मंगळवार, १ मे, २०१२

लोकांचा अण्णांवरील विश्वास उडतो आहे का?


   "ससुराल गेंदा फ़ुल" नावाची एक हिंदी मालिका आहे. स्टारवाहिन्यांवर कधीतरी मी चुकून बघत असतो. त्यातला एक भाग पाहिलेला आठवतो. सुहाना नावाची एक श्रीमंत घरातली मुलगी कश्यप नामक मध्यमवर्गिय कुटुंबात सुन म्हणुन येते. ती अतिशय निरागस स्वभावाची आहे. बागेत सापडलेले मुल ती घरी घेऊन येते आणि तिच्या आग्रहाखातर घरवाले मुल ठेवून घेतात. सगळ्यांना त्या बाळाचा लळा लागतो. त्या बालिकेचे नाव खुशी ठेवतात. एकदा कोणी तरी त्या बाळावर दावा सांगायला येतात. पण हे त्यांचे मुल नसल्याने संकट टळते. मग एकदा सुहानाचा दीर इंदर आपल्या बॉसला घरी जेवायला बोलावतो. तो बॉस कश्यपका घर ऐवजी खुशीका घर अशी चौकशी करत पत्नीसह त्याच परिसरात घोटाळताना सुहानाला भेटतो. तिला वाटते, हे नवे दावेदार खुशी या बालिकेला न्यायला आलेत. तेव्हा ती मुद्दाम त्यांना इतक्या चुकीच्या खाणाखुणा सांगते, की ते भलतीकडेच भरकटत जातात. इकडे सुहाना घरी येऊन आपण केलेला पराक्रम सर्वांना सांगते. तर घरची मंडळी ईंदरचा बॉस अजून घरी पोहोचला नाही, म्हणून चिंताक्रांत असतात. मग इंदर शेवटी बॉसला फ़ोन लावून विचारणा करतो. तेव्हा कश्यप कुटुंबियांच्या लक्षात येते, की आमंत्रित पाहुण्यांना सुहानानेच भलतीकडे भरकटत पाठवलेले असते.

   त्या कथेतल्या सुहानाचा हेतू भले चांगला असेल. पण तिने जाणीवपुर्वक इंदरच्या बॉसला भलतीकडे पाठवलेले असते. शिवाय तिने गैरसमजातून त्यांची अशी दिशाभूल केलेली असते. बोलताना व खाणाखुणा सांगताना ती त्यांना मदत केल्याचा आव आणत असते. पण प्रत्यक्षात ती त्यांची बेछुट फ़सवणूक करत असते. त्यांना आपल्याच म्हणजे कश्यप कुटुंबाच्या घरी जायचे आहे व ते अगदी समोर आहे, हे सुहानाला पक्के ठाऊक असते. पण ती हेतूपुर्वक त्यांना भलतीकडे वळवते. अण्णांच्या आंदोलन वा अन्य कुठल्याही संदर्भात आपण वाहिन्यावर ज्या चर्चा ऐकत असतो त्यांचे सुत्रसंचालन त्याच त्या सुहाना कश्यपने प्रशिक्षण दिलेले लोक करतात की काय, अशी मला अनेकदा शंका येते. कारण प्रत्येक चर्चेत असे दिसते, की विषय एक असतो आणि चर्चा त्याच विषयाच्या अंगाने जाऊ नये याची काळजी स्वत: संचालन करणाराच घेत असतो. जणू त्या विषयातले सत्य व तथ्य लोकांसमोर येऊच नये व एकूणच प्रेक्षकांच्या मनाचा गोंधळ उडावा असाच त्यांचा हेतू असतो काय, अशी शंका येते.  

   मध्यंतरी अण्णा हजारे व त्यांच्यासह भ्रष्टाचार हा विषय काहीसा मागे पडला होता. आता नव्याने त्याला उजाळा आला आहे. डिसेंबरच्या मुंबई उपोषणात कमी गर्दी जमली म्हणून अण्णा संपले, असे सांगून माध्यमांनी त्यावर पडदा टाकायचा प्रयास केला होता. पण अलिकडेच पुन्हा दिल्लीत अण्णा टीमने एक धरण्याचा कार्यक्रम यशस्वी केल्याने, माध्यमांना त्याकडे पाठ फ़िरवणे अशक्य झाले आहे. कारण भले लोक रस्त्यावर नसतील, पण अण्णा व त्यांच्या आंदोलनाविषयी जनमानसातील पाठींबा तेवढाच असल्याचे दिल्ली धरण्याने सिद्ध केले आहे. मग अण्णांना थोपवायचे कसे, ही आता वाहिन्यांना चिंता ग्रासू लागली आहे. मागल्या सोमवारी कायबीइन लोकमत वाहिनीवर त्यासाठी चर्चा रंगवण्यात आली आणि संपुर्ण चर्चा अण्णांवरचा लोकांचा विश्वास संपतो आहे अशा दिशेने सरकत गेली. पण इकडे त्यांनीच चालविलेल्या मतदानात मात्र सतत अण्णांवरील विश्वास वाढताना दिसत होता. चर्चेचा पहिला भाग संपला तेव्हा अण्णांची विश्वासार्हता घटते आहे काय, या प्रश्नाला ६२ टक्के लोकांनी नकार दर्शवला होता. म्हणजेच ३८ टक्के लोक अण्णांवर विश्वास नसल्याचे सांगत होते. दुसरा भाग संपला तेव्हा मतविभागणी २८ विरुद्ध ७२ अशी झाली; तर चर्चा संपली तेव्हा विभागणी २४ विरुद्ध ७६ अशी झाली. याचा अर्थ काय लावालचा? तर जेवढी माध्यमे अण्णांवरील लोकांचा विश्वास कमी होतो म्हणून प्रचार करत आहेत, तेवढा लोकांचा अण्णांना असलेला पाठींबा वाढत जातो. आपणच आपल्या वाहिनीवर घेत असलेल्या मतदानाचा अर्थ तिथल्या संपादक व चर्चेत सहभागी होणार्‍यांना कळत का नसेल? खरे तर अशा मंडळींचे मानसिक संतुलन तपासून बघण्याची गरज आहे. कधीतरी त्यावर एक स्वतंत्र लेख लिहिण्याचा मा्झा विचारही आहे.

   याचा अर्थ अण्णांची लोकप्रियता अफ़ाट आहे असा अजिबात नाही. लोकांना भ्रष्टाचाराचा कमालीचा तिटकारा आलेला आहे. भ्रष्टाचाराने लोक खुप गांजलेले आहेत. माध्यमांनी त्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून काहीही होत नाही. त्याच्याही पुढे पाऊल पडायला हवे, अशी लोकांची धारणा आहे. त्यातूनच अण्णांबद्दल जनमानसात सहानुभूती निर्माण झालेली आहे. अण्णा हा एकच माणूस ठामपणे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतो व लढायला सिद्ध आहे, अशी लोकभावना आहे. त्यातूनच अण्णांची विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यात मग अन्य कुणाची त्यांना मदत होणार असेल, तर लोकांना हवेच आहे. मग ते योगगुरू स्वामी रामदेव असोत किंवा सेक्युलर मंडळी ज्याला नाके मुरडतात तो संघपरिवार असो. हेतू मह्त्वाचा. त्यात कोण सहभागी होतो त्याला महत्व नाही. जो सहभागी होतो त्याने मुळ हेतूला बाधा आणली आहे काय, एवढेच महत्वाचे आहे. ती बाधा न आणणारा कोणीही अण्णा वा रामदेव यांच्या आंदोलनात सहभागी झाला, तर लोकांना त्याचे वावडे असायचे कारण नाही. म्हणूनच कितीही अपप्रचार झाला, तरीही अण्णांच्या लढ्याला जनतेकडून मिळणारी सहानुभूती कमी झालेली नाही. हे अर्थातच माध्यमांनाही कळते. तसे नसते तर त्यांनी पुन्हा अण्णा व र्रामदेव यांची दखल कशाला घेतली असती?

   पण दखल घेणे वेगळे व त्यात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न वेगळा असतो. मला वाटते, की भांडवलदारी माध्यमे जाणीवपुर्वक अण्णा व अन्य भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात गोंधळ माजवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत असतात. मग ती अनेकदा त्या ससुराल मालिकेतल्या सुहानाप्रमाणे एकूणच चर्चा व विषय भरकटत भलतीकडे जावा, असा डाव खेळताना दिसतात. गेल्या रविवारचीच गोष्ट घ्या. अण्णा टिममध्ये दिर्घकाळ मुस्लिम चेहरा म्हणून दाखवण्यात आलेले मुफ़्ती शमीम काझ्मी यांना आता माध्यमांनी नवा मोहरा बनवले आहे. २५-३० लोकांची अण्णा टीम बनली आहे. त्यातून काझ्मी बाहेर पडले वा त्यांना टीमने बाहेर काढले, ही बातमी कशी पेश करण्यात आली? अण्णा टीममध्ये फ़ूट, अशाच शिर्षकाखाली त्या घटनेचा गवगवा करण्यात आला ना? २५-३० जणांमधून एक बाजूला झाला तर फ़ूट असेल, तर शरद पवार, संग्मा व तारिक अन्वर बाहेर पडल्यावर कोणी कॉग्रेस फ़ुटल्याची बोंब का ठोकली नव्हती? इथे बातम्या रंगवणार्‍यांचा हेतू स्पष्ट होतो. काझ्मी एकटेच आहेत. त्यांच्या समवेत अन्य कुठला टीम सदस्य वेगळा झालेला नाही. याला फ़ूट म्हणता येईल काय? काझ्मीबद्दलचे आक्षेप बाजूला ठेऊन बघितले तरी बातम्यांमधील लबाडी लपत नाही. अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचा माध्यमांचा हेतू लपत नाही.

   आता नेमके काय झाले त्याची छाननी करू या. रविवारी दिल्लीनजिक नॉयडा येथे अण्णा टीमची बैठक होती. त्यात चाललेल्या चर्चेचे रेकॉर्डींग काझ्मी करत असल्याची शंका आली. त्याबद्दल त्यांना अन्य सहकार्‍यांनी हटकले, त्यांचा मोबाईल तपासला, तर तीन ध्वनीमुद्रणे सापडली. त्याची काय गरज होती? काझ्मी हा उद्योग का करत होते? जे काही रेकॉर्ड झाले होते, ते तपासून शिसोदिया यांनी नष्ट केले असा काझ्मी यांचा दावा आहे. याचा अर्थ काहीतरी रेकॉर्ड केले याची ती कबूलीच आहे ना? एखाद्या संस्था वा संघटनेच्या बैठकीत असे कुठला सदस्य कशाला करतो? आणि अन्य सदस्यांच्या नकळत का करतो? त्यामागे कुठला चांगला हेतू असतो? अण्णा टीमला लपवण्यासारखे काहीच नसेल, तर काझ्मींच्या रेकॉर्डींगबद्दल तक्रार कशाला; असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. खरेच आहे. पण तसेच असेल तर कुठलीही बैठक बंदिस्त जागेत घेण्याची गरज नाही. किंबहूना वाहिन्यांच्या संपादक पत्रकारांच्या बैठका गोपनिय नसतात काय? त्यांना काय लपवाछपवी करायची असते? मंत्रीमंडळ, सरकारी कारभार, पक्ष बैठका यात गोपनियता कशाला असते? तर सर्वानुमते काही सहमतीची भुमिका ठरण्यापर्यंत गोपनियता पाळली जात असते. त्याला लपवाछपवी म्हटले जात नाही. बैठकीत वादावादी होतेच. ती बाहेरच्या जगाला कळण्याचे कुठलेही कारण नसते. त्याचे तिथेच बसलेला कोणी सदस्य रेकॉर्डींग करतो म्हणजे त्याला मतभेदाचे भांडवल करायचे असणार. असे मतभेद जगासमोर आणण्याचा हेतू शुद्ध मानता येईल काय?

   त्यांना अण्णा टीममध्ये एकवाक्यता नाही वा अंतर्गत मतभेद आहेत असे जगाला ओरडून सांगायचे आहे, किंवा त्यातल्या कुणा सदस्यावर मनमानीचे आरोप करायचे असणार. आणि त्याचप्रमाणे काझ्मी यांनी बाहेर येऊन केजरीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपातूनच तसे बैठकीचे रेकॉर्डींग करण्याचा हेतू स्पष्ट होतो. केजरीवाल हे अण्णा टीममध्ये एकमेव सदस्य असे आहेत, की त्यांच्या्वर सर्वात अधिक आक्षेप घेतले जात असतात. त्यांच्याच बरोबरीने किरण बेदी व शिसोदिया यांच्यावरही आक्षेप घेतले जात असतात. पण दुसरीकडे अण्णा टीमच्या एकूण वाटचालीकडे बघितले तर असेच दिसेल, की अण्णांच्या बरोबरीने याच लोकांनी प्रथमपासून पुढाकार घेतला आहे. ज्यांनी आजवर आक्षेप घेतले वा कारणे सांगून वेगळा मार्ग स्विकारला, त्यांचे या एकूण आंदोलनात योगदान किती आहे? अग्नीवेश यांच्यापासून अनेकांनी जनलोकपाल लढ्यातून अंग काढून घेतले आहे. पण त्यांचा प्रथमपासून सहभाग तरी किती होता? आरंभापासून लोकांसमोर जी अण्णा टीम आहे त्यात बाहेर पडलेले फ़ारसे दिसलेले नाहीत. काझ्मी तसे नेहमी अण्णांच्या मागे बसलेले दिसतील. पण त्यांनी नेमके कोणते योगदान दिले? आपण आंदोलनाचा मुस्लिम चेहरा होतो असा त्यांचा दावा आहे. ही काय भानगड आहे?

   प्रत्येक बाबतीत मुस्लिम चेहरा लागतोच कशाला? एका बाजूला देश सेक्युलर आहे म्हणायचे आणि त्यात मुस्लिम असण्याचा हट्ट कशाला? दुसरीकडॆ मेधा पाटकर यांची कैफ़ियत घ्या. काझ्मी वादानंतर लोकमत वाहिनीवर मुद्दाम पाटकर यांचे मत घेण्यात आले. त्यांना अण्णांचे रामदेव यांच्या सोबत जाणे मंजूर नसल्याचे दिसते. पण त्याबद्दल उघड न बोलता, त्यांनी "ससुराल"मधल्या सुहानाप्रमाणे भलतीकडे विषय फ़िरवण्याची किमया करून दाखवली. काळापैसा परदेशातून आणला पाहिजेच. पण इथे देशातच असलेल्या काळ्यापैशाचे काय? त्याबद्दल रामदेव यांची भूमिका काय आहे? त्यांच्या संस्था व संघटनांकडे ११०० कोटी आहेत म्हटले जाते, त्याचा खुलासा काय? असे मेधा पाटकर विचारतात. हरकत नाही. जेव्हा असे आपण विचारतो, तेव्हा आपण किती पैसे मिळवतो व कुठून ते येतात, त्याबद्दल पाटकरांनी कधी जाहिर खुलासे केले आहेत काय? दुसर्‍याला प्रश्न विचारण्यापुर्वी आपले हिशोब मांडायचे कष्ट त्यांनी कधी का घेतलेले नाहीत? असे म्हटले मग पाटकर वा त्यांचे ’भाटकर’ लगेच म्हणतील लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. सर्व पारदर्शक कारभार आहे. ज्याला हवा त्याने येऊन आमच्या कार्यालयात बघावे. कसे चोख उत्तर वाटते ना? सगळी लफ़ंगेगिरी तिथेच तर आहे.

   रामदेव यांच्या पातंजली पीठाचे सर्व व्यवहारसुद्धा खुलेच आहेत. पाटकरांनी असे सवाल करण्यापुर्वी ते का जाऊन तपासले नाहीत? तुमचे हिशोब विचारले मग कार्यालयात येऊन बघा म्हणता, मग तुम्ही त्याच शंका जाहिर बोलण्यापेक्षा रामदेवांचे हिशोब त्यांच्या कार्यालयात जाऊन तपासत का नाही? त्यांनी ते हिशोब दाखवायचे नाकारले, तर बोंब ठोकणे समजू शकते. पण तेवढे सौजन्य पाटकर दाखवत नाहीत. रामदेव यांना हैराण करण्यासाठी कॉग्रेस सरकारने त्यांच्या मागे संपुर्ण आयकर खाते कामाला जुंपले होते. तरीही काहीच सापडले नाही. अन्यथा एवढ्यात तो बाबा गजाआड दिसला असता. पाटकर यांच्या नर्मदा बचावचे हिशोब तेवढे साफ़ असल्याची ग्वाही कोणी द्यायची? आणि त्यांना परदेशातील काळ्यापैशाबद्दल इतकी सहानुभूती कशाला? यातला फ़रक सुद्धा समजून घेतला पाहिजे. पाटकर यांच्या साळसुद वाटणार्‍या आक्षेपमागचे राजकारण मोठे कुटील आहे. त्यांच्यासारख्या ज्या स्वयंसेवी संस्था म्हणजे एनजीओ आहेत, त्यांना कारभार चालवण्यासाठी परदेशातून करोडो रुपये मिळत असतात. ते किती पांढरे पैसे असतात? रामदेव यांना देशांतर्गत पैसा मि्ळतो आणि तोही अर्थात इथल्या भा्डवलदारांकडून मिळतो. आणि तेच देशातले काळापैसावाले आहेत, असेच यातून पाटकरांना सुचवायचे आहे. परदेशातला भारतिय का्ळापैसा माघारी आणा म्हणणारे रामदेव देशातला काळापैसा खणून काढण्याबद्दल बोलत नाहीत, तेव्हा देशातील काळ्यापैशाचे त्याचे समर्थन करतात, असेच पाटकरांना सुचित करायचे आहे.

   या सर्व चर्चा व वादविवाद कुठल्या दिशेने जात असतात? त्यातून काय साधायचे असते? त्यातून लोकशिक्षण व प्रबोधन करण्याचा हेतू असतो, की लोकांची दिशाभूल करणाचा डाव असतो? लोकांना खर्‍या समस्यांपासून कुठेतरी भरकटत न्यायचा हेतू त्यात असतो? अण्णा व रामदेव यांना काय करायचे आहे? त्यांच्या मागण्या वा आंदोलन जनहिताला बाधा आणणार आहेत काय? नसेल तर त्यांच्या तपासण्या व चौकश्या कशासाठी होत असतात? त्यांनी व्यक्त केलेल्या शंका वा आरोप-आक्षेप यावरचे लक्ष विचलित करण्याची ही धडपड आहे काय? एखाद्या बलात्कार प्रकरणात पोलिसांना जेव्हा गुन्हा नोंदवायचा नसतो, तेव्हा ज्याप्रकारची टाळाटाळ चालते, त्यापेक्षा हा सगळा तमाशा वेगळा आहे काय?

   ज्या मुलीवर बलात्कार झालेला असतो, तिच्याच चारित्र्यावर पोलिस शंका घेतात. त्या जागी अवेळी का गेलीस? तुझे कपडे कसे होते? अशा जागी अशा लोकांसोबत जाण्याचेच कारण काय? तुला संशयिताकडून पैसे उकळायचे आहेत काय? ब्लॅकमेलसाठी आरोप करते काय? असेच प्रश्न विचारून पोलिस त्या बलात्कारित मुलीला नामोहरम करतात ना? न्याय मागायला आलेल्या मुलीलाच बदमाश ठरवणारे पोलिस एकप्रकारे त्या बलात्कार्‍याला जसे अभय द्यायला धडपडत असतात, त्यापेक्षा माध्यमांची अण्णांच्या आंदोलनाबद्द्लची भूमिका कितीशी वेगळी आहे? पाटकर वा अन्य स्वयंसेवी मंडळी ज्या प्रकारचे आक्षेप अण्णा व रामदेव यांच्या एकत्र येण्याबद्द्ल घेत आहेत ते त्याच पोलिसांच्या लबाडीपेक्षा थोडे तरी भिन्न आहेत काय?

   रामदेव देशातल्या काळ्यापैशाबद्दल बोलत नसतील तर तुम्ही लढा त्यासाठी. मेधा पाटकरांना कोणी अडवलेले नाही. कोण सोबत येतो, त्यापेक्षा कोणत्या हेतूने सोबत येतो, त्याला महत्व अधिक असते. आंदोलनाला दगाफ़टका करण्यासाठी अग्नीवेश यांच्यासारखा छुपा सेक्युलर सोबत येण्यापेक्षा, निरपेक्ष वृत्तीने त्यात सहभागी होणारा कोणी संघपरिवारातला असेल, म्हणून बिघडत नाही. येणार्‍याने त्या आंदोलनाचा मूळ हेतू साध्य करायला हातभार लावला पाहिजे. निदान त्याला बाधा आणता कामा नये. तसे होताना दिसते काय? स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे असे शंका व संशय निर्माण करत असतील, तर त्यांचे आक्षेपच नव्हेत तर सेक्युलर भुमिकाही शंकास्पद होऊन जाते. सवाल बलात्कार करणार्‍याला शिक्षा देण्याचा असताना, पिडीत महिलेच्या चारित्र्याची चाचणी व छाननी करायला निघालेले प्रामाणिक म्हणता येतील काय? लोकांना भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे. ती भगव्या कपड्यातला कोणी करतो, की हिरवा झेंडा घेऊन कोणी करतो; याच्याशी लोकांना कर्तव्य नाही. मुलांना आपण शाळेत घालतो तेव्हा त्याचा गणवेश, पुस्तके, वह्या अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात. पण त्यापेक्षाही मह्त्वाचे म्हणजे मुलाने शिकणे व त्याला शिकवणारा शिक्षक असणे. त्याकडे पाठ फ़िरवून जेव्हा इतर गोष्टींचे अवडंबर माजवले जाते, तेव्हा शिक्षणाचा बोजवारा उडत असतो. अण्णा, त्यांची टीम, त्यातल्या सदस्यांचे पुर्वेतिहास, त्यांना येऊन मिळणारे अन्य लोक, त्यांना सहानुभूती दाखवणार्‍यांचे राजकीय पक्ष, या दुय्यम गोष्टी आहेत. पण माध्यमे त्यावरच बोलत असतात, गाजावाजा करत असतात, तेव्हा त्यांना अण्णांचे आंदोलन यशस्वी होण्यापेक्षा त्याचाही सर्वशिक्षा अभियानाप्रमाणे बोजवारा उडावा, असेच वाटत असते काय? नसेल तर या संदर्भहीन चर्चा वा बातम्या कशासाठी चालू असतात?

   आणखी एक गोष्ट. केजरीवाल व शिसोदिया या दोघांनी या आंदोलनाचे आजवर यशस्वी आयोजन व नियोजन केले आहे. तेच बाजूला झाले तर आंदोलनाचा बोजवारा उडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच त्याच दोघांना सर्व माध्यमांनी व टिकाकारांनी लक्ष्य केले आहे. अण्णांनी त्यांना बाजूला करावे असा एकूण आग्रह दिसतो. ते झाले तर अण्णांचे आंदोलन कागदावरच राहील. थोडक्यात अण्णांचे जे उजवे डावे हात आहेत, तेच त्यांनी तोडून टाकावेत, मग अण्णांचे आंदोलन मजबूत होईल, असा हा आग्रह आहे. ज्याने आपले हातच तोडून टाकले, तो सामर्थ्यशाली झाल्याचे कोणी आजवर बघितले आहे काय? अण्णांना ते कळते म्हणून ते अशा जाणकार सल्लागारांकडे काणाडोळा करून आपले आंदोलन पुढे नेत असावेत.
२९/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा