बुधवार, १३ जून, २०१२

खलनायकालाच नायक केला तर?


   आमिर जे करतोय ते ग्रेट आहे. आपण आपली निगेटिव्ह थिंकिंग चेंज करावी. दोन मुलींचे प्राण वाचले, दोन पालक जरी बाल शोषणाबद्दल जागरुक झाले तरी खुप झाले. कोटींचे भ्रष्टाचार चालतात मग आमिरचा सत्यमेव जयते तर सामाजिक समस्या दाखवतोय. पुन्हा सत्यमेव जयतेबद्द्ल काही छान लिहायचा प्रयत्न करावा.

   एका वाचकाने मला हा मेसेज बुधवारी पाठवला. आमिरच्या मालिकेतील व त्याच्या विषयांच्या मांडणीतल्या चुका किंवा मी दोष दाखवले, ते या वाचकाला आवडलेले नाहीत. त्याला मी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करतो असे वाटले. मग त्याने आमिरचे समर्थन करताना काय युक्तीवाद केला आहे? दोन मुलींचे प्राण वाचले किंवा दोन पालक जरी बालशोषणाबद्दल जागरुक झाले तरी खुप झाले. याचा अर्थ असा, की दोन मुली वा दोन पालकांना जागरुक करण्यासाठी आमिरने कोट्यवधी रुपयांचा मोबदला घेतला तरी हरकत नाही. मी त्या वाचकाचा युक्तीवाद मान्य करतो. किती मरतात वा किती बालकांचे शोषण चालूच राहिल, त्याची फ़िकीर नाही. अवघ्या दोन मुली वाचल्या वा दोन पालकांमध्ये बदल झाला तरी पुरेसा आहे. बदल किती मोठा वा किती व्यापक याला महत्व नाही. असेच या अमिर समर्थकाला सुचवायचे आहे ना? हरकत नाही. अमिरच्या चुका मी दाखवल्या तर मी नकारात्मक विचार करात असेन तर आमिर तरी काय करतो आहे? महागडी औषधे का होईनात, ती निर्माण करून शेकडो रोग्यांचे जीव औषध कंपन्या वाचवत आहेत ना? ते करताना लाखो करोडो लोक गरीबीमुळे औषधाविना मेले म्हणून काय बिघडले? मग ती औषधे महागडी असल्याचा नकारात्मक विचार आमिर तरी का करतो? दोन रोगी वाचले तरी खुप झाले ना? सर्वांना कशाला औषधे हवीत? महागाचा विचारच करू नये. सर्वांचा विचारच करू नये. जे दिसते त्यातल्या फ़क्त चांगल्याकडेच बघायचे असेल, तर ते मीच करायला हवे आणि आमिर मात्र दुसर्‍यांच्या चुका शोधणार वा दोष शोधणार कशाला? त्यात कुठली सकारात्मकता आहे?

   पण या अमिरभक्ताला मी दोष देत नाही. त्याने मला एक नवा विषय सुचवला आणि प्रतिकुल परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने कसे बघावे व उपाय शोधावा, त्यासाठी या अमिरभक्त वाचकाने मला प्रवृत्त केले, हे मी नाकारणार नाही. मी नकारात्मक विचार करत नसून आमिर कसा फ़क्त नकारात्मक बाजू मांडतो आहे, त्याचा मी विचार या वाचकामुळेच करू शकलो. त्याच्यामुळेच या संबंधातली एक सत्यकथा मला आठवली. खरे तर त्या कथेवर हॉलिवूडने एक चांगला चित्रपट काढला आहे. CATCH  ME  IF  YOU  CAN   अशा नावाचा तो चित्रपट आहे. शक्य असेल तर मला पकडून दाखव, असा त्याचा अर्थ होतो. टॉम हॅंक्स व लिओनार्दो दिकॅप्रिओ यांनी त्यातल्या प्रमुख भूमिका केल्या आहेत. एक तरूण होतकरू मुलगा असतो. त्याला वैमानिक होण्याची, ऐषारामी जीवन जगायची महत्वाकांक्षा असते, पण तो वाईट मार्गाला लागतो. फ़्रॉड करतो, चेक बदलून भामटेगिरी करतो. तोतयेगिरी करतो. मग त्यात आरंभी यश मिळाल्यावर त्याला त्याची चटकच लागते. पुढे पैसेच नव्हे, तर आपण पोलिस व कायद्याला टांग मारतो; याचीच त्याला नशा चढते. पोलिस व एफ़बीआय त्याच्या मागावर असतात. शेवटी तो पकडला जातो. कोर्टात त्याच्यावर गुन्हा सिद्ध होतो. त्याला कित्येक वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा होते. पण दिर्घकाळ  त्याच्या मागावर असलेला व त्याला अखेरीस पकडणारा टॉम हॅंक्स, ( आमिरसारखा खलनायक रंगवणारा) निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार करणारा नसतो. तो त्या गुहेगाराचे दोष व गुन्हेच कोर्टासमोर आणत नाही, तर त्याला सुधारण्याचाही सकारात्मक विचार करतो. जो गुन्हेगार आहे त्याच्या गुन्हेगारी कौशल्याचा समाजोपयोगी उपयोग करण्याचा पर्याय तो अधिकारी शोधून काढतो. त्याला सकारात्मक विचार म्हणतात.

   टॉम कोर्टाला विनंती करतो, की शिक्षेच्या बदल्यात त्या आरोपीने एफ़बीआयला मदत करण्याचा आदेश द्यावा. आणि कोर्ट त्याला मान्यता देते. ज्याने सरकार व बॅन्कांना सळो की पळो करून सो्डलेले असते, तोच मग अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यात एफ़बीआयला बहूमोलाची मदत करतो. शेकडो गुंतागुंतीची प्रकरणे तो उलगडून देतोच. पण ज्याचे फ़्रॉड करता येणार नाहीत, असे चेक डिझाईन करण्यात त्याचाच हातभार लागतो. ही सत्यकथा आहे. पुढे त्याला पकडणारा व तो गुन्हेगार आयुष्यभराचे जीवाभावाचे मित्र होऊन जातात. मुद्दा आहे तो त्याच्या कौशल्याचा, गुणांचा समाजासाठी सदुपयोग करण्याचा. गुन्हेगार म्हणुन त्याला शिक्षापात्र ठरवणे, ही नकारात्मकता असते. पण तो हाती लागल्यावर त्यालाच कायद्याच्या बाजूने उभा करून कायद्याचे हात मजबूत करणे, ही सकारात्मकता असते. ती कुठे आमिरच्या कार्यक्रमात दिसते काय?

   मागल्या रविवारी आमिरने प्रेमविवाह व प्रेमात पडणे किंवा अशा प्रेमविवाहांना कुटुंब, समाजाकडुन जो विरोध होतो, त्या संबंधाने आख्यान लावले होते. त्यात एकाच बाजूने विषय मांडला अशी तक्रार नको, म्हणून हरयाणातील खाप पंचायतीच्या काही सदस्यांना आमंत्रित केले होते. मात्र त्यांची बाजू ऐकून व समजून घेण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडवण्यासाठीच त्यांना आमंत्रित केले होते हे लपले नाही. आमिरने देशाच्या घटनेबद्दल विचारले असता त्यातल्या एका बुजुर्गाने ब्रिटनची घटना लिहिलेली नाही तर जुन्या पायंड्याच्या आधारे देश चालतो, असा नेमका मुद्दा मांडला होता. तर थिल्लरपणे आमिरने, आप ब्रिटनका संविधान मानते है, अशी त्याची टवाळी केली. शिवाय या देशाचे कायदे वा संविधानात आमच्या पंचायतीला कुठलेही अधिकार नाहीत, असे ते पंचायतवाले अत्यंत गंभीरपणे सांगत होते. तेवढेच नाही एकाने तर अत्यंत गंभीर मुद्दा मांडला. आजच्या कोर्टात न्याय मिळत नाही तर जजमेन्ट दिले जाते असे दुखणे सांगितले. ते समजून घेणे अगत्याचे होते. ज्याला समस्या सोडवायची असते, त्याने दुसर्‍या बाजूची टवाळी करण्यापेक्षा ती बाजू समजून घेणे व समस्येवर उपाय शोधण्याला प्राधान्य द्यायला हवे असते. इथे आमिरने खाप पंचायती हीच समस्या असल्याचे सुचित केले. नेहमी असेच होत असते. पण ज्याला आपण समस्या म्हणतो, तोच उपाय होऊच शकत नाही काय? त्या एफ़बीआय एजंटने अफ़रातफ़रीच्या समस्येलाच उपाय बनवले नव्हते का? मग आपल्याकडल्या या कालबाह्य झालेल्या वाटतात त्या पंचायतींना समस्या समजण्यापेक्षा त्यांनाच उपाय बनवण्याचा प्रयत्न का करू नये?

   एक गोष्ट मान्य करावी लागेल, की देशाच्या मोठ्या भागात व मोठ्या लोकसंख्येत, आजही अशा जात पंचायती, खाप पंचायती, जमात पंचायती यांचे वर्चस्व आहे. अगदी कायद्यापेक्षा त्यांचा शब्द त्या त्या समाज घटकात प्रमाण मानला जात असतो. जेवढा कायदा व सरकार त्या समाज समुहांवर हुकूमत गाजवू शकत नाहीत, तेवढी या पंचायतींची त्यांच्यावर हुकूमत चालते. त्यांचा शब्द, निवाडे, निर्णय, आदेश मानले जातात. स्विकारले जातात. याचाच अर्थ तिथे आजचे सरकार व कायदे हुकूमत चालवू शकत नाहीत, शासन तोकडे पडते. मग त्यांचाच नव्या कायद्याच्या राज्याने सकारात्मक वापर का करून घेऊ नये? पेशवाई बुडाली व मराठेशाही त्यातून संपुष्टात आल्यावर जी ब्रिटीश हुकूमत महाराष्ट्रात प्रस्थापित झाली, तेव्हा तिची सत्तासुत्रे हाती घेणार्‍या सर एल्फ़िन्स्टन याने कारभार सुरळीत चालावा, म्हणून मराठेशाहीत जी महसुली पद्धती कार्यरत होती; ती तशीच पुढला काही काळ कायम ठेवली होती. अगदी तत्पुर्वी उत्तरेत व दक्षीणेत नवी ब्रिटीश महसुल पद्धती कार्यरत झाली असतानाही, याने जुनीच पद्धती आपल्या अधिकारक्षेत्रात कायम राखली. कारण ती सत्ता राबवायला सुटसुटीत होती. शिवाय त्यासाठी तातडीने नवी यंत्रणा उभारावी लागली नाही. कारभार सुरळीत होऊ शकला. आजही जर समाजाच्या मोठ्या भागावर पंचायतींची हुकूमत चालत असेल, तर शासनाने त्यांचाच वापर आपले धोरण, योजना, कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी का करून घेऊ नये?

   पंचायतीची हुकूमत गावात व समाजात आहे, याचा अर्थ त्यांचा त्या लोकसंख्येला धाक आहे. ते काय कारवाई करतील, याचा धाकच हुकूमत निर्माण करत असतो. पंचायतीने फ़तवा काढला मग त्या व्यक्ती वा कुटुंबावर बहिष्कार घातला जातो. कधी तर त्यांना वस्ती गावातून हाकलून दिले जाते. तसे होईल याचे भय त्या पंचायतीची हुकूमत निर्माण करत असते. पण तेवढी हुकूमत वा धाक आजच्या प्रस्थापित कायद्याने निर्मा्ण केलेला नाही. कारण आजचा प्रचलित कायदा शिक्षा देईल, दंडीत करील याची कोणालाच भिती वाटत नाही. म्हणुन कायदा कागदावर रहातो आणि पंचायतीची हुकूमत चालते. मग त्याच पंचायतींकडून नव्या कायद्याचा अंमल करून घेण्यात काय अडचण आहे? या पंचायती जुने कायदे म्हणजे रिवाज रुढीनुसार चालतात. त्या चालवणारे मुठभरच आहेत. देशभरातले पंचायतीवाले एकत्र केल्यास लाखभर सुद्धा होणार नाहीत. मग त्यांनाच लक्ष्य बनवून त्यांना नव्या कायद्यासाठी प्रशिक्षित करणे, त्यासाठी त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणणे अशक्य आहे काय? स्त्रीभृणूहत्या, मुलींचे शिक्षण, बालविवाह, प्रेमविवाह अशा बाबतीत करोडो लोकांचे प्रबोधन अवघड आहे. पण त्या करोडो लोकांवर प्रभूत्व असलेल्या या मुठभर बुजूर्गाचे मतपरिवर्तन खुप मर्यादित स्वरूपाचे काम आहे. गावातील, वस्तीमधील तंटे सोडवण्याचे काम त्यांनीच केले व नव्या कायद्यानुसार केले, तर आजच्या न्यायव्यवस्थेवरील बोजाही कमी होऊ शकतो. शिवाय पंचायतीचे बुजूर्गच सांगतात, तेव्हा त्याला विरोध करण्याची कुवत व हिंमत त्या त्या समाज घटकात शिल्लक उरत नाही.

   त्या एफ़बीआय एजंटने जसा त्या तोतया भामट्याला पकडला, पण त्याच्यातले कौशल्य, गुणवत्ता नाकारली नाही. उलट त्याचे कौशल्यच कायद्याच्या बाजूला आणून उभे केले. आपण तेच पंचायतीच्या बाबतीत करू शकणार नाही काय? मुद्दा जुन्या रुढींपासून मुक्त होण्याचा आहे. ते काम ज्यांच्याकडून सोप्या मार्गाने व सहजगत्या होऊ शकते, त्यांचीच त्यात मदत घेण्यात काय वावगे आहे? शिवाय ज्यांना आज आपण बेकायदा हुकूमत गाजवणारे म्हणतो, त्यांच्याच हुकूमतीला कायद्याचे थोडे संरक्षण मिळाले, तर तेही नव्या कायद्याच्या बाजूने उभे राहू शकतील. सवाल आहे तो तसे प्रयत्न करण्याचा. पण तसे सकारात्मक प्रयत्न होत नाहीत. त्यापेक्षा त्याच पंचायतीशी संघर्षाची भूमिका घेतली जाते. जणु त्या पंचायती व त्यांची रुढीप्रियता यांना शत्रू ठरवण्याला आपण हेतू ठरवून बसलो आहोत. आपल्याला जुन्या रुढीपरंपरा नष्ट करण्यापेक्षा त्या पंचायतींना खलनायाक ठरवण्यात अधिक रस आहे का? नवे कायदे, धोरणे, योजना त्या त्या समाज घटकाच्या हितसंबंधाना बाधा आणणार्‍या नसून, त्यांचा अवलंब त्यांच्याच कल्याणाच्या वाटा खुल्या करणार आहे; हे बुजूर्गांना पटवणे अशक्य आहे काय? मला तसे वाटत नाही. शक्य खुप गोष्टी आहेत. पण त्यासाठी समोर आहेत त्यांना शत्रू मानण्यापेक्षा चुकलेले मानून सोबत घेण्याची भूमिका आवश्यक आहे. नुसते तेवढेच नाही. त्यासाठी संवाद आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर पाच सहा दशकात असा संवाद साधण्यापेक्षा त्यांच्याशी कायद्याने संघर्षाचाच पवित्रा घेतला, शत्रूत्व जोपासले. त्याचे दुष्परिणाम होत राहिले आहेत. काही बाबतीत तर शत्रूत्व विकोपास गेलेले दिसते. त्यातून काय साधले?

