. म्हणुनच त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धडे सामान्य माणसाला देऊन (छगनरावांच्या भाषेतली) नकारात्मकता त्याला शिकवली म्हणायची. "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा भुजबळ गुरूमंत्र जोतीरावांना मिळाला असता, तर आजवर किती सकारात्मक प्रगती समाज करू शकला असता ना? एकूणच भारतीय समाजाचे दुर्दैव म्हणायचे, की छागनराव दोन शतके उशीरा जन्माला आले.

   असो, आपल्याला भुजबळ नॉलेज सि्टीमधल्या शिक्षणाची फ़ी परवडणारी नाही. तेव्हा आपण त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनापासून दुर राहिलेले बरे. त्यापेक्षा जोतीरावांनी दिडशे वर्षापुर्वी जो शिकवला तो अन्यायाविरुद्ध लढण्याचा व त्यासाठी आवाज उठवण्याचा गुरूमंत्र जीवापाड जपण्यातच आपले भले आहे. भुजबळाच्या सत्यरोधक समाजाचे घटक होण्यापेक्षा जोतीरावांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी रहाणे, आपल्याला परवडणारे आहे. त्यासाठी नुसते भुजबळांपासूनच नव्हेतर त्यांच्या सकारात्मक भूमिकेपासूनही दुर राहिलो, तरी आपण आयुष्यात अधिक सकारात्मक जीवन जगू शकणार आहोत. कारण जोतीरावांनी समस्येकडे पाठ फ़िरवायला शिकवले नव्हते. समस्येला जाऊन भिडण्याला सकारात्मक मानले होते. सत्य सांगण्याला व बोलण्याला सकारात्मक मानले होते. कितीही कटू असले तरी सत्याला सामोरे जाण्यातच सकारात्मकता असते. त्याकडे पाठ फ़िरवणे ही नकारात्मकता असते.
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी ८/७/१२ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा