शनिवार, १९ जानेवारी, २०१३

आपल्या धडावर आपलेच डोके असावे


    ‘मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही जर ते माझे द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तर मी माझ्या घरच्या देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर ब्राह्मण पुजार्‍यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजार्‍यांकडून करवून घेईन. ते मला मनुष्य समजत असतील तरच त्यांच्याकडे पुजारीपणा ठेवीन आणि जर का ते मला जनावराप्रमाणे समजतील तर मी ठेवणार नाही.’

      ‘राजकारण’कर्त्यासारख्या (दामलेशास्त्री) मजवर टिका करणार्‍यास माझी विनंती आहे, की त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅरेग्राफ़समोर त्यावर आपली टिका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने; माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. ‘राजकारण’कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भिती वाटते. कारण मग त्यास विरुद्ध टिका करण्यास स्थळे कमीच सापडतील’

   तब्बल ब्याण्णव वर्षापुर्वीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या एका भाषणातला हा उतारा आहे. नेमके सांगायचे; तर १५ एप्रिल १९२० रोजीचे हे भाषण आहे. नाशिक येथे श्री. उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभातले प्रमुख पाहुणे म्हणून महाराजांनी जे सर्वस्पर्शी विस्तारपुर्वक भाषण केले होते, त्यातला हा उल्लेख आजच्या संबंधातही तेवढाच मोलाचा ठरावा. शाहू महाराजांनी जी ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात मोहिम त्या काळात छेडली होती आणि दुसरीकडे समाजसुधारणा व तात्कालिन राजकीय सुधारणांचे काम चालविले होते; त्याचा उहापोह त्यांनी या भाषणातून केलेला होता. महाराजांवर त्यावेळी व आजही धर्मविरोधी व ब्राह्मणांचा द्वेष करणारे असा आरोप होतो. त्याचाही समाचार त्याच भाषणातून घेतलेला आहे. जातीपातीच्या वर्चस्ववादाने समाजात जो उचनीच भाव पसरला होता, तो मोडीत काढून, तमाम समाजाला एकत्र आणायचे जे प्रयास चालू होते, त्यात आपली बुद्धी विघ्नसंतोषी वृत्तीने वापरणार्‍यांना महाराजांनी दिलेला तो इशारा होता. यातले शब्द व त्यांची योजना काळजीपुर्वक वाचली; तर असे दिसेल की महाराज आपल्या नुसत्या अपमान व अवहेलनेने व्यथित झालेले नाहीत. ज्याप्रकारे कारस्थानी वृत्तीने व टोळीबाज मानसिकतेने, त्यांना बदनाम व अपमानित करण्याचे प्रयास चालू होते, त्याने चिडून उठलेले दिसतील. 

   आपण ब्राह्मणांवर प्रेम करीत असूनही ते (ब्राह्मण) आपला द्वेष व तिरस्कार करतात व आपल्याला जनावरासारखी वागणूक देतात; ही त्यांची तक्रार आहे तेवढीच वेदना सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला कुणाही ब्राह्मणाचा द्वेष वा तिरस्कार करायचा नाही. पण ते तसे वागत असतील, तर त्यांना तसाच प्रतिसाद द्यावा लागेल, असा त्यात इशारा आहे. इतके महाराज का चिडलेले असावेत? तर साक्षात राजा असून व त्याच्याच अनुदानावर उदरनिर्वाह करणार्‍यांनी, त्या राजाला अपमानित करायचे उद्योग चालू होते. सामान्य माणसाचे किंवा अस्पृष्य जातीच्या लोकांचे सोडाच; खुद्द राजालाही तुच्छ ठरवणार्‍या अभिजन वर्गाच्या प्रवृत्तीने महाराज संतापले होते. आणि तो अभिजनवर्ग म्हणजे बुद्धीचा मक्ता आपल्याकडेच आहे; अशी समजूत असल्याने मुजोर झालेला ब्राह्मणवर्ग होता. त्या समजाला कोणी आव्हान दिलेले नव्हते. पण स्वत:ला तुम्ही शहाणे समजत असला; म्हणून इतरेजनांना तुच्छ लेखून सातत्याने त्यांची अवहेलना कराण्याचा अधिकार गाजवला जात होता, त्याच्या विरोधात महाराजांनी शड्डू ठोकला होता. आपल्याच अनुदानावर पोसला जाणारा हा मुजोर वर्ग आपल्यालाच असे वागवत असेल, तर सत्ताहीन, शक्तीहीन व संपत्तीहीन सामान्य लोकांची काय कथा? हे लक्षात आल्यानेच शाहू महाराजांनी या बौद्धिक मुजोरीचे कंबरडे मोडायचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी तळागाळातल्या विविध समाजघटकांच्या शिक्षणांला प्रोत्साहान दिले, सवलती दिल्या. पण नुसत्या सवलती देऊन ते थांबले नाहीत. तर या मुजोरीशी दोन हात करायलाही शाहू महाराज पुढे आलेले होते. आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या त्या भाषणात पडलेले होते.

   महाराजांना धर्मकार्य वा कर्मकांडात ब्राह्मणांचा त्रास झाला व अडवणूक झाली असेल हा त्यांचा व्यक्तीगत विषय होता. म्हणूनच त्यांनी त्याला फ़ारसे महत्व दिलेले दिसत नाही. पण त्यांच्या कार्यात बाधा आणणार्‍यांचे प्रयत्न मुळातच बौद्धिक मुजोरी व मक्तेदारीचे होते, आणि त्यामुळेच तात्कालीन ब्रह्मवृंद विचलित होऊन महाराजांच्या विरोधात एकवटला होता. संघटित हल्ले केल्याप्रमाणे खोटेनाटे आरोप करीत होता, लिहित होता. अशाच त्यावेळच्या एका नियतकालिकात जो अवास्तव टिकेचा प्रकार घडला होता, त्यावर महाराज तुटून पडले आहेत. पण आपल्यावरचे नुसते आरोप त्यांनी खोडून काढलेले नाहीत. तर त्या आरोपबाजी व टिकेच्या आडची बदमाशी त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे. टिका व बदनामी, यात खुप मोठा फ़रक असतो, महाराजांनी टिकेचे त्याही भाषणात स्वागत केले आहे आणि जरूर टिका करा, म्हणजे मला सुधारण्यास मदत होईल; असेही उदगार काढलेले आहेत. पण टिकेच्या आडून बदनामीचे कारस्थान चालवले जाते, त्या बौद्धिक बदमाशीवर महाराजांनी नेमके बोट ठेवले आहे. ते काय म्हणतात? ‘अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो.’ 

   आपल्या भाषणाचा बरचसा मजकूर गाळला जातो आणि बारीकसे अवतरण देऊन अर्थाचा अनर्थ केला जातो. ते कोण करत होते? तेव्हाचा बुद्धीवादी अभिजन वर्ग. अर्थात त्यावेळी शिक्षणाचा आजच्यासारखा प्रसार झालेला नसल्याने जो पिढीजात सुशिक्षित उच्चभ्रू ब्राह्मण समाज होता, त्यातूनच अभिजन घडवले जात. आणि तेच असे बौद्धिक मुजोरी दाखवून सत्याचा विपर्यास करीत होते. मुठभर लोक वृत्तपत्रे वाचन होते आणि हाताच्या बोटावर मोजावी इतकीच वृत्तपत्रे होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. लिहिता वाचता येणारे व बुद्धीमान समजले जाणारे ब्राह्मण सुधारणेच्या चळवळीला व्यत्यय आणण्यासाठी सत्याचा अपलाप करीत होते. आणि तो विपर्यास कोणत्या मार्गाने केला जात होता? मूळ भाषण छापायचेच नाही. त्यातला सोयीचा शब्द, वाक्ये वा अवतरणे घेऊन त्यावरच झोड उठवायची. म्हणजे असे, की मांडलेल्या मूळ मुद्द्याचा अनर्थ होऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत. त्याला काही लोक बामणीकावा म्हणतील. मी त्यात पडणार नाही. पण हा इतिहास आज अगत्याने इथे शाहू महाराजांच्या नेमक्या शब्दात सांगायचे कारण असे; की एक शतकाचा काळ उलटून जायची वेळ आली, म्हणुन त्याच माध्यमे व नियतकालिकातील मानसिकता कितीशी बदलली आहे? अर्थाचा अनर्थ व मूळ भाषणाचा विपर्यास करायचे थांबले आहे काय? 

   गेल्या दोन आठवड्यात दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर एकूणच राजकीय नेत्यांपासून संघटनांचे नेते व साधू महाराजांच्या विरोधात जे काहूर माजवण्यात माध्यमांनी भूमिका बजावली; ती किंचित तरी वेगळी आहे काय? प्रत्येक बाबतीत कोणाचे तरी अवतरण (म्हणजे आधी व नंतर तो माणूस नेमके काय बोलला आहे ते लपवून) घेऊन त्याच्यावर काहूर माजवण्यात आले. यातले दोन मोठे साक्षिदार म्हणजे मान्यवर महिलाच आहेत. दिल्लीच्या माजी पोलीस आयुक्त म्हणून काम केलेल्या व सध्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आघाडीवर दिसलेल्या किरण बेदी  व प्रसिद्ध पत्रकार व कार्यकर्त्या मधू किश्वर अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघी नित्यनेमाने टिव्ही वाहिन्यांच्या चर्चेत आपल्याला दिसतात. मोहन भागवत यांच्या भाषणासंबंधी काहुर माजवाले जात असताना अनेक वाहिन्यांनी या दोघींशी संपर्क साधला. असे लोक वाहिन्यांना लागतच असतात. आपण जो धुमाकुळ चालविला आहे, त्यात तथ्य असल्याचे भासवण्यासाठी व मान्यवरांचे तसेच मत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी; मग अशा मान्यवरांच्या साक्षी काढल्या जातच असतात. त्यांना तेवढेच अवतरण म्हणजे एखादे वाक्य दाखवले जाते. आणि बाकी आपल्या मनचे सांगून प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगायचे. वाहिनीचा वार्ताहर सत्य सांगतो, या गृहितावर अनेकजण प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. म्हणून त्यांना सत्य काय घडले, त्याचा थांगपत्ता नसतो. अनवधानाने अशी बरीच मान्यवर मंडळी त्या खोटारडेपणात सहभागी करून घेतली जातात. आणि मग बघा, लोकमत संतप्त झाले आहे, असा डंका पिटला जातो. वाहिन्यांवर आलेल्या प्रतिक्रिया, मग अन्य वृत्तपत्रातून बेधडक छापल्या जातात. पण राईचा पर्वत करताना मुळात राई तरी आहे काय; याचा शोध कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्यालाही धक्का बसायची वेळ येते आणि इथे तेच झाले.

   मधू किश्वर यांना वाहिनीकडून भागवत यांचे वादग्रस्त विधान सांगण्यात आले आणि त्यावर मतप्रदर्शन करायचा आग्रह धरण्यात आला. पण आधीच्या अनुभवामुळे सावध असलेल्या मधू किश्वर यांनी संपर्क साधणार्‍या प्रत्येक वाहिनीकडे भागवतांचे संपुर्ण भाषण ऐकायचा आग्रह धरला. ते शक्यच नव्हते. खरे भाषण संपुर्ण ऐकवले; तर माध्यमांचा खोटारडेपणा उघडा पडणार होता. म्हणून किश्वर यांचा नाद सोडून वाहिन्या इतर मान्यवरांकडे वळल्या व त्यांनी धुमाकुळ घालून घेतला. पण हे सुद्धा असेच काहीतरी खोटे असणार याची किश्वर यांना खात्री होती. म्हणुनच त्यांनी आपल्या मार्गाने भागवतांचे संपुर्ण भाषण मिळवले. मुळात त्यांना वाहिन्यांच्या आशा काहूर माजवण्याविषयी शंका व संशय का यावा? त्याचे कारण दोन महिने आधी घडले होते. त्यावर त्यांनी एक लेखही इंग्रजीमध्ये लिहिला होता. तेव्हा गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हिमाचलमध्ये प्रचाराला गेलेले होते. त्यांनी पाऊण तास केलेल्या भाषणावर असेच काहूर माजवण्यात आलेले होते. त्यात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी व आधीचे मंत्रीपद जाण्यास कारणीभूत झालेल्या मैत्रीण, सुनंदा यांच्यावर मोदींनी टिप्पणी केली होती. तो एकूणच महिलांचा अवमान आहे असे काहूर माजवले जात होते. पण पाऊण तास कोणी केवळ ‘काही कोटी रुपयांची मैत्रीण’ असे एकच वाक्य बोलणार नाही. तो आणखी काही बरेच बोलला असणार. मग ते कां सांगत नाहीत वाहिन्या? त्या भाषणातले एकच वाक्य घेऊन काहूर माजवले जात होते. पण त्याच कालखंडात हिमाचलच्या थंड प्रदेशात घरसंसार संभाळणार्‍या महिलांचे गॅस अनुदान रद्द झाल्याने किती हाल होत आहेत; त्यावर मोदी विस्ताराने बोलले होते. त्यातून सर्वसामान्य महिलांच्या हालअपेष्टांविषयी त्यांना असलेली नेमकी जाणिव स्पष्ट होऊ शकत होती. पण त्याबद्दल अवाक्षर वाहिन्या बोलत नव्हत्या किंवा दाखवले जात नव्हते. पाऊण तासाच्या भाषणातील एकच वाक्य निवडून त्यावर गोंधळ घातला जात होता. त्यापेक्षा तात्कालीन परिस्थितीमध्ये गॅसमुळे हैराण झालेल्या महिलेच्या वेदना व समस्याविषयी वाहिन्या कशा बधीर व संवेदनाशून्य आहेत; याचा किश्वर यांना संताप आला होता. कारण त्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. महिलांचा अवमान म्हणून बोंबा मारणारे प्रत्यक्षात लोकांची दिशाभूल करत होते. कारण देशातील करोडो महिलांसाठी त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणार्‍या श्रीमंत मनमौजी सुनंदाच्या सन्मानापेक्षा गॅस हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण वाहिन्या मात्र नको त्या शब्दावर दळण दळून विपर्यास करीत होत्या. म्हणून भागवतांच्या भाषणावर प्रतिक्रिया वाहिन्यांनी मागितली, तेव्हा मधू किश्वर सावध होत्या. आधी सगळे भाषण ऐकवा असा हट्ट त्यांनी धरला. 

   मात्र भागवत यांचे मूळ भाषण ऐकून किश्वर गप्प बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर वरून वाहिन्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडला. त्याच दरम्यान किरण बेदी यांनीही इंटरनेटच्या माध्यमातून भागवत यांचे संपुर्ण भाषण ऐकले, तेव्हा त्यात महिलांचा किंवा भारतिय विवाहाचे वि्डंबन कुठेही केलेले नव्हते, असे बेदी यांना आढळून आले. उलट वाहिन्या जे दाखवत व ऐकवत होत्या, त्यात सरळसरळ लबाडी चालू असल्याचे त्यांना दिसून आले. भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय विवाह, त्यातील महिला व कुटुंब यांच्या परस्पर संबंधांवर टिप्पणी केलेली होती. त्यात भारतीय महिला वा विवाह संबंध याचा सन्मानजनक उल्लेख होता. बेदी यांनाही हा खोटेपणा असह्य झाला. त्यांनी देखील वाहिन्यांच्या खोटेपणाचे पितळ लगेच ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडले, त्याचा बोलबाला झाल्यावर वाहिन्यांचा धीर सुटला. आता मोबाईल वा इंटरनेट वापरणार्‍यांसमोर उघडे पडल्यावर विनाविलंब भागवत पुराण तमाम वाहिन्यांनी गुंडाळले आणि ओवायसीच्या शिळ्या कढीला ऊत आणायचे काम हाती घेतले. इथे एक भयंकर बदमाशी लक्षात घेतली पाहिजे. भागवत यांच्या मुळ भाषणाची मोडतोड करून त्यातले नसलेले पाप दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार्‍या वाहिन्यांनी सहा दिवस आधी होऊन गेलेल्या ओवायसीच्या अत्यंत स्फ़ोटक व वादग्रस्त भाषणावर अवाक्षर बोलायचे टाळले होते. पण भागवत पुराण उलटल्यावर त्याच ओवायसीवर किर्तन सुरू झाले. ते भयंकर एवढ्यासाठी म्हणायचे, की इंतरनेट व सोशल मीडियावर ओवायसीचे वादग्रस्त भाषण तीन चार दिवस फ़िरत असताना व त्यावर संतप्त प्रतिक्रियांचे वादळ उठले असताना; वाहिन्या व वृत्तपत्रे त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलेली होती. जणू ओवायसीला वाचवण्यासाठी किंवा झाकण्यासाठीच भागवतांचे वादग्रस्त नसलेले भाषण संगनमताने वादग्रस्त बनवण्यात आलेले होते. थोडक्यात चोर सोडुन संन्याशी म्हणावा, तसाच वाहिन्यांचा कल्लोळ चालू होता. त्यावर मधू किश्वर व बेदी यांनी झोड उठवली नसती, तर ओवायसी वाहिन्यांनी लपवलाच असता. म्हणजे वाहिन्या किती दिशाभूल करतात ते लक्षात येईल. 

   एकदा अशा अफ़वा पसरवून झाल्यावर वाहिन्यांनी त्याबद्दल बोलायचेच सोडुन दिले. कारण मग इंटरनेटवर कोणी तरी भागवत यांचे संपुर्ण भाषणच टाकले. त्याचा त्याच सोशल मीडियातून प्रसार करण्यात आला. पण जित्याची खोड म्हणतात ना? खोटेपणाचीस संवय लागली; मग रोज काही खोटेपणा केल्याशिवाय अन्न पचणार कसे? त्यामुळेच मग वाहिन्यांनी नासलेले म्हणून बाजूला केलेल्या खरखट्या ताटातले असत्य, वृत्तपत्रातील सेक्युलर पत्रकारांनी पक्वान्न म्हणून उचलून धरले. आता त्यातूनच नवे प्रकरण उदभवले आहे. मान्यवर दैनिक सकाळच्या गेल्या आठवड्याच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये हेमंत देसाई यांनी भागवत यांच्यावर टिप्पणी केली. म्हणजे खोटे आहे, याची खात्री असतांनाही पुन्हा तोच विषय उकरून काढला. थोडक्यात ठरवून विपर्यास करायचा, हीच भूमिका नाही काय? कोणी इतका बेशरमपणा करीत असेल, तर मग त्यामुळे दुखावणार्‍यांनी काय करावे? आता त्या खोटेपणाबद्दल आपल्याला धमक्या दिल्याचे फ़ोन आले; अशी तक्रार देसाईंनी पोलिसात केली आहे. पण तशी वेळ तुमच्यावर यावीच का? माझ्या माहितीप्रमाणे सकाळच्या संपादक व कार्यालयाला भागवत यांच्या भाषणाबद्दल पुर्ण माहिती देण्यात आलेली होती. तरीही असा लेख लिहिला व छापला जात असेल; तर त्यामागे बदनामी आणि दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्टपणे समोर येतो ना? मग अशा लोकांबद्दल काय बोलायचे? ही कुठली प्रवृत्ती म्हणायची? असे वागणारे कुठल्या जातीचे वा धर्माचे आहेत त्याला अर्थ नाही. कारण शाहू महाराज धर्म वा जात मानत नव्हते; तर अन्याय व खोटेपणाच्या विरोधात कंबर कसून उभे होते आणि त्यांनी विपर्यास करणार्‍या ब्राह्मणांच्या विरोधात रणशिंग फ़ुंकले होते. दुर्दैव इतकेच, की जी माणसे असा विपर्यास आजकाल सर्रास करीत असतात, तीच माणसे नित्यनेमाने ‘फ़ुले शाहू आंबेडकर’ अशी जपमाळ ओढत असतात. शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेला कोणी अशी बदमाशी वा विपर्यास करू शकतो का? नसेल तर असे का होते आहे आणि तसे करणारे शाहू महाराजांचे नाव तरी कशाला घेतात? महाराजांच्याच कोल्हापुरचे साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी अशा बनावट सेक्युलर माध्यमे व विचारवंतांकडे नेमके बोट दाखवले आहे. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड लिहितात, 

      ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ 

   आज वाहिन्यांची रेलचेल झाली आहे. माध्यमांचा पसारा वाढला आहे. त्यातली गुंतवणूक अफ़ाट झाली आहे आणि एकूणच सगळा व्यवहार आतबट्ट्याचा होऊन गेला आहे. तरी भांडवलदार लोक इतके पैसे बुडवून माध्यमे का चालवित आहेत? तर हे असे त्यांना लोकांची दिशाभूल करायची असते म्हणून. खर्‍या समस्या, लढे व लोकचळवळीतून लोकांचे मन उडवायचे आणि न्यायाच्या लढ्य़ांना सुरुंग लावायचा असतो. त्यासाठी मग भागवत, अण्णा किंवा आणखी कोणाचा बिनधास्त विपर्यास करून बळी घेतला जात असतो. त्यामागची भूमिका व योजना सोपी असते. खोटे बोला पण रेटून बोला.




शनिवार, १२ जानेवारी, २०१३

कौनो लडत नाही.



   एखाद्या घरात बाप दारुडा, बेकार व कर्जबाजारी असतो आणि संसाराचे पुरते धिंडवडे निघालेले असतात. अशा घरातली मुलगी वयात आलेली वा तरूण असेल, तर तिची काय अवस्था असेल, ते इथे सांगण्याची गरज नाही. आपण अशा गोष्टी आसपास बघत असतो. कधी तिथे वयात येणारी मुलगी असते तर कधी त्या दारुड्याची पत्नीही असू शकते. पण परिणाम सारखेच असतात. कोणीही गावगुंड भुरटे त्याच्या व तिच्या अब्रूशी खुले आम खेळत असतात. कधीकधी तर असला बेशरमपणा विकोपास गेलेलाही असतो. त्याच गुंडाकडून आपल्या व्यसनाची पुर्तता करण्यासाठी असला नामर्द घरची अब्रू त्या गुंडाच्या चरणी अर्पण करीत असतो. मात्र वर तोंड करून त्या गुंडाला लौकरात लौकर मुलीशी लग्न कर, असेही धमकावत असतो. अशावेळी तो गुंड कसा फ़िदीफ़िदी हसतो, हे आपण कुठे ना कुठे बघितलेले दृष्य आहे ना? अतिशय संतापजनक व निर्लज्ज प्रसंग असतात असे. पण ते बघूनबघून आपलीही नजर व मन मेलेले असते. सातत्याने तसले तमाशे बघून त्याचे काही वाटेनासे होते. याला गावातल्या, गल्लीतल्या भानगडी म्हणतो आपण. पण तेच जर आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असेल, तर त्याला काय म्हणायचे? त्याला ‘अमन की आशा’ असे सोज्वळ नाव दिले जाते. आपल्या देशात आणि देशाच्या वेशीवर हा तमाशा अनेक वर्षे चालू आहे आणि आपल्या सर्वांची नजर व मने आता मेली आहेत. आणि खरे सांगायचे तर त्या दारुड्य़ाप्रमाणे आपणही नुसते फ़ुसके इशारे देणारे बोलघेवडे होऊन गेलो आहोत. मुर्दाडांचा देश अशीच इतिहास बहुधा आपल्या देशाची व समाजाची नोंद करील. 

   दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या धक्क्यातून भारतीय मानसिकता अजून सावरलेली नाही, इतक्यात सीमेवर आणखी एक भीषण बलात्कार झाला आहे आणि तो देशाच्या सार्वभौमत्वावर झाला आहे. कारण भारतीय भूमीवर व आपल्या हद्दीत गस्त करणार्‍या दोघा भारतीय जवानांवर हल्ला करून; त्यांना ठार मारून त्यांचे शीर कापून पळवण्य़ाची अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त होऊन थेट पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा बोलायचे सोडून, आमच्या सरकारने त्या दारुड्य़ाच्या भाषेत निषेधाची पोपटपंची केली आहे. तसा गोळीबार व तोफ़ांचा मारा अधूनमधून सीमेवर पाकिस्तानकडून होतच असतो. त्यात अनेकदा भारतीय जवान शहीद होतच असतात. पण तशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तरही दिले जात असते. त्यांच्यावर प्रतिहल्ला, गोळीबार व तोफ़ांचा भडीमार केला जातो. त्यामुळे आपले सैनिक शहीद झाले तरी पलिकडल्या सैनिकांनाही त्याची किंमत मोजावी लागत असते. अशाप्रकारे देशासाठी वीरगती प्राप्त करणार्‍या जवानांचा कोणालाही अभिमान वाटतो. पण जेव्हा लढाई होतच नाही आणि गाफ़ील पकडून दगाबाजीने घातपात केला जातो, त्यात बळी पडतात, त्यांना शहीद म्हणणे हा त्यांचाही अपमानच असतो. मग तो सीमेवरील सैनिकांचा असो किंवा कसाब टोळीकडून मुंबईत मारल्या गेलेल्या नि:शस्त्र नागरिकांची हत्या असो. स्वत:चा बचाव करण्याची संधी नाकारून केलेली हत्या हे हौतात्म्य नसते. तो खुन असतो. आणि म्हणूनच ज्यांना या आठवड्यात भारत पाक सीमेवर गाफ़ील मारण्यात आले, ते शहीद झाले असे मानणे ही आपण स्वत:ची केलेली फ़सवणूक असेल. त्यांच्याही मर्दानगीचा अवमान असेल. आपल्या नालायकीमुळे त्यांना असे अपमानास्पद मरण आले, ही वस्तुस्थिती, त्यांचे मृतदेह तिरंग्यात लपटले म्हणून झाकली जाणारी नाही. कारण त्यांच्यावर शस्त्राचा हल्ला पाकिस्तानी सैनिकांनी जरूर केला असेल. पण त्या आपल्याच जवानांना गाफ़ील ठेवून मृत्यूच्या सापळ्यात ढकलण्याचे पाप; आपण सर्वांनी केले आहे. त्यात आपले सरकार आहे, तसेच क्रिकेटप्रेमी व शांततावाद्यांचाही समावेश होतो. त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने आपण उरलेले निरपराध ठरत नाही. त्यांच्या भामटेगिरी व पापकर्माला रोखणे शक्य असून आपण गप्प बसतो, तेव्हा एकप्रकारे आपणही त्याच पापाला मान्यता देत असतो. मग आपणही तेवढेच गुन्हेगार नाही काय? 

   गेल्या दोन दशकात म्हणजे १९९० पासून भारतातच हस्तक निर्माण करून; कधी त्यांच्या मदतीने तर कधी आपले घातपाती पाठवून इथल्या पोलिस, सैनिक, रक्षक व नागरिकांना मारण्याचे उद्योग पाकिस्तान करतो आहे. त्यातली विविध नावे ही शुद्ध धुळफ़ेक आहे. हिजबुल, तोयबा, आयएसआय, इंडियन मुजाहिदीन किंवा पाक सेना व पाक सरकार; ही सगळी भिन्न भिन्न नावे असली तरी त्याची प्रेरणा व सुत्रधार समानच आहे. वेगवेगळी रुपे व विविध नावे धारण करून लोकांची दिशाभूल करणरा भुरटा भामटा असतो, तशी ही पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणाची विविध रुपे आहेत. तेव्हा त्यांच्या नावाशी खेळत बसणे महत्वाचे नसून, आपल्याला होणार्‍या जखमांचा विचार करण्याची आवश्यकता असते. ‘तो मी नव्हेच’ ही पाकिस्तानची निती आहे. आणि त्याचे वेळोवेळी पुरावे वा दाखले समोर आलेले आहेत. आपण भारताशी उघड खुले युद्ध करू शकत नाही, याची खात्री असल्याने १९७१ नंतर पाकिस्तानने ही रणनिती वापरली आहे. प्रत्यक्ष लढाई करायची नाही, तर घातपाताच्या मार्गाने अघोषित युद्ध चालवायचे, अशी ती रणनिती आहे. त्यासाठी मग काश्मिरचा प्रश्न वापरला जात असतो. त्यांच्या कब्जातील काश्मिरींना आधी जिहादी बनवून हल्लेखोर म्हणून सोडले जात होते. पुढे अफ़गाण जिहाद सुरू झाल्यावर त्यातलेही मुजाहिदीन पाकिस्तानने भारताच्या विरुद्ध वापरले आहेत. अफ़गाणिस्तानच्या युद्धाच्या निमित्ताने जगभरात जी धर्मासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण करण्यात आली; तिचा सढळ वापर पाकिस्तानने भारताच्या विरोधात केला, त्याचे काही अंशी परिणाम त्यांनाही आता तालिबानांच्या रुपाने भोगावे लागत आहेत. पण ज्या देशाची मानसिकताच मुळात द्वेषावर आधारलेली आहे, त्याला स्वत:च्या कल्याणाचे सुचणार तरी कसे? आपले किती व कोणते भले होते, त्यापेक्षा भारताचे नुकसान कसे होईल; यावर पाकिस्तानचे राजकारण स्थापनेपासून आधारलेले आहे. त्याचे सुत्र एकच आहे. आम्ही सुखाने जगणार नाही आणि तुम्हालाही सुखासमाधानाने जगू देणार नाही. 

   याच धोरणातून मग कुरापती काढून पाकिस्तानने भारताशी युद्धे सुरू केली. त्यात सपाटून मार खावा लागला तेव्हा त्यांनी आपली रणनिती बदलली आहे. त्याचे परिणाम मग जिहाद रुपाने समोर आलेले आहेत. मग इथल्या मुस्लिमातील असंतोषाला खतपाणी घालून चिथावण्या दिल्या जातात आणि त्यांनाच स्वदेशात हस्तक बनवून आतून दगाफ़टका निर्माण केला जातो. त्याचा परिणाम म्हणून मग या विषयाला धार्मिक वळण दिले जात असते. मग गुजरातची दंगल असो की मंदिर मशिदीचा वाद असो, त्यात पाकिस्तान नाक खुपसते आणि त्यातूनच ओवायसीसारखी बांडगुळे निर्माण होत असतात. त्याला रोखणे दुर रहाते आणि आपल्याकडले सेक्युलर दिडशहाणे त्याच्याशी तोगडीयाच्या मुर्खपणाशी तुलना करून जिहादी मनोवृत्ती पाठीशी घालत असतात. तोगडीयाच्या बरळण्याने कुठे दंगली पेटत नाहीत. त्याच्या मागे देशभरातले हिंदू एकवटले असे कधी दिसत नाही. उलट त्याचा निषेध करण्यात अधिकाधिक हिंदूंचाच भरणा दिसतो. पण ओवायसीने चिथावणीखोर बोलले तर किती मुस्लिम विचारवंत वा सेक्युलर मुस्लिम त्याच्या अटकेची मागणी करायला पुढे आले? जेव्हा असे होत नाही, तेव्हा मग तटस्थ विचार करणारा हिंदूही बेचैन होतो. त्याला तोगडीया वा नरेंद्र मोदीच योग्य असे वाटू लागते. अशी ही विभागणी पाकला हवीच असते. कारण मग इथल्या मुस्लिमांमध्ये एकाकी पडल्याची भावना वाढत असते. त्यातून आणखी जिहादी प्रेरणा मिळत असते. महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातला अबू जुंदाल मुंबई हल्ल्याचे कराचीत बसून नियंत्रण करीत होता. हे कशातून होते? पाकिस्तानी सेना व तिथले राज्यकर्ते धर्माच्या नावाने चालत असतील व भारताकडे हिंदू राष्ट्र म्हणूनच बघत असतील, तर ते तुमच्या समोर अन्य कुठला पर्याय ठेवत नसतात. त्यांना चोख उत्तर द्यायला इथल्या मुस्लिमांनी पुढाकार घेण्याची गरज असते. तेही होत नाही. ओवायसी किंवा अबु आझमी सारखे लोक इतल्या मुस्लिमांची प्रतिमा बनत चालले आहेत. आणि मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चाने धुमाकुळ घालून त्याला दुजोरा देण्याचे काम केले. 

   आज देशाची अवस्था अराजकासारखी झाली आहे. इथल्या जनतेला कुठल्या कायद्याचे वा सरकारचे संरक्षणच उरलेले नाही. गुंडगिरी मोकाट आहे, नक्षलवाद व दहशतवाद मोकाट आहे. पोलिस व सेनादल निष्प्रभ करून टाकण्यात आलेले आहे. सरकारी यंत्रणा पक्षाघात झाल्याप्रमाणे लुळीपांगळी पडली आहे. कुणी म्हणजे कूणी स्वत:ला सुरक्षित समजू शकत नाही अशी दुर्दैवी स्थिती आहे. अगदी सीमेवरचा सैनिक हाती बंदूक व हत्यार असूनही स्वत;ला असुरक्षित समजतो, इतकी दुर्दशा कधीच नव्हती. पाकिस्तानातही अराजकच आहे. पण निदान तिथले सत्ताधीश जगाला आपण समर्थ आहोत असे दाखवून तरी देतात. भारतात कोण सरकार आहे, कारभार कोण चालवतो व निर्णय कोण घेतो, ते खुद्द पंतप्रधानालाही माहित नाही, अशी स्थिती आहे. उलट पाकिस्तानकडे बघा. अमेरिकन सेनेने पाकच्या मित्रांनाही गाफ़ील ठेवून अबोटाबाद येथील कारवाई केली होती. त्यात पाकिस्तानचे नाक कापले गेले, यात शंकाच नाही. तिथल्या एका मोठ्या बंगल्यात ओसा्मा बिन लादेन लपल्याची कुणकुण अमेरिकन हेरखात्याला लागली होती. तर पाकिस्तानी पोलिस, लष्कर व हेरखात्याला खबर लागू न देता मोजक्या अमेरिकन सैनिकांनी अबोटाबादपर्यंत मजल मारून थेट धडक कारवाई केली. ओसामाच्या बंगल्यावर छापा मारून त्यालाही ठार मारून; त्याच्या मृतदेहासहीत त्या सैनिकांनी पळ काढल्यावर पाकला जाग आली. त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याची तक्रार पाकिस्तानने केली. पण भारताने निषेधाचे खलिते पाठ्वून गप्प बसावे तसे पाकिस्तानने केले नाही. त्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला व मित्र देशालाही चांगला धडा शिकवला. भारताच्या नेभळट सरकारने तेवढी हिंमत कधी दाखवली आहे काय?  

   अबोटाबादच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेच्या अफ़गाण भूमीतील सेनेला कराची बंदरातून होणारी रसद तोडली होती. त्यांचे सामान घेऊन जाणार्‍या ट्रक व वहानांना संरक्षण द्यायचे नाकारले होते. शेवटी अमेरिकेला उझबेगिस्तानच्या मार्गाने प्रचंड वळसा घालून आपल्या सेनेला रसद पाठवण्याची वेळ आली होती. अमेरिकेच्या नाड्या आखडण्याची कृती तरी पाकिस्तानने करून दाखवली, हे मानावेच लागेल. शेवटी ओसामाला ठार मारल्याच्या बढाया मारणार्‍या अमेरिकेला पाकिस्तानच्या काही अटी मान्य कराव्या लागल्या, तेव्हाच पुन्हा त्यांची रसद कराची मार्गे सुरू होऊ शकली. पाकिस्तानसारखा आर्थिक दुबळा व अमेरिकेच्या अनुदानावर चालणारा देशही इतका स्वाभिमान दाखवू शकतो, तर महाशक्ती होण्याच्या वल्गना करणार्‍या भारताला पाकिस्तानच्या नाड्या आवळणे अजिबात अशक्य नाही. पाकिस्तानला अनेक बाबतीत भारतावर अवलंबून रहावे लागते. त्याबाबतीत तरी भारताने कधी कठोर धोरण राबवून दाखवले आहे काय? उलट पाकिस्तानने एखादी आगळीक करावी, की आमचे महान राज्यकर्ते ‘गट्टी फ़ू’ म्हणून रुसून बसल्याचे नाटक करतात आणि दोन चार महिन्यात पाक राज्यकर्त्यांनी बोलणी करायची भाषा वापरली; मग कुठलीही अट मान्य न करता पाकिस्तानला नव्या सवलती देऊन टाकतात. यासारखा बेशरमपणा जगात कुठलेही राज्यकर्ते करत नसतील. मुंबई हल्ल्यानंतर असेच झाले होते. मग पुन्हा बोलण्यांचे वाटाघाटीचे आमिष पाकिस्तानने दाखवले आणि आमचे राज्यकर्ते क्रिकेट खेळण्यापासून अधिक पाकिस्तान्यांना विसा द्यायला धावत सुटले. तेवढेच नाही तर, पाक नेत्यांना खुश करण्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान केलेल्या कॅप्टन सौरभ कालीयाचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जायचीही टाळाटाळ भारत सरकारने केली. कुठली आई वा कुठला बाप आपल्या पोराला सैन्यात जायला देईल मग? 

   सरकार किंवा सत्ता असते कशाला असा प्रश्न आता प्रत्येक भारतीयाने स्वत:ला विचारण्याची पाळी आली आहे. कारण हे सरकार साधा रस्त्यावरचा सामुहिक बलात्कार रोखू शकत नाही. सरकारी कामकाजात चाललेले घोटाळे व भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. दंगली व घातपात थांबवू शकत नाही, की त्याचा बंदोबस्त करू शकत नाही. लढायला सैन्य आहे, त्याला प्रतिकार करा इतका आदेश देण्याची शक्तीसुद्धा गमावून बसलेले सरकार हवे कशाला असा प्रश्न पडतो. सत्यजित रे यांचा प्रेमचंदच्या कथेवर आधारित एकमेव हिंदी सिनेमा खुप गाजला होता. ‘शतरंज के खिलाडी’ नावाच्या त्या चित्रपटात ब्रिटीश व्यापारी हा देश हळूहळू काबीज करत चालले होते, तेव्हाच्या राजकीय इतिहासाचे चित्रण. कथन आहे. अवध हे संस्थान धोक्यात आलेले असते. तिथला नबाब नाचगाण्यात रममाण झालेला असतो आणि त्याचे सरदार जहागिरदार पुर्वजांच्या पराक्रमाची गाथा गुणगुणत बुद्धीबळ खेळण्यात गर्क असतात. कंपनी सरकार सेना घेऊन येते अशी खबर लागताच लढावे लागेल म्हणुन त्यातले दोन बुद्धीबळपटू सरदार खेड्यात पळ काढतात व शतरंज खेळत, हुक्का ओढत मौज करतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सेवा देणारा इवलासा गडी मुलगा दिवस उजाडताना येणारी कंपनीची फ़ौज एका झाडाआड लपून भयभीत होऊन बघत असतो. त्याला लढाईचे भय नसते. तो विषण्ण मनाने पुटपुटतो, ‘कौनो लडत नाही.’ त्याच्या त्या मोजक्या तीन शब्दातली वेदना खुप बोलकी व इतिहासाला झालेल्या यातनांची व्याकुळता सांगणारी आहे. परवा सीमेवर दोघा जवानांचे शीर धडावेगळे करून पळवण्याची बातमी आल्यावर जी संताप व भयाची लहर देहातून दौडत निघून गेली ती ‘शतरंज के खिलाडी’तल्या त्या मुलाची आठवण करून गेली होती. 

त्या मुलाचे काय जाणार होते? तो काय गमावणार होता? नबाब, सरदार, जहागिरदार, अमीर, उमरावांची सत्ता जाणार होती. संस्थान खालसा होणार होते. पण त्यामुळे त्या सेवकाचे काय जाणार होते? तो किंवा तिथली त्याच्यासारखी रयत गरीबीत जगत होती आणि तशीच जगणार होती. या दिवाळखोर सरदारांना सलाम करायचा तर, नव्या मायबाप सरकारला मुजरा करावा लागणार होता. ना त्याची गरीबी, दारिद्र्य संपणार होते, ना नव्याने गुलामी त्यांच्या नशीबी येणार नव्हती. त्याच्या जगण्यात कुठलाही फ़रक पडणार नव्हता, तरी त्या मुलाचा जीव कासाविस झाला होता. प्रतिकार व्हायला हवा, लढायला हवे असे त्यालावाटत होते. मात्र ज्यांनी आजवर सत्ता उपभोगली वा सत्तेची फ़ळे चाखली; सत्ताधीश म्हणून मुजरे घेतले, त्यांना संस्थान खालसा होऊ घातले होते, त्याची फ़िकीर नव्हती. फ़िकीर होती सामान्य रयतेला. जी रयत म्हणजे सामान्य जनता देश, राष्ट्र, राज्य असल्या अस्मितेसाठी आपला प्राण व सर्वस्व उपाशी पोटीसुद्धा पणाला लावते, कारण या उपाशी वा अर्धपोटी जगणर्‍यांना अनंत कष्ट सोसूनही जगण्याची उर्जा त्या अमुर्त अस्मितेतून व अभिमानातून मिळत असते. पैसा व साधनांपासून वंचित असणार्‍यांचा जगण्या झगडण्याचा तेवढाच आधार असतो. कारण तेवढीच त्यांची ओळख असते. त्यांनाच अवधचे स्वातंत्र्य जाणार याची फ़िकीर लागली होती. तशाच आजच्या अर्धपोटी सामान्य भारतीयांना जवानाच्या विटंबनेची वेदना असह्य झाली आहे. मात्र बुद्धीमान बुद्धीपटू विचारवंत साहित्य संमेलनातल्या चित्रे, नावे, स्मरणात रममाण झालेत. बौद्धिक हुक्का फ़ुंकत कौज करीत आहेत. आणि आपण सामान्य जनता मात्र  त्या मुलासारखे विषण्ण मनाने पुटपुटत आहोत, ‘कौनो लडत नाही.’ 
 
  आज जेव्हा सीमेवरील त्या दोघा जवानांची निर्धृण हत्या झाली व त्यांची शिरे धडवेगळी करण्यात आली तेव्हा आजचे सत्ताधीशही तशीच बुद्धीबळाच्या पटावरची प्यादी खेळवत बसले आहेत आणि उपाशी पोटी जगणारी, दारिद्र्यात पिचलेली, पण राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगणारी सामान्य जनता मात्र त्या दोघा जवानांसाठी अश्रू ढाळते आहे. आपण पाकिस्तानला धडा का शिकवत नाही? चोख उत्तर का देत नाही, अस सवाल विचारते आहे. त्या सामान्य नागरिक व ‘खिलाडी’मधल्या मुलाचे शब्द वेगळे आहेत काय? त्यांना पडलेला प्रश्न वेगळा आहे काय? त्यांना सतावणारी वेदना वेगळी आहे काय? कुठलीहीस सत्ता किंवा स्वातंत्र्य कुणा एका राजा, बादशहा किंवा नेत्याच्या पराक्रमाने संपन्न झालेले नसते. त्यामागे हजारो, लाखो सैनिक व जनतेच्या योगदानाचे दायित्व असते. त्यातूनचे राष्ट्र व देशसंस्कृती उभ्या रहात असतात, त्यांची भरभराट होत असते. त्याच त्यागातून कष्टातून त्या समाज व देशाला ओळख मिळत असते. आणि परकीयांच्या आक्रमाणातून व हल्ल्यातून तीच ओळख पुसली जाणार असते. त्या ओळखीलाच अस्मिता व स्वाभिमान म्हणतात. आज सामान्य भारतीय दोन जवानांच्या हत्येने वा शिरच्छेदाने विचलित झालेला नाही. असे शेकडो जवान विनाविलंब सैन्यात शहीद व्हायला भरती होतील. वेदना आहे ती बलिदान कोणासाठी द्यायचे? कशासाठी द्यायचे असा. जे सत्ताधारी लढायला व स्वाभिमान अस्मिता राखायलाही प्रतिकार करू बघत नाहीत, त्यांच्यासाठी प्राण पणाला लावायचे? लोकांच्या मनातले काहुर तेच आहे. शे दिडशे वर्षे उलटून गेली असतील त्या अवधच्या इतिहासाला, पण आपली वेदना त्याच सामान्य मुलाइतकी ताजी आहे ना? मन म्हणते ना? 

कौनो लडत नाही.

शनिवार, ५ जानेवारी, २०१३

दिल्ली आणि मुंबईत नेमका फ़रक कुठला?






   माणसाचे माणूसपण त्याच्या भावनिक गुंत्यामध्ये सामावलेले असते. त्या भावनांचा विसर पडला; मग तुम्ही मुळात माणुसकीलाच मुकत असता. मग तुमच्यापाशी किती हुशारी आहे किंवा तुम्ही किती बुद्धीमान आहात, त्याने फ़रक पडत नाही. तुम्ही माणसात रहायला नालायक असता. कारण समाज म्हणून जगणार्‍यांना एकमेकांच्या सहवासातच जगावे लागत असते आणि म्हणूनच परस्परांच्या सुखदु:खाशी समरस सुद्धा व्हावे लागत असते. त्यापासून दुरावलात तर त्या समाजाचे काही बिघडत नाही, तुमचेच अडत असते. हे सत्य अगदी कुठल्या खेड्यात जन्मलेल्या किंवा कुठलेही शिक्षण न घेतलेल्या अडाणी माणसालाही नेमके ठाऊक असते. म्हणूनच ती माणसे कितीही अडचणी व संकटावर मात करून समाज म्हणून टिकून रहातात. उलट स्वत:ला बुद्धीमान व हुशार समजणार्‍यांना आपल्या बुद्धीमत्तेची झिंग कधीकधी इतकी चढते, की आपल्यामुळेच जग अस्तित्वात आले अशा मस्तीत ते वास्तवाचे भान सोडून बरळू लागतात. सहाजिकच शहाणे असूनही हास्यास्पद ठरत असतात. आपण शहाणे आहोत आणि म्हणून उर्वरित जग मुर्खांचे आहे; असे भास त्यांना होऊ लागतात. मग सभोवतालचे सत्य दिसत असूनही बघायची इच्छाच त्यांना होत नाही. आणि बघायची इच्छाच नसली, तर दिसणार कसे आणि दिसत असून बघायची इच्छाच नसली, तर दिसूनही बघणार कोण? परिणामी अशा लोकांना सामान्य जनतेला दिसणारे व कळणारे सत्य बघता येत नाही की उमगत नाही. तरीही आपण सांगतो, तेच सत्य;काही  अशा थाटात हे शहाणे सांगू लागतात, आणि लोक त्यांच्याकडे मुर्खाची बडबड म्हणून बघू लागतात. राजदीप सरदेसाई नावाचा असाचे एक शहाणा आहे. दिड महिन्यापुर्वी त्याने असाच एक शहाणपणा कारण नसताना केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत निधन झाले आणि बघता बघता मुंबईचे व्यवहार थंडावत गेले. मुंबई त्यांच्या मृत्य़ूनंतर त्यांना आदर दाखवण्यासाठी बंद झाली. त्यावर शहाणपणा करताना राजदीपने ट्विटरवर लिहिले होते, ‘दिल्लीत नेता मेला तर भयाने किंवा आदराने शहर बंद होत नाही, मुंबई बंद होते, याचा अर्थ काय?’ 

   अनेक शिवसेनप्रेमींना त्याचा रागही आलेला होता. राजदीपलाही तेच हवे होते. आपण शिवसेनेला घाबरत नाही; हे दाखवण्य़ासाठीच त्याने असे डिवचणारे शब्द जाहिरपणे लिहिले होते. त्यातून नुसते शिवसैनिकांना डिवचणे एवढाच त्याचा हेतू नव्हता; तर मुंबईकरांना तुम्ही सेनेला घाबरता, अशी हेटाळणी सुद्धा करायची होती. त्यातून दिल्ली कशी राजकीय व सामाजिक पातळीवर समजदार लोकांचे शहर आहे; अशी शेखी सुद्धा मिरवायची होती. पण म्हणून ते वास्तव अजिबात नव्हते. जेव्हा आपल्याला प्रामाणिकपणे एखादा मुद्दा मांडायचा असतो; तेव्हा त्यातले वास्तव खोटे पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी असते. पण राजदीपचा हेतू शुद्ध नव्हता, की त्याच्या निर्बुद्धतेला कधी वास्तवाचे भान नसते. त्यामुळेच नसलेली अक्कल वापरून तोंडघशी पडण्यातच त्याला नेहमी धन्यता वाटत आलेली आहे. बहुतांश लोकांना आता अशा अर्धवटरावांच्या अकलेचा अंदाज आलेला असल्याने; कोणी त्यांच्या मुर्खपणाची सहसा दखल घेत नाही. पण लोकांचे काम कधीकधी परिस्थिती व नियती आपल्या हाती घेते. इथे राजदीपच्या बाबतीत नेमके तेच घडले. त्याच दिल्लीत जिथे नेता मेला म्हणून व्यवहार बंद होत नाहीत; तिथे महिनाभरात परिस्थिती अशी निर्माण झाली, की राजकीय नेते जिवंत आहेत, त्याचाच दुखवटा साजरा करण्यासाठी भयभीत दिल्लीकरांनी दोन आठवडे दिल्ली बंद करून टाकली. शिवसेनेच्या प्रभावाखालची मुंबई आणि सेक्युलर माध्यमांच्या लाड्क्या सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्या प्रभावाखालची दिल्ली, यात नेमका कोणता फ़रक आहे; ते राजदीपसारख्या मुर्खांना कळावे म्हणून की काय नियतीने अशी परिस्थिती आणली. कुठला फ़रक आहे दिल्ली आणि मुंबईमध्ये?

   आपल्या नेत्याचे निधन झाले तर आपला त्राता कोण राहिला नाही, अशा भावनेने मुंबईची जनता व्यवहार बंद ठेवून रस्त्यावर येते आणि त्याला श्रद्धांजली वहाते. त्याचे नेमके उलट टोक दिल्ली आहे. तिथे गेले दोन आठवडे लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते राजकीय नेते मेल्यामुळे नाही; तर जिवंत असून मुर्दाडासारखे वागत असल्याने. कसे उलटे टोक आहे ना? दिल्लीकरांना आपले नेते जिवंत आहेत; याचीच भिती वाटू लागली असून ते मरत नाहीत, याचे अतीव दु:ख झाल्याने रस्त्यावर उतरावे लागले आहे. दिल्ली बंद करावी लागली आहे. योगायोग कसा आहे बघा. दिल्लीत बलात्काराची घटना घडली त्याच्या नेमक्या एक महिना आधी, मुंबईत शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले होते आणि जवळपास त्याच तारखेला डिसेंबरमध्ये दिल्लीतली घटना घडून प्रक्षोभ सुरू झाला. फ़रक एकच आहे. दिल्लीत कोणी नेता मेलेला नाही, तर जिवंत आहेत. लोकांचा प्रक्षोभ किंवा दु:ख कशासाठी आहे? नेते जिवंत आहेत म्हणूनच ना? पण हे वास्तव दिल्लीत बसून राजदीपला कधी कळणार आहे का? ही आजच्या आपल्या विद्वानांची दुर्दशा आहे. त्यांची लोकभावना व जनमानस यांच्याशी किती फ़ारकत झाली आहे; त्याचा अंदाज येऊ शकतो. लोक मुंबईत रस्त्यावर आले; तेव्हा दु:ख अनावर झाल्याने त्यांनी तसे केले, त्याचे भान अशा विद्वानांना नसते. आणि दुसरीकडे दिल्लीतही लोक खवळलेत कशाला; त्याचाही यांना थांगपत्ता लागलेला नाही. म्हणूनच दिल्लीतल्या नेताविहीन संतप्त जमावाला कोणी अराजक म्हणतो आहे, तर कोणी त्याला व्हायरस म्हणतो आहे. धावत्या बसमध्ये मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याने लोक भयभीत होऊन रस्त्यावर आले, तर लोक का चिडलेत, तेच ज्यांना कळत नाही, त्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? आणि ज्यांना माणूस म्हणता येत नाही, त्यांची बुद्धी माण्ससारखी काम करणार कशी? मग ते अशी खुळ्यासारखी मते व वक्तव्ये करू लागतात व लिहू लागतात.

   आता जरा त्यांना बाजूला ठेवून देशाचे भावी पंतप्रधान म्हणून राजदीप ज्याचा अधुनमधून उल्लेख करतो; त्या राहुल गांधींची बुद्धीमत्ता तपासून पाहू. एकटा राजदीप नव्हे, कुमार केतकरांपासून अनेक विद्वान, राहुलमध्ये भावी पंतपर्धान बघत असतात. त्यांचे अशा बलात्काराबद्दल कुठले मतप्रदर्शन समोर आलेले नाही. पण समजा त्यांना मत व्यक्तच करायचे असते; तर ते काय म्हणाले असते? मुंबईतल्या बॉम्बस्फ़ोटानंतर त्यांनी त्याचा संकेत दिलेला आहे. अवघ्या दिड वर्षापुर्वी मुंबईत काही बॉम्बस्फ़ोट झाले होते. तेव्हा राहुल गांधी ओरिसात भुवनेश्वर येथे होते. त्यांनी त्या स्फ़ोटानंतर आपल्या गृहमंत्र्यांची पाठ थोपटली होती. ते म्हणाले होते, ‘देशातला प्रत्येक घातपात थांबवता येणार नाही. नव्याण्णव टक्के अशा घटना बंदोबस्त व जागरुकतेमुळे रोखण्यात आलेल्या आहेत. एखादा टक्का घटना घडायच्याच. त्या थांबवणे अशक्य आहे.’ हे राहुल गांधींचे तर्कशास्त्र आहे. त्यानुसार दिल्लीच्या बलात्काराबद्दल ते काय म्हणतील ते समजू शकते ना? देशातल्या ९९ टक्के महिला मुली सुरक्षित आहेत. एक टक्का महिलांवरचे बलात्कार होणारच. ते थांबवता येणार नाहीत. शंभर टक्के बलात्कार थांबवणे अशक्यच आहे. दिल्लीचे लोक रस्त्यावर त्याच कारणास्तव रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना अशा भावी पंतप्रधानाचीच भिती वाटू लागली आहे. कारण त्याच्या तर्कशास्त्रानुसार शंभरातल्या ९९ महिलांना सुरक्षित ठेवायचे असते आणि एकीवर बलात्कार झाला तर ते फ़ारसे मनावर घ्यायचे नसते. दिल्लीचे लोक त्यालाच घाबरले आहेत. त्यांना आपल्यावर असे लोक राज्य करतात आणि ते जिवंत आहेत, याचीच भिती वाटते आहे. असे लोक जिवंत व सत्तेवर असणे; म्हणजे राजरोस बलात्कार, अपहरण होणार याचीच हमी असणार ना?

   अर्थात राजदीपलाही अशाच राज्यकर्त्यांचे कौतुक आहे. त्याच्यासारख्या बहुतेक संपादक, पत्रकार, बुद्धीमंतांना हेच कायद्याचे राज्य वाटते. त्यामुळेच दिल्लीचे नागरिक एका सामुहिक बलात्काराने चिडून रस्त्यावर का उतरले, त्याचे या शहाण्यांना नवल वाटते आहे. तर ‘दिव्य मराठी’चे अग्रलेख लिहिणार्‍या शास्त्रींना असे चिडून रस्त्यावर येणे व्हायरस वाटतो आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा? बलात्कार होतच रहाणार आणि ते सहन करण्याची लोकांनी तयारी ठेवली पाहिजे. ती तयारी नसेल तर असे लोक म्हणजे अशी जनता सेक्युलर भारतात जगायलाच नालायक आहे. आता मग आपण माघारी मुंबईला येऊया. जेव्हा ठाकरे निधनानंतर राजदीपने ट्विटरवर आपली अक्कल पाजळली होती, तेव्हाच पालघर येथील एका मुलीने तसेच काही आपल्या फ़ेसबुकवर लिहिले होते. त्यातून कल्लोळ माजला तर भावना भडकवल्या म्हणून पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंदवला होता. तेव्हा हेच तमाम विचारवंत पत्रकार संतप्त होऊन मैदानात कुठल्या भूमिकेतून उतरले होते? आपले मत व्यक्त करणार्‍या त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्याची सर्वांना फ़िकीर लागली होती. त्यावरून इतका कल्लोळ माजवण्यात आला, की त्याची दखल तात्काळ प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष अध्यक्ष न्या. मार्कंडेय कटजू यांच्यापासून केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यापर्यंत तमाम लोकांना घ्यावी लागली होती. पालघरच्या एका मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी इतके हळवे झालेले हे तमाम सेक्युलर विचारवंत आणि पत्रकार; दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराविषयी मात्र कमालीचे उदासिन आहेत. एका मुलीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले व तिच्या जिवाशी खेळ खेळला गेला; त्या मुलीबद्दल संपुर्ण उदासिन असलेलेच लोक दुसर्‍या मुलीच्या भ्रामक मतस्वातंत्र्याचा बाबतीत मात्र कमालीचे हळवे होतात, हा विरोधाभास कोणी तपासून तरी बघितला आहे काय? असे का होत असते?

   ती शाहीन नावाची मुलगी फ़ेसबुकवर आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली होती, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्‍याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्‍याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय?

   अशा मुलीला लोकभावना कळत नसते, समाजात जगताना आसपासच्या लोकांच्या भावनांची कदर करायची असते याचे भान नसते, त्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? राहुल गांधी, राजदीप सरदेसाई, किंवा ही शाहीन यांच्या भाषा व विधानाचा गर्भितार्थ कोणी कधी गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे काय? त्यामागची प्रवृत्ती कधी आपण उलगडून बघितली आहे काय? त्यातली पाशवी वृत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे काय? माणसामध्ये आणि पशूमध्ये एक अत्यंत मोलाचा व सुक्ष्म फ़रक आहे. माणूस हा सहभावनेने एकत्र वागणारा, जगणारा प्राणी आहे. पशू कळपात जगतात ते सहभावना किंवा सहवेदना म्हणून नव्हे; तर सुरक्षेची गरज म्हणून झुंडीने जगतात. पण बाकी त्या कळप वा झुंडीमधे त्यांचे वर्तन अत्यंत आत्मकेंद्री व स्वार्थी असते. एकमेकांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याची स्पर्धाच चालू असते. दुसरा जखमा वेदनांनी व्याकुळ झाला असतानाही, कळपातले त्याच्याकडे अत्यंत त्रयस्थपणे तुच्छतेने बघत असतात. कारण तो दुबळा असेल, जखमी असेल तर कळपाला आता त्याचा उपयोग उरलेला नसतो. नेमका याच्या उलटा प्रकार माणसामध्ये आढळतो. आपल्यातल्या जखमी, दुर्बळ गरजूसाठी माणसातले सबळ, सशक्त स्वत:च्या तोंडचा घास भरवून; त्याला जगायला मदत करत असतात. स्वत: झीज सोसून मरू घातलेल्या निकामी माणसाला, आप्तस्वकीयालाही जगवायला धडपडतात, कष्ट उपसतात. अडीअडचणी, गैरसोय सहन करतात, त्यांना माणसांचा समूदाय किंवा मानव समाज म्हणतात. त्याचा कुठला लवलेश या उपरोक्त विधानांमध्ये दिसतो काय? राजदीप, राहुल वा शाहीन यांची तीन विधाने मी मुद्दाम इथे नमूना म्हणून पेश केली आहेत. बाकीच्या तथातथित विद्वान, सेक्युलर व अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांची अशी शेकडो विधाने व वाक्ये मी दाखवू शकतो. त्यात पाशवी उर्मटपणा, मुजोरी व अहंकार ओसंडून वहाताना दिसू शकेल. त्यात शिकारी श्वापदाच्या वृत्तीचा हिंस्र चेहरा बघता येईल. त्यात कुठेही मानवी भावनांचा लवलेश आढळून येणार नाही.

   तुम्ही कधी डिस्कव्हरी वा नॅटजिओ वाहिन्या बघत असाल तर त्यातल्या सिंहीणी, वाघीणी कशा आपल्या पिलांचा मायेचे चाटतांना दिसतील. पण जेव्हा झेब्रा, हरीण वा अन्य सावजाचे पिलू असेल, तर त्यावर हिंस्र आवेशात हल्ला करताना दिसतील. त्यापेक्षा अशा शहाण्यांचे वर्तन व मनोवृत्ती वेगळी आहे काय? ज्या तीन महनीय लोकांची वक्तव्ये मी इथे सादर केली आहेत, त्यांना कुठल्या संदर्भात माणसे म्हणायचे त्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? माणूस म्हणून ज्या मूलभूत प्रेरणा किंवा प्रवृत्ती व जाणिवा असायला हव्यात; त्याचाच ज्यांच्याकडे अभाव आहे, ते आपल्याला माणूसकी व मानवी मूल्यांचे धडे शिकवू बघतात, हीच आजच्या बुद्धीवादी मुठभरांची शोकांतिका आहे. ते आपले माणूसपणच विसरून गेलेत किंवा गमावून बसले आहेत आणि तावातावाने मानवी समाजाच्या उत्थानाच्या गप्पा मारत असतात. त्यांच्या अशा वागण्यला प्रतिष्ठा मिळाल्यानेच समाजातील अमानुष विकृती सोकावत चालल्या आहेत. त्याचेच दुष्परिणाम मग दंगली, घातपात, बलात्कार व असहिष्णूता अशा स्वरूपात आपल्याला भोगावे लागत असतात. जेव्हा त्यांच्या अशा मुर्खपणाचा विपरित परिणाम समाजाला भोगावा लागत नसतो, तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असते. पण जेव्हा त्यापासून समाजाच्या माणुसकीलाच काळीमा फ़ासली जाण्याचे परिणाम घडून येऊ लागतात, तेव्हा समाज टिकवण्यासाठी व सुरक्षित भवितव्यासाठी अशा प्रवृत्तीच्या मुसक्या बांधाव्याच लागतात. त्यांना स्वातंत्र्य म्हणजे उर्वरित करोडो, लाखो लोकांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरची गदा असते.

   जे लोक गुजरातमधल्या सोहराबुद्दीन नामक एका गुंडाला पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार मारले त्याच्या न्यायासाठी गेली आठ वर्षे आपली सर्व बुद्धी पणाला लावून ओरडा करीत आहेत; त्याच सेक्युलर माध्यमांना दिल्लीत एका निरागस, निरपराध मुलीवर अमानुष बलात्कारासाठी दोन आठवडे लोक रस्त्यावर येऊन न्याय मागतात, तो अतिरेक वाटतो, यातूनच त्यांच्या पाशवी मानसिकतेची प्रचिती येत असते. सामान्य जनता व नागरिक म्हणजे त्यांना त्यांच्या सेक्युलर प्रयोगशाळेतील मुकी जनावरे वाटतात. अन्यथा त्यांनी दिल्लीतल्या निदर्शनांना व्हायरस किंवा मुजोरांची मस्ती कशाला म्हटले असते? त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या श्रद्धांजलीसाठी लोकांनी बंद पाळला तर कशाला पोट दुखावे? जेव्हा शिकारीत मारली जाणारे सामान्य प्राणी एकजुटीने श्वापदांच्या विरोधात जमा होऊ लागतात, तेव्हा त्यांना धडकी भरत असते, त्यातलाच हा प्रकार आहे ना? आजच्या बुद्धीवादी वर्गाचे हितसंबंध व स्वार्थ इथल्या एकूणच भ्रष्ट व्यवस्थेमध्ये सामावलेले आहेत. आणि म्हणूनच माध्यमातले संपादक, पत्रकार, त्यांच्याच पठडीतले विचारवंत, अभ्यासक प्रत्येक लोकचळवळी विरुद्ध कंबर कसून उभे रहाताना दिसतील. त्या लोकभावना व लोकचळवळीची हेटाळणी करताना दिसतील. प्रत्येक मानवी भूमिका व भावना-जाणिवेची टवाळी करताना दिसतील. त्यामागचा क्रुर हेतू समजून घेण्याची गरज आहे. सावजाने तक्रार करणे कुठल्या शिकारी श्वापदाला आवडू शकते? बलात्कारी गुंडाला तरी विरोध वा प्रतिकार करणारी महिला गुन्हेगारच वाटत असते ना? त्या बसमधील बलात्कारातला प्रमुख आरोपी काय म्हणाला? तिने प्रतिहल्ला चढवला म्हणून इतके घडले. त्याच्या या वाक्यात आणि सुजय शास्त्रीच्या ‘दिव्य मराठी’च्या अग्रलेखात नेमका कितीसा अरक आहे? दिल्लीतल्या आंदोलनाचे विरोधक बुद्धीचे बळ पणाला लावून प्रत्यक्षात कोणाचे समर्थन करत आहेत? बलात्काराचेच समर्थन करीत नाहीत काय? बलात्काराने, अन्यायाने चिडून उठण्याला त्यांचा आक्षेप आहे. म्हणजेच निमूट अन्याय अत्याचार सहन करा, असाच त्यांच दावा नाही काय? फ़्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी राजवाड्यावर चाल करून गेलेल्या मोर्चाला राजकन्या काय म्हणाली होती? ‘खायला पाव मिळत नाही? मग केक खा’, त्यापेक्षा आजच्या पत्रकार बुद्धीमंतांचे दावे वेगळे आहेत काय? राष्ट्रपती भवनाच्या दिशेने गेलेल्या निदर्शकांवर लाठीमार झाला, त्याचे समर्थन करणारे त्याच फ़्रेंच राजकन्येचे आप्तस्वकीय नाहीत काय? मुंबई व दिल्लीच्या जनतेमध्ये तसूभर फ़रक नाही. सामान्य जनता आणि भांडवली गुंतवणुकीने श्रीमंती आलेल्या श्वानवृत्तीच्या इथल्या मुजोर बुद्धीमंत पत्रकारांच्या जीवनमूल्यांमध्ये मोठा फ़रक पडला आहे.