   कायद्याच्या कठोर अंमलाने आणखी शेकडो लोकांना शिक्षा देता येतील. पण तेवढ्य़ासाठी गुन्हे घडतच राहिले पाहिजेत काय? मुली जाळल्या गेल्या पाहिजेत काय? प्रेमविवाह करणार्‍यानी छळ सोसलाच पाहिजे काय? ती वेळच येऊ नये असे काहीच शक्य नाही काय? ह्या सर्व नवेपणात बुजूर्ग पंचायतवाल्यांनी पुढाकार घेतला तर काम किती सोपे होऊन जाईल ना? पोलिस व न्यायव्यवस्थेवरचा भार किती कमी होऊन जाईल? पण ते करायचे असेल तर आधी यातला पेच समजून घेतला पाहिजे. हे बदल वा सुधारणा किंवा त्यांना पोषक कायदे; आपल्या आयुष्यात व खाजगी जीवनात ढवळाढवळ व हस्तक्षेप करतात, अशी एक धारणा तयार झालेली आहे. तिला दोन्ही  बाजूसारख्याच जबाबदार आहेत. जे बदल सुधारणा व कायदे सरकार तयार करते त्याबाबत सामान्य माणसाला कधीच विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे कायदे व निर्णय आपल्यावर लादले जातात, अशी भावना होते. ती त्या त्या समाज घटकाला आपल्या खाजगी वा समाजजीवनात हस्तक्षेप आहे असेच वाटते. मग विरोध सुरू होतो. तो का होतो ते कधी समजूनच घ्यायचे नाही का?

   पंचवीस वर्षापुर्वी शहाबानू खटल्याचा निकाल लागला तेव्हा देशभरच्या मुस्लिम संघटना व मुस्लिम संप्रदायांनी त्याचा कसून विरोध केला होता. एका वृद्ध महिलेच्या विरोधात इतक्या संघटना व करोडोच्या संख्येने मुस्लिम उभे राहिले, तर का राहिले, याचा थोडा शांत डोक्याने विचार करायचा नाही का? मुस्लिम म्हणून त्या समाज घटकाची एक ओळख असते. ती ओ्ळख जपणार्‍या समुदायाला समाज किंवा जमात म्हणतात. त्यांचे म्होरकेपण करणार्‍यांना पंचायत म्हणतात. कधी ती ओळख मराठी म्हणून असते, कधी ती मुस्लिम म्हणून असते, कधी ती मुस्लिमातील शिया किंवा सुन्नी अशी पंथीक असते. कधी ती भटके विमुक्त म्हणून असते, तर कधी आदिवासी म्हणुन असते. ती ओळख हा त्या त्या समाज समुहाच्या जगण्याचा मुलभूत आधार असतो. त्यातूनच त्यांच्या चालीरिती, रिवाज परंपरा उदयास आलेल्या असतात. मग त्यांची जपणूक, जोपासना म्हणजेच त्या समूदायाची ओळख बनून जाते. तिला धक्का लागला म्हणजे आपल्या ओळख वा अस्तित्वालाच उखडून टाकण्याचा प्रयत्न, अशी त्यांची धारणा होते. म्हणूनच अशा ओळखीला धक्का लागतो अशी समजूत होण्याआधीच शंकानिरसन आवश्यक व उपयुक्त असते. त्याऐवजी त्यांची माथी भडकतील वा प्रक्षोभ निर्माण होईल असाच सुधारणावाद्यांचा पवित्रा असतो. नव्यासाठी जुन्याची टवाळी करणे, त्यांची खिल्ली उडवणे, त्यांना शत्रू ठरवणे ही नकारात्मक भूमिका पुढले दुष्परिणाम घेऊन येते. त्यावरचा उपाय म्हणजे सुधारणा व नवे कायदे लादण्यापेक्षा समाजाच्या म्होरक्यांना विश्वासात घेऊन, त्यांचीच मदत त्या बदलासाठी मिळवणे होय. असा एकतरी प्रयत्न झाला आहे काय? परवा प्रेमविवाहाचे गोडवे गाताना आमिरनेही त्या खाप पंचायतवाल्यांची खिल्ली उडवण्याचा थिल्लरपणा केला. अशा कार्यक्रम वा माध्यमातून सुरक्षित जागी त्यांची टवाळी सोपी असेल. पण जिथे प्रत्यक्ष समुह जीवन जगले जात असते, तिथे ती सुरक्षितता नसते. तिथे त्यांची खिल्ली उडवता येत नसते. कारण तिथे त्यांचीच हुकूमत व कायदा चालत असतो. आपण ज्यावर चर्चा करतो ते त्याचेच परिणाम असतात. अशी खिल्ली ऊडवून वा टवाळी करून त्या भीषण परिणामांपासून सुटका आहे काय?

   घटणारी मुलींची संख्या, बाल शोषण, जगण्यातल्या अनेक समस्या यांच्या सोडवणुकीसाठी त्या त्या समुदायाच्या पंचायतीची मदत किती लाभदायक ठरू शकते? जे कळीचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून याच पंचायतीना; मतभेदाचे मुद्दे नाहीत तिथे सामावून घेता येणार नाही का? त्यातून जी जवळीक कायदा प्रशासन व पंचायतीमध्ये तयार होईल, ती त्यांच्यातले मतभेद कमी करून संवाद पाया घालू शकेल. तो संवाद दोघांमधे विश्वासाचे बीजारोपण करू शकेल. जेव्हा हे विश्वासाचे वातावरण तयार होते, तेव्हा मतभेदाच्या विषयांना संवादातून संपवता येऊ शकेल. पण तसा प्रयत्नच कधी झालेला नाही. पुर्वापार चालत आलेल्या या पंचायतींना कायदाबाह्य ठरवण्य़ाच्या उफ़राट्या भूमिकेने दोन्ही समाज नियंत्रक घटकांमध्ये शत्रूत्वाचे बीज रोवले आहे. मग कायद्याचे प्रशासन पंचायतींना संपवण्याच्या भूमिकेत असते आणि पंचायती कायद्याला आव्हान देण्याच्या पवित्र्यात असतात. मधल्यामध्ये सामान्य माणुस मात्र भरडला जात असतो. त्यासाठी जुन्या मानसिकतेच्या पंचायतींना मी दोष देणार नाही. दोष आहे तो नव्या शासन यंत्रणेच्या अरेरावी वृत्तीचा आणि त्या कायद्याच्या लादण्य़ानेच समाजबदल शक्य आहे, अशा भ्रामक समजुतीत वावरणार्‍यांचा. कारण या कायदा शासनाची भूमिकाच नकारात्मक आहे. जे सोबत येऊ शकतील त्यांना शत्रू ठरवून संघर्षाचा पवित्रा घेतला तर दुसरे काय होणार?

   ज्या वाचकाने मला आमिरबद्दल नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक बाजू मांडायला सांगितले त्याला नकारात्मक कोण आहे, एवढे कळले तरी भरून पावले. अमिर मांडतो ते प्रश्न नवे नाहीत, त्याने अशा विषयात लक्ष घातल्याने त्या समस्यांना नव्याने उजाळा मिळाला, हे कोणी नाकारू शकणार नाही. मग मी कशाला नाकारू? पण सवाल आहे तो समस्येच्या मांडणीचा नसून समस्या सुटण्याचा आहे. त्यासाठी कोणाला तरी खलनायक म्हणून रंगवून समस्या सुटणार नाही. आमिर त्यातला नायक म्हणजे हिरो जरूर ठरेल. किंबहूना ठरतोच आहे. त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. हिरो म्हणून आपली इमेज लोकमानसात उभी करणे, हा त्याचा धंदाच आहे. पण जी मालिका तो सादर करतो आहे, तो चित्रपट वा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून गंभीर प्रश्नांचा उहापोह आहे, असे त्यानेच पहिल्या दिवसापासून म्हटले आहे. तेव्हा त्यातून प्रश्न समस्या कितीशा सुटणार याची तपासणी करणे नकारात्मक कसे ठरू शकते?
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी १०/६/१२ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